पीव्हीसी पाईपपासून तयार केलेल्या बासर्‍या

Submitted by चैतन्य दीक्षित on 14 November, 2011 - 13:41

साधारण माझ्या बारवीच्या परीक्षेच्या आधी काही महिने मी शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात केली. त्या-आधी क्वचित रेडिओवर ऐकलं असेल तरच, अन्यथा कॅसेट आणून ऐकलं नव्हतं कधी. पण ऐकायला 'व्होकल क्लासिकल'ने सुरुवात झाली आणि मग 'इंस्ट्रुमेंटल' ! वाद्यांमध्ये बासरी अग्रगण्य. पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. रघुनाथ सेठ, पं. विजय राघव राव यांच्या कॅसेट्स तुडुंब ऐकल्या आणि आपोआपच मनात ठरलं की 'जर एखादं वाद्य शिकलो, तर बासरीच शिकायची'. शिक्षण पूर्ण होईपर्यंत काही योग नाही आला पण नोकरीनिमित्ताने चेन्नईला आलो आणि सुदैवाने फार चांगले (आणि हिंदी बोलू शकणारे) गुरू मिळाले.
कर्नाटकी पद्धतीच्या बासरीवर शिक्षण चालू झालं खरं पण बहुतेक माझ्या सरांना पण लक्षात आलं की माझा ओढा हिंदुस्तानी पद्धतीकडे जास्त आहे. त्यांनीही कर्नाटकी पद्धतीबरोबर हिंदुस्तानी पद्धतीने शिकवायला सुरुवात केली.
बासरी शिकू लागलो आणि कळलं की ऐकायला जितकं गोड वाटतं तितकं हे वाद्य सोपं नाही. आधी 'दम-सास' टिकणं हा मुख्य मुद्दा. (माझ्या पहिल्याच क्लासला मला थोडी चक्कर आल्यासारखं झाल्याचं आठवतंय!)
मग 'फुंक' आणि 'बोटांनी बासरीची छिद्रे नीट बंद करणे' या दोन गोष्टींची सांगड घालता येणं. आणि मग ही सांगड घालता येत असताना, फुंक एकसारखी येत असताना, जो स्वर वाजवला जातोय, तोच स्वर खर्‍या अर्थाने वाजणे हे त्याहून कठिण काम आहे हे समजायला लागलं. आणि हे सगळं 'बर्‍यापैकी' जमू लागलं तेव्हा अजून एक मुद्दा भेडसावू लागला तो म्हणजे, 'नक्की माझी बासरी चांगली आहे ना?' म्हणजे, मी सराव बर्‍यापैकी नियमितपणे करतोय, फुंक आणि बोटांची चांगली युती जमली आहे आणि तरीही सर क्लासमध्ये 'हा स्वर नीट वाजत नाहिये. श्रुती ऐक आणि मग वाजव' (हे वाक्य बोलायचा त्यांना कंटाळा येत नाही. ते कायम हसतमुखाने हे वाक्य बहुतेक प्रत्येक क्लासमध्ये ऐकवतातच) आणि मग प्रत्येक वेळि 'नाचता येई ना अंगण वाकडे' या न्यायाने मला 'बासरीच नीट नाहिये' असं वाटायला लागलं. सरांच्या हेही कसं लक्षात आलं कोण जाणे, एक दिवस त्यांनी त्यांचीच बासरी मला वाजवायला सांगितली आणि तरीही मी 'आऊट ऑफ श्रुती' होतोय हे त्यांनी दाखवून दिलं. आणि एक फार मोलाचा सल्ला दिला. 'बासरी चांगली असणं यावर फार तर ५०% स्वर (म्हणजे स्वरांचं परफेक्शन) अवलंबून असेल पण उरलेलं ५०% हे वाजवणारा कसा वाजवतोय यावर अवलंबून आहे.' हे ऐकून आणि सरांकडून अजून वेगवेगळ्या प्रकारे 'श्रुती' म्हणजे स्वर कसा परफेक्ट वाजवायचा याचं मार्गदर्शन मिळालं आणि मी त्याचा प्रयत्न करू लागलो. पण तरीही ते वाजवणं म्हणजे, 'फुंक मारताना बासरीच्या मुखरंध्रावर ओठ कुठे ठेवायचे?' 'फु़ंक कशी मारायची? किती जोराने मारायची?' इ. इ. स्वरूपाच्या तडजोडीच ! त्यामुळे 'बासरी ठीक नाही, किंवा म्हणावीशी चांगली नाही' हा विचार काही सुटेना.
आणि साधारण ३ एक आठवड्यांपूर्वी, 'शशांक पुरंदरें'ना भेटलो. निमित्त ठरलं ते म्हणजे माझे सर स्वतः केवळ हिंदुस्तानी पद्धतीच्या चांगल्या बासर्‍या चेन्नईत मिळत नाहीत म्हणून पुण्याला आले होते. मी त्यांच्याबरोबर 'मेहेंदळे हाऊस'मध्ये बासरी कशी निवडावी? याचं 'ऑन जॉब ट्रेनिंग' घेत होतो. आधीच पुरंदरे काकांना फोन झाला होताच. ते वेळात वेळ काढून मेहेंदळे हाऊस इथे भेटायला आले आणि आम्ही बासर्‍या घेण्यात तसेच गर्क. एका स्केलच्या बासरीसाठी किमान १३-१४ बासर्‍या चेक करून, त्यातून पुन्हा ४-५ बाजूला काढून त्यातून एक अशी बासरीची निवड चालू होती. आणि तेव्हा पुरंदरे काका बोलता बोलता 'पीव्हीसी पाईप'पासून तयार केलेल्या बासरीबद्दल बोलले. त्यांच्या एका मित्राने तशा काही बासर्‍या तयार केल्या आहेत असे कळले. मग डोकं त्या दिशेनं फिरायला लागलं. इंटरनेटावर नेटाने शोध घेतला आणि काही साईट्सवर छान आणि सोपी करून दिलेली माहिती मिळाली. त्याच माहितीच्या आधारे मी ही एक बासरी तयार करायचा प्रयत्न केला. दिवाळीला घरी गेलो होतो, घरातलीच एक पाईप चेन्नईला घेऊन आलो. पण मुहूर्त काही लागत नव्हता. शेवटी मागच्या आठवड्यात ठिय्या करून बसलो आणि बासरीचं मुखरंध्र तयार केलं. बासरी करताना आधी मुखरंध्र करावं लागतं हे सांगायलाच नको. ते तयार झाल्यावर बासरीचा 'पंचम' कोणता ते कळतं. माझ्या बासरीचा पंचम आधी 'पांढरी ३' च्या आसपास होता. पण त्याच्याशी 'षड्जपंचम भाव असलेला षड्ज' कसा तयार करायचा हा प्रश्न होता. म्हणून पाईप खालून थोडी कापून घेतली. पंचम (खालचा) हा थोडा 'फ्लॅट' लागतोय असं पाहून बासरीची लांबी कमी करणं थांबवलं. मग धैवत, निषाद आणि षड्ज यांसाठीची छिद्रं तयार करून घेतली (आधी लहान आकाराची छिद्रं करून मग ट्यूनिंग करताना ती मोठी करतात. एकदम मोठं छिद्र केलं तर ते नंतर लहान करता येत नाही आणि ती बासरी जवळजवळ वायाच जाते) बर्‍याच दिवसांनी गणिताशी संबंध आला होता. पण मजाही वाटत होती. मग बाकीची म्हणजे रिषभ, गंधार आणि मध्यमाची छिद्रं तयार करून घेतली. आणि एकदा पुन्हा खालचा आणि मध्यसप्तकातला पंचम वाजवून पाहिला. थोडा 'फ्लॅट' होता म्हणून करंगळीने झाकता येईल आणि करंगळी पोहोचू शकेल अशा ठिकाणि एक छिद्र पाडलं. पंचम परफेक्ट झाला. पण सगळी छिद्रे मोकळी केल्यावर येणारा मध्यम हा 'तीव्र मध्यम' लागत होता. तोही थोडा फ्लॅट होता म्हणून ते करंगळीजवळचं छिद्र अजून थोडं मोठं केलं आणि बासरी तयार झाली.
From basari

इथे ती थोडी वाजवूनही पाहिली आहे. अर्थात पहिलाच प्रयत्न असल्याने एकदम 'परफेक्ट' नाहीच. पण तरी ६०-६५% तरी बरी जमली आहे असं मला वाटतंय.
आठवड्यापूर्वी अजून एक बासरी तयार केली. 'पांढरी ३' या स्केलची. ही साधारण ७५-८०% चांगली जमली आहे असं वाटतंय. अर्थात, वजनाला काकणभर जास्त झाली आहे आणि गंधार आणि तीव्रमध्यम तितकेसे परफेक्ट नाहियेत. पण तरीही बरीच चांगली जमली असं मला वाटतंय.
या नव्या बासरीवर यमन रागावर आधारित 'तुज मागतो मी आता' हे भजन वाजवलंय.

हे सगळं इथे सांगायचा हेतू हाच की मायबोलीकरांपैकी बासरी शिकणारे, शिकलेले, शिकू इच्छिणारे बरेच असतील असा अंदाज आहे आणि या निमित्ताने जर सगळ्यांनी आपापले विचार इथे मांडले तर नक्कीच सगळ्यांनाच मदत होणार आहे. पीव्हीसी पाईपपासून कुणी बासरी तयार केली असेल तर त्याबद्दलही इथे लिहा. जेणेकरून मलाही पुढच्या प्रयत्नात सुधारणा करता येईल.

- चैतन्य.

गुलमोहर: 

अनिताताई,
रूपक कुलकर्णी नव्हेत. ते बहुतेक मुंबईत असतात.
सुरेश की असं काहीतरी नांव होतं. आणि ते पन्नालाल घोषांच्या परंपरेतले होते.
(हरीजी आणि पन्नालाल यांची बासरी धरण्याची पद्धत वेगळी आहे)

इब्लिस, यूट्यूबवर अजून अनेक फिरंग्यांनी पीव्हीसी पाईपच्या बासर्‍या केल्याचे व्हीडिओ आहेत. (त्या नेटिव्ह अमेरिकन फ्लूट्स आहेत)

बागुलबुवा, तुमचा अनुभव भारीच !
देव काका, महेश आणि इतर सर्वांचे आभार !

माझा शिकण्याचा अनुभव अगदीच छोटासा.

सरांकडे गेलो. तिथे देशपांडे नावाचे एक गृहस्थही शिकायला आले होते.

सरांनी त्यांना विचारलं याआधी कुठे शिकलात ?

नाशिकला एक वर्ष श्री अमुक तमुक यांच्याकडे शिकलो.

'सा' लावायला शिकलो.

लावून दाखवा.

......................

जमत नाहीये. परत शिकावा लागेल.

(च्यामारी एक सूर शिकायला एका वर्षापेक्षा जास्त वेळ ? )

बरं देसाई, तुमचं काय ?

काही नाही सहज आलो होतो. Proud

पुण्यात राजेंद्र कुलकर्णी नावाचे बासरीवादक आहेत. ते स्टेट बँकेत सर्व्हिसला असून डेक्कन जिमखाना शाखेत आहेत.

येस्स... राजेंद्र कुलकर्णीच. धन्स शशांकली Happy

बागुलबुवा, तुमचा हाही अनुभव मस्त! माझ्या सरांना एक स्कॉलरशिप मिळाली होती २ वर्षांची.
त्याच्या परीक्षेत त्यांनाही फक्त 'सा' च लावायला सांगितला होता.
आणि केवळ १०-१५ सेकंदात थांबवलं आणि सांगितलं 'यू आर सिलेक्टेड'.
कारण तो सा परफेक्ट श्रुतीतला होता !!
आणि असं माझ्या सरांच्या ऐकण्यात आहे की हिंदुस्तानी पद्धतीत खरंच पहिले किमान काही महिने तरी केवळ षड्ज आणि पंचम लावायला शिकवतात. (हे कदाचित फार 'सीरियसली' बासरी शिकणारे आणि शिकवणारे यांच्याच बाबतीत होत असावं म्हणा)
मला अजूनही धड सा लावता येत नाही. बाकी एखादी ट्यून वाजवायची असेल तर आता बोटं धावतात.
मला वाटतं 'लय भारी', पण सरांसमोर वाजवलं की ते हमखास म्हणतात, 'ठीक है, पर श्रुती अछा आना चाहिये'!
Happy

चैतन्य... एकदम बरोबर... सध्या घरी असलेल्या बासरीतून स्वर काढायचा प्रयत्न चालू आहे.. तो येतोय पण सा व्यवस्थित लागत नाही म्हणून आजोबा ओरडत असतात.. आधी फक्त सा लाव असेच सांगतात.. पण त्या बासरीचा तो सा बरोबर आहे की नाही ह्या साठी रे पण लावायला सांगतात.. जेणे करुन दोन्ही स्वरांमधले जे रिलेशन आहे ते बरोबर आहे आणि म्हणूनच सा बरोबर आहे की नाही हे बघतात..

मस्तच.

Gr8..

Pages