तुम्हांला भेटलेले गावातील नमुने

Submitted by माध्यम_प्रायोजक on 10 October, 2011 - 00:16

गाव! गाव म्हटलं की डोळ्यांसमोर उभ्या राहतात अनेक प्रतिमा. नदी. डोंगर. नदीकाठचं देऊळ. कुठे गावातला मारुतीचा पार. पारावर रंगलेल्या गावकर्‍यांच्या गप्पा. रंगवून सांगितलेले अनेक प्रसंग. आणि या प्रसंगांतून डोकावणारी गावातली माणसं. भोळी, बेरकी, इरसाल, मासलेवाईक, नमुनेदार! द. मा. मिरासदारांच्या नाना चेंगट किंवा बाबू पैलवानासारखी. पु.लं.च्या अंतू बर्व्यासारखी. पण ही झाली आपल्या नमुनेदार वागण्यानं, बोलण्यानं आठवणींत रुतून बसलेली काल्पनिक माणसं! तरी खरीखुरी, आपल्या आसपासची वाटणारी.

इथे तुम्हांला लिहायचंय तुम्हांला भेटलेल्या गावातल्या अशाच खर्‍याखुर्‍या, नमुनेदार माणसांविषयी. करा तर मग सुरुवात!

विषय: 
Groups audience: 

माझ्या आईच्या आत्याचे पति, कै बाबुराव बेडके.
ईरसालपणाचा अर्क होते. शाहू महाराजांच्या प्रोत्साहनाने त्यांनी भिक्षुकी शिकून घेतली होती आणि राजवाड्यातील अंबाबाईचे ते पुजारी होते. पण देवधर्मावर अजिबात विश्वास नव्हता. देवाबाबत त्यांची मते विचित्र होती. त्यांनी घरच्या देवांची कधीही पूजा केली नाही.

ते म्हणत देवाचा हात आशिर्वादासाठी नसतो. तो म्हणतो बाबा रे थांब तिथेच. माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस.
आम्ही म्हणायचो, तूम्ही रोज देवीची सेवा करता, तिच्याकडे मागा कि काहीतरी. तर म्हणायचे ती काय मला देणार, तिचाच दागिना हरवलाय, तो सापडत नाही अजून.
नुसती भिक्षुकीच नव्हे तर सुतारकाम, लोहारकाम, सोनारकाम यातही ते तरबेज होते. घरात सगळी हत्यारे होती. आणि दिवसभर त्यांचे काम चाललेले असे. मेंढीच्या लेंड्या सात दिवस पाण्यात कूजवून त्यांनीच घराच्या भिंतींना उत्तम गिलावा केला होता.

त्यांचे दात पडले होते तरी अनेक खाण्याचे प्रकार ते स्वतः करत असत. बेळगावी फुटाण्याची चटणी हि तर खासियत त्यांची.
शाहु महाराजांच्या प्रभावाने ते सुधारकी विचारांचे होते. ज्या काळात मराठा समाजात, मुलींना शिक्षण द्यायची प्रथा नव्हती, त्या काळात त्यांनी मुलींना पदवीधर केले होते.
स्वतःही शेवटपर्यंत वाचन वगैरे करत असत.

मिरासदारांची, माडागुळकरांची आणि पाटलांची पात्रे ही खरी प्रातिनिधिक म्हणता येतील अशी. गावात कोण बाळंत होतंय आणि त्या घरी जाऊन कधी एकदाचा डिंकाचा लाडू खातोय- याची सतत वाट बघत असलेला नाना चेंगट, जगबुडीच्या बातमीनंतरही दाखवायच्या राहून गेलेल्या पैलवानी डावांच्या नावाने हळहळणारा बाबू पैलवान..

गावातल्या पारावरची अख्खी 'सटारी-भपारी-अ‍कादमी' इथं जमायला हवी आता. Happy

माझ्या आठवणीतल्या गावांचे शेकडो किस्से असतील. आठवतील तसे लिहितोच आता इथं.

माझी सर्वात मोठी मामी आता बरीच म्हातारी झालीय. (मामाच्या लग्नात आमची आई सव्वा महिन्याची होती म्हणजे बघा. :फिदी:). आमच्या आज्यांच्या वयाची.

मामा गेलेत कधीच. इतकं वय होऊनही घरातला सारा कारभार मामीच्या ताब्यात आहे. डझनभर दुभत्या म्हशींच्या दुधाचे पैसे, शेतीमालाची विक्री आणि नवीन शेतांतली गुंतवणूक.. हे सारं तीच बघते. आताशा तिला दिसत नाही. खरंतर आवाजावरून माणसं ओळखू यायला हरकत नाही. पण घरात कुणी पाव्हणा आला, की त्याचं नाव सोडून इतरच तीन-चार नावं घेते. किंवा सपशेल अनुल्लेख करून टाकते. हे असं ती मुद्दाम करते, असं अनेक जणांचं म्हणणं आहे. आताच मी तिच्याकडे गेलो होतो, तेव्हा माझ्यासोबत असलेल्या धाकट्या भावाला तिने विचारलं, 'हा परशरामभाऊ आहे का?' (हा माझ्या आजीचा भाचा).

भावाचं डोकं फिरलं. तो म्हणाला, 'दुधाच्या पैशांच्या नोटा येतात, तेव्हा त्या मोजताना तुला कसं दिसतं बरोबर. सहा फूटांची माणसं बरी दिसत नाहीत ती?'

मामी मिश्कील हसून म्हणाली, 'अरे बाबा, नोटांवर गांधीबाबा असतात. तुम्ही आपली साधी माणसं. तो एवढा मोठा माणूस ओळखला नाही तर पाप नाही लागणार मला?'

आम्ही हात जोडले, आणि तिथून कणी कापली. निघताना खिरूजाच्या वड्या मात्र दिल्या मामीनं.

'अरे बाबा, नोटांवर गांधीबाबा असतात. तुम्ही आपली साधी माणसं. तो एवढा मोठा माणूस ओळखला नाही तर पाप नाही लागणार मला?' >>>> Rofl

भारी आहे हा धागा, अजून नीट वाचला नाही, सवडीने वाचेन. अशी माणसं मी पाहिली नाहीयेत कधी, त्यामुळे भरपूर उत्सुकता आहे ह्याबद्दल Happy

माझ्या लग्नापर्यंत आम्ही एका ओनरशीप फ्लॅट सिस्टीम मध्ये होतो(मी,आई, पप्पा आणि बहिण). आजुबाजूला पप्पांच्या शाळेतलेच सगळे- क्लार्क, शिक्षक, शिक्षिका इ.इ.
आमच्या शेजारी दोन्ही बाजूला अविवाहित शिक्षिका राहात. पैकी एकीकडची म्हणजे माझी मानलेली आत्याआज्जी.तिला स्वयंपाकाचा जाम कंटाळा. माझ्या आईचे पदार्थ खूप आवडीने खायची(खाते). पण तिची बोलण्याची स्टाईलच निराळी. "स्मिता, काय छान स्वयंपाक करतेस गं! अगदी तुझे हातच तोडून घ्यावेसे वाटतात.!" असं ती जेव्हा जेव्हा म्हणायची माझ्या मनात एकच विचार बाई हात तोडले तर तुला कुठून खायला मिळणार चांगलं चुंगलं(पुलंच्या त्या थेरड्या म्हातारी सारखं आमचा बेमट्या ना खाली मुंडी आणि पातळ धुंडी...वाल्या असामी असामीतल्या) तिला काही जण" ज्याची खावी पोळी .." असं ही म्हणायचे.
तर आमच्या या आजीला आम्ही विशेष म्हणजे माझे पप्पा विक्स अ‍ॅक्शन ५०० म्हणायचे खूपच स्टायलिश होती नी ती!!

दुसर्‍या बाजूला दोन अविवाहित बहिणी राहायच्या. त्यांना आम्ही आत्या म्हणायचो. पण चुकून एकदा एका लहान मुलाने त्यातील धाकटीला "ओ काकू , आरतीला चला" असे म्हणून बोलाविले. त्या जाम भडकल्या आणि म्हणाल्या," काय रे काका दिसतायत का तुला कुठे?"
एकदा याच आत्या गॅलरीत उभ्या होत्या माझ्या मैत्रिणीची आई शाळेला निघाली होती. काकूना वाटले आज पाऊस पडेल म्ह्णून त्या सहज म्हणाल्या," काय हो सिंधूताई आज पाऊस पडेल असं वाटतंय नाही?" या पुन्हा चिडल्या," मी काय नंदिबैल आहे पाऊस पडेल की नाही ते सांगायला?"

अजून खूप आहेत याच आत्यांच्या गमतीजमती उद्या लिहिन Happy

गावी एक सोन्ड्या म्हणून कॅरेक्टर होतं...त्याचे अनेक किस्से आहेत त्यातला एक लिहीतो.

सोंड्या म्हणजे घरची एकुलती एक अवलाद, त्यामुळं आयच्या लाडानं शेफारलेला.

आठवीत असताना त्यानं वर्गातल्या एका पोरीला "चिट्टी" दीली. सांच्यापारी पोरगी आणि तीचा बाप सोंड्याच्या घरी दाखल. सोंड्या घरी नव्हता. पोरीच्या बापानं चिट्टी सोंड्याच्या बाच्या अंगावर फेकली. "बघा तुमच्या चिरंजिवांचा परताप" Angry
सोंड्याच्या बानं कागदावर खाली वर नजर फीरवली. खालची सही वाचून, "आवं पर ही तर राजेशनं लिवल्या नवं!"
"आता वं असं का करताय राजेश आपल्या सोंड्याचंच नांव हाय न्हवं?!" सोंड्याची आई.
"हां ! पर ही त्येचं अक्शर हाय ?" सोंड्याचा बाप.
"बघा की तेच्या शाळेच्या वहीतलं तपसून" खाली मान घालून रडायच्या सूरात, सदर पोरगी.

बापानं सोंड्याच्या कपाटातून शोधून एक वही काढली आणि अक्षरं जुळवून पाहीली. मग गप्पच राहीले. पोरीच्या बापाला आणि पोरीला सोंड्याच्या आईनं चहा आणि बिस्कीटं आणून दीली.
"तुम्ही जरा कडक शब्दांत ताकीद द्या ओ त्येला. पोरांचं हे शिकायचं वय आहे. ही असलं भलतं उद्योग......."
पोरीच्या बापाचं भाषण चालू असतानाच सोंड्याची घरात एंट्री झाली. त्यनं फक्त एकवार त्या पोरीच्या बापाकडं आणि स्वतःच्या बापाकडं बघीतलं. मग आईला जोरात हाक मारली. "आयेSSSS"
"आये भूका लागल्याती...काय खाया अशील तर दी"
मग त्येच्यी इस्काटलेल्या कपाटाकडं नजर गेली.
"ह्या...हीतं...कुणी...आय..घातली ? "
"म्या" बाप
"परत घालू नगा!"

पोरीचा बाप आपल्या पोरीला घेऊन चुपचाप उठला चकार शब्द न बोलता घराबाहेर पडून चालायला लागला.

>> "ह्या...हीतं...कुणी...आय..घातली ? "
"म्या" बाप
"परत घालू नगा!"
<<

Lol

"ह्या...हीतं...कुणी...आय..घातली ? "
"म्या" बाप
"परत घालू नगा!" >>> हे मला काही कळलंच नाही Uhoh का हसताय सांगा ना.

"ह्या...हीतं...कुणी...आय..घातली ? "
"म्या" बाप
"परत घालू नगा!" >>>

Lol

हे मला काही कळलंच नाही का हसताय सांगा ना>>>

Lol

जाजू, अगं मी अमा नाही. तो वडिलांनाच उलटं झापतोय हे मला कळलं होतं पण मला त्याबद्दल हसू न आल्याने मला वाटलं अजून काहीतरी जाम विनोदी त्यात असावं. असो Happy

अके, तुम्ही फार सरळमार्गी, हळव्या, भावनाप्रधान, इ. इ. असाल असे वाटते
त्यामुळे वरील चर्चेवर जास्त विचार करू नका.
(उगाच दिलेला आगाऊ सल्ला असल्याने मानलाच पाहिजे असे नाही) Wink

Lol
प्रकाशचा किस्सा अतिरंजित वाटेल कुणाला, पण खेड्यात असं बोलतात खरं. बाप पोराला उठता बसता 'रांडेच्च्या' आणि याहीपेक्षा वाईट संबोधनं सहज वापरतो. आपल्या बोलण्याचा शिवीचा शब्दशः अर्थ काय होतो, याची कुणी फिकीर करत नाही. संतपदाला पोचलेली माणसं!

असो. अजून बाकी कुणाकडे नाहीत का किस्से?

Pages