अतिथि देवो भव
अतिथि देवो भव
(आशिष महाबळ, LAMAL, 10 Dec 2011)
अनाहुताला देवासमान वागवायची पौर्वात्य प्रथा प्रचीन आहे. घरोघरी शक्य असेल त्याप्रमाणे रोज रात्री थोडे अन्न देखील कोणी उगवल्यास उपयोगी पडावे म्हणुन वगळुन ठेवल्या जाई. ही रीत नक्कीच हीतकारी व मानवताभिमुख होती. आजकाल मात्र, निदान शहरांमधे, निरोप न पाठवता जाण्याचा प्रघात नाही. अचानक टपकणे शिष्टाईला धरुन नाही असा समज आहे. जुन्या पद्धतीचा दुरुपयोगही केल्या जायचा. गम्मत म्हणजे जिथे देवांना किम्मत नसायची अशा ठिकाणी देव अतिथ्याच्या रूपात पोचून आपला कार्यभाग साधायचे. विष्णुचेच घ्या. सर्वशक्तीमान होण्याकडची आपली वाटचाल बलीने सुरु ठेवली होती. त्यात विघ्न आणायला वामनावतारात शेषशाई पोचले व शुक्राचार्याला न जुमानता आपले मिशन साध्य केले. पण ते सर्वश्रुत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे किस्सा काशीचा. स्कंदपुराणातील काशीखंडातील या गोष्टीत भगवान अ-तिथी न येता तिथी सांगुन येतात आणि तरीही बसलेली घडी मोडुन नव्या घडीचा पाया बनवण्यात यशस्वी होतात.
खूप पुर्वी जगभर दुष्काळ पसरला होता. ६४ वर्षे चाललेल्या या आपत्तीमुळे पृथ्वीचे भवितव्य धोक्यात आले होते सामाजिक व्यवस्था कोलमडू लागली होती व खुद्द ब्रह्मा काळजीग्रस्त होता. दिव्यदृष्टीने त्याला दिसले की आपले राज्य सोडुन सध्या वाराणसीत तप करत असलेला रिपुंजय राजाच केवळ स्थिती पुर्ववत करण्यात मदत करु शकेल. ब्रह्माने रिपुंजयाची मनधरणी केल्यावर नाईलाजाने तो एका अटीवर पृथ्वीवर राज्य करण्यास तयार झाला: सर्व देवांनी पृथ्वी सोडुन द्यायची व स्वर्गात आपापल्या जागी जायचे. ते मानण्याशिवाय ब्रह्माला गत्यंतर नव्हते. एकच अडथळा होता आणि तो म्हणजे शिवाला वाराणसी सोडायला कसे तयार करायचे. योगायोगाने मंदर पर्वताने शिवाची आराधना करुन शिवपार्वतीने आपले बिऱ्हाड तिथे हलवावे असा वर मागीतला होता. त्याची मनोकामना पुर्ण व्हावी आणि ब्रह्माला त्याचा शब्द राखता यावा म्हणुन शिवाने काशी सोडायची तयारी दर्शविली. जाताजाता आपली खूण म्हणुत तेथे त्याने एका लिंगाची स्थापना केली. काशीतील हे पहिले लिंग. ते पाहुन ब्रह्मा, विष्णु आणि इतर देवांनीही एकेका लिंगाची तिथे स्थापना केली.
रिपुंजयाने, 'दिवोदास' हे नाम धारण करुन काशीतुन पृथ्वीवर राज्य करणे सुरु केले. बघता-बघता सगळीकडे सुबत्ता पसरली व धर्मपरायण आणि न्यायी म्हणुन दिवोदासाने नाव कमावले. सर्व लोक आपापल्या धर्माप्रमाणे वागत आणि एकुणच राहण्याकरता स्वर्गापेक्षा उत्कृष्ठ अशी काशीची ख्याति झाली. दिवोदास सर्व धर्म सांभाळत असुनही देवांनी त्याच्याविरुद्ध कारस्थाने रचणे सुरु केले. पृथ्वीवरुन येणारे हवन बंद झाले होते आणि त्यांचे वर्चस्व धोक्यात होते. त्याला जेरीस आणण्याकरता म्हणुन अग्नी, वायु व इंद्राने उष्णता, वारा व पाऊस नाहीस केला. पण दिवोदासाच्या तपाचे फळ इतके जबरदस्त की त्याच्या बळावर हे सर्व त्याने स्वत:च बनविले.
यादरम्यान शिवालाही काशी पुन्हा हवीहवीशी वाटु लागली होती. त्या दुराव्यामुळे तो अक्षरश: पेटला होता. शितकारी चंदन, चंद्र, गंगा या सर्वांचाही उपयोग त्या ओढीचा ताप शमविण्यात होत नव्हता. काशीला परतुनच सर्व ठीक होणार होते. पार्वतीचीही भुणभुण सुरु होती की प्रलयकाळी देखील कमळाप्रामाणे सुंदर असलेल्या, आणि शिवाच्या त्रिशुळाग्रावर वसलेल्या काशीत त्यांचे वास्तव्य असते. असे असतांना या सुंदर पण मन न रिझवणाऱ्या ठिकाणी आपण का आहोत? काशी जी की पृथ्वीवर आहे, पण पृथ्वीची नाही, जिथे मृत्युनंतर जन्म नसतो, पापाचे भय नसते, अशा त्या काशीत आपण कसे परतु शकणार? हजारो सुंदर, चमत्कृतीपुर्ण शहरे असली तरी, शिवा, तुझ्या काशीसमोर ती 'किस झाड की पत्ती'. दुराव्याचा हा ताप तुझ्याइतकाच मलाही होतो आहे. तिथे जाऊनच आपल्याला बरे वाटणार. वगैरे.
राजाच्या धर्मशासनात ढवळाढवळ कशी करावी याबद्दल शिवपार्वतीची विचारचक्रे फिरु लागली. रोगराई, वार्धक्य, मृत्यु सारख्या गोष्टी दिवोदासाला नामोहरम करु शकणार नव्हत्या, म्हणुन शिवाने एक कपट करायचे ठरविले. त्याने ६४ योगिनींना राजाला भुलविण्याकरता पाठविले. योग, मायादी शक्तींनी परीपुर्ण त्या दिवोदासावर आपले कौशल्य दाखवता येणार म्हणुन उल्हासीत झाल्या. त्याचबरोबर शिवाचेही कार्य त्यांच्याकडुन सिद्ध होणार होते व त्या रम्य काशीनगरीचेही दर्शन होणार होते. काशीत मायेनी त्यांच्यातील कुणी जादुगार बनल्या, कुणी डोंबारी, कुणी ज्योतिष्यी तर अजुन कुणी अजुन काही. पूर्ण एक वर्षभर त्यांनी प्रजेला व त्याद्वारे राजाला आपल्या कारस्थानांना बळी पाडायचा प्रयत्न केला पण त्यांना यश प्राप्त झाले नाही. आपली अयशस्वी तोंडे मंदर पर्वतावर परतून शिवाला दाखवण्याची त्यांच्यात हिम्मत नव्हती. आणि काशीवर तर त्यांचे प्रेम जडले होते. त्या म्हणाल्या की केवळ एखादी मुर्ख व्यक्तीच मुक्ती देणाऱ्या या काशीला एकदा पोचल्यावर बाहेर पडेल. असे म्हणुन त्यांनी तेथेच आपले बस्तान बांधले.
योगीनी न परतल्याचे पाहुन शिवाने सुर्याला पाचारण केले आणी काशीला जाऊन राजात दोष शोधायला सांगीतले. शेवटी एकदाचे काशीत जाता येणार या आनंदाने सूर्य थरथरु लागला. वर्षभर सूर्य वेगवेगळ्या वेषांमधे फिरत होता. कधी भिकारी, तर कधी व्यापारी तर कधी ब्राह्मण. पण दिवोदासात दोष काही तो शोधु शकला नाही. योगिनींप्रमाणेच काशीचा आश्रय घ्यायचे त्याने ठरविले. क्षेत्रसन्यासाचे हे व्रत काशीची हद्द कधीही न सोडण्याचे होते. 'इथे खुद्द धर्माचे वास्तव्य आहे. तो मला खचितच रुद्रापासुन वाचवेल. आधीच काशीला पोचणे इतके कठीण. का सोडुन जायची काशी? शिवाने रागावुन माझे तेज कमी केलेच तर काशीतील आत्मज्ञानाचे तेज मला प्राप्त होईल'. असा विचार करुन सुर्याने स्वत:ला १२ भागांमधे विभाजीत केले व १२ आदित्य म्हणुन तिथेच राहिला.
शिव मंदरवर काशीला परतायला अधीर होता. ज्याने तिसऱ्या डोळ्याने खुद्द कामदेवाला जाळले होते, तो स्वत: विरहाने जळत होता. शिवाने मग ब्रह्माला काशीला पाठवले. ब्रह्मा ब्राह्मणाच्या रूपात दिवोदासाच्या दरबारात पोचला व त्याची दशाश्वमेध यज्ञात मदत मागितली. यजमान म्हणुन दिवोदासाला अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी नियमांप्रमाणे तंतोतंत कराव्या लागल्या असत्या. कुठेनाकुठे त्याची चूक झाली असती आणि त्याचा धर्म भंग झाला असता. दिवोदासाने यज्ञास मान्यता दिली व बिचचूकपणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. तेंव्हापासुन ती जागा दशाश्वमेध या नावानेच ओळखल्या जाते व ते एक प्रमुख तिर्थ आहे. ब्रह्माने विचार केला की हे शिवाचेच स्थान आहे. या जागेच्या सेवेत राहिल्याने शिवाला राग येणे शक्यच नाही. येथे जर अनेक जन्मांच्या कर्मांची पापे धूतल्या जातात, तर कोण काशी सोडुन जाईल? त्याने तिथेच रहायचा निर्णय घेतला व ब्रह्मेश्वर नामक लिंगाची स्थापना केली.
ब्रह्मादेखील न परतल्याने शिव अस्वस्थ झाला होता. त्याचे कोणतेच दूत परतले नव्हते. त्याने आपल्या विश्वासु गणांपैकी शंकुकर्ण व महाकाळला काशीतील हालहवाल समजावून घ्यायला पाठविले. ते उत्साहाने निघाले, पण काशीला पोचताच शिवाच्या आज्ञांचा त्यांना विसर पडला. 'इथे एक लिंग स्थापन केले तर तिन्ही लोक बनविण्याइतके पुण्य प्राप्त होते. का सोडुन जाईल कोणी काशी'? असा विचार करुन ते तिथेच राहिले. मग शिवाने महोदर व घंटाकर्णाला पाठविले. ते ही काशीच्या जादुला भुलले व तेथे लिंगे स्थापन करुन राहिले. आता मात्र शिवाला हसु आले. त्याला कळले की तो ज्याला कुणाला पाठवेल काशी त्याला अडकवुन ठेवेल. त्याने इतर गणांनाही तिथे पाठवुन दिले पुर्णपणे समजुन की ते परत येणार नाहीत. त्याने विचार केला की त्याचे सर्वच गण तेथे असतील तर त्याला परतणे सोपे जाईल. सर्व गणांनी काशीत लिंगे स्थापन केली व मंदर पर्वतावर कुणीच परतले नाही.
शेवटी शिवाने त्याच्या मुख्य गणाला, गणेशाला, काशीला पाठविले. त्याने एका ब्राह्मण ज्योतिष्याचे रूप धारण करुन काशीच्या प्रजेला वश केले. लीलावती नामक राणीकरवी त्याची असाधारण ज्योतिषी म्हणुन झालेली ख्याती दिवोदासापर्यंत पोचली. दिवोदासाने त्याला राजवाड्यात बोलावुन घेतले. त्याच्या ज्ञानाने आणि वर्तणुकीने खुष होऊन राजाने दूसऱ्या दिवशी त्याला पुन्हा बोलावुन घेतले. तो आल्यावर दिवोदास त्याला म्हणाला, 'मी माझ्या प्रजेची ती माझी मुलेच असल्याप्रमाणे काळजी घेतली आहे. मी ब्राह्मणांचा आदर केला आहे आणि सर्वांचे क्षेम जपले आहे. पण आता सगळीकडे भरभराट असुनही मला अलिप्त वाटते. या सर्व चांगल्या कर्माचे फळ काय?'' यावर गणेश म्हणाला, ''तु खरेच खूप मोठी शक्ति बनला आहेस. चंद्र-सुर्य तूच आहेस, आठी दिशाही तूच आहेस. समुद्र, अग्नि, वायुही तूच बनला आहेस. पण तुझ्या प्रजेप्रती करत असलेल्या या तपश्चर्येचे फळ काय? त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी असमर्थ आहे, पण येवढे मात्र मी सांगु शकतो की आजपासुन अठराव्या दिवशी एक ज्ञानी ब्रह्मण येईल आणि तो तुला तुझे उत्तर देईल''. गणेशाच्या मनात विष्णु येऊन ते करेल असे होते. अशाप्रकारे विष्णुच्या आगमनाची पुर्वतयारी त्याने केली. पण इतरांप्रमाणेच मंदरला परतायची त्याची तयारी नव्हती, त्याला आलेल्या यशाबद्दल शिवाला सांगण्याकरता सुद्धा. त्याने स्वत:ला ५६ भागांमधे विभाजीत केले आणि शिवाच्या आगमनाची वाट पाहु लागला.
गणेशपण काशीहुन परतत नाही हे पाहिल्यावर शिवाने विष्णुला तिथे धाडले. तिथे पोचल्यावर विष्णुने आधी वरना व गंगेच्या संगमावर स्नान केले. ती जागा पादोदक तिर्थ या नावाने ओळखल्या जाते व विष्णुची तेथील प्रतीमा आदिकेशव या नावाने. विष्णुने मग एका बुद्ध भिख्खुचे रूप घेतले व पुण्यकिर्ती हे नाव धारण करुन किंचीत उत्तरेला असलेल्या सारनाथजवळ धर्मक्षेत्र या नावाचा आश्रम वसवला. विष्णुपत्नीने स्त्री-भिख्खुचे रूप घेतले व विज्ञानकौमुदी या नावाने वावरु लागली. गरुड पुण्यकिर्तीचा विद्यार्थी बनला व तिघेही आसपास सगळीकडे फिरुन बुद्धाचा संदेश पसरवु लागले. 'हे जग देवाने बनविले नसुन ते आपसुक बनते व नष्ट होते. देव नाहीतच व फक्त आत्मा खरा आहे आणि म्हणुन सर्व लोक समान आहेत. संहार वर्ज्य आहे व यज्ञयागांसाठी पण प्राण्यांची हत्या अयोग्य आहे. जातींमधे उच्च-निच असा भेदभाव करणे निशिद्ध आहे'. या जातीधर्माविरुद्ध असलेल्या शिकवणी ऐकुन हा-हा म्हणता लोकांचे आचरण बदलु लागले. स्त्रीया नवऱ्यांचा साथ सोडु लागल्या व पुरुषही भरकटु लागले. जातीव्यवस्था उध्वस्त होणे सुरु झाले होते. या गदारोळातच विज्ञानकौमुदीने लोकांना चेटुक व जादुटोण्याकडे आकर्षीत करणे सुरु केले.
राज्यातील धर्माचरण या तीन बौद्धांमुळे पुर्णपणे मोडकळीस आले होते. दिवोदासाची शक्ति क्षीण होऊ लागली व राज्याबद्दलची त्याची अनास्था वाढु लागली. गणेशाने सांगीतलेल्या अठराव्या दिवसाची तो आतुरतेने वाट पाहु लागला. अठराव्या दिवशी विष्णु एका ब्राह्मणाचे रूप घेऊन दिवोदासाच्या दरबारात आला. राजाने त्याचे चांगले आदरातिथ्य केले आणि राज्य व जगाबद्दल त्याला वाटु लागलेल्या अनासक्तीबद्दल त्याने त्याला सांगीतले व विचारले की या सर्व कर्मापासुन मोकळीक कशी मिळवायची.
विष्णु उतरला, 'राजन, तु उत्तम प्रकारे राज्य केलेस हे योग्यच झाले. तुला आता मुक्त व्हावे असे वाटते आहे हे ही योग्यच आहे. तु देवांना जरी जुमानले नसलेस तरी धर्माचे पालन केले आहेस. तुझे एकमेव पाप म्हणजे शिवाला काशीबाहेर घालविणे. त्या पापापासुन मुक्ती कशी मिळवायची ते ऐक. तु एका लिंगाची स्थापना कर. तेवढ्या एका कृत्यानेच तुला सर्वोच्च स्वर्गात स्थान मिळेल. तसे तुझे हे पाप भाग्यकारीच कारण त्यामुळे शिवाच्या विचारात रात्रंदीवस तुच असतोस. तो तुला घालवावे कसे ह्याचा जरी विचार करत असला तरी शेवटी सतत विचार तुझाच करतो.'
विष्णु दरबारातुन निघुन गेल्यावर दिवोदासाने राज्यकारभार आपल्या मुलाच्या हाती सोपवला, दिवोदासेश्वर नामक लिंगाची स्थापना केली व त्याची षोडशोपचारे पुजा केली. त्याला न्यायला आलेल्या रथात बसुन तो शिवाच्या उच्चतम स्वर्गात पोचला. इकडे आपला कार्यभाग साधल्यानंतरही विष्णुला काशी सोडवेना. त्याने गरुडाकरवी शिवाला निरोप पाठवला आणि पंचनद नावाच्या ठिकाणी आवास प्रस्थापीत केला.
गरुडाकरवी विजयाचा निरोप मिळताच शिवाला अतोनात आनंद झाला. सर्व देवांचा लवाजमा घेऊन तो काशीला पोचला. उत्तरसिमेवर आधीच पोचलेले देव वाटच पहात होते. वृषभध्वज नामक या स्थानावरुनच पहिल्यांदा त्यांना शिवाचा ध्वज दिसला. सर्व देवांनी शिवाची १००० दिव्यांनी आरती करुन त्याचे स्वागत केले. काशी पुन्हा एकदा शिवाची झाली होती.
अशातऱ्हेने विष्णु तिथी सांगुन आला, किंवा गणेशाने सांगीतलेल्या तिथीला तो आला आणि तरी त्याने यजमानाला चकवलेच. अतिथ्याला देवासमान समजल्याने देवांची हकालपट्टी करणारा दिवोदास स्वर्गवासी झाला. हा दिवोदास धन्वंतरीचा वंशज मानल्या जातो, आणि सुश्रुताचा गुरु. दिवोदास म्हणजे जरी स्वर्गाचा दास तरी दूसऱ्या एका व्युत्पत्ती प्रमाणे त्याचा अर्थ त्याच्या कृतीला जास्त साजेसा असा स्वर्गाला महत्व न देणारा हा होतो.
हिंदु जातीव्यवस्थेत फुटिरता निर्माण करणारी बौद्ध शिकवण शिताफीने कथानकात गुंफली आहे. पुराणांच्या प्रथेप्रमाणे एका देवालाच महत्व दिले जाते व तो इथे अर्थातच शिव आहे. काशीबद्दल बोलायचे तर सर्व देवांचा वास तिथे आहे म्हणुन काशीची महती नसुन काशी दुर्लभ असल्यानेच सर्व देवांना तिथे रहावेसे वाटते. १२ आदित्यांनी, ५६ गणेशांनी ई. स्थापन केलेली पवीत्र वर्तुळे अजुनही शाबुत आहेत. वरील कथा स्कंदपुराणातील काशीखंडाच्या पुर्वार्धातील सर्ग ३९ ते ५३ मधे आहे. माझी या कथेशी पहिली ओळख झाली ते Diana Eck यांच्या Banaras City of Light या उत्कृष्ट पुस्तकातील चौथ्या प्रकराणातुन.
----------------------------------------------------------------
http://is1.mum.edu/vedicreserve/puranas/skanda_purana/skanda_purana_04ka...
अश्चिग, इथल्या कथेचा थोडक्यात
अश्चिग, इथल्या कथेचा थोडक्यात रेफरंस तिकडल्या फोटोतील स्थानांना देता आला तर बघ ना (अर्थात रेफरंस असला तर)
धन्य धन्य ते (पूर्वीचे)
धन्य धन्य ते (पूर्वीचे) भारतीय.
२१ व्या शतकात सगळेजण अमेरिकेला जाण्यासाठी कसे धडपड करतील हे त्यांनी रूपकात्मक कथेत स्पष्ट केले आहे.
आता काशीला 'बकाल आहे' म्हणतात लोक!
झक्की, मीच त्या दुसर्या
झक्की, मीच त्या दुसर्या बाफवर बकाल म्हटलंय. तुम्ही दुखावले गेला असाल तर माफी असावी. माझ्या मनात काशीचे अध्यात्मिक दृष्टिकोनातून स्थान उच्चच आहे पण एक ठिकाण म्हणून त्या फोटोंमध्ये मला ते बकाल दिसलं म्हणून तसं लिहिलं होतं.
विश्वेश्वराच्या स्थानी असा बकालपणा मला जास्त खटकला. एरव्ही एखाद्या ठिकाणी सोयींअभावी आलेला बकालपणा खटकला नसता. इकडे धारावीतील बकालपणा मला ऑब्व्हियस वाटायचा कारण तिथल्या लोकसंख्येच्या मानाने सुविधा काहीच दिसत नव्हत्या. पण आता त्या रस्त्यावरुन बसने जाताने पुर्वीची दृश्य दिसत नाहीत कारण तिथे सुविधा काही प्रमाणात झाल्या आहेत.
रोचकता हा सर्वच पौराणिक
रोचकता हा सर्वच पौराणिक कथांमधील समान गुण इथेही दिसतो.
हिंदु जातीव्यवस्थेत फुटिरता निर्माण करणारी बौद्ध शिकवण शिताफीने कथानकात गुंफली आहे. >>>>>> हे विचारात पाडणारे आहे.
झक्की, अमेरिकेची अॅनॉलॉजी
झक्की, अमेरिकेची अॅनॉलॉजी चांगली आहे. अजुन वाढवता येईल.
अश्विनी, एकास-एक याप्रमाणे रेफरंस देणे थोडे कठीण आहे. दोन्ही गोष्टी एका अजुन मोठ्या प्रकरणाची छोटी अंगे आहेत.
ओके अश्चिग
ओके अश्चिग
हिंदु जातीव्यवस्थेत फुटिरता
हिंदु जातीव्यवस्थेत फुटिरता निर्माण करणारी बौद्ध शिकवण
जातीमुळे फुटिरता ही हिंदुमध्ये मूळचीच होती.. बौद्धांमुळे फुटिरता येण्याचा प्रश्न येतोच कुठे?
Pages