असे म्हणतात की श्रीगणेशाने दृष्टांत दिल्यानंतर अथर्व ऋषींनी अथर्वशीर्ष लिहिले. संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्षाची एक हजार (सहस्त्रावर्तन), एकशे आठ अथवा एकवीस आवर्तने करतात. उपनिषदाने आवर्तनाची सुरुवात होते आणि श्रीगणेशाची आठ नावे घेऊन ते संपते.
अथर्वशीर्षाची नियमीत आवर्तने करणारे आपल्यात अनेक असतील. बर्याचदा असे होते की धार्मिक विधी अथवा परंपरा पाळत असताना आपल्याला त्याचा अर्थ ठाऊक नसतो, फलश्रुति ठाऊक नसते. ह्यासाठीच यंदाच्या गणेशोत्सवात खास मायबोलीकरांसाठी संपूर्ण अथर्वशीर्षाचा मराठीत अनुवाद केला आहे. तर समजावून घेऊयात अथर्वशीर्षाचा अर्थ आणि उद्देश !!!
| श्रीगणेशाय नम: |
शांतिमंत्र
ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: | भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: | व्यशेम देवहितं यदायु: ||१||
ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: | स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: |
स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: | स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||२||
ॐ शांति: शांति: शांति: ||
ॐ तन्मामवतु तद्वक्तारमवतु
अवतु माम् अवतु वक्तारम्
ॐ शांति: शांति: शांति: ||
हे देवांनो, आम्ही आमच्या कानांनी कल्याणमय वचने ऐकावीत, आम्ही आमच्या डोळ्यांनी शुभ दृष्ये पहावीत (कल्याणमय वचने कानावर पडावी, शुभ दृष्ये डोळ्यांना दिसावीत). तुम्ही पूजनीय आहात. आम्हांला दिलेले आयुष्य उत्तम प्रकृतीने भोगून आमच्याकडून तुमची स्तुती होवो. भाग्यवान इंद्र आमचे पोषण करो. सर्व जाणणारा पूषा आमचे पोषण करो. ज्याला कोणी अडवत नाही असा तार्क्ष्य आमचे पोषण करो. बृहस्पती आमचे पोषण करो. तो माझे रक्षण करो, तो बोलणार्याचे रक्षण करो.
उपनिषद
ॐ नमस्ते गणपतये | त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि |
त्वमेव केवलं कर्ताऽसि | त्वमेव केवलं धर्ताऽसि |
त्वमेव केवलं हर्ताऽसि | त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि |
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ||१||
गणपतीला नमन. तूच वेदातील तत्त्वज्ञान आहेस, तू कर्ता आहेस, रक्षणकर्ता आहेस, आणि जग नष्ट करणारा आहेस. तूच हे सर्व ब्रह्म आहेस. तूच परमात्मा आहेस.
स्वरूप तत्त्व
ऋतं वच्मि | सत्यं वच्मि || २||
अव त्वं माम् | अव वक्तारम् | अव श्रोतारम् | अव दातारम् |
अव धातारम् | अवानूचानमव शिष्यम् | अव पश्चात्तात् | अव पुरस्तात् |
अवोत्तरात्तात् | अव दक्षिणात्तात् | अव चोर्ध्वात्तात् | अवाधरात्तात् |
सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् || ३ ||
मी योग्य व सत्य वचन करीन. तू माझे रक्षण कर. तू बोलणार्याचे रक्षण कर. तू ऐकणार्याचे रक्षण कर. तू देणार्याचे रक्षण कर. तू घेणार्याचे रक्षण कर. तू गुरूंचे रक्षण कर, तू शिष्यांचे रक्षण कर. तू माझे पश्चिमेकडून (येणार्या संकटांपासून) रक्षण कर. पूर्वेकडून रक्षण कर. उत्तरेकडून रक्षण कर. दक्षिणेकडून रक्षण कर. उर्ध्व दिशेकडून रक्षण कर नि अधर (म्हणजे खालील) दिशेकडून रक्षण कर. माझे सर्व बाजूंनी रक्षण कर.
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय: | त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः ||
त्व सच्चिदानंदाद्द्वितीयोऽसि | त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि |
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि || ४||
तू सर्व शब्द, मन, आहेस. तू सत्यमय, आनंदमय व ब्रह्यमय आहेस. तू अद्वैत जगाचे सार आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस.
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति |
सर्वं जगदिद त्वयि लयमेष्यति | सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति |
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ: | त्वं चत्वारि वाक्पदानि || ५ ||
हे सर्व जग तुझ्यापासून निर्माण झाले. हे सर्व जग तुझ्यामुळे चालते, हे सर्व जग तुझ्यातच नष्ट होते. हे सर्व जग सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. तू भूमी, जल, अग्नी, वायू व आकाश आहेस.
त्वं गुणत्रयातीत: | त्वं देहत्रयातीत: |
त्वं कालत्रयातीत: | त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ||
त्वं शक्तित्रयात्मक: | त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् |
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं | रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं |
वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं | ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ||
तू तीन गुणांच्या (सत्त्व, रज, तम) पलीकडील आहेस. थोडक्यात, तुझे वर्णन करणे देह, काल, अवस्था (जागृती, निद्रा, स्वप्न) यांच्यापलीकडे आहे. योगी लोक सतत तुझेच ध्यान करतात. ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र व भू, भुवः, स्वः, हे तिन्ही लोक तुझ्यात सामावलेले आहेत. (मनुष्य प्रथम भूमीवर जगतो. मृत्यूनंतर आत्मा भुवः लोकात जातो, तिथून जसजसा तो पवित्र होत जातो, तसतसा तो स्वः मः जनः तपः लोकांतून शेवटी सत्य लोकात जातो. पैकी पहिल्या तीन लोकात श्रीगणेशाचे वर्चस्व आत्म्यावर असते.)
गणेश मंत्र
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम् |
अनुस्वार: परतर: |
अर्धेंदुलसितम् | तारेण ऋद्धम् |
एतत्तव मनुस्वरूपम् | गकार: पूर्वरूपम् | अकारो मध्यमरूपम् |
अनुस्वारश्चान्त्यरूपम् | बिंदुरुत्तररूपम् | नाद: संधानम् | संहिता संधि: | सैषा गणेशविद्या |
गणकऋषि: | निचृद्गायत्रीच्छंद: | गणपतिर्देवता | ॐ गँ गणपतये नम: ||७||
गं या अक्षरात व ॐ या अक्षरात श्रीगणेश सामावलेले आहेत. सर्व विद्यांचे मूळ तेच आहे. या मंत्राचा कर्ता गणक ऋषी, छंद ( काव्यातील meter) 'निचृद्गायत्री', देवता गणपती. गं अक्षराला वंदन करून मी गणपतीला वंदन करतो. (ॐ नि गं ही गणेशविद्येची वैदिक रूपे आहेत.)
गणेश गायत्री
एकदंताय विद्महे | वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंती प्रचोदयात् || ८ ||
श्रीगणेश हा एकद राक्षसाचा अंत करणारा तसेच वाईट लोकांचा नाश करणारा आहे. तो आम्हाला उत्साहवर्धक असो.
गणेश रूप
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् |
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ||
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् |
रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम् ||
हे आपल्या माहितीचे श्रीगणेशाचे रूप - एक दात, चार हात, हातात पाश व अंकुश, सोंड, आशीर्वाद देणारा हात, उंदीर हे वाहन, लाल रंग, मोठे पोट, सुपासारखे कान, लाल वस्त्रे नेसलेला, लाल रंगाचे गंध लावलेला, लाल फुलांनी ज्याची पूजा केली आहे असे हे श्रीगणेशाचे स्वरूप आहे.
भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् |
आविर्भूतं च सृष्ट्यादौ | प्रकृते: पुरुषात्परम् ||
एवं ध्यायति यो नित्यं | स योगीं योगिनां वर: || ९ ||
तो भक्तांवर दया करतो, सर्व जगाचे निर्माण त्याने केले आहे, तो आपल्या मार्गावर स्थिर आहे. सृष्टीच्या सुरुवातीला प्रकृती व पुरुष त्यानेच निर्माण केले. असे चिंतन जो नेहेमी करतो, तो सर्व योग्यांपेक्षा श्रेष्ठ
आहे.
अष्ट नाम गणपती
नमो व्रातपतये | नमो गणपतये | नम: प्रमथपतये | नमस्तेSस्तु लंबोदरायैकदंताय |
विघ्ननाशिने शिवसुताय | श्रीवरदमूर्तये नमो नम: || १० ||
ही गणपतीची आठ नावे: व्रातपती, गणपती, प्रथमपती, लंबोदर, एकदंत, विघ्ननाशिन, शिवसूत, वरदमूर्ती.
यांना पुनः पुनः नमस्कार असो.
काही लोक इथेच पाठ संपवतात. यानंतर हे अथर्वशीर्ष म्हणण्याचे फायदे (फलश्रुति) वर्णन केले आहेत.
फलश्रुति
एतदर्थवशीर्षं योSधीते | स ब्रह्मभूयाय कल्पते | स सर्वत: सुखमेधते |
ससर्वविघ्नैर्न बाध्यते | स पंञ्चमहापापात्प्रमुच्यते | सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति |
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति | सायंप्रात: प्रयुञ्जानो अपापो भवति |
सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति | धर्मार्थकाममोक्षं च विंदति ||
या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो (वाचन, मनन, चिंतन) तो ब्रह्माच्या योग्यतेचा होतो. त्याला सर्व बाजूंनी सुख मिळते. त्याला विघ्नांची बाधा होत नाही, पाच महापापांपासून त्याची सुटका होते. जो संध्याकाळी अध्ययन करतो, त्याने दिवसा केलेली पापे नाहीशी होतात. जो सकाळी अध्ययन करतो, त्याने रात्री केलेली पापे नाहीशी होतात. सकाळ संध्याकाळ अध्ययन करणारा निष्पाप होतो. सर्व ठिकाणी जप करणार्याची सर्व विघ्ने नाहीशी होतात. त्याला धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे सर्व प्राप्त होतात.
इदमथर्वशीर्षंमशिष्याय न देयम् | यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति |
सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् || ११ ||
हे अथर्वशीर्ष 'अशिष्याला' देऊ नये. अशिष्य म्हणजे ज्याची योग्यता नाही असा (ज्याची श्रद्धा नाही असे लोक). जर कुणी मोहामुळे (पैशासाठी) देईल, तो महापापी होईल. एक हजार वेळा जो याचे अध्ययन करेल त्याची जी जी इच्छा असेल ती ती यामुळे पूर्ण होईल.
अनेन गणपतिमभिषिंचति | स वाग्मी भवती |
चतुर्थ्यामनश्नन् जपति | स विद्यावान भवति |
इत्यथर्वणवाक्यम् |
ब्रह्माद्याचरणं विद्यात् | न बिभेति कदाचनेति || १२ ||
या मंत्राने जो गणपतीवर अभिषेक करतो, तो उत्तम वक्ता होतो. जो चतुर्थीच्या दिवशी उपाशी पोटी जप करतो तो विद्यावान होईल. तो यशस्वी होईल. असे अथर्वऋषींनी सांगितले आहे. त्याचे नेहेमी चांगले आचरण होईल, व तो कधीही कशालाही घाबरणार नाही.
यो दुर्वांकुरैर्यजति | स वैश्रवणोपमो भवति |
यो लाजैर्यजति स यशोवान् भवति | स मेधावान् भवति |
यो मोदकसह्स्रेण यजति | स वाञ्छितफलमवाप्नोति |
यः साज्यसमिद्भिर्यजति | स सर्वं लभते स सर्वं लभते || १३ ||
जो दूर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासारखा (श्रीमंत) होतो. जो (भाताच्या) लाह्यांनी हवन करतो तो यशस्वी (व) बुद्धिमान होतो. जो एक हजार मोदकांचा नैवेद्य दाखवेल त्याला इच्छित फळ मिळेल. जो तूप व समिधा यांनी हवन करेल त्याला सर्व काही मिळेल. त्याला सर्व काही मिळेल.
अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति |
सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति |
महाविघ्नात्प्रमुच्यते | महादोषात्प्रमुच्यते |
महापापात्प्रमुच्यते | स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति |
य एवं वेद इत्युपनिषद् || १४ ||
जर आठ योग्य शिष्यांना हे कुणी शिकवले तर तो सूर्याहून श्रेष्ठ होतो. सूर्यग्रहणात, महानदीत (म्हणजे गंगा वगैरेसारखी नदी) किंवा मूर्तीजवळ जर याचा जप केला तर या मंत्राचे सर्व फायदे मिळतील. मोठ्या संकटांतून, मोठ्या दोषांपासून, मोठ्या पापांपासून सुटका होईल. अशा तर्हेने हे रहस्य जो चांगल्या रीतीने जाणतो तो सर्वज्ञ होतो.
शांतिमंत्र
ॐ सहनाववतु | सह नौ भुनक्तु | सह वीर्यं करवावहै |
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ||
आपल्या दोघांचे (गुरू व शिष्य) रक्षण होवो. आपण एकत्र याचे सेवन (वाचन, श्रवण, मनन) करू. आपल्या दोघांच्या प्रयत्नांनी आपले अध्ययन अधिक तेजस्वी (प्रभावी) होवो. आपल्याला कुणाबद्दलही द्वेष असू नये.
शांतिमंत्र
ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: | भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: | व्यशेम देवहितं यदायु: ||१||
ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: | स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: |
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: | स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||२||
ॐ शांति: शांति: शांति: ||
ॐ तन्मा अवतु
तद्वक्तारमवतु
अवतु माम्
अवतु वक्तारम्
ॐ शांति: शांति: शांति: ||
|| श्रीगणेशार्पणमस्तु ||
झक्की, खूप धन्यवाद की हा धागा
झक्की, खूप धन्यवाद की हा धागा दिलातः-)
यांत्रिक पद्धतीने स्तोत्र म्हणण्यापेक्षा असे म्हणणे व एकदाच म्हणने कितीतरी लाभदायक असावे.
===========================
आता या धाग्यात लिंबुटिंबूंनी नुकताच काढलेला मुद्दा काही प्रमाणात जाणवतो अशी एक दोन उदाहरणे:
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं | रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं |
वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं >>>
येथे जवळपास सगळेच शेवटचा शब्द 'चंद्रमास्त्वं' असा उच्चारतात जे चूक आहे. चंद्रमा या शब्दाचे संस्कृत रूप चंद्रमा: असे होते. तेथे चंद्रमा: त्वं असे उच्चारले जायला हवे.
(अवांतर - त्वं ब्रह्मा येथेही ब्रह्मा या शब्दाला स लावतात तेही चुकीचेच आहे. त्याही शब्दाचे रूप चंद्रमा सारखेच होते. अर्थात, हे अवांतर याबाबत आहे की त्वं ब्रह्मा येथपासून चंद्रमा: त्व येथपर्यंत एकाच श्वासात ओळ उच्चारणे अभिप्रेत आहे. किंबहुना, असे म्हंटले गेले आहे की छातीत आत येणारा किंवा बाहेर जाणारा असा श्वासच नाही - ही स्टेज अशक्य आहे , पण मिनिमम हवा असताना - ही ओळ उच्चारावी)
तसेच 'प्रमथपतये' यात प्रमथ चा अर्थ गुरुजी (योगी ) असा आहे.
झक्की, अहो मी येथिल टेक्स्ट,
झक्की, अहो मी येथिल टेक्स्ट, वर्ड मधे कॉपी करुन थोडेफार फॉरम्याटिन्ग करुन त्याचे चारपानी प्रिन्ट काढून ल्यामिनेट करुन घेतले नुकतेच, ते घेऊन लिम्बी भिशी मन्डळात गेली, तो आता तिथे बाकी स्तोत्रे आरत्यान्बरोबर त्याचे रोज पारायण होते. आता बिनाअर्थाचे प्रिन्ट मागितले आहेत सगळ्यान्ना हाती धरायला, ते बनवुन देतोय! त्यामुळे तुम्हालाच धन्यवाद!
माझ्या एका सिनियर मित्राकरता त्याने दिल्याप्रमाणे मी पण बरहा मधे टाईप केलय, पण ते उच्चारान्चेबाबतीत प्रत्येक अनुस्वार कशा पद्धतीने उच्चारावा याचेही विश्लेषण करणारे असे आहे, अजुन मलाच अवगत व्हायचे आहे.
विवेक देसाई, अभिनन्दन वीस वर्षे रोज न चूकता म्हणणे हे कसोटीच आहे. असेच चालू ठेवा हे सान्गणे नलगे.
बेफिकिर, माझ्या त्यामुद्याला
बेफिकिर, माझ्या त्यामुद्याला काहीन्नी उत्तरे दिली, त्यातिलच, रॉबिनहुडचे हे उत्तर शन्कानिरसनाकरता सन्दर्भासाठी घ्या... (चिनुक्स अन हिम्स्कुल यान्ची पोस्टही सन्दर्भा)
>>> रॉबीनहूड | 29 August, 2009 - 16:53
त्वं ब्रह्मा: त्वं विष्णु: स्त्वंरूद्र: स्त्वंइंद्र: स्त्वंअग्नि: स्त्वंवायु: स्त्वंसूर्यं: स्त्वंचंद्रमा: स्त्वंब्रह्मभूर्भुवः स्वरोम् || ??????
>>>
लिम्बाजीराव, विसर्गाचे रूपान्तरण सन्धी होताना काही ठिकाणी अर्धा 'स' तर काही ठिकाणी अर्धा'र' होते पण ते विसर्गाच्या ऐवजी. विसर्ग आणि हा स आणि र दोन्ही एकत्र येणार नाहीत. त्यामुळे एक तर विष्णु: त्वं रुद्रः त्वं इन्द्रः असे तरी होईल नाहीतर विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं असे तरी होईल. यात त्वं हे सम्बोधन शेवटी घेण्याच्या ऐवजी सुरुवातीस घेतलेले असल्याने त्वं ब्रम्हः, त्वं विष्णु: , हा क्रम बरोबर वाटतो. त्यामुळे स जोडण्याचे कारण नाही.
(बाकी एवढे चांगले काम केल्याबद्दल पापाचा भार रतीभर तरी कमी झाला असेल ) <<<<<
>>> सहज प्रयत्न केला की किती
>>> सहज प्रयत्न केला की किती श्वासात एक आवर्तन मला म्हणता येतय
तर असे कळले की सात श्वासात (खरे तर सव्वासहा श्वासात) एक आवर्तन पुर्ण करता येतय
मी फार पूर्वी ऐकले/बघितले होते की कित्येकजण पाच श्वासान्च्या आत, मोठ्या आवाजात, एक आवर्तन म्हणू शकतात! याबद्दल कोणी काही सान्गू शकेल का? <<<<
माझ्याच २००९ च्या पोस्ट मधिल हा भाग.
यन्दा तपासुन बघितले तर चार श्वासात पूर्ण सुस्पःष्ट उच्चारात पण गतीने म्हणता येतय. (पाच श्वासात सहजपणे)
तीन श्वासापर्यन्त काही पोचता आले नाही ब्वॉ!
विसर्गाचे रूपान्तरण सन्धी
विसर्गाचे रूपान्तरण सन्धी होताना काही ठिकाणी अर्धा 'स' तर काही ठिकाणी अर्धा'र' होते पण ते विसर्गाच्या ऐवजी.>>>
आणि 'आ'कारान्त शब्दाच्या शेवटी विसर्ग असल्यास 'स' किंवा 'र' यातील काहीच येत नाही.
सव्वा सहा श्वास... बापरे...
सव्वा सहा श्वास... बापरे... नाहि जमनार बहुदा... प्रयत्न करतो.
धन्यवाद झक्की, अर्थसकट लिहिल्याबद्दल.
हा धागा वर आल्याने
हा धागा वर आल्याने विसर्गाबद्दल जी काही चर्चा चालू आहे त्याबद्दल लिहितो.
>>येथे जवळपास सगळेच शेवटचा शब्द 'चंद्रमास्त्वं' असा उच्चारतात जे चूक आहे. चंद्रमा या शब्दाचे संस्कृत >>रूप चंद्रमा: असे होते. तेथे चंद्रमा: त्वं असे उच्चारले जायला हवे.
ब्रह्मा- ब्रह्मन् या अन्नन्त पुल्लिंगी शब्दाचे प्रथमा एकवचन. त्यामुळे ब्रह्मा: (विसर्गासह) असे रूपच नाही.
त्वं ब्रह्मा त्वं विष्णु: त्वं....... असे सगळे प्रथमा एकवचनातले शब्द आहेत.
ब्रह्मा (ब्रह्मन्)
विष्णु: (विष्णु) (इथे विसर्गासह प्रथमा एकवचन होते)
विसर्गाच्यापुढे 'त' वर्ग (म्हणजे त, थ, द,ध,) आले असता विसर्गाचा 'स' होतो.
इथे विसर्ग आकारान्त शब्दाला आहे की उकारान्त की ईकारान्त यामुळे फरक पडत नाही.
उदा: इतस्ततः हा शब्द. याची फोड इतः + तत: अशी होते. विसर्गापुढे 'त' आल्याने 'इतस्ततः' असे रूप होते.
चन्द्रमा: (चन्द्रमस् या 'स्'कारान्त शब्दाचे प्रथमा एकवचन)
वरील नियमानुसार चन्द्रमा: + त्वं= चन्द्रमास्त्वं असे रूप होते.
विसर्गापुढे 'त' वर्गातला अनुसासिक वर्ण (न) आल्यावर मात्र विसर्गाचा 'स' होत नाही.
तिथे विसर्गाचा 'रफार' होतो.
उदा: अग्निर्नः पातु कृत्तिका: -> इथे अग्नि: + नः = अग्निर्नः.
> हे अवांतर याबाबत आहे की त्वं ब्रह्मा येथपासून चंद्रमा: त्व येथपर्यंत एकाच श्वासात ओळ उच्चारणे अभिप्रेत >आहे.
असे काही अभिप्रेत असावे असे वाटत नाही.
मूळ स्तोत्रात ती ओळ अखंड दिली आहे (किंवा अखंड दिल्यासारखी वाटते) याचे कारण संधींचा विग्रह न करता ते लिहिले जाते म्हणून.
'त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोऽम्'
भरभर म्हणतानासुद्धा 'त्वं ब्रह्मा..........ब्रह्मभूर्भुवस्वरोऽम् ' इथपर्यंत एका श्वासात म्हणता येईलच असे नाही.
म्हणताना जर तुम्ही 'चन्द्रमा' ला थांबत असाल तर तिथे संधीविग्रह करून म्हणणे योग्य ठरेल (चन्द्रमा:, त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोऽम् असे) इतकेच.
>तसेच 'प्रमथपतये' यात प्रमथ चा अर्थ गुरुजी (योगी ) असा आहे.
प्रमथचा योगी हा अर्थ नव्याने कळला. प्रमथ म्हणजे 'हत्ती' असा अर्थ आधी वाचला होता.
-चैतन्य
Pages