मीनावहिनी

Submitted by भरत. on 9 June, 2011 - 00:46

शाळेतल्या शिक्षकांना आपल्याला नेमून दिलेला विषय सोडून अन्य विषय शिकवण्यात भलताच आनंद मिळत असावा. मी नवव्या की दहाव्या यत्तेत असताना एका शनिवारी मराठीच्या ऑफ़ झालेल्या तासिकेला सामाजिक शास्त्राच्या(इतिहास भूगोल हो) बाई आल्या.(इथे शिक्षिका म्हणायला हवे का? पण आम्ही बुवा त्यांना बाई अशीच हाक मारायचो?) एकदा त्यांनी अशीच ऑफ़ तासाला इंदिरा संत यांची ती कुटुंबवत्सल फ़णस इत्यादिकांची कविता शिकवून गृहपाठ म्हणून सवयीप्रमाणे ‘कारणे द्या’ म्हटल्यावर पहिल्या बाकावर बसलेल्या (उंचीचा फ़ायदा/तोटा काय हवे ते घ्या) माझ्या तोंडून निघालेला आँ बाईंच्या कानांपर्यंत पोचला नव्हता, इतक्या त्या कवितेत आणि कार्यकारण भावात मग्न झाल्या होत्या. तर त्याच बाईंनी काहीही न शिकवता गप्पांचा तास ठेवला. आणि गप्पांच्या ओघात केव्हा तरी उद्या दूरदर्शनवर `रविवारची सकाळ' मध्ये त्या आशालताबाई , कडवेकर मामीच्या भूमिकेत बेळगावी हेल कसा लावतात ते बघा असं सांगितले. आता हा गृहपाठ मिळाला नसता, तरी दूरदर्शनचे दिवसाला ३-४ तासांचे मोजके दर्शन नित्यनेमाने घ्यायचे हा तर परिपाठ होता. रविवारच्या सुप्रभाती पुलंचे दर्शन घ्यायला भक्तीभावाने टीव्हीसमोर मांडी ठोकली आणि चक्क एक ओळखीचा आवाज कानी पडला. पुलंच्या पत्नीच्या भूमिकेतला, फ़ोनवरून रेसिपी सांगणारा हा आवाज रोज कानावर पडणारा. लक्षात आलं अरे या तर आपल्या नीलम प्रभू. तोपयंत रेडिओ तर जन्मापासून घरात वाजत असल्याने घरातलं माणूसच वाटायचा. तर नुकताच आलेला टीव्ही कुणा परगावाहून आलेल्या लांबच्या श्रीमंत नातेवाईकासारखा होता. त्यामुळे रेडिओवर रोज आपल्याशी बोलणार्‍या नीलम प्रभूना टीव्हीवर पाहून हा कार्यक्रम पुलंसाठी पाहायचा असतो हेच विसरून गेलो.
तर अशा या नीलम प्रभू. ५ जून २०११ रोजी त्यांचं निधन झाल्याची बातमी वाचून आपल्या घरातलंच कुणी गेल्याची भावना झाली.

त्यांचा जीवनपट थोडक्यात मांडायचा हा प्रयत्न.
हिरामण देसाई या कापडव्यापार्‍याच्या पाच अपत्यांपैकी एक नीलम. जन्म २६ एप्रिल १९३५ . वडील नाट्यप्रेमी, नट-दिग्दर्शक होते. केशवराव दाते, धुमाळ, डॉ भालेराव यांच्याबरोबर त्यांची मैत्री होती. ’चित्तरंजन नाट्यसमाज’ ही नाट्यसंस्था त्यांनी काही काळ चालवली.
१९४०-४२ दरम्यान नीलमने प्रथम संस्कृत शाकुंतलात भरताची भूमिका केली. वय ५-७ वर्षे. नीला शाळेबरोबर कथ्थक नृत्य आणि गाणं शिकत होती. वडिलांच्या नाट्यसंस्थेत जायला लागली. मग बाहेरील नाट्यसंस्थांच्या नाटकांतही जाऊ लागली. मॅट्रिकपर्यंतच शिक्षण झालं असलं तरी वाचनाच्या सवयीने वैचारिक जडणघडण होत राहिली.
देवल जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या `झुंजारराव’च्या प्रयोगात नानासाहेब फ़ाटक, विजया मेहता, मा दत्ताराम यांच्यासोबत सारजाच्या भूमिकेत नीला उभी होती. यानंतर राजसंन्यास, श्रीमंत, शितू, एकच प्याला, भाऊबंदकी, संभूसांच्या चाळीत अशा वेगवेगळ्या नाटकांत आणि निरनिराळ्या संस्थांत त्यांनी भूमिका केल्या. तरीही नाटक/अभिनय यात करियर करावे असे काही त्यांना वाटले नाही. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी वार्‍यावरची वरात मधल्या `रविवारची सकाळ’ मध्ये पुलंच्या पत्नीची भूमिका त्यांनी साकारली, ती पुढली दहा वर्षे निभावली.
आकाशवाणीच्या श्रुतिकांमध्येही त्या भाग घेऊ लागल्या होत्या. तिथले नाट्यविभागातले निर्माते बाळ कुडतरकर यांनी त्यांना आकाशवाणीवर नोकरी करण्याविषयी सुचवले. रीतसर ईंटरव्ह्यु देऊन त्या निवडल्या गेल्या आणि त्यांच्याबरोबरच बबन प्रभूही.
नीलम प्रभू यांची आकाशवाणीवरील कारकीर्द , त्यांच्या श्रुतिका आठवताना, अपरिहार्यपणे बाळ कुडतरकर हे नाव येतेच. दोघांनी महानंदा, आनंदी -गोपाळ, ययाती देवयानी, घरगंगेच्या काठी या रंगमंचीय नाटकांच्या नभोवाणी आवृत्त्या साकारल्या.विजय तेंडुलकरांची रात्र आणि अन्य काही एकांकिकाही त्यांनी श्रुतिका रूपात सादर केल्या.
आकाशवाणीवर श्रुतिकांमध्ये भूमिका करता करताच त्या ध्वनिसंकलनही शिकल्या आणि आवडीने करूही लागल्या.

पुरुषोत्तम दारव्हेकरांनी खास त्यांच्या साठी `आम्ही तिघी’ ही श्रुतिका लिहिली. यात आजी, आई आणि तरुण मुलगी अशा तीन भूमिका त्यांनी केल्या. आवाजातून प्रत्येक व्यक्तिरेखेचं वय, मन:स्थिती, आयुष्याचा प्रवास सहज पोचवले. प्रत्येक भूमिकेतले वेगवेगळे संवाद म्हणायला लागणारा वेळ तालमीत स्टॉपवॉचवर मोजून मग त्याचे वेगवेगळे रेकॉर्डींग करून मिक्सिंग करण्यात आले. शिवाय `ए मम्मी, माझा शांपू कुठाय’ असा न्हाणीघरातून, लांबून ओरडल्याचा लेकीचा आणि उत्तरार्थ आईचा जवळून येणारा आवाज अशा तांत्रिक बाबींच्या कसरती सांभाळून केलेला हा प्रयोग इतक्या वर्षांनंतरही श्रोत्यांच्या लक्षात आहे.
अशीच एक `प्रकाशचे तेल' ही जाहिरात. आयत्या वेळी अन्य कलाकार न आल्याने `आई ग! वैतागले मी या केसांना’ असा कंगव्यात केस अडकल्यावर किंचाळणारा पहिला आणि `अगं मग प्रकाशचे माक्याचे आयुर्वेदिक तेल का वापरत नाहीस .......’ असा शांत, समजावणारा दुसरा; असे दोन्ही आवाज नीलमताईंच्या गळ्यातूनच निघाले.

नीलमताईंची ओळख ’पुन्हा प्रपंच’ मधली मीना वहिनी म्हणून झाली असली तरी प्रथम ही भूमिका कमलिनी विजयकर करीत. पुढे ते काम नीलमताईंकडे आले आणि त्यांचेच झाले. यातली प्रभाकरपंत (बाळ कुडतरकर) यांची `मिने मिने मिने मिने’ ही आणि टेकाडे भावजींची (प्रभाकर जोशी) मीनावहिनी ही हाक लोकांच्या अजून लक्षात आहे. आठवड्यातून एकदा ऐकवल्या जाणा‍र्‍या पंधरा मिनिटांच्या या श्रुतिकेचे लेखन शं ना नवरे, वि आ बुवा,शाम फ़डके, व पु काळे, आत्माराम सावंत इत्यादिकांनी केले. बाळ कुडतरकरांच्या निवृत्तीपर्यंत ही श्रुतिका चालली. अगदी कुसुमाग्रजांनीही त्यांना ‘या नीलम प्रभू ’ अशी ओळख करून दिल्यावर ‘अरे मीनावहिनी, तुम्ही तर आमच्या घरात रोजच येता’ असं म्हटलं होतं!
नीलम प्रभू, लीलावती भागवत यांच्या जोडीने वनिता मंडळ सादर करीत. हा कार्यक्रम सुरुवातीला बराच काळ लाइव्ह ब्रॉडकास्ट व्हायचा. तर या दोघी संपूर्ण निवेदन आधी लिहून काढून तालीम करून वेळेत बसवायच्या. आणि तरीही त्यात कुठेही कृत्रिमपणा नव्हे, तर `भगिनींशी’ अगदी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसून संवाद साधावा इतकी सहजता होती. आकाशवाणी हे पूर्णपणे श्राव्य माध्यम. त्यात अगदी काही क्षणांची शांतताही कार्यक्रमाला मारक ठरू शकते. नीलम प्रभू समोरची व्यक्ती बोलत असताना, त्याच्या बोलण्यातले अवकाश, आपल्या हुंकारांनी, एकशब्दी प्रतिसादांनी तर कधी हसण्याने भरून काढत.

आकाशवाणीवर बातम्या वगळता अन्य निवेदक स्वत:चे नाव सांगत नसत . श्रुतिका संपल्यावर कलाकारांची नावे सांगितली जात, तेवढीच काय ती त्यांची प्रसिद्धी.माझ्या आठवणीत `पुन्हा प्रपंच’ च्या लेखकाचे नाव सांगितले जायचे आणि कलकारांची बोळवण आकाशवाणी कलावंत या बिरुदाने केली जायची. म्हणजे काहीसं ‘मेरी आवाज ही पहचान है’ असं. तरीही हे सगळे कलाकार श्रोत्यांच्या कानात आणि मनात घर करून राहिलेले.

अचानक एक दिवस आकाशवाणीवरून नीलम प्रभू हे नाव ऐकू यायचं थांबलं. तो चिरपरिचित आवाज मात्र ऐकू येत होता, एका वेगळ्या `करुणा देव' या नावाने.

२६ एप्रिल १९६५ या (वाढ)दिवशी वडिलांच्या विरोधाला न जुमानता, नाट्यक्षेत्रातल्या सहकार्‍यांचे सल्ले धुडकावून नीलम देसाईनी बबन प्रभूशी लग्न केले होते. २७ ऑगस्ट १९८१ रोजी बबन प्रभूंनी शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर दोन वर्षांनी नीलमताईंनी आकाशवाणीतच सेवारत असलेल्या पं. यशवंत देवांशी विवाह केला.

’मी कोणतीही भूमिका जगत नाही, तर वॉच करते, आयुष्यात मी ज्या वेगवेगळ्या भूमिका जगले, त्यावरून जग ही रंगभूमी आहे हे मला केव्हाच पटलंय’ असं म्हणणार्‍या नीलम प्रभूनी, करुणा देव यांनी, मीनावहिनींनी आता आपलं प्रसारण थांबलंय. पण त्यांच्या ध्वनीलहरी मात्र मनात कायम रुंजी घालत राहतील.

गुलमोहर: 

उत्तम लेख. वार्‍यावरची वरात मध्ये पण एक छोटा सा भाग आहे जेव्हा पुल स्वगत बोलतात व त्या फोनवर बोलतात पण दोन्ही एकत्र एक संभाषण आहे असे वाट्ते. मालती पांडे माझ्या साबांची जवळची मैत्रीण. त्या यजमानांसाठी फिश मेडिसिन घ्यायला इथे आल्या होत्या तेव्हा घरी आल्या होत्या. साबांकडे त्यांचे रेकॉर्डिन्ग असेल कदाचित.

श्रद्धांजली.

मुलांसाठी च्या `छान छान गोष्टी ' मधे त्यांनी सांगितलेली गोष्ट ही खुप मस्त वाटते ऐकायला.

भरत किति छान लिहिलंय तुम्ही! आकाशवाणीवरचे ते सर्व कार्यक्रम जसेच्या तसे आठवले.
दिनेशदा, तुम्ही अभिनय क्षेत्रात पण मागे नाही ? Wink

तरीही एक नॉल्स्टॅल्जियाचा अनुभव येत आहे इथल्या चर्चा वाचताना.>>> अगदी!
कुछ तो मिस् किया हमने..
ओळख करून द्यायची लिखाण पद्धत आवडली.

छान लिहिलंय. नीलमताईंचा स्वच्छ्,निकोप आणि ताजातवाना आवाज नभोनाट्यात आणि प्रपंचमधून ऐकत ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो! त्यावेळी दूरदर्शन नसल्यामुळे रेडिओची चलती होती.
तीन्-चार वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांच्या निर्मळ स्वभावाचाही प्रत्यय आला. त्यांचे पं. यशवंत देवांच्या पत्नी म्हणून कौतुक झाल्यावर त्या चटकन माईक हातात घेऊन म्हणाल्या,'' हे माझ्याहाती आयते लागलेले घबाड आहे. खरं कौतुक देवांच्या पहिल्या पत्नीचं व्हायला हवं. त्यांनी खुप कष्ट केलेत त्यांच्यासाठी. ते यशाच्या शिखरावर चढत असताना त्या ताईंनीच त्यांची सेवा केलीय.'' असे अतिशय आदराचे आणि प्रेमाचे उदगार नीलमताईंनी काढले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अमित खूप छान लिंक दिलीत. प्रवीन दवणेंचा लेख फार फार आवडला.
थोडं विषयांतर होतंय, पण कुणाला माहिती असेल तर मला प्लीज सांगाल काय की पूर्वी जो आकाशवाणीवर 'बालोद्यान 'हा कार्यक्रम व्हायचा त्याचे सादरकर्ते कोण होते?

निलम प्रभू ह्याच करुणा देव हे मला कित्येक वर्षे माहित नव्हते. आवाज ओळखीचा वाटायचा पण त्या आवाजाचे नाव वेगळे असल्याने गोंधळ व्हायचा.

नंतर जेव्हा कळले की लग्नानंतर निलम प्रभू करुणा देव झाल्या तेव्हा थोडे आश्चर्य वाटले. त्या एका नावाने फेमस असताना त्या नावाची ओळख पुर्ण मिटवुन नवे नाव घेताना त्यांना वाईट वाटले नसणार का ह्या विचाराने मला अजुनही बैचेन होते. त्यांनी कुठे लिहिलाय का त्यांच्या नाव बदलण्यामागचा विचार?

आता तर कधी वाटते की नवे नाव स्विकारताना त्यांना इन्सिक्युरिटी वाटली असेल का? नवे नाव लोक स्विकारतील की नाही अशी भिती वाटली असेल का त्यांना? त्यानी तिन वेगवेगळ्या नावांनी आपला ठसा उमटवला या पार्श्वभुमीवर आताच्या पिढीतल्या स्त्रिया जेव्हा स्वतःच्या नावाबद्दल आग्रही होतात तेव्हा वाटते खरेच नावाला आपण समजतो तेवढे महत्व असते का?

प्रज्ञा१२३, त्या बालोद्यान कार्यक्रमाचे सादरकर्ते श्री. गोपिनाथ तळवलकर होते असं वाटंतय. नाना या नावाने ते हा कार्यक्रम करत असत.

छान लेख भरत.

आमच्या पिढीला मीनावहिनी क्वचीत ऐकून माहिती, ते पण घरच्यांनी लावले तरच. नीलम प्रभूंना श्रद्धांजली.

Pages