मागील भाग -
महिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...
महिकावतीची बखर - भाग २ : बखरीतील जुनी नावे ...
महिकावतीची बखर - भाग ३ : प्रताप बिंबाची कोकणावर स्वारी ...
महिकावतीची बखर - भाग ४ : बिंब घराण्याची ठाणे - कोकणची राजवट ...
महिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाचे आगमन
महिकावतीची बखर - भाग ६ : नागरशाचा प्रतिहल्ला ...
महिकावतीची बखर - भाग ७ : कोकणात निका मलिकचे आगमन ...
महिकावतीची बखर - भाग ८ : ठाणे - कोकणचे मुसलमानी राज्य ...
शके १४२२ (इ.स. १५००) मध्ये पोर्तुगीझांनी कोची बंदर ताब्यात घेतले आणि वखार घालून व्यवसाय करू लागले. जागा बळकट करू लागले. अवघ्या १२ वर्षात तिथून गोवा आणि मग थेट वसई - दमण प्रांतात आले आणि तिथेही व्यापार करू लागले. वसईच्या दांडाळे तळे ह्याठिकाणी तटबंदी उभी करून त्यांनी वस्ती केली. अर्थात हे सर्व प्रांताचा मुसलमान सुभेदार याच्याकडून परवानगी घेऊन अधिकृतरित्या चाले. आवश्यक तेंव्हा पोर्तुगीझाचा वकील दिल्ली दरबारी हजेरी लावी. नंतर नंतर डच, ब्रिटीश, फ्रेंच जसजसे भारतात येऊ लागले तसे पोर्तुगीझाचे वकील हे कायम स्वरूपी दिल्ली-आग्रा येथे राहू लागले. सुरवातीला त्यांच्या हजेरीत आणि वजनामुळे इतर युरोपीय सत्तांना दिल्लीवरून सवलती मिळवून घेणे कठीण पडत होते.
पुढे तर गोव्यावरून आरमार आणून कप्तान आलमेद याने लष्करीदृष्ट्या वसई ते दमण हा भाग ताब्यात घेतला. थोडक्यात महिकावती प्रांतावर पोर्तुगीझ या नव्या राज्यकर्त्यांचे आगमन झाले होते. प्रांतातील देसायांना त्याने काही विशेष फरक सुरवातीला पडण्याचे कारण नव्हते. कारण मुसलमान राजे तसेच फिरंगी. धर्म-कर्म आणि व्यापार उदीम याला पोर्तुगीझांनी सुरवातीला कसलेच बंधन घातले नाही. जवळ-जवळ २५ वर्षे इथे बस्तान पक्के बसवल्यानंतर पोर्तुगीझांनी धर्मछ्ळ सुरू केला. अनेकांना बाटवले आणि जे तयार झाले नाहीत त्यांना कैद करून गोव्याला पाठवले. आजही वसई प्रांतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरित झालेले हिंदू आहेत. त्यांची आडनावे हिंदू असली तरी ते ख्रिस्त धर्माचे पालन करतात. ह्यात बहुसंख्य लोकांचे पूर्वज हे शेष, सूर्य आणि सोमवंशीय क्षत्रिय आहेत जे बिंब, यादव आणि नागरशाच्या काळात सुखाने नांदत होते. अजून एक म्हणजे वसई आणि आसपासच्या भागात जसे ख्रिस्त मोठ्या प्रमाणावर आढळतात तसे ते वैतरणा नदीच्या पलीकडे म्हणजे सफाळे, केळवे - माहीम उर्फ महिकावती आणि पुढे डहाणू - बोर्डी येथे आढळत नाहीत. ह्याचे कारण काय असावे?
बिंबदेव यादव याचा पुत्र प्रतापशां यादव महिकावती भागावर राज्य करत होता हे आपण मागे पाहिले आहेच. प्रतापशांची एक स्त्री होती जिच्या देवशा नावाच्या पुत्राला प्रतापशांने काही गावांचे हक्क दिलेले होते. ह्या देवशाचा पुत्र रामशा याने शके १२९४ (इ.स. १५७२) मध्ये वाडा-जव्हार आणि आसपासच्या भागातील १५७ गावे जिंकून राम नगर स्थापिले होते. आज ठाणे जिल्ह्यातील जे रामनगर आपण ऐकतो ते हेच. त्या प्रांतावर रामशा उर्फ यादवांचे वंशज राज्य करीत होते. ह्या प्रांतावर पोर्तुगीझांची नजर गेली आणि त्यांनी रामनगर ताब्यात घेण्याचे ठरवले. त्यावेळी तेथे कोणी कोळी उमराव होता त्याची मदत पोर्तुगीझांनी घेतली आणि त्याला चौथाई देऊन रामनगर सोबत तह केला. पोर्तुगीझांच्या जोरावर कोळी माजला आणि त्याने स्वतंत्र कारभार सुरू केला.
महिकावतीची बखर मधील प्रकरणे १ आणि ४ (जी खरेतर सर्वात शेवटी लिहिले गेली - पहा भाग १) ही ह्याच काळात लिहिली गेली. भगवान दत्त नामक लेखकाने पूर्वीची टिपणे वापरून बखरीत नव्याने माहिती जोडली आणि ती भावी पिढ्यांसाठी उपलब्ध करून दिली.
पुढे पोर्तुगीझांनी वसई ते डहाणू अशी २७ सागरी किल्ल्यांची साखळी उभी केली. हे किल्ले लहान असले, काही तर नुसते बुरुज सदृश्य असले तरी टेहाळणीच्या दृष्टीने मोक्याचे होते. दुसरीकडे अशेरी-अडसूळ, तांदूळवाडी, कोहोज, टकमकगड, काळदुर्ग हे डोंगरी किल्ले मजबूत करून पोर्तुगीझ वसई प्रांतात कायमचे बसले तें बसले. अखेर शके १६६१ (इ.स. १७३९) मध्ये चिमाजी आपा यांच्या वसई मोहिमेने तें तिथून हुसकावले गेले. २०० वर्ष पोर्तुगीझांनी दमण ते वसई आणि चौल - रेवदंडा भागात निर्विवाद राज्य केले. आजही त्यांचे अस्तित्व तेथे स्पष्टपणे जाणवते आणि खुपसे खुपते...
इथे बखरीचा ऐहासिक घटनाक्रम संपतोय मात्र पुढील भागापासून बखरीच्या अनुषंगाने इतर काही ऐतिहासिक समकालीन बाबींवर उजेड पाडण्याचा प्रयत्न करुया.
क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग १० : देवगिरीच्या लढाईचे सत्य ...
रोहन, सगळे ९ भाग सलग वाचून
रोहन, सगळे ९ भाग सलग वाचून काढले. अफलातून काम केलं आहेस हे सगळं संक्षिप्त रुपात आम्हापुढे मांडून.
तुझं लिखाण नेहमीच काहीतरी वेगळं असतं
वसई ते डहाणू अशी २७ सागरी
वसई ते डहाणू अशी २७ सागरी किल्ल्यांची साखळी >>> हा भाग राहुनच गेलाय...
अश्विनी....धन्यवाद... इंद्रा.
अश्विनी....धन्यवाद...
इंद्रा... हे सर्व किनारपट्टी आपण अवघ्या २ दिवसात पूर्ण करू शकतो... २७ पैकी बऱ्याच जागा आज शोधाव्या लागतात... केळवे बीचला ४ छोटे किल्ले आहेत..वसई आणि अर्नाळा जायला काय तो वेळ लागतो...
तू अर्नाळ्याचा सुटा बुरुज प्रकार पाहिला आहेस का? हा प्रकार पोर्तुगीझांनी आपल्यालाडे आणला...
नाही रे मी तिकडील एकही किल्ला
नाही रे मी तिकडील एकही किल्ला पाहिलेला नाही... यो ला माहित असेल... लवकरच महिकावती मोहिम आखायला हवी.
महिकावती मोहीम... नक्कीच..
महिकावती मोहीम...
नक्कीच.. घाणेकरांचे सफर सागरी किल्ल्यांची ह्यात ठाणे जिल्ह्यातील सर्व जलदुर्गांचे वर्णन आलेले आहे. हवंतर रिफर कर..
खुप छान माहिती . धन्यवाद अमोल
खुप छान माहिती .
धन्यवाद
अमोल केळकर
-------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा
रोहन. पुर्वी घारापुरी,
रोहन. पुर्वी घारापुरी, शूर्पारक (नाला सोपारा) -- नाणेघाट --- जून्नर हा व्यापाराचा मार्ग होता. त्याचा काही प्रभाव या भागावर पडलेला दिसत नाही.
वसईचे ख्रिश्चन अगदी वेगळ्याच स्वभावाचे असत, कष्टाळू आणि प्रेमळ. त्यांच्या भाषेवर, नेसूवर पण वेगळाच प्रभाव आहे. आता माहीत नाही, पण पुर्वी त्या बायका पांढरा ब्लाऊज आणि एकाच प्रकारचे लाल रंगाचे चौकडीचे लुगडे नेसत. मी त्या लोकांच्या घरी जाऊन, लहानपणी जेऊन खाऊन आलो आहे.
होय दिनेशदा... पण शूर्पारकचे
होय दिनेशदा... पण शूर्पारकचे जेंव्हा सोपारे / सोपारा झाले त्याच दरम्यान येथील बंदराला ओहोटी लागलेली होती असे दिसते. कल्याण बंदर म्हणून नावारूपाला आले होते आणि अर्थात नाणेघाटाच्या जवळ असल्याने त्याला महत्व प्राप्त झाले असेल...
वसईवर रजिन डिसिल्वा यांनी बरेच अभ्यासपूर्वक काम केले आहे. आता माझा मित्र श्रीदत्त राउत हा वसई किल्ला संवर्धन आणि त्याच्या अभ्यासात गेली ४-५ वर्ष बुडून गेला आहे. पोर्तुगीझ कागद तपासता यावे म्हणून त्यांची भाषा शिकणे, मराठा कागद वाचता यावेत म्हणून मोडी शिकणे असे बरेच काय काय करतोय. मध्ये तो गोव्याला देखील गेला होता काही कागदपत्र पहायला. खरेतर एखाद्या रविवारी मायबोलीची अभ्यास मोहीम तिथे ठेवायला हवी. ज्यांना आवड आहे अशांना बरीच माहिती तो देऊ शकेल...
खरेतर एखाद्या रविवारी
खरेतर एखाद्या रविवारी मायबोलीची अभ्यास मोहीम तिथे ठेवायला हवी.>>> जरूर ठेवा... खरच आवडेल.