८ मार्च २०११ रोजी सगळा देश - नव्हे - अखिल विश्व जागतिक महिला दिन साजरा करत असतानाच राजधानी दिल्लीत राधिका तन्वर या कॉलेज तरुणीला एका युवकाने गोळी घालून ठार केल्याच्या वृत्ताने सगळा देश हादरला.
"सगळा देश हादरला" असं लिहीण्याची पद्धत असते. कारण असले प्रकार आजकाल इतके सर्वसामान्य झाले आहेत की कुणी हादरत वगैरे नाही. एका सहकर्मचार्याची प्रतिक्रिया अगदी प्रातिनिधिक म्हणावी लागेल. "असेल काहीतरी प्रेमाबिमाचं लफडं, सोड यार".
सुदैवाने चार दिवसांत पोलीसांनी यशस्वी(!) तपास करुन खुन्याला अटक केली. विजय उर्फ राम सिंग हा तो खूनी. पोलीसांनी नेहमीच्या पद्धतीने चौदावं रत्न दाखवून त्याची चौकशी केली तेव्हा जे उघड झालं ते समजल्यावर मात्र हा विषय डोक्यातून जाईना.
उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील राम सिंग हा राधिकाच्या घराजवळच असणार्या एका शिवणकाम कारखान्यात कामाला होता. राधिकाचा पाठलाग करणे आणि तिला छेडणे हा त्याचा आवडता छंद होता. तसंही मुलींना अशा प्रकारे त्रास देणे हे प्रकार नवीन नव्हते, पण त्याचा राधिकावर विशेष "जीव" असावा. असाच एकदा राधिकाचा पाठलाग करत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच राधिकाने धावत रस्त्यातच उभ्या असलेल्या काही लोकांना गाठले आणि "तो माणूस मला छेडतोय" अशी आरोळी ठोकली. एखादा चोर, मुलींना छेडणारा नि:शस्त्र गुंड असे कोणी तावडीत सापडले की हात साफ करायला लोक टपलेलेच असतात. अर्थातच त्या लोकांनी मग "लडकी को छेडता है" किंवा तत्सम डायलॉग मारत त्याला बेदम चोप दिला. अशा अनेक गोष्टी कानावर आल्याने राम सिंगला कामावरुन काढून टाकण्यात आले. असेच काही दिवस गेले पण राम सिंग राधिकाचा पाठलाग करणे आणि तिने स्पष्ट नकार दिल्यावरही तिच्याकडे आपल्या एकतर्फी "प्रेमाची" कबूली देणे सोडेना.
नोकरी गेल्याने राम सिंगने मुंबई गाठली आणि तिथे रोजगार शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्याच्या विकृत डोक्यातून राधिकाचा विचार जाता जाईना. त्याने वारंवार दिल्लीला येऊन राधिकाच्या मागावर राहणे सोडले नाही. एकदा राधिका बस मधून उतरून पादचारी पुलावरून जात असताना पुन्हा त्याने राधिकाला गाठले आणि त्याच्याशी लग्न करण्याची गळ घातली. तिच्याही मनात त्याच्याविषयी 'प्रेमभावना' असल्याचा त्याचा समज होता. तसं बोलून दाखवल्यावर राधिकाने तिथेच त्याच्या श्रीमुखात भडकावली. आता हा आपल्याला त्रास देणार नाही अशा समजूतीत असलेल्या राधिकाला मात्र राम सिंगच्या मनात भडकलेल्या सूडाग्नीची कल्पना कशी असावी?
विजय उर्फ राम सिंगने आपला सूडाग्नी शमवण्यासाठी राधिकालाच संपवण्याचा घाट घातला. त्याने सरळ गुरगाव गाठले आणि तिथून दोन हजार रुपये देऊन एक 'कट्टा' उर्फ गावठि पिस्तूल विकत घेतले. गंमत म्हणावी की दैवदुर्विलास, आपल्या देशात डि.व्ही.डी प्लेअर आणि पिस्तुल या दोन वस्तू एकाच किंमतीत आणि सहजतेने विकत घेता येतात.
पिस्तूल घेऊन पूर्ण तयारीने तो पुन्हा दिल्लीला आला आणि एके दिवशी संधी साधून त्याने राधिकाला गाठले. पुन्हा त्याला झिडकारून राधिकाची पाठ वळताच त्याने खिशातून पिस्तुल काढले. पण लगेच न चालवता जिना सुरू होण्याच्या जराच आधी त्याने तिच्यावर झाडून जिन्यावरुन उतरुन पळ काढला. पुलावर बर्यापैकी वर्दळ असल्याने काही क्षण कुणाला काय झाले ते समजेना. ह्याच गोंधळाचा फायदा घेऊन राम सिंग तसाच पिस्तूल हातात घेऊन पळाला आणि दिल्लीच्या गर्दीत दिसेनासा झाला.
पोलीसांनी तिच्या घरच्यांकडे आणि महाविद्यालयातील मित्रपरिवाराकडे आधी चौकशी केली. मग इतर तपास सुरु झाला आणि राम सिंगच्या खोलीत राहणार्या मित्रांकडून माहिती मिळाल्यावर तपास वेगाने करुन त्याला मुंबईतून अटक केली. राम सिंगला त्याच्या कृत्याविषयी अजिबात पश्चात्ताप नव्हता "माझी बायको नाही झाली तर आता इतर कुणाचीही होणार नाही" असले विकृत समाधान त्याच्या चेहर्यावर झळकत होते.
मला सर्वात जास्त क्लेषकारक वाटलेली बाब म्हणजे राधिकाच्या घरच्यांच्या चौकशीत पोलीसांना जी धक्कादायक बाब समजली ती होय. असे काही प्रकार अनेक दिवस सुरू असल्याचे राधिकाने तिच्या घरच्यांना सांगितलेच नव्हते! मग त्याचं नावही ठाऊक असणं दूरच राहिलं. राम सिंगला जेव्हा अटकेनंतर तिच्या घरच्यांनी पाहिले तोपर्यंत त्यांनी त्याला त्यांच्या घराच्या आसपास बघितलेही नव्हते!! राधिकाने जरी फक्त तिच्या घरच्यांना 'एक माणूस आपला पाठलाग करत असतो आणि आपल्याला छेडत असतो" असं नुसतं सांगितलं असतं तरी पुढची कारवाई करुन पुढची अप्रिय घटना टाळता आली असती.
हे समजल्यावर मनात असंख्य प्रश्नांचे मोहोळ उठले. असे का झाले असावे? याला घरचे वातावरण कारणीभूत असावे का? शक्य आहे. कारण असले प्रकार घडल्यावर "तुझीच काहीतरी चूक असेल" अशी मुक्ताफळे उधळणारे पालक आहेतच की. मुलांना आई-वडीलांची इतकी भीती वाटावी, की छेडछाड आणि पाठलागासारख्या गंभीर बाबीही त्यांना सांगायला संकोचावे? मुलांना - आणि विशेषतः मुलींना) धाकात ठेवण्याच्या प्रयत्नात आपण त्यांना आपल्यापासून दूर करत आहोत ह्याची जाणीव पालक म्हणून आपल्याला राहिली नाही असे झाले आहे का? मुले आणि आई-वडील/एकूणच घरातले यांच्यातला संवाद इतका हरवत चालला आहे का, की आपल्या अब्रू आणि जिवाला असलेल्या धोक्याबाबतही घरच्यांशी बोलावेसे मुलांना वाटू नये? की राधिकाला वाटलं तशी ही बाब गांभीर्याने घेण्याजोगी वाटत नाही अनेक मुलांना? बाहेर घडणारं सगळं आपल्या आई-वडिलांना सांगणारी मुले आहेत, मान्य. पण अगदी काहीच न बोलणारी, थोडंच सांगणारी, किंवा नेमकं महत्वाचं तेच न सांगणारीही मुलं आहेतच की.
विकृत मंडळी जागोजागी असणारच, पण मग मुले असले प्रकार घरी का सांगत नसावीत? काहीही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा विश्वास आपण आपल्या मुलांच्या मनात निर्माण करण्यात अपयशी ठरतोय का?
अशा अनेक राधिका या आधी झाल्या आहेत. पुढेही होतील. पण मुलांच्या मनात विश्वास निर्माण करण्याच्या दिशेने — जेणेकरुन त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकता येतील — आपल्याला काय करता येईल?
>>> त्या मुलीने तो निर्णय
>>> त्या मुलीने तो निर्णय अत्यंत विचारपुर्वक घेतला होता... कधी भेट झाली तर सांगेन
आपला खून करण्याचा प्रयत्न करणार्याशी लग्न करणे हा मला अविचार वाटतो. जर फारसे काही गुपित नसेल तर ती माहिती इथे टाकायला हरकत नसावी.
अरुंधती कुलकर्णी यांचा
अरुंधती कुलकर्णी यांचा "उमलूद्या कळ्यांना....http://www.maayboli.com/node/24827
ह्या लेखामध्ये मी लेखरुपाने प्रतिसाद(हे ४,५ प्रतिसाद म्हणजे मोठे लेखच आहेत) दिले आहेत त्यात
बरीच उत्तरं मिळतील. वेळ मिळाल्यास तो लेख आणि प्रतिसाद वाचणे. लेख पण खूप छान आहे.
सांगली प्रकारातील मुलगी मला
सांगली प्रकारातील मुलगी मला नाही वाटत की विकृत आहे. तिला ऑप्शन नसेल ठेवला म्हणूनच केले असेल लग्न. एकतर इतक्या दादागिरी करणार्या नगरसेवकापुढे तिथे त्याच गावात रहाणे शक्य नसेल किंवा आणखी काहि मानसिक दबावाखाली केले असेल.
नाहितर कशाला कोण लग्न करेल अश्या गुंडाशी..
आणखी एक
आणखी एक राधिका..........अत्यंत भीषण
http://www.naidunia.com/epapermain.aspx
या बातमीतल्या श्रीमती फडकेच्या नातेवाईक ऑफिसमधे माझ्या शेजारी बसतात.
ताजी बातमी...
http://daily.bhaskar.com/article/MP-IND-indore-triple-murder-bhopal-buil...
फेब्रुवारी २००७ मध्ये माझ्या
फेब्रुवारी २००७ मध्ये माझ्या बालमैत्रिणीसोबत ही घटना घडली.
http://news.oneindia.in/2007/02/15/three-arrested-in-lady-doctors-rape-m...
ती जखम अद्याप भरून निघू शकत नाही.
बापरे. त्या तिघांना आजतगायत
बापरे. त्या तिघांना आजतगायत काही शिक्षा झाली की नाही?
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर हल्ला
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 22, 2011 AT 12:45 PM (IST)
Tags: pune, crime
हडपसर - अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करून युवकाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. एकतर्फी प्रेमातून ससाणेनगर येथे बुधवारी सकाळी ही घटना घडली. या मुलीवर हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंकुश सूर्यकांत इंगळेवाड (वय 20, रा. शिंदेवस्ती, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अंकुश भोर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी अंकुशच्या नात्यातील आहे. एक वर्षापासून अंकुशचे तिच्यावर प्रेम होते. तेव्हापासून तो या मुलीला त्रास देत होता. मात्र, तिने त्याला नकार दिला होता. त्याचा राग मनात धरून अंकुशने हे कृत्य केले. ही मुलगी नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ससाणेनगर येथील एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये ती "एमएससीआयटी'चे प्रशिक्षण घेत होती. तेथेच अंकुशची बहीण शिक्षिका आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी नऊ वाजता ही मुलगी तिच्या मामाच्या मुलीसोबत क्लासला गेली. दहा वाजता क्लास सुटल्यानंतर ती इमारतीतून खाली उतरत असताना अंकुशने मागून येऊन या मुलीला मारहाण केली; तसेच चाकूने मानेवर व पाठीवर वार केले. तिच्या मामे बहिणीने अंकुशला विरोध केला. दरम्यान, ही मुलगी अंकुशच्या तावडीतून सुटली आणि जीव वाचविण्यासाठी जिन्याने खाली पळत गेली. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला.
हा प्रकार घडल्यानंतर याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून अंकुशने उडी मारली. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या मुलीला हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. डॉ. ज्ञानेश्वर दुसाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीच्या मानेवर व पाठीवर चाकूच्या खोल जखमा झाल्या होत्या. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. घटनास्थळी पोलिस उपायुक्त संजय जाधव, सहायक पोलिस निरीक्षक व्ही. टी. पवार यांनी भेट दिली.
हल्ल्याची तयारी अगोदरपासून
कॉलेजला जातो, असे आईला सांगून अंकुश घराबाहेर पडला. मात्र, तो भोरला न जाता थेट ससाणेनगर येथील क्लासकडे गेला. ही मुलगी त्याला नकार देत असल्याचा राग त्याच्या मनात होता. घरातून बाहेर पडताना त्याने दप्तरात पेट्रोलची बाटली, माचीस, रोगरची (विषाची) बाटली घेतली होती. त्यामुळे बुधवारी (ता. 22) या मुलीवर हल्ला करून आत्महत्या करण्याची तयारी त्याने अगोदरपासूनच केल्याचे उघडकीस आल्याची माहिती पोलिस हवालदार जनार्दन जाधव यांनी दिली.
बापरे. त्या तिघांना आजतगायत
बापरे. त्या तिघांना आजतगायत काही शिक्षा झाली की नाही?
>>>
मी व माझे आईबाबा माझ्या सासरच्यांना घेऊन कौतुकाने मलकापूरला (कुर्हा-गोतमारा) गेलो होतो. "ती"च्या घरच्यांशी भेट घालून द्यायला आणि त्यांच्या खेड्यात मजा करायला. वर दिलेली घटना गुरुवारी घडली त्याच रात्री आम्ही कल्याणहून प्रवासाला निघालो. निघण्यापूर्वी त्यांच्या घरी फोनही केला. तेव्हा तिच्या आईशी बोलताना तिला बिचारीला कल्पनाही नसेल की कुठेतरी तिच्या मुलीवर असा प्रसंग ओढवत (ओढवला) असेल.
शनिवारी संध्याकाळी त्यांच्या घरी पोचलो तर हे वृत्त कळले. मुंबईला परतल्यानंतर मी जवळपास २ महिने देशोन्नती (विदर्भातला स्थानिक पेपर) आणि लोकमतची विदर्भ आवृत्ती यामध्ये या घटनेचे अपडेट्स घेत होते. त्यांच्या घरी फोन करायलाही कसे तरी वाटायचे. आधीच बिचारे मुलीच्या अशा प्रसंगाने ते घाबरलेले आणि दु:खी त्यात पोलिस चौकशीने हैराण ! त्यात आपण कुठे फोन करून खपल्या काढायच्या नंतर नंतर सतत त्याच विचारांत राहून मला वेड लागायची वेळ आली. मग घरच्यांनी मला पेपर वाचू नकोस म्हणून सांगितले. माझीच ही अवस्था तर तिच्या आई-वडीलांची व भावाची काय अवस्था असेल
त्या तिघांनी गुन्ह्याची कबूली दिली त्यामुळे त्यांना अटक झाली. खटला जवळपास २ वर्षे चालला बहुदा. पण ऐन वेळेला त्यांनी पुन्हा साक्ष फिरवली असे ऐकले. मध्ये तर कधीतरी "ती"च्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले गेल. तीच कशी वाईट चालीची होती. तिने तिच्या शिक्षकाबरोबर आपणहून संबंध ठेवले होते वगैरे वगैरे. लांछनास्पद आहे हे सगळे.
ज्या दिवशी (गुरुवारी) ही घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी (बुधवारी) मी स्वतः तिच्याशी बोलले होते. "लवकर या. मी वाट बघतेय" म्हणाली होती ती! लग्नही ठरले होते तिचे.
निंबुडा, शाळेत असल्यापासून
निंबुडा, शाळेत असल्यापासून असल्या प्रवृत्ती हेरून मुलांच समुपदेशन केलं पाहिजे - मुख्य म्हणजे नकार पचवायला शिकवलं पाहिजे.
आपण काहीतरी विचार करुया भेटलो की यावर. अशी एखादी संस्था आहे का ह्याचा शोध घेऊ आधी.
दुर्दैवी घटना ! पण वरील
दुर्दैवी घटना !
पण वरील दोन्-तीन प्रसंगातुन जसे की राधिकाने रस्त्यावरील लोकांना मदत मागितली, त्या मुलाला श्रीमुखात दिली यावरुन मला तरी ती प्रसंगावधानी, साहसी वाटली. तिने हे घरी सांगितले नसेल कारण एक तर तिला हे एवढे महत्वाचे नसेल वाटले अथवा घरच्यांना काळजीत नसेल पाडायचे.
सर्वात वाईट म्हणजे अगदी रिंकु पाटील ते सध्या घडणार्या घटना अगदी गर्दीत घडतात. गुन्हा होताना कदाचित रोखणे शक्य नसेल (अचानक घडल्यामुळे म्हणा) पण गुन्हेगाराला कधीही तेव्हाच पकडले जात नाही.
सोनी टीव्हीवर दस्तक म्हणुन एक सिरियल लागते, गुन्हा घडायच्या आधी काही गोष्टी आपण कश्या नजरअंदाज करतो त्यावर आहे.
बापरे! @मंदार >> नकार पचवायला
बापरे!
@मंदार
>> नकार पचवायला शिकवल पाहिजे. >> १००% सहमत!.या बाबत खरे तर ११-१२ वर्षांची मुलं असतानाच बोलायला सुरुवात करायला हवी. सिनेमा, सिरिअल्स वगैरेतून जे काही मुलं पहातात ते पुसायचे असेल तर 'हेल्दी रिलेशनशिप' बद्दल खुप लवकर आणि सातत्याने बोलणे गरजेचे आहे.
Pages