साधारण माझ्या बारवीच्या परीक्षेच्या आधी काही महिने मी शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात केली. त्या-आधी क्वचित रेडिओवर ऐकलं असेल तरच, अन्यथा कॅसेट आणून ऐकलं नव्हतं कधी. पण ऐकायला 'व्होकल क्लासिकल'ने सुरुवात झाली आणि मग 'इंस्ट्रुमेंटल' ! वाद्यांमध्ये बासरी अग्रगण्य. पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. रघुनाथ सेठ, पं. विजय राघव राव यांच्या कॅसेट्स तुडुंब ऐकल्या आणि आपोआपच मनात ठरलं की 'जर एखादं वाद्य शिकलो, तर बासरीच शिकायची'. शिक्षण पूर्ण होईपर्यंत काही योग नाही आला पण नोकरीनिमित्ताने चेन्नईला आलो आणि सुदैवाने फार चांगले (आणि हिंदी बोलू शकणारे) गुरू मिळाले.
कर्नाटकी पद्धतीच्या बासरीवर शिक्षण चालू झालं खरं पण बहुतेक माझ्या सरांना पण लक्षात आलं की माझा ओढा हिंदुस्तानी पद्धतीकडे जास्त आहे. त्यांनीही कर्नाटकी पद्धतीबरोबर हिंदुस्तानी पद्धतीने शिकवायला सुरुवात केली.
बासरी शिकू लागलो आणि कळलं की ऐकायला जितकं गोड वाटतं तितकं हे वाद्य सोपं नाही. आधी 'दम-सास' टिकणं हा मुख्य मुद्दा. (माझ्या पहिल्याच क्लासला मला थोडी चक्कर आल्यासारखं झाल्याचं आठवतंय!)
मग 'फुंक' आणि 'बोटांनी बासरीची छिद्रे नीट बंद करणे' या दोन गोष्टींची सांगड घालता येणं. आणि मग ही सांगड घालता येत असताना, फुंक एकसारखी येत असताना, जो स्वर वाजवला जातोय, तोच स्वर खर्या अर्थाने वाजणे हे त्याहून कठिण काम आहे हे समजायला लागलं. आणि हे सगळं 'बर्यापैकी' जमू लागलं तेव्हा अजून एक मुद्दा भेडसावू लागला तो म्हणजे, 'नक्की माझी बासरी चांगली आहे ना?' म्हणजे, मी सराव बर्यापैकी नियमितपणे करतोय, फुंक आणि बोटांची चांगली युती जमली आहे आणि तरीही सर क्लासमध्ये 'हा स्वर नीट वाजत नाहिये. श्रुती ऐक आणि मग वाजव' (हे वाक्य बोलायचा त्यांना कंटाळा येत नाही. ते कायम हसतमुखाने हे वाक्य बहुतेक प्रत्येक क्लासमध्ये ऐकवतातच) आणि मग प्रत्येक वेळि 'नाचता येई ना अंगण वाकडे' या न्यायाने मला 'बासरीच नीट नाहिये' असं वाटायला लागलं. सरांच्या हेही कसं लक्षात आलं कोण जाणे, एक दिवस त्यांनी त्यांचीच बासरी मला वाजवायला सांगितली आणि तरीही मी 'आऊट ऑफ श्रुती' होतोय हे त्यांनी दाखवून दिलं. आणि एक फार मोलाचा सल्ला दिला. 'बासरी चांगली असणं यावर फार तर ५०% स्वर (म्हणजे स्वरांचं परफेक्शन) अवलंबून असेल पण उरलेलं ५०% हे वाजवणारा कसा वाजवतोय यावर अवलंबून आहे.' हे ऐकून आणि सरांकडून अजून वेगवेगळ्या प्रकारे 'श्रुती' म्हणजे स्वर कसा परफेक्ट वाजवायचा याचं मार्गदर्शन मिळालं आणि मी त्याचा प्रयत्न करू लागलो. पण तरीही ते वाजवणं म्हणजे, 'फुंक मारताना बासरीच्या मुखरंध्रावर ओठ कुठे ठेवायचे?' 'फु़ंक कशी मारायची? किती जोराने मारायची?' इ. इ. स्वरूपाच्या तडजोडीच ! त्यामुळे 'बासरी ठीक नाही, किंवा म्हणावीशी चांगली नाही' हा विचार काही सुटेना.
आणि साधारण ३ एक आठवड्यांपूर्वी, 'शशांक पुरंदरें'ना भेटलो. निमित्त ठरलं ते म्हणजे माझे सर स्वतः केवळ हिंदुस्तानी पद्धतीच्या चांगल्या बासर्या चेन्नईत मिळत नाहीत म्हणून पुण्याला आले होते. मी त्यांच्याबरोबर 'मेहेंदळे हाऊस'मध्ये बासरी कशी निवडावी? याचं 'ऑन जॉब ट्रेनिंग' घेत होतो. आधीच पुरंदरे काकांना फोन झाला होताच. ते वेळात वेळ काढून मेहेंदळे हाऊस इथे भेटायला आले आणि आम्ही बासर्या घेण्यात तसेच गर्क. एका स्केलच्या बासरीसाठी किमान १३-१४ बासर्या चेक करून, त्यातून पुन्हा ४-५ बाजूला काढून त्यातून एक अशी बासरीची निवड चालू होती. आणि तेव्हा पुरंदरे काका बोलता बोलता 'पीव्हीसी पाईप'पासून तयार केलेल्या बासरीबद्दल बोलले. त्यांच्या एका मित्राने तशा काही बासर्या तयार केल्या आहेत असे कळले. मग डोकं त्या दिशेनं फिरायला लागलं. इंटरनेटावर नेटाने शोध घेतला आणि काही साईट्सवर छान आणि सोपी करून दिलेली माहिती मिळाली. त्याच माहितीच्या आधारे मी ही एक बासरी तयार करायचा प्रयत्न केला. दिवाळीला घरी गेलो होतो, घरातलीच एक पाईप चेन्नईला घेऊन आलो. पण मुहूर्त काही लागत नव्हता. शेवटी मागच्या आठवड्यात ठिय्या करून बसलो आणि बासरीचं मुखरंध्र तयार केलं. बासरी करताना आधी मुखरंध्र करावं लागतं हे सांगायलाच नको. ते तयार झाल्यावर बासरीचा 'पंचम' कोणता ते कळतं. माझ्या बासरीचा पंचम आधी 'पांढरी ३' च्या आसपास होता. पण त्याच्याशी 'षड्जपंचम भाव असलेला षड्ज' कसा तयार करायचा हा प्रश्न होता. म्हणून पाईप खालून थोडी कापून घेतली. पंचम (खालचा) हा थोडा 'फ्लॅट' लागतोय असं पाहून बासरीची लांबी कमी करणं थांबवलं. मग धैवत, निषाद आणि षड्ज यांसाठीची छिद्रं तयार करून घेतली (आधी लहान आकाराची छिद्रं करून मग ट्यूनिंग करताना ती मोठी करतात. एकदम मोठं छिद्र केलं तर ते नंतर लहान करता येत नाही आणि ती बासरी जवळजवळ वायाच जाते) बर्याच दिवसांनी गणिताशी संबंध आला होता. पण मजाही वाटत होती. मग बाकीची म्हणजे रिषभ, गंधार आणि मध्यमाची छिद्रं तयार करून घेतली. आणि एकदा पुन्हा खालचा आणि मध्यसप्तकातला पंचम वाजवून पाहिला. थोडा 'फ्लॅट' होता म्हणून करंगळीने झाकता येईल आणि करंगळी पोहोचू शकेल अशा ठिकाणि एक छिद्र पाडलं. पंचम परफेक्ट झाला. पण सगळी छिद्रे मोकळी केल्यावर येणारा मध्यम हा 'तीव्र मध्यम' लागत होता. तोही थोडा फ्लॅट होता म्हणून ते करंगळीजवळचं छिद्र अजून थोडं मोठं केलं आणि बासरी तयार झाली.From basari
इथे ती थोडी वाजवूनही पाहिली आहे. अर्थात पहिलाच प्रयत्न असल्याने एकदम 'परफेक्ट' नाहीच. पण तरी ६०-६५% तरी बरी जमली आहे असं मला वाटतंय.
आठवड्यापूर्वी अजून एक बासरी तयार केली. 'पांढरी ३' या स्केलची. ही साधारण ७५-८०% चांगली जमली आहे असं वाटतंय. अर्थात, वजनाला काकणभर जास्त झाली आहे आणि गंधार आणि तीव्रमध्यम तितकेसे परफेक्ट नाहियेत. पण तरीही बरीच चांगली जमली असं मला वाटतंय.
या नव्या बासरीवर यमन रागावर आधारित 'तुज मागतो मी आता' हे भजन वाजवलंय.
हे सगळं इथे सांगायचा हेतू हाच की मायबोलीकरांपैकी बासरी शिकणारे, शिकलेले, शिकू इच्छिणारे बरेच असतील असा अंदाज आहे आणि या निमित्ताने जर सगळ्यांनी आपापले विचार इथे मांडले तर नक्कीच सगळ्यांनाच मदत होणार आहे. पीव्हीसी पाईपपासून कुणी बासरी तयार केली असेल तर त्याबद्दलही इथे लिहा. जेणेकरून मलाही पुढच्या प्रयत्नात सुधारणा करता येईल.
- चैतन्य.
व्वा मस्तच. अभिनंदन हा अभिनव
व्वा मस्तच. अभिनंदन हा अभिनव प्रयोग केल्याबद्दल
आपली अभ्यासूवूत्ती दाद
आपली अभ्यासूवूत्ती दाद देण्याजोगी आहे.
खूप कौतुक!
खूप कौतुक!
अरे वा मस्तच. माझे काका
अरे वा मस्तच.
माझे काका बांबुपासून बासरी बनवायचे ते लहानपणी बघितल्याचे अंधुकसे आठवतय.
अरे वा! मस्त एकदम.
अरे वा! मस्त एकदम.
चैतन्या - माझ्या ओळखीतील त्या
चैतन्या - माझ्या ओळखीतील त्या सद्ग्रहस्थांनी (कै. श्री. देशमुख) अॅल्युमिनियम पाईप वापरुनही अतिशय सुरेख बासरी केलेली आहे - मला स्वतःला ही बासरी जास्त गोड वाटते. पूर्वी पितळ्याच्या उभ्या बासर्या पाहिलेल्या आहेत.
पं. केशवराव गिंडे यांचे "वेणूविज्ञान - बासरीविषयी सर्व काही" (राजहंस प्रकाशन) हे पुस्तक नुकतेच मला मिळाले आहे - त्यात खूप छान माहिती आहे - तांत्रिक व बेसिक काही रागांविषयीही. तसेच त्यांच्या एका कार्यक्रमात विविध बासर्यांचा अतिशय सुंदर संग्रह पाहिला मिळाला होता -त्याची या निमित्ताने आठवण झाली.
मला तर वाटते कर्टन रॉड्स वापरूनही बासरी करता येईल बहुतेक - त्यावरील उभ्या रेघांचा वापर करुन बोटांना ग्रिपही (पकड) छान येईल - मी जाणकार नाही पण असे वाटते खरे. तज्ज्ञ, कलाकार, इंजिनियर (या क्षेत्रातले) मंडळी अजून प्रकाश टाकू शकतील.
पी व्ही सी पाईप जरा मोठ्या व्यासाचा घेतला तर जास्त घुमाव येईल का स्वरांना ?
आणि हे राहिलंच की रे - या नवीन उपक्रमाकरता तुझे मनापासून अभिनंदन, नवनवीन बासरी निर्मितीसाठी तुला खूप शुभेच्छा........
पुण्यात बघतो कोणी यातला जाणकार / क्रेझी असेल तर.... तो मदत करु शकेल......
मस्त, अशा गोष्टिंसाठी वेड हा
मस्त, अशा गोष्टिंसाठी वेड हा एकमेव शब्द आहे. अभिनंदन. वाजवलेलीपण ऐकली. हे जे काही सापडलय ते जप मात्र. शुभेच्छा!
सही रे चैतन्य. बासरी चांगलीच
सही रे चैतन्य. बासरी चांगलीच बनवली आहेस. तू वाजवतोस सुद्धा मस्त.
मायबोली गणेशोत्सवात कधीतरी तुझी कला सादर कर.
सर्वप्रथम, बासरी शिकत
सर्वप्रथम, बासरी शिकत असल्याबद्दल अभिनन्दन व शुभेच्छा
शेवटी कण्टाळून काहीच नाही तर सन्घाचा "शन्ख" (बिगुल) वाजवायचा असे ठरवले
पण तिथे तर बेम्बीच्या देठापासुन हवा कोन्डून दाबाने गाल न फुगवता सोडावि लागते, ते कुठले जमायला? आमचा छातीचा भात्या आधीच नाजुक, त्यामुळे हे शन्ख वगैरे प्रकरण देखिल बाजुलाच ठेवावे लागले.
>>>>मायबोलीकरांपैकी बासरी शिकणारे, शिकलेले, शिकू इच्छिणारे बरेच असतील <<<<<
शिकु इच्छिलेल्यान्च्या यादीत माझ नाव टाकुन द्या... शाळेत असतानापासुन प्रयत्न करतोय. पूर्वी आईकडे हट्ट करुन पेशवेउद्यानाच्या बाहेर उभारलेल्या फेरीवाल्यान्च्या कडून घ्यायचो, नन्तर बाजिराव रोडवरिल मेहेंदळे दुकानातुन दोन तीन वेळा घेतली, तिथुनच पुस्तक देखिल घेतले, सन्घाच्या वंशी देखिल उपलब्ध करुन घेतल्या, पण आजवर कधी सलग सारेगमपधनिसा काही वाजवता आले नाही
अन त्यामुळेच, कुणी बासरी शिकत आहे असे समजले जरी तरी त्याच्याबद्दल मन कौतुकाने भरुन येते.
व्वा!! छानच! बासरी छान वाजवता
व्वा!! छानच!
बासरी छान वाजवता तुम्ही. अभ्यास चालु ठेवा नक्की.
अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा!
आणखी वादन ऐकायचेय !
आणखी वादन ऐकायचेय !
मस्तच. . तुम्हाला शुभेच्छा.
मस्तच. :). तुम्हाला शुभेच्छा.
छान
छान
मस्तच! प्रसन्न वाटलं ऐकुन...
मस्तच! प्रसन्न वाटलं ऐकुन...
सही रे... तो व्हिडीओसुद्धा
सही रे... तो व्हिडीओसुद्धा आवडला !!
जबरीच.... अश्याच नवनवीन बासरी
जबरीच.... अश्याच नवनवीन बासरी बनविण्यासाठी शुभेच्छा..
पुण्यात सुनिल अवचट आहेत.. हरीजिंचे शिष्य.. ते बासरी तयार करतात की नाही ते माहिती नाही.. पण मदत करु शकतील कदाचित..
मला पण पुण्यात बासरी शिकवणारे कोणी असेल तर माहिती हवी आहे..
मला स्वतःला बांबूपासून बनवलेल्या बासरीचेच सूर जास्त भावतात...
Gr8 ...... Innovative idea
Gr8 ...... Innovative idea .......
नवीन बासरीवर एखादी धुन वाजवून इथे पोस्ट कर.
तुमची बासरी ऐकली. पहिलाच
तुमची बासरी ऐकली. पहिलाच प्रयत्न असूनही कानाला बहुतांश गोड वाटत होती. नवीन कांही करून पाहाण्याचे तुमच्या रक्तातच असावे. या तुमच्या प्रयत्नाला खूप शुभेच्छा!
यानिमित्त बासरी वाजवत असतांना तुम्हाला पाहाता आले. 'वैनायक' बाबतच्या माझ्या क्वेरीला तुम्ही दिलेल्या प्रतिसादावरून तुमचा आवाजही चांगला वाटला. माझा अंदाज आहे की तुम्हाला गाताही येत असावे. चेन्नईसारख्या दूरच्या गावातही गुरू शोधून बासरी शिकण्याचाच नव्हे तर ती तयार करण्याचाही तुम्ही चालवलेला प्रयत्न खरेच कौतुकास्पद आहे. या दोन्ही प्रयत्नात तुम्हाला चांगले यश लाभो!
शुभेच्छा. बासरीवादनही ऐकले
शुभेच्छा. बासरीवादनही ऐकले मस्त वाटले.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार!
पुरंदरे काका,
स्टीलची आणि पितळेची बासरी मीही पाहिली आहे.
कर्टन रॉडपासूनही करता येईल नक्कीच, पण त्या रॉडला आतूनही रेघा-रेघा असतील तर स्वर कसे येतील याबाबत शंका आहे. (इंटरनेटवर याबाबत काही दुमत आहे- काहींच्या मते बांबूचा आतला भाग जितका 'रफ' तितका आवाज चांगला आणि काहींच्या मते तो भाग गुळगुळीत असावा.)
पीव्हीसी पाईप मोठ्या व्यासाचा घेतला की 'बेस' मधले स्वर वाजतील( अर्थात तो लांबीलाही तितकाच मोठा घ्यावा लागेल.) तोही प्रयत्न करायचाय. ते झालं की मग प्रत्यक्ष बांबूची बासरी- असा मानस आहे. बघू कसं काय जमतंय ते.
उल्हास काका, दिनेशदा-
अजून काही अपलोड करता आले तर नक्की बघतो.
हिम्सकूल,
मलाही बांबूच्या बासरीचा आवाज जास्त आवडतो.
पण एकदम बांबूची बासरी तयार करण्याऐवजी आधी पाईपची आणि मग बांबूची बासरी करण्याचा मानस आहे.
बहुतेक मेहेंदळे हाऊसमधे असे बासरी तयार करण्यासाठीचे बांबूही मिळतात.
आणि पुण्यात एक 'बन्सुरीबापु' म्हणून कुणी तरी निगडीमध्ये आहेत. (यूट्यूबवर त्यांचे काही व्हीडिओ सुद्धा आहेत)
आणि अजून कुणी तरी 'कुलकर्णी' ही आहेत. (संजय की कुणीतरी). मधंतरी डी.डी. सह्याद्रीवर त्यांचा कार्यक्रम होता. राग श्री आणि खमाज वाजवला होता त्यांनी फार सुरेख!
चैतन्य.. छान वादन! लेख पण छान
चैतन्य.. छान वादन! लेख पण छान आहे.
आमच्या महेशदादाची पुन्हा एकदा आठवण आली. त्याला पण बासरीचे पिसे आहे.
चैतन्या - बासरी मस्त
चैतन्या - बासरी मस्त वाजवलीयेस रे, "तूनळी" घरीच बघता / ऐकता येते - ऑफिसमधे बंदी......
जाईजुई - बासरी काय आणि इतर छंद काय पिसे लागल्याशिवाय अजिबात जमतच नाहीत.... क्रेझ ऐवजी "पिसे" शब्द मस्त वाटला..... धन्स......
फारच मस्त प्रयोग!
फारच मस्त प्रयोग! बन्सी-वादनही आवडले!
जबरदस्त चैतन्य!
जबरदस्त चैतन्य!
अश्याप्रकारची नवी बासरी
अश्याप्रकारची नवी बासरी बनवण्याची कल्पना छानच. तुमचे बासरी वादन ऐकले. श्रवणीय झालंय.
कुलकर्णींचा उल्लेख केलाय ते रुपक कुलकर्णी होते का? हरीजींचे शिष्योत्तम आहेत. त्यांचे काका मल्हारराव कुलकर्णीही बासरी वादक होते.
चैतुबाप्पा! आयडिया सुंदर आहे.
चैतुबाप्पा!
आयडिया सुंदर आहे. फारशी हत्यारे जवळ नसताना, अन किरकोळ खर्चात बनविता येईल असे वाद्य आहे.
एक छोटी शंका.
तुम्ही बनवली आहे तशी साईडने वाजवतात, त्याला पावा अन समोरून (सॅक्साफोन प्रमाणे) वाजविता येईल ती बांसरी असे काहीतरी डोक्यात आहे, ते बरोबर आहे काय?
कुणी माहितगार यावर प्रकाश टाकील तर बरे!
अजून एक अनाहुत सूचना:
तिथे यूट्यूबवर इंग्रजीत थोडक्यात लिहा तुमच्या प्रयोगाबाबत. कुण्या फिरंगी बालेने हे विचारलं आहे तिथे:
that is pvc pipe? : )
anamarie8 2 days ago
सुंदर डोकं लढविलं आहात, फिरंग्यांनाही कळू देत!
बासरी शिकण्याबद्दल, ती स्वतः
बासरी शिकण्याबद्दल, ती स्वतः बनविल्याबद्दल अभिनंदन आणि त्यावर इथे लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद! हा लेख वाचताना मला पण बासरी बनवायची सुरसुरी आली. पण सुरांचा अंधार असल्यामुळे पाडलेलं भोक नक्की बरोबर जागी आहे की नाही हे मला कळणार नाही, ते लक्षात आल्यावर ताबडतोब ती सुरसुरी जिरली हे वेगळं सांगायला नकोच.
चैतन्य, हाच प्रयोग
चैतन्य, हाच प्रयोग माझ्याबाबतीत झाला होता. १९९० - ९१ मध्ये कामावरुन मित्राची काळी ४ बासरी पोहोचवायला जात असताना एक खूप सिनियर कलिग भेटले. ते इव्हिनिंग शिफ्टला होते. मित्राचं घर त्यांच्या जवळ असल्याने त्यांनी ती बासरी पोहोचवायची तयारी दाखवली. पण दुसर्या दिवशी पोहोचेल म्हणाले.
दुसर्या दिवशी कामावर आल्यावर मी विचारायच्या आतच त्यांनी बासरी पोहोचवल्याचं सांगितलं आणि स्वत:च्या लॉकरमधून काढून मला १" पिव्हीसी पाईपपासून बनवलेली बासरी गिफ्ट दिली. म्हातारबुवांनी संध्याकाळच्या वेळात व्हर्निअर कॅलिपरने मापं वगैरे घेउन बनवली होती. नंतर मित्राच्या बासरीवर आणि त्याच्या गुरुंकडे त्याने ती चेकही करुन बघितली. एक्झॅक्ट मॅच. ओरीजनल दादर ब्रीजखालून धोत्र्यांकडून घेतली होती. मुंबईत तेच बेस्ट होते त्यावेळी. दहा पंधरा वर्षांनी ती बासरी त्याच मित्राकडून पडून तुटली.
ई-ब्लीस्स
त्याला उभी बासरी म्हणतात. पावा, पावरी, बासरी, वेणू, अलगुज यात माझ्या माहितीप्रमाणे काही फरक नाही.
लिंबूदा, बासरी हे सर्वात स्वस्त (कुणी हाणू नका याबद्दल) आणि सर्वात कठीण वाद्य म्हणतात. पण प्रयत्न करा की, नक्की जमेल.
वा! मस्त!खूपच
वा! मस्त!खूपच कौतुकास्पद!
चैतन्या,नशीबवान आहेस रे...तुला बासरी आणि संगीत दोन्हीही वश झालंय!
चैतन्य, फारच छान आहे
चैतन्य, फारच छान आहे बासुरीवादन.
असे वाटतच नाही की बासरी PVC पाईपची आहे.
Pages