अतर्क्य आणि अचाट घटनंनी भरलेली रात्र होती ती!
कोणीही दुसर्याने सांगितलेल्या प्लॅनप्रमाणे वागलेलेच नाही आहे हे कोणालाही माहीत नव्हते.
आत्ता रात्रीचे साडे दहा वाजले होते.
मे महिन्याचा उकाडा आत्तासुद्धा जाणवत होता.
त्या उंचवट्यावर तब्बल दोन तास बसून निवेदिताचे सर्वांग ठणकत होते. पाण्याचा घोटही न घेता ती अव्याहत केवळ एकाच दिशेला पाहात होती.
...... रास्ते वाड्याचे प्रवेशद्वार!
अत्यंत विचित्र साहस केले होते तिने!
उमेशला धुळ्याहून पत्र पाठवले तर ते पत्र भलत्याच्याच हातात लागून 'आपट्यांची मुलगी अजून आमच्या मुलाला नादाला लावत आहे' अशी बोंब राईलकरांनी ठोकली असती. सरळ वाड्यात गेली असती तर तर काही प्रश्नच राहिला नसता. उमेशच्या आजोबांनी किंवा शैलाताईनेच कंप्लेन्ट दाखल केली असती कदाचित! आणि रस्त्यात कोठेही उमेशला भेटणे अशक्य होते कारण एक तर कोणीही पाहू शकेल ही शक्यता आणि उमेश कोठे आहे हेच माहीत नसणे हा मोठा प्रश्न! त्यामुळे या सर्वांवर तिने एक उपाय काढला होता, जो अतिशय खतरनाक उपाय होता.
दुपारी बाराच्या बसने ती साडे तीन वाजता अहमदनगरला पोचली आणि धुळ्याचे तिकीट फेकून देत खाली उतरली. बाजूच्या प्रवाश्यांना सरळ सांगितले की माझ्यासाठी बस थांबवू नयेत. अक्षरशः तिसर्या मिनिटाला समोरच असलेल्या एका बसमध्ये बसून निवेदिता उलटी पुण्याला निघाली. साडे सात वाजता शिवाजीनगर!
५६६६०.
घरी फोन लावला आणि एक रिंग वाजताच ठेवून दिला. धुळ्याला आपण किती वाजता पोचणार होतो हा विचार केला. रात्री नऊ वाजता! मग तशीच अंधारातून चालत चालत कोणाच्याही फारसे नजरेस पडणार नाही याची काळजी घेत मॉडर्न कॅफे बाहेर असलेल्या एका टपरीवर एक चहा प्यायली व क्रीम रोल खाल्ला. तो टपरीवाला पहिल्यांदाच एकटी मुलगी टपरीवर आल्याने जरा कुतुहलानेच पाहत होता. नितुच्या धुळ्याच्या मावशीकडे फोन नव्हता. पण तिचे वडील खात्यात असल्याने तिच्या स्वतःच्या घरी मात्र फोन होता. मात्र पुण्यातुनच फोन केला तर ट्रंक बुकिंगची ऑपरेटर बोलणार नाही आणि विश्वास बसणार नाही इतके तिला जाणवले. फोन तर करायलाच लागणार होता नाहीतर मग तिच्या फोनची वाट पाहून तिच्या बाबांनीच सादे नऊ पासून धुळ्यात चक्रे हालवायला सुरुवात केली असती.
काही वेळ थांबून नितुने शेवटी निर्णय घेतला. काही का असेना, फोन तर करावाच लागणार आहे. मग उशीर कशाला करायचा. एका उघड्या किराणा मालाच्या दुकानात तिने फोनची चौकशी केली. पन्नास पैसे टाकून नंबर फिरवला.
सात आठ वेळा रिंग वाजली तरी कोणी उचलेना! हे कसे काय झाले? नितुला काहीही समजेना! तिने पुन्हा तीन वेळा फोन लावला. पण कोणीही उचलला नाही. वास्तविक पाहता तिच्या फोनची आतुरतेने वाट पाहिली जायला हवी होती. आता काय करायचे म्हणून काही वेळ थांबुन तिने सरळ वडिलांच्या चौकीचाच नंबर फिरवायचे ठरवले तसा किराणा मालवाला वैतागला व म्हणाला कि आता दुकान बद करायचे आहे. नितुने घाईघाईत चौकीचा नंबर फिरवला व तो फोन मात्र दुसर्याच रिंगला उचलला गेला.
"शिवाजीनगर....."
चौकीचे नांव त्या माणसाने फोन उचलल्या उचलल्या स्वतःच सांगितले तसा नितुच्या अंगावर शहारा आला. ती जिथे आत्ता होती तिथून केवळ अर्ध्या किलोमीटरवर तिचे बाबा असणार होते. भीती बाजूला ठेव्न तिने विचारले.
"निवेदिता आपटे बोलतीय... बाबा आहेत का??"
"तू कुठंयस बाळ?"
"अं?? धुळे.."
"पोचलीस ना??"
"हो.. कोण बोलताय??"
" मोरे काका बोलतोय... "
"बाबा कुठे आहेत??"
आत्ताच निघाले आहेत वगैरे उत्तर आले असते तर कसलाही विधिनिषेध न बाळगता नितु सरळ टपरीच्या मागे बसणार होती लपल्यासारखी! पण उत्तर..... उत्तर तिसरेच मिळाले...
"बाबा कमिशनर ऑफीसला गेलेत... जरा... जरा काहीतरी गडबड झालीय... "
"क... काय गडबड??"
"फार काही विशेष नाही... मला तुझा पोचल्याचा निरोप घेऊन ठेवायला सांगितलाय... "
"हो पण.. काय झालंय??"
"बाळ त्यांच्यावर कसलातरी आरोप केलाय कोणीतरी.. तू काही काळजी करू नकोस... "
"आई???"
"आई तिकडेच आहे.. तू उद्या सकाळी घरी फोन कर... आई सगळं सांगेल तुला... "
"हो पण... काका.. प्लीज सांगा ना काय झालंय??"
" काही नाही.. खात्यातल्या लोकांवर असले आरोप करतातच लोक... स्वतः सुटायचे असते म्हणून... "
"कसला आरोप केलाय?? "
"सांगण्यासारखा नाहीये बाळ.. पण तू अजिबात घाबरू नकोस... बाबा सकाळी घरी येतील.. हं??"
फोनच ठेवून दिला त्या माणसाने!
नखशिखांत हादरलेली निवेदिता रिसीव्हर हातात धरून तशीच उभी राहिली तेव्हा वाण्याने स्पष्ट शब्दात तिला जायला सांगितले. भानावर येऊन तिने विचारले की अजून एक फोन करू का! त्यावर तो नाही म्हणाला आणि त्याने शटर अर्धे लावूनही घेतले. वाकून बाहेर निघत निवेदिता डोळ्यात पाणी आल्यामुळे नुसतीच बसून राहिली.
बाबा कमिशनर ऑफीसला आहेत आणि उद्या सकाळी येणार याचा अर्थ तिला व्यवस्थित समजला. चौकशी! त्यांची स्वतःचीच चौकशी चाललेली असणार होती. का??? कशासाठी? अचानक काय झाले? काही आपल्या आणि उमेशच्याच संबंधात असेल का? आणि आपण लगेच पुण्याला निघून यावे यासाठी आई मावशीच्या जवळच्या दुकानात फोन करेल का? आपण धुळ्याला पोचलोच नाही आहोत हे तिला समजेल का? 'सांगण्यासारखे नाही' असे मोरेकाका का म्हणाले? आणि आता आपण काय करायचे? धुळ्याच्या मावशीला फोन करून सांगायचे का की गाडी खराब झाल्यामुळे लेट होत आहे आणि माझी मैत्रीण नाशिकलाच असल्याने मी तिच्याकडे राहात आहे असे? मग मोरेकाका बाबांना आपण धुळ्याला पोचल्याचे सांगतील त्याचे काय?
अत्यंत हेल्पलेस परिस्थिती होती ती! तशीच अंधारातून चालत चालत रास्ते वाड्याकडे निघाली आणि तेथे एका उंचवट्यावर, कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने बसून राहिली. त्या उंचवट्यावरून रास्ते वाड्याचे प्रवेशद्वार सहज दिसत होते. बाकी काहीही हालचाल दिसत नव्हती. तब्बल दोन तासात उमेशच काय पण राईलकरांकडचे कोणीही दिसले नव्हते.
आणि..... अत्यंत अवघडलेल्या शरीराने बसून राहिलेली असताना... पावणे अकरा वाजता तिला एक अत्यंत विचित्र दृष्य दिसले... जे पाहून तिचा श्वासच अडकला... बसल्या जागी स्तब्ध झालेल्या निवेदिताला....
.... त्या दृष्याचा काहीही अर्थ समजत नव्हता...
=======================================
"येड्या कधी वाटलं तरी होतं का बे आपण इथे येऊन असे राहू असे??"
राहुल्याने विन्याला विचारले तसे तिघे खदाखदा हासले. आप्पा, विन्या आणि राहुल धुळे एस्टी स्थानकाबाहेर असलेल्या एका अत्यंत स्वस्त लॉजमध्ये अस्ताव्यस्त पहुडलेले होते. रात्रीचे म्हणजे पहाटेचे अडीच वाजलेले होते. सकाळी उठून काय करायचे हे व्यवस्थित ठरलेले असल्यामुळे तिघेही निवांत गप्पा मारत काही वेळाने झोपून जाणार होते. साडे सात वाजता पुन्हा बस स्टॅन्डवर उभे राहायचे आणि पुण्याहून रात्री निघालेल्या बसमधून उतरणार्या उम्याला लॉजवर घेऊन यायचे हे त्यांचे ठरलेले होते. त्यामुळे आता कसलेच टेन्शन नव्हते व त्याचा परिणाम त्यांच्या वागण्यावर झालेला होता. घरापासून इतक्या दूर असल्याने कसलीच बंधने राहिलेली नव्हती. बरेच दिवसांनी एक बाटली फुटली होती रामप्रहरी!
विन्याला किक बसली तसा उठून उभा राहिला आणि नितुच्या वडिलांना उमेश कसा बोलेल याची नक्कल करत म्हणाला..
"मला माहितीय काका तुम्ही पोलिस आहात... पण मी मजनू आहे... ही माझी लैला आहे... मी शिरीन... नाय नाय मी फरहाद आहे... ही शिरीन आहे... मी... मी तो हा आहे... कोण तो?? परवाना परवाना... ही माझी शम्मा आहे... जुनैद अख्तर आमच्या लग्नाचा साक्षीदार आहे.. तुमच्या पोरीचा हात माझ्या हातात देऊन रिटायर्ड व्हा काका... प्रेम हा कायद्याच्या कक्षेत येणारा गुन्हा नसून प्रेम हे एक अजरामर सत्य आहे"
"फक्त मला नोकरी नाही आणि हनीमूनला काय करतात ते माहीत नाही" - आप्पा
रूममध्ये हास्यस्फोट झाला तसा राहुल म्हणाला..
"बाबा... मै इस लडकेसे शादी नही करुंगी... इसे तो कुछ मालूमही नही................ है..."
'नही' आणि 'है' यात अंतर पडण्याचे कारण म्हणजे रूमचे दार वाजले होते.
"क्या हुवा??" विन्याने दार उघडत विचारले.
"क्या हुवा क्या , क्या हुवा??? तीन बजनेको आये है... बाकी गिर्हाईकको सोनेका नही है क्या??"
"हां हां... सॉरी.. सो रहे है अब... "
"आप्पा कौन है आप्पा??"
"हां... मी आप्पा आहे..."
"तुम्हारे वास्ते फोन था कोई उम्या करके... "
खाडकन उतरली तिघांची! राहुल्याने पुढे येत विचारले...
"काय म्हणाला उम्या फोनवर???"
"वो नही आ रहा है इधर करके बोला... "
नवीनच धक्का बसला.
"क्युं????"
"कोई बडा लफडा होगयेला है कहरहा था पूनामे... "
पायाखालची जमीनच सरकली.
विन्या आणि राहुल्याला बाजूला करत पुढे होत आप्पाने विचारले...
"कसलं लफडं??"
लॉजवाला अव्याहत दहा मिनिटे बोलत होता. कोणीही एक अक्षरही उच्चारत नव्हते. आणि लॉजवाला निरोप सांगून निघून गेला तेव्हा..........
........ पूर्णपणे अवाक झालेल्या तिघांची पूर्णपणे उतरलेली होती....
================================
"रेवती.... वेड लागलंय का तुला??? कसल्या जागी नेतीयस मला??"
क्षमाच्या या प्रश्नावर रेवती कशीशी हासली. मनात अत्यंत उलथापालथ होत असताना माणूस ते वरवर दाखवणार नाही अशा पद्धतीचे हावभाव होते रेवतीचे!
डाव्या हातात क्षमाचा हात आणि उजव्या हातात स्वतःची पर्स धरून रेवती अबोल मात्र ठाम व ताणयुक्त चेहर्याने संभाजी बागेतल्या त्या घनदाट झाडी व बराचसा अंधार असलेल्या कोपर्यात गेली. खरे तर अजिबात तेथे जावेसे वाटत नव्हते. एक तर तिथे जाऊन गप्पा मारायला बसण्यासारखे काही झालेले नव्हते तिच्याही किंवा रेवतीच्याही आयुष्यात! अत्यंत खासगी स्वरुपाचा तो स्पॉट क्षमाने नेहमीच खूप लांबून फक्त पाहिलेला होता. आणि त्या स्पॉटच्या जवळ जाताना रेवती अचानक अबोल झाली हे तिला काहीसे सूचक वाटत असले आणि खरोखरच काढता पाय घ्यावासा वाटत असला तरीही आता पळून जाणे प्रशस्तही दिसणार नव्हते आणि ते शक्यही नव्हते कारण रेवतीचा आजवर आलेला अनुभव ठीकठाकच होता, त्यात वावगे काहीच नव्हते.
मात्र! ........ मात्र....
त्या स्पॉटच्या अगदी प्रवेशापाशी रेवती एकदम थबकली. क्षमाला आपला हात तिच्या ज्या हातात आहे तो हात घामाने भिजल्याचे जाणवले. ती थबकली तशी क्षमाही आपोआपच थबकली व रेवतीकडे पाहू लागली.
लहान मुलीसारखे रेवतीच्या डोळ्यात पाणी आलेले होते. चक्क गालांवरून दोन सरी ओघळल्या होत्या. क्षमाने काही विचारायच्या आतच रेवती एकदम बोलून गेली.
"तुला फसवणार होते ते... माझ्या वडिलांना धमकी देऊन मला हे काम करायला सांगितले... पण... पण मी सगळी व्यवस्था केली आहे अक्षू.... खुशाल जा आत"
क्षमाला मैत्रिणी 'अक्षू' म्हणायच्या. रेवतीने अक्षरशः तिला ढकललेच. पळून जाण्याचा विचार व्हायच्या आतच....
..... क्षमाला दोन मुलांनी पकडले... आणि त्यातला एक मुलगा तिला छेडू लागला... पण..
..... दोन्ही मुलांनी अचानक फटकेच खायला सुरुवात केली...
उमेशच्या त्या होस्टेलवरच्या तीन मित्रांपैकी दोघे त्या मुलांना पिटत होते... आणि क्षमा उमेशच्या मिठीत जाऊन हमसून हमसून रडत होती... रेवती काही अंतरावर तशीच रडत होती... गलका वाढू लागला तशी संभाजी पार्कातली काही माणसे त्या स्पॉटकडे सरकू लागली... तसे मात्र उमेशने क्षमा आणि रेवतीला तातडीने बागेच्या बाहेर निघून जायला सांगितले... आणि त्याच्या तिसर्या मित्राने तोवर एका वेगळ्याच मुलाला पकडून आणले होते...
त्या मुला पाहताच उमेश त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला... त्या मुलाचा कॅमेरा एका मित्राने हिसकावून घेतला होता...
सब इन्स्पेक्टर आपटेंचा हीन प्लॅन केवळ तीन ते चार मिनिटांमध्ये धुळीला मिळाला होता... रेवतीने उमेशला भेटून सगळे सांगून ठेवलेले होते आधीच!
... पण ही प्रकरणाची समाप्ती नव्हती... उमेशने सरळ डेक्कन पोलीस स्टेशनला तक्रारच नोंदवली.... आणि तीही कुणाची?? तर आपटेंचीच....
संभाजी पार्क शिवाजीनगरच्या अंडर येते हे कुणीतरी म्हणाल्यावर उमेशने निराळाच अवतार धारण केला...
"मी काय शिवाजीनगरला जाऊन त्या आपट्यांनाच सांगू काय की तुमच्या विरुद्ध तक्रार नोंदवून घ्या म्हणून???"
हा प्रश्न मात्र सुयोग्य होता. अचानक सूत्र वेगात हलू लागली. कॅमेरावाला आणि उरलेल्या दोघांपैकी एक असे दोघांना या चौघांनी पकडून चौकीवर नेलेले होते. तिसरा मुलगा पळून गेलेला होता. मात्र या दोघांनी सरळ सांगितले की पक्या नावाच्या खबर्याने त्यांना ही कामगिरी सांगितली होती. पक्या कोण आहे हे डेक्कनवर सगळ्यांनच माहीत होते आणि आपटेंची इन्व्हॉल्व्हमेन्ट नाकारणे शक्यच नव्हते. केवळ एका तासाच्या आत पक्या आला आणि खबरी असूनही त्याने फटके खाल्ले व शेवटी मान्य केले की डिपार्टमेन्टकडूनच ही ऑर्डर मिळाली होती.
आपटे वॉज कॉल्ड अॅट कमिशनर ऑफीस... द व्हेरी सेम मोमेन्ट!
प्रकरण कोणत्या दिशेने जाणार याची खुद्द वरिष्ठांनाही कल्पना नव्हती... मात्र एक निश्चीत होते... ते म्हणजे आपट्यांच्या नोकरीचे आता काही खरे नव्हते...
इकडे बातमी कळली तसे रास्ते वाड्यातले अनेक लोक राईलकरांबरोबर तिकडे पोचले... त्यात आजोबाही होते... पण केवळ आपटेवर एक सूड उगवता येतो म्हणून हवे ते बोलून घ्यायचे असे त्यांनी केले नाही... उमेश मात्र तोंडाचा पट्ता सोडून वाट्टेल ते बोलत होता म्हणून त्याला स्टाफनेच गप्प केला... नितुच्या आईची रडून रडून वाईट परिस्थिती झालेली होती...
घडलेल्या प्रकारात एक नुकताच 'अंजुमे इस्लाम' संदर्भात पकडला गेलेला व नंतर सहिसलामत सुटलेला आरोपी असला तरी या प्रकरणात त्याचा समावेश केवळ आणि केवळ गुन्हेगार पकडुन देण्यापुरताच होता. त्यामुळे त्याची केवळ दोन तास चौकशी झाली इतकेच! दहाच्या सुमारास उमेश आणि क्षमाला सोडून देण्यात आले तरीही सगळे तिथेच थांबले. इकडे नितुची आई सारखी शिवाजीनगरला फोन करून नितु पोचली आहे का हे विचारत होती आणि शेवटि साडे आठ पावणे नऊला नितु धुळ्याला पोचल्याचा निरोप कळाला. सुटकेचा श्वास घेत आता नितुची आई पूर्ण लक्ष नवर्याच्या चाललेल्या चौकशीकडे व बनत असलेल्या कागदपत्रांच्या गांभीर्याकडे पुरवू लागली व सव्वा दहाच्या सुमारास तिला समजले की आपला नवरा चांगलाच अडकला आहे. त्याचवेळेस तिथे थांबलेले राईलकर कुटुंब घरी निघून गेल्याचे समजताच ती रडत रडत चालतच रास्ते वाड्यात पोचली.
उमेशच्या आईसमोर पदर पसरत म्हणाली...
"आमची एक चूक पदरात घ्या... क्षमाला सांगा सांगायला... की त्या मुलांची तिने खोटीच तक्रार केली... आम्ही पैसे देऊ... काय हवे ते करू... पण.. एवढी एक चूक पदरात घ्या... तुमच्यासारखीच आम्हालाही लग्नाची मुलगी आहे.. भावना समजून घ्या... ह्यांची खूप मोठी चूक झाली रागाच्या भरात... आमच्या मुलीची बदनामी झाली म्हणून ते एवढे चिडले... आम्ही कधीच असे करणार नाही नाहीतर... मी माफी मागते... तुमच्या मुलीला पाठवून तेवढे करा... "
स्तब्धपणे उमेश, क्षमा, रेवती, उमेशची आई आणि उमेशचे बाबा... तसाच अख्खा रास्ते वाडा ... आणि....
..... आणि एका अंधारलेल्या कोपर्यातून... निवेदिता आपटे...
.... सगळेजण चक्रावून नितुच्या आईकडे पाहात होते... तेव्हा... कोणालाही कल्पना नसताना आजोबा क्षमाला म्हणाले...
"जा बेटा... खोटी तक्रार होती असे सांगून ये... "
आजोबांच्या पायावर आसवांचा अभिषेक घालून निवेदिताची आई क्षमाच्या आणि तिच्या आई बाबांच्या मागोमाग रास्ते वाड्याबाहेर पडत होती तेव्हा...
... उमेश चक्रावून आजोबांकडे पाहात होता..... आणि....
नितुचा आईलाच नव्हे तर कोणालाही कसलीही कल्पना नसताना... अत्यंत धक्कादायक पद्धतीने समोर येऊन..
..... निवेदिता स्वतःच्या आईसमोर उभी राहून विचारत होती...
"काय केले बाबांनी???????"
त्या धक्याने उद्ध्वस्त झालेल्या नितुच्या आईने नितुच्या कानफडात वाजवल्याचा आवाज सगळ्यांच्या कानातून घुमून नष्ट व्हायच्या आधीच उमेश तिथे पोचला आणि संतापाने थरथरत नितुच्या आईला म्हणाला...
"निवेदिताला मारलंत तर खबरदार, नितु.... चल घरी"
मी पहीली........ मस्तच भाग
मी पहीली........ मस्तच भाग
झकास्....climax मस्त्...love
झकास्....climax मस्त्...love it...वाटतय कि सिनेमा बघतिये...
मस्त आहे हा भाग.. सही
मस्त आहे हा भाग..
सही उम्या.....
अरे वा.........चला एक दडपण
अरे वा.........चला एक दडपण कमी झाले....उगाच क्षमाचे काही बरे वाईट झाले नाही......निष्पाप मुलांचे वाईट होउ नये........
अरे वा.........चला एक दडपण
अरे वा.........चला एक दडपण कमी झाले....उगाच क्षमाचे काही बरे वाईट झाले नाही......निष्पाप मुलांचे वाईट होउ नये........
आवडला हा भागही..
आवडला हा भागही..
जबरदस्त . . .लेखन. तुम्हाला
जबरदस्त . . .लेखन.
तुम्हाला हे सगळं कसं काय सुचतं . . .?
अजून किती उलथापालथ घडवून आणणार आहात.
इथून पुढील भागांस वेळ लावू नका. प्लीज लवकर लिहा.
मन शांत झाल. प्लिझ आता वेळ
मन शांत झाल.
प्लिझ आता वेळ नका लाऊ पुढील भागाला//////////////////////////............
पुढचा भाग लवकर येउ देत.
पुढचा भाग लवकर येउ देत.
मस्तच झालाय हा भाग, बेफिकीर
मस्तच झालाय हा भाग, बेफिकीर
(No subject)
बरे वाटले बेफिकीर!
बरे वाटले बेफिकीर!
Please post next part
Please post next part early.
We are waiting for it ........
बेफिकीर, >> पन्नास पैसे टाकून
बेफिकीर,
>> पन्नास पैसे टाकून नंबर फिरवला.
अगदी बरोबर! इ.स. १९८६ साली ५० पैश्यात ३ मिनिटांचा कॉल लागत असे. बरं लक्षात आहे तुमच्या!
सस्पेन्स जबर्या जमलाय!
आ.न.,
-गा.पै.
खुपच छान !!
खुपच छान !!
प्रसंग छान जुळवलेत
प्रसंग छान जुळवलेत भूषणराव.......
अभिनंदन!!!