लाखो रुपयांची थकबाकी!

Submitted by नरेंद्र गोळे on 24 June, 2011 - 07:45

रात्री आठचा सुमार होता. मी ऑफिसमधून घरी पोहोचलो. मी बेल दाबली. आवाज आला नाही. बहुधा दिवे गेलेले असावेत. मग ठक ठक केले. आईनेच दार उघडले. आमच्या घरी सगळीकडे, अंधार दिसत होता. बाहेर मात्र सगळ्यांकडे दिवे दिसत होते . मी विचारले, आपलेच दिवे गेले आहेत का? मग इन्व्हर्टर का चालत नाही आहे? पाहिले तर, इन्व्हर्टर बंद पडलेला. घरात वीज येत नसलेली. मग खाली जाऊन मीटरपाशी पाहावे, म्हणून खाली गेलो. तर आमचा मीटर गायब!

वर येऊन आईला विचारले की कुणी आले होते का, विजेचे कनेक्शन तोडायला? छे! कुणीच तर नाही आले. मग मालकांकडे चौकशी केली. त्यांनाही काहीच माहीत नव्हते. पण दुपारी एक दीड वाजल्यापासूनच दिवे गेलेले होते, ते आत्ता येताहेत. ही नवी बातमी समजली. म्हणजे आई दुपारपासून दिवे, पंखे, टीव्ही लावून बसलेली असणार. तिला दिवे गेले हे कळले, तेव्हा बहुतेक इन्व्हर्टर खलास झालेला असणार. मला एकएक तपशील कळू लागला.

मग मालक -उमेश- आणि मी दोघेही मराविमंच्या कार्यालयात गेलो.

उमेश: "आमचे मीटर कधी काढून नेले".
कर्मचारी: दुपारीच तर नेले की!
उमेश: का? काय म्हणून?
कर्मचारी: अहो साहेब, तुमची एक लाख तेवीस हजाराची थकबाकी आहे!
उमेश: पण मग अजून बिल कुठे पाठवले आहे?
कर्मचारी: ते उद्या ऑफिसात येऊन विचारा! आमच्याजवळ ती माहिती नसते.
मी: अहो पण मीटर काढून नेतांना काही सांगायची वगैरे पद्धत असते की नाही. असे कसे काढून नेलेत, न सांगता?
कर्मचारी: आवाज का चढवताय? निष्कारण गुंडागर्दी?
मी: अहो, चोरासारखे मीटर तुम्ही काढून नेलेत आणि वर आम्हालाच दमदाटी करता? आमचे मीटर घेतल्यापासूनचे एकूण बिल देखिल लाखभर होणार नाही, मग त्याहून जास्त थकबाकी होईलच कशी? आम्ही प्रामाणिकपणे बिले भरतोय तर हे मीटर काढून नेतायत!
कर्मचारी: अहो मग पावती दाखवा ना बिल भरल्याची!
मी: ही घ्या! (मी गेल्या महिन्याचे बिल भरल्याची पावती घेऊन गेलेलोच होतो.)
कर्मचारी: अहो एक लाख तेवीस हजाराची थकबाकी भरल्याची पावती म्हणतोय मी!
मी: पण त्याचे बिल कुठाय?
कर्मचारी: ते उद्या ऑफिसात येऊन विचारा! आमच्याजवळ ती माहिती नसते.

अगदीच नाइलाज झाला. म्हणून मग मी जरा पडते घ्यायचे ठरवले. कारण, उन्हाळ्याचे दिवस होते. मे महिन्याची अखेर. जीवाची नुसती तलखी होत होती. त्यात पंख्याविना रात्र काढायची कशी या विचारानेच मला घामाची अंघोळ होत होती.

मी: अहो, आमची कसलीही थकबाकी नाही आहे. शेवटले बिल भरल्याची पावती मी तुम्हाला दाखवलीच आहे. तेव्हा रीतसर होईल ते होऊ दे सावकाश. पण मला आतापुरते, निदान तात्पुरते कुठे तरी जोडून द्यायला सांगा ना!
कर्मचारी: अहो तुम्ही पाहताय ना! इथे माणसेच कुठायत? नेहमीच्याच तक्रारी निस्तरतांना नाकी नऊ येताहेत, त्यात हे थकबाकीदार हैराण करतात!
उमेश: हे पाहा आम्हाला थकबाकीदार म्हणू नका! सगळी बिले भरलेली आहेत आम्ही!!
कर्मचारी: मग मीटर काय उगाच काढलंय?
मी: माणूस आल्यावर तरी, निदान तात्पुरते का होईना पण कनेक्शन जोडून द्या हो! (मी गयावया करू लागलो.)
कर्मचारी: हो. हो. माणूस मिळाला की मी नक्की पाठवतो.

एव्हाना भांडण रंगतदार होत आहे असे पाहून बर्‍यापैकी गर्दी जमलेली. आत्ता रात्रीचे दहा वाजायला आलेले होते. आम्ही इथून गेलो, की हा कर्मचारी काही आपले काम करणार नाही, अशी माझी खात्री पटली. रात्र पंख्याविना काढावी लागणार ह्या विचाराने मी आणखीनच काकुळतीला आलो. ती काळरात्र आम्ही कशी काढली ते आमचे आम्हालाच ठाऊक. पण ती संस्मरणीय झाली हे सांगायची आवश्यकताच नाही.

मला दुसर्‍या दिवशी सुट्टी नव्हती. मी उमेशला म्हटले तू जरा जाऊ शकशील का उद्या? तो कशासाठी तरी सुट्टी घेणारच होता. म्हणाला मी उद्या जाऊन, पावती दाखवून, मीटर पुन्हा बसवून घेईन. तो दुसर्‍या दिवशी गेला. पावती दाखवली. त्यावर ठराविक साच्याचे उत्तर मिळाले. तुमचे सगळे खरे आहे. मात्र, त्या बिलात जो विलंब आकार (सुमारे चार हजार रुपये) लावलेला आहे, किमान तो भरल्याशिवाय मीटर पुन्हा प्रस्थापित करता येणारच नाही. तेव्हा तुम्ही विलंब आकार भरा. आता आकार भरा म्हटल्यावर प्रश्न आला की मग बिल कुठाय? तर म्हणाले की तुम्हाला मिळाले नसेल तर ड्युप्लिकेट बिल घ्या! मग ड्युप्लिकेट बिलाची मागणी केली तर त्यांना मूळ बिलच सापडेना! शेवटी अकाऊंटंटच्या वहीतून आकडे पाहून, एक, हातांनी लिहिलेले बिल, ड्युप्लिकेट बिलाचा आकार भरल्यावर प्राप्त झाले. त्या बिलाचे आधारे त्यात दर्शवलेला विलंब आकार त्याने भरला. मग आमचे मीटर विधिवत पुनर्स्थापित झाले.

ही झाली अर्धी कहाणी. घरी आल्यावर जेव्हा ती समजली तेव्हा, संतापाने माझे डोकेच फुटायची वेळ आली. मुळात आमचे गेल्या महिन्याचे बिल भरल्याची पावती आमच्याकडे आहे. ती आहे की नाही हे न विचारताच त्यांनी चोरासारखे मीटर काढून नेलेले आहे. एक लाख तेवीस हजाराचे बिल –जे त्यांनी स्वतःसुद्धा कधीच पाठवलेले नव्हते- त्यावर लिहिलेल्या तारखेलाच आम्ही त्याची ड्युप्लिकेट पैसे भरून मिळवलेली होती. तेव्हा भरायचे म्हटले तरी ते बिल आम्ही कधी भरणार होतो? तशात त्यात दर्शवलेली बिल भरण्याची तारीख उलटून गेलेली. म्हणून त्यावर विलंब आकार लावलेला. तो आकारच आम्ही कधीही भरले नसेल त्या बिलाहूनही जास्त. तो भरल्याशिवाय मीटर म्हणे परत बसवता येणार नाही. सगळाच कारभार अजब. विनोदी. हास्यास्पद.

मग मी निश्चय केला. महिनाभर सुट्टी काढावी लागली तरी चालेल पण ह्या अन्यायाची तड लावायचीच. पुढल्याच शनिवारी मी आमची १९८५ साली मीटर घेतले तेव्हापासूनच्या विनाविलंब बिले भरल्याच्या सर्व पावत्यांचा गठ्ठा घेऊन मराविमंच्या कार्यालयात दाखल झालो. मला वाटले एवढा पुरावा पुरेसा ठरेल. तक्रार देण्याच्या रांगेत उभा राहिलो. नंबर लागल्यावर अत्यंत सौम्य आवाजात सांगण्यात आले की, “सात दिवसांचे दैनिक मिटरवाचन” नोंदवलेल्या अर्जावरच तक्रार स्वीकारण्यात येते. माझ्या तक्रारीच्या आवेशातील हवाच निघून गेली. वरिष्ठ साहेबांना भेटूनही इतकाच निष्कर्ष निघाला की, तक्रार करायची तर विधिवत सात दिवस मिटरमापने नोंदवा. मगच तक्रार घेऊ. मला ह्या लालफीतशाहीचा संताप उरात माईना झाला.

तरीही निश्चयाने मी रोज मिटरमापन नोंदवू लागलो. पुन्हा पुढल्या शनिवारी, सात दिवसाची मिटरमापने –जी महिन्याचे बिलही शे दोनशे रुपयांपलीकडे जाणार नाही असे स्पष्टपणे दाखवत होती-, गेल्या पंधरा वर्षांतील थकबाकी नसल्याचे रेकॉर्ड, त्या एक लाख तेवीस हजाराच्या बिलात दर्शवलेले मिटरवाचनाचे आकडे आमच्या मीटरशी जुळत नसल्याचे पुरावे, इत्यादीच्या सर्वसमावेशक विश्लेषणातून मुळात ते बिलच आम्हाला चिपकत नसल्याचा निःसंदिग्ध पुरावा, सहा पानी संगणक मुद्रितात, ताळेबंदानिशी एकत्र करून मराविमंची वाट धरली. त्या पत्रात मी असेही म्हटले होते की, मीटर पुन्हा बसवण्याकरता आम्हाला विलंब आकाराचा जो भुर्दंड बसवण्यात आला तोही बेकायदा आणि गैरलागू आहे. तेव्हा तो परत देण्यात यावा अथवा पुढील बिलांतून वळता करण्यात यावा. न पेक्षा मी हीच कागदपत्रे ग्राहक न्यायालयात पेश करेन!

खिडकीवर माझा अर्ज स्वीकारण्यात आला. तो मिळाल्याची पावती, मी त्याच्याच झेरॉक्स प्रतीवर सहिशिक्क्यानिशी नोंदवून घेतली. मग वरिष्ठ साहेबांना भेटून यात मराविमं कशी चूक आहे ते समजावून सांगू लागलो. मात्र, त्यांना ते सर्व आधीच माहीत झालेले होते. "अहो तुम्हाला दुसर्‍या?च एकाचे बिल भरायला सांगून, त्याच्या ऐवजी तुमचेच मीटर तोडण्यात आलेले होते. आता झाले आहे ना सगळे ठीक?" ते विचारू लागले. मग मी जाम उसळलो. "म्हणजे मला हा निष्कारणच मनस्ताप म्हणा की!" त्यांनी माझे जमेल तसे सांत्वन केले. पण त्या पत्राचे उत्तर आल्याखेरीज माझे समाधान होणार नव्हते.

प्रत्यक्षात तसले काहीच घडले नाही. आमच्या पुढल्या बिलात, त्या सुमारे चार हजार रुपयांचा विलंब आकार, उणा दाखवलेला होता. पुढे अनेक महिनेपर्यंत आम्हाला बिलेच भरावी लागली नाहीत. कारण ती उणा असत. एव्हाना माझ्या संतापाची वाफ हवेत विरून गेलेली होती. तरीही पदरी पडले तेही काही कमी नव्हते. किमान मराविमंचा लाखो रुपयांचा थकबाकीदार असल्याचे लांच्छन, मराविमंने स्वतःच परत घेतले होते. हेही नसे थोडके!

http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

गुलमोहर: 

मात्र प्रत्यक्ष कस्टमरपेक्षा "कस्टमर आयडी" ज्या बँकेला महत्त्वाचा वाटतो, ती बँकच "लालफितशाहीवाली " बँक असे ठरवावे लागेल. >>>>>>>>>>>

सुदैवाने, कस्टमर केअरला उपरोधिक पत्र "ई-मेल"ने लिहील्यावर बँकेचे प्रशासन जागे झाले. त्यांनी ताबडतोब दखल घेऊन संबंधित अधिकार्‍यास मला फोन करून, बोलावून घेऊन प्रश्न सोडवण्यास सांगितले. अखेरीस प्रश्न मिटला. किमान संवेदनाशीलता दाखवल्याखातर आय.डी.बी.आय. बँकेच्या प्रशासनास मनःपूर्वक धन्यवाद!

मला असे वाटले की हेही इथे नोंदवणे आवश्यकच आहे. तुम्ही काय म्हणता?

योग,
तुमची सूचना मला योग्य वाटते.

त्यांच्या सूचनेनुरूप खाते उघडले.
आज मला ते सांगू लागले की नव्या खात्याचा कस्टमर आयडीही तोच असायला हवा. तुमचा वेगळा असल्याने तुम्हाला ही सवलत मिळू शकणार नाही. >>>>>

हे सांगणारे अधिकारी श्री.कांबळे व श्री.पळसेकर, डोंबिवली (पूर्व) शाखा, आय.डी.बी.आय.बँक.

कस्टमर केअरनी हस्तक्षेप केल्यावर
सोडवणूक करणारे बँक मॅनेजर श्री.धनंजय पेंढारकर, डोंबिवली (पूर्व) शाखा, आय.डी.बी.आय.बँक.

<<<<कारण रेशनकार्ड्चे काम ७ दीवसात होते, तुम्ही ७ वर्ष घालवली.. तुम्ही तिथल्या योग्य व्यक्तीना भेटायला हवे होते असे माझे मत.>>>>
पण ती योग्य माणसे शोधायला / मिळायलाच वर्षे जातात त्याचे काय? Wink

Pages