सायोनारा s s
नोकरी निमित्त दहा वर्षे पैठणला होतो. (१९७९ ते १९८९). त्यावेळी आलेले हे दोन अनुभव. औरंगाबाधून फोन आला. विद्यापीठात एक आंतरराष्ट्रीय परिषद होती आणि त्यासाठी आलेले एक जपानी प्रतिनिधी मला भेटू इच्छित होते. हे जपानी कनेक्शन माझ्या काही लक्षात येईना. निरोप अर्जंट होता. लगोलग मी गेलो. ते प्रतिनिधी कामात होते. पण त्यांनी निरोप ठेवला होता. मला गेस्ट हाऊस वर बोलावलं होतं. मी गेलो. ते प्रतिनिधी माझी वाटच पहात होते. आपल्या बॅगेतून त्यांनी एक छोटेसे पार्सल काढले आणि माझ्या हातात देत म्हणाले: "धिस इज फॉर यू !" मला तरी ही काही लक्षात आलं नाही हे बघून ते म्हणाले: "यू हॅड रीटन टू द कंपनी, नो ?" आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे झालं होतं असं की आमच्या औरंगाबादच्या ’नाट्यरंग" नं एक बालचित्रपट काढला होता. नांव होतं "सोनेरी डोक्याचा मासा". माझा मित्र कै. कुमार देशमुखच्या याच नावाच्या बालनाट्यावर आधारीत असा तो पिक्छर. सगळेच हौशी. सगळ्यांनी कॉंट्रीब्यूशन केलं. त्यावेळी सोळा एम.एम., ३५ एम.एम. आणि ७० एम.एम. मधे चित्रपट निघत. पण ते काही आम्हाला परवडणारं नव्हतं. म्हणून सुपर एट मधे तो चित्रपट काढला. त्यासाठी लागणारा कॅमेरा आमचे खामगावचे स्नेही बाळासाहेब खेकाळे यांचा. तेच कॅमेरामन. रंगीत चित्रपट पूर्ण झाला. तो दाखवण्यासाठी दोन सुपर एट प्रोजेक्टर्स घेतले आणि शाळा-शाळातून तो पिक्चर दाखवाला. पण मधेच काही तरी गडबड झाली आणि दोन्ही प्रोजेक्टर्स बंद पडले. मुंबईला चौकशी केली तेंव्हा कळलं की एक सुटा भाग आहे, तो मिळाला तर काम होईल, पण तो मुंबईत उपलब्ध नाही. काय करावं कळेना. महिना गेला. शेवटी मी संस्थेचा सचिव म्हणून त्या जपानी कंपनीला रागारा्गानं पत्र लिहिलं आणि विसरून गेलो! आता त्या जपानी कंपनीनं तो सुटा भाग पाठवला होता!
मला कळेना की या माणसाचा आणि त्या कंपनीचा काय संबंध? कारण ते प्राध्यापक होते. मी त्यांना तसं विचारलं. यावर त्यांनी सांगितली ती हकिकत ऐकून तर मी थक्कच झालो. त्या जपानी कंपनी कडे माझा पत्ता होता. त्यांनी जपानमधील भारतीय दूतावासाकडे चौकशी केली की औरंगाबादला कोण जपानी मंडळी अशात जाताहेत. तिथं त्यांना या कॉन्फ़रन्स ची आणि या प्राध्यापकांची माहिती कळाली. मग त्यांनी यांना गाठलं आणि तो सुट्टा भाग मला द्यायची विनंती केली आणि पुढचं सगळं मी सांगितलंच आहे. हा सगळा प्रकार एखाद्या भारतीय वस्तूबद्दल घडता तर... याचा विचार करून मला खरंच सांगतो, गहिंवरून आलं. आणखी आश्चर्य तर पुढेच आहे. तो भला प्राध्यापक म्हणाला: " आय ऍम सॉरी फॉर द इन-कन्व्हीनिअन्स. काईंडली ऍक्सेप्ट अवर सिन्सिअर अपोलोजीज." असं म्हणून त्यांनी खिशातून एक पाकिट काढलं आणि माझ्या हातात देत म्हणाले," धिस शूड कव्हर युवर लॉसेस!". पाकिटात त्या प्रोजेक्टरच्या किमतीच्या जवळपास १०% भरेल इतकी रक्कम भारतीय चलनात होती, नुकसानभरपाई म्हणून! वर कंपनीचं पत्र. दिलगिरी व्यक्त करणारं आणि त्या प्रोजेक्टरचा एक महत्वाचा दोष दाखवल्या बद्दल वर आमचेच आभार मानणारं! माझ्या डोळ्यांसमोर भारतीय दुकानदारांचे आणि उत्पादकांचे अनुभव तरळून गेले.
दुसरा अनुभव असाच आहे. माझे एक स्नेही जायकवाडी धरणाच्या कामावर इंजिनिअर होते. तिथे जपानच्या सहकार्याने धरणावर रिव्हर्सिबल टरबाईन्चा पथदर्शी प्रकल्प चालू होता. मुख्य धरणातून पाणी काढून त्यावर गरजेच्या वेळी वीज निर्मिती आणि गरज कमी असते तेंव्हा ग्रीड मधून वीज घेवून हे पाणि परत धरणात असं त्या प्रकल्पाचं स्वरूप. त्याची अंतिम चांचणीची वेळ आली आणि काही जपानी इंजिनिअर्स आले. मला हा प्रकार पहायचा होता. त्या दिवशी ठरल्या प्रमाणे आमच्या इंजिनिअर स्नेह्याचा निरोप आला आणि जामानिमा करून मी गेस्ट हाऊस वर पोहोचलो. माझे स्नेही आणि त्यांचे सहकारी सुट-टाय या वेषात होते. ठीक ठरल्या वेळी ते जपानी इंजिनिअर बाहेर आले. अर्धी चड्डी आणि हाफ शर्टात! परिचय इत्यादी सोपस्कार आटोपल्यावर ते आमच्या स्नेह्यांना म्हणाले: "यू आर नॉट रेडी? वी आर लेट!" त्यावर आमची स्नेही निघू या म्हणाल्यावर त्यांनी अशा काही नजरेनं पाहिलं की सगळे सर्द झाले. चूक ल्क्षात आली. आमचे स्नेही धावत पळत घरी गेले आणि सैलसर कपडे घालून आले! उन्हा तान्हात हिंडून त्या जपान्यानं कधी मशीनच्या खाली जाऊन, तर कधी वर जावून, कधी गुढ्ग्यावर बसून तर कधी पाठीवर असं करत तपासणी पूर्ण केली तेंव्हा आमचे सर्वांचे चेहेरे पहाण्या सारखे झाले होते. सगळं आटोपून घरी आलो.
रात्री दहाच्या सुमाराला निरोप आला की मला दवाखान्यात बोलावलंय. मी गेलो, तर आमचे स्नेही या जपान्याला घेवून आलेले. मी तपासणी केली. डी-हायड्रेशन झालं होतं. सलाइइन वगैरे सगळं झालं. तीन चार तासातच फरक पड्ला. मी दवाखान्यातच होतो. जातांना त्या जपानी इंजिनीअरचा चेहेरा कृतद्न्य्तेनं भरून आला. सहज म्हणून त्यानं खिशात हात घातला आणि माझ्या हातात ४०० रुपये ठेवले. मी त्यांना समजावून सांगितलं की हे सरकारी हॉस्पिटल आहे. इथं मोफत उपचार होतात. पण गृहस्थ ऐकेना. उपचारासारखी एखादी गोष्ट फुकट मिळते हे त्याला पटेचना!! जपानी कोणाचे उपकार घेत नाही, घेतलेच तर ठेवत नाही वगैरे सांगायला लागला. मी ही इरेला पेटलो. "भांडणा"चा निकाल लागेना. शेवटी मी उपाय सुचवला. ते पैसे पुअर पेशंट फंड बॉक्स मधे टाकयचे. पण गडी स्वत:च्या हाताने टाकेना. मी पैसे तुम्हाला दिलेत, तुम्हीच काय वाटेल ते करा म्हणायला लागला. शेवटी मी माघार घेतली आणि माझ्या हातानं ते पैसे बॉक्स मधे टाकले. जातांना तो भला गृहस्थ कमरेत वाकून आणि हंसून मला म्हणाला: "सायोनारा !"
"लव्ह इन टोकियो" या सिनेमात लताजींच्या आवाजात "सायोनारा" हे गाणं आहे. मी ते बरेचदा ऐकलंय. पण शप्पथ सांगतो, खोटं नाही, मी त्या जपानी इंजिनीअरच्या तोंडून ऐकला त्या सायोनाराला तोड नाही!
-ashok
छान अनुभव. पण असे अनुभव मला
छान अनुभव. पण असे अनुभव मला इतर देशातही आणि भारतातही आलेत. शेवटी प्रामाणिक माणसे सगळीकडेच असतात.
सुंदर लिहीलय. माझ्या जपानच्या
सुंदर लिहीलय. माझ्या जपानच्या ८-९ वर्श्याच्या वास्तव्यात असे बरेच अनुभव आलेत. अगदी आत्ता त्सुनामी च्या काळात देखिल ज्या पद्धतिने त्यांन्नी परस्थिती हातळली, खरच त्रिवार प्रणाम
तीच तर खासियत आहे जपानची.
तीच तर खासियत आहे जपानची. त्याच्याशी भारताची तुलनाही नको.
छान
छान
सायो+१
सायो+१
छान झाला आहे लेख. जपान्यांचे
छान झाला आहे लेख. जपान्यांचे असे अनुभव खूपदा येतात. अजूनही टीव्हीवर त्सुनामीग्रस्त भागाच्या पुनर्वसनाचे काम इत्यादी वर काही कार्यक्रम असतात ते पाहिले की लाजल्यासारखे होते.
त्यांची जिद्द आणि कामसू वृत्ती अचाट आहे!
हो, मला भारतात आलेत असे काही
हो, मला भारतात आलेत असे काही (चांगले) अनुभव. शंभरातले उरलेले सुटे पैसे दुस-या दिवशी घरी आणून देणारा रिक्षा वाला , "ती भाजी खराब आहे, घेवू नका ती" म्हणत माझ्या पिशवीतून घेतलेली भाजी काढून घेणारी भाजीवाली, शंभरा ऐवजी मी चुकून दिलेली पाचशे ची नोट परत करणारा (पुणेरी) किराणा दुकानदार अशी उदाहरणे आहेत.
याऊलट नांदेड हून पुण्याला आलोय हे सांगून सुद्धा "इंटर्व्हल आहे , नंतर या !" असं उद्दामपणं सांगणारा (पुणेरी) दुकानदार, खरेदी केलेल्या बॉलपेनचं स्प्रिंग दुकानतच तुटून खराब झालं तर "ते काय आम्ही बनवतो कां? पैसे नाही मिळणार परत" असं सांगणारा (नांदेडचा) दुकानदार आणि "फ़ॅशनके इज जमाने मे कपडे की गॅरंटी? ना बाबा ना" अशी पाटी मिरवणारा (मुंबई चा) दुकानदार ही उदाहरणंच जास्त....
भारतातही येऊ शकतात असे अनुभव.
भारतातही येऊ शकतात असे अनुभव. सगळीच लोकं सारखी असतात असं नाही पण किती वेळा? १०० पैकी फारतर ५, १० वेळा. जपानमध्ये १०० पैकी ९५ वेळा हाच अनुभव येणार.
अगदी खरय सायो
अगदी खरय सायो
छान अनुभव.
छान अनुभव.
मस्तच
मस्तच
खूपच छान अनुभव ....
खूपच छान अनुभव ....
विजय आणि शशांक धन्यवाद !!
विजय आणि शशांक
धन्यवाद !!
Dr. Ashok, It also takes
Dr. Ashok,
It also takes great luck to gain such experience, you are lucky.
Nice to read such experiences, good.
Namaste.