सध्या मस्त पाऊस चालू आहे,गरमागरम भजी खायची इच्छा होतेय,मस्त कॉफी पीत खिडकीत बसून पाऊस बघावासा वाटतोय! पण... ऑफिस! जाऊ दे!
अशा वातावरणात मस्त गरमगरम वडापाव मिळाले तर काय मजा येईल! आहाहा...
आमच्या गावी एक वडापाववाला आहे, घाशीलाल त्याचं नाव! घाशीलालचा वडापाव आमच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. चार भाऊ मिळून ते दुकान चालवतात. प्रत्येक भाऊ महिन्याचा एक एक आठवडा दुकान चालवतो. त्या आठवड्याचा खर्चही त्याचा आणि येणारं सर्व उत्पन्नही त्याचंच! असे महिन्याचे चारही आठवडे त्यांनी वाटून घेतलेत. मस्त एक आठवडा बिझनेस करायचा आणि तीन आठवडे आराम, तरीही प्रत्येक भावाची गणना गावातल्या श्रीमंतांमधे होते, इतकं ते एका आठवड्यात कमवतात. त्या दुकानात कधीही जा, वडापाव घ्यायला रांग असते. आपला नंबर यायला किमान पंधरा मिनिट तरी लागतात इतकी गर्दी असते. घाशीलालच्या वडापावचं हेच वैशिष्ट्य आहे. त्याच्याकडचा वडा म्हणजे काही साधासुधा नसतो, तर आपण जनरली जेवढया साईजचा वडा बघतो, त्याच्या दुप्पट तरी त्याची साईज असते. आणि एकदम तिखट! दिवसाला दोनेक हजार वड्यांची तरी विक्री होतेच होते. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी हा आकडा अजून वाढतो.
आम्ही शाळेत असतांना सकाळी सात वाजता टेक्निकल हायस्कूलला जायचो तेव्हा त्याच्या दुकानासमोरुन जावं लागायचं. तेव्हा त्याच्याकडच्या लोकांची वड्याचं मिश्रण बनवण्याची लगबग चालू असायची. एका मोठ्या काहीलीत बटाटे उकळत असायचे. दोन जण खाली बसून खलबत्यात मिरची आणि आलं कांडत बसलेले असायचे. त्यांच्या बाजूला मिरची आणि आल्याचं पोतं पडलेलं असायचं. एक जण पोतंभर कांदे चिरत बसलेला असायचा. शंभर किलोच्यावर तरी वड्याचं मिश्रण सकाळी आठ वाजेपर्यंत तयार असायचं. त्यानंतर मोठ्या चुलाणावर मोठ्ठी कढई चढवून आचारी वडे बनवायला बसायचे. तोपर्यंत तीस-चाळीस तरी गि-हाईकं दुकानात आलेलीच असायची. एका वेळेस ते साधारण शंभरेक वडे तळत असत. वडे काढले रे काढले, की दोन वेटर्स ते गरमागरम वडे लगेच बांधून गि-हाईकांच्या ऑर्डर्स पु-या करत असत.
ह्या वड्यांचा सगळ्यात मोठा ग्राहकवर्ग म्हणजे हातावर पोट असलेला कामगारवर्ग! बांधकामावर काम करणारे मजूर, विटभट्ट्यांवर काम करणारे कामगार, बाहेरगावच्या ट्रकचे ड्रायव्हर्स हे नेहेमी हे वडे नेतात. त्या वड्याची साईजच इतकी मोठी असते की एक-दोन वड्यात एका वेळेचं पोट भरतं. ट्रक ड्रायव्हर्स आले की त्यांची ही वडे खाण्याची कॅपेसिटी बघावी, जिथे एक वडा खाता आपल्याला थोडं होतं तिथे हे ड्रायव्हर्स बिनधास्त आठ आठ वडे खातात. त्या वड्यांबरोबर मस्तपैकी लसनाची चटणीही असते, पण मुळात वडाच इतका तिखट असतो की सहसा चटणी खायच्या फंदात कुणी पडत नाही.
आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निवासी वर्गांना जायचो तेव्हा दुस-या दिवशी निघतांना आमच्या सिनिअर्सकडून सगळ्यांना नाष्टा असायचा. आणि नाष्टा ठरलेला असायचा, तो म्हणजे घाशीलालचा वडापाव! इतका भरपेट नाष्टा झाल्यावर जेवणाचे बारा वाजणार हे ठरलेलंच असायचं. कुणाच्या घराचं बांधकाम चालू असेल तर तिथले मजूर मालकाला म्हणायचे, "साहेब जरा वडे आणि जिलबीचं बघा ना!". त्यांना घाशीलालचे वडे आणि थोडीशी जिलबी आणून दिली की ते पण खूष आणि आपणही!
खरं तर ह्या वड्यांनी खूप लोकांचा एका वेळचा पोटाचा प्रश्न सोडवलाय! हमाल असू द्या, हातगाडीवाले असू द्या, मजूर असू द्या, क्लासच्या घाण्याला जुंपलेले विद्यार्थी असू द्या, किंवा कुणीही सामान्य मध्यमवर्गीय असू द्या, जिभेला चव आणि वेळोवेळी पोटाला आधार ह्या वड्यांनीच दिलाय, फक्त माझ्या गावातच नाही, सगळीकडेच! मुंबईकरांचा ’वडा’ हा एकदम जिव्हाळ्याच्या विषय आहे. कुणी त्याचा ’शिववडा’ करुदेत, नाहीतर आणखी काही, वडा आणि सामान्य माणूस एकमेकांना कधीच सोडणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे!
(चित्रे आंतरजालावरुन साभार)
तों. पा. सु. .... आवडला,
तों. पा. सु. .... आवडला, वडापाव आणि लेख दोन्ही
छानच लिहिलयं. पण खर्या
छानच लिहिलयं. पण खर्या घाशिलाल वड्याचे फोटो का नाही टाकले? ते बघायची आता उत्सुकता आहे. नुस्ते वड्यांचे फोटो नाही तर स्टेप बाय स्टेप जे करतानाचे वर्णन आहे ते पण फोटो सकट बघायला मिळालं तर मजा येइल.
कोणतं गाव हे?
निराली ला अनुमोदन!!
निराली ला अनुमोदन!!
वड्यासाठी वेडे होणार्यातले आम्ही!!!
झालंच तर घाशीराम ची रेसिपी मिळाल्यास ती ही ट्राय करून पाहू
सुरश,निराली ,वर्षू नील
सुरश,निराली ,वर्षू नील मनःपूर्वक धन्यवाद!
@निराली, माझं गाव भुसावळ! जिल्हा जळगाव. घाशीलालच्या वड्यांचे फोटो आता मी घरी जाईन तेव्हा
काढून आणेन आणि @वर्षू नील, रेसिपी तुम्हाला विपू करतो.
राव बाहेर पाउस सुरु आहे
राव बाहेर पाउस सुरु आहे त्यात घाशिलाल्चे वर्णन ! राव तोंडापुढे बाद्ली धरावी लागली एव्ढ पाणी सुटलं की!
रेसिपी टाकाच.
>> रेसिपी तुम्हाला विपू
>> रेसिपी तुम्हाला विपू करतो.
का बरं!!इथेच टाका की!!
सहिच, ईथे परदेशात आल्यावर
सहिच,
ईथे परदेशात आल्यावर वडापाव खुप मिस्स करतोय भारतात गेल्यावर पाहिले काम एक वडापाव आणि चहा बस्स
आदित्य घाशीलालचे वडे
आदित्य घाशीलालचे वडे म्हणजे... यम्म.....
आता वाटते आहे सरळ भुसावळ गाठावे....
सुनिल
सुनिल जोग,रोचीन,ऋशिबेला,योगिता,सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
रेसिपी टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करेन!
@योगिता, तुम्ही भुसावळच्या का?
लेखाच नाव वडापाव्...ठिक
लेखाच नाव वडापाव्...ठिक आहे...पण फोटो सुद्धा...किती जळवावं लोकांना...तोंडाला पाणी सुटलयं...आता आजच बनवते...
ईथे परदेशात आल्यावर वडापाव
ईथे परदेशात आल्यावर वडापाव खुप मिस्स करतोय भारतात गेल्यावर पाहिले काम एक वडापाव आणि चहा बस्स >>>>>>>>> अनुमोदन
भुसावळला स्टेशनकडे जाताना एका
भुसावळला स्टेशनकडे जाताना एका हॉटेलवजा टपरीत वडापाव खाल्लेला त्या विक्रेत्याने माझ्या पुणेरी तोंडाकडे पाहुनच बहुदा एक वडा व दोन पाव दिले असावेत तरीही तो इतका झणझणीत होता की अजुनही नाकातोंडातुन धूर येतो की काय असे वाटते.
लेख आवडला
काय मस्त आहे?? तो पा सु आज
काय मस्त आहे?? तो पा सु
आज संध्याकाळी खातेच
अरे.. हा वडा मी कसा मिस केला?
अरे.. हा वडा मी कसा मिस केला? यम्म्म्म!
पुढच्या वेळी शेगाव वारीत भुसावळपर्यंत जमले तर पाहू.
पत्त द्याल का? (खरे तर गावातल्या सगळ्यांना माहिती असेलच.. )
ईथे परदेशात आल्यावर वडापाव खुप मिस्स करतोय भारतात गेल्यावर पाहिले काम एक वडापाव आणि चहा बस्स >>>>>>>>> अनुमोदन >>> मी पण ठाण्यातले आणि गोरेगावातले वडे मिसतेय.. :भ्या:
शोनु-कुकु,शुभांगी हेमंत
शोनु-कुकु,शुभांगी हेमंत ,प्रितीभुषण ,जाईजुई धन्यवाद! आमच्या भुसावळला लोक फार तिखट खातात. एकतर लाल मिरचीच्या तिखटाची भाजी असतेच असते रोजच्या जेवणात नाहीतर हिरव्या मिरच्या लावून केलेली भाजी असतेच. लोक वर्षाला सात-आठ किलो तिखट सहज फस्त करतात. खान्देशची शेवभाजी, फौजदारी वरण हे इतके तिखट प्रकार आहेत की बाप रे बाप! मलाही तितकंच तिखट खायची सवय होती. त्यामुळे पुण्यात आल्यावर इथल्या मेसचं जेवण अगदीच मिळमिळीत वाटायचं. आता सवय झालीये. तरी पण खास खान्देशी जेवण देणारी काही हॉटेल्स इथे आहेत. त्यांच्याकडची शेवभाजी म्हणजे अप्रतिम! कोथरुड भागात एक ’खान्देश’ म्हणून हॉटेल आहे. सांगवीत तीन-चार आहेत. प्रॉपर खान्देशी जेवण मिळतं त्यांच्याकडे! जाईजुई, भुसावळला मामाजी टॉकिजजवळ घाशीलालचं हॉटेल आहे. कुणीही सांगेल.
चांगलाच झणझणीत असतो हा
चांगलाच झणझणीत असतो हा घाशीलालचा वडा.
मस्त लिहिलय आदित्य.