नैवेद्य १) मोदक

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 August, 2011 - 15:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

तांदळाचे पिठ
मिठ

१ ओला नारळ खरवडून
गुळ
खसखस
चारोळी/काजु/आक्रोड/मनुका
वेलची/केसर
तुप

क्रमवार पाककृती: 

तापलेल्या भांड्यात तुप टाकुन खसखस घाला. आता त्यावर गुळ घाला व मंद गॅसवर वितळू द्या.
गुळवितळला की लगेच खोबर व चारोळी/काजु/आक्रोड/मनुका/बदाम पैकी काही आवडत असेल ते घाला किंवा जे घरात असेल ते थोडे थोडे घाला.
थोडा वेळ परतुन गॅस बंद करा.

आता १ ते दिड ग्लास पाणी घेउन त्यात मिठ टाकुन गरम करण्यासाठी ठेवा. आता पाणी उकळायच्या आधी जे भांड्याच्या तळातुन बुडबुडे यायला लागतात तेंव्हा तांदळाचे पिठ अंदाजे टाकत ढवळा व लगेच गॅस बंद करा म्हणजे मोदक वातड होत नाहीत. जास्त पिठ टाकु नका. पिठ ओलसर राहील एवढेच टाका.

पिठ परातीत काढा व थोडे थंड झाले की पाण्याने मळायला घ्या. जास्त पाणी लावु नका. हलकेच हात भिजेल एवढेच घेत रहा व चांगले मळून घ्या.

आता मोदक करायला घेताना परत थोडे पिठ जरा मळा व लिंबाएवढा गोळा घेउन त्याची पातळ वाटी करा.

वाटीत तळाला नारळाचे सारण भरा. आता वाटीच्या बाहेरच्या बाजुला दुमडत कमी अंतरावर कळ्या करा. मग वाटीच्या वरच्या भागाच्या कळ्यांना हलके आतल्या बाजुला गोल गोल फिरवत वरच्या दिशेने जुळवा. टोकाची शेंडी टोकदार करा.

आता हे मोदक २० ते ३० मिनिटे मोदक पात्रात वाफवुन घ्या.

मोदकांबरोबर आमच्याकडे करंज्या (शिंगर्‍या) व खापट्या (पिठाची चपटे गोल) करण्याची पद्धत आहे.

वाढणी/प्रमाण: 
गणपती बाप्पालाच २१ लागतात :स्मित:
अधिक टिपा: 

प्रथम वंदनिय गणपती म्हणुन गणपतीच्या मोदकाने सुरुवात करत आहे. तसे आमच्याकडे नागपंचमी ह्या पहिल्या श्रावणातल्या सणालाच नागोबाच्या नैवेद्यासाठी मोदक करण्याची प्रथा आहे.

उकळवणी घेताना काही जणं पाण्याबरोबर दुध किंवा तेलही घालतात.

वाटी वळताना काही जणं ती पातळ होण्यासाठी हाताला तेल लावतात. मी नेहमी पाणीच वापरते.

मोदकाच्या सारणात आक्रोड जास्त चांगला लागतो हा माझा अनुभव आहे.

साखरचौतीच्या गणपतीला नारळाच्या सारणात गुळाऐवजी साखर घालतात.

(नागपंचमीच्या दिवशी ऑफिसला जायच्या घाईमुळे सगळे फोटो काढू शकले नाही त्याबद्दल क्षमस्व. पण परत केल्यावर सगळे फोटो इथे लोड करण्याचा प्रयत्न करेन.)

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागूतै, खुपच मस्त ग. आणि कसले सुबक झाले आहेत .
इथे मोदक करते गणपतीत पण तांदुचे पिठ जूने असते की काय कोणासठाऊक कधी कधी उकड निट होत नाही त्याला मोदक करताना विरी जाते Sad

हो_सुबक्_तर्_आहेतच.
पण्_सारणासकट्_सगळ्या_कृतिचे_फोटो_पाहिजेत.
आमच्याकडे_पण्_नागपंचमीला_गणेश_चतुर्थीला_आणि_अंगारकीला_मोदकच्_असतात.

आम्बेमोहोर तान्दळाचे मोदक छान सुवासिक होतात.
काही ठिकाणी एक मोदक मिठाचा करतात, ज्याच्या पानात लागला तो भाग्यवान अशी समजूत आहे.

माझी आई मोदकांबरोबर एक तरी करंजी करते, तशी रीत आहे म्हणते. त्यामागचे कारण माहिती नाही.

माझी आई मोदकांबरोबर एक तरी करंजी करते, तशी रीत आहे म्हणते. त्यामागचे कारण माहिती नाही. >>

भावाला बहिण म्हणून....

खरंतर करंज्यांबरोबर पण एक तरी मोदक करतातच..vice versa

जागू, मस्त सुबक दिसताहेत मोदक Happy

फक्त किती खोबऱ्‍याला किती गूळ आणि तेवढ्यासारणासाठी तांदूळाचं पीठ किती हे लिहिलंस तर पाककृती पूर्ण होईल.

अनु3, विरी जात असेल तर एक भांडं तांदूळाच्या पिठीत एक चमचा मैदा व्यवस्थित मिसळून मग उकड काढायची.

जागूटले, आता मी गणपतीत तुझ्याच घरी मुक्कामाला Happy
उ.मो. माझा वीक पाँईंट आहे ग अगदी.
सुरेख कळया आल्यात मोदकाच्या

अर्रे व्वा जागुतै, माझा हंगामी आवडता पदार्थ Happy
वळ्यांची रचना सुंदर केली आहेस आणी एकाच मोदकात इतक्या वळ्या? ते पण सारख्याच्...अरे हो..ते पण 'पाणि' लावुन्...ग्रेट!

तुला कानात सांगतो.....,

ते 'नैवद्य' लिहले नसतेस तर मी "१)मोदकं" असंच वाचलं असतं Wink Biggrin

जागूतै Happy

सह्हीच झालेत मोदक< Happy सुंदर आणि सुबक.... अत्ता उचलुन खावेसे वाटतायत Happy
गरम गरम मोदक आणि त्यावर तूपाची धार... आहाहा स्वर्ग!!!!!!

फार सुंदर वळलेयस Happy

उकड : - १ वाटी पाणी, १ चमचा साखर, १ चमचा लोणी, किंचीतसं मीठ आणि १ वाटी मोदकाचं पीठ

पाण्यात साखर, लोणी घालून उकळणे. गॅस बंद करुन त्यात पीठ घालून ढवळून झाकून ठेवणे. १० मिनिटांनी मळून घेणे.

सारण :- १ वाटी शिगोशिग भरुन खोबरं, १ सपाट वाटी गूळ, वेलची

चिनुक्स, पराग, पुर्वा, सुचित्रा, गिता, वर्षा, लाजो, अखि, अनघा,निल्या धन्यवाद.

अनु अग उकड मी वर दिल्याप्रमाणे घे. आणि पिठ चांगले मळून घे.

दिनेशदा पुढच्यावेळी नक्की.

अश्विनी धन्स ग. आम्ही साखर नाही घालत पिठात. आम्ही मिठ घालतो. त्यामुळे पिठाला चव येते. आणि मग खारट पिठ आणि गोड चव हे छान कॉम्बिनेशन लागत.

नामणदिवा आमच्याकडेही तिच पद्धत आहे. पण मिठाच्या मोदकाचे पहिल्यांदाच ऐकले.

मंजुडी अग मी नेहमी सगळ अंदाजाने करते. पण जेवढ पाणी तेवढ पिठ घेतात उकडीला. आणि खोबर जेवढ त्याच्या अर्धा ते पाऊण पट गुळ. जास्त गुळ टाकला तर सारण लिबलिबीत होत.

शुभे वाट पाहतेय.

चातक खर सांगायच तर हा विचार ही पोस्ट टाकतानाच आला माझ्या मनात. आणि आपल्यासारख्या मासेखाउंच्याच ते लक्षात येत. Lol

अ.....प्र......ति......म झालेत मोदक.................. Happy

तोंपासू................. Happy

आमच्याकडेही मिठाची चतुर्थी करतात...

२१ मोदक करतात... त्यात एक पूर्ण मिठाचा करायचा....

उपवास सोडताना ताटात २१ मोदक ठेवायचे.... जोपर्यंत मिठाचा मोदक लागत नाही तोपर्यंत खात जायचे... जेंव्हा मिठाचा लगेल तेंव्हा थांबायचे......
मग तो पहिला लागला तरिही..... Happy

Pages