माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा
बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना एका मित्राच्या मावशीकडे कैलास-मानस सरोवर यात्रेचा स्लाईड शो बघितला होता. मी कॉलेजला असताना जमेल तेव्हा गिर्यारोहण करायचे. हिमालयातही एकदा जाऊन आले होते. हा स्लाईड शो बघितल्यावर मात्र भारावून गेले. गिर्यारोहणापेक्षा वेगळाच प्रकार होता. तो कैलास पर्वताचा गूढ आकार, मानस सरोवराची अथांग निळाई !! वा!!
पण तेव्हा मी शिकत होते. माझ्या शिक्षणासाठी, गिर्यारोहणाच्या छन्दांसाठी वडील आनंदाने पैसे, पाठींबा, उत्तेजन देत होते. कैलासच्या महागड्या यात्रेसाठी पैसे मागायची माझी हिम्मत झाली नाही. शिक्षण पूर्ण करून आपल्या पैशानी जायचं नक्की ठरवल होत. पण नेहमीप्रमाणे ‘दात आणि चणे’ न्याय मध्ये आला. शिक्षण संपल्यावर एका वर्षात ‘दोनाचे चार’, मग अजून दोन वर्षात ‘चार हातांचे सहा हात’ झाले!! गृहकृत्य, बालसंगोपन, नवऱ्याच्या कामानिमित्त परदेश दौरे ह्यात बारा-पंधरा वर्षे कुठल्या कुठे उडून गेली.
ह्या दरम्यान कुठे कैलास-मानस सरोवर यात्रे बद्दल काही वाचल, बघितल की मनात एक कळ यायची. पण ‘घरच्या तसेच कामाच्या जबाबदार्याय आहेत. सध्या नाही जमणार. पुढे कधीतरी जमेल’ अशी मी माझीच समजूत घालत होते. मात्र माझ्या ओळखीतले एकजण तीन वर्षांमागे ह्या यात्रेला जाऊन आले. त्यांचे वर्णन ऐकून, फोटो बघून ती दबलेली इच्छा अगदी उफाळून आली. मग मात्र मी पद्धतशीर चौकशा सुरूच केल्या.
ही कैलास मानसची यात्रा दोन प्रकारे करता येते. पहिला प्रकार म्हणजे विदेश मंत्रालय (भारत सरकार) ही यात्रा दरवर्षी आयोजित करतात. भारत सरकार दरवर्षी ९६० यात्री तिबेट मध्ये पाठवू शकते. मेच्या शेवटच्या आठवड्या पासून साधारण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सहा-सहा दिवसांच्या अंतराने १६ ग्रूप जातात. ह्या यात्रेमध्ये आपण तिबेटमध्ये जाण्याआधी जवळ-जवळ पाच-सहा दिवस चालत किंवा घोड्यावर रस्ता कापून चीनच्या हद्दीत प्रवेश करतो. नंतर पुढच्या बारा दिवसात कैलास पर्वताची तसेच मानस सरोवराची परिक्रमा पूर्ण होते. त्यानंतर मायदेशी परतून आल्या वाटेने घरी! ह्याला एकूण एक महिना लागतो.
दुसरा प्रकार म्हणजे, प्रवासी कंपन्यांबरोबर जाणे. ह्याच्या जाहिराती सर्वानी वाचल्या असतीलच. ह्या कंपन्या नेपाळमार्गे land rover गाड्यांनी तिबेटमध्ये नेतात. परिक्रमा झाल्या की पुन्हा नेपाळमार्गे परत.
दोन्ही प्रकारात खर्च साधारण सारखाच येतो. सरकारतर्फे गेल्यास एक महिना लागतो. नेपाळमार्गे गेल्यास वीस दिवस. मात्र भारतातून गेल्यास आपण हळू-हळू वरच्या उंचीला जातो. त्यामुळे कैलास-मानसच्या समुद्र सपाटीपासून ४५५६ मीटर इतक्या उंचीवर कमी त्रास होतो. शिवाय मी अस ऐकलंय की, नेपाळमधून तिबेटमध्ये नेऊ शकणाऱ्या agencies ठरलेल्या आहेत. ते लोक ‘हवा खराब आहे’, ‘तुम्हाला झेपणार नाही’ अस सांगून परिक्रमा नीट करवत नाहीत.
ही झाली प्राथमिक माहिती! आता मी माझे स्वतःचे अनुभव सांगते.
मनाने जायचं नक्की केल तरी ते घडवून आणण्यात अक्षरशः कैलास पर्वता एवढ्याच मोठ्या अडचणी होत्या. वृध्द सासु-सासरे, लेकाची दहावी, माझा स्वतःचा वास्तू-वीशारदाचा व्यवसाय (architectural practise), इत्यादि, इत्यादि. ह्या यात्रेआधी एकदम जोरदार मेडीकल असते. बाकी तसा प्रश्न नाही पण माझ हिमोग्लोबीन कायम गरजेपेक्षा कमी, आणि वजन गरजेपेक्षा जास्त!!! ( साधारणपणे लग्नाला प्रत्येक वाढदिवसाला एक-एक किलो ह्या प्रमाणात वजन वाढल होतं!!) ह्या सगळ्याची काळजी होतीच नाहीतर एवढी जाहिरात करून, अश्रू ढाळून, समारंभाने जायचं आणि ‘आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा’ अस म्हणत मी दिल्लीहून परत!! नवऱ्याने कुठलीतरी फिल्म बघून ‘मी नाही येणार. तुला जायचं तर जा’ अस आधीच सांगितल होत.
पण प्रश्न येतात तसे सुटतातही.
ऑफिस साठी एक असिस्टंट मिळाली. ती जानेवारीपासून यायला लागली. मार्चमध्ये तिला ‘जून-जुलैत महीनाभर तुलाच ऑफिस सांभाळायचय बर का’ अस सांगितल्यावर एकदम उडालीच. लेकाने सुरवातीला ‘आई, इतर मुलांच्या आया दहावी म्हणून नोकऱ्या सोडतात. तू महिनाभर ट्रीपला कसली जातेस’ अशी कुरकुर केली. पण नंतर त्यालाही तो ज्वर चढला. ‘ मी अठरा वर्षांचा झालो की मी पण जाणार’ अश्या बोलीवर आमची माय-लेकांची मांडवली झाली. माझ्या क्लाएंटस् पैकी काहीजण जरा नाराज झाले पण काहींनी ‘जाऊन या हो. महिना काय असातसा जाईल’ अशी समजूत घातली. नवऱ्याचे काही कामाचे परदेश प्रवास ठरलेले तरी नव्हते.
सासू-सासरे नणंदेकडे काही महिन्यांकरता गेले. माझे आई-बाबा पुण्यात जावई आणि नातवासाठी आले. एरवी ते भावाकडे असतात. दिवसभर भाची त्यांच्याजवळ असते. तिला बघायला वाहिनीची आई नाशिकला गेली. असे कौंटुबिक पत्ते पिसून झाले!! घर आणि ऑफिसचे प्रश्न झाले.
एकीकडे दिल्लीशी पत्र-व्यवहार सुरू होता.
साधारण जानेवारीत विदेश मंत्रालयाची जाहिरात सर्व भाषांमधील प्रमुख वृत्तपत्रात येते. तो फॉर्म, पारपत्राची प्रत आणि स्वतःच्या पत्त्याचे पोस्ट-कार्ड असा जामानिमा पाठवला. मग दोन महिने फक्त वाट बघणे. ती अवस्था म्हणजे पु.ल.देशपांडेंच्या ‘नारायण’ मधल्या मुलगी बघायला आलेल्या मुलासारखी! ‘यात्रेला जाण्याची स्वप्नं बघावी की नको?’, ‘फिटनेस साठी सिंहगडला रविवारची साखर झोप मोडून जावे की नाही?’,’ज्याला-त्याला मी कैलास-मानसरोवर यात्रेला जाणार असल्याचे सांगून नको करावे की नाही’ इत्यादी इत्यादी प्रश्न पडत होते!!
एकदाचे दिल्लीचे पत्र आले. त्यात माझा १० जूनच्या, म्हणजे तिसऱ्या बॅचमध्ये प्रतीक्षायादीत १३वा क्रमांक असल्याचे शुभवर्तमान कळले! पुन्हा मी लटकलेली. नवरा मनोभावे ‘माझा नंबर लागणे कसे अवघड आहे’ हे सांगून माझा उत्साह वाढवत होता. पण त्याची ही गुरु-वाणी खोटी पाडत विदेश मंत्रालयाचे निवड झाल्याचे पत्र आले. आता एकदम चित्रच बदलले. विदेश मंत्रालयाकडून माहितीपुस्तक आले. एका काकांनी त्यांच्या जवळचे ‘अपूर्ण परिक्रमा कैलास-मानस सरोवराची’ हे श्री.मोहन बने ह्यांच पुस्तक वाचायला दिल. ह्या दोन्ही पुस्तकांचा माहिती मिळवायला खुपच उपयोग झाला. त्यातले फोटो बघून कधी एकदा हे सगळं प्रत्यक्ष बघतोय अशी घाई झाली.
आता प्रश्न सामान जमवणे आणि भरणे!!
हे फार मोठे काम होते. काही कळत नव्हत, काय न्याव ते. खर तर काय नेऊ नये हा मोठा प्रश्न होता. कारण मला सगळ कपाटच उचलून न्यावस वाटत होत!! किंवा जमल्यास सगळं घरच!! मी ह्या आधी युथ हॉस्टेलच्या ट्रेकना जाऊन आले होते. पण ही यात्रा महिन्याची. त्यातही दिल्लीच्या कडक उन्हाळयापासून ते तिबेटच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीपर्यंत व्हरायटी!! हिमालयात कधीही जायचं म्हणजे पाउस तर असतोच. विदेश मंत्रालयाकडून आलेल्या माहिती-पत्रका प्रमाणे २० किलो पर्यंत समान न्यायला परवानगी होती. माझ्या डोळ्यासमोर विमानाने परदेशात जाताना चेक-इन-काउंटरसमोर मी करूण चेहऱ्याने सामानाचे वजन करताना उभी राहायचे, तेच यायला लागलं.
त्यात भर म्हणून सगळ्यांचे सल्ले. माझ्या वडिलांचे एक स्नेही ह्या यात्रेला जाऊन आले होते ( नेपाळमार्गे. त्यांचीही फक्त मानस सरोवराची परीक्रमा झाली.) मी आणि बाबा जाऊन त्यांचा सल्ला घेऊन आलो. ‘भरपूर सुका मेवा घेऊन जा’ ह्या त्यांच्या सल्ल्यानुसार बाबा प्रचंड प्रमाणात सुका मेवा घेऊन आले. मग आम्ही तो छोट्या-छोट्या प्लास्टिक पिशव्यांमधून भरला.
गरम – गार आणि पावसाचे कपडे काय घ्यावे हा विचार करण्यात मी पुष्कळ दिवस घालवले. शेवटी हे दोन १२-१५ दिवसांचे ट्रेक लागोपाठ करतोय असा विचार करून समान जमवल. एका ओळखीच्यांची भव्य सॅक आणली. त्याच्या मानाने सामान भरायला सुरवात केली. एक बेताची सॅक, पुणे-दिल्ली-तिबेट सीमा ह्या सामानाची केली. सगळे जड गरम कपडे दुसऱ्या सॅकमध्ये भरले. ही परिक्रमा सॅक. दिल्लीत आणि काही पुढच्या काही मुक्कामाच्या ठिकाणांवर सामान ठेवता येते असे कळले. वापरून झालेले आणि येताना घालायचे कपडे तिथे ठेवायचे ठरवले.
कैलास- मानस म्हणले की आठवतो तो मालपा येथे १९९८ साली दरड कोसळून झालेला अपघात. ह्यात सुप्रसिद्ध नृत्यांगना प्रोतिमा बेदी ,त्यांची पूर्ण ६० जणांची batch, तेवढेच पोर्टर, पोनीवले, व्यवस्थेतील लोक, स्थानिक नागरिक असे जवळ जवळ २०० लोक ठार झाले होते. ह्या अपघाताचे एक अप्रत्यक्ष दडपण मनावर होतेच. (लेकानेही ,’आई, ती जागा पार केलीस की फोन कर बर का.’ अस सांगून ठेवल होतं) विदेश मंत्रालय सुद्धा ‘तीबेटमध्ये काही बर-वाईट झाल्यास ‘अवशेष’ परत भारतात आणले जाणार नाहीत ‘ अस लिहून घेते!!
अशी सगळी affidevits, demand draft, विमानाची जाण्या-येण्याची तिकिटे इत्यादी तयारी झाली. आणि वर्षानुवर्ष मी ज्याची स्वप्न पाहत होते, त्या यात्रेसाठी, मी घर-ऑफिस-कुटुंब सर्वांची काळजी करत आणि सर्वाना माझ्या काळजीत टाकत एकदाची निघाले.
ह्या पुढचे भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा!
भाग १ : पूर्वतयारी: http://www.maayboli.com/node/30416
भाग २ : दिल्ली ते नारायण आश्रम: http://www.maayboli.com/node/30637
भाग ३: नारायण आश्रम ते लीपुलेख खिंड: http://www.maayboli.com/node/30799
भाग ४: मुक्काम तिबेट : http://www.maayboli.com/node/31261
भाग ५: महाकैलासची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31407
भाग ६: मानस सरोवराची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31704
भाग ७: तकलाकोट ते लीपुलेख खिंड : http://www.maayboli.com/node/31889
भाग ८: लीपुलेख खिंड ते गाला : http://www.maayboli.com/node/32246
भाग ९: गाला ते पुणे: http://www.maayboli.com/node/32565
भाग १०: यात्रेची तयारी: http://www.maayboli.com/node/34063
भाग ११ : समारोप http://www.maayboli.com/node/34065
सुंदर. पुढच्या भागाची वाट
सुंदर. पुढच्या भागाची वाट बघतोय. फोटो मात्र मोठे हवेत. (इथे मदतपुस्तिकेत सविस्तर माहिती आहे.)
धन्यवाद दिनेशदा. फोटो टाकता
धन्यवाद दिनेशदा. फोटो टाकता येतील की नाही, ह्या भीतीने, इतके दिवस लिहिले नाही. आता पुढचे भाग कसे करायचे हे शिकायचं आहेच!
सुंदर! पुढचा भाग येउद्या
सुंदर! पुढचा भाग येउद्या लवकर!
खुपच उत्सुकता आहे.
मस्त. पुढील भाग लिहा लवकर.
मस्त. पुढील भाग लिहा लवकर. सॉलीड उत्सुकता लागली आहे
अनया, निवांतपणे वाचायचे आहे.
अनया, निवांतपणे वाचायचे आहे.
मस्त.
मस्त.
अनया पुढचं लिही लवकर! आणि
अनया
पुढचं लिही लवकर! आणि फोटोही हवेत!
खुपच मस्त
खुपच मस्त
मस्त पुढचा भाग लवकर लिहा.
मस्त पुढचा भाग लवकर लिहा.
छानच वर्णन. पुढच्या भागांची
छानच वर्णन. पुढच्या भागांची उत्सुकता आहे. हे वाचून १२-१५ वर्षांपूर्वी कैलास मानस वरील पाहीलेला स्लाईड शो आठवला तसेच त्यावेळी सीडी सुद्धा पाहीली होती. अगदी कैलास मानस यात्रा म्हंटली की मालपा येथील अपघात आणि त्यात गेलेले २०० लोक आठवतात. मलाही कैलास-मानस यात्रा करायची आहे........बघुया शिवशंकर कधी बोलावून घेतोय भेटीला!
मस्त. क्या बात है. लिहायला
मस्त. क्या बात है.
लिहायला सुरवात केली हे छानच. गो अनया.
आई, इतर मुलांच्या आया दहावी म्हणून नोकऱ्या सोडतात. तू महिनाभर ट्रीपला कसली जातेस’ >> ऑस्सम.
तसेच 'कौटुंबिक पत्ते पिसणे' या वाक्प्रचारावर फिदा. कसले समपर्क शब्द आहेत. आम्हीही सतत असले पत्ते पिसत असतो. काय रे देवा संसार.
प्रश्न येतात तसे सुटतातही >> टाळ्या.
वा, एकदम झकास. प्रत्यक्ष
वा, एकदम झकास. प्रत्यक्ष यात्रेच्या वर्णनाची वाट बघतो आहे.
व्वा.. पुढच्या भागाच्या
व्वा.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!!!
फोटो ही भरपूर आणी मोट्ठे टाक
छान वर्णन! पुढील भाग
छान वर्णन! पुढील भाग वाचण्याची उत्सुकता आहे. मला स्वत:ला पण जायची इच्छा आहे. कधी जमेल कोणास ठाऊक!
एक सूचना - त्या सरोवराचे नाव "मानस" सरोवर नसून "मानसरोवर" आहे, असे वाचले होते. जाणकारांनी खुलासा करावा. तसे असल्यास लेखात नाव बदलावे ही विनंती.
जावेसे वाटणे, करावेसे वाटणे
जावेसे वाटणे, करावेसे वाटणे याची जी काय कळ उठते ना, ती उठली की कधी ना कधी मार्गी लागतेच गाडे.
सध्या मी नर्मदा परिक्रमेची स्वप्न पाहतेय. सध्याची माझी परिस्थिती पाहता ते केवळ हास्यास्पद आहे, पण 'हजारो ख्वाईशे ऐसी के हर ख्वाईश पे दम निकले'
सुरुवात मस्तच झालीये, आता
सुरुवात मस्तच झालीये, आता पटापट वर्णन व त्याला साजेसे फोटो येऊ द्या.
एक्दम मस्तं...पुढ्चे भाग लवकर
एक्दम मस्तं...पुढ्चे भाग लवकर येउदेत.
रैना, फेसबुकसारखं इथे 'लाईक'
रैना, फेसबुकसारखं इथे 'लाईक' बटण असतं नां, तर तुझी वरची पोस्ट मी 'लाईक' केली असती.
निवडक १० मध्ये नोंदवलं आहे.
निवडक १० मध्ये नोंदवलं आहे.
पुढचे भाग येऊ द्यात आणि फोटो सुद्धा. आतूरतेने वाट बघतो आहोत .............
रैना... मी जर तपस्वी वगैरे
रैना... मी जर तपस्वी वगैरे असतो तर लगेच तथास्तु म्हणालो असतो. सध्या तरी शुभेच्छाच.
अनया. फोटो अपलोड करण्यासाठी काहिही मदत हवी असेल तर आम्ही सगळे तयार आहोत.
छान लिहीलय! अजुन
छान लिहीलय! अजुन येऊद्यात
तब्येतीचे काय काय निकष आहेत? काय कसे तपासतात?
'नर्मदा परिक्रमा' म्हणजे
'नर्मदा परिक्रमा' म्हणजे माझंही स्वप्नच!
मस्त लिहिलय
मस्त लिहिलय
अनया, तयारीचं वर्णन वाचून
अनया, तयारीचं वर्णन वाचून आता प्रत्यक्ष यात्रेचं वर्णन वाचायची उत्सुकता लागली आहे. पुढचे वर्णन व फोटो येऊचद्यात.
अनया, छान लिहिलं आहे आणि खूप
अनया, छान लिहिलं आहे आणि खूप प्रामाणिकपणे लिहिलं आहे
ट्रेकिंग तेही हिमालयातलं जमेल असं वाटत नाही. ओढ मात्र फार वाटते. लेखांवर / पुस्तकांवर समाधान मानून घेत असते.
फोटोंबाबत इथे खूप जण उत्साहाने मदत करतील. चांगले फोटो निवडणे, इथे अपलोड करणे. पुढचे भाग लिहाच.
मस्त लिहिताय. लवकर येऊ द्यात
मस्त लिहिताय. लवकर येऊ द्यात पुढचे भाग.
मोठे अन पुष्कळ फोटो पण बघायला आवडेल .
'कौटुंबिक पत्ते पिसणे' >> आमच्याच घरचा एपिसोड वाचल्यासारखे वाटले
मस्त जमलाय पहिला भाग...पुढचे
मस्त जमलाय पहिला भाग...पुढचे भाग लवकर आले तर उत्तम पण सविस्तर यायला पाहिजेत.....
मस्त... अनया, पुढचे भाग पटापट
मस्त...
अनया, पुढचे भाग पटापट येऊ द्या. उत्सुकता लागली आहे.
<< असे कौंटुबिक पत्ते पिसून झाले !! >> काय जबरी शब्द ! फिदा.
<<आम्हीही सतत असले पत्ते पिसत असतो. काय रे देवा संसार.>> रैना +१.
मस्त झालेय सुरुवात!
मस्त झालेय सुरुवात!
मस्त !! आई, इतर मुलांच्या
मस्त !!
आई, इतर मुलांच्या आया दहावी म्हणून नोकऱ्या सोडतात. तू महिनाभर ट्रीपला कसली जातेस >>>> हे भारी होतं... मी पण कधीकाळी मारलेले असेच डायलॉग आठवले..
कौटूंबिक पत्ते पिसणे हा शब्दप्रयोग पण भारी एकदम..
Pages