हल्ली मला हा प्रश्न प्रामुख्याने विचारला जातो. "तू काय करतोयस?" लोक ओळखीचे असतील तर 'य' असतो, पहिल्यांदा भेटत असतील तर नसतो.
खर तर हा प्रश्न साधा आहे आणि ९९.९९% लोक याचे उत्तर "मी इथे आहे, मी तिथे अमुक करतो" असे देतात. सध्या माझ्यासाठी मात्र या प्रश्नाचे उत्तर बदलणारे आहे कारण मी याचे खरे उत्तर द्यायचे ठरवले तर "मी फ्रेंच शिकतोय" किंवा "मी लेख लिहीतो" असे द्यावे लागेल. तसे देऊन बघितले पण लोकांचे समाधान होईना. मग काही लोक आणखी खोलात जाण्याचा प्रयत्न करतात, "तू एक्झॅक्टली काय करतोयस?" (एक्झॅक्टली बोल्ड टायपात.) मला त्यांचा रोख कळतो पण तरीही मी समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. का ते हे घडाभर तेल संपल्यानंतर कळेल अशी अपेक्षा आहे. (खरं तर या भागात नुसते तेलच आहे, जगाची तेल-समस्या इथे सुटायला हरकत नाही.)
विज्ञान विषयात पीएचडी, नंतर काही वर्षे संशोधन असे केल्यानंतर ठराविक पर्याय उपलब्ध असतात. एखाद्या रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये पर्मनंट पोझिशन घेऊन संशोधन करणे किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये नोकरी - तिथे संशोधन आणि शिकवणे दोन्ही करावे लागते किंवा एखाद्या कंपनीत नोकरी. माझ्या बरोबरच्या सर्व मित्रमैत्रिणिंंनी यापैकी एखादा पर्याय निवडलेला आहे. मला तीनही पर्याय मान्य नव्हते.
शिकवण्यासाठी जो अमाप संयम लागतो तो माझ्याकडे नाही. कंपनी जे म्हणेल त्यावर काम करायचे आणि थांब म्हणले की थांबायचे हे मला जमणारे नाही. आणि फक्त संशोधन करायचे म्हटले तर ते ही शक्य नाही कारण -कारण हल्ली मला रिसर्च बोअर होतो. हे कारण माझ्या काही प्राध्यापकांना सांगितल्यावर त्यांचे आश्चर्यचकित चेहेरे अजूनही आठवतात.
रिसर्च कंटाळवाणा का वाटू लागला याचीही बरीच कारणे आहेत.
१. जसजसे तुम्ही अधिकाधिक सिनियर होत जाता, तसतसे तुम्हाला प्रयोगशाळेत काम करण्याची संधी कमीकमी होत जाते. मग पीएचडीचे विद्यार्थी, अंडरग्रॅड्स यांना मार्गदर्शन करणे, मिटिंगा अटेंड करणे, रिपोर्ट लिहीणे, पेपर लिहीणे अशी कामे वाढू लागतात. नंतर नंतर तुम्ही नुसती देखख करता. मला ही बाकीची कामे कंटाळवाणी वाटायला लागली. ही आवश्यक आहेत हे खरेच पण ती करताना माझा वेळ वाया जातो आहे असे वाटायला लागले.
२. पीएचडी किंवा स्पेशलायझेशन ही दुधारी तलवार आहे. एखाद्या क्षेत्रात तुम्ही खोल जाण्याचा निर्णय घेता तेव्हाच इतर क्षेत्रे बंद करण्याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो. याची परिसीमा म्हणजे मी प्रोब मायक्रोस्कोपीच्या एका शाखेमध्ये संशोधन करत असलो तर इतर काही शाखांमध्ये काय चालले आहे हे मला कळते पण त्यापलिकडे नोंद ठेवणे अशक्य. मग पदार्थविज्ञानाच्या इतर शाखांमध्ये किंवा रसायनशास्त्र/ जीवशास्त्र यांचे काय चालले आहे हे कळणे दुरापास्तच. (अगदी जागतिक दर्जाचे संशोधन झाले तर कळते, उदा. नुकताच प्रकाशाचा वेग ओलांडला गेला अशी बातमी आली.) जसजसे मी खोल जायला लागलो, तसतसे हे मला जाचक वाटू लागले. कारण माझे आवडीचे विषय वाढत होते, त्यात फक्त विज्ञानच नव्हे तर भाषा, इतिहास, साहित्य असे विषय यायला लागले. विविध क्षेत्रांमध्ये जाणून घेण्यासारख्या इतक्या गोष्टी असताना फक्त एका छोट्या विषयावर आपले आयुष्य खर्च करणे हा मला वेळेचा अपव्यय वाटू लागला.
३. माझा निर्णय सध्याच्या आपल्या व्यवस्थेच्या विरूद्ध एक छोटीशी बंडखोरी आहे. या व्यवस्थेमध्ये तुम्ही एकदा एक मार्ग पत्करला की परत फिरण्याची मुभा नाही. (इथे गॉडफादर आठवतो, एकदा त्या मार्गाला लागलात की सुधारणे नाही. ) मला हे पटत नाही. अर्थात ज्यांना तो मार्ग पत्करायचा आहे त्यांच्याबद्दल काहीच म्हणणे नाही. पण एखाद्या क्षेत्रामध्ये पुरेसा काळ घालवल्यानंतर त्या क्षेत्राचा कंटाळा आला तर काय करायचे याला आपल्या व्यवस्थेकडे उत्तर नाही. पूर्वीची परिस्थिती फार वेगळी होती. दा विंचीसारखे लोक काय-काय होते याची यादी पाहिली तर छाती दडपते. (चित्रकार, शिल्पकार, वास्तुशात्रज्ञ, संगीतकार, गणितज्ञ, इंजिनियर, भूगर्भशास्त्रज्ञ, लेखक, इ. इ.) इथे दा विंचीच्या प्रतिभेशी तुलना करण्याचा हेतू नाही, तो वेडेपणा ठरेल. मुद्दा इतकाच की माणसाला एकाहून अधिक विषयांमध्ये रस असू शकतो, किंबहुना असतो आणि त्या विषयांचा परस्परसंबंध नसेल तरीही चालू शकते. त्या काळात सर्वांना चित्रकला ते शेती - कोणत्याही क्षेत्रात काम करण्याचे स्वातंत्र्य होते. सध्याच्या स्पेशलायझेशनमुळे हे स्वातंत्र्य हिरावले आहे.
४. तुम्ही जे काम करता ते तुम्हाला आवडते की नाही हे शोधण्याचा एक सोपा मार्ग आहे. जर तुम्ही प्रत्येक आठवड्यात विकांताची आतुरतेने वाट पहात असाल आणि जर सोमवार म्हटले की नको वाटत असेल तर तुमचे काम तुम्हाला आवडत नाही असे मानायला हरकत नसावी. कल्पना करा, पिकासो 'आज कंटाळा आलाय, आज नाही चित्र काढत' असे कधी म्हणाला असेल का? परत, तुलना पिकासोशी नाही. पिकासोने जो मार्ग निवडला त्याच्याशी आहे. हे बरेचसे 'थ्री इडियट्स' सारखे आहे मात्र हा विचार चित्रपट यायच्या बराच आधीपासून डोक्यात चालू होता.
५. प्रयोगशाळेत काम करतानाही बराच वेळ इतर गोष्टींध्येच जातो. जपानमध्ये निर्वात चेंबरमध्ये टायटॅनियम डायऑक्साइडचे एसटीएम इमेजिंग करायचे होते. यासाठी त्याचा पृष्ठभाग स्वच्छ हवा. किती स्वच्छ? त्यावर दुसरा कोणताही अणू दिसायला नको. हे कसे करायचे तर टायटॅनियम डायऑक्साइड एका विशिष्ट तपमानार्यंत तापवायचे, मग त्यावर आयनचा मारा करायचा, परत तापवायचे, परत आयन. असे चक्र पृष्ठभाग स्वच्छ होईपर्यंत करायचे. याला किती वेळ लागला? तीन महिने. तीन महीने सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत (जेवण इ. सोडून) मी फक्त हेच काम करत होतो. तीन महिन्यानंतर पहिली इमेज घेता आली. हे चालू असताना मला माझे आयुष्य कणाकणाने कमी होत असल्याचे जाणवत होते.
अर्थात आपले क्षेत्र सोडण्याचा निर्णय सोपा नाही हे मान्यच. किंबहुना माझ्यावर कोणतीही जबाबदारी नसल्याने मी हा निर्णय घेऊ शकलो पण अन्यथा हे शक्य झाले नसते याचीही जाणीव आहे.
"मग तुला करायचय तरी काय?" [१]
असा प्रश्न उघड विचारत नाहीत, पण मनातल्या मनात विचारलेला मला ऐकू येतो.
मला अजून पाच एक तरी भाषा शिकायच्या आहेत. दहा-एक हजार पुस्तके वाचायची आहेत. जी पहिली भाषा जाणीवपूर्वक शिकलो (इटालियन) तिच्यामध्ये असलेले इतालो काल्विनोसारखे बाप लेखक मूळ भाषेत वाचायचे आहेत. या सर्वांबद्दल लिहायचे आहे. विषय आवडीचा असेल तर लेख लिहीणे मला कधीही कंटाळवाणे वाटत नाही. (त्याचा प्रत्यय इथे दिसतोच आहे.) अजूनही काही गोष्टी डोक्यात आहेत पण सगळेच आता सांगितले तर पुढे मजा काय? आम्ही सेंट रामदासांना फॉलो करतो,
"फर्स्ट डू बाबा, देन टेल ना."
----
[१] हे लिहीत असताना कोणते गाणे चालू असावे?
ऐ दिल-ए-नादां
आरजू क्या है
जुस्तजू क्या है
----
सही लिहिलय. आपल्याकडचा वेळ
सही लिहिलय. आपल्याकडचा वेळ कितीक मार्गांनी सत्कारणी लावता येऊ शकतो हे पुन्हा एकदा जाणवुन दिल्याबद्दल धन्यवाद.
आणि>>>> मला बहुतेक सर्व गोष्टीत रस आहे.. आणि थोड्या थोड्या दिवसांनी माझा करंट रस बदलत असतो. अशा स्वभावाचे फायदे आहेत आणि तोटेही! सगळ्यात मोठ्ठा तोटा म्हणजे आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं आहे ते न कळणे!>>>>>> +१
अप्रतिम लिहिलय.
अप्रतिम लिहिलय. आवडलं.
'कुठल्याही विषयांचे परस्परसंबंध नाहीत हे गृहीतकच पुन्हा विचार करण्यासारखं आहे.' >> सहीच!
मस्त! .. एकदम आवडलं!
मस्त! .. एकदम आवडलं!
छानच. तू इथं लिहिता झाला आहेस
छानच. तू इथं लिहिता झाला आहेस हे माहितीच नव्हते.
अमेझिंग आहे हे !! तुझ्या
अमेझिंग आहे हे !! तुझ्या ब्लॉगमधून तुझी वेगवेगळ्या विषयांमधूनची भरारी दिसायचीच. (त्याल ज्याक ऑफ ऑल म्हणून हिणवू नको.. त्या वाक्यापुढे उगीच मास्टर ऑफ नन हे वाक्य कानात ऐकू येते.. )
काश मला असं काहीतरी करता आले असते. सध्या मी वरदाच्या भाषेत श्वासोच्छवास घेतीय. उमेद मिळते पण असं काही वाचून! थँक्स!
मृ, भन्नाटच!
मनोगत आवडले. पटले.
मनोगत आवडले. पटले.
छान लिहिले आहे. आगतिकता आणि
छान लिहिले आहे. आगतिकता आणि बांधुन न घेण्याची मानसिकता पोचते.
पण.
वरदाने म्हंटल्याप्रमाणे तुझ्या संशोधनाबद्दलही लिही. सध्या करत असलेल्या इतर उद्योगांबद्दल सुद्धा लिहीत रहाच.
वरील भावना पोचवायला एक इंग्रजी वाक्य आहे, पण ते येथे देणे सभ्यतेला धरुन होणार नाही आणि लोकांना भलत्यासलत्या शंका येतील म्हणुन ते देत नाही.
ब्लॉग मधील गोष्टीपण इथे डकवल्यास जास्त कॉमेंट्स येतील (मी १-२ एन्ट्र्या वाचल्या, आणि अर्थातच आवडल्या).
प्रतिसादाबद्दल अनेक
प्रतिसादाबद्दल अनेक आभार.
सध्या काय चाललय अशी आस्थेने विचारपूस करणार्यांचे विशेष आभार.
>>पण तरीही यात तू स्वतः नक्की काय संशोधन केलंस त्याबद्दल विस्ताराने यायला हवं होतं असं वाटतं. तू त्या यंत्रावर नक्की काय काम केलंस? तुझ्या संशोधनाचा वापर पुढे कुठे होऊ शकतो/झाला? इ. विषयावर तू काहीच लिहिलं नाहीस>>
किती लिहायच असं वाटलेलं म्हणून विस्तार केला नव्हता, आता तिसरा भाग टाकला आहे. सगळीकडे लिंका दिल्या आहेत.
श्वासोच्छवास मस्त.
>>'कुठल्याही विषयांचे परस्परसंबंध नाहीत हे गृहीतकच पुन्हा विचार करण्यासारखं आहे.' >
सही उत्तर आहे, म्युझिक, गणित आणि न्युरोबायो म्हणजे माणूस एकदम भन्नाटच असणार.
<<<'कुठल्याही विषयांचे
<<<'कुठल्याही विषयांचे परस्परसंबंध नाहीत हे गृहीतकच पुन्हा विचार करण्यासारखं आहे.' >>>
त्या माणसाचे हे विधान केवळ जबरदस्त विधान!
राजकाशाना,
पहिले दोन्ही भाग अ'त्ति'शय आवडले.
-'बेफिकीर'!
मुद्दा इतकाच की माणसाला
मुद्दा इतकाच की माणसाला एकाहून अधिक विषयांमध्ये रस असू शकतो, किंबहुना असतो आणि त्या विषयांचा परस्परसंबंध नसेल तरीही चालू शकते.>> सही!! सेम हिअर
संशोधनाचा विषय कसा आणि का निवडला, हे ही वाचायला आवडलं असतं. म्हणजे ज्याला बर्याच विषयात रस आहे त्याला इतका स्पेसिफिक विषय निवडायला काय मुद्दे कारणीभूत झाले, ते कळेल.
> मुद्दा इतकाच की माणसाला
> मुद्दा इतकाच की माणसाला एकाहून अधिक विषयांमध्ये रस असू शकतो, किंबहुना असतो आणि त्या विषयांचा परस्परसंबंध नसेल तरीही चालू शकते.
हा मुद्दा इतक्या लोकांना आवडला हे पाहुन बरे वाटले. (मी मांडला नव्हता पण पूर्णपणे या विषयावर असलेल्या साहित्याचे नोबेल मिळालेल्या Glass Bead Game बद्दल अनेकदा लिहिले आहे. त्या पुस्तकावरुन याची खरी व्याप्ती कळु शकेल. पुस्तक प्रेमींनी तरी जरुर वाचा - सुरुवातीला थोडे वेगळे वाटले तरी . लेखक Hermann Hesse ) .
> म्हणजे ज्याला बर्याच विषयात रस आहे त्याला इतका स्पेसिफिक विषय निवडायला काय मुद्दे कारणीभूत झाले, ते कळेल.
राज का राज क्या है हे जाणायला आवडेलच पण संशोधन म्हणजे विश्वाला एखाद्या जिगसॉ प्रमाणे समजायचे, आणि त्यातील एक छोटा कोपरा निवडुन तो उकलत बसायचे. म्हणुन मग तो विषय स्पेसिफिक होतो.
राज चांगले लिहीले आहेत. आवडले
राज चांगले लिहीले आहेत. आवडले !
राजकाशाना ते कळलेच अगदी
!
नंद्या, <<संशोधनाचा विषय कसा
नंद्या,
<<संशोधनाचा विषय कसा आणि का निवडला, हे ही वाचायला आवडलं असतं>> +१
>>हा मुद्दा इतक्या लोकांना
>>हा मुद्दा इतक्या लोकांना आवडला हे पाहुन बरे वाटले. >>
मलाही सुखद आश्चर्य वाटले. प्रवाहाच्या विरूद्ध जाण्याचा निर्णय इतक्या लोकांना पटेल असे वाटले नव्हते.
>>नोबेल मिळालेल्या Glass Bead Game बद्दल अनेकदा लिहिले आहे. त्या पुस्तकावरुन याची खरी व्याप्ती कळु शकेल. पुस्तक प्रेमींनी तरी जरुर वाचा - सुरुवातीला थोडे वेगळे वाटले तरी . लेखक Hermann Hesse >>
ग्रेट. हेस माझ्या आवडत्या लेखकांपैकी आहे. पुस्तक यादीत टाकले आहे. धन्यु.
>>संशोधनाचा विषय कसा आणि का
>>संशोधनाचा विषय कसा आणि का निवडला, हे ही वाचायला आवडलं असतं. म्हणजे ज्याला बर्याच विषयात रस आहे त्याला इतका स्पेसिफिक विषय निवडायला काय मुद्दे कारणीभूत झाले, ते कळेल.>>
क्षेत्र निवडण्याचा निर्णय जाणीवपूर्वक म्हणण्यापेक्षा अपघाताने घेतला गेला असे म्हणणे जास्त योग्य होईल. बारावी झाल्यानंतर काय करावे याचे योग्य मार्गदर्शन करणारे कुणी नव्हते, सल्ले देणारे मात्र भरपूर. तेव्हा मेडिकल-इंजिनिअरिंग म्हणजे स्वर्गाची दारे उघडली अशी परिस्थिती होती. त्या वाटेने जाण्यासाठी माझ्यावर बराच दबाव आला, सुदैवाने यात आई-वडिल सामील नव्हते. त्यांनी माझा निर्णय मला घेऊ दिला. पदार्थविज्ञान आवडायचे म्हणून बीएसस्सीला जायचे ठरवले. नंतर एमएस्सीला जाईपर्यंत नक्की झाले नव्हते की पुढे काय करायचे. मला खगोलशास्त्राचीही खूप आवड होती. त्यासाठी आयुकामध्ये समर स्कूल केले. मग एमएस्सीला असताना योगायोगाने धर्माधिकारी सरांकडे प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली. तोपर्यंत एसटीएम म्हणजे काय हे ही माहित नव्हते. प्रोजेक्ट केल्यानंतर विषय आवडू लागला, मग पीएचडीसाठी उडी घ्यायची ठरवली.
आता विचार करताना हा प्रवास कसा झाला ते लक्षात येते पण त्या त्या वेळेस पुढे काय ही दिशा स्पष्ट होतीच असे नाही. कदाचित त्या वेळेस ही जाणीव असती आणि योग्य मार्गदर्शन मिळाले असते तर प्रवास वेगळ्या वाटेनेही झाला असता असे वाटते.
अशा प्रवासाचा एक फायदा म्हणजे असे सर्व निर्णय स्वतः घेतल्यामुळे आता असा कोणताही निर्णय घेणे त्या मानाने सोपे जाते. स्वत:चे स्वतःशी जे उत्तरदायित्व आहे त्याचा क्रमांक सर्वात वर असे सूत्र ठरवून घेतले, त्यामुळे निर्णयाला अनूकूल प्रतिसाद मिळाले नाहीत तरी त्याचा विशेष परिणाम होत नाही.
आजच एका स्नेह्यांच्या स्टेटस अपडेटमध्ये गुरूदेवांच्या या ओळी वाचल्या.
जोदी तुमार डाक शुनेर केउ न आछे तोबी एकला चलो रे.
जबरदस्त लिहिलयं राज. पटलं आणि
जबरदस्त लिहिलयं राज. पटलं आणि आवडलं.
>>राजकाशाना ते कळलेच
>>राजकाशाना ते कळलेच अगदी>>
गुड वन.
प्रवाहाच्या विरूद्ध जाण्याचा
प्रवाहाच्या विरूद्ध जाण्याचा निर्णय इतक्या लोकांना पटेल असे वाटले नव्हते.>> मला वाटतं प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची इच्छा किंवा काहिसे अस्पष्ट विचार बर्याच जणांच्या मनात असतात. पण कधी विचारांच्या अस्पष्टतेमुळे / पराभवाच्या भितीने / साचेबद्ध नोकरीच्या सोशल कंडीशनिंगमुळे / इतर जबाबदार्यांमुळे ते जमतेच असे नाही. म्हणुन ज्यांना जमते त्यांचे खरच फार फार कौतुक
तुमच्या ब्लॉगमधले काही लेख वाचले. खुप आवडले. बाकी वाचायचे आहे.
आता विचार करताना हा प्रवास
आता विचार करताना हा प्रवास कसा झाला ते लक्षात येते पण त्या त्या वेळेस पुढे काय ही दिशा स्पष्ट होतीच असे नाही. कदाचित त्या वेळेस ही जाणीव असती आणि योग्य मार्गदर्शन मिळाले असते तर प्रवास वेगळ्या वाटेनेही झाला असता असे वाटते. >>>
राज आणि इतर मायबोलीकर खुप मोठं वाक्य आहे हे , आपण हे वाक्य बरेचदा ऐकलं असेल किंवा स्वतः अनुभवलही असेल , मायबोलीवरचे बहुतांश पालक उच्चशिक्षित असावेत पण तरीही जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपण गोंधळुन जातो, पुढच्या पिढीला काय मार्गदर्शन करावं काही कळत नाही. मायबोलीवर असा काही उपक्रम राबवता येईल का की जेणेकरुन येणार्या पिढीला येथील अनुभवी मंडळींच योग्य मार्गदर्शन लाभेल आणि त्यांचा प्रवास योग्य वाटेने होईल.
मायबोलीवर असा काही उपक्रम
मायबोलीवर असा काही उपक्रम राबवता येईल का की जेणेकरुन येणार्या पिढीला येथील अनुभवी मंडळींच योग्य मार्गदर्शन लाभेल आणि त्यांचा प्रवास योग्य वाटेने होईल.>>> नक्किच ...
छान लिहिलं आहेस
छान लिहिलं आहेस
हो. मलापण माझा लेख लिहिताना
हो. मलापण माझा लेख लिहिताना याची जाणीव झाली. वळून बघितल्यावरच "आपला रस्ता" दिसतो. तो आधी शोधून चालायचा ठरवला तर सारखं द्विधा व्हायला होतं. आय थिंक हरवणं तत्कालीन असतं. हरून जिंकलं की लगेच "बाझीगर" वगैरे. पण हरून कायमचं हरवलं की, "बघा!! म्हणून आम्ही तुमच्यावर एवढे जीव खाऊन संस्कार केले. नाहीतर हे असं झालं असतं".
इन एनी केस, जगाच्या सर्टिफिकीटची आशा सोडली की मजा येते लाईफ मध्ये. हा हा. कायपण मराठी आहे!
सई +१ मला वाटतं पालकांचं/
सई +१
मला वाटतं पालकांचं/ मोठ्यांचं मार्गदर्शन नाही तर कुठल्याही अपेक्षांच्या ओझ्याशिवाय स्वतःचा रस्ता शोधून त्यावर चालून बघायचं स्वातंत्र्य मिळणं महत्वाचं आहे. मला ते दिलं हे माझ्या आई-बाबांचं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ्ठं कॉन्ट्रिब्यूशन आहे असं माझं मत आहे
>>मायबोलीवरचे बहुतांश पालक
>>मायबोलीवरचे बहुतांश पालक उच्चशिक्षित असावेत पण तरीही जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपण गोंधळुन जातो, पुढच्या पिढीला काय मार्गदर्शन करावं काही कळत नाही. >>
मला नात्यातील किंवा शेजारपाजारच्या पालकांनी 'हिला/ह्याला गायडंस द्या' अशी विनंती केली आहे. खरं सांगायचं तर अशा वेळी काय सांगावं असा मला प्रश्न पडतो. कारण जे सांगायचं आहे ते एका बैठकीत सांगता येण्यासारखं नसतं, किंबहुना ते पालकांनीच किंवा शिक्षकांनी लहानपणापासून अंगात रूजवायचं असतं.
मुलीने किंवा मुलाने काय व्हायचे हा निर्णय कोणत्या निकषांवर घ्यावा? इथे चांगला जॉब मिळेल का, अमुक फिल्डला किती स्कोप आहे असे प्रश्न येतात आणि मूळ मुद्दा बाजूला पडतो. मुलीला तिचे करीयर एका प्रयत्नात सापडेल ही तरी अपेक्षा कितपत बरोबर आहे? तिला स्वतःला मनापासून काय करावेसे वाटते या दिशेने विचार केल्यास योग्य दिशा सापडण्याची शक्यता जास्त. पण अशी मुभा द्यायला किती पालक तयार असतील?
इथे डस्टीन हॉफमनची एक मुलाखत आठवते. सगळी मुलाखतच बघण्यासारखी आहे, पण या संदर्भात शेवटच्या प्रश्नाला दिलेले उत्तर बघावे.
http://www.youtube.com/watch?v=YpEkiP1OA0A
राज, जोपर्यंत बहुतांश
राज, जोपर्यंत बहुतांश मध्यमवर्गीय पालकांसाठी आयुष्यात यशस्वी होण्याची व्याख्या उत्तम पैसा आणी सुरक्षितता मिळवून देणारी नोकरी (आणि त्यातून मिळणारा 'सामाजिक दर्जा') अशी आहे तोपर्यंत फारसं काही होईल असं वाटत नाही. साधारण ७०-८० च्या दशकापर्यंत हे समजण्यासारखं होतं कारण बहुतेक आई-वडील कष्टाने, झगडून वरती आले होते. तेव्हा सुरक्षित आणि व्यवस्थित पैसाअडका मिळवून देणारी नोकरी मुलांना मिळावी अशी अपेक्षा अगदी पहिल्यांदा असणार हे उघड होतं. शिवाय नोकरीच बरी, स्वतःचा व्यवसाय म्हटला की रिस्क आली, असाही विचार असायचाच. तेव्हा शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात पैसा आणखीच कमी असायचा. त्यापेक्षा इंजिनिअर, डॉक्टर यांचा सामाजिक दर्जा वरचा होता. मग सरकारी अधिकारी, बँक, इ.इ.
दुर्दैव असं की गेल्या २५-३० वर्षांत या मानसिकतेत फार फरक पडलाय असं वाटत नाही. (<<इथे चांगला जॉब मिळेल का, अमुक फिल्डला किती स्कोप आहे असे प्रश्न येतात>>). शेवटी 'शिवाजी दुसर्याच्या घरी' हेच खरं
>>शिवाय नोकरीच बरी, स्वतःचा
>>शिवाय नोकरीच बरी, स्वतःचा व्यवसाय म्हटला की रिस्क आली, असाही विचार असायचाच. तेव्हा शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात पैसा आणखीच कमी असायचा. त्यापेक्षा इंजिनिअर, डॉक्टर यांचा सामाजिक दर्जा वरचा होता. मग सरकारी अधिकारी, बँक, इ.इ. दुर्दैव असं की गेल्या २५-३० वर्षांत या मानसिकतेत फार फरक पडलाय असं वाटत नाही.>>
खरय. म्हणूनच असा वेगळा विचार करणं शक्य आहे की नाही हे प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. तरीही जिथे पालक सक्षम आहेत आणि मुलांवर घराची जबाबदारी नाही तिथे मुलांना स्वातंत्र्य मिळायला हरकत नाही. पण बरेचदा प्रत्यक्षात चित्र वेगळं दिसतं. मी पीएचडी करत असतानाही नेमकं काय करतोय हे सांगून झालं की लोक विचारायचे, "ते सगळ ठीक आहे, पण तुला नोकरी कधी लागणार?"
यात बदल कसा होणार हा मिलियन डॉलर क्वेश्चन आहे.
जोपर्यंत "शाळेत का जायचं?" या
जोपर्यंत "शाळेत का जायचं?" या मुलांच्या प्रश्नाला "चांगली नोकरी मिळवायला. / पैसे कमवायला." असे उत्तर मिळते तो पर्यंत असा घाऊक बदल घडणे कठिण आहे असे मला वाटते.
चांगली चर्चा
राजकाशाना गेले काही दिवस
राजकाशाना
गेले काही दिवस वाचतोय सगळं. तुम्ही मात्र अगदी खरं खरं लिहीलंय .
>>>माझे आवडीचे विषय वाढत
>>>माझे आवडीचे विषय वाढत होते,
मला ही हाच प्रॉब्लेम आहे. मला बहुतेक सर्व गोष्टीत रस आहे.. आणि थोड्या थोड्या दिवसांनी माझा करंट रस बदलत असतो. अशा स्वभावाचे फायदे आहेत आणि तोटेही! सगळ्यात मोठ्ठा तोटा म्हणजे आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं आहे ते न कळणे!<<<
च्यायला! अश्या विचारांचे बरेच आहेत बघून हायसं वाटले. मी अश्याच गाड्या बदलत गेले तरी अजून माहीत नाही नक्की कुठले स्टेशन लागेल/असेल पुढे. आमचा चंचल स्वभाव(लोकांच्या मते) बघून तातांनी विचारलेले शेवटी, पोट कसे भरणार आहात तुम्ही(असामी) मग?
आताच्या कामात बाकी विकांताची वाट रोज बघणे तसे चालूच असते....( अॅनालोजी आवडली)
>>>>मुद्दा इतकाच की माणसाला एकाहून अधिक विषयांमध्ये रस असू शकतो, किंबहुना असतो आणि त्या विषयांचा परस्परसंबंध नसेल तरीही चालू शकते>>>><<<<
बरोबर!
राजकशाना
पण मूळ कळीचा प्रश्ण राहिलाच, पोटं कसे भरता मग?(म्हणजेच नक्की काय करता?)
झंपी
झंपी
Pages