२०११च्या मायबोली वर्षाविहारला ह्यावेळी हजेरी लावली आणि त्यामुळे मित्रमंडळाचं वर्तूळ अजून मोठं झालं. खरं तर गेले जवळपास पाच वर्ष सदस्य असूनही मी मायबोलीवर फारसा सक्रिय कधीच नव्हतो. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक मला आणि मी त्यांना नावाने ओळखत होतो..त्यातही एक/दोन जणांनाच मी प्रत्यक्ष भेटलो होतो....मात्र वविच्या आधी टी-शर्ट नोंदणी आणि टी-शर्ट वाटप निमित्ताने दोन वेळा शिवाजीपार्कच्या कट्ट्यावर हजेरी लावली आणि अजून किमान दहा-बारा जणांना प्रत्यक्ष भेटलो...त्यातले बहुसंख्य लोक मला आधी नावानिशी माहीतही नव्हते...असो.
वविला भरपूर दंगामस्ती करतांना तीन चांगल्या आवाजाच्या तरूण मित्रांशी माझी ओळख झाली आणि ह्या आवाजाचा उपयोग मला करून घेता येईल अशी आशा मनात निर्माण झाली...आता तुम्ही म्हणाल की आवाजाचा उपयोग?हा काय प्रकार आहे?
सांगतो....तसं पाहायला गेलं तर आता जालावरच्या बहुसंख्य मित्रमंडळींना हे माहीत झालंय की मी एक हौशी आणि छांदिष्ट चालक आहे...चालक? हो...चालकच! कवितांना चाली लावतो ह्या अर्थाने हो... ’चाल’क!
हं, तर काय झालं....जरा मूळ मुद्द्याकडे येतो आता.
वविला भेटलेल्या त्या तीनजणांना मी माझी कल्पना सांगितली ती अशी....मी आजवर बर्याच कवितांना चाली लावलेत. त्यातल्या काही निवडक एक/दोन चाली मी तुम्हाला पाठवतो...तुम्ही त्या तुमच्या आवाजात गाऊन मला पाठवायच्या...नेहमीपेक्षा काही तरी हटके करायला मिळणार म्हणून त्यांनीही उत्सुकतेने होकार दिला. ह्या तीन तरूणांपैकी दोन माझ्यापासून बरेच दूर राहात असल्यामुळे आम्ही प्रत्यक्ष एकमेकांना वारंवार भेटणे शक्य नव्हते, त्यामुळे हे सगळे काम इमेलच्या माध्यमातूनच होणार होते...पण तिसरा एकजण तर माझ्या अगदीच जवळ राहणारा निघाल्यामुळे तो म्हणाला...काका,मी येईन तुमच्या घरी...मला तुम्ही तिथेच ऐकवा तुमच्या चाली..मी माझ्या आवाजात गायचा प्रयत्न करेन!
अशा तर्हेने तीन जणांच्या होकारामुळे, त्यांच्या तरूण आवाजात आता माझ्या चाली जास्त लोकांना ऐकायला आवडतील अशी खुशीची गाजरं खात मी घरी परतलो. मध्यंतरी एकमेकांच्या इमेल आणि भ्रमणध्वनीक्रमांकाची देवघेवही झाली.
त्यानंतर मी दूरस्थ अशा त्या दोन पुतण्यांना माझ्या चालींची एम्पी३ फाईल आणि संबंधित कवितेचा दुवा असे दोन्ही पाठवून दिले. बरेच दिवस कुणाकडूनही काही उत्तर आले नाही. त्यातला एकजण थोपुवर भेटला तेव्हा त्याला विचारल्यावर..विचारल्यावर बरं का! स्वत:हून नाही. ;) त्याने सांगितले...काका,चाल ऐकली,आवडलीही, पण ताल कठीण आहे..मला नाही जमणार!
दुसराही थोपुवर भेटला...त्याला विचारले...तो म्हणाला, अजून मला वेळच मिळाला नाहीये त्या फाईल्स पाहायला.
तिसरा, काही ना काही कारणाने आजपर्यंत घरी आलेला नाहीये...थोडक्यात काय तर...परिस्थिती जैसे थे...एकूणच माझ्या चाली माझ्या व्यतिरिक्त दुसरे कुणी गाऊ शकेल अथवा गाईल अशी आशा उरली नाही. असो.
त्यानंतर इथे मायबोलीवर गणेशोत्सवाची घोषणा झाली...त्यासाठी संयोजन मंडळात काम करण्यासाठीच्या आवाहनाला मी प्रतिसाद दिला आणि माझी संयोजन मंडळात वर्णीही लागली...खरं तर मी नेमकं काय करू शकेन ह्याची मलाच कल्पना नव्हती...पण काम करण्याची इच्छा आणि भरपूर मोकळा वेळ ह्या गोष्टी हाताशी असल्यामुळे मी बिनधास्तपणे हो म्हणून टाकलं.
संयोजन मंडळातल्या इतर चार व्यक्ती माझ्यापेक्षा खूपच तरूण असल्यामुळे आपोआपच मला वडिलकीचा मान मिळाला आणि कामाचा भार माझ्यावर फारसा पडणार नाही हे त्यांनी पाहिले आणि त्याप्रमाणे मला सहज जमतील आणि आवडतील अशी मुशो(मुद्रितशोधन) आणि गणेशोत्सवासाठी गाणी तयार करणे अशी दोन कामं माझ्यावर सोपवली....इथे माझा ’चाल’कत्वाचा लौकिक कामी आला.
गाणी तयार करायची तर आधी त्यासाठी काव्य हवे...आता ते कुणाकडून मागवावे बरं? लगेच माझ्या डोळ्यासमोर काही नावं झळकली.. जयश्री अंबासकर,क्रांती साडेकर,गंगाधरपंत मुटे आणि कामिनी केंभावी(श्यामली)....ही चौघंही माझ्या जवळच्या वर्तूळातली असल्यामुळे मी हक्काने त्यांच्याकडून काही गणेशगीतांची मागणी केली.
खरं सांगायचं तर माझ्याकडे आधीच ह्या कविमंडळींच्या काही काव्यरचना होत्याच ज्यांना मी आधी चाली लावलेल्या होत्या....पण त्या सगळ्या माझ्या आवाजात ध्वनीमुद्रित होत्या त्यामुळे त्या कुणी ऐकायला उत्सूक असणार नाहीत ह्याची जाणीव होती..म्हणून तर ताज्या दमाचे आणि चांगल्या आवाजाचे गायक/गायिका मला हवे होते...पण आयत्यावेळी आता काय करायचं असा यक्षप्रश्न उभा राहिला.
गऊच्या तयारीत असतांना त्यासंबंधीचे गेल्या वर्षीचे काही धागे वाचतांना ’योग’ ह्यांचे अनुभव कथन वाचले आणि त्यांची गाणी ऐकल्यावर लक्षात आलं की हीच व्यक्ती आपल्याला नक्की मदत करेल, म्हणून मग त्यांच्याशी संपर्क साधला...त्यांनीही लगेच प्रतिसाद देऊन अशा मदतीची काही प्रमाणात ग्वाही दिली...व्यवसायात व्यस्त असल्यामुळे खूप जास्त आणि सलग असा वेळ देऊ शकत नसलो तरी यथाशक्ती मदत नक्की करेन...असे आश्वासन मिळाले आणि मी थोडा सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यांच्या मागणीप्रमाणे मी लगेच त्यांना माझ्या, आधीच तयार असलेल्या चार चाली आणि काव्य पाठवून दिले...चाली ऐकल्यावर त्यातल्या तीन गीतांवर ते निश्चितपणे काम करून साधारण ३१ ऑगस्टपर्यंत तयार करून पाठवतील असे म्हणाले.
चला, आता बाकी राहिलेल्या गीतांचं काय करावं? कुणाकडून गाऊन घ्यावं बरं? चौकशी करता करता मायबोली सदस्या ’रैना’चं नाव पुढे आलं, म्हणून तिला संदेश पाठवला......तिला तर प्रचंड सर्दी-खोकला झाला होता, बोलतांनाही दम लागत होता हे तिच्याशी प्रत्यक्ष फोनवर बोलतांना जाणवत होते...तरीही तिचे उत्तर होते...मी जरूर प्रयत्न करेन...वेळेचं बंधन मात्र थोडं शिथिल केलंत तर बरं होईल...ते तर करणं भाग होतंच...मी प्रत्यक्ष परिस्थिती पाहात होतोच...मग तिच्याचकडून कळलं की मायबोली सदस्या ’अगो’ देखिल खूप चांगलं गाते...त्याचा पुरावा म्हणून तिने मला लागलीच ’अगो’च्या गेल्या वर्षीच्या गायनाचा दुवा पाठवून दिला...’अगो’चं गाणं ऐकलं आणि ठरवलं..तिलाही विनंती करूया, म्हणून तिला संदेश पाठवला...अपेक्षेप्रमाणे तिचाही होकार आला..मात्र गाणं ऐकल्यावरच निश्चित काय ते सांगता येईल असं ती म्हणाली...मग मी तिला चाल आणि काव्य पाठवलं...ऐकल्यावर तिने ते तिच्या आवाजात पाठवायचं कबूल केलं, मात्र वेळेची मर्यादा वाढवण्याची विनंती केली... मी लगेच ती मान्य करून टाकली.....हुश्श!
चला आता किमान पाच गाण्यांची निश्चिंती झाली होती...हेही काही कमी नव्हते..माझ्यासारख्या नवख्या माणसाला.
आणि अचानक...योग ह्यांच्याकडून संदेश आला....अचानकपणे मला व्यवसायानिमित्त परदेशी जावं लागत आहे त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे मी गाणी तयार करू शकत नाही...आपल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व...आपण मला समजून घ्याल अशी अपेक्षा करतो...
खरं तर हा जबरदस्त आघात होता...क्षणभर काय करावे तेच कळेना...पण ह्या गाण्यांपेक्षा त्यांचे काम निश्चितच जास्त महत्त्वाचे होते त्यामुळे त्यांना दोष न देता शांतपणे विचार करू लागलो...विचार करतांना माझ्या एका मित्रवर्यांची, श्री.सुहास कबरे ह्यांची आठवण झाली जे एक प्रख्यात तबलजी आहेत...माझा हा चाली लावण्याचा छंद त्यांनाही माहीत होता...लगेच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सगळी परिस्थिती कथन केली आणि म्हटलं...काही मदत करू शकाल काय?
त्यांनी थोडा विचार करून म्हटले...माझा एक चांगला गायक मित्र आहे...त्याला विचारून पाहतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला कळवतो.
अर्धाएक तासाने त्यांचा फोन आला...अमूक अमूक दिवशी रात्री ८ वाजता माझ्या गायक मित्राला घेऊन येतोय...येतांना तबला,पेटीही आणतोय...कितीही उशीर होऊ दे किमान दोन गाणी बसवून देतो.
पुन्हा जीवात जीव आला...कबरेसाहेबांनी शब्द दिलाय म्हटल्यावर मी निश्चिंत झालो.
ठरल्याप्रमाणे कबरेसाहेब आपले मित्र श्री. केदार पावनगडकर ह्यांना घेऊन हजर झाले....थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, चहा-पाणी झालं आणि मग आम्ही मूळ मुद्द्याकडे वळलो....आधी केदारजींना चाली ऐकवल्या....शांतपणाने आणि लक्षपूर्वक त्यांनी चाली ऐकल्या. त्यानंतर पहिली भूप रागातली ’सकल कलांचा उद्गाता’ ही चाल ऐकता ऐकताच त्यांनी ती स्वरलिपीत लिहायला सुरुवात केली आणि त्यानंतर प्रत्यक्ष गाऊन पाहिली...
केदारजी ह्यांचा आवाज ऐकला मात्र...मी अतिशय रोमांचित झालो..अतिशय मधुर आणि तीनही सप्तकात सहजतेने फिरणारा त्यांचा आवाज ऐकून मनाची पक्की खात्री झाली की आता आपल्या चालींचे नक्की सोने होणार.
केदारजी हे व्यवसायाने संगीत शिक्षक आहेत आणि ते खाजगी मैफिलीतूनही गातात...त्यामुळे त्यांच्या गात्या गळ्यातून येणारे स्वर अगदी सहजसुंदर असेच होते....माझ्यासारख्या संगीतातल्या कुडमुड्या ’चाल’काच्या चाली, असा मातबर कलाकार गाणार म्हटल्यावर मला खरंच कृतकृत्य झाल्यासारखे वाटले...स्वत: एक संगीतशिक्षक असूनही, चाल माझ्याकडून समजून घेतांना मात्र ते एखाद्या विद्यार्थ्यासारखे माझे गाणे ऐकत होते...मी स्वत: काय आहे हे मला नीटपणे माहीत आहे...बेताल आणि बेसूर...अशी बेची जोडी माझ्या गाण्यात पदोपदी आढळून येत असतांनाही....त्यातनं नेमकं जे काही घेण्यासारखं दिसलं ते घेऊन केदारजींनी त्यानंतर ’सकल कलांचा उद्गाता’ असं काही गायलंय की माझ्या आणि कबरेसाहेबांच्या तोंडून उस्फूर्तपणाने ’व्वा!’ असा उद्गार निघाला.
आता थोडं ध्वनीमुद्रणाविषयी.....इतके दिवस मी माझ्याच आवाजातल्या चाली ऑडेसिटी ह्या ध्वनीमुद्रण प्रणालीच्या मदतीने ध्वनीमुद्रित करत होतो..त्याही विना वाद्यसंगीत...पण आज इथे तर गायन-वादन असे दोन्हीही ध्वनीमुद्रित करायचे होते. माझ्या संगणकातल्या दोन ऑडियो पोर्टमधील फक्त एकच ऑडियोपोर्ट व्यवस्थित सुरु आहे...ह्याचा अर्थ केवळ एकाच माईकवर हे ध्वनीमुद्रण करावे लागणार होते...तसं पाहायला गेलं तर माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता की मी एखाद्या मातबर कलाकाराचे गाणे ध्वनीमुद्रित करणार होतो....
सर्वात आधी दोनतीन चांचणी ध्वमु केली आणि त्याचा दर्जा पाहून एका विवक्षित ठिकाणी मायक्रोफोनची मांडणी केली....ह्या मांडणीमुळे शक्यतो गायकाचा आवाज इतर वाद्यांच्या तुलनेत कमी पडणार नाही ही खात्री झाली...आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष ध्वनीमुद्रणाला सुरुवात केली...खरं तर केदारजींना स्वत: पेटी वाजवून गायची सवय नाही...पण दुसरा कुणी वादक हजर नसल्यामुळे गातांना त्यांना स्वत:लाच पेटीसाथ करावी लागली...त्याचा नाही म्हटले तरी थोडा परिणाम त्यांच्या गाण्यावर जाणवत होता हे त्यांच्याच बोलण्यावरून मला कळत होते...एकदोनदा पूर्णं गाणं गाऊनही त्यांचं पूर्ण समाधान झालेलं नव्हतं...पण एकीकडे वेळेचं बंधन होतं तर दुसरीकडे घड्याळाचा तासकाटा भराभर पुढे सरकत होता....दोन तास उलटून गेले होते आणि कसंबसं एक गाणं पूर्णपणे ध्वमु झालेलं होतं...शेवटी मीच केदारजींना म्हटलं की आता जे झालंय ते चांगलंच आहे...आपण दुसर्या गाण्याकडे वळूया का?
खरा कलाकार कधीच समाधानी नसतो हे केदारजींच्या बोलण्यावरून कळलं...ते म्हणाले..तुमचं समाधान झालं असलं तरी माझं स्वत:चं अजून समाधान झालेलं नाहीये...मला अजून चांगलं गायला हवंय...
मी आणि कबरेसाहेबांनी मग कशीबशी त्यांची समजूत घालून त्यांना दुसर्या गाण्याकडे वळवलं...त्यानंतर ते नाईलाजानेच दुसर्या गाण्याकडे वळले....आणि मग ध्वमु झालं... ’तुंदिलतनु श्री गणेश!’
फक्त दोन गाणी पूर्ण होईपर्यंत रात्रीचे साडेबारा होऊन गेले होते...दुसर्या दिवशी सकाळी उठून त्या दोघांनाही आपापल्या कामगिरीवर जायचं होतं आणि म्हणूनच नाईलाजाने जे काही ध्वमु झालं त्यावर समाधान मानण्यावाचून गत्यंतर नव्हतं...खरं तर केदारजींचं म्हणणं होतं की... माझ्या मनाप्रमाणे अजून गाणी जमलेली नाहीयेत तेव्हा ही गाणी प्रसिद्ध करू नयेत, आपण पुन्हा एकदा बसून ती चांगली बसवू आणि मगच ध्वमु करू...
पण गणपती उत्सव संपेस्तोवर त्या दोघांनाही अजिबात फुरसत नव्हती आणि मला तर ही गाणी मायबोलीसाठी द्यायची होती...मग दुसरा पर्याय काय होता? मी केदारजींना म्हटलं...केदारजी,तुम्ही स्वत: जरी समाधानी नसलात तरी मला मात्र दोन्ही गाणी आवडलेत आणि आता तुमच्या-माझ्याकडे,दोघांकडेही अजिबात वेळ नाहीये तेव्हा मला वाटतंय की हीच गाणी आपण वापरूया...मग केवळ नाईलाज म्हणून त्यांनी मला गाणी वापरण्याची परवानगी दिली...मी लगेच ती गाणी मायबोलीकडे पाठवून दिली...गणेशोत्सवाची सुरुवात तरी आता सुश्राव्य संगीताने होणार हे निश्चित झाले होते.
त्याप्रमाणे सकल कलांचा उद्गाता आणि तुंदिलतनु श्रीगणेश ही दोन्ही गीतं गणेश उत्सवाच्या अनुक्रमे दुसर्या आणि चौथ्या दिवशी मायबोलीवर प्रसारित झाली.
ह्या दोन्ही गीतांची रचना मायबोलीची एक आघाडीची कवयित्री क्रांती साडेकर हिनेच केलेली आहे. अतिशय उत्तम शब्दरचना आणि अंगभूत लय असलेल्या ह्या रचनांना चाल देण्याची खरं तर काहीच गरज पडली नाही..ह्या दोन्ही चाली गीतं वाचतांनाच आपोआप उलगडत गेल्या ...हेच क्रांतीच्या शब्दसामर्थ्याचं यश आहे.
ही दोन गाणी तर झाली.लोकांना आवडलीही... अजून रैना आणि अगोकडून गाणी यायची होती. रैनाशी माझं फोनवर बोलणं होतंच होतं...एकदोनदा तिने मला तिला जमले तसे ध्वनीमुद्रण पाठवलेही..पण तिला जबरदस्त सर्दी आणि खोकला झालेला असल्यामुळे त्याचा तिच्या आवाजावर झालेला परिणाम स्पष्टपणे जाणवत होता..त्यामुळे तिचं आणि माझंही पूर्ण समाधान होत नव्हतं...पण रैना मागे हटणारी नव्हती...तिने काहीही करून ह्यावर मात करण्याचा चंग बांधला होता...ध्वनीमुद्रण ऐकतांना मला एक जाणवत होतं की तिला धाप लागतेय,मध्येच ठसका लागतोय...त्यामुळे बर्याचदा सूर कमी पडतोय... तिने पाठवलेल्या ध्वनीमुद्रणातले हे दोष मी काढायचा प्रयत्न केला...काही अंशी तो जमलाही..पण त्यामुळे तंबोर्याचा आवाजही मधे मधे गायब होत होता...म्हणून मग मी तिला ऑडेसिटी वापरण्याची सूचना केली आणि ती तिने ऐकली.
ह्यात ध्वनीमुद्रण करण्यासाठीही एक उपसूचना केली...इलेक्ट्रॉनिक तंबोरा वापरून तो हेडफोनमधून ऐक आणि फक्त गाणं ध्वनीमुद्रित कर...गाणं ध्वनीमुद्रित करतांना खोकावंसं वाटलं तर खुशाल खोक..ध्वनीमुद्रण मात्र सुरुच ठेव..जिथे व्यत्यय येतोय तिथे थोडं थांबून तो भाग पुन्हा गाऊनच पुढे जा.....तंबोर्याचा ट्रॅक वेगळा पाठव...मी करतो बाकीचे सोपस्कार....आणि रैनाने तसंच करून मला पाठवलं ...आता माझं काम आधीपेक्षा सोपं झालं होतं....रैनाच्या ध्वनीमुद्रणातले अधलेमधले व्यत्यय,थांबे पुसत पुसत मला तिचे सलग असे गाणे तयार करता आले...मग त्याला तंबोर्याचा ट्रॅकही जोडला आणि तयार झाले एक सुंदर गाणे...तारीख होती
६ सप्टेंबर २०११. मी लगेच ते गाणं मायबोलीला पाठवून दिलं.
एकवेळ तर अशी आली होती की रैनाला तिचा खोकलाग्रस्त गळा हे गाणं गाऊ देईल की नाही ही शंका येत होती...पण त्या तशा परिस्थितीतही तिने सर्वस्व पणाला लावून जे काही गायलंय ते आपण प्रत्यक्ष ऐकलंच आहे...शाबास रैना! तुझ्या जिद्दीला माझे शतश: प्रणाम!
रैनाने गायलेल्या हे गजवदना ह्या गीताचे कवी आहेत मायबोलीचेच एक ज्येष्ट सदस्य आणि सुप्रसिद्ध कवी श्री. प्रसाद शिरगांवकर. त्यांच्या ह्या गीताला मी खूप आधीच चाल लावलेली होती...उत्सुकता असल्यास त्याबद्दलची कहाणी अवश्य वाचावी.
इथे रैनाच्या गाण्याचे हे प्रयोग सुरु असतांना अचानक अगोकडून निरोप आला... काही वैयक्तिक अडचणींमुळे मी हे गाणं गाऊन, ठरलेल्या अवधीत पाठवू शकेन असे वाटत नाहीये त्याबद्दल क्षमस्व..म्हणून आपण माझ्यावर अवलंबून राहू नये.
पुन्हा विचार सुरु झाला...कुणाला सांगावं आता? मी पुन्हा केदारजींना फोन केला..अजून एखादं गाणं किमान तंबोर्याच्या साथीने गाऊन द्याल का हे विचारण्यासाठी...पण फोनवरचा त्यांचा आवाज ऐकताच लक्षात आलं की त्यांची तब्येत बिघडलेली आहे....ते सांगत होते...गेले दोन दिवस सर्दी,खोकला आणि तापाने बेजार आहे.
मी माझे शब्द तसेच गिळून त्यांना... आराम करा आणि वेळेवर औषध घ्या असे सांगून फोन ठेवला. मनाशी म्हटलं...चला,किमान तीन गाणी तर तयार आहेत ना...हेही नसे थोडके! आता शांत बसणंच ठीक आहे.
केदारजींची दोन्ही गाणी प्रकाशित झाली आणि त्याने जणू जादूच केली...ती गाणी ऐकताच अगोकडून पुन्हा संदेश आला...काका,दोन्ही गाणी उत्तम झालेत...इतकी, की ती ऐकून मी ठरवलंय...
मीही आता गाणं पाठवतेच.
अचानक ह्या आलेल्या संदेशाने मी ही खुश झालो. अगो नुसतं बोलून थांबली नाही तर तिने काही तासातच गाणं अतिशय उत्तमरित्या गाऊन आणि ध्वनीमुद्रित करून पाठवलं...ती तारीख होती ७ सप्टेंबर २०११. अगोने तिच्या वैयक्तिक अडीअडचणींना बाजूला सारून ठरलेल्या मुदतीत इतकं उत्तम गाणं गाऊन पाठवलं त्याबद्दल तिचंही करावं तेवढं कौतुक कमीच आहे...शाबास अगो!
तिचे गाणं येतांच मी तेही लगेच मायबोलीला पाठवून दिलं आणि लगेचंच दुसर्या दिवशी रैना आणि अगो ह्या दोघींचीही गाणी मायबोलीवर प्रकाशित झाली.
अगोने गायलेल्या गिरीजासुता,गौरीगणेशा ह्या गाण्य़ाची कवयित्री देखील क्रांती साडेकर हीच आहे. अशा रितीने ह्या गणेशोत्सवात क्रांतीने, क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचे तर हॅटट्रीक केलेली आहे.
अशा रितीने, इतक्या सगळ्या लोकांच्या मदतीने मी माझ्यावर सोपवलेली कामगिरी काही प्रमाणात का होईना पार पाडू शकलो ह्याबद्दल मी समाधानी आहे. ही संधी दिल्याबद्दल मी मायबोली प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानतो. तसेच, मला माझ्या ह्या ’चाल’कत्वाला पूर्ण वेळ देता यावा म्हणून इतर दुसर्या कोणत्याही कामाला न जुंपता पूर्ण मोकळे सोडल्याबद्दल संयोजन समितीच्या प्रमुख मामी आणि इतर सदस्य लाजो,प्रज्ञा९ ,वैद्यबुवा आणि दिव्या ह्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो.
तळटीपः प्राप्त परिस्थितीत आणि सहज हाताशी असलेल्या साधनसामुग्रीचा वापर करून ही सर्व ध्वनीमुद्रणं घरगुती स्वरूपात केलेली असल्यामुळे त्यांचा दर्जा हा व्यावसायिक दर्जाच्या ध्वनीमुद्रणाइतका उत्तम नाहीये ह्याची मला पूर्ण जाणीव आहे.
मस्त उपक्रम गाणी ऐकलीच नव्हती
मस्त उपक्रम गाणी ऐकलीच नव्हती आता ऐकेन
ऐकलेल्या त्या सुंदर सुंदर
ऐकलेल्या त्या सुंदर सुंदर गाण्यांमागे किती धडपड होती. धन्यवाद काका.
किती कष्ट आहेत यामागे हे
किती कष्ट आहेत यामागे हे जाणवलं. शब्द, चाल आणि गायन, सगळंच सुंदर.
सगळ्यांचंच अभिनंदन!
मामी आणि प्रज्ञाशी सहमत!
मामी आणि प्रज्ञाशी सहमत! धन्यवाद.
काय उपक्रम आहे देव साहेब. मला
काय उपक्रम आहे देव साहेब. मला तुमचा उपक्रम फारच आवडला. कोणतेही काव्य वृतात लिहावे, किमान यमक जुळवावे हा आग्रह त्या काव्यांना चालवण्याच्या दृष्टीने गरजेचा असतो. गद्यातल्या काव्यांना चाली देण्याचे धाडस फक्त पं ह्रदयनाथ मंगेशकरच करो जाणे.
आपल्या रुपाने देव पावला. माझ्या मनातला उपक्रम आपण घडवला.
मायबोलीकरांचा काव्यांना मायबोलीकरांनी संगीत दिले आणि ती काव्ये मायबोलीकरांनी गायली आणि पुन्हा पुन्हा वाजवण्यासाठी रेकॉर्ड सुध्दा झाली. याला काय योग म्हणावा ?
मायबोलीकरांच्या कथा - कादंबर्यांच्या मालिका आणि चित्रपट सुध्दा व्हायला हवेत इतके गुणी कलाकार इथे आहेत. यासाठी देवांच्या पाठोपाठ महादेव निर्माण व्हावा.
आत्ताच एक गीत ऐकले. कॉप्युटरचे स्पिकर्स बिघडल्यामुळे गीत डाऊनलोड करुन ब्ल्यु टुथ ने मोबाईलवर पाठवुन ऐकले. आपल्या श्रमांचे सार्थक झाले. गीत, संगीत आणि गायकांचा आवाज सर्वकाही उत्तम.
श्रीगणेशा झालाच आहे. उपक्रम सुरु ठेवावा.
धन्यवाद देवकाका:-) ऐकलेल्या
धन्यवाद देवकाका:-)
ऐकलेल्या त्या सुंदर सुंदर गाण्यांमागे किती धडपड होती>>>>>+१
देवा! देवा! अरे देवा! जाम
देवा! देवा! अरे देवा!
जाम कष्ट घेतलेत राव तुम्ही. गीत कमी झालेत पण छान झालेत. एवढ्या कठीण स्थितीतही ४-५ सुंदर गाणी झालीत, हेही नसे थोडके.
तुम्ही देवही आहात आणि (प्र) मोदकही आहात, तरीही तो देवबाप्पा तुमची अशी कसोटी का पाहतो तेच कळत नाही.
देवकाका, सगळ्याच हौशी
देवकाका,
सगळ्याच हौशी मंडळींची धांदल आणि तुमचीही केवढी ती धांदल. काय म्हणू?
एवढ्या लोकांची मोट बांधून काहीतरी भरीव करायचे उत्साहाने याला किती परिश्रम लागतात याची जाणीव आहे. All's well that ends well. सगळीच गाणी छान झाली.
फार फार ऋणी आहे.
शेवटपर्यंत गाणं काही माझ्या मनासारखं होत नव्हतं. तेव्हा 'अगो', 'अरुंधती', 'हिम्याने' धीर दिला आणि ऐकुन हे पुरेसं ठिक आहे याची हमी दिली. त्यांच्याही ऋणात आहेच.
किती धडपडीने जमवून आणलंत
किती धडपडीने जमवून आणलंत सगळं. सर्व संबंधितांचं अभिनंदन!
गाणे ऐकताना त्यामागे किती
गाणे ऐकताना त्यामागे किती मेहनत असते, ते कधी लक्षातच येत नाही.
आता या आमच्या बालकलाकारांच्या आवाजातही मोठी गाणी ऐकायची आहेत.
देवकाका, इतक्या सुंदर
देवकाका, इतक्या सुंदर गाण्यांसाठी तुमचे आभार. इतके दिवस गाणी नुसतीच ऐकुन अप्रतिम आहेत म्हणुन appreciate केली होती. आज ती तयार करण्यामागची तुमची धडपड आणि तळमळ, गायक/वादकांचे कष्ट वाचले. आणि हे सगळं आमच्यासाठी. धन्यवाद !
मस्त. अजून कुठलंही गाणं मी
मस्त. अजून कुठलंही गाणं मी ऐकलेलं नाही पण आज ऐकतेच. एवढे परिश्रम घेतल्यावर त्याचं फळंही त्याच तोडीचं असणार.
स्वाती ताई +१ मस्त मांडलंत...
स्वाती ताई +१
मस्त मांडलंत...
सर्व प्रतिसादकांना मन:पूर्वक
सर्व प्रतिसादकांना मन:पूर्वक धन्यवाद!
संबंधित कवी/कवयित्री,गायक/गायिका,वादक आणि समस्त मायबोलीकर हितचिंतक ह्यांच्यामुळे हे असाध्य ते साध्य झाले...प्रत्येकांनी त्यांचा अमूल्य वेळ माझ्यासाठी दिला आणि मायबोलीने संधी दिली म्हणूनच हा योग साधला गेला. माझ्या आयुष्यात पुन्हा असा योग जुळून येईलच असे खात्रीलायक सांगता नाही येणार..त्यामुळे जे घडलं ते माझ्या दृष्टीने एक साकारलेलं सुखस्वप्नच आहे.
पुन्हा एकदा सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद!
देवकाका, चालकत्व चालू
देवकाका, चालकत्व चालू ठेवण्यास मनापासून शुभेच्छा!
All's well that ends well.
All's well that ends well. >>> रैना, अगदी खरं
देवकाका, किती टेंशनमधून जावं लागलं तुम्हाला. 'मला जमत नाहीये' असं सांगणं सोपं पण जो संयोजन करतो त्याला हे वाक्य किती अडचणीत टाकू शकतं हे प्रकर्षाने जाणवलं.
कुठल्याही गायकासाठी आधी कुणीही न गायलेलं नवकोरं गाणं गायला मिळणं ही फार फार आनंदाची गोष्ट असते आणि अपूर्वाईची सुद्धा. ती संधी मला तुमच्यामुळे मिळाली ह्याबद्दल अतिशय आभारी आहे
छान च आहे उपक्रम
छान च आहे उपक्रम
देवकाका, धन्य आहात तुम्ही!
देवकाका, धन्य आहात तुम्ही! मला तर फक्त शब्द जुळवून द्यायचे होते, पण त्या शब्दांचं अतिशय सुरेल गाणं घडवणारी तुमची चमू आणि तुम्ही स्वतः खूप अथक परिश्रम घेतलेत! हो, आणि हे लिहिलं पण खूप छान.
देवकाका! काय सांगू? तुम्ही
देवकाका! काय सांगू? तुम्ही थोपुवर भेटलात आणि दोन चालींचे दुवे दिले होतेत तेव्हाच मी त्या ऐकल्या आणि त्या मला खूपच आवडल्या.उरलेल्या ऐकीनंच.एवढ्या अडचणींतून मार्ग काढून चांगलं काम केलं आहे तुम्ही! तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद! 'चालकत्व' सोडू नका ही विनंती!
क्रांती, रैना, अगो आणि केदार
क्रांती, रैना, अगो आणि केदार यांचंही मनापासून अभिनंदन!
प्रमोद दादा, तुम्ही आम्हांला
प्रमोद दादा, तुम्ही आम्हांला क्रांती, रैना, अगो आणि केदारच्या मदतीने काय सुश्राव्य मेजवानी दिलीत ! आणि त्यासाठी काय काय खटपटी लटपटी केल्यायत ते वाचुन एवढेच म्हणेन सादर प्रणाम !.........................
वा मस्त ! ऐकलेल्या या सगळ्या
वा मस्त ! ऐकलेल्या या सगळ्या सुंदर सुंदर गाण्यांमागे किती धडपड होती, किती कष्ट होते यामागे हे जाणवलं. शब्द, चाल आणि गायन, सगळंच सुंदर.
सगळ्यांचंच अभिनंदन!
प्रमोद जी, धडपड सार्थकी
प्रमोद जी,
धडपड सार्थकी लागली. तुमची सर्व गीते श्री गणेशाच्या चरणी सेवारुजू झाली त्यामूळे ऐनवेळी दुर्दैवाने मला दिला शब्द पाळता न आल्याने आलेली अपराधी पणाची भावना काही अंशी कमी झाली.
असो. भविष्यात एकत्र काम करायचा "योग" नक्की येवो अशीच प्रार्थना!