एकंदर प्रकार असा झालेला होता की उमेश आणि नितु यांच्यात मैत्री असण्यात आपटे कुटुंबियांना अडचण नाही हे वाड्याला समजलेले होते आणि राईलकरांना कधी अडचण नव्हतीच!
या कालावधीत बिचारा आप्पा चौकात झोपणार म्हणून विन्याने त्याला आपल्याकडे झोपायला ठेवून घेतले.
आणि वाड्यात एक नवी कोरी करकरीत सुखद बातमी मिळाली. राहुल्याची मोठी बहीण शैलाताईचे लग्न जुळले, ठरले आणि तोंडावरही आले.
कर्हाडचा एक मुलगा आणि त्याचे आईवडील व मोठा भाऊ येऊन तिला बघून गेले. बघितल्या बघितल्याच पसंती झाली आणि बैठकही तिथेच!
केवळ बाराव्या दिवसावरच चांगला म्हणजे अतिशयच शुभ मुहुर्त असल्याचे मुलाच्या पुरोहित वडिलांनी तेथेच सांगीतले. राहुल्याच्या वडिलांची सहा वर्षे घरात अर्धांगवायू सोसण्यात गेलेली होती. त्यांना जणू संजीवनीच मिळाली. आजवर जिला जन्म देऊन, खूप कौतुके करून आणि जिवापाड जपून वाढवले आणि जिला अजून कुणीच पसंत न केल्यामुळे ही काही इतक्यात सासरी जाणार नाही असे वाटत होते त्या शैलाला केवळ बाराव्या दिवशी सासरी पाठवायचे?
एका डोळ्यात हसू आणि दुसया डोळ्यात अश्रू घेऊन वावरू लागले सगळेच!
काय करावे तेच कुणाला समजत नव्हते. मुलाकडच्यांची चौकशी केलेली होती. घर चांगले असल्याचा निर्वाळा दोघांनी दिलेला होता. आता प्रश्न इतकाच उरलेला होता की शैला कायमची कर्हाडला जाणार! त्यामुळे शैला तर आता आईला आणि राहुलला सोडतच नव्हती क्षणभरही!
शैलाच्या चेहर्यावर आलेली लकाकी पाहून वाड्यात तिची थट्टा सुरू झालेली होती. सुखावत असतानाही लटक्या रागाने आणि लाजून शैला तिथून पळ काढत होती. तिला आता विद्यासुद्धा चिडवू लागली होती.
राहुलने सजावटीची तयारीही सुरू केली. बजेट व्यवस्थित होतेच! फक्त वडील अर्धांगवायूने आजारी असल्याने कन्यादानाला थोरले काका येणार होते आणि वडिलांना बसता येणार नव्हते इतकेच काय ते दु:ख!
शैलाताईचे लग्न ठरले तशी वाड्यातील सर्व ऐतिहासिक भांडणे तात्पुरती नष्ट झाली. वाड्यातील प्रत्येकाने त्या दिवशी आणि आदल्या दिवशी रजा टाकून ठेवली. केळवणे आणि आहेर यांचा वर्षाव सुरू झाला. बायका एकत्र जमून रुखवत आणि अनंत प्रकारच्या तयारीला लागल्या. साड्यांच्या चौकश्या आणि कौतुके यांनी वाडा गजबजला. दागिन्यांना अनेक महिन्यांनी सूर्यप्रकाश दिसला.
आप्पा, विन्या, उमेश, वर्षा, क्षमा आणि विद्या हे तर घरचे कार्य असल्यासारखे राहुलच्याच घरी वावरू लागले. त्यांनी प्रचंड जबाबदारी उचलल्यामुळे कित्येक कामे चुटकीसरशी होऊ लागली. राहुलच्या घरी आता रोज किमान वीस पान उठू लागले एका वेळी! त्यातच बाहेरगावचे पाहुणे आले. त्यांची मुले वाड्यातल्या मुलांची मित्र बनली.
रात्र रात्रभर जागरणे सुरू झाली. सगळा वाडा जागाच राहत असल्यामुळे आता चौकात सगळेच जमून गप्पा मारायचे. दोन अडीच वाजता जांभयांचे संसर्गजन्य रोग झपाटू लागले की मगच पांगापांग व्हायची. राहुलच्या वडिलांनाही खाली चौकात आणले जायचे उचलून! आणि शैला?
सर्व आनंदाच्या बरसातीला इवल्याश्या मनात माववायचा प्रयत्न करत्त असतानाच कुणाचे लक्ष नाही असे बघून हळूच डोळे टिपायची आणि आईला बिलगायची.
या प्रकारात आप्पाने केलेली मदत पाहून आणि त्याला वाड्यात असलेले प्रचंड महत्व पाहून त्याच्या वहिनीने थक्क होऊन त्याला परत घरात बोलावले. तिला मिठी मारून ढसाढसा रडला आप्पा! आईच्या जागी होती ती त्याला! आईही नव्हती आणि वडीलही नव्ह्ते. त्यामुळे दादा आणि वहिनी हेच आई वडील झालेले होते. वहिनी मोठी असूनही तिने चूक कबूल केली. त्यानंतर भूमकर काकूंनी तोंडाचा पट्टा सोडला आणि आप्पाच्या वहिनीचा पाणउतारा केला. सगळ्यांनी तो चूपचाप ऐकून घेतला.
शैलाताईच्या लग्नामुळे एक मोडलेले घर पुन्हा व्यवस्थित बसले होते ..... आणि....
.... एक जुळू पाहणारे घर ..... अतिशय... अतिशय वेगात जवळ येऊ लागले.....
आता रात्री एकमेकांना 'झोप' असे कागदावर लिहून दाखवणे शक्यच नव्हते,. कारण पै पाहुण्यांमुळे गजबजलेल्या वाड्याच्या चौकात रात्री किमान बारा चौदा जण झोपायचे.
आता एकमेकांशी बोलायचे म्हंटले तरीही खासगी बोलणे शक्य नव्हते कारण आजूबाजूला सतत कुणी ना कुणीतरी असायचेच!
मात्र एक गोष्ट होत होती.
या गजबजाटात होत असलेली नजरानजर आता अधिक तीव्र होत होती, अधिक वारंवार होऊ लागली होती. इतकी, की वाड्यातील लहान मुलालाही समजावी.
नितु आणि वर्षाला कुणी काही काम सांगीतले की काही ना काही कारण काढून उमेशही त्यांच्याबरोबर निघायचा. तो एकटाच कुठे जात असला तर 'सहज विचारले' असे दाखवून निवेदिताही त्याच्याबरोबर कोपर्यापर्यंत जाऊन यायची. एक मदहोश नाते फुलत होते, क्षणोक्षणी!
चुकून दोघे भेटले आणि कुणी आजूबाजूला नसलेच तर उमेश काहीतरी बोलून नितूचे मन सैरभैर करायचा. मग ती तिथून पळ काढायची. सिंहगडचा तो क्षण पुन्हा आणण्याची मागणी तर उमेशने कैक वेळा केली तिच्याकडे, पण अस्पष्टपणे, अंधुकपणे आणि तिसर्याच शब्दात! तो असे काही बोलला की ती गोरीमोरी व्हायची, पण गडबडीत कुणाचे तिकडे लक्षच नसायचे.
आणि आज तर क्षमाने वर्षा, विद्या आणि निवेदिताला स्वतःच्या घरी बोलावले झोपायला. गप्पा मारत म्हणे झोपू इथेच!
अर्थातच आजोबा आणि उमेशची रवानगी चौकात झाली. त्यातच पाहुण्यांपैकी कुणीतरी रात्री बारा साडेबाराला चक्क एक टेप लावली.
आयुष्यात पहिल्यांदाच उमेशने इतका मुलायम आवाज ऐकला. त्याला आत्तापर्यंत रफी, मुकेश आणि किशोर इतकेच माहीत होते. असेही कुणी गाते आणि अशीही काही गाणी असतात हे पहिल्यांदाच कळले.
जिस रस्तेसे तू गुजरे वो फुलोंसे भरजाये
तेरे पैरकी कोमल आहट सोते भाग जगाये
जो पत्थर छूले गोरी तू वो हीरा बनजाये
तू जिसको मिलजाये वो होजाये मालामाल...
एक तूही धनवान है गोरी.... बाकी सब कंगाल..
लक्षपुर्वक ऐकू लागला उमेश! थंड हवा, मंद दिवे, चौकातील ऐसपैसपणा, डोळ्यांच्या पापण्यांवर गोंधळून थांबलेली झोप आणि चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल सारखी गीते!
'गझलसे पहले... इक कत्तअ पेश है'
मग टाळ्यांचा कडकडाट!
"हा कुणाचा आवाज आहे हो?"
"माहीत नाही? पंकज उधास"
उमेशने ते नांव पहिल्यांदाच ऐकले होते. साखर घातलेले लोणी कानातून आत सोडावे तसा आवाज, साधेसाधे शब्द आणि दर्द!
लहराके झूम झूमके ला... मुस्कुराके ला
फुलोंके रसमे चांदकी किरने मिला के ला
कहते है उम्रे-रफ्ता कभी लौटती नही
जा मयकदेसे मेरी जवानी उठा के ला
व्वा व्वा! मयकदा? हा माणूस चक्क दारूवर गझल म्हणणार?
नही देखे साकीने हमसे शराबी
के मयखानेमेभी गये पीते पीते
न समझो के हम पीगये पीते पीते
के थोडासा हम जीगये पीते पीते
लाईव्ह कन्सर्टमध्ये टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत असल्यामुळे तर आणखीनच रंग भरत होता. ज्याची टेप होती तो सुद्धा झोपला तरीही उमेश जागाच राहिला.
सिर्फ इक बार नजरोंसे नजरे मिले
और कसम टूट जाये तो मै क्या करू
सबको मालूम है मै शराबी नही
फिरभी कोई पिलाये तो मै क्या करू
उमेशने ठरवलेच! उद्यापासून ही टेप विकत आणून रोज म्हणजे रोज ऐकायची! अशक्य गाणी आहेत ही!
अणि पापण्यांवरील गोंधळलेल्या झोपेला आत घेताना त्याला जाणवले... आपल्या डोक्यापाशी काहीतरी पडलंय!
सर्रकन शहाराच आला त्याच्या अंगावर! किड्यांना फार घाबरायचा तो! ताडकन उठला आणि हातात घेऊन पाहिले तर.........
फूल .... आहिस्ता फेको... फूल बडे नाजूक होते है...
गजरा??????
खाडकन त्याने स्वतःच्याच खोलीकडे पाहिले तेव्हा एक लाजरा चेहरा 'गुडनाईट'साठी हात हालवून अदृष्य होत होता.
आजची रात्र तू बहकशील का
मज आलिंगनी महकशील का
नितु सासरी आल्यासारखी वागत होती त्या घरात!
आणि एकदाची सीमांतपूजनाची रात्र उजाडली.
काय ती रडारड!
माणसे नटून थटून रडत होती.
वाड्यातील प्रत्येक घरात जाऊन शैला 'येते' म्हणून रडत होती. ते पाहून त्या घरातील प्रत्येक माणूसही रडत होता.
कित्येकांनी तिला तिच्या जन्मापासून पाहिलेले होते. सगळेच अनावर!
आपल्या पांगळ्या झालेल्या वडिलांच्या मात्र अंगावर कोसळलीच शैला! तिला उठवणेही शक्य नव्हते आता!
राहुल तर वाड्याच्या बाहेरच जाऊन उभा होता. एका भिंतीपाशी, अबोलपणे डोळे पुसत!
आणि अचानक क्षमाने उमेशला सांगीतले..
"दादा, राहुलदादा रडतोय... बाहेर..."
आप्पा, विन्या आणि उमेश सगळेच पळाले. पाठोपाठ निवेदिता, वर्षा, क्षमा आणि शैलाही!
ताईला पाहिल्यावर मात्र राहुलने लहान मुलासारखी मिठी मारली तिला.
आणि शेवटी एकदा त्या वाड्याने आपल्या मुलीला कार्यालयात जाण्याचा धीर पुरवला.
अत्यंत जुनाट असलेल्या त्या कार्यालयाला मजले मात्र दोन होते. आणि वरच्या मजल्यावर आता शैलाची थट्टा सुरू झाली. कारण खालच्या मजल्यावर कर्हाडहून आलेले वर्हाड होते. पन्नास एक माणसे आलेली होती.
शैलाची कुणी थट्टा केली की नितु पटकन उम्याकडे पाहायची आणि पुन्हा मान फिरवायची! हे तर कित्येक दिवस चाललेलेच होते. आप्पाचा पुतण्या अभि इतका लहान असूनही आज चक्क त्याला सगळ्यांबरोबर आणि विद्याच्या हवाली देऊन सोडण्यात आलेले होते. त्याच्याशीही खेळण्यात सगळ्यांचा वेळ जातच होता. शेवटी मात्र तो रडायला लागला तसे आता त्याला घरी नेऊन सोडणे आले.
कुणीतरी म्हणाले..
"उम्या... तू जारे नितुला घेऊन.. याला घरी सोडून या..."
उम्या पटकन आणि नितु 'छे छे, मला जायचंय असं काहीच नाही' असा चेहरा करून उठले तेव्हा कुणीतरी पचकले..
"आणि त्याला घरी सोडून तुम्ही इथेच या बर का? नाहीतर पुण्यात फिरत बसाल"
अभिला सोडायला आप्पा का जात नाही आहे हा प्रश्न पडल्यावर विद्या म्हणाली...
"पण आप्पादादा जाईल की? "
तिला अजून नितु - उमेश प्रकाराची फारशी कल्पना नव्हती, कारण ती लहान होती या सगळ्यांपेक्षा!
आप्पा म्हणाला... "मला वैताग आलाय... जाऊदेत यांनाच"
शेवटी एकदाचे युगुल त्या बाळाल अघेऊन निघाले!
अबोल रस्ते, अबोल दोघे, अबोल धुंदी... !!!
अभि आता उमेशच्या कडेवर झोपलेला होता. उमेश त्याला उचलून वैतागलेलाही होता आणि दमलेलाही होता.
"मी घेऊ का त्याला?"
"नको... नंतर मला तुला घ्यायची वेळ यायची येताना"
फूटपाथवर बसून हासली निवेदिता!
"चल आता बावळट, ही काय हासण्याची वेळ आहे?"
"मग कसली वेळ आहे?"
"मला तुला बरेच दिवसांपासून एक प्रश्न विचारायचाय"
"इजाजत है"
"तू इतकी सुंदर कशी?"
"इतकी म्हणजे किती?"
"म्हणजे जेवढी आहेस तेवढी"
"म्हणजे केवढी?"
"प्लच... "
"सांग ना?"
"म्हणजे... इतकी प्रचंड सुंदर कशी?"
"मन सुंदर असलं की आपोआप माणूस सुंदर होतो"
"मार खायची वेळ येणार आहे आता तुझी, बाकी काही नाही"
त्याला चिडवत नितु हासत हासत चाललेली होती. आणखीन चिडवण्यासाठी म्हणाली:
"मीही आत घरीच झोपते... नाही का? परत परत काय चालायचं?"
उम्या हिरमुसला!
"घरीच झोपणार असलीस तर याला घेऊन जा की मग? मला कशाला ताबडवतीयस?"
पुन्हा हासली ती!
"परवा गजरा फेकला तयला माझा चाप होता... तो दे..."
"जमणार नाही"
"म्हणजे?"
"म्हणजे देणार नाही..."
"अरे माझ्याकडे तीनच चाप आहेत.. "
"माझ्याकडे तर एकही नाहीये.. बरे झाले एक मिळाला"
खुसखुसत नितुने विचारलं!
"आणि करणार काय त्या चापाचं?"
"ठेवणार... एक आपली आठवण.. "
"मला वाटलं केस वाढवणार आणि लावणार की काय?"
"तुझं आणि माझं फारसं जमेल असं वाटत नाही"
खदाखदा हासत नितुने उम्याच्या या सात्विक संतापाची खिल्ली उडवली.
"ए आत्ता मी वाड्याच्या आत नाही येत बाई"
"का?"
"कुणी पाहिले तर? आपण दोघंच रात्रीचे भटकतोय म्हणतील"
"म्हणजे तू परत येणारेस तर..."
"नको येऊ का?"
"बघ बुवा.. "
"नालायक"
"का? तू बोललेलं चालतं का?"
वाड्यात हळुच अभिला त्याच्या आईकडे सोपवून उम्या सशासारखा बाहेर आला. आप्पाच्या वहिनीने त्यातल्यात्यात चौकश्या केल्याच, पण नितुही आली आहे हे कळूच दिलं नाही त्याने तिला!
आणि मगाचपेक्षा अधिक बेहतरीन प्रवास सुरू झाला.
रात्रीचा एक! थंड हवेचे ठिकाण असलेले पुणे आत्ता स्वप्नांच्या दुलईत निजलेले होते.
आणि मग हळूच उम्याच्या उजव्या हाताची करंगळी नितुच्या डाव्या तळव्याला लागली. तो स्पर्श तसाच ठेवायची अबोल परवानगी नितुने दिल्याचे उम्याच्या लक्षात आले. आता भाषा स्पर्शांची होती.
निवेदिताचा तळवा त्या थंड हवेतही शरमेच्या घामाने ओथंबलेला होता. ओठ थरथरत होते. उमेश स्वतःलाही ओळखू येणार नाही अशा मनस्थितीत पोचलेला होता. घडत आहे त्यावर त्याचाच विश्वास बसत नव्हता. शैलाताईचे लग्न ठरले नसते तर हा क्षण आपण कधीच अनुभवू शकलो नसतो हे त्याला प्रकर्षाने जाणवत होते.
हळूहळू हातात हात गुंफले गेले. निवेदिता आता उमेशकडे बघूही शकत नव्हती. दोघांनाही सिंहगडच्या त्या क्षणाची आठवण येत होती.
आणि शनीपार ओलांडल्यानंतर एका अंधार्या कोपर्यात अचानक सहन न होऊन उमेशने रस्त्यातच थबकत नितुला जवळ ओढले.
कितीतरी क्षण एकमेकांचा उष्ण नि:श्वासांचा गंध स्वतःच्या श्वासात भरून घेत तसेच उभे राहिले.
त्यातच निवेदिताने दूर जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जो करायला नको होता. कारण ती दूर होत आहे या जाणिवेने आक्रमक होऊन उमेशने तिला आपल्या मिठीत खेचले.
पुन्ह एकदा सिंहगडावरचा तो क्षण अवतरला!
सुटायची निष्फळ धडपड करत शेवटी निवेदिता सामावून गेली. धगधगते स्पर्श असह्य होत होते दोघांनाही!
केव्हातरी भान आले. विस्कटलेले केस आणि उमेशचे मिसरूड बोचल्याने अस्वस्थ होत निवेदिता झरझर पावले उचलू लागली. स्वर्गाच्या दारात जाऊन आलेला उमेश आता अबोलपणे मागून एक एक पाऊल उचलू लागला.
कार्यालयाच्या दारात मात्रे एकच क्षण नितु थांबली आणि तिने मागे पाहिले. मंत्रावल्याप्रमाणे मागून चालत आलेल्या उमेशकडे पाहून एक खट्याळ स्मितहास्य करत.... तिने दारातून आत पाऊल टाकले तर...
"झुमो .... झुमो... झुमो.... "
हातात बाटली घेऊन, कंबरेत वाकून, नितुकडे लाल भडक डोळ्यांनी पाहताना पागल झालेला तो माणूस निवेदिताला नाचण्याची फर्माईश करत होता.
संपूर्ण भावविश्वाला अचानक असा हीन तडा गेल्यामुळे अवाक झालेली निवेदिता क्षणभर तेथे थांबली आणि तिने जिन्यावरून वर वधुपक्षाकडे पळ काढला. शेवटचे दृष्य तिने पाहिले तेव्हा...
अतिशय संतापलेला उमेश खाडकन त्या माणसाच्या कानाखाली वाजवत होता आणि...
... ते दृष्य सहन न झाल्यामुळे... वरून वधूपक्षाच्या गॅलरीत असलेली शैलाताई खच्चून ओरडत होती...
"उ... मे..... श"
वरपक्षाला तसेच अवाक ठेवत दोघे वर धावले तेव्हा शैलाताई ओक्साबोक्शी रडत होती आणि सगळे तिला समजावून सांगत होते...
मात्र शैलाताईने उठून उमेशलाच एक लगावली आणि रडत रडतच ओरडून म्हणाली...
"नवरा मुलगा आहे तो.... काय केलंस तू???"
तोवर मागून विनित राहुलच्या आईला आणि काकांना घेऊन धावत धावत आला.. नशीब हे तिघे वेगळ्या रस्त्याने वाड्यातून कार्यालयात आले... नाहीतर त्यांना उमेश आणि निवेदिता दिसलेच असते...
तोवर नवरा मुलगा आणि वरपक्षातील बहुतेक सगळे वर आलेलेच होते...
अर्थातच खूप मोठा इश्यू करून.....
.... वरपक्षाने चक्क... लग्न मोडले...
मग मात्र राहुल, शैलाची आई, शैला स्वतः आणि आप्पा यांनी त्यांना असे काही झापले की आता खरच पोलिसांना बोलवणार असे वाटून वरपक्षातील काही मंडळी पळून गेली कार्यालयाच्या बाहेर...
.. आता मात्र विन्या आणि उमेश या दोघांनी नवर्या मुलाला फटकेच टाकायला सुरुवात केली..
तोवर वाडाच लोटला तिथे..... आपटेही आले होते... त्यांनी नवरा मुलगा आणि वरपक्षातील आणखीन चौघांना चक्क चौकीवरच नेले..
एका पुरोहिताचा मुलगा व्यसनी आणि मवाली निघालेला होता... कार्यालयात शुभ प्रसंगाऐवजी स्मशान शांतता पसरलेली होती...
निवेदिता स्वतःलाच अपराधी मानून रडत होती... शैलाताईचे आणि स्वतःच्या आईचेही भकास रडणे पाहून आता राहुलही रडू लागला होता... सर्व स्वप्ने मोडलेली होती... अशा काळात, जेथे एक लग्न मोडले आहे म्हंटल्यावर त्या मुलीला इतर स्थळे पाहात सुद्धा नाहीत अशा काळात हे लग्न मोडलेले होते...
आणि शैलाने आता उठून उमेशला फडाफडा मारायला सुरुवात केली... तिला विनित आणि तिचे काका समजावून सांगत होते की असा मुलगा न मिळालेलाच चांगला आहे... पण ती मनाने कोलमडलेली होती बिचारी... आणि उमेश एक आवाजही न काढता फटके सहन करत होता... शेवटी राहुलनेच ताईला थांबवले...
"माझ्या मुलीचं आयुष्य नासलं...."
असे म्हणून शैलाच्या आईने हंबरडा फोडला...
"कोण करणार आता लग्न शैलुशी??"
आईच्या या प्रश्नाचे कोणाकडेही काहीही उत्तर नव्हते..... फक्त.....
...... फक्त एकच माणूस सोडून....
थक्क करणारे वाक्य टाकले त्याने....
"तुमची तयारी असली तर..... मी.... म्हणजे... मी... शैलाशी... ल.. ग्न करायला तया..... र... आहे"
अवर्णनीय नजरा आप्पाकडे वेडावल्यासारख्या बघत होत्या.... आणि त्यात एक नजर... शैलाचीही होती...
दुसर्याच दिवशी शैला सासरी गेली.... सासरी गेली म्हणजे.... सासरी 'आली'
कालच्याही पेक्षा आज वाडा अधिक सजलेला होता...
.... आप्पाची वहिनी गेली कित्येक वर्षे नजरेसमोर असलेल्या शैलाला कौतुकाने आपल्या घरात सामावून घेत होती... आप्पा आणि शैला तर एकाच वयाचे होते... लहानपणापासून एकत्र खेळलेले होते...
शैलाच्या वडिलांना तर आनंद सहनच होत नव्हता...
... राहुल, विन्या आणि उम्या... 'शैलाच्या नव्हे' ... तर.... आप्पाच्या लग्नाची पार्टी म्हणून...
आज प्यासाला आलेले होते....
........ आणि त्याच वेळेस....
निवेदिता आपल्या वडिलांच्या संतापी प्रश्नांना उत्तर देता देता आईचा मार खात होती...
"तू कशी काय होतीस इतक्या रात्री उमेशबरोबर?????"
=============================================
कृपया कथानक वाचल्याचे कळवू नये.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
मागील ११ भाग भराभर पुन्हा
मागील ११ भाग भराभर पुन्हा वाचुन येतो....
कृपया कथानक वाचल्याचे कळवू
कृपया कथानक वाचल्याचे कळवू नये. >>>>
का? आम्ही कळवणार आणि आवडल्याचेही सांगणार.
धन्यवाद.... सावरी
धन्यवाद....
सावरी
hi.how are you.is it raining
hi.how are you.is it raining in Pune?
मस्त !!!..
मस्त !!!..
मस्त. ट्विस्ट आवडला
मस्त. ट्विस्ट आवडला
हे भगवान आता पुढे? बेफिकीर
हे भगवान आता पुढे?
बेफिकीर ट्च कायम राखला आहे. मनाला उद्याच्या भागाची हुरहुर लावुनच शेवट केला आहे.
सहीच.......
झक्कास झाला हा पण भाग......
छान
छान
सहिच झालाय हा भाग ..आता
सहिच झालाय हा भाग ..आता पुन्हा वाट बघा पुढे काय होतय याचि.....:)
सुरवातीचा आनंदी क्षण.... . .
सुरवातीचा आनंदी क्षण....
. . . . . आणि . . . . .
शेवटी आतुरता . . . पुढील भागाची.
मस्त . . . . . मस्त
पुढील भाग लवकर येवू देत.
बायकांच्या मनात काय चालु असते
बायकांच्या मनात काय चालु असते ते देवाला सुध्दा ठाउक नसते............मनात एक .....जिभेवर दुसरे....करणार तिसरेच......
जरा पुढिल कथा समजायला आली............पण आमचा अंदाज चुकावा.....हीच अपेक्षा................:)
धन्यवाद! वाचल्याचे सांगणार
धन्यवाद! वाचल्याचे सांगणार नव्हते पण पुढील भाग दिसला नाही की आपोआप प्रतिक्रिया गळुन जाते.
खास खिळवुन ठेवणार हि कथा
खास खिळवुन ठेवणार हि कथा पण.
"कृपया कथानक वाचल्याचे कळवू नये. " सोडुन बाकी सारे आवड्ले.
lai bhari
lai bhari
माफ कर कथा वाचलि. पण पुढील
माफ कर कथा वाचलि. पण पुढील भाग कधि येईल???????
मस्त . . . . . मस्त पुढील भाग
मस्त . . . . . मस्त
पुढील भाग लवकर येवू देत.
खुप उशिर होतो पुढील भाग यायला वाचायचि खुप वाट पाहावि लागते.
सहिच...
सहिच...
खुप उशिर होतो पुढील भाग यायला
खुप उशिर होतो पुढील भाग यायला वाचायचि खुप वाट पाहावि लागते..... अनुमोदन
पुढे काय होते नितुचे फार
पुढे काय होते नितुचे फार उत्सुकता आहे. पुढ्चा भाग कधी ?
ठिके! नाही कळवत कथानक
ठिके! नाही कळवत कथानक वाचल्याचं...पण आवडल्याचं तर कळवू शकते ना?
भाग ८ ते १२ सलग...आवडले!!!!
पुढचा भाग आवडण्याच्या उत्सुकतेत... 