भुता परस्परे पडो | "मैत्र जिवांचे" || : उद्घाटन समारंभ!

Submitted by ह.बा. on 6 July, 2011 - 06:30

..............................................................................................................................................
..............................................................................................................................................

दिव्या दिव्यांचे सुखी त्रिकोण आपापले कोपरे उजळण्यात दंग आहेत. अंधार्‍या कोठड्यांना निराशेचा असाध्य आजार जडला आहे. उजेडाच्या गावाला प्रेमाची साद घालून अंधाराच्या क्रूर खेळाचा अंत होईल असा आशेचा कवडसा नजरेच्या टप्प्यात येत नाही. कुणी कुणाचा कुणीच नाही... जो तो ज्याचा त्याचा आहे. उजळ कोपर्‍यांना सुबक नक्षीची... तर अंधार्‍या कोठड्यांना दबक्या हुंदक्यांची सोबत आहे. दिव्याने दिवे पेटताहेत... एक गाव उजळतो आहे. अंधारात मिसळणारा अंधार आहे... अंधार अंधारतोच आहे... हसणार्‍याला दिसतात ती फक्त आसव... रडणार्‍याला उगम उमजला आहे... हसणारा पाहतो... चुकचुकतो... हळहळतो... विसरून जातो. पण रडणारा पाहतो... जाणतो... जगतो आणि जगत राहतो.

अंधारात जन्मून अंधारात जगणार्‍याला प्रकाशाची आस नसतेच असे नाही. पण त्याच्या काळ्या भाळावर एक पांढरी रेघ उमटण्यासाठी प्रकाशाच्या गावी लोकसेवेची तपश्चर्या करणारा महात्मा जन्मावा लागतो. अंधार- प्रकाशाच्या नात्याचा इतिहासच दुराव्याचा आहे. आणि जेव्हा जेव्हा पणत्यांनी अंधाराशी सामना करून आसवांना मायेन कुरवाळ तेव्हा तेव्हा मानवतेच्या पवित्र ग्रंथाला उराशी कवटाळून प्रत्यक्ष सरस्वतीनं आनंदाश्रू ढाळले.

आयुष्याचा डोंगर पोखरून संसाराच्या उंदराला जीवनाच्या कोठारावर आनंदान बागडु देणारे येतात आणि जातात. पण जनसेवेच्या पालखिसमोर श्वासांची उधळण करत बेहोश नाचणारा जातो म्हणाला तरी मनातून जात नाही. उजेडाच्या साथिने देव शोधणार्‍याला मुक्ती मिळाली पण कुट्ट अंधारात वाहती आसव ज्याला मोत्यासारखी स्वच्छ दिसली त्याला माणसं मिळाली. ज्याचं त्याचं आयुष्य ज्याचा त्याचा मार्ग... प्रत्येकाची व्याख्या... प्रत्येकाचा परमार्थ आहे.

आम्हाला संसार सोडवत नाही... आम्हाला दु:खही पाहवत नाही. आमच्या सुखात वाटा नको... पण त्यांना दु:खात एकटं सोडायचं? मनात सेवेचा दीप तेवतो आहे पण आपल्या घरात अंधार होता कामा नये... बहुतांशी लोकांना याच द्विधेत पाहिलय आणि स्वतःही अशाच विचारांनी अस्वस्थ झालोय. होत राहीन. ज्या आदर्शांचे गोडवे आपण गातो त्यांचा रस्ता चालणं अशक्यच पण आपल्याचाने होईल तेवढे तर करायलाच हवे...

मायबोलीकर झाल्यानंतर बर्‍याच गझला, कविता, कथा, ललितं लिहीली. अशाच लिखाणात ८ डिसेंबर २०१० ला एक लेख लिहीला.
लग्नानंतरचा एचआयव्ही... http://www.maayboli.com/node/21747

या लेखानंतर बरीच चर्चा झाली. लेखातील मताविषयी बोलता बोलता गाडी समाजसेवेच्या स्टॉपला आली. आणि चर्चेसोबत कृती करण्याची इच्छा असणार्‍या काही मायबोलीकरांनी एक सामाजिक संस्था सुरू करण्याचा मनोदय मांडला. अपेक्षेपेक्षा जास्त लोकांचे प्रतिसाद आले. काहिंनी प्रत्यक्ष कामाची तयारी दाखविली तर काहिंनी वेळेनुसार, सवडीनुसार येण्याचे कबूल केले. होईल न होईल अशा स्थितीत असतानाच प्रगो, विशाल कुलकर्णी, आर्या, चनस, कोमल कुंभार, विजय पाटील या लोकांनी व्हायलाच पायजे! अशी ठाम भुमिका घेतली. होईलसे वाटले तेवढ्यात डॉ. कैलास गायकवाडही मी तुमच्या पाठिशी आहे म्हणत उभा राहिले आणि संस्था स्थापन होणारच हा निर्धार झाला.

संस्थेविषयीची पहिली बैठक डॉक्टरांच्या घरी मुंबईला पार पडली. कार्यकारी मंडळ ठरले. नोंदणीची कागदपत्रे तयार झाली. संस्थेचा पत्ता म्हणून मालखेडच्या घराचा पत्ता दिला. त्यासाठी घराचा उतारा देताना आज्जीचा जीव वरखाली होत होता. ती म्हणत होती संस्थेला घर दिल्यावर माझी उच्चलबांगडीच करशीला. हातापाया पडून कसातरी उतारा मिळवला. सर्व सभासदांची कागदपत्रे आली ज्यांची नव्हती त्याना नाईलाजाने क्लार्यकारी मंडळात स्थान न देता २३/०३/२०११ ला मैत्र जिवांचेची फाईल सातारा धर्मादाय आयुक्तांकडे दाखल झाली. त्यानंतर बरेच डिटेल्स, चुका दुरूस्ती, वकील, जाहिर नोटीस, असे प्रकार झाले. नोंदणी पुर्ण होण्याचा कालावधी तिनेक महिन्याचा असतोच असे समजल्यावर आरंभशुरांच्या (माझा नंबर पहिला) उत्साहाविषयी साशंक झालो पण सुदैवाने कार्यकारी मंडाळाचा उत्साह पाच महिने आहे तसाच राहिला.

०२/०७/२०११ रोजी मैत्र जिवांचेचे नोंदणी प्रमाणपत्र हाती आले सर्वांना मेसेज केला आणि ८ दिसेंबर २०१० ला जो उत्साह होता तोच उत्साह ८ महिन्यांनी पुन्हा एकदा दिसला...

कागदाचा खेळ संपला आता कार्याची वेळ आलिये. १०/०७/२०११ ला आपल्या मैत्र जिवांचे या सामाजिक संस्थेचं उद्घाटन आहे.

लोकसेवेचा आरंभ लोकसेवेनेच....
आई वडिलांचा एड्सने मृत्यु झाल्यानंतर एचआयव्ही बाधित मुलांचा सांभाळ करायला कुणीच तयार नसते अशा एड्सग्रस्त अनाथ मुलांचा आधार असलेल्या "स्पर्श बालग्राम" www.sparshbalgram.com या संस्थेला देणगी देऊन आणि तिथल्या मुलांसोबत रविवारचा काही काळ घालवून मैत्र जिवांचेचे उद्घाटन होईल.

१० जुलैला सकाळी दहा वाजेपर्यंत तिथे पोहोचायचे, संस्थेला देणगी देऊन तिथल्या मुलांच्या हातून संस्थेचे उद्घाटन करायचे असा बेत आहे. ज्याना शक्य असेल त्यानी आवश्य यावे ही विनंती.

- मैत्र जिवांचे सामाजिक संस्था

.....................................................................................................................................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन हबा आणि मैत्र जिवांचे कुटुंब. हबा उद्घाटनाचा कार्यक्रम छान आखला आहेस. संस्थेची निवडही उत्तम.
संस्थेला देणगी देऊन तिथल्या मुलांच्या हातून संस्थेचे उद्घाटन करायचे असा बेत आहे. >> हेच खरं कार्य आणि हिच खरी सुरुवात.

मैत्र जिवांचेचा प्रवास नेहमीच यशस्वी होत असाच दुरपर्यंत चालत जावो हिच सदिच्छा.

हबा. ह्या व अश्या अर्वच उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.

ते भूता परस्परे जडो आहे ना ?

पुण्यात नाही याचा पश्चाताप होतोय खरा पण नाईलाज आहे.
माझ्या लायक काही असेल तर नक्की सांग मित्रा.....उपक्रमास हार्दिक शुभेच्छा!!!!!

मनःपूर्वक अभिनंदन व अश्या अर्वच उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.
मी देखिल देशात परतल्यावर आपल्या उपक्रमात सहभाग घेवू इच्छितो.

सर्वांचा आभारी आहे!!!

आणि नव्या घडामोडी आमच्यापर्यंत पोचवताय त्याबद्दल धन्यवाद. >>> मायबोलिकरांची शाबासकी मिळाली की कामाला हुरूप येतो. चांगलं काही केलं की वेळ असेल तेव्हा नक्कीच सांगणार.

Pages