तुंदिलतनु तरी... - साजिरा

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 04:41

पहिल्यांदा घरात गणपती बसवायचा हट्ट धरला तेव्हा आम्ही भावंडं सात-आठ वर्षांची असू. त्या आधी का कुणास ठाऊक, पण आमच्या घरात गणपती बसवण्याची प्रथा नव्हती. दादांनी या गोष्टीला आधी नाही म्हणून पाहिलं. त्यामागचं कारणही तसंच होतं.

ब्राह्मणगावात मातीचे किल्ले वगैरे दिवाळीत न बनवता गणेशोत्सवात बनवत. तेही फक्त किल्लेच नाही, तर जमेल ते सारं. रस्ते, पूल, तळी, डोंगर, झाडी, जंगल, इमारती, शाळा, मैदानं... घरात असलेल्या जागेचा अंदाज घेऊन हे जमेल तेवढं केलं जाई. बरं, गावातल्या घरांत 'गणपती बसवण्यासाठी' म्हणून अशा काही खास जागा नसायच्या. एखाद्या फडताळात, पुस्तकं तात्पुरती बाजूला करून त्या जागेत, खुर्चीवर, स्टूलावर, टेबलावर, स्वयंपाकघरात पाटावर-चौरंगावर, इतकेच काय पण भांड्यांच्या लोखंडी मांडणीवरले दोन-तीन डबे तात्पुरते बाजूला करून ढेरपोट्या बाप्पाला जागा केली जाई. शेतकर्‍यांच्या घरात तर इतक्या जागेचाही प्रश्न. कारण बघावे तिकडे धान्याची पोती, अवजारं नि काय काय. मग कपडे, मुंडासे, उपरणे, टोप्या टांगायच्या दोन खुंट्यांवर आडवी फळी टाकून तितक्या उंचीवर बाप्पा विराजमान होत. मग आरती, पूजा करायची असली, की स्टूलावर, पोत्यांवर उभं राहायचं.

आता हे जमेल तिथं, छोट्या जागेत का होईना, बाप्पाला आणायचाच या पोरांच्या हट्टामागे काही फार मोठी भक्तीबिक्ती नसायची. बाप्पाच्या भोवतालची आरास, रोज मिळणारा प्रसाद, गावभर हिंडत सार्‍या बाप्पांच्या आरत्या करत सार्‍यांचे घरचे प्रसाद आणि विसर्जनाच्या दिवशी मनसोक्त धांगडधिंगा इत्यादी आकर्षणे असायचीच.

पण मुख्य आकर्षण म्हणजे बाप्पाच्या भोवतालची- किल्ले, डोंगर, घरे, रस्ते, तळी, पूल यांची मातीची मिनिएचर्स आणि मग खेळण्या, सजावटीचे, सैनिक, दिवे इ. इतर सजावटीचे सामान. या सार्‍यापोटी घरात जो चिखलाचा राडा व्हायचा, त्यापोटी घरातली मोठी माणसं अक्षरशः करवादून जायची. एकतर गावच्या शिवारातली सारी शेतं काळ्याभोर चिकट मातीची, आणि गणपतीसाठी तिथूनच पोती-गोण्या-बारदानं भरभरून माती आणली जायची. पाऊस चालू असला तर अर्थातच चिखल भरून आणायचा. या चिकटमऊ काळ्याभोर चिखलाने मुलं आपले कपडे नि सारं अंग तर माखून घ्यायचीच, पण घरात ठिकठिकाणी फासलेला चिखल काढता काढता घरातल्या बायकांच्या तोंडाला फेस यायचा.

दादांनी 'नाही' म्हणायचं हे मुख्य कारण होतं. गणपती बसवायचाच तर छान चौरंगावर बसवा, फुलापानांची आरास करा, पूजा-आरती-उदबत्ती-कलश-नारळ-नैवेद्य सारं नीट करा, हवाय कशाला चिखल नि डोंगर गणपतीला?- या मुद्द्यावर ते अडून राहिले. या अशा गणपती बसवण्यात आम्हाला एक नैवेद्य सोडला, तर काडीचीही मजा वाटण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे असा गणपती तुम्हीच बसवा नि तुम्हीच करा पूजा-आरत्या- असंही आम्ही रुसून म्हणून पाहिलं. पण दादा ढिम्म हालेनात.

बरेच सवालजवाब पार पडल्यावर मग अशा वेळी कधीतरी मदत करणारं आईचं राखीव सैन्य आमच्या मदतीस आलं. मग दादांचा नाईलाज झाला. आणि झालंच. ओसरीतले एक फूट बाय तीन फूट बाय तीन फूट उंचीच्या आकाराचं पुस्तकांचं सानं- ही बाप्पाची जागा ठरली. गणपती यायला दोनेक दिवस बाकी असताना आम्ही बर्‍या-फाटक्या पिशव्या-गोणपाटं घेऊन शेतात सुसाट.

आता शेतंशिवारं तुडवत दुरून इतकी माती आणायचं एकट्यादुकट्याचं काम आहे होय? इतरांना मदतीला घ्यावंच लागे. त्यांना मदतीला घ्यायचं म्हणजे त्यांचीही माती आणायला मदत करायची, असा सरळ अर्थ. थोडक्यात एक संपूर्ण दिवस हे सहकार धोरण राबवून माती आणायचं काम चालायचं. यात बार्टर सिस्टिमही चालायची. म्हणजे एखाद्याला आपल्या मागल्या वर्षाच्या खेळणी, कारंजे, सैनिक, बाहुल्या, गाड्या इत्यादी वस्तू देऊन त्याच्याकडून आपल्या बाप्पासाठी माती आणवून घ्यायची, किंवा याच्या उलट.
माती-ढेकळं तर आणून झाली, पण त्यापुढलं आम्हाला काहीच येत नव्हतं. पुन्हा दादांना साकडं. त्यांच्या आधीच्या 'नाही' म्हणण्यामागे याही गोष्टीची भीती होतीच. पण आता इलाज नव्हता. मग आयुष्यात पहिल्यांदाच दादा गणपतीच्या सजावटीसाठी बाह्या सरसावून चिखल कालवायला बसले.

आम्ही नवल बघितल्यागत दादांची कारागिरी बघत राहिलो. आणि धापा टाकत, जिभेने ओठ ओले करत, घामाघूम होत थोड्याच वेळात दादांनी त्या चिखलाचे जे काय केले ते बघून आम्ही तोंडात बोटे घातली आणि आईने खोखो हसायला जे चालू केले ते तिच्या डोळ्यांत पाणी आलं तरी थांबेना.

सान्याच्या दोन बाजूला दोन असे, इजिप्तच्या पिरॅमिडसारखे सरळसोट उभे, एकदम घासून पुन्हा पुन्हा पाण्याचे हात फिरवून सारे पृष्ठभाग गुळगुळीत केलेले आणि सार्‍या कडा बरोबर एकसारख्या- एकाच लांबीच्या आणि अत्यंत प्रमाणबद्ध असलेले असे 'डोंगर' दादांनी तयार केले होते. दादा त्यावेळी दहावीला भूमिती शिकवत असत, पण ती त्यांच्या इतकी मनात रुतली असेल असं वाटलं नव्हतं.

'तुमच्या लहानपणी तुमच्या मामाच्या गावाला असतील असे डोंगर, नाही?' असं शेवटी हसू दाबत आईने विचारलं तेव्हा चिखलाने बरबटलेले हात घेऊन दादा रागारागाने आलटूनपालटून सार्‍यांकडे बघू लागले.
शेवटी वामन पुंडलिकांच्या दहावीतल्या सुदाम्याला आईने बोलावणं धाडलं. त्याच्या रांगड्या हातांनी त्याने त्या पिरॅमिडांचं रूप पालटून खरेखुरे वाटतील, असे वेडेवाकड्या खड्ड्या-उंचवट्यांवाले डोंगर तयार केले. दादा त्यांकडे बघत म्हणाले, मला खरं तर असलेच डोंगर बनवायचे होते.

पुन्हा हसू दाबत आईने आत जाऊन सुदाम्याला खाऊ दिला. तो खाऊन झाल्यावर शेवटी जाताना दादांकडे पाहून तो जणू म्हणत होता- तुम्ही आम्हाला भूमिती नि त्रिकोणमिती शिकवता म्हणून काय झालं? आम्हीही तुम्हाला काहीतरी शिकवलंच की नाही?

आम्ही मग त्या डोंगरावर गहू पेरले. सैनिकांच्या टेहळणीची ठाणी बनवली. एक छोटं तळं बनवलं. फेकून दिलेल्या सलाईनची बाटली, नळी नि सुई वापरून कारंजे तयार केलं. ते पाणी एका छोट्याशा बाहुलीवर पाडून ती गोलगोल फिरत राहील अशी व्यवस्था केली. दोन्ही डोंगरांदरम्यान रस्ते, पूल तयार केले. त्यांवर प्लॅस्टिकच्या गाड्याही ठेवल्या. रस्त्याच्या कडेला कडब्याच्या टुश्शापासून बनवलेले पथदिवे लावले. टुश्शापासूनच बनवलेल्या बैलगाड्याही ठेवल्या. मातीचे वेडेवाकडे पण गोड असे चिमुकले बैलही त्या गाड्यांना जोडले. इतकंच काय, पण गवत कापून त्या बैलांना टाकलं. त्यांच्या पाण्याचीही व्यवस्था केली. सरमटाच्या काड्यांची वीण तयार करून एक झ्याप म्हणजे झोपडी बनवली. त्याच्या अंगणात एक प्लॅस्टिकचा शेतकरी ठेवला.

दोन दिवसांत पेरलेले गहू उगवले तसे डोंगर घनदाट जंगलाने, आणि खालचं मैदान पिकांनी लगडल्यागत दिसू लागलं. मग अचानक प्लॅस्टिकच्या शेतकर्‍याच्या मुखावर समाधान दिसू लागलं. निरांजन ठेवण्याची जागा त्याच्या जवळच असल्याने आरती झाल्यावर तर तो शेतकरी जास्तच समाधानी दिसू लागला. आणि हे सारे बघून आमच्या बाप्पाचंही पोट गच्च भरल्यागत जास्त गोल, मोठं आणि तेजस्वी दिसू लागलं. त्या वाळत चाललेल्या चिखलाचा, कडब्या-टुश्शांचा, नव्याने उगवलेल्या गव्हांकुरांचा आणि गवताचा, तुपानिरांजनाचा, नैवेद्याचा असा एकत्रित वास मग तिथं जो तयार झाला होता, आणि नंतर दहा दिवस येत होता- तो अजूनही नाका-छातीत भरून राहिला आहे.

***

वयाने जरा मोठ्या असलेल्या मुलांना ओसरीच्या बाहेरच्या पडवीत, ओट्यावर गणपती बसवायची परवानगी मिळायची. तर काहींना घराच्या बाहेर, अंगणात ऐसपैस जागा मिळायची. पण हे एकंदरच प्रकरण जरा मोठं असायचं. सार्वजनिक गणपतीतल्यासारखे खूप मोठी माणसं, भरपूर कार्यकर्ते इथे नसायचे. कितीही म्हटलं तरी खाजगी गणपती. फार तर वाड्यातला गणपती. सारं काही पोरांनीच करायचं. पाऊस-ऊन-वार्‍यापासून बाप्पाचं संरक्षण व्हावं म्हणून शेड करावं लागायचं. मग वापरलेली संपुटं, फळ्या वापरून बांबू-टोकरांनी आणि काथ्याच्या दोरीने मंच तयार करणं, त्याला फळ्या वापरून भक्कम पायर्‍या करणं, पडदे लावून मग सुशोभीकरण इत्यादी. हाही खरं तर घरच्यांना ताप व्हायचाच. या लागणार्‍या सार्‍या वस्तू सहज मिळाल्या नाहीत, तर मोठ्या माणसांकडे लकडा. मोठा गणपती, मोठी जागा, त्यामुळे दिवसभर पोरांचा धिंगाणा दाराशी. अर्थात काही कुटुंबे ही सारी मदत रस घेऊन करायचीही.

गावातल्या अहिरेवाड्यातली आणि मालजीवाड्यातली सारी पोरं आठवी-नववी-दहावीतली होती. दोन्ही वाड्यांतली पोरं एकमेकांशी खुन्नस ठेवून. मागल्या वर्षी मालजीवाड्याने केलेल्या मस्त सजावटीला उत्तर म्हणून या वर्षी अहिरेवाड्याने आठ दिवस आधीच भव्य मंचाची तयारी केली. त्यांनी बैलगाड्याच्या गाड्या भरून माती आणवली तशी मालजीवाड्यात चलबिचल वाढली. मग आम्हां बारक्या पोरांना हेर नेमण्यात आले. अहिरेवाड्यात काय चाल्लंय, याची बित्तंबातमी तासातासाला मालज्यांकडे जाऊ लागली. अहिर्‍यांनी एका बाजूला भव्य हिमालय (बहुधा कैलास पर्वत असावा), त्यावर शंकराची पिंड, मग डोंगरावर दोन-तीन फूट वाढलेली, शेतातून आणलेली खरीखुरी वाढलेली रोपटी नि झाडे, तर दुसर्‍या बाजूला एका टेकडीच्या पायथ्याचं गाव, घरं, रस्ते, तळं, पूल, कारंजे, सैन्य, जनावरं, मळेखळे असं साग्रसंगीत तयार केलं. हा सारा देखावा बघून पोरं तर सोडाच पण मोठी माणसं खूश झाली. जिकडे तिकडे याची चर्चा होऊन अहिरेवाड्याला शाबासक्या मिळू लागल्या, तशी मालज्यांची गुप्त खलबतं वाढली. अहिरेवाड्याला सडेतोड उत्तर म्हणून काय करावं यावर प्रचंड खडाजंगी झाली.

मग मालजीवाड्याच्या जागेत कडेकोट बंदोबस्तात काम सुरू झालं. चारही बाजूला पडदे लावण्यात आले. सजावटीचं काम पूर्ण होईतो कुणाला समजू नये, म्हणून त्यांची पोरं संरक्षणासाठी चारही बाजूला तैनात करण्यात आली. पण तरी माझ्यासकट आणखी काहींना मुक्त प्रवेश होताच.

अहिरेवाडा पुन्हा चिंतेत पडला. शत्रुपक्षाचं काहीतरी भव्यदिव्य चाललेलं आहे, या शंकेने त्यांना ग्रासलं. अहिर्‍यांच्या मध्यानं मग आम्हाला कोपर्‍यात घेतलं आणि मालज्यांच्या कामाचे डिटेल्स शोधायची मोहीम सोपवली.

आता आम्हाला नीट कळलं, की आमची गोची झाली आहे. मालज्यांसाठी आधीच हेरगिरी आम्ही करून बसलो होतो. आता त्या रानदांडग्या मध्या अहिरेला हे सांगतो, तर त्याने अफाट बुकलला असता. आम्ही मोकाट कान पाडून मध्याचं काम स्वीकारलं. मालज्यांचं काय चाललं आहे, ते त्यांना आमच्याकडून कळलं, तेव्हा पुन्हा अहिरेवाड्याच्या चर्चा-हालचाली वाढल्या- त्या अर्थातच आम्हां बारक्या हेरांना वगळून.

गणपती यायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मालजीवाड्याने पडदे वर केले, तेव्हा सार्‍यांनी तोंडात बोटं घातली. सार्‍यांचे डोळे विस्फारले. डेकोरेशन बघायला गर्दी लोटली. मालजीच्या पोरांनी देखावाच तसा जबरदस्त केला होता. त्यांनी गुप्तपणे कुठून तरी हजारो बियरच्या बाटल्या पैदा केल्या होत्या. त्या एकाला एक अशा कसल्या तरी घट्ट गोंदाने चिकटवून भव्य महाल तयार केला होता. त्याला मनोरे, बुरूज, नक्षीदार खिडक्या सारे सारे होते. आणि सर्वांत कळस म्हणजे प्रत्येक बाटलीत एक असे सार्‍या हजारो बाटल्यांत विजेचे हजारो रंगीबेरंगी दिवे सोडले होते. रात्रीच्या वेळी ही रोषणाई बघून सार्‍यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं.

पण अहिरेवाड्यातल्या पोरांनी त्यांचे काम बरोबर केलं होतं. थोड्याच वेळात सरपंच राघोनाना आले आणि त्यांनी तोंडाचा पट्टा सोडला. 'दारूच्या बाटल्यांत देवाला बसवता होय रे भडव्याहो!' असं ओरडून हाताला सापडेल त्याची कानशिलं फोडली. झालं. रातोरात या सार्‍या बाटल्या गावाबाहेर एका भंगारवाल्याला देण्यात आल्या.

दुसर्‍या दिवशी केळीचे खांब, पानं, फुलं यांची जमेल तशी ऐनवेळेला आरास करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आमच्या हेरगिरीची बातमी मग फुटलीच. 'राघोनानांना कधीतरी कळलंच असतं की' या आमच्या युक्तिवादाला न जुमानता मालजीवाड्यातल्या दोनतीन दांडग्यांनी चिडून आम्हाला धोपटून काढलं.

दुसर्‍या दिवशी गणपती आले. मध्या अहिरेने आम्हाला ताटली भरून भरपूर शिरा-पेढ्यांचा प्रसाद दिला. पण मी मात्र तोंड एवढेसे करून बसलो होतो, कारण मालजीवाड्यातला अपमान मला विसरता येईना. मध्याची धाकटी बहीण रेखी तिचे मोठे डोळे आणखी मोठे करत जवळ येऊन म्हणाली- 'बाकीच्यांचं जाऊ दे. पण तुझ्यासारख्याने कशाला यांच्या नादी लागावे? तू आता पौर्णिमेला गुलाबाईच्या वेळी माझ्या नैवेद्याच्या ताटापाटामागे उभे राहायचेस. माझ्या गुलाबाईचा प्रसाद पण तूच वाटायचास. हं?'

मला तेव्हा भारीच मस्त वाटलं. झालेला अपमान जरा विसरल्यागत झालं. होकारार्थी मान डोलवत, तिच्या डोळ्यांत बघत पेढा खात असताना तिने झटक्यात वेणीचा शेपटा मागे फेकला, आणि वळून गणपतीकडे बघत म्हणाली, 'ढेरपोट्या कुठचा. दहा दिवस यावं, गप्प आनंदात वाजतगाजत निघून जावं, तर ते नाही. दिसतो असा भोळासुंदर, पण कलागती केवढ्या लावतो पोरांमध्ये!'

***

पुढल्या वर्षी राघोनानांनी जाहीर करून टाकलं- वाड्यांतले आणि मंडळांचेही गणपती गावात चालणार नाहीत. ग्रामपंचायत आणि राममंदिर यांच्यामधल्या पिंपळाच्या भल्या मोठ्या पारावर एकच 'गावगणपती' बसवायचा. सार्‍या पोरांनी आणि मंडळांनी भांडणं विसरून तिथं एकत्र काम करायचं, रोज नवनवे कार्यक्रम करायचे, वर्गणी गोळा करायची- वगैरे.

पोरं खट्टू झाली, पण पोरांच्या दरसालच्या उपद्व्यापांनी वैतागलेल्या लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. लहाने आळीतल्या पोरांनी मात्र असहकार पुकारला. तिथले विष्णुपंत हे राघोनानांचे राजकारणातले विरोधक, त्यामुळे हे साहजिकच होतं. खबरदारीचा उपाय म्हणून राममंदिराभोवती घिरट्या घालणारं सुरक्षापथक तयार करण्यात आलं.

या सुरक्षापथकात 'बागलाणमित्रा' नावाचा अजब माणूस होता. हे नाव त्याला कसं पडलं, ठाऊक नाही. याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं सारं गाव म्हणायचं. हा पन्नासेक वर्षांचा सडाफटिंग माणूस. कुठचेही पाश नसलेला. बायको याला सोडून कुठेतरी निघून गेल्याने हा वेडा झाला असावा. पण हा वेडा होता म्हणून बायको सोडून गेली, असंही काही लोक म्हणत. पांढरा कुर्ता-पायजमा, पूर्ण पांढरे झालेले आणि विस्कटलेले डोक्याचे आणि दाढीचे केस- अशा अवतारात गावभर फिरत असे. खांद्यावर एक नॉयलॉनची पिशवी. तित जुनीपानी वर्तमानपत्रं, फाटकी पुस्तकं, एक मोठा रुमाल, त्याची खूप वर्षांपुर्वीची कळकट डायरी आणि किडूकमिडूक सामान.

बागलाणमित्राला कुणाचंही घर वर्ज्य नव्हतं. भिल्लांच्या झोपड्यांत ज्या ऐसपैसपणे तो बसायचा त्याच हक्काने राघोनानांच्या, विष्णुपंतांच्या, अमृतअण्णांच्या, हेडमास्तरांच्या घरी आणि चावडीत, पंचायतीतही तो बसे, वावरे. शिवाय कुठच्याही कामाची लाज नाही. सोसायट्यांच्या मीटिंगांत चहा वाटण्यापासून पोरांना पतंग तयार करून देण्यापर्यंत काहीही तो दिवसभर करत असायचा. त्याचा आवाजही वैशिष्ट्यपूर्ण होता. खर्जातला, जाडाभरडा. खूप लहान मुलांना घाबरवण्यासाठी, दमदाटी करण्यासाठी गावातल्या आया त्याचा वापर करून घेत. 'माझा आवाज असा नव्हता, पण बायकोशी एकदा भांडण झालं आणि प्रचंड आरडाओरडा केला, तेव्हापासून माझा घसा जो बसला, तो नंतर कधीच उठला नाही', असं तो स्वतःच सांगे. आमच्यासारख्या थोड्या मोठ्या मुलांना मात्र तो आवडे, कारण गोष्टी सांगण्यासाठी ते आमचं हक्काचं गिर्‍हाईक. आमच्यापेक्षा मोठी मुलं आणि काही माणसं मात्र त्याची सतत हेटाळणी करत, ते आम्हाला आवडत नसे. त्याला मात्र काही फरक पडत नसे. याला दारूचंही व्यसन होतंच. पण दारू पिऊन गोंधळ करणं, झिंगत फिरणं हे त्याने कधीच केलं नाही.

'गावगणपती' हे आपलं काम, या भावनेनं बागलाणमित्रा निष्ठेने तिथं राबू लागला. सारी कष्टाची, सजावटीची आणि पडतील ती कामं त्याने केली. गणपती बसल्यावर राखणीसाठी म्हणून तिथंच झोपू लागला.

मग दोन-तीन दिवसांनी एक घटना उघडकीस आली. दोन वर्षांपूर्वी गावात नवीन आलेल्या तरुण देवरे डॉक्टरनं खंडूबाबांच्या सुनंदेला पळविल्याची.

मागच्याच वर्षी या प्रेमी जोडप्याची चर्चा झाली होती, पण डॉक्टरला दम देऊन मोठ्या लोकांनी ते सारं प्रकरण दडपून टाकलं होतं. आता लहाने आळीतल्या पोरांनी या सार्‍याकडे बारीक नजर ठेवली होती. बागलाणमित्राने त्या दोघांच्या चिठ्ठ्याचपाट्या पोचवून हे सारं ठरवायला मदत केली, इतकंच नव्हे तर गणपतीच्या मंडपाच्या मागेच दोघं रात्री भेटली, आणि तिथून त्यांनी गावाबाहेर पळ काढला, हे या पोरांनी सिद्ध केलं. बागलाणमित्राकडून ते वदवूनही घेतलं.

विष्णुपंतांना आपसूकच मुद्दा मिळाला. यासाठी गावगणपती बसवता का?- असं त्यांनी खड्या आवाजात विचारलं. कारखान्याची निवडणुक जवळ आल्याने नानांना जास्त काही बोलता येईना. त्या डॉक्टरच्या पाठीमागे माणसं सोडून, त्याच्या गावी तपास करायला सांगून, जंग जंग पछाडून, प्रेमी जोडप्याला गाडीत घालून आणलं गेलं.

मंडपासमोरच गावातले सारे मोठे लोक जमले. नानांनाही मित्राला जाब विचारावाच लागला, तेव्हा तो म्हणाला, 'जाऊ द्या नाना. दोघं सुखात राहतील की ती. काय दोष आहे पोरात? शेवटी लग्न तर करणारच ना सुनंदेचं? लावून द्या त्यांचं लग्न. करू द्या की संसार.' मी नीट निरखून मित्राकडे पाहिलं, तेव्हा याला लोक वेडा का म्हणत असतील, असं वाटून गेलं.

तो डॉक्टरही काही तरी बोलणार, तसं पंतांनी पुढे होऊन त्याच्या कानफडात वाजवली. लहाने आळीच्या पोरांना चेव आला. तीही धावून आली तसा बागलाणमित्रा कळवळून म्हणाला, 'नका मारू पोरांनो त्याला. नाना, अडवा त्यांना. तो गजानन बघतो आहे. यांनी काय नि कोणी काय, काही वाईट केलं असलं तर तो बघूनच घेईल नीट. त्याच्या अंगणात का करायचे हे असले दांगडो?'

नाना भडकून म्हणाले, 'तुझ्यासारख्या वेड्याने मला शिकवायची गरज नाही. तुला गावगणपतीचं काम करायला सांगितलं होतं, की या असल्या नालायक धंगड्यांत मदत?'

'नालायक धंगडे काय त्यात नाना?' बागलाणमित्रा नानांच्या डोळ्यांत डोळे रोखत हिमतीने म्हणाला, 'मोठे लोक मोठ्या मानापानात प्रेमं करतात, प्रकरणं करतात. या पोरानं केलं तर ते नालायक धंगडे?'

याचा सरळसरळ रोख नानांवरच होता. त्यांच्यासमोर गावात कुणीही आजवर असं काही बोलायची हिंमत केली नव्हती. यानंतर व्हायचं तेच झालं. नानांनी मित्राला पारासमोरच अक्षरशः बुटांनी तुडवला.

सारी पांगापांग झाली. आम्ही भेदरून तिथेच बागलाणमित्राजवळ थांबलो. थोड्यावेळाने तो शांतपणे कपडे झटकत हळूहळू उठला, पायर्‍या चढून मंडपात उकिडवा बसला आणि असंबद्ध हातवारे करत राहिला. आता मात्र मला तो खरंच वेडा वाटू लागला. बर्‍याच वेळाने मंडपातल्या भल्यामोठ्या मूर्तीकडे बघत त्याच्या जाड्याभरड्या वेड्यावाकड्या कोरड्या आणि जात्यातून खडे भरडताना यावा तशा आवाजात म्हणाला, 'ठाऊक आहे, फार मोठं आहे तुझं पोट. मीही बघतोच आता, आणखी काय काय पोटात बसतं तुझ्या..!'

- साजिरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! वर्षानुवर्ष गणपती बसवतो, त्यात किती प्रसंग अगदी खोल आठवणीत जाऊन बसतात नाही?! साधी, सरळ थेट आतलं बोलणारी खास 'साजिरा शैली'. जप रे तिला. Happy रैनाला अनुमोदन.

मी कालपासून परत परत वाचलं. अ प्र ति म
खरंच फार मोठा लेखक होणार तुम्ही राव!
आम्हाला विसरा विसरू नका पण लिखाण सोडू नका हो! Happy

सुंदर लेख. लहानपणीचा गणपती आठवला. त्या डोंगरांवर अळीव पेरायचो आम्ही. अन का कुणास ठाऊक. डोंगरातल्या घाटात एक अ‍ॅक्सिडेंटचा सीन कम्पल्सरी असायचा. एक बाहुली आडवी, तिच्यावर कुंकू टाकलेलं, अन बाहुलीच्या अर्ध्या साईज ची एक कार तिला धडक देणारी.

साजिर्‍या, सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं. सुरेख लिहिलयस. हॅटस ऑफ गड्या! Happy

कौतुक वाटत खरच...केवढं सहज किती काही लिहून जातोस...मायबोलीकडून साहित्य जगताला अजून एक नाव मिळणार लवकरच.

जीओ दोस्त!!!

Pages