शाळेतल्या शिक्षकांना आपल्याला नेमून दिलेला विषय सोडून अन्य विषय शिकवण्यात भलताच आनंद मिळत असावा. मी नवव्या की दहाव्या यत्तेत असताना एका शनिवारी मराठीच्या ऑफ़ झालेल्या तासिकेला सामाजिक शास्त्राच्या(इतिहास भूगोल हो) बाई आल्या.(इथे शिक्षिका म्हणायला हवे का? पण आम्ही बुवा त्यांना बाई अशीच हाक मारायचो?) एकदा त्यांनी अशीच ऑफ़ तासाला इंदिरा संत यांची ती कुटुंबवत्सल फ़णस इत्यादिकांची कविता शिकवून गृहपाठ म्हणून सवयीप्रमाणे ‘कारणे द्या’ म्हटल्यावर पहिल्या बाकावर बसलेल्या (उंचीचा फ़ायदा/तोटा काय हवे ते घ्या) माझ्या तोंडून निघालेला आँ बाईंच्या कानांपर्यंत पोचला नव्हता, इतक्या त्या कवितेत आणि कार्यकारण भावात मग्न झाल्या होत्या. तर त्याच बाईंनी काहीही न शिकवता गप्पांचा तास ठेवला. आणि गप्पांच्या ओघात केव्हा तरी उद्या दूरदर्शनवर `रविवारची सकाळ' मध्ये त्या आशालताबाई , कडवेकर मामीच्या भूमिकेत बेळगावी हेल कसा लावतात ते बघा असं सांगितले. आता हा गृहपाठ मिळाला नसता, तरी दूरदर्शनचे दिवसाला ३-४ तासांचे मोजके दर्शन नित्यनेमाने घ्यायचे हा तर परिपाठ होता. रविवारच्या सुप्रभाती पुलंचे दर्शन घ्यायला भक्तीभावाने टीव्हीसमोर मांडी ठोकली आणि चक्क एक ओळखीचा आवाज कानी पडला. पुलंच्या पत्नीच्या भूमिकेतला, फ़ोनवरून रेसिपी सांगणारा हा आवाज रोज कानावर पडणारा. लक्षात आलं अरे या तर आपल्या नीलम प्रभू. तोपयंत रेडिओ तर जन्मापासून घरात वाजत असल्याने घरातलं माणूसच वाटायचा. तर नुकताच आलेला टीव्ही कुणा परगावाहून आलेल्या लांबच्या श्रीमंत नातेवाईकासारखा होता. त्यामुळे रेडिओवर रोज आपल्याशी बोलणार्या नीलम प्रभूना टीव्हीवर पाहून हा कार्यक्रम पुलंसाठी पाहायचा असतो हेच विसरून गेलो.
तर अशा या नीलम प्रभू. ५ जून २०११ रोजी त्यांचं निधन झाल्याची बातमी वाचून आपल्या घरातलंच कुणी गेल्याची भावना झाली.
त्यांचा जीवनपट थोडक्यात मांडायचा हा प्रयत्न.
हिरामण देसाई या कापडव्यापार्याच्या पाच अपत्यांपैकी एक नीलम. जन्म २६ एप्रिल १९३५ . वडील नाट्यप्रेमी, नट-दिग्दर्शक होते. केशवराव दाते, धुमाळ, डॉ भालेराव यांच्याबरोबर त्यांची मैत्री होती. ’चित्तरंजन नाट्यसमाज’ ही नाट्यसंस्था त्यांनी काही काळ चालवली.
१९४०-४२ दरम्यान नीलमने प्रथम संस्कृत शाकुंतलात भरताची भूमिका केली. वय ५-७ वर्षे. नीला शाळेबरोबर कथ्थक नृत्य आणि गाणं शिकत होती. वडिलांच्या नाट्यसंस्थेत जायला लागली. मग बाहेरील नाट्यसंस्थांच्या नाटकांतही जाऊ लागली. मॅट्रिकपर्यंतच शिक्षण झालं असलं तरी वाचनाच्या सवयीने वैचारिक जडणघडण होत राहिली.
देवल जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या `झुंजारराव’च्या प्रयोगात नानासाहेब फ़ाटक, विजया मेहता, मा दत्ताराम यांच्यासोबत सारजाच्या भूमिकेत नीला उभी होती. यानंतर राजसंन्यास, श्रीमंत, शितू, एकच प्याला, भाऊबंदकी, संभूसांच्या चाळीत अशा वेगवेगळ्या नाटकांत आणि निरनिराळ्या संस्थांत त्यांनी भूमिका केल्या. तरीही नाटक/अभिनय यात करियर करावे असे काही त्यांना वाटले नाही. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी वार्यावरची वरात मधल्या `रविवारची सकाळ’ मध्ये पुलंच्या पत्नीची भूमिका त्यांनी साकारली, ती पुढली दहा वर्षे निभावली.
आकाशवाणीच्या श्रुतिकांमध्येही त्या भाग घेऊ लागल्या होत्या. तिथले नाट्यविभागातले निर्माते बाळ कुडतरकर यांनी त्यांना आकाशवाणीवर नोकरी करण्याविषयी सुचवले. रीतसर ईंटरव्ह्यु देऊन त्या निवडल्या गेल्या आणि त्यांच्याबरोबरच बबन प्रभूही.
नीलम प्रभू यांची आकाशवाणीवरील कारकीर्द , त्यांच्या श्रुतिका आठवताना, अपरिहार्यपणे बाळ कुडतरकर हे नाव येतेच. दोघांनी महानंदा, आनंदी -गोपाळ, ययाती देवयानी, घरगंगेच्या काठी या रंगमंचीय नाटकांच्या नभोवाणी आवृत्त्या साकारल्या.विजय तेंडुलकरांची रात्र आणि अन्य काही एकांकिकाही त्यांनी श्रुतिका रूपात सादर केल्या.
आकाशवाणीवर श्रुतिकांमध्ये भूमिका करता करताच त्या ध्वनिसंकलनही शिकल्या आणि आवडीने करूही लागल्या.
पुरुषोत्तम दारव्हेकरांनी खास त्यांच्या साठी `आम्ही तिघी’ ही श्रुतिका लिहिली. यात आजी, आई आणि तरुण मुलगी अशा तीन भूमिका त्यांनी केल्या. आवाजातून प्रत्येक व्यक्तिरेखेचं वय, मन:स्थिती, आयुष्याचा प्रवास सहज पोचवले. प्रत्येक भूमिकेतले वेगवेगळे संवाद म्हणायला लागणारा वेळ तालमीत स्टॉपवॉचवर मोजून मग त्याचे वेगवेगळे रेकॉर्डींग करून मिक्सिंग करण्यात आले. शिवाय `ए मम्मी, माझा शांपू कुठाय’ असा न्हाणीघरातून, लांबून ओरडल्याचा लेकीचा आणि उत्तरार्थ आईचा जवळून येणारा आवाज अशा तांत्रिक बाबींच्या कसरती सांभाळून केलेला हा प्रयोग इतक्या वर्षांनंतरही श्रोत्यांच्या लक्षात आहे.
अशीच एक `प्रकाशचे तेल' ही जाहिरात. आयत्या वेळी अन्य कलाकार न आल्याने `आई ग! वैतागले मी या केसांना’ असा कंगव्यात केस अडकल्यावर किंचाळणारा पहिला आणि `अगं मग प्रकाशचे माक्याचे आयुर्वेदिक तेल का वापरत नाहीस .......’ असा शांत, समजावणारा दुसरा; असे दोन्ही आवाज नीलमताईंच्या गळ्यातूनच निघाले.
नीलमताईंची ओळख ’पुन्हा प्रपंच’ मधली मीना वहिनी म्हणून झाली असली तरी प्रथम ही भूमिका कमलिनी विजयकर करीत. पुढे ते काम नीलमताईंकडे आले आणि त्यांचेच झाले. यातली प्रभाकरपंत (बाळ कुडतरकर) यांची `मिने मिने मिने मिने’ ही आणि टेकाडे भावजींची (प्रभाकर जोशी) मीनावहिनी ही हाक लोकांच्या अजून लक्षात आहे. आठवड्यातून एकदा ऐकवल्या जाणार्या पंधरा मिनिटांच्या या श्रुतिकेचे लेखन शं ना नवरे, वि आ बुवा,शाम फ़डके, व पु काळे, आत्माराम सावंत इत्यादिकांनी केले. बाळ कुडतरकरांच्या निवृत्तीपर्यंत ही श्रुतिका चालली. अगदी कुसुमाग्रजांनीही त्यांना ‘या नीलम प्रभू ’ अशी ओळख करून दिल्यावर ‘अरे मीनावहिनी, तुम्ही तर आमच्या घरात रोजच येता’ असं म्हटलं होतं!
नीलम प्रभू, लीलावती भागवत यांच्या जोडीने वनिता मंडळ सादर करीत. हा कार्यक्रम सुरुवातीला बराच काळ लाइव्ह ब्रॉडकास्ट व्हायचा. तर या दोघी संपूर्ण निवेदन आधी लिहून काढून तालीम करून वेळेत बसवायच्या. आणि तरीही त्यात कुठेही कृत्रिमपणा नव्हे, तर `भगिनींशी’ अगदी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसून संवाद साधावा इतकी सहजता होती. आकाशवाणी हे पूर्णपणे श्राव्य माध्यम. त्यात अगदी काही क्षणांची शांतताही कार्यक्रमाला मारक ठरू शकते. नीलम प्रभू समोरची व्यक्ती बोलत असताना, त्याच्या बोलण्यातले अवकाश, आपल्या हुंकारांनी, एकशब्दी प्रतिसादांनी तर कधी हसण्याने भरून काढत.
आकाशवाणीवर बातम्या वगळता अन्य निवेदक स्वत:चे नाव सांगत नसत . श्रुतिका संपल्यावर कलाकारांची नावे सांगितली जात, तेवढीच काय ती त्यांची प्रसिद्धी.माझ्या आठवणीत `पुन्हा प्रपंच’ च्या लेखकाचे नाव सांगितले जायचे आणि कलकारांची बोळवण आकाशवाणी कलावंत या बिरुदाने केली जायची. म्हणजे काहीसं ‘मेरी आवाज ही पहचान है’ असं. तरीही हे सगळे कलाकार श्रोत्यांच्या कानात आणि मनात घर करून राहिलेले.
अचानक एक दिवस आकाशवाणीवरून नीलम प्रभू हे नाव ऐकू यायचं थांबलं. तो चिरपरिचित आवाज मात्र ऐकू येत होता, एका वेगळ्या `करुणा देव' या नावाने.
२६ एप्रिल १९६५ या (वाढ)दिवशी वडिलांच्या विरोधाला न जुमानता, नाट्यक्षेत्रातल्या सहकार्यांचे सल्ले धुडकावून नीलम देसाईनी बबन प्रभूशी लग्न केले होते. २७ ऑगस्ट १९८१ रोजी बबन प्रभूंनी शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर दोन वर्षांनी नीलमताईंनी आकाशवाणीतच सेवारत असलेल्या पं. यशवंत देवांशी विवाह केला.
’मी कोणतीही भूमिका जगत नाही, तर वॉच करते, आयुष्यात मी ज्या वेगवेगळ्या भूमिका जगले, त्यावरून जग ही रंगभूमी आहे हे मला केव्हाच पटलंय’ असं म्हणणार्या नीलम प्रभूनी, करुणा देव यांनी, मीनावहिनींनी आता आपलं प्रसारण थांबलंय. पण त्यांच्या ध्वनीलहरी मात्र मनात कायम रुंजी घालत राहतील.
धन्यवाद भरत. भावपूर्ण
धन्यवाद भरत.
भावपूर्ण श्रद्धांजली.
मस्तच. खुप छान लिहिलं आहे.
मस्तच. खुप छान लिहिलं आहे. अगदी लहानपणी आईमुळे यातले काही कार्यक्रम कानावर पडले होते. तेव्हा ते जरी फार इंटरेस्टिंग वाटले नसतील, तरी आता वर उजळणी झाल्यावर असं वाटलं कि ते मन लावुन ऐकल्यासारखे त्यातले आवाज आणि संवाद आठवताहेत. अगदी nostalgic झाले आहे मी.
आईची, रेडिओची, त्यावेळी आई स्वयंपाक करत असायची त्या खमंग वासांची, उबदार दुपार, cozy रात्रींची आठवण आली. काही म्युझिक्स, काही व्यक्तींचे आवाज याबरोबर इतर इतक्या आठवणी जोडलेल्या असतात. तुमचा लेख इतका अप्रतिम आहे ना, कि मला ते रेडिओवरचे आवजही ऐकु आले आणि त्याबरोबरच्या आठवणीही. थँक्स. थँक्स.
छान परिचय करून दिलास भरत..!
छान परिचय करून दिलास भरत..!
मी फक्त ती "प्रकाशचे तेल"ची जाहीरात ऐकलीय नभोवाणीवर.
सुंदर.. वाचतावाचताच ते '`मिने
सुंदर.. वाचतावाचताच ते '`मिने मिने मिने मिने’'एकदम कानावर आल्यासारखं वाटलं
'प्रकाश तेल' कित्येकदा ऐकलेय पण दोन्ही आवाज त्यांचेच हे माहित नव्हते.
नीलमताईंची ओळख ’पुन्हा प्रपंच’ मधली मीना वहिनी म्हणून झाली असली तरी प्रथम ही भूमिका कमलिनी विजयकर करीत.

कालच्या सकाळमध्ये कमलिनी विजयकरांचे निधन झाल्याची बातमी वाचली
भरत, माझ्या एका
भरत, माझ्या एका आकाशवाणीवरच्या कार्यक्रमाच्या रेकॉर्डींगच्या वेळी, मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो होतो. जश्या त्यांच्या बोलण्यातून जाणवायच्या, अगदि तश्याच लोभस होत्या त्या. त्यांच्या आवाजातल्या कथाकथनाच्याही कॅसेट्स निघाल्या होत्या.
<< भावपूर्ण श्रद्धांजली. >>
<< भावपूर्ण श्रद्धांजली. >> अगदी खरंय.
कांहीजणांच्या आवाजातील गोडवा त्यांच्या स्वभावातून गळ्यात उतरलेला असतो; माझा जो कांही थोडासा परिचय 'मीनावहिनीं'शी होता त्यावरून काढलेला हा निष्कर्ष. वाचनाचे संस्कार असलेलं त्यांचं साधं बोलणंही म्हणूनच 'श्रवणीय' असायचं.
खरच मस्त आठवणी भरत. भावपूर्ण
खरच मस्त आठवणी भरत. भावपूर्ण श्रद्धांजली.
भरत, धन्यवाद. तुमच्या या
भरत, धन्यवाद. तुमच्या या लेखामुळे बरेच माहित नसलेले, माहित झाले. लहानपणी 'टेकाडेभावोजी' खूप वेळा ऐकलं होत. अगदी लक्षात ठेवून आम्ही घरातील सर्व जण ते ऐकायचो. आत्ता हे वाचून परत आठवण झाली. पण त्यांच्याविषयी काहीच माहीती नव्हती.
<<<असे दोन्ही आवाज नीलमताईंच्या गळ्यातूनच निघाले..>>>>खरच हे माहीत नव्हत.
नीलम प्रभूना भावपूर्ण श्रद्धांजली.
हा लेख लिहिण्यासाठी अक्षर
हा लेख लिहिण्यासाठी अक्षर च्या दिवाळी १९८६ च्या अंकात स्वतः नीलम प्रभू यांनी लिहिलेल्या लेखाचा आणि त्यांच्या आकाशवाणी, दूरदर्शनवरील मुलाखतींचा आधार घेतला आहे.
आकाशवाणीच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने त्यांचा फोन्-इन कार्यक्रम झाला होता आणि त्यात माझा फोन लागला व मला त्यांच्याशी बोलायचे भाग्य लाभले. तेव्हा मी त्यांना `आम्ही तिघी' या श्रुतिकेबद्दल विचारले होते.
त्यांनी चित्रपटांसाठी डबिंगही केले होते, हे नोंदवायचे राहिले.रंजना (देवघर), प्रिया तेंडुलकर( राणीनं डाव जिंकला) उषा चव्हान (भैरु पैलवान की जय), तसंच मराठीत डब झालेल्या जमुनादेवींच्या तमिळ चित्रपटांना त्यांनी आवाज दिला होता.
कमलिनी विजयकर त्यांच्या 'गोल्डन व्हॉइस' साठी प्रसिद्ध होत्या. पुन्हा प्रपंच प्रमाणेच वनिता मंडळातही नीलम प्रभू यांच्या आधी त्या होत्या. पण मी त्यांना फक्त `आपली आवड' सादर करतानाच ऐकले आहे.
छान लेख. धन्यवाद. करुणा देव
छान लेख. धन्यवाद.
करुणा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
छान लेख. धन्यवाद. करुणा देव
छान लेख. धन्यवाद.
करुणा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
भरत, माझ्या आठवणीप्रमाणे
भरत, माझ्या आठवणीप्रमाणे वनिता मंडळ, लिलावती भागवत आणि कमलिनी विजयकर सादर करत असत. त्यात प्रसंगानुरुप नीलम प्रभू हजेरी लावत असत.
नीलम प्रभूंचा उल्लेख करताना, महानंदा या नभोनाट्याचा उल्लेख करायलाच हवा. दळवींची हि कादंबरी नभोनाट्य रुपात, चार भागात सादर झाली होती. त्यात बाळ कुरतडकर बाबूल आणि नीलम प्रभू महानंदाच्या भुमिकेत होत्या. (मला नीट आठवत नाही, पण कल्याणीच्या भुमिकेत बहुतेक कमलिनी विजयकरच होत्या.) हे चारही भाग अतिशय सुंदर झाले होते. त्याचे पार्श्वसंगीतपण उत्तम होते. (पुढे गुंतता ह्रुदय हे, या नाटकात मात्र वेगळे संगीत वापरले होते. या कथानकाचे भाग्य एवढे थोर, कि कादंबरी, नभोनाट्य, मराठी नाटक (आशा काळे, डॉ. घाणेकर, आशालता), मराठी सिनेमा (विक्रम गोखले, फैयाज, शशिकला) हिंदी सिनेमा (मौशुमी चॅटर्जी, फारुख शेख, शशिकला) अशा अनेक माध्यमात ते सादर झाले.)
यातल्या दोघांच्याही भुमिका उत्तम वठल्या होत्या. नीलम प्रभू यांनीच, मरणगंध आणि ओ आर ए एल ओरल म्हणजे तोंडी अश्या नावाच्या श्रुतिका एकटीने सादर केल्या होत्या. ओरल.. मधे पण त्यांनी अनेक पात्रे रंगवली होती.
प्रपंच हा प्रोग्रॅम फक्त १५ मिनिटाचा असे, पण त्यात चुरचुरीत संवाद असत. लेखक बहुदा वि. आ. बुवा असत. या तिघांनी (प्रभाकरपंत, मीनावहीनी आणि टेकाडे भाऊजी ) यात प्राण ओतले होते. लोकांच्या प्रचंड आग्रहावरुन हि मालिका, पुन्हा प्रपंच नावाने सुरु झाली.
यात टेकाडे वहिनींचा अनेकदा उल्लेख असे, पण ते पात्र कधीही श्रुतिकेत आले नाही.
या श्रुतिकेच्या रेकॉर्डींगसाठी, आकाशवाणीत एका स्टूडीयो मधे खास पार्टीशन केले होते. मीनावहीनी जे संवाद किचनमधून बोलत, त्यासाठी त्या या पार्टीशनच्या मागे जात असत. तिथेच कप बश्या, चमचे असे सामान ठेवले होते, आणि गरजेनुसार त्या याचा वापर करत. ते तिघे जवळजवळ अभिनय करतच संवाद म्हणत.
माझ्या एका कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग त्याच रूममधे झाले होते. या ना त्या कारणाने, आमचे रेकॉर्डींग दिवसभर रखडले. त्यावेळी त्या दोनदा येऊन गेल्या. तूमचे चालू द्या, आम्ही मग रेकॉर्ड करु असे सांगून गेल्या. आम्हाला शुभेच्छा पण दिल्या त्यांनी. त्यांचे नेहमीचे बोलणे आणि रेडीओवरचे बोलणे यात अजिबात फरक नसे, त्यामूळे त्यांचे संवाद अगदी नैसर्गिक वाटत.
अरे! या मीना वहिनी होत्या का?
अरे! या मीना वहिनी होत्या का? खुपदा ऐकलाय प्रपंच. पण कलाकारांची नावे माहीत नव्हती!
करुणा देव आणि कमलिनी जयकर या दोघींना भावपुर्ण श्रद्धांजली!
खरच खुपच नॉस्टॅलजिक वाटत आकाशवाणीचा विषय निघाला की!
धन्यवाद भरत मयेकर आणि दिनेशदा!
या सगळ्या जुन्या कार्यक्रमांचं रेकॉर्डिंग कुठे मिळु शकेल का?
वत्सला, त्या कार्यक्रमाचे
वत्सला, त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डींग कुणी खाजगीरित्या केले असेल तरच. पण त्यांच्या आवाजातल्या कथाकथनाच्या कॅसेट्स मिळायला हव्यात. आता सारेगामा, कदाचित काढेल परत.
एक अगदी दुखरी आठवण. ज्यावेळी मालती पांडे गेल्या, त्यावेळी मी एका प्रसिद्ध कंपनीमधे त्यांची एखादी कॅसेट वा सिडी आहे का ते विचारायला गेलो होतो. तिथल्या अधिकार्याने.. गेल्या का त्या ? आता अर्काइव्ज शोधून एखादं कंपायलेशन आणतो बाजारात, असे उत्तर दिले होते.
दिनेशदा, तुम्ही कोणत्या
दिनेशदा, तुम्ही कोणत्या रेकॉर्दिंगसाठी गेला होतात?
आमच्या शाळेतर्फे गंमत जंमत
आमच्या शाळेतर्फे गंमत जंमत मधे एक श्रुतिका सादर झाली होती. परत एकदा प्रश्नमंजूषेच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. (१९७७ ची गोष्ट आहे ही.)
कै मालती पांडे >>>> मागच्या
कै मालती पांडे >>>>

मागच्या भारतभेटीत जुने रेकॉरडिंग शोधण्याचा प्रयत्न केला पण
पुन्हा प्रपंचचे रेकॉर्डींग
पुन्हा प्रपंचचे रेकॉर्डींग नसेल आकाशवाणीकडे. पण श्रुतिका आहेत.
श्रद्धांजली म्हणून आम्ही तिघी आणि रात्र ऐकवल्या होत्या.
दिनेशदा,कमलिनी विजयकर यांच्यावरच्या कार्यक्रमात त्या ८६ वर्षांच्या होत्या असे सांगितले. नीलम प्रभू ७५ वर्षांच्या. वनितामंडळात आधी कमलिनी विजयकर होत्या असेही त्या कार्यक्रमात सांगितले. नीलम प्रभूंनी स्वातःच आपल्या लेखात त्या ताई/माई व्हायच्या असं म्हटलंय.
माझा जन्म होईतो कमलिनी विजयकर नाट्यविभागातून बाहेर पडून अनाउन्सर म्हणून राहिल्या असाव्यात. कारण मला फक्त त्यांची `आपली आवड'च आठवतेय.
त्यांची भूमिका असलेल्या एका श्रुतिकेची झलक काल ऐकवली होती.
प्रभाकर जोशी यांचेही फार पूर्वीच निधन झाले. त्यांच्या पत्नी आकाशवाणीच्या फोन इन कार्यक्रमात सामान्य श्रोत्यांप्रमाणे फोन करीत आणि मी टेकाडेभावजींची पत्नी बोलतेय असे सांगत. त्यांचेही निधन झाले.
हो मग कमलिनी विजयकर नंतर
हो मग कमलिनी विजयकर नंतर सेवानिवृत्त झाल्या असणार. त्या एकदा दूरदर्शनवर पण आल्या होत्या असे आठवतेय. सुंदर माझे घर मधे, अविवाहित राहिलेल्या स्त्रिंयांवर एक कार्यक्रम सादर झाला होत्या. त्यात होत्या बहुतेक त्या. खरे तर या कलाकारांचे आवाज हिच त्यांची ओळख असे. त्यांचे फोटोही कुठे छापलेले नसत. पण तो आवाज मात्र, त्यांची खास ओळख बनून राहिला होता.
छान लेख.करुणा देव यांना
छान लेख.करुणा देव यांना श्रद्धांजली.
<<<`आम्ही तिघी’ ही श्रुतिका
<<<`आम्ही तिघी’ ही श्रुतिका लिहिली. यात आजी, आई आणि तरुण मुलगी अशा तीन भूमिका त्यांनी केल्या. आवाजातून प्रत्येक व्यक्तिरेखेचं वय, मन:स्थिती, आयुष्याचा प्रवास सहज पोचवले.>>> अजून लक्षात आहेत ते आवाज आणि प्रपंच ऐकायला तर घरातले सगळे तयार होऊन बसायचो ते आठवतय. व.पु. काळेच्याबरोबर त्यांनी केलेलं कथाकथन कॅसेट - 'पपा' ही गोष्ट फक्त त्यांच्या आवाजासाठी मी कितीतरीवेळा ऐकते. फार वाईट वाटलं त्या गेल्या ते वाचून.
चांगली माहिती. धन्यवाद,
चांगली माहिती.
धन्यवाद, भरत.
मोहना, बरोबर, मलाही 'वार्यावरची वरात' आणि 'पपा'ची आठवण झाली.
'वार्यावरची
'वार्यावरची वरात'...
त्यांच्या सुरवातीच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही वाईट वाटायचं. बबन प्रभू या असामान्य कलाकारासाठी जेव्हढं वाईट वाटायचं तेव्हढंच त्यांच्यासाठीही. पुलं/सुनीताबाईंनी जणू त्यांना आपली लेकच मानलं होतं. या दोघांचा खूप आधार होता नीलम प्रभूंना.
भरत अगदी योग्य श्रद्धांजली.
भरत
अगदी योग्य श्रद्धांजली. शाळकरी वयात प्रपंच बरेचदा ऐकले होते, त्यामुळे मीनावहिणी, टेकाडे भावजी ही नावे लक्षात होती. तुमचा लेख वाचल्यावर बरीचशी उजळणी झाली.
मस्त लेख! रेडीओ आणि माझं आजोळ
मस्त लेख!
रेडीओ आणि माझं आजोळ असे काहिसे माझ्या मनात आहे. मनिमाऊप्रमाणे वेगवेगळे वास... आजीच्या साड्या.. आजोबांच्या चार मिनारचा वास... मासे.. खारे दाणे.. दिवाळी.. तुळस.. अमीन सयानी.. गंमत जंमत असे बरेच काहीसे रेडीओशी जुळले आहे. सक्काळी सक्काळी पण एक छानसा कार्यक्रम लागायचा.. मराठी. नाव आता आठवत नाही.
मला आताचे एफ्.एम फारसे सुधरत नाहीत.
पण उद्या माझी लेक त्यांचाच नॉस्टेल्जिआ घेऊन बसेल.. 
दुर्दैव आमचे की, यातील एकही
दुर्दैव आमचे की, यातील एकही कार्यक्रम आम्हाला ना कधी ऐकायला मिळाला ना त्याबाबत कधी चर्चा कानी पडली. आज हा लेख आणि त्यावरील विस्तृत अशा प्रतिसादातून उमटलेली आठवणींची पोतडी पाहिली आणि उमजले की किती बहारीचे दिवस असतील ते 'आकाशवाणी' चे. मी स्वतः रेडिओचा पक्का 'सुधाकर-तळीराम' नादिष्ट पंथी आहे, पण ऐकतो ते कायमस्वरूपी एफ.एम. बॅन्ड्स, तेही मिर्ची, टोमॅटो, रेडिओ सिटी सारखे खाजगी (ए.आय.आर.चे ऐकतो, ते फक्त जुन्या हिंदी गाण्यासाठी..."रजनीगंधा' नामक कार्यक्रमातून कानी पडणारे). मिडीअम आणि शॉर्टवेव्हजचा जमानाच संपला जणू.....आणि साहजिकच मिडीअम बॅण्डवरून प्रसृत होणारे आकाशवाणीचे वरील धर्तीचे कार्यक्रम ऐकणे दुर्लभच....ते सोनेरी दिवस असणार श्रोत्यांसाठी.
काल हा लेख वाचल्यापासून मिळेल त्या दैनिकात प्रकाशित झालेले आठवणी स्वरुपांचे लिखाण वाचले आणि "मीनावहिनी' खर्या अर्थाने प्रत्येक घरातील सदस्य कशा झाल्या होत्या...ते प्रकर्षाने जाणवले. नीलम प्रभू हे नाव तरी किमानपक्षी माहीत आहे, पण कमलिनी विजयकर इथेच वाचले.
तरीही एक नॉल्स्टॅल्जियाचा अनुभव येत आहे इथल्या चर्चा वाचताना.
छान लेख पं.यशवंत देव आणि
छान लेख
पं.यशवंत देव आणि करुणा देव यांना एका कार्यक्रमादरम्यान भेटायचा योग आम्हांला तीन चार वर्षांपूर्वी आला होता. आम्ही त्यांना कार्यक्रम आवडल्याचे सांगितले तेंव्हा गोड हसत त्यांनी आभार मानले आणि आम्हांला पहिल्यांदा त्यांचा आवाज इतक्या जवळून ऐकायला मिळाला. त्या पहिल्याच भेटीत त्या मी आणि माझ्या मैत्रीणीशी जुनी ओळख असल्यासारख्या मोकळेपणाने बोलल्या, पुन्हा "हल्ली गं हे गुडघे फार त्रास द्यायला लागलेत ना म्हणून खाली बसलं की अवघडल्यासारख होतं हे ही सांगून झालं!
इतकं साधं सरळ व्यक्तीमत्व होतं त्यांच..
भरत, छान आहे श्रद्धांजली ..
भरत, छान आहे श्रद्धांजली .. माझी आकाशवाणीशी ओळख आईमुळेच त्यामुळे वर मनीमाऊ ने म्हण्टलंय तशा आठवणी जाग्या झाल्या .. धन्यवाद! मला बहुतेक आवाज आठवतोय त्यांचा ..
प्रपंच म्हणजे हे गाणं असलेलाच कार्यक्रम का?
'अहो प्रपंच, प्रपंच नेहेमी करावा, नेटका, हसता खेळता ..'
सशल, तेव्हाच्या प्रपंच आणि
सशल, तेव्हाच्या प्रपंच आणि पुन्हा प्रपंचच्या आरंभी फक्त धून वाजायची.
आता हा कार्यक्रम `अहो प्रपंच' या नावानी चालतोय आणि त्याच्या आरंभी हे गाणे वाजते. पण आताच्या कार्यक्रमाचं स्वरूप बहुतेक वेळा चालू घडामोडींवर घरगुती चर्चा असं असतं.
छान लेख. धन्यवाद
छान लेख. धन्यवाद भरत.
मीनावहिनींना भावपूर्ण श्रद्धांजली.
Pages