तो शनिवार काही वेगळाच होता.तब्बल एका महिण्यानंतर मी घरी जाणार होतो. तेंव्हांचं घरी जाणं म्हणजे सासरहून माहेरी जाण्यापेक्षा कमी नव्हतं. घरी गेलं की आई विचारायचीही अगदी तसचं , किती बारीक झालास रं? म्यासमधी जेवाण चांगल नस्त काय? वगैरे वगैरे....तिला कुठं माहीत, बापानं दिलेल्या पाचशे रुपयांत मेस होत नाही म्हणुन?
माझी एक मैत्रीण,म्हणजे पत्र लिहून झाल्यावर 'तुझीच बहीण' असं लिहिणारी. तिचा डबा जरा जास्त आणायची त्यात आम्ही सकाळ भागवायचो, आणि रात्री मेस. तिचं नि माझं जमण्याचं कारणही वेगळं होतं, तिच्या अनियंत्रीत डौलदार रुपामुळं तिला दुसरा मित्र नव्हता आणि मी कॉलेजात नविन असल्याने मला दुसरा पर्याय नव्हता.पण मनाने खूपच चागंली होती.
मी निघालो तेंव्हा दुपारचे दोन वाजले होते, सोबत सुनिल नावाचा एक मित्र होता.तो ही त्याच्या गावाला निघाला होता. कॉलेज अडीचला सुटायचं आणि पुण्याहुन आमच्या गावाला जाणारी एक मेव बस, पावणे तीन वाजता असायची. मग इतक्या कमी वेळात भवानीनगरहुन शिवाजीनगर गाठणं शक्य होत नसे. म्हणुन थोडा लवकर निघालो होतो. ही बस आम्हाला पुष्पकयानापेक्षा कमी नव्हती. गावातल्या समस्त ग्रामस्थांना बसायला खुर्ची मिळण्याचं ते एकमेव ठिकाणं होतं. आमच्या अख्ख्या गावात तेंव्हा दोनचं खुर्च्या होत्या एक शिंदे मास्तरला नि दुसरी सावकाराला. मास्तरांची खुर्ची म्हादू पाटलाला पोराच्या लग्नात भेट मिळालेली. बसायची लाज वाटते म्हणून त्याने मास्तरला दिली होती, आता तिचा मागचा पत्रा गायब होता आणि खालच्या पत्राने धोतर फाटू नये म्हणुन मास्तरांनी अडगळीत टाकली होती. सावकाराचीही खुर्ची आता मोडली होती. वायरने विणलेली आणि अगणित अष्टकोनी नक्षी असणारी ही खुर्ची बरेच दिवस गावाला माहीत नव्हती पण एकदा काय झालं, त्यांच्या घरी कोणी पाहुणे आले होते. सहज म्हणुन खुर्चीत बसले नि दोर्याची गुंडी सुटावी तशी वायर अचानक सुटली. पाहुणे अडकले, अर्धे खुर्चीत अन् अर्धे वर. घरगुती प्रयत्न संपल्या नंतर मारुती सुतार आठवला. त्याच्या वयाने त्याची उठबस थांबवली असल्याने पाहुण्यांनाच तिकडे नेण्याचे ठरले. विसर्जनाला गणपती न्यावा तसं खुर्चीसकट पाहुण्यांना मारुती सुताराकडे नेण्यात आलं आणि तेंव्हा कुठं गावाला त्या खुर्चीचं दर्शन झालं होतं. ही बस आणि गावच्या रस्त्याच्या संयुक्त विद्यमानाने गावातल्या बर्याच जनांना अवकाळीच पृथ्वीवर पाचारण केलं होतं तर काहींना वैकुंठही दाखवलं.
मातोश्री प्रतिष्टानचे गेट आलांडताच मला तहाणं लागल्याचं जाणवलं. 'बिसलेरी' तेंव्हा दहाला होती, पस्तीस रुपयांची स्लिपर,मोजून नऊ महिणे वापरणार्या मला तिचं दुरूनच दर्शन व्हायचं. भवानीनगरच्या बसस्टॉपवर असलेल्या पानपोईत पाणी पिऊ, असं मनोमन ठरवुन आम्ही स्टॉपवर आलो. पाण्यासाठी ठेवलेले तिन्ही रांजण स्वतःच तहाणेने व्याकुळ होते. जवळच असलेल्या कॉर्पोरेशनच्या पाईपावर माझं लक्ष गेलं. त्याला एक कॉकही लावलेला होता. "बरं झालं!"असं म्हणुन कॉकच्या पुढ्यात गुढगा टेकून मी कॉक फिरवला आणि फिरवल्यासरशी अख्खा कॉकच निघुन माझ्या हातात आला. पुढे काही कळायच्या आत एक प्रचंड वेगवान पाण्याचा फवारा माझ्या तोंडावर आदळला तसा क्षणभर जलप्रलयाचा भास मला झाला. नाका तोंडात पाणी जात असतानाच "बाप्या, जातो रे बस आली." असा सुन्याचा निर्वाणीचा संदेश मी ऐकला. बराच वेळ चाचपडत चाचपडत मी पाईपवरचं छिद्र दोन्ही हातांनी दाबुन धरलं.
आता भोवतीचं जग हळूहळू दिसू लागलं होतं. पौढकडे जाणारा हमरस्ता, वाहणांची ये जा , स्टॉपवर ताटकळलेले चेहरे, हॉर्नचे वेगवेगळे आवाज, आणि भर दुपारच्या उन्हात तो कॉर्पोरेशनचा पाईप हातात धरून बसलेला मी. हे पाणी बंद कसं करायचं? हा मोठ्ठा प्रश्न माझ्या समोर होता. त्यात मी स्वतःकडे पाहिलं आणि बधीरच झालो. अंगावर बोटभर जागा सुद्धा कोरडी राहिली नव्हती. पाणीच पाणी चहुकडे. भानावर येऊन त्या गढूळ डबक्यात मी तो कॉक शोधू लागलो.
एव्हाना अडीच झाले होते. कॉलेजीयन्स घोळक्याने खिदळत येत होते. मला मात्र वेगळीच भीती , 'कुणी मला पाहूच नये' यासाठी मी देवाला साकडं घालतं होतो. पण झालं वेगळचं. हे ठिकाण कॉलेजच्या रस्त्याला खेटून असल्याने माझी याचना व्यर्थ गेली. कुणीतरी माझ्याच कानात ओरडलं,
'बाप्या अंघोळ करतोय रे'
झालं..हव्या नको त्या सगळ्या माना माझ्याकडे वळाल्या. बाहेरल्या पेक्षा आता मी आतून भिजत होतो..
मुलींनी आपल्याला असं पाहणं म्हणजे मोठा अपमान होता..त्यातही अशा मुलीनी ज्या स्वतः कधी अंघोळ केल्यासारख्या दिसत नव्हत्या. माझी आवडती, नावडती सगळी माणसं हसून गेली. थांबलं मात्र कुणीच नाही. मी मदार्याच्या माकडा सारखा मिचमिच्या डोळ्यांनी पहात राहिलो.
एका हाताने पाणी आवरायचं आणि दुसर्या हाताने कॉक शोधायचा असं चाललं होतं.
जरा वेळाने एक बाई टुनूक टुनूक चालत माझ्याच दिशेने येताना दिसल्या. बहुदा माझी कीव आल्याने त्या मदतीसाठी येत असाव्यात असे वाटून क्षणभर सुखावलो.
"चौदा नंबरमद्ये सुद्धा एक लिकेज आहे, हे झालं की या तिकडे"
असं म्हणत त्या एका हाताने साडीच्या निर्या सावरत आणि दुसर्या हाताने मला ते ठिकाण अगदी टाचावर करून दाखवत होत्या.मी ही मान उंचावून बघितल्या सारखं केलं, माझ काही उत्तर ऐकण्याआधीच त्या ........टुनूक टुनूक......... गेल्याही.
मग एक मोटरसायकल कच्च करुन ब्रेक दाबत माझ्या समोर थांबली.
" ये मुर्खा इकडं बघ जरा'
गाडीवरुन खाली उतरत तो बोलला. माझ्या बाजूला असणार्या विजेच्या डी. पी चा बॉक्स बंद करत तो पुन्हा म्हणाला,
'पाणी उडालं ना याच्यावर, जळून मरशील ..बंद कर ते'
आणि गेला सुद्धा.
मी मनातून घाबरलो होतो. पाण्याचा पसाराही वाढला होता. ओघळ थेट समर्थ हॉटेलकडे चालला होता.
मी देवाचा धावा करु लागलो आणि अचानक तो कॉक हाताला लागला.
मी लगोलग कॉक बसवू लागलो. पण त्याच्या थ्रेडचाच प्रॉबलेम होता, तो काही केल्या बसेना. या प्रयत्नात पाणी मात्र मिळेल तशी वाट काढून मला भिजवत होतं. कोण जाणे कसं
पण लक्षात आलं आणि मी खिशातला रुमाल काढून त्याची त्रिकोणी घडी केली. पाईपाला रुमाल बांधला आणि कॉक त्यावर ठेऊन सर्व शक्तीनीशी मुठ आवळून हातानेच ठोका मारला. कॉक बसला पाणी थांबलं.
मी रिक्षा करुनच शिवाजीनगर गाठलं. बस उभीच होती. आत बसलो आणि मनातल्या मनात त्या रुमालाचे आभार मानू लागलो. पुढे आयुष्यात अशाच रुमालांनी खूप साथ दिली मला, जेंव्हा जवळचं कुणीच नसायचं.... दु:खाचे गहिवर आवरायला.
-----------------------------------------------------------------शाम
मस्त लिहिलयं ,
छान लिहिलय. आवडलं.
छान लिहिलय. आवडलं.
रुमालाची खुप सुंदर आठवण. इतकं
रुमालाची खुप सुंदर आठवण. इतकं सगळं होत असताना सुद्धा तो नळ तसाच वाहता ठेऊन न जाता, जिद्दी ने ते पाणी थांबवून मग बस घेतली हे फारच कौतुकास्पद.
लिखाणतली honesty आणी innocence खूप touching होते.
तिच्या अनियंत्रीत डौलदार
तिच्या अनियंत्रीत डौलदार रुपामुळं तिला दुसरा मित्र नव्हता आणि मी कॉलेजात नविन असल्याने मला दुसरा पर्याय नव्हता.पण मनाने खूपच चागंली होती.>>
आपण पु ल आहात.
छान लिहिलय. अजुन वाचायला
छान लिहिलय. अजुन वाचायला आवडेल.
पाहुणे अडकले, अर्धे खुर्चीत
पाहुणे अडकले, अर्धे खुर्चीत अन् अर्धे वर.>>>
वाचतोय
घरगुती प्रयत्न संपल्या नंतर
घरगुती प्रयत्न संपल्या नंतर मारुती सुतार आठवला. त्याच्या वयाने त्याची उठबस थांबवली असल्याने पाहुण्यांनाच तिकडे नेण्याचे ठरले. विसर्जनाला गणपती न्यावा तसं खुर्चीसकट पाहुण्यांना मारुती सुताराकडे नेण्यात आलं आणि तेंव्हा कुठं गावाला त्या खुर्चीचं दर्शन झालं होतं>>>
अ श क्य
बाहेरल्या पेक्षा आता मी आतून
बाहेरल्या पेक्षा आता मी आतून भिजत होतो..>>> सॉलीड वाक्य
.त्यातही अशा मुलीनी ज्या स्वतः कधी अंघोळ केल्यासारख्या दिसत नव्हत्या. माझी आवडती, नावडती सगळी माणसं हसून गेली. >>> अगगगग!
अफाट आहात, वाचतोय.
पुढे आयुष्यात अशाच रुमालांनी
पुढे आयुष्यात अशाच रुमालांनी खूप साथ दिली मला, जेंव्हा जवळचं कुणीच नसायचं.... दु:खाचे गहिवर आवरायला.>>
शाम अन गझल
एकच शब्द!
ज ब र द स्त
बाकी काहीही बोलत नाही.
-'बेफिकीर'!
छानच लिहिलेय.. आणखी लिहा शाम.
छानच लिहिलेय.. आणखी लिहा शाम.
सुंदर आणि साधी सरळ, मनाला
सुंदर आणि साधी सरळ, मनाला स्पर्शुन गेली
तुझी लिहीण्याची स्टाईल
तुझी लिहीण्याची स्टाईल आवडली.
आणखी वाचायला नक्की आवडेल.
तुमची लिहण्याची पद्धत,
तुमची लिहण्याची पद्धत, त्यातला प्रामाणेकपणा खूप आवडला.
प्रसंग डोळ्यासमोरे उभा राहिला..
पाहुणे अन सावकाराची खुर्ची..:))
आणखी लिहा..
छान लिखाण. आवडलं.
छान लिखाण. आवडलं.
आवडले.
आवडले.
श्री ,दिनेशदा, निराली ,
श्री ,दिनेशदा, निराली , चैत्रा, manasmi18, prafullashimpi , अनिलभाई ,एक मुलगी, सावली, स्वाती
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद!!!
मला ही ललित लिहायला आवडतं , आणि इतका दर्दी वाचकवर्ग मिळाल्यावर कोण नाही लिहणार?
...नक्कीच आणखी लिहण्याचा प्रयत्न करीन.
बेफि..खूप चवीनं वाचलतं त्या बद्द्ल विशेष आभार!!
पु ल ?..लाजवताय हं! पण तुमच्या भावनेचा खूप आदर आहे मला आणि तुमचाही.
मस्त लिखाण.
मस्त लिखाण.
आवडल छोटे छोटे पंचेस मस्त
आवडल
छोटे छोटे पंचेस मस्त जमलेयत. शैली उत्तमच.
मस्त लिहीलय!
छान आहे, आवडलं, प्रसंग
छान आहे, आवडलं, प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.
अजून लिहीत रहा. 
खूप सुंदर लिहिलंय
खूप सुंदर लिहिलंय
चांगलं लिहीलंय.
चांगलं लिहीलंय.
शाम, मस्त लिहिलंय अगदी. खूप
शाम,
मस्त लिहिलंय अगदी. खूप आवडलं..
मस्त.. छान लिहिलय..
मस्त.. छान लिहिलय..
मस्तच
मस्तच
>>विसर्जनाला गणपती न्यावा तसं
>>विसर्जनाला गणपती न्यावा तसं खुर्चीसकट पाहुण्यांना मारुती सुताराकडे नेण्यात आलं आणि तेंव्हा कुठं गावाला त्या खुर्चीचं दर्शन झालं होतं.
हे मात्र डोळ्यासमोर आलं अगदी
मस्त लिहिलंय.....पु.ले.शु.
छान लिहीलं आहे. सगळे प्रसंग
छान लिहीलं आहे. सगळे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. लेखन शैली मस्त आहे. लिहीत रहा. पुढील लेखनास शुभेच्छा!
जेंव्हा जवळचं कुणीच
जेंव्हा जवळचं कुणीच नसायचं.... दु:खाचे गहिवर आवरायला.
छान लिहिलं आहेस. पुलेशु
शीर्षक वाचून पहिले जरा घाबरत
शीर्षक वाचून पहिले जरा घाबरत घाबरतच हा धागा उघडला. म्हटल आणखी एक पुण्या वरचा लेख!! आंतरजालीय हाणामारीचा दुसरा यशस्वी आठवडा
वगैरे वाचायला मिळतय का काय. पण वाचून मजा आला.
मस्ताय शांतारामा. पुलेशु
मस्ताय शांतारामा.
पुलेशु
Pages