शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधुन येताना अचानक पावसाने गाठले, बचावाची कुठलीच संधी न देता त्याने चिंब भिजवलं. या वर्षीचा पहिला पाऊस भेटला तो असा. "पाऊस" मग तो कुठलाही भागातला असो, प्रत्येकाच्या मनात काही न काही आठवण ठेवून जातो. असंच भिजुन घरी आल्यावर मन काही वर्षे मागे गेले आणि आम्हाला कोकणात भेटलेला पहिला पाऊस आठवला. तीच आठवण पूर्वी मायबोलीवर लिहली होती. आज पुन्हा तुमच्यासमोर काही शब्दबदल करून फोटोंसहित आणत आहे.
पहिल्या पावसाची आपण ज्या उत्कंठतेने वाट पाहत असतो तो बेसावध असताना अचानक येतो. निसर्गाचे हे खेळकर रूप पाहताना/अनुभवताना जो आनंद होतो तो शब्दातीत आहे. असाच हा पावसाच्या लपाछपीचा आमचा कोकणातील अनुभव.
===============================================
===============================================
यंदा पावसाने मुंबईत वेळेवर हजेरी लावली. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप.
पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच. अशा या पाऊसवेड्यांमध्ये हिरव्या ऋतुत मनसोक्त भटकंती करणाऱ्या पर्यटकांचाही समावेश होतो आणि भिजून चिंब करणार्या ठिकाणाला भेटी द्यायच्या याद्या तयार होऊ लागतात. अशा या वेड लावणार्या पावसाचे रूप प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते. घाटमाथ्यावर कमी-अधिक तर कोकणात धुवांधार. म्हणुनच दरवर्षी पावसाळी भटकंतीसाठी जाणारे आम्ही पहिला पाऊस अनुभवण्यासाठी कोकणात जायचे ठरविले.
त्यावर्षी पावसाचे आगमन जरा उशीराच झाले. मान्सून गोव्यापर्यंत येवून थडकला असून कोकणात त्याचे आगमन लवकरच होईल अशा बातम्या येत होत्या. त्याच पावसाला अनुभवण्यासाठी आम्ही ३ योगेश (मी, योगेश शेलार, योगेश शेडगे), गणेश आणि संदीप असे पाच मित्र सॅन्ट्रो कार घेऊन सज्ज झालो. गोव्यात जरी मान्सूनचे आगमन झाले असले तरी मुंबईत मात्र घामाच्या धारा वाहत होत्या. आम्ही पावसावर आणि हवामान खात्यावर भरोसा ठेवून आमचा प्रवास सुरू केला. गाडी पनवेल, कोलाड, महाड, पोलादपूर, खेड मागे टाकून चिपळुणच्या दिशेला धावू लागली, पावसाचा तर पत्ताच नव्हता पण त्याच्या आगमनाचे काही चिन्हही दिसत नव्हते. चिपळुणला पोटपूजा करून आम्ही गणपतीपुळ्याला पोहचलो. गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही मुक्कामाला संदीपच्या घरी रत्नागिरिला थांबलो. संपूर्ण दिवस हा पावसाच्या धारात न जाता घामाच्या धारात गेला.
दुसर्या दिवशी आमच्या प्लॅननुसार आम्ही कुणकेश्वरला जाण्यासाठी निघालो. आकाशात सूर्य तळपत होता. पावसाच्या आगमनाचा काहिही मागमुस नव्हता. रत्नागिरी, भाट्ये, गावखडी, कशेळी मार्गे आम्ही राजापुरकडे निघालो. मध्ये आमची गाडी एका पठारावर आली असत अचानक आकाशात काळे ढग दिसू लागले. चला! आजचा दिवस तरी फुकट जाणार नाही असे आम्हा सर्वांना वाटले. वारा जोरात वाहत होता. पण अचानक त्या वार्याबरोबर काळे ढगही पुढे निघून गेले. पुन्हा लख्ख ऊन पडले आणि आमच्यातला एकजण सहज उद्गारला, "अरे! हि काय पावसाची जाहिरात होती का?"
मजल दरमजल करत आम्ही कुणकेश्वरला पोहचलो, पण तरीही पावसाचा पत्ता नव्हता. गोव्यात मात्र पाऊस चांगलाच कोसळतोय याच्या बातम्या मात्र मिळत होत्या. संध्याकाळी कुणकेश्वराचे दर्शन घेऊन समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेलो. पावसाळी वातावरण होते, पण पाऊस मात्र पडत नव्हता. वारा प्रचंड प्रमाणात वाहत असल्याने समुद्र खवळलेला होता. आमचा दुसरा दिवसही पावसाची वाट पाहण्यातच गेला.
कुणकेश्वर बीच
तिसर्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही निवती बंदर (वेंगुर्ला) येथे जाण्यासाठी निघालो. कुणकेश्वरहून आचरामार्गे आम्ही मालवणात पोहचलो. समुद्र उसळलेला असल्याने व किल्ल्यापर्यंत जाणार्या होड्या बंद केल्याने आम्हाला "मालवणची शान" किल्ले सिंधुदुर्ग पाहता आला नाही. मालवणहून पुढे कुंभारमाठ, सागरी मार्गाने आम्ही निवतीला जाण्यासाठी निघालो. मालवण ते निवती हा सारा प्रवासच स्वप्नवत होता. संपूर्ण प्रवासच हा कोकणच्या हिरव्यागार निसर्गाची साक्ष देत होता. पण आम्ही ज्याच्यासाठी तळकोकणापर्यंत आलो तो पाऊस मात्र आमच्यावर बहुतेक रागावला होता. आमची हि पावसाळी भटकंती पाऊस न अनुभवताच जाणार कि काय अशी शंका आमच्या मनात आली. मालवण ते निवती या प्रवासात बर्याच वेळा आकाशात अचानक काळे ढग येत होते व तसेच ते नाहिसे होत होते. एव्हाना आम्हालाही त्या "जाहिरातीची" सवय झाली होती.
वाटेत कोकणचा निसर्ग न्याहळत पाट, परुळे, म्हापण मार्गे आम्ही निवती गावात पोहचलो. निवती हे बंदर असून शे-दोनशे उंबर्याच्या या गावाला अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभले आहे. विस्तिर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या या गावचा मुख्य व्यवसाय हा मासेमारीचा होय. निवती खाडी जेथे समुद्राला मिळते तेथेच वसलेले हे निवती बंदर. येथील निवतीचा किल्ला आणि त्यावरील दीपस्तंभ (जलदूर्ग)पाहण्यासारखा आहे. या गावाविषयी अधिक काही सांगणे म्हणजे स्वतंत्र लेखाचा विषय होईल.
निवतीचा समुद्रकिनारा
थोडे फ्रेश होऊन आम्ही समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी निघालो. समुद्राला भरती असल्याने आम्ही किनार्यावरच फिरत होतो. संध्याकाळी चारच्या दरम्यान आम्ही निवती खाडीमध्ये होडीतून फेरफटका मारण्यासाठी निवती खाडीवर पोहचलो. पावसाळा सुरू होत असल्याने आपआपल्या होड्या किनारी लावण्यासाठी सगळ्यांची लगबग चालू होती. पण पावसाचा काही पत्ता नव्हता.
सहसा खाडी म्हटले कि आपल्याला आठवते ती मुंबई-ठाण्याची खाडी नव्हे नाला! पण निवती खाडीचे पाणी मात्र अतिशय स्वच्छ होते. दह फुटापर्यंतचा तळ दिसेल असे आरसपानी.
निवती खाडी
नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी आम्ही होडीत बसलो. खाडीच्या मध्यावर आलो असता वारा पुन्हा जोराने वाहू लागला. संध्याकाळची वेळ, समोर दिसणारे सुंदर निवती गाव, जोराने वाहणारा वारा यामुळे "नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे! सांजवेळ झाली आता पैल माझे गाव रे! " या गाण्याची आठवण न व्हावी तर आश्चर्यच. नावेत मासे पकडण्याचे जाळे पाहून आम्हालाही मासे पकडण्याची हुक्की आली. आमचा एक मित्र गणेश कोळी याने आपल्या आडनावाला जागून जाळे फेकले खरे पण वाटले ह्या वेळेस पाऊस आणि मासे यांनी जणू आमची परीक्षा घेण्याचेच ठरविले होते. अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर जाळ्यात अवघे ४-५ छोटे मासे मिळाली आणि हो एक खेकडासुद्धा!
आजचा दिवसही पावसाविना जाणार या विचाराने आम्ही सगळे जलविहाराचा आनंद घेऊ लागलो. पण आपल्या (आणि हवामान खात्याच्या) तर्कांना छेद देनार नाही तो पाऊस कसला. अचानक सगळीकडे अंधार दाटून आला. खाडीच्या समोर असलेल्या हिरव्यागार एका छोट्या टेकडीवर ऊन आणि सावली यांचे एक सुंदर दृष्य दिसू लागले आणि नकळत पाडगावकरांच्या "पाचुच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले" या गाण्याची आठवण झाली.
गेल्या दोन दिवसांपासून आम्हाला पावसाच्या लहरीपणाची सवय झाली होती म्हणून आम्हीही परत हा त्याच्या "जाहिरातीचा" एक भाग समजून दुर्लक्ष केले. येथेही त्याने आपल्या लहरीपणाचे रूप दाखवायला सुरूवात केली. अचानक पावसाचे एक एक थेंब अंगावर पडू लागले आणि सर्वांनी एकच जल्लोष केल "पाऊस आला". गेले ३ दिवस ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो व ज्याला अनुभवण्यासाठी एवढ्या लांब आलो तो एकदाचा आला. निवती खाडीच्या मध्ये आम्ही, समोर उफाळलेला समुद्र, चोहिकडे पाणीच पाणी, नावेमध्ये आम्ही हा अनुभवच विलक्षण होता. हाच अनुभव देण्यासाठी बहुतेक त्याने ३ दिवस आमची परीक्षा घेतली असावी. त्याच्यावरचा आमचा राग हा त्या पावसाच्या पहिल्या सरिबरोबर वाहून गेला. सभोवती सगळीकडे पाणी असल्याने आम्हाला पावसाच्या पहिल्या सरींनी येणारा मातीचा गंध मात्र अनुभवता आले नाहि. मात्र "कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है ना! " या उक्तीप्रमाणे आम्ही भर पाण्यात होडीमध्ये बसून पहिल्या पावसाचा आनंद लुटत होतो. एव्हाना रात्र झाली व आम्ही पावसाचा आनंद घेऊन घरी परतलो. बाहेर पावसाने आता खर्या अर्थाने आपला रंग दाखवायला सुरूवात केली होती. आपल्या आगमनाची वर्दी तो विजांचा ढोल पिटून देत होत. बाहेर संपूर्ण अंधार असल्याने आम्हाला भिजता आले नाही. पण दुसर्या दिवशी मात्र मालवण येथे "तारकर्ली" बीचवर भिजून आदल्या दिवशीची कसर आम्ही भरुन काढली. आम्ही अनुभवलेला कोकणातला पहिला पाऊस हा त्यादिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाला.
तारकर्ली बीच
असा हा पाऊस आमच्या मनात एक खास आठवण ठेवून गेला. ज्या पावसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो किंबहुना ज्याला अनुभवण्यासाठी आम्ही खास मुंबईहून कोकणात आलो, ज्या पावसाला येण्याची आणि बरसण्याची आम्ही विनवणी करीत होतो तो पाऊस एका महिन्यातच आपले रौद्र रूप दाखवेल असे कोणाच्याही मनात आले नव्हते. त्या दिवशी मुंबईत पाऊस सकाळपासून पडत होता दुपारनंतर मात्र त्याचे प्रमाण वाढत गेले आणि बघता बघता त्याने संपूर्ण मंबापुरीला आपल्या "मिठी"त घेतले. हो! अगदी बरोबर ते वर्ष होते २००५ आणि तो दिवस होता २६ जुलै! जो मुंबईकर कधीही विसरू शकत नाहि. आग, वादळ, पूर या गोष्टीतील भीषण सौंदर्याचा आनंद आपण स्वतः दूर असतो तोपर्यंतच आपणा सर्वांना लुटता येतो पण स्वतःवर ते संकट येऊन कोसळले म्हणजे त्यातील सौंदर्य पाहण्याची आपली शक्तीच नाहिशी होते.
सदर लेख खुप आधी मायबोलीवर
सदर लेख खुप आधी मायबोलीवर लिहिला होता. आज पुन्हा तुमच्यासमोर काही शब्दबदल करून फोटोंसहित आणत आहे.
सगळेच फोटो अप्रतिम.
सगळेच फोटो अप्रतिम.
सुरेख फोटो!
सुरेख फोटो!
धन्यवाद जिप्सी. तुझा लेख
धन्यवाद जिप्सी. तुझा लेख म्हणजे डोळ्यांना पर्वणी असते मित्रा.
मस्तच........... सावरी
मस्तच...........
सावरी
जिप्स्या धन्स पुनप्रकाशित
जिप्स्या धन्स पुनप्रकाशित केलेस त्यासाठी.
मस्त वर्णन केले आहेस.कुणकेश्वर बीच चा प्रचि फार आवडला.
फोटो ,लेखन दोन्ही मस्त .
फोटो ,लेखन दोन्ही मस्त .
यंदा वेंगुर्ल्यात पावसाने
यंदा वेंगुर्ल्यात पावसाने दुसर्याच दिवशी तब्बल ९३० मिमि कोसळुन जोरदार entry मारली आहे.

बाकी प्रचि नेहमी प्रमाणेच सुंदर..
वा मस्तच. फोटोही आणि लेखनही
वा मस्तच. फोटोही आणि लेखनही !
तरीपण मी म्हणेन, पाऊस बघायचा तर गोव्यातच ! परत खास गोव्यासाठी म्हणून ट्रिप काढा, पण बीचेस्वर जाऊ नका. (कुठे जायचे ते मी सांगतो )
जिप्सी, मस्त फोटो आणि
जिप्सी, मस्त फोटो आणि वर्णन.(नेहमीप्रमाणे)
आज्जेला अनुमोदन!
आज्जेला अनुमोदन!:-)
जिप्सी, फोटो आणि वर्णन
जिप्सी, फोटो आणि वर्णन अप्रतिम! माझे बालपण कोकणातीलच असल्याने पावसाच्या विविध छटा खूप जवळून अनुभवल्यात! त्यामुळे तुमचे वर्णन वाचताना खूप छान वाटले.
मस्त!
मस्त!
सुंदर.
सुंदर.
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
वरील सगळे फोटो माझ्या जुन्या डिजीकॅमने (Benq, 2MP) काढले आहेत.
मस्त रे जिप्सी..
मस्त रे जिप्सी..
आधीचा लेख वाचला होता की नाही
आधीचा लेख वाचला होता की नाही ते आठवत नाहीये..
खूप छान लिहीले आहेस.. नि संगतीला डकवलेले फोटोदेखील छानच.. .. असाच लिहीत रहा..
लेख व सगळेच फोटो अप्रतिम
लेख व सगळेच फोटो अप्रतिम
मित्रा, मस्त लेख
मित्रा,
).
मस्त लेख आहे.
खाडीच्या समोर असलेल्या हिरव्यागार एका छोट्या टेकडीवर ऊन आणि सावली यांचे एक सुंदर दृष्य दिसू लागले >>>
हा फोटो खुप आवडला.
अरे प्रकाशचित्र विभागाशिवाय दुसरीकडे कुठे काही टाकले तर सांगत जा (रिक्षा फिरव
नेहमीप्रमाणेच सुंदर फोटो आणि
नेहमीप्रमाणेच सुंदर फोटो आणि लेख
तो 'ऊन हळदीचे' फोटो तर एकदम खल्लास!!!
फोटो कोकणातले आहेत म्हणजे छान
फोटो कोकणातले आहेत म्हणजे छान असणारच!
आणी तुम्हाला ते मडक्याच्या बाजुच्या टोपलीत काय ठेवले आहे ते माहित आहे का?