माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा
बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना एका मित्राच्या मावशीकडे कैलास-मानस सरोवर यात्रेचा स्लाईड शो बघितला होता. मी कॉलेजला असताना जमेल तेव्हा गिर्यारोहण करायचे. हिमालयातही एकदा जाऊन आले होते. हा स्लाईड शो बघितल्यावर मात्र भारावून गेले. गिर्यारोहणापेक्षा वेगळाच प्रकार होता. तो कैलास पर्वताचा गूढ आकार, मानस सरोवराची अथांग निळाई !! वा!!
पण तेव्हा मी शिकत होते. माझ्या शिक्षणासाठी, गिर्यारोहणाच्या छन्दांसाठी वडील आनंदाने पैसे, पाठींबा, उत्तेजन देत होते. कैलासच्या महागड्या यात्रेसाठी पैसे मागायची माझी हिम्मत झाली नाही. शिक्षण पूर्ण करून आपल्या पैशानी जायचं नक्की ठरवल होत. पण नेहमीप्रमाणे ‘दात आणि चणे’ न्याय मध्ये आला. शिक्षण संपल्यावर एका वर्षात ‘दोनाचे चार’, मग अजून दोन वर्षात ‘चार हातांचे सहा हात’ झाले!! गृहकृत्य, बालसंगोपन, नवऱ्याच्या कामानिमित्त परदेश दौरे ह्यात बारा-पंधरा वर्षे कुठल्या कुठे उडून गेली.
ह्या दरम्यान कुठे कैलास-मानस सरोवर यात्रे बद्दल काही वाचल, बघितल की मनात एक कळ यायची. पण ‘घरच्या तसेच कामाच्या जबाबदार्याय आहेत. सध्या नाही जमणार. पुढे कधीतरी जमेल’ अशी मी माझीच समजूत घालत होते. मात्र माझ्या ओळखीतले एकजण तीन वर्षांमागे ह्या यात्रेला जाऊन आले. त्यांचे वर्णन ऐकून, फोटो बघून ती दबलेली इच्छा अगदी उफाळून आली. मग मात्र मी पद्धतशीर चौकशा सुरूच केल्या.
ही कैलास मानसची यात्रा दोन प्रकारे करता येते. पहिला प्रकार म्हणजे विदेश मंत्रालय (भारत सरकार) ही यात्रा दरवर्षी आयोजित करतात. भारत सरकार दरवर्षी ९६० यात्री तिबेट मध्ये पाठवू शकते. मेच्या शेवटच्या आठवड्या पासून साधारण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सहा-सहा दिवसांच्या अंतराने १६ ग्रूप जातात. ह्या यात्रेमध्ये आपण तिबेटमध्ये जाण्याआधी जवळ-जवळ पाच-सहा दिवस चालत किंवा घोड्यावर रस्ता कापून चीनच्या हद्दीत प्रवेश करतो. नंतर पुढच्या बारा दिवसात कैलास पर्वताची तसेच मानस सरोवराची परिक्रमा पूर्ण होते. त्यानंतर मायदेशी परतून आल्या वाटेने घरी! ह्याला एकूण एक महिना लागतो.
दुसरा प्रकार म्हणजे, प्रवासी कंपन्यांबरोबर जाणे. ह्याच्या जाहिराती सर्वानी वाचल्या असतीलच. ह्या कंपन्या नेपाळमार्गे land rover गाड्यांनी तिबेटमध्ये नेतात. परिक्रमा झाल्या की पुन्हा नेपाळमार्गे परत.
दोन्ही प्रकारात खर्च साधारण सारखाच येतो. सरकारतर्फे गेल्यास एक महिना लागतो. नेपाळमार्गे गेल्यास वीस दिवस. मात्र भारतातून गेल्यास आपण हळू-हळू वरच्या उंचीला जातो. त्यामुळे कैलास-मानसच्या समुद्र सपाटीपासून ४५५६ मीटर इतक्या उंचीवर कमी त्रास होतो. शिवाय मी अस ऐकलंय की, नेपाळमधून तिबेटमध्ये नेऊ शकणाऱ्या agencies ठरलेल्या आहेत. ते लोक ‘हवा खराब आहे’, ‘तुम्हाला झेपणार नाही’ अस सांगून परिक्रमा नीट करवत नाहीत.
ही झाली प्राथमिक माहिती! आता मी माझे स्वतःचे अनुभव सांगते.
मनाने जायचं नक्की केल तरी ते घडवून आणण्यात अक्षरशः कैलास पर्वता एवढ्याच मोठ्या अडचणी होत्या. वृध्द सासु-सासरे, लेकाची दहावी, माझा स्वतःचा वास्तू-वीशारदाचा व्यवसाय (architectural practise), इत्यादि, इत्यादि. ह्या यात्रेआधी एकदम जोरदार मेडीकल असते. बाकी तसा प्रश्न नाही पण माझ हिमोग्लोबीन कायम गरजेपेक्षा कमी, आणि वजन गरजेपेक्षा जास्त!!! ( साधारणपणे लग्नाला प्रत्येक वाढदिवसाला एक-एक किलो ह्या प्रमाणात वजन वाढल होतं!!) ह्या सगळ्याची काळजी होतीच नाहीतर एवढी जाहिरात करून, अश्रू ढाळून, समारंभाने जायचं आणि ‘आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा’ अस म्हणत मी दिल्लीहून परत!! नवऱ्याने कुठलीतरी फिल्म बघून ‘मी नाही येणार. तुला जायचं तर जा’ अस आधीच सांगितल होत.
पण प्रश्न येतात तसे सुटतातही.
ऑफिस साठी एक असिस्टंट मिळाली. ती जानेवारीपासून यायला लागली. मार्चमध्ये तिला ‘जून-जुलैत महीनाभर तुलाच ऑफिस सांभाळायचय बर का’ अस सांगितल्यावर एकदम उडालीच. लेकाने सुरवातीला ‘आई, इतर मुलांच्या आया दहावी म्हणून नोकऱ्या सोडतात. तू महिनाभर ट्रीपला कसली जातेस’ अशी कुरकुर केली. पण नंतर त्यालाही तो ज्वर चढला. ‘ मी अठरा वर्षांचा झालो की मी पण जाणार’ अश्या बोलीवर आमची माय-लेकांची मांडवली झाली. माझ्या क्लाएंटस् पैकी काहीजण जरा नाराज झाले पण काहींनी ‘जाऊन या हो. महिना काय असातसा जाईल’ अशी समजूत घातली. नवऱ्याचे काही कामाचे परदेश प्रवास ठरलेले तरी नव्हते.
सासू-सासरे नणंदेकडे काही महिन्यांकरता गेले. माझे आई-बाबा पुण्यात जावई आणि नातवासाठी आले. एरवी ते भावाकडे असतात. दिवसभर भाची त्यांच्याजवळ असते. तिला बघायला वाहिनीची आई नाशिकला गेली. असे कौंटुबिक पत्ते पिसून झाले!! घर आणि ऑफिसचे प्रश्न झाले.
एकीकडे दिल्लीशी पत्र-व्यवहार सुरू होता.
साधारण जानेवारीत विदेश मंत्रालयाची जाहिरात सर्व भाषांमधील प्रमुख वृत्तपत्रात येते. तो फॉर्म, पारपत्राची प्रत आणि स्वतःच्या पत्त्याचे पोस्ट-कार्ड असा जामानिमा पाठवला. मग दोन महिने फक्त वाट बघणे. ती अवस्था म्हणजे पु.ल.देशपांडेंच्या ‘नारायण’ मधल्या मुलगी बघायला आलेल्या मुलासारखी! ‘यात्रेला जाण्याची स्वप्नं बघावी की नको?’, ‘फिटनेस साठी सिंहगडला रविवारची साखर झोप मोडून जावे की नाही?’,’ज्याला-त्याला मी कैलास-मानसरोवर यात्रेला जाणार असल्याचे सांगून नको करावे की नाही’ इत्यादी इत्यादी प्रश्न पडत होते!!
एकदाचे दिल्लीचे पत्र आले. त्यात माझा १० जूनच्या, म्हणजे तिसऱ्या बॅचमध्ये प्रतीक्षायादीत १३वा क्रमांक असल्याचे शुभवर्तमान कळले! पुन्हा मी लटकलेली. नवरा मनोभावे ‘माझा नंबर लागणे कसे अवघड आहे’ हे सांगून माझा उत्साह वाढवत होता. पण त्याची ही गुरु-वाणी खोटी पाडत विदेश मंत्रालयाचे निवड झाल्याचे पत्र आले. आता एकदम चित्रच बदलले. विदेश मंत्रालयाकडून माहितीपुस्तक आले. एका काकांनी त्यांच्या जवळचे ‘अपूर्ण परिक्रमा कैलास-मानस सरोवराची’ हे श्री.मोहन बने ह्यांच पुस्तक वाचायला दिल. ह्या दोन्ही पुस्तकांचा माहिती मिळवायला खुपच उपयोग झाला. त्यातले फोटो बघून कधी एकदा हे सगळं प्रत्यक्ष बघतोय अशी घाई झाली.
आता प्रश्न सामान जमवणे आणि भरणे!!
हे फार मोठे काम होते. काही कळत नव्हत, काय न्याव ते. खर तर काय नेऊ नये हा मोठा प्रश्न होता. कारण मला सगळ कपाटच उचलून न्यावस वाटत होत!! किंवा जमल्यास सगळं घरच!! मी ह्या आधी युथ हॉस्टेलच्या ट्रेकना जाऊन आले होते. पण ही यात्रा महिन्याची. त्यातही दिल्लीच्या कडक उन्हाळयापासून ते तिबेटच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीपर्यंत व्हरायटी!! हिमालयात कधीही जायचं म्हणजे पाउस तर असतोच. विदेश मंत्रालयाकडून आलेल्या माहिती-पत्रका प्रमाणे २० किलो पर्यंत समान न्यायला परवानगी होती. माझ्या डोळ्यासमोर विमानाने परदेशात जाताना चेक-इन-काउंटरसमोर मी करूण चेहऱ्याने सामानाचे वजन करताना उभी राहायचे, तेच यायला लागलं.
त्यात भर म्हणून सगळ्यांचे सल्ले. माझ्या वडिलांचे एक स्नेही ह्या यात्रेला जाऊन आले होते ( नेपाळमार्गे. त्यांचीही फक्त मानस सरोवराची परीक्रमा झाली.) मी आणि बाबा जाऊन त्यांचा सल्ला घेऊन आलो. ‘भरपूर सुका मेवा घेऊन जा’ ह्या त्यांच्या सल्ल्यानुसार बाबा प्रचंड प्रमाणात सुका मेवा घेऊन आले. मग आम्ही तो छोट्या-छोट्या प्लास्टिक पिशव्यांमधून भरला.
गरम – गार आणि पावसाचे कपडे काय घ्यावे हा विचार करण्यात मी पुष्कळ दिवस घालवले. शेवटी हे दोन १२-१५ दिवसांचे ट्रेक लागोपाठ करतोय असा विचार करून समान जमवल. एका ओळखीच्यांची भव्य सॅक आणली. त्याच्या मानाने सामान भरायला सुरवात केली. एक बेताची सॅक, पुणे-दिल्ली-तिबेट सीमा ह्या सामानाची केली. सगळे जड गरम कपडे दुसऱ्या सॅकमध्ये भरले. ही परिक्रमा सॅक. दिल्लीत आणि काही पुढच्या काही मुक्कामाच्या ठिकाणांवर सामान ठेवता येते असे कळले. वापरून झालेले आणि येताना घालायचे कपडे तिथे ठेवायचे ठरवले.
कैलास- मानस म्हणले की आठवतो तो मालपा येथे १९९८ साली दरड कोसळून झालेला अपघात. ह्यात सुप्रसिद्ध नृत्यांगना प्रोतिमा बेदी ,त्यांची पूर्ण ६० जणांची batch, तेवढेच पोर्टर, पोनीवले, व्यवस्थेतील लोक, स्थानिक नागरिक असे जवळ जवळ २०० लोक ठार झाले होते. ह्या अपघाताचे एक अप्रत्यक्ष दडपण मनावर होतेच. (लेकानेही ,’आई, ती जागा पार केलीस की फोन कर बर का.’ अस सांगून ठेवल होतं) विदेश मंत्रालय सुद्धा ‘तीबेटमध्ये काही बर-वाईट झाल्यास ‘अवशेष’ परत भारतात आणले जाणार नाहीत ‘ अस लिहून घेते!!
अशी सगळी affidevits, demand draft, विमानाची जाण्या-येण्याची तिकिटे इत्यादी तयारी झाली. आणि वर्षानुवर्ष मी ज्याची स्वप्न पाहत होते, त्या यात्रेसाठी, मी घर-ऑफिस-कुटुंब सर्वांची काळजी करत आणि सर्वाना माझ्या काळजीत टाकत एकदाची निघाले.
ह्या पुढचे भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा!
भाग १ : पूर्वतयारी: http://www.maayboli.com/node/30416
भाग २ : दिल्ली ते नारायण आश्रम: http://www.maayboli.com/node/30637
भाग ३: नारायण आश्रम ते लीपुलेख खिंड: http://www.maayboli.com/node/30799
भाग ४: मुक्काम तिबेट : http://www.maayboli.com/node/31261
भाग ५: महाकैलासची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31407
भाग ६: मानस सरोवराची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31704
भाग ७: तकलाकोट ते लीपुलेख खिंड : http://www.maayboli.com/node/31889
भाग ८: लीपुलेख खिंड ते गाला : http://www.maayboli.com/node/32246
भाग ९: गाला ते पुणे: http://www.maayboli.com/node/32565
भाग १०: यात्रेची तयारी: http://www.maayboli.com/node/34063
भाग ११ : समारोप http://www.maayboli.com/node/34065
छान लिहीले आहे..पुढच्या
छान लिहीले आहे..पुढच्या विस्तृत भागाची वाट पहात आहे..
छान लिहिलय... पुढचे भाग कधी
छान लिहिलय...
पुढचे भाग कधी ?
वाट पहातोय
खूप छान लिहिलंय. आता लवकर
खूप छान लिहिलंय. आता लवकर मानस सरोवर यात्रेचे वर्णन लिहा. निदान वाचून तरी ती कठीण सैर घडेल!!:स्मित:
मस्तच! खूप आवडलं वाचायला
मस्तच! खूप आवडलं वाचायला
वा , सहीच लिहीलंय. . आण्खी
वा , सहीच लिहीलंय. :). आण्खी फोटो टाका.
अगदी जमलेलं, ओघवते
अगदी जमलेलं, ओघवते लिखाण.......
इतर सर्व वाचकांप्रमाणे पुढील भागांची जाम उत्सुकता लागलीये.
तुमच्या इच्छाशक्तिला, धाडसाला सलाम.......
मस्त लिहिलयं.
मस्त लिहिलयं.
अनया, अहा!!!! काय मस्त आठवणी.
अनया,
अहा!!!!
काय मस्त आठवणी. लग्न ठरल्यावर आणि व्हायच्या आधी मी केली कैलास मानस यात्रा. खाजगी कंपनी तुन. पण अनुभव अफाट आहे. आता माझ्या हजारों ख्वाईशें मधली एक. परत एकदा लेकी बरोबर करायची
अनया ... सॉलिड.... कैलास
अनया ... सॉलिड....
कैलास बद्दल फार उत्सुक्ता आहे. मानस सरोवरा जवळ एक सर्प रात्रि दिसतो ..अशी काहीतरी दन्त कथा आहे....खरी आहे का?
मागे एका पुण्याच्या लेखिकेच ( नाव आठवत नाही) पुस्तक वाचले होते. कैलास-मानस यात्रेवर होत. तीने फार विस्त्रुत पणे लिहीले होते. पण एकन्दर व्यवस्था फार वाइट होती असे लिहीले आहे. त्या पण सरकारी टुर बरोबर गेल्या होत्या. आता आपण लवकर लिहा.
आणि शक्य असल्यास खाजगी आणि सरकारी टुर कम्पन्न्या ह्यान्च्यातिल फरक लिहा. खुप मार्गदर्शन होइल.
छानच झालाय हा भाग. पुढचे
छानच झालाय हा भाग. पुढचे वर्णन व फोटो पहायला मनापासून आवडेल..
-- नरेन्द्र
९ तारीख ते १६ तारिख.... इतका
९ तारीख ते १६ तारिख.... इतका ऊशीर अलाउड नाही.
तारीख पे तारिख, तारीख पे तारिख ..... बोहोत ना इन्साफी है .....
पुढचा भाग लिहिते आहे. लवकरच
पुढचा भाग लिहिते आहे. लवकरच टाकते.
सर्वाना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
अगदी छान. .. उत्सुक पुढच्या
अगदी छान. .. उत्सुक पुढच्या भागासाठी..
सुरुवात छानच झाली आहे, फोटो
सुरुवात छानच झाली आहे, फोटो पण छान.
ते 'मानसरोवर' च आहे. 'मानस' नाही. सरोवरातला 'स' इकडे जोडून कोणीतरी नाव बदललेलं दिसतंय.
अतिशय सुंदर सहज्-सोप्या भाषेत
अतिशय सुंदर सहज्-सोप्या भाषेत वर्णन - अनया, तू या आणि अशा इतर अनुभवांचं संकलन करून पुस्तक प्रकाशित करायला हवंस असं मला मनापासून वाटतं.
लेखन अगदि खुमासदार पद्धतीने
लेखन अगदि खुमासदार पद्धतीने लिहिलेय. पुढचा लेख वाचण्याची अपार उत्सुकता आहे.
खूप छान लिहिलं आहे. माहितीही
खूप छान लिहिलं आहे. माहितीही मिळत आहे आणि विनोदी शिडकावा टाकल्यामुळे लेखनाची गोडी वाढली आहे.
मस्तच
मस्तच
सुंदर ....
सुंदर ....:)
मस्तच लिहिलय. इथे जरा
मस्तच लिहिलय. इथे जरा बाकीच्या भागांच्या लिंक्स टाका ना.
मामी, तुमच्या सुचनेप्रमाणे
मामी, तुमच्या सुचनेप्रमाणे पुढच्या भागाच्या लिंक दिल्या आहेत.
पुन्हा एकदा वाचल, सगळेच भाग
पुन्हा एकदा वाचल, सगळेच भाग मस्त ,
मस्त लिहिलयस
Thanks …really I was waiting
Thanks …really I was waiting for such kind of narrative description about this ‘Kailas Manas Sarovar’ tour……………..Just I have read only 1st part ……………amazing…………….U have noted down very clearly…………..now can’t move to any other work…….extremely portrayal live ………
लेह-लडाख झाले, सिक्कीम देखील
लेह-लडाख झाले, सिक्कीम देखील होतंय... आता हे कधी करतोय असे झालंय... सुरुवात मस्त.. आता सर्व वाचून काढतो..
लेखन अतिशय सुन्दर ! लिखण
लेखन अतिशय सुन्दर !
लिखण कुठेही वहावत गेलेले नाही. महत्वच्या गोश्टी अचुक नोन्दल्या गेल्या आहेत. भाशा ओघवती आहे. वाचकाला खिळवून ठेवण्याची अवघड कसरत साध्य झाली आहे.
खरोखर वाचकाला प्रत्य़क्श कैलास मानस यात्रा घडविण्याची ताकत वर्णनात आहे.
हे "प्रवास वर्णन" उच्च प्रतीचे "ललित लेखन" आहे.
पुढील मोहिमेसाठी शुभ चिन्तन.
ता.क. : लेख वाचल्याचा मझ्यावर झालेला परिणाम म्हणजे मी दुसर्या दिवशीच आळस झटकून वीस वर्शान्नी सिहगड चढून आलो.
भारत सरकारने ही यात्रा पुन्हा
भारत सरकारने ही यात्रा पुन्हा सुरु केली आहे का ? कुणाला माहीत असल्यास प्लीज माहिती द्या. त्यांच्या ऑफिशियल साईटवर पण काहीच दिसत नाहीये.
निकु, ही लिंक बघा.https://www
निकु, ही लिंक बघा.
https://www.google.com/amp/s/www.tourism-of-india.com/blog/amp/how-to-ap...
शीघ्रप्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
शीघ्रप्रतिसादाबद्द्ल धन्यवाद अनया ! त्यातही परत kmyचीच लिंक आहे. त्यावर काहीच दिसत नाही. भारत सरकारने २०२० आणि २०२१ मधे कोरोनामुळे यात्रा स्थगित केली होती.. पण बहुधा परत सुरु झाली नसावी ..
kmyatra@mea.gov.in इथे एक मेल
kmyatra@mea.gov.in इथे एक मेल पाठवून बघता का? किंवा 011-24300655 ह्यावर संपर्क करून पहा.
ॐ नमः: शिवाय
मायबोलीच्या archive मध्ये अशी
मायबोलीच्या archive मध्ये अशी रत्ने लपलेली असतात ती कोणी वर काढल्यावर वाचायला मिळतात. सर्व लेखमाला सविस्तर अजून वाचली नाही पण जे भाग वाचले ते फारच सुंदर आहेत. तिथे गेल्यासारखंच वाचकाला वाटेल.
फक्त एकच गोष्ट पचनी पडली नाही किंवा आकलन झालं नाही- जर मर्यादित संख्येने यात्रेकरू जाऊ शकत होते आणि त्यातही वेटिंग लिस्ट होती तर लेखिका self proclaimed नास्तिक असताना त्यात नंबर लावला त्याऐवजी कोणी आस्तिक व्यक्ती जाऊ शकली नसती का? भारत सरकार मुळात ही यात्रा, परिक्रमा religious purposes साठी चालवत असताना आणि त्याला पुरेसे अर्ज येत असताना तिथे नास्तिकांनी जाणं म्हणजे technically काही चूक नसेल पण तरी ते मूळ उद्देशाला धरून नाही. Am I missing something here?
अर्थात आम्हाला सुंदर लेखमाला वाचायला मिळाली हे छानच झालं त्यातून
Pages