आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही

Submitted by टीम गोवा on 21 June, 2011 - 12:11

***
आमचें गोंय- प्रास्तविक(१)
आमचें गोंय- प्रास्तविक(२)
आमचें गोंय- भाग १ - प्राचीन इतिहास
आमचें गोंय- भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ता
आमचें गोंय- भाग ३ - पोर्तुगीज(राजकीय आक्रमण)
आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)
आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही

***


छत्रपति शिवाजी महाराज

इ.स. १५७० च्या सुमाराला बहामनी सत्तेचे ५ तुकडे झाले. आणि तिसवाडी, बार्देश व साळशेत हे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले ३ तालुके वगळून बाकीचे तालुके इस्माईल आदिलशहाच्या ताब्यात आले. इ.स. १५८० मध्ये पोर्तुगालवर स्पेनची सत्ता प्रस्थापित झाली. इथून पुढे इ.स. १६४० पर्यंत पोर्तुगालवर स्पेनची सत्ता सुरू राहिली. अर्थातच, या काळात गोव्यावर अप्रत्यक्षपणे स्पेनची सत्ता होती. या काळात पोर्तुगीज सत्ता काहीशी दुर्बल झाली होती. या काळात हॉलंड आणि स्पेन यांचं शत्रुत्व होतं. इ.स. १६०३ मध्ये वलंदेज म्हणजेच डच लोकानी मांडवीच्या मुखात ठाण मांडून गोव्याची नाकेबंदी सुरू केली. इ.स. १६०४ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध, डच आणि कालिकतचा झामोरिन यांच्यात तह झाला. डच आणि पोर्तुगीज यांच्यातल्या चकमकी सुरूच राहिल्या. इ.स. १६४० साली श्रीलंका तर इ.स. १६४१ साली मलाक्का हे दोन प्रांत डचानी पोर्तुगीजांकडून हिसकावून घेतले. समुद्रातून गोव्याची नाकेबंदी इ.स. १६४० च्या दरम्यान परत सुरू झाली. नंतर इ.स. १६६० पर्यंत हे असंच सुरू राहिलं. इ.स. १६६० मधली महत्त्वाची घटना म्हणजे कॅथरिन या राजकन्येच्या विवाहात मुंबई बेट पोर्तुगालकडून दुसर्‍या चार्ल्सला हुंडा म्हणून मिळालं आणि भारताच्या पश्चिम किनार्‍यावर इंग्रजांना एक महत्त्वाची जागा मिळाली. आता भारतात पोर्तुगीजांचं राज्य दीव-दमण, वसई, चौल आणि गोव्यातले ३ तालुके एवढ्यापुरतंच उरलं.

या दरम्यान, शिवनेरीवर एक तेजस्वी, महापराक्रमी शक्ती १९ फेब्रुवारी १६३० ला उदयाला आली होती. राजे शिवाजी स्वराज्य आणि सुराज्याची स्थापना करून त्याच्या मजबुतीचं काम करत होते. या द्रष्ट्या महापुरुषाने तेव्हाच्या कोणत्याही भारतीय शासकाने फारशा न केलेल्या अनेक गोष्टी केल्या. त्यातली एक म्हणजे आरमाराची स्थापना. भूदुर्गांबरोबरच जलदुर्गांची स्थापना. इ.स. १६५९ मध्येच शिवाजी राजांनी २० लढाऊ नौका तयार करून युरोपियन आक्रमकांना जबरदस्त आव्हान उभे केले. या आरमाराची पोर्तुगीजांनाही एवढी दहशत होती की, त्यांनी राजांच्या नौकांना आपल्या बंदरात येऊ द्यायला नकार दिला होता! संपूर्ण कोकण किनार्‍या वर महाराजांनी अनेक जलदुर्ग उभारले. पोर्तुगीजांना धडकी भरवणारा सिंधुदुर्ग इ.स. १६६४ मध्ये अस्तित्त्वात आला. सुरुवातीच्या काळात आदिलशहाच्या विरोधात लढण्यासाठी शिवाजी राजांनी पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पोर्तुगीज घाबरले आणि त्यांनी या लढ्यात गप्प राहणे पसंत केले. या काळात सावंतवाडी संस्थानात लखम सावंतची सत्ता होती. त्याने शिवाजी राजांचे आधिपत्य मान्य केले. कोकणातून राजांचे सैन्य कुडाळ जिंकून पेडण्यात उतरले. इ.स. १६६४ मध्येच डिचोली तालुका आदिलशहाकडून राजांच्या ताब्यात आला. इथे राजांनी आपला तळ उभारला. इ.स. १६६५ मध्ये राजानी ८५ युद्धनौका बरोबर घेऊन मालवणहून प्रयाण केले आणि गोव्याचा किनारा ओलांडून थेट बसरूरपर्यंत धडक मारली. तिथे अगणित लूट करून, परतीच्या रस्त्यात गोकर्ण, अंकोला आणि कारवार आदिलशहाकडून जिंकून घेतले. पोर्तुगीजांच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या सिंधुदुर्गाप्रमाणेच दक्षिण सीमेवर रामाचे भूशिर इथला मूळात रामदेवरायाचा जलदुर्ग मजबूत करून घेतला. त्यानी जणूकाही पोर्तुगीजाना त्यांची सीमा आखून दिली की याच्या पुढे तुम्ही यायचं नाही.

इ.स. १६६५ मध्ये राजांना मिर्झाराजेंबरोबर तह करून आग्रा भेटीला जावं लागलं. इ.स. १६६६च्या अत्यंत थरारक अशा आग्र्याहून सुटकेनंतर राजांनी अजिबात उसंत न घेता कोकणातून गोव्यावर स्वारी केली. टाकोटाक आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या मर्दनगडाला वेढा घातला. लगेच पोर्तुगीजांनी आदिलशाही सैन्याला मदत सुरू केली. महाराजांनी तरीही हा किल्ला जिंकून घेतला. मध्यंतरीच्या काळात वाडीच्या लखम सावंत व तळकोकणातल्या इतर देसायांनी शिवाजी राजांच्या मुलखाला उपद्रव द्यायला सुरुवात केली होती. राजे कोकणात येताच हे देसाई घाबरून पोर्तुगीजांच्या ताब्यातल्या मुलखात पळून गेले. त्यांचं पारिपत्य करण्याच्या मिषाने आणि पोर्तुगीजाना जरब बसविण्यासाठी महाराजांचे सैन्य बारदेशात घुसले. आणि फिरून पोर्तुगिजाना दहशत बसली. इ.स. १६६७ साली पोर्तुगीज आणि महाराज यांच्यात तात्पुरता तह झाला. महाराजांनी पोर्तुगीजांना त्यांचे इन्क्विझिशन बंद करायला सांगितलं.

गोव्यातल्या जनतेला अभय देण्याच्या दृष्टीने या शिवभक्त राजाने कदंबांचं कुलदैवत श्री सप्तकोटीश्वर याचं मंदिर नार्वे येथे परत उभारलं. मलिक काफूर, आदिलशहा आणि पोर्तुगीज यानी ३ वेळा उद्ध्वस्त करून विजनवासात पाठवलेल्या सप्तकोटेश्वराला महाराजानी छप्पर दिलं. गोव्यातला डिचोलीचा तळ मजबूत करून महाराज परत महाराष्ट्रात गेले. इ.स. १६७० पर्यंत सुमारे ६०,००० पायदळ आणि ४०,००० घोडदळाची उभारणी करून महाराजानी मिर्झाराजे जयसिंगांबरोबरच्या तहात गमावलेला बहुतेक सगळा मुलुख परत मिळवला.

इ.स. १६७२ मध्ये महाराजांनी रामनगरच्या राजावर हल्ला चढवला, आणि तो पोर्तुगीजाना देत असलेली चौथाई आपल्याला द्यावी अशी त्यांनी मागणी केली. यावेळेला पोर्तुगीजांनी रामनगरच्या राजाला मदत केली. नंतर ६ जून १६७४ ला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि काही काळातच महाराजांनी रामनगरच्या राजाचा पराभव करून पोर्तुगीजांकडे असलेले चौलमधले चौथाईचे हक्क मिळवले. तर आदिलशहाच्या ताब्यात गेलेले कारवार, कोल्हापूर, फोंडा-मर्दनगडही इ.स. १६७५ मध्ये परत मिळवले. ५०,००० चे सैन्य जमा करून इ.स. १६७६ मधे महाराज दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडले. यावेळेला महाराजानी दक्षिणेतील राजांची एकजूट घडवून औरंगजेबाला टक्कर द्यायचं स्वप्न पाहिलं होतं. कुतुबशहाने महाराजांचा मैत्रीचा हात स्वीकारला, पण आदिलशहाने मात्र एवढी समजूत दाखवली नाही. प्रथम महाराजानी तामिळनाडूतील जिंजी आणि वेल्लोर जिंकून घेतले, जे भविष्यकाळात मराठी साम्राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतीव महत्त्वाचे ठरले.

नंतरचा काळ स्वराज्याची घडी बसवण्यात आणि संभाजी राजांच्या काहीशा अपरिपक्व हालचालींच्या काळजीत व्यतीत होत असताना मराठी राज्याचा पाया घालणारा हा सूर्य ३ एप्रिल १६८० ला अस्तंगत झाला. पोर्तुगीजाना महाराजांची एवढी भीती होती की त्यानी महाराजांच्या ताब्यात असलेल्या मुलखावर कधीही सरळ हल्ला चढवला नाही. कोकण आणि गोव्यातल्या नद्या, जंगलं, दर्‍या, डोंगरांनी भरलेल्या दुर्गम प्रदेशात महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र अतिशय यशस्वी ठरले. त्याना थोडा अवधी मिळाला असता तर त्यांनी पोर्तुगीजांना गोव्यातून उखडून काढलं असतं हे निश्चित. पोर्तुगीज दप्तरात, महाराजांनी पोर्तुगीजांना जरब बसवण्यासाठी लिहिलेली तसेच पोर्तुगीज महाराजांना किती घाबरत असत हे दाखवणारी पत्रे उपलब्ध आहेत.

महाराजांचा काळ झाल्यानंतर एक वर्ष काहीसं गोंधळाचं गेलं. संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला. त्यांच्या अटकेचा आदेश काढला गेला आणि रायगडावर घाईघाईने लहानग्या राजारामाचा राज्याभिषेक झाला. या घटनांचं कारण म्हणजे अष्टप्रधानांपैकी काहीजण सोयराबाईला पुढे करून आपल्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालत असावेत असं वाटतं. तसंच नवीन राज्य स्थापन करण्याच्या हेतूने संभाजी राजांनी दिलेरखानाच्या छावणीत सामिल होणं आणि शिवाजी महाराजांनी प्रयत्नपूर्वक त्यांना परत आणणं, यात महाराजांना झालेला प्रचंड मनस्ताप, यातूनच प्रधानमंडळांपैकी काहींचा संभाजी राजांवरचा विश्वास उडाला, हेही एक कारण असावं. संभाजी राजे आणि सोयराबाई यांच्या वादात सोयराबाईचे भाऊ सरनौबत हंबीरराव मोहिते यानी संभाजी राजे हेच राज्य चालवायला योग्य आहेत आणि अभिषिक्त युवराज आहेत या भूमिकेतून संभाजी राजांची बाजू घेतली. सरनौबतांच्या मदतीमुळे इ.स. १६८१ मध्ये संभाजी राजे छत्रपती झाले. त्यानी प्रथम स्वतःच्या गुन्हेगाराना कठोर शिक्षा दिल्या. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे याना मात्र माफी मिळाली आणि त्यानी नंतर राजांबरोबर मोहिमेत भाग घेतला.


छत्रपति संभाजी महाराज

राज्याभिषेक होताच अवघ्या १५ दिवसात हा २३ वर्षांचा राजा मोहिमेवर निघाला. बरोबर पेशवे मोरोपंत आणि सरनौबत होते. त्यानी बुर्‍हाणपूरवर हल्ला करून २ कोटी रुपयांची लूट मिळवली. यावेळेला एका अरबी व्यापार्‍याकडून राजांनी घोडे विकत घेतले असा उल्लेख आहे. हा व्यापारी एवढा घाबरला होता की तो ते घोडे फुकट द्यायला तयार झाला होता म्हणे! पण सामान्य जनतेला त्रास देऊ नये हे शिवाजी राजांचं तत्त्व संभाजी राजांनीही अंगिकारलं असावं. यापूर्वीच म्हणजे इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यु होताच औरंगजेब ५ लाख सैन्य आणि ४ लाख जनावरे घेऊन स्वतः महाराष्ट्रात दाखल झाला होता, मराठी राज्य सहज चिरडून टाकू अशा हिशेबाने तो आला असेल पण आपली गाठ कोणाशी आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती! नाशिकजवळच्या रामशेजच्या एका किल्ल्यासाठी मुघल सैन्याला ७ वर्षं लढावं लागलं! तसंच पुढच्या ९ वर्षात नाव घेण्यासारखा एकही विजय मुघल सैन्याला मराठ्यांसमोर मिळवता आला नाही. संभाजी राजांच्या काही सैन्याने औरंगजेबाच्या सैन्याला गनिमी काव्याने सळो की पळो करून सोडले तर स्वतः राजे कोकणात उतरले. त्यानी प्रथम पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला पण पोर्तुगीजांनी मुघलांना मदत करणे पसंत केलं. आता राजांनी पोर्तुगीजांना संपविण्याचा निर्धार केला. मर्दनगडाची डागडुजी करून तिथे आणि भतग्राम (डिचोली) इथे सैन्याचे भक्कम तळ उभारले.

वयाच्या १६ व्या वर्षापासून संभाजी राजांनी थोरल्या महाराजांबरोबर गोव्याच्या आणि इतर मोहिमांमधे भाग घेतला होता, त्यावेळेला महाराजांचं युद्धतंत्र त्यांच्या पूर्ण अंगवळणी पडलं असावं. तसंच गोव्याच्या भूमीची संभाजी राजांना पूर्ण माहिती झाली होती. यामुळेच गोव्यात राजांचा सर्वत्र सहज संचार होत असे. इ.स. १६८३ मधे राजांनी चौल पोर्तुगीजांकडून घेतले तर ११ डिसेंबर १६८४ ला बार्देशवर हल्ला केला. बार्देशातील थिवी, चोपडे हे किल्ले जिंकले. साळशेत (मडगाव) घेतले. म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचा पराभव केला आणि शिवाजी महाराजानी स्थापन केलेल्या राज्याचा आणखी विस्तार केला. राजे अवघ्या १ लाख सैन्यानिशी ५ लाखाचे मुघल सैन्य, जंजिर्‍या चा सिद्दी, गोव्यातले पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय एवढ्या आघाड्यांवर एकाच वेळी लढत होते. पैकी गोव्यात त्यानी बराच काळ वास्तव्य केलं. गोव्यातलं त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यानी पोर्तुगीजांना पायबंद घातला आणि धर्मांतरित झालेल्याना परत शुद्धिकृत करून हिंदू करून घेण्याचं शिवाजी महाराजांचं कार्य त्यांच्या या पुत्रानेही पुढे चालू ठेवलं.

शिवाजी महाराजांच्या गोवा मोहिमेत इथल्या स्थानिक राणे, देसाई वगैरे मंडळीनी त्याना विरोधच केला होता. पण त्यांची मदत मिळवण्यात संभाजी राजे मात्र यशस्वी ठरले. असोळणा, कुंकोळी इथल्या मराठ्यांनी आणि साखळीच्या राणे घराण्याने राजांना खुल्या दिलाने मदत केली आणि त्यांचं राज्य स्वीकारलं. समाजातून बहिष्कृत झालेल्या राण्यांना संभाजी राजानी पंक्तिपावन करून घेतले आणि राणे राजांचे ऋणी झाले. गोकुळाष्टमीच्या रात्री संभाजी राजांनी मांडवी नदी पार करून पोर्तुगीजांवर हला करण्यासाठी नदीच्या पात्रात घोडे घातले, पण पावसात उधाण आलेल्या प्रवाहात घोड्याचा पाय घसरला आणि राजे वाहून जाऊ लागले. या वेळेला खंडो बल्लाळाने राजांना वाचवले अशी कथा स्थानिक लोकांच्या सांगण्यात येते. काही मराठी सैन्य साळशेतमधे ठाण मांडून बसले तर स्वतः राजांनी वेळ न गमावता कुंभारजुवे बेट पोर्तुगीजांकडून घेतले आणि तीन बाजूंनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर हल्ला चढवला. आता फक्त तिसवाडीच पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिली होती.

दुसर्‍या दिवशी राजे स्वतः गोवा वेल्हावर हल्ला करणार हे पोर्तुगीजांनी जाणले. आताच्या ओल्ड गोवा येथून कुंभारजुवे बेट दिसते. तिथल्या सैन्याच्या हालचाली पाहून पोर्तुगीज घाबरले. त्यांनी चर्चमधलं सेंट फ्रान्सिस झेवियरचे शव बाहेर काढलं. व्हाईसरॉय काउंट डी अल्वारिसने आपला राजदंड त्याच्या शवपेटीवर ठेवला आणि "सायबा, तूच आमचं रक्षण कर" अशी करुणा भाकली. पोर्तुगीजाना हा सायब पावला की नाही माहित नाही, पण मुघल मात्र मात्र पावले! सुमारे १ लाखाचे मुघल सैन्य कोकणात उतरल्याची खबर आली आणि जिंकत आलेली गोव्याची मोहीम अर्धवट टाकून संभाजी राजाना परत जावं लागलं.

इ.स. १६८४ मधे संभाजी राजांनी पोर्तुगीजांबरोबर तह केला. त्या अनुसार मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले गोव्याचे ३ तालुके त्याना सोडून दिले. तर पोर्तुगीजानी चौल इथे कर देण्याचं मान्य केलं. पण या तहाची पूर्ण अमलबजावणी झाली नाहीच! बार्देशमधले किल्ले मराठ्यांनी परत केले नाहीत. आता औरंगजेबाची वक्रदृष्टी गोव्याकडे वळली. पण पोर्तुगीजांनी गोव्यातल्या मराठा देसायांबरोबर तह केला आणि मुघल सैन्याच्या हाती काही लागले नाही. मराठा सैन्य आणि पोर्तुगीज यांच्या चकमकी सुरूच राहिल्या. पण संभाजी राजे पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी परत गोव्यात येऊ शकले नाहीत. ते जर झालं असतं तर आज गोवा महाराष्ट्राचा एक जिल्हा राहिला असता!

आणखी सतत ४ वर्षे मुघलाना हुलकावण्या देत जेरीला आणणारा हा शूर छत्रपती १ फेब्रुवारी १६८९ ला कपटाने कैद झाला. त्यांच्या सख्या मेव्हण्याने, गणोजी शिर्क्याने विश्वासघात केला आणि नंतर तब्बल ४० दिवस हालहाल करून शेवट औरंगजेबाने ११ मार्च १६८९ ला राजांचा वध केला. पण एवढे हाल होत असतानाही या छाव्याने औरंगजेबाचा कोणताच प्रस्ताव मानला नाही आणि वीराचे मरण पत्करले. महाराष्ट्राच्याच नाही तर गोव्याच्या इतिहासात या राजाचं स्थान अद्वितीय आहे. त्याच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा झुंजण्याचा निर्धार आणखीच पक्का झाला आणि नंतर एकजुटीने पण निर्नायकी अवस्थेत मराठ्यांनी मुघलांना जी झुंज दिली तिला इतिहासात तोड नाही. पराक्रमात बापसे बेटा सवाई असलेल्या या तरूण राजाने अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात विजेसारखं थोड्या काळासाठी लखलखून आत्मार्पण केलं आणि सामान्य शेतकर्‍यांना औरंगजेबाशी भांडण्याचं पहाडाचं बळ दिलं. गोव्यात पोर्तुगीजांना बसलेला दणका एवढा प्रचंड होता की त्या ३ तालुक्याच्या पलिकडे आणखी प्रदेश आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्नसुद्धा त्यानी नंतर केला नाही. एवढ्या सततच्या धामधुमीतही 'बुधभूषण' आणि इतर काही संस्कृत रचना करणार्या या तेजस्वी राजाच्या नावावरून 'वास्को द गामा' शहराचं नाव 'संभाजीनगर' करावं असा प्रस्ताव काही काळापूर्वी आला होता, पण...

छत्रपती संभाजीच्या वधानंतर महाराणी येसूबाईने राजारामाला रामचंद्रपंत अमात्यांच्या हाती सोपवून प्रतापगडावर पाठवले. रायगडावर सूर्याजी पिसाळ फितूर झाला आणि येसूबाई आणि शाहू मुघलांच्या हाती लागले. खंडो बल्लाळ राजारामाला महाराष्ट्रातून सुखरूप जिंजीला घेऊन गेला. तिथे ९ वर्षं वेढ्यात काढून गणोजी शिर्केच्या मदतीने राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परत आला. इ.स. १७०० साली राजारामाच्या मृत्यूनंतर ताराबाईने राज्याची सूत्रे हातात घेतली. आता सावंतवाडी इथे लखम सावंताचा धाकटा भाऊ फोंड सावंत याची सत्ता होती. ताराबाईच्या प्रदेशाला लागून असल्याने त्याने ताराबाईचे वर्चस्व मान्य केले. तर ताराबाईने त्याला कुडाळ, बांदा, पेडणे, साखळी, डिचोली आणि मणेरी या ६ तालुक्यांचा मोकासा लिहून दिला.

फोंड सावंताचा मुलगा खेम सावंत हे गोव्याच्या आणि सावंतवाडीच्या इतिहासातलं मोठं मजेशीर प्रकरण आहे. त्याची कारकीर्द बरीच मोठी म्हणजे इ.स. १६७५ ते इ.स. १७०९ पर्यंत. त्यानेच 'सुंदरवाडी' अर्थात 'सावंतवाडीचा' पाया घातला. त्यापूर्वी सावंतांचं प्रमुख ठाणं कुडाळ होतं. या काळात त्याने प्रथम ताराबाई नंतर शाहू महाराज, म्हणजे ज्या कोणाचं वर्चस्व दिसेल त्याची प्रभुसत्ता बिनतक्रार मान्य केली. शाहू राजानी त्याला या ६ तालुक्यांचं वतन दिलं. म्हणजेच, छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांच्या काळात बंद झालेली वतनाची पद्धत शाहूच्या काळात परत सुरू झाली होती आणि हे छोटे वतनदार आपापल्या मुलुखात आपापल्या पद्धतीने सत्ता चालवीत होते. मूळ कर्नाटकातील शिरसीजवळचे, पण गोव्यात फोंडा इथे स्थायिक झालेल्या सोंदेकरांबरोबर खेम सावंताचा ३६ चा आकडा होता. जमेल तेव्हा सोंदेकरांच्या कुरापती काढण्याचे उद्योग त्याने आयुष्यभर चालू ठेवले. जिथे यश मिळणार नाही असं दिसलं तिथे सरळ माघार घेतली. मराठ्यांचं पारडं हलकं होतंय असं वाटलं की पोर्तुगीजांची मदत घेतली. हेतू साध्य होताच परत पोर्तुगीजांना अंगठा दाखवला. या सोंदेकरानीही वेगवेगळ्या वेळी मुघल, पोर्तुगीज, मराठे यांच्याबरोबर आपल्या रक्षणासाठी तह केलेले आढळून येतात. गोव्यातल्या सध्याच्या पक्षबदलांच्या राजकारणाची सुरुवात फार पूर्वी झालेली होती असं दिसतंय!

फोंड्याच्या मर्दनगडासाठी या काळात दरवर्षी एक लढाई लढली गेली. आणि किल्ल्याची मालकी आलटून पालटून कधी खेम सावंत, तर कधी सोंदेकर, कधी मराठे तर कधी मुघल अशी बदलत राहिली. पोर्तुगीजाना मराठे किंवा मुघलांसारखे प्रबळ शत्रू सीमेवर नको होते, त्यामुळे त्यानी खेम सावंत आणि सोंदेकर याना आपल्या सीमेवर राहू दिले. आणि शक्य तितके आपसात झुंजत ठेवले. अर्थातच फोंडा, डिचोली हे भाग अप्रत्यक्षपणे मराठ्यांच्याच ताब्यात राहिले.

साधारण इ.स. १७०० ते इ.स. १७०९ या ९ वर्षात खेम सावंताने गोव्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने पोर्तुगीज जहाजांवर हल्ले करून लूटमार सुरू ठेवली. त्याने संधी मिळतच बार्देश, फोंडा वळवई या भागात छापे मारून लुटालूट, जाळपोळ करणे, किल्ले ताब्यात घेणे यांचे सत्र सुरू ठेवले. किल्ल्यांच्या आश्रयाने शत्रूवर हल्ला करण्याचे शिवाजी महाराजांचे तंत्र खेम सावंताने वापरले. पोर्तुगीजानी या प्रकाराला वैतागून आमोणा, डिचोली, वळवई इथले किल्ले आपल्या ताब्यात येताच पाडून टाकले. डिचोलीचा किल्ला पाडल्यानंतर पोर्तुगीज व्हॉईसरॉयने असे उद्गार काढले की,"खेम सावंताला दुसरा शिवाजी होऊ देणार नाही!" तरी खेम सावंताचे उपद्व्याप सुरूच होते. शेवटी इ.स. १७०९ साली खेम सावंत मरण पावला. त्याला ३ मुलीच होत्या. त्यामुळे त्याच्या मागून त्याचा पुतण्या फोंड सावंत गादीवर आला. यानेही खेम सावंताप्रमाणेच पोर्तुगीजांबरोबर कधी मैत्री, कधी भांडण चालू ठेवले. कान्होजी आंग्रेंच्या आरमाराबरोबर त्याच्या चकमकी सतत चालू असत. इ.स. १७२९ मधे कान्होजींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा सेकोजी याने पोर्तुगीज आणि फोंड सावंताबरोबर लढाया चालू ठेवल्या.

इ.स. १७२० नंतर बाजीराव पेशव्यांच्या सरदारानी उत्तर गोव्यात हल्ले चालू ठेवले. आता फोंड सावंत बाजीरावाच्या बाजूने पोर्तुगीजांवर हल्ले करू लागला. बाजीराव आणि चिमाजी, पोर्तुगीजांविरुद्ध वसई आणि गोव्याच्या दोन्ही आघाड्यांवर लढत होते. पोर्तुगीजांनी वसईला गोव्यातून मदत पाठवू नये म्हणून इ.स. १७३९ साली दादाजी भावे नरगुंदकर, वेंकटेशराव घोरपडे आणि जिवाजी शिंदे यांनी गोव्यावर पुर्‍या ताकदीने हल्ला चढवला. राशोल आणि मार्मुगोव्याचा किल्ला सोडून उरलेला साळशेत तालुका मराठ्यांच्या ताब्यात आला. तर फोंड सावंतानंतर गादीवर आलेला त्याचा नातू रामचंद्र याने बारदेश तालुका घेतला. मराठ्यांनी फोंडा, सुपे आणि सांगे तालुके ताब्यात घेतले. संभाजी राजांनंतर परत एकदा पोर्तुगीजांच्या ताब्यात फक्त तिसवाडी राहिली. आता पोर्तुगीजांनी बाजीरावाकडे तहाची याचना केली. बाजीरावाने इन्क्विझिशन बंद करा, हिंदूंचा छळ बंद करा या आणि आणखी मागण्या पोर्तुगीजांपुढे ठेवल्या. इ.स. १७४० मध्ये चौल आणि कोर्लाईचा किल्ला देऊन पोर्तुगीजानी गोव्यात आपलं अस्तित्त्व कसंबसं राखलं. मराठ्यांनी कुंकोळी आणि असोळणा परत केले, पण रामचंद्र सावंताने बार्देश मात्र परत केला नाही! रामचंद्र सावंत आणि मराठे विरुद्ध पोर्तुगीज अशा चकमकी सुरूच राहिल्या. सोंदेकर आणि राणे यानी या वेळेला पोर्तुगीजाना मदत करायचं मान्य केलं.

इ.स. १७५६ साली पोर्तुगीज व्हॉईसरॉय कॉण्डे डी अल्वाने मराठ्यांच्या ताब्यातील मर्दनगडावर हल्ला केला. या लढाईत स्वतः व्हॉईसरॉय मरण पावला! गोंधळाचा फायदा घेत सावंतांनी पेडणे, सांगे आणि मणेरी तालुके घेतले. २४ डिसेंबर १७६१ ला तह झाला आणि पोर्तुगीजांनी सावंतांच्या ताब्यात असलेल्या सर्व प्रदेशावर सावंतांचा हक्क मान्य केला. याच सुमाराला पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि पेशवाई दुबळी झाली. याचा फायदा घेत पोर्तुगीजांनी इ.स. १७६३ मध्ये मर्दनगड जिंकून सोंदेकरांच्या ताब्यात दिला. पण एवढ्यात म्हैसूरच्या हैदर अलीने सोंदेकरांवर हल्ला केला. सोंदेकर पळून गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाला आले. आता कसलीच जबाबदारी नको म्हणून सोंदेकरानी फोंडा, केंपे आणि काणकोण तालुके पोर्तुगीजांच्या हवाली केले. इ.स. १७७१ साली सोंदेकरानी गोव्यातल्या त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावरचा हक्क सोडून दिला. इ.स. १७८५ साली कोल्हापूरच्या छत्रपतीनी सावंतांवर हल्ला केला. आता घाबरून सावंतानी पोर्तुगीजांकडे मदत मागितली आणि त्या मदतीची परतफेड म्हणून पेडणे तालुका पोर्तुगीजांच्या हवाली केला.

अशा प्रकारे इ.स. १७८८ मध्ये पूर्ण गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेखाली आला. पोर्तुगीजांनी इ.स. १५६० साली जिंकलेल्या तिसवाडी, बार्देश आणि साळशेत (साष्टी) तालुक्याना 'जुन्या काबिजादी' तर इ.स. १७७१ आणि इ.स. १७८८ मध्ये ताब्यात आलेल्या उरलेल्या प्रदेशाला 'नव्या काबिजादी' हे नाव मिळालं.

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (ज्योति_कामत,प्रीतमोहर, बिपिन कार्यकर्ते)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच छान !
या सगळ्या भानगडीत संधिसाधू इंग्रज कसे काय नाही डोकावले ? 'क्रमशः' आहे, तेंव्हा आतुरतेने वाट पहातो !!

>>>गोव्यातल्या सध्याच्या पक्षबदलांच्या राजकारणाची सुरुवात फार पूर्वी झालेली होती असं दिसतंय! <<< Proud

अभिनंदन टीम गोवा, सुंदरच लिहिताय. हि सगळी ठिकाणे परिचयाची,
पण एकत्र इतिहास वाचला नव्हता. आता दाखवण्यासारखे काही अवशेषही
नाहीत उरलेले ना, त्या किल्ल्यांचे !

दिनेशदा, फोंड्याच्या सर्व बाजूना डोंगर आहेत, मर्दनगड त्यातल्या नक्की कोणत्या डोंगरावर होता हे सुद्धा फार कोणी सांगू शकत नाहीत. मर्दनगड ज्याच्या ताब्यात असेल तो जवळच्या फार मोठ्या भूभागावर राज्य करतो असा तेव्हा समज होता शिवाय तिथे सैन्याची जमवाजमव करून मराठे पोर्तुगीजांवर हल्ले करीत, त्यामुळे मर्दनगड पोर्तुगीजांच्या ताब्यात येताच त्यानी त्याचा एक दगडही शिल्लक राहू दिला नाही. पण काबो डी रामा (रामाचे भूशिर, आग्वाद, रेइश मागूश असे काही मोजके किल्ले (तट किंवा इतर अवशेष) या स्वरूपात शिल्लक आहेत.

फारच छान लेख आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दलचे लेख वाचताना नेहमीच प्रसन्न वाटत. 'क्रमशः' आहे, तेंव्हा पुढील लेखाची वाट बघत आहे.

कांही कुतूहल शमवण्यासाठी लेख पुन्हा वाचला; वरच्या नकाशात तेरेखोल नदीच्या उत्तर किनार्‍यावर जो एक छोटासा पिवळा ठिपका दिसतो त्याने मला नेहमीच गोंधळात पाडलंय. जर खेम सावंत, फोंड सावंत, संभाजी महाराज व पेशव्यांचे सरदार तेरेखोल नदीच्या दक्षिणेस जावून पोर्तुगीजांवर हल्ले करत असत, तर त्यांच्याच हाद्दीत, मोक्याच्या जागीचा तेरेखोलचा किल्ला बांधणं व तो स्वतःच्या अधिपत्याखाली ठेवणं पोर्तुगीजाना कसं शक्य झालं? [ आजही तेरेखोल नदी गोवा- महाराष्ट्राची सीमा असली, तरी फक्त तेवढ्या एका ठिपक्याचा भाग मात्र म्हणूनच अधिकृतपणे गोव्याचा भाग समजला जातो !].
जमिनीवरून हल्ले करण्यापेक्षां पोर्तुगीजांचं गोव्यातलं आरमारच नष्ट करण्यावर लक्ष केंद्रीत झालं असतं तर पोर्तुगीजांची त्रेधातिरपिट नसती का उडाली ? कान्होजी आंग्रेना सहाय्य देऊन हे सहज सध्य झालं असतं, असंही मला नहमी वाटतं.
ह्या माझ्या शंका अगदीच बाळबोध आहेत, याची मला जाणीव आहे. पण सहजपणे कुणी त्यांचं निरसन करूं शकत असेल तर मला हलकं वाटेल, इतकंच.

नेहमीप्रमाणे उत्तम माहितीपूर्ण लेख... पुढील लिखाणाच्या प्रतीक्षेत.. Happy

भाऊ...

जमिनीवरून हल्ले करण्यापेक्षां पोर्तुगीजांचं गोव्यातलं आरमारच नष्ट करण्यावर लक्ष केंद्रीत झालं असतं तर पोर्तुगीजांची त्रेधातिरपिट नसती का उडाली ? कान्होजी आंग्रेना सहाय्य देऊन हे सहज सध्य झालं असतं,>>>>>

पोर्तुगीझ आरमार नष्ट करणे वगैरे हे तेंव्हा (१६८०-९०) मराठा आरमाराच्या आवाक्यातले काम नव्हते. जलदुर्गांच्या आश्रयाने समुद्रातील गनिमी कावा विकसित करत मराठे तेंव्हा सिद्दी आणि इंग्रज यांच्या बरोबर लढाया करत. बरंच काळ मराठे - पोर्तुगीझ हे तहात बांधलेले होते. तसेही अजूनही भरारी घेऊ पाहणाऱ्या मराठा आरमाराला इंग्रज आणि सिद्दी बरोबर पोर्तीगीझांशीही वैर परवडणार नव्हतेच..

अजून एक मुद्दा म्हणजे कान्होजी आंग्रे यांचा काळ १६९८ नंतरचा. तेंव्हा ते सरखेल झाले. त्यानंतर मराठा आरमाराने उत्तुंग भरारी घेतलेली आहेच... मग इंग्रज काय पोर्तुगीजांना देखील आपण हाण्लेले आहेच.. Happy या लेख मालिकेत ते पुढे बहुदा वाचायला मिळेलच.. Happy

प.भ.जी,
माहिती व विश्लेषणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

भाऊ,
तेरेखोलचा किल्ला पहिल्या खेम सावंताने बांधलेला. या किल्ल्याच्या आश्रयानेच त्याने आणि लखम तसंच फोंड सावंताने गोव्यावर वारंवार यशस्वी हल्ले चढवून पोर्तुगीजांच्या नाकी नऊ आणले. या काळात त्यानी पेडणे आणि डिचोली बराच काळ आपल्या ताब्यात ठेवली होतीच पण बारदेशवरही अनेक हल्ले केले होते. त्यामुळे तेव्हा तेरेखोल इथे पोर्तुगीज असण्याचा काही प्रश्नच नव्हता.

पण नंतर म्हणजे १७४६ साली पोर्तुगीजानी रामचंद्र सावंताचा पूर्णपणे पराभव केला आणि तेरेखोलचा किल्ला हस्तगत केला. यानंतर काही वर्षानी, म्हणजे १७८५ साली सावंतानी पेडणे तालुकाही पोर्तुगीजांचा हवाली केला आणि पोर्तुगीजांची सत्ता मजबूत झाली. या काळातसुद्धा तेरेखोलच्या किल्ल्याला पोर्तुगीजांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्व होतं. पण १८१९ साली सावंतानी इंग्रजांचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि तेरेखोलचा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यातच राहिला तो गोवा स्वतंत्र होईपर्यंत. अर्थात या काळात या किल्ल्याचं महत्त्व संपलं होतं.

पक्का भटक्या,
मराठा आरमाराबद्दल बहुमोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! सरखेल कान्होजी आंग्रे विजयदुर्गावरून आणि खांदेरी-उंदेरी, अलिबाग इथून इंग्रज आणि पोर्तुगीजाना जरब बसवत होते. पण त्यानी मुख्यतः इंग्रजाना जास्त हैराण केलं होतं. १७२१ साली पोर्तुगीजानी इंग्रजांच्या मदतीने अलिबागवर हल्ला केला होता, पण दोघानाही जबरदस्त पराभव चाखायला मिळाला. इंग्रज आणि पोर्तुगीज कान्होजीना "समुद्री चाचा" असं रागाने म्हणत असत. पण यात पोर्तुगीज हे जास्त शहाणे होते. ते शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव यांच्या सैन्याच्या वाटेला फारसे गेले नाहीत. तसंच कान्होजीच्या वाटेला गेलं तर आपली वाट लागेल हे त्यानी ओळखलं होतं त्यामुळे शक्यतः समोरासमोरच्या लढाया त्यानी टाळल्या.

सरखेल आंग्रेनी अंदमान सुद्धा जिंकून घेतलं होतं, आणि त्या काळात संपूर्ण कोकणच्या समुद्रावर त्यांची सत्ता चालत होती. पेशवाईच्या काळात आरमाराकडे काहीसं दुर्लक्ष झालं त्यामुळे कान्होजी आणि त्यांचे पुत्र सेकोजी संभाजी वगैरे याना जमिनीवरून मदत मिळाली नाही. शिवाजी महाराजांच्या काळातल्यासारखी मध्यवर्ती सत्ता प्रबळ असती तर पोर्तुगीज जमिनीवरून आणि समुद्रातून एकदम आलेल्या हल्ल्यात कुठच्या कुठे उडून गेले असते! पण आमचं दुर्दैव, आंग्रे आणि पेशवे यांचे हेवेदावे इतके विकोपाला पोचले की शेवट १७५६ साली कान्होजींचे पुत्र तुळाजी यांचा पराभव करायला पेशव्यानी इंग्रजाना मदत केली. आणि मराठ्यांच्या आरमाराचा अस्त झाला.

या भागात आम्ही गोव्याशी संबंधित इतिहासवर्णन मुख्यत्वे करायचं ठरवल्यामुळे सरखेल आंग्रे या मराठा इतिहासातल्या चमकदार तार्‍याबद्दल जास्त लिहिलं गेलं नाही. पण पक्का भटक्या याना विनंती की उत्तर कोकणचा इतिहास लिहिताना त्यानी आंग्रेंबद्दल जास्त काही लिहावं.

ज्योती ताई... २ ओळी लिहिल्या तर ती कसली बहुमोल माहिती.. Happy मी कान्होजी आणि मराठा आरमार ह्यावर थोडे लिखाण नक्की करीन. खांदेरीची लढाई आणि पुढे इंग्रजांची केलेली फजिती हे देखील वाचण्यासारखे आहे. नक्की लिहेनच..

सरखेल आंग्रेनी अंदमान सुद्धा जिंकून घेतलं होतं,
>>>> ह्या बद्दल मला कृपया योग्य तो संदर्भ दया. मी अनेकांकडून हे ऐकलेले आहे पण कोणी अस्सल पुरावा समोर आणलेला नाही. आपण हे कशाच्या आधाराने लिहिले आहे ते कळले तर बरे होईल... Happy

पक्का भटक्या,
मी ही माहिती विकिपेडियावरच वाचली होती. कान्होजी आंग्रे आणि अंदमान बेटांच्या पृष्ठांवर. http://en.wikipedia.org/wiki/Andaman_Islands इथे आणखी २ उल्लेख मिळाले.

^ a b c Olivier Blaise, Andaman Islands, India, PictureTank, "... Kanhoji Angre, a Maratha admiral had his base on the island in the early 18th century. From there, he attacked passing Portuguese, Dutch and English merchant vessels. Kanhoji Angre was never defeated. He died in 1729. The British established their first colony in the Andaman and Nicobar Islands in 1789, which was abandoned in 1796 ..."
^ Asra Nomani (2004), Tantrika: Traveling the Road of Divine Love, HarperCollins, ISBN 0062517147, "... A Maratha admiral, Kanhoji Angre, fought the British off these islands until his death in 1729 ..."

पण मला सरखेलबद्दल खरंच फार माहिती नाही. आणखी माहिती मिळवायला नक्की आवडेल!

ज्योतिजी, आपल्या << तेरेखोलचा किल्ला पहिल्या खेम सावंताने बांधलेला. >> व << शिवाजी महाराजांच्या काळातल्यासारखी मध्यवर्ती सत्ता प्रबळ असती तर पोर्तुगीज जमिनीवरून आणि समुद्रातून एकदम आलेल्या हल्ल्यात कुठच्या कुठे उडून गेले असते >> या माहितीमुळे बर्‍याच वर्षांचा माझ्या डोक्यातील घोळ नाहीसा झाला.[ अर्थात मी स्वतः हे शोधण्याचा प्रयत्न करणं आवश्यक होतं; पण तशा मी न केलेल्या आवश्यक गोष्टींची यादी खूपच मोठी आहे !]. मनःपूर्वक धन्यवाद.