आर.डी.च्या संगीताशी पहिली ओळख कधी झाली ते नक्की आठवत नाही.पण बहुतेक माझ्या पिढीच्या बर्याच जणांना पंचम हा प्रकार '१९४२ अ लव्ह स्टोरी' नंतरच कळला.नदीम-श्रवणच्या संगीतालाच 'मेलोडीयस' म्हणणार्या आम्हा सर्वांना तो एक जोरदार झटका होता! त्यानंतर मी जो पंचमभक्त बनलो तो आजतागायत...
'काळच्या पुढे'; 'व्हर्सटाईल' इ.इ.विषेशणे पंचमच्या बाबतीत एकतर अपुरी पडतात आणी ती अतिवापराने गुळगुळीत झाली आहेत.मी ते सर्व पुन्हा सांगणार नाही.त्याची गाणी ऐकता ऐकता त्यांच्या निर्मीतीचे किस्से गोळा करण्याचा,त्याच्या अफाट प्रयोगांना समजून घेण्याचा छंद लागला.हे त्यातलेच काही किस्से...
नवेनवे सांगितीक प्रयोग आणि रिदम पॅटर्न हा आरडीचाच प्रांत.एकाच वेळी भारतीय रागदारी आणि पाश्चिमात्य कॉर्ड सिस्टीमचा मिलाफ तोच करु जाणे.पहा (खरंतर ऐका!) अमरप्रेम मधलं 'कुछ तो लोग कहेंगे'.हे गाणे खमाजच्या जवळपास जाते पण वाद्यरचना मात्र पूर्णपणे कॉर्डवर आधरित आहे.अमरप्रेममधेच आरडीने अजून एक गंमत केलीय;तोडी हा खरंतर सकाळचा राग पण त्याने त्यात 'रैना बिती जाए' सारखी अदभुत रचना केली.आणखी एक अजब प्रकार त्याने 'आजा पिया तोहे प्यार दूं' (बहारों के सपने) मधे केलाय;नीट ऐका,या गाण्यात सगळा ताल केवळ इलेक्ट्रॉनिक गिटारने सांभाळला आहे-कुठेही तबल्याचा वापरच नाही! याच सिनेमात त्याने डबल ट्रॅक रेकॉर्डींगचा वापर सर्वात पहिल्यांदा केला (क्या जानूं सजन),आणि हेच तंत्र पुन्हा अत्यंत प्रभावीपणे 'कतरा कतरा मिलती है' (इजाजत) मधे वापरले.
स्केल बदलाचे खेळ हे तर त्याचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.त्याचे अत्यंत ठळक उदाहरण म्हणजे 'कारवां' मधले 'ऐ मै कहाँ आ फसी'.यात अचानक शेवटी स्केल वर जाते आणी मुळातल्याच विनोदी प्रसंगात अजुन धमाल उडते.पण या प्रकारातले माझे आवडते गाणे म्हणजे 'घर' मधले 'तेरे बिना जिया जाए ना'.त्यातल्या कडव्याच्या प्रत्येक ओळीत गाणे एकएक घर खाली उतरत जाते आणि शेवटच्या ओळीनंतर व्हायोलीनचा एकच तुकडा सर्व सुरावट पुन्हा मुळ स्केलवर घेऊन जातो.हे सर्व चालू असताना 'मादल'चा संथ ठेका मात्र बदलत नाही.
मादलवरुन आठवलं,अशीच अनेक नवी वाद्ये पंचमने प्रथमच वापरात आणली.मादल हे मूळ नेपाळी वाद्य,ते त्याने त्याचा वादक रणजीत गजमेरसकट मुंबईत आणले आणि भरपूर वापरले (कांची रे कांची,ऐसे न मुझे तुम देखो,इ.इ.).इलेक्ट्रॉनिक ऑर्गनचा पहिला वापर त्यानेच 'तिसरी मंजील'च्या 'ओ मेरे सोना' मधे केला.शोलेतले 'मेहबूबा मेहबूबा' सुरु होताना जे वाद्य आपण ऐकतो ते 'फ्लँजर'ही पंचमचीच देणगी.पण आरडीचे 'सिग्नेचर' ठरलेले वाद्य अर्थातच 'रेसो-रेसो'.त्याची निर्मीतीच त्याने केली.'मेरे सामनेवाली खिडकी में' हे गाणं आपल्याला या वाद्याच्या आवाजापासूनच आठवते. जाताजाता सांगतो,पहिला रेसो-रेसो त्याने दुधीभोपळ्याला तारा पिळून तयार केला होता! ही तर झाली 'कन्व्हेनशनल' वाद्यांची हकिकत,मात्र आरडीने याही पुढे जाऊन अशक्य गोष्टी वापरुन सुरावटी तयार केल्या आहेत.'चुरा लिया है तुमने' मधला चमचा-ग्लासचा किणकिणाट कोणाला आठवतं नाही? गुलझारच्या 'किताब' मधल्या 'मास्टरजी की आयी चिठ्ठी' या मॅड गाण्यात त्याने शाळेतली खरोखरीची बाकडी रिकॉर्डींगसाठी आणून बडवली होती.आरडीच्या पडत्या काळतले 'बटाटावडा' हे गाणे घ्या;रिकाम्या बाटलीवर आघात करुन ती पाण्यात बुडवल्यावर येणारा आवाज यात वापरला आहे.
आरडीची सर्वात मोठी ताकद कुठली असेल तर ती म्हणजे चित्रपटातला प्रसंग,ती सिच्युएशन ओळखून तिला,त्यातल्या पात्रांना साजेशी रचना करणे.त्याने संगीताचा वापर नेहमीच सिनेमाच्या संदृभातच केला.
'हरे रामा हरे कृष्णा' साठी पंचम हा देव आनंदचा पहिला चॉईस नव्हता यावर तुम्ही विश्वास ठेवाल? तो एसडीसाठी हटून बसला होता.एसडीने त्याला परोपरीने समजावले की या सिनेमाची जातकुळी पंचमच्या शैलीला साजेशी आहे,त्यालाच संगीत देऊ दे.त्यावर देवने तोड काढली की 'वेस्टर्न' प्रसंगाची गाणीच फक्त आरडीला मिळतील बाकी सर्व सिनेमा दादा बर्मननी करावा.त्यांनी हा प्रस्ताव नाकारला आणि अत्यंत अनिच्छेने देवने संगीत आरडीला दिले.यावरही कडी म्हणजे 'दम मारो दम' गाणे सिनेमात ठेवण्यास देव आनंद राजी नव्हता.त्या गाण्याच्या रेकॉर्डने ब्रिटनमधले काऊंटडाउन पादाक्रांत केल्यावर त्याचा नाईलाज झाला!! अनेक वेळा आपल्याला त्याचे गाणे त्या प्रसंगासकटच आठवते,याबाबतीत त्याच्या समोर नक्कीच एस.डीचाच आदर्श असावा.एक किस्सा सांगतो-अमरप्रेमच्या गाण्याचे सिटींग चालले होते,'एक भजन हवे आहे';शक्ती सामंतानी पंचमला सांगितले.ते करत असतानाच एस.डी. ने त्याला हटकले-'काय करतोयसं,अरे नुसते एक भजन केलेस तर त्यात काय विशेष? लक्षात घे सिच्युएशन भजनाची नाहिये,एक स्त्री जी कधीही आई होणार नाही आणि तरी जिच्या मनात ममता भरुन वाहतेय ती हे गाणं गाते आहे,आता पुन्हा विचार कर आणी मग दे संगीत' आर.डी.ने सल्ला मानला आणी 'बडा नटखट है ये' तयार झालं.
चित्रपटात मिसळून जाणारे संगीत द्यायच्या याच ताकदीमुळे पंचमने 'बॅकग्राऊंड म्युझिक' तयार करतानाही अनेक माईलस्टोन्स करुन ठेवले आहेत.हिंदी चित्रपटात बॅकग्राऊंड म्युझिकचा वेगळा विचार करणारा आरडी हा पहिला संगीतकार असावा असे माझे मत आहे.त्याआधी बर्याच वेळी केवळ 'स्टॉक' तुकडे वापरले जात,मारामारी आली वाजवा व्हायोलिन;दु:खी प्रसंग आहे लावा सारंगी इ.इ.अगदी मुगल-ए-आझम वा मदर इंडीया सारख्या क्लासिक्समधेही हाच प्रकार दिसतो.मात्र प्रत्येक सिनेमाचा बाज,त्यातल्या पात्र व प्रसंगांचा विचार करुन त्याची वेगळी ओळख,थीम तयार करणारे पार्श्वसंगीत पंचमनेच रुजवले.'तिसरी मंझील' मधला शम्मीला खुनी कोण आहे हे कळते तो सीन आठवा- शम्मीचे विस्फारलेले डोळे,कोटाचा क्लोजअप आणि जोडीला ट्रंपेट्सचा किंचाळणारा आवाज;त्या आवाजासकटच तो प्रसंग आठवतो.
आणि अर्थातच-शोले.याततर आरडीची प्रतिभा पुर्ण भरात आहे;किती प्रसंग सांगावेत की जे त्या पार्श्वसंगीताने अजरामर करुन ठेवले आहेत वेस्टर्नपटांच्या जगात तात्काळ घेऊन जाणारा तो टायटल ट्रॅक,गब्बरच्या एंट्री सीनमधे चिरकणारी बासरी (जी आरडीने त्या प्रसंगासाठी विशेष बनवून घेतली),माउथ ऑर्गनची ती अजरामर धुन आणी जय-राधाची प्रेमकथा,गब्बर जेंव्हा ठाकूरच्या कुटूंबाला संपवतो तेंव्हाचा झोपाळ्याच्या कड्यांचा करकराट,आणि अर्थातच शांततेचा-सायलेन्सचा अंगावर येणारा वापर;पार्श्वसंगीताचे पाठ्यपुस्तक आहे हा चित्रपट.
आरडीच्या प्रतिभेची ही काही रुपे.जसेजसे आपण त्याचे संगीत ऐकत जातो तसेतसे त्याच्या नव्यानव्या आविष्कारांची ओळख होत जाते. अजून खुप मनात आहे -त्याच्या स्वतःच्या गायनाबद्दल,त्याच्या सहकारी वादक,गायकांबद्दल,ऑर्केस्ट्रेशनबद्दल आणि अर्थातच गुलजार-पंचम या जादूबद्दल,पण ते पुन्हा केंव्हातरी,पंचमपुराणाच्या पुढच्या अध्यायात.
॥पंचमपुराण॥
Submitted by लसावि on 10 January, 2009 - 01:38
गुलमोहर:
शेअर करा
"आर.डी.च्या
"आर.डी.च्या संगीताशी पहिली ओळख कधी झाली ते नक्की आठवत नाही.पण बहुतेक माझ्या पिढीच्या बर्याच जणांना पंचम हा प्रकार '१९४२ अ लव्ह स्टोरी' नंतरच कळला.नदीम-श्रवणच्या संगीतालाच 'मेलोडीयस' म्हणणार्या आम्हा सर्वांना तो एक जोरदार झटका होता! त्यानंतर मी जो पंचमभक्त बनलो तो आजतागायत..."
हे अगदि खरच आहे ....
आगाऊ ,तुम्हि खुप सुंदर लेख लिहिलात्..खुप मजा आली..सकाळी सकाळी एक्दम आरडीमय करुन टाकलेस्..आजचा दिवस मस्त जाणार्..धन्यवाद...
ट्रेन्डी.प्रवीण
बेस्टच. '१९
बेस्टच.
'१९४२ अ लव्ह स्टोरी' नंतर तुम्ही आर. डी. च्या प्रेमात पडलात आणि मग त्याची जुनी गाणी ऐकलीत हे खरंच कौतुकास्पद आहे.
'१९४२ अ लव्ह स्टोरी' रीलीज होण्याच्या काही दिवसच आधी आर. डी. चं निधन झालं होतं. तेव्हा तो गेला नसता तर '१९४२ ...' ची गाणी इतकी गाजली असती का अशी शंका विचारण्याची तेव्हा फॅशन होती. म्हणजे भावनेच्या भरात लोकांनी ती गाणी डोक्यावर घेतली असं काहींचं म्हणणं होतं
~~~
पकाक पॅक पॅक पॅक पॅक
lalita-preeti, Love Story
lalita-preeti,
Love Story 1942,musically, was a masterpiece.
बापू करन्दिकर
खुप
खुप अभ्यासपुर्ण लेख...! खरच कौतुकास्पद..! आम्ही कानसेन असलो तरी वाद्यांबद्दल प्रथमच एवढे ऐकायला मिळाले..! (कारण गाण्यातील शब्दांकडेच जास्त लक्ष
)
परंतु आता तुम्ही वर सांगितलेली गाणी नक्कीच काळजीपुर्वक ऐकु..!
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
भावना अनावर झाल्या की अश्रुंचे सैनिक पापण्यांच्या तटावरुन पटापटा उड्या घेतात..
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
बापुंना
बापुंना अनुमोदन.
विशेषत: कुछ ना कहो कुछ भी ना कहो, ये सफर बहुत है कठिन मगर आणि रुठ न जाना तुमसे कहु तो ही गाणी अप्रतिमच होती.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
'ये सफर
'ये सफर बहुत है कठिन मगर' च्या इंटरल्युडमधे 'जीवन के सफर में राही' ची धून एकदम सही बसवली आहे
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
सत्या, १००
सत्या,
१०० मार्क तुझ्या लेखाला, सोप्पं आणि साधं भाषा पण कित्ती सुटसुटीत... तुझ्यामुळे खूपशी नविन माहीती मिळाली ... आणि एक शिकले सुद्धा की तुम्ही जरी गाण्यांचे भक्त असलात तरिही नुसतं गाणं नाही ऐकायचं... तर त्याची पार्श्वभूमी सुद्धा समजून घ्यायची... म्हणजे ते गीत अजून सुरेल वाटतं... अगदी खरंच... तुझा लेख वाचून संदर्भ देण्यासाठी तू वापरलेली गाणी पुन्हा एकदा कानात वाजली आणि या माहीतीच्या आधारे ती मनातल्या मनात ऐकली आणि त्यातली सुरेलता अजून वाढली..
लेख अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण आहे.. फोटो ही समर्पक टाकलेयंस.. पण थोडी गर्दी झाल्यासारखी वाटतेय, संपादन करून थोडं सुटसुटीत करता आलं तर पहा... हा आपला माझा सल्ला... योग्य काय ते तूच ठरवू शकतोस....
असंच लिहीत रहा, म्हणजे आम्हाला नव्या नव्या संगितकारांविषयी खूप माहीती मिळेल... आयती...
पुलेशु....
अगदी
अगदी !!!
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
फारच सुंदर
फारच सुंदर लेख. या महान कलाकाराची गाणी ऐकताना, हरवून जायला होते. या बाबी लक्षातच येत नाहीत. असे जाणकार भेटले कि छान नव्याने ओळख होते.
लताचे क्या जानु सजन, हे कालच मी लिहिले होते अनंताक्षरीवर. मला वाटत अमोल पालेकरच्या, गोलमालमधे पण असे एक गाणे होते. शब्द आठवत नाहीत आता.
आशाकडुन त्याने, बर्निंग ट्रेन मधे दुहेरी आवाजात गाणे गाऊन घेतले होते.
मेहबुबा मेहबुबा, सारखेच किताब मधे, धन्नो कि आंखोमे, असे एक गाणे होते. याच सिनेमात त्याने राजकुमारी कडुन पण एक गाणे गाऊन घेतले होते.
बहारोंके सपने मधले, चुनरी संभाल गोरी, गाण्यात त्याने महाराष्ट्राच्या काहि धून घेतल्या होत्या. चक्क लेझिम वगैरे.
मेरा कुछ सामान, तर गुलजार, आशा आणि आरडी, कुठली उंची गाठु शकतात, याचे उत्तम उदाहरण आहे.
मध्यंतरी सिनेमातून मेलडीच गायब झाली होती, त्यावेळी आर्डी पण मागे पडला होता, पण १९४२ अ लव्ह स्टोरी, नंतर त्याचे युग येणार असे वाटले होते. पण मग त्यानेच एक्झिट घेतली.
खूपच मस्त
खूपच मस्त लेख आहे... इतके दिवस कुठे लपला होता हा लेख?
'शोले'तला तबला माहिती होता पण रेकॉर्डिंगची माहिती आजच मिळाली. (धन्स बापू)
तसेच 'चिरक्या बासरी'बद्दलही माहिती आजच समजली.
पुलेशु !
(एक सूचना: >> 'तिसरी मंझील' मधला शम्मीला.... तो सीन आठवा >>
हे वाक्य बदलून -- 'तिसरी मंझील'मधला शम्मीला खरा खुनी कळतो तो सीन आठवा... असं करता येईल का?
तिसरी मंझील पाहिला नाहीये असा मायबोलीकर मिळणं जरा अवघडच आहे पण कुणी एखादा / एखादी असलाच / असलीच तर सिनेमा पाहण्याआधीच त्याचा / तिचा विरस न होवो
छान
छान लिहिलंय. बापूंनी दिलेली माहितीही interesting आहे.
मजा आली.
मजा आली. कानसेनांनी बाकीच्या दिग्गजांबद्दल पण असेच लिहिले तर कय मजा येईल .....
छान लिहिला
छान लिहिला आहे लेख... बापूंनी दिलेली माहितीसुद्धा छान...
मस्त लेख,
मस्त लेख, खूप माहिती मिळाली वाद्यांबद्दल आणि आर्डी बद्दल. पूर्वी असे लेख चंदेरी मधे येत असत. राजेश खन्ना च्या चित्रपटातील गाणी, 'हम किसीसे कम नही', 'यादों की बारात' वगैरे मधली गाणी, आणि गुलजार बरोबरची गाणी ही आर डी ची एकमेकांपासून खूप वेगळी वाटणारी गाणी आहेत. त्याबद्दल वाचायला आवडेल.
लेख एकूण
लेख एकूण चांगला आहे परंतु रिसर्च अजून करायला पाहिजे असे वाटले. पंचमनी बहारोंके सपने मध्ये डबल ट्रॅक रेकॉर्डींगचा वापर केलेला नसून जो दुसरा आवाज आहे तो उषा मंगेशकर यांचा आहे. पहा- विश्वास नेरुरकर यांचे पंचम वरील पुस्तक. इ़जाजत मध्ये तो प्रथम वापरला गेला कारण त्यावेळेस आपल्याकडे मल्टी-ट्रॅक सिस्टिम्स आल्या होत्या. तसेच शोले मध्ये सुरुवातीला वापरले आहे ते बाटली मध्ये हवा फुंकून आवाज काढला आहे, 'फ्लँजर' हा गिटार इफेक्ट आहे. 'फ्लँजर' त्यानेच प्रथम वापरला पण तो धन्नो की आखोंमे, किंवा गोलमाल हॅ भाई सब गोलमाल हॅ च्या वेळेस. शोलेसारखा बाटली आवाज ओ माझी रे या गाण्यात मुख्य वाद्य म्हणून वापरला आहे. स्केल चेंज त्याने पहिल्यांदा वापरला तो म्हणजे - मॅ चली मॅ चली या पडोसनच्या गाण्यात. तेव्हा यावर फार वादळ झाले होते.
काही इतर गोष्टी - १९८० च्या काळात त्याचे लागोपाठ २३ चित्रपट पडले होते ज्याच्यामुळे तो एकदमच मागे पडला आणि त्यातच किशोरच्या अचानक निधनाने तो अजूनच खचला होता. त्यात हार्ट मुळे काही वर्ष तो अंथरुणावरच होता. त्यातून फारसा वर आलाच नाही. १९४२ लव्ह स्टोरी नंतर त्याच्या आशा खूप वाढल्या होत्या परंतु अकालि निधनाने सगळेच बिनसले.
पंचम बद्द्ल अजून खूप काही सांगता येईल. वेळ कमी पडेल असेच नेहमी वाटते.
- प्रशांत
काही
काही लिंक्स -
http://www.youtube.com/watch?v=Du54paUkRFQ
रेस्सो रेस्सो बद्द्ल मला थोडी शंका होती. दुधी भोपळ काही खरा वाटला नाही. तसेच बाटली पाण्यात न्हवती बुडवली- शाळेची घंटा होती
इथे पहा -
http://www.youtube.com/watch?v=6tiP7nW_nIY&feature=related
http://www.youtube.com/watch?v=CSSzGdQpDjQ&feature=related
http://www.youtube.com/watch?v=YAzq9NisqUg&feature=related
आगाऊ, तुझ्या लेखाच्या उद्देशा बद्दल अजिबात शंका नाही परंतु आम्ही पंचम वरती वाढलेलो आहोत ... अक्षरशः त्यामुळे आम्ही या प्रकारची सगळी माहिती काढण्याच्या सारखे मागे असायचो कारण आम्ही स्टे़ज प्रोगाम्स करायचो आणि अजूनही करत असतो त्यामुळे मला एवढी इतर माहीती पुरवणे आवश्यक वाटले खासकरून नवीन पिढीसाठी जी नदिम श्रवण आणि नंतरच्या संगीतकारांवरती वाढलेली आहे.
वरील लिंक्सच्या पानांवर अजून पण इतर लिंक्स सापडतील.....
आगाऊ.... प्रश
आगाऊ....
प्रशांतने खूप चांगली माहिती दिली आहे. स्पष्टपणे सांगितल्याबद्दल राग मानू नकोस.
प्रशांत माझा चांगला मित्र आहे आणि तो स्वत: एक उत्कृष्ठ गिटार, की-बोर्ड वादक आहे.
सध्या प्रशांत आणि त्याचे काही मित्र गुलजार - आर. डी. असा शो उत्तर अमेरिकेत करतायत
नदीम-श्रवण सोडून आर. डी. ध्यास घेतल्याबद्दल तुझे पुन्हा एकदा अभिनंदन.
अरे कमॉन
अरे कमॉन यार,राग काय यायचाय त्यात! मला पूर्ण जाणीव आहे की पंचमबद्दल माझ्यापेक्षा कितीतरी जाणकार लोक आहेत.माझा हा लेख बरासचा प्रशांतसारख्या भक्तमंडळींचे कार्यक्रम पाहूनच तयार झाला आहे.
नवीन दिलेल्या माहिती आणी लिंक्सबद्दल मनापासून धन्यवाद.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
आगाउ, मस्त
आगाउ, मस्त जमलाय लेख.
आरडी च आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गायकांचा वापर. म्हणजे बघा शैलेन्द्र सिंग, भुपेंन्द्र यांचा पर्फेक्ट वापर त्यानेच केलाय. अमितकुमारला lovestory मधे त्यानेच ब्रेक दिला... त्या बेट्याला काही त्याचा उपयोग करुन घेता आला नाही ते वेगळ. अगदी शब्बीरकुमार देखिल बेताब मधे "गायलाय". "तुझसे नाराज नही ..अनुप घोषाल किंवा "दो नैना, एक कहानी .. आरती मुखर्जी ही गाणी पण आधी न ऐकलेल्या गायकांकडुन effectively गाउन घेतलीत पंचमने.
"चिंगारी कोई भडके" मधे त्याला जो effect हवा होता, त्यासाठी त्याने सोड्याच्या बाटलीत पाणी भरुन फुंकर मारुन तो मिळवला. "एक लडकी को" कंपोज करताना, त्याला सुचवण्यात आलं होतं की त्यात त्याने काही effects वापरावेत, पण त्याने तो आग्रह टाळला आणी मेलडी पुन्हा जन्मली.
असं म्हणतात की "सागर"च्या अपयशाचं खापर रमेश सिप्पिने त्याच्यावर फोडलं आणी मग तो खचला. त्यात किशोरच जाणं त्याला फार चटका लावुन गेलं.
बापु, लताला पवन दिवानी- डॉ. विद्यासाठी एस्.डी. ने परत बोलावल ना?
मस्तच लेख.
मस्तच लेख. जुन्या जुन्या सुरेख आठवणी जाग्या झाल्या.
इप्रसारण साठी ह्यावर एक मस्त कार्यक्रम होउ शकेल. त्यांच्याकडे चौकशी कराल का ?
www.eprasaran.com
माझ्या
माझ्या माहितीनुसार 'बन्दिनी' मधलं 'जोगी जबसे आया तू मनके द्वारे' हे लताच्या एस.डी. कँप मधल्या पुनरागमनाचं गाणं होतं पण थोडा आणखी रिसर्च करायला लागेलसं वाटतय. चु.भू.द्या.घ्या.
बापू करन्दिकर
The Encyclopedia of Indian
The Encyclopedia of Indian Cinema by Ashish Rajadhyaksha and Paul Willemen, first published by the British Film Institute in November 1994 and in January 1995 by Oxford University Press: यातील नोंदीनुसार डॉ.विद्या आणि बन्दिनी हे दोन्ही चित्रपट १९६२चे दाखवले आहेत. त्यापैकी कोणता चित्रपट आधी रिलीज झाला हे शोधावं लागेल. त्याहीपेक्शा, 'जोगी जबसे तू आया' हे गाणं आधी रे़कॉर्ड झालं का 'पवन दिवानी' आधी रेकॉर्ड झालं हे सुद्धा तपासावं लागेल. हे दोन्ही तपशील बराच शोध घेऊनही निदान इंटरनेटवर तरी मला सापडले नाहीत.
सचिन देव बर्मन ह्या विषयावरच्या अनेक लिंन्क्स पैकी एका लिंक वर मला ही नोन्द सापडली:
Lata did not sing for Dada for a stretch of five years. When she did come back, it was with a vengeance and her first number with Dada was a remarkable piece in musical artistry was Jogi jab se tu aaya mere dwaare (Bandini).
जाणकारांनी ह्या विषयावर अधिक मतप्रदर्शन केलं तर आपल्या सगळ्यांच्याच ज्ञानांत भर पडेल.
बापू करन्दिकर
अप्रतिम.
अप्रतिम.
मस्त वाटले पंचमदांच्या आठवणी वाचुनसुध्दा. 
मी पूर्वी
मी पूर्वी चंदेरी च्या लेखांमधे (राजू भारतन किंवा इसाक मुजावर लक्षात नाही) लता 'जोगी...' साठी पुन्हा गायली असे वाचले होते.
पण मी ही
पण मी ही 'पवन दिवानी' बद्दल असेच कणेकरांच्या लेखात वाचले होते,आणी असेही की ते गाणे आधी आशाबाई गाणार होत्या.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
मी उगाच
मी उगाच आरडी बद्दलच्या चर्चेला फाटा फोडला
लताचे क्या
लताचे क्या जानु सजन, हे कालच मी लिहिले होते अनंताक्षरीवर. मला वाटत अमोल पालेकरच्या, गोलमालमधे पण असे एक गाणे होते. शब्द आठवत नाहीत आता.
---------------------------------------------------
काहीसे अप्रसिद्ध पण छान गाणे..
गोलमाल मधले...
एक बात कहु गर मानो तुम
सपनो मे न आना जानो तुम
मै नींद मे उठकर चलती हु
बस देखती हु गर मानो तुम..
लेख अप्रतिम्....पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहे.
हे वाचून
हे वाचून मला वाटते की लवकरच मायबोलीकर "सारख्या चुका दाखवतो" म्हणून वाळीत टाकणार
पण माझे तो उद्देश्य नाही...... पण जे माहीती आहे ते सांगावे इतकंच....
चिंगारी मध्ये बाटली कुठेच नाहीये... तो जो इफेक्ट आणला आहे तो गिटार वरती विशिष्ट प्रकारे कॉर्ड वाजवल्याचा आहे. मी पाठवलेल्या लिंक्स मध्ये ते दाखवलेले आहे.
आणि ... बाकीच्या उदाहरणांचे बरोबर आहे पण ...शब्बीरकुमार "गायलाय" ? .... :-)) हे काही जरा झेपले नाही बुवा....
परिबतो्से आजी मई ट़किरा गया....असं मुंबई लो़कल मधील स्टाईल रेकण्याला "गाणं" म्हणण मला तरी फारच अशक्य वाटते... तो पंचमकडे आणि इतर लोकांकडे एक सारखाच रेकला आहे. जिथे आडात नाही तिथे पोहर्यात कुठुन येणार? महंमद रफी गेल्यानंतरच्या त्या लाटेत आलेले हे लोक - शब्बीर, मुन्ना अझीझ. तेच किशोर गेल्यावर झाले आणि आपल्या कानांना आणखी १० वर्षांची सक्तमजुरी झाली... सुमार सानू च्या रुपानी.
थोडे विषयांतर करतो पण माझ्या मते माझ्या म्युझिकल आयुष्यातला सर्वात दु:खद काळ - १९८३ ते २००० जो या दोघांच्या गाण्याने कडवट झाला. १९८० मधल्या फिल्म म्युझिक मधील एकूण भीषण परिस्थितीमुळे तेव्हा आमची पिढी ग़जल कडे वळली आणि मग पंकज उधास (काय योग्य आड्नाव आहे), चंदन दास वगॅरे वाटेल ते लोकांनी त्यात हात धुवून घेतले.यथावकाश गजल चा पण ऑर्केस्टॉ झाला (धन्यवाद पंकज - गजलला "उधास" करण्याबद्द्ल)
आम्ही तर जोक मध्ये म्हणायचो की याच (म्हणजे शब्ब्बीर, सानू, सलमा आगा,वगॅरे) चुका पंचमला खूप खात असण्यामुळेच तो खचला असावा...;-))
असो. हे माझे वॅयक्तिक मत झाले. संगीतावर आणि त्यात पंचमच्या गाण्यांवर अति-भक्ति असल्यामुळे थोडा आग्रहीपणा पण माझ्यात आला आहे. त्या बद्द्ल मला खेद नाही, परंतु त्यामुळे इथे कुणाला वाईट वाटले तर मात्र मला माफ करा.
प्रशांत,
प्रशांत, शब्बीर बद्दल च्या 'जनरल' कॉमेंट्स एकदम मान्य. फक्त मला वाटले की तो बेताब मधे बराच सुसह्य होता. 'तेरी तस्वीर मिल गयी...' हे मला अजूनही आवडते. 'परबतोंसे...' वगैरे नाही. आणि 'जब हम जवॉ होंगे...' पूर्णपणे लताच्या जोरावर आहे (काय गाणे आहे पण!), तसेच 'बादल यू गरजता है..' चे.
मलाही असेच वाटते की साधारण '८३ पासून काही वर्षे गाण्यांच्या दृष्टीने फार बेकार टाईम होता (आणि नेमके आम्ही तेव्हा कॉलेजात होतो. आम्हाला फ्रेश रोमँटिक गाणी वगैरे काही नाही. एखादा 'कयामत से...' सारखा अपवाद सोडला तर बरीचशी फालतू गाणी. ऍक्शन वाल्या चित्रपटातही किशोर ची गाणी नसल्याने तीही मजा राहिली नाही.
आगाउ, गाडी वेगळ्याच रूळांवर टाकल्याबद्दल सॉरी.
शोलेतले
शोलेतले 'मेहबूबा मेहबूबा' सुरु होताना जे वाद्य आपण ऐकतो ते 'फ्लँजर'ही पंचमचीच देणगी.पण आरडीचे 'सिग्नेचर' ठरलेले वाद्य अर्थातच 'रेसो-रेसो'.त्याची निर्मीतीच त्याने केली
हे काय पटले नाही... कारण हे गाणे चाल, स.न्गीत, त्यातील वाद्यमेळ, उच्चारण्याची ( कि.न्चाळण्याची !) पद्धत हे सगळे एका आफ्रिकन गाण्यातून हुबेहूब उचललेले आहे... ऐका... से यु लव्ह मी
http://www.itwofs.com/hindi-rdb.html
Pages