मसूराची खिचडी ( जुन्या मायबोलीवरची मॄण्मयीने दिलेली पाककृती )

Submitted by संपदा on 29 May, 2011 - 08:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१. २ वाट्या बासमती (४-५दा पाणी बदलून धुतलेला, कमीतकमी १५ मिनिट पाणी निथळून ठेवलेला)
२. १ वाटी मसूर, रात्रभर भिजवून, उपसून ठेवलेला
३. १ लहान चमचा आलं लसूण वाटलेलं
४. २ पळ्या तेल
५. १ पळी साजूक तूप
६. २ टोमॅटो
७. २ कांदे
८. कोथिंबीर

मसाले: सगळे भर तेलात तळून घ्यावे. तेल टिपून घेतल्यावर बारीक वाटावे. (वाटताना थोडं पाणी घालायला हरकत नाही.)

१. २ मोठे चमचे धने
२. अर्धा चमचा मिरे
३. ४-६ लवंगा
४. १ मोठा दालचिनीचा तुकडा
५. २ मोठी तमाल पत्र (तेजपान)- ही अख्खी फोडणीत घालायला
६. हिंग
७. मीठ चवीनुसार
८. ३ वाट्या आधणाचं पाणी.

क्रमवार पाककृती: 

१. तेल तापवून त्यात तमालपत्र आणि हिंग घालावं.

२. त्यावर निथळलेले मसूर घालून भरपूर परतावं.

३. मसूर परतल्यावर मग तांदूळ घालावेत.

४. आलं लसूण गोळी घालून आणखी कलसावं

५. कांदा घालून तो पारदर्शक होईपर्यंत घाटावं.

६.यावर मसाल्याची पावडर घालून (वाटल्यास तिखट घालावं) आणखी काही वेळ परतून आधण ओतावं.

७. वरून टोमॅटो (एकाच्या ८ फोडी केलेल्या), कोथिंबीर (बारिक चिरलेली) आणि साजूक तूप घालून उकळी आणावी.

८.पाणी आटत आलं की जाड झाकण ठेऊन शिजू द्यावं. टोमॅटोचा कच्चा वास लागत नाही.

९.अर्ध पाणी-अर्ध नारळाचं दूध एकत्र करून त्यात फुलवलेली खिचडी पण खूप छान लागते.

माहितीचा स्रोत: 
मॄण्मयीची जुन्या मायबोलीवरची पाककृती .
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजपर्यंत ह्या रेसिपीने अगणितवेळा मसूर खिचडी केलीये , चव अप्रतिमच लागते . Happy दरवेळी जुन्या मायबोलीवरची लिंक द्यावी लागायची म्ह्णून इकडे आणली . Happy
थँक्स मृ . Happy ( आणि ह्यात तुझ्याकडचे काही चेंजेस असले तर सांग . )

संपदा, तांदळानंतर कांदा घालायचा का ?
याला नक्कीच चांगली चव येत असणार. नारळाच्या दूधाने जास्त छान लागणार.

दिनेशदा , ही पाककृती मी जुन्या मायबोलीवरून जशीच्या तशी इकडे आणलीये , मी स्वतः करताना ह्यात काही बदल केलेत , ते लिहिते Happy
( मॄ , पुन्हा एकदा ही कृती वाचून काही चुकलं असल्यास सांगणार का ? मी त्यानुसार वरच्या पाककृतीत बदल करते . )

माझे बदल :-

१. तेल तापवून त्यात तमालपत्र आणि हिंग घालावं.

२. कांदा घालून तो पारदर्शक होईपर्यंत परतावं .

३. मग टोमॅटो (एकाच्या ८ फोडी केलेल्या) घालावा , त्यानंतर आलं लसूण गोळी घालून आणखी परतावं .

४. त्यावर निथळलेले मसूर घालून भरपूर परतावं.

५. यावर मसाल्याची पावडर घालावी . (वाटल्यास तिखट घालावं)

६. मसूर परतल्यावर मग तांदूळ घालावेत. आणखी काही वेळ परतून आधण ओतावं .( मी ह्या मसूर तांदूळाच्या प्रमाणाला १/२ वाटी एव्हढे नारळाचे दूध घालते . बाकी गरम पाणी वापरते . )

७. पाणी आटत आलं की जाड झाकण ठेऊन शिजू द्यावं. टोमॅटोचा कच्चा वास लागत नाही.

८. कोथिंबीर (बारिक चिरलेली) आणि साजूक तूप घालावं .

करून खायची म्हणजे ..त्यापेक्षा तयार मिळाली तर किती छान Happy , चला विकेंडला बघतोच करून Happy

संपदा, खिचडी अगदी अशीच करते मी पण. Proud हळद (तिथे लिहायचं विसरलेय) आणि गुळाचा खडा (ऐच्छिक) पण टाकते. कलसलेल्या मसूर-तांदळावर आधणाचं पाणी ओतलं की लागलीच त्यात साजुक तूप, मीठ, गूळ, कोथिंबीर आणि टोमॅटोचे काप घालते.

तळलेला मसाला घालायचा नसेल तर वापरणार असू त्या मसाल्याची पावडर जराश्या तेलात आधी वेगळी परतून घ्यायची आणि मग कलसलेल्या मसूर-तांदळावर घालायची असं वहीत लिहिलंय. ते तिथे लिहायचं विसरले होते बहुतेक.

मस्त लागते ही खिचडी! आवडता पदार्थ!! Happy त्यासोबत ताक, कैरी/ लिंबाचं लोणचं इ. इ. प्रकार असतील तर स्वर्ग!

छान पाकक्रुती. सी के पी घरात नेहेमीच होत असते पण खूप दिवसात केली नाही आता करेन. आम्ही टोमटो घालत नाही, नारळाचे दूध वापरतो.

नारळाचं दूध न वापरता चव कॉम्प्रमाईझ न करता करायची असेल तर काही करता येईल का?

हा प्रश्न सिली असू शकेल ह्याची कल्पना आहे .. :p

मस्त पाकृ. पण ह्याला खिचडी हे अगदी लो प्रोफाईल नाव का बरं? छानपैकी मसूर पुलाव किंवा शाही मसूर पुलाव (नारळाचं दूध घालून) असं भारदस्त नाव हवं बै. Wink

सशल, नारळाच्या दुधाचा फ्लेवर आलाय बाजारत, तो घालू शकतेस तू खिचडीच्या पाण्यात.

आज ब्राउन राईस वापरुन ही खिचडी लंचसाठी केली. आलं, लसुण , कोथिंबीर पेस्ट फ्रीजरला होती ती घातली. धणे पावडर आणि कायस्थी मसाला असे घातले. नारळाचे दूध घातले नाही. पाणी ब्राउन राईसच्या हिशोबाने अ‍ॅडजट केले. प्रेशर पॅनमधे रुचकर आणि झटपट खिचडी तयार झाली. थॅक्स मृण्मयी आणि संपदा!

आज ही खिचडी केली. मस्त झाली! मी खिचडी करताना नारळाचं दूध वापरलं नाही, नारळाचं दूध लावून आमसुलाचं सार केलं त्यामुळे कॉम्बिनेशन अफलातून लागलं! चवीला सौम्य केल्यामुळे आमच्या बारकीनेही आणखी मागून मागून खाल्ली खिचडी.
धन्यवाद मृण आणि संपदा.

सर्वांनी खिचडी करून लगेच खाऊन टाकल्याने फोटो नाहीत.
थोडं अवांतर-
या खिचडीत मसुर दिसतच नाहीत कारण मसुर फार लवकर शिजतात .मसुराचा वास असा येतच नाही फक्त कांद्याचा भपकारा.खिचडी या प्रकारासाठी बारीक कोलम,इंद्रायणी वगैरे तांदुळच उत्तम असतात.लांबडा आणि मोकळा ढाकळा बासमतीसारखा तांदुळ वापरल्यास आणि कांदा परतुन टाकल्याने फारतर मसुर पुलाव झाला असं म्हणता येईल.हे रिमिक्स झालं.

आवडीचा प्रश्न आहे.

धन्यवाद संपदा व मृण्मयी
करून बघीन नक्कीच.
मसूर डाळ व दिल्ली राइसची फडफडीत खिचडी माझ्या नणंदेकडून शिकले. याला इकडे फिक्की खिचडी म्हणतात.
नाहीतर माहेरी मसूर्/मसूर डाळ वापरात असलेलं आठवत नाहीये. का नव्हते वापरत माहिती नाही.
असो...ही खिचडी:
१वाटी दिल्ली राइस, अर्धी/पाउण वाटी मसूर डाळ. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोही भरपूर, आलं, हिरवी मिरची, लसणाचं वाटण, मीठ तेल इ.इ. साहित्य.
फोडणीत (हळद नो नो.) कांदा परता, त्यावर टोमॅटो, त्यावर वाटण परतून त्यावर धुतलेले डाळ तांदूळ मीठ घालून दुप्पट पाण्यात अगदी मोकळी शिजवा. वरून भरपूर कोथिंबीर.
या खिचडीत मसाला कोणताही नाही आणि हळदही नाही.
खूप छान लागते. मात्र अगदी पहिल्या वाफेची खाल्ली पाहिजे. कारण तशी कोरडीच असते ना.