कोकम (रातांबा) सरबत

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 May, 2011 - 14:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोकम (राताआंबे)
साखर

क्रमवार पाककृती: 

कोकम मधुन कापुन त्याचे दोन भाग करा.

त्यातील बिया काढुन टाका (त्या बिया वेगळ्या भांड्यात ठेउन त्यात पाणी टाकुन गर कुस्करा आणि त्यात साखर टाकुन तात्पुरते सरबत बनवा)

आता कोकमाच्या ज्या वाट्या तयार झाल्या आहेत त्यात पुर्ण साखर भरा.

आता एक काचेची बरणी घ्या. त्यात तळाला थोडी साखर टाका व त्यात साखर भरलेले कोकम एकावर एक रचा.


परत थोडी वरुन साखर पेरा आणि बरणीचे झाकण घट्ट लावुन बरणी २-३ दिवस उन्हात ठेवा. नंतर घरात ७-८ दिवस मुरवुन घ्या.

हा सरबताचा पाक तयार होतो. ४-५ चमचे पाक ग्लासात घेउन त्यात बर्फ व पाणी घालुन गारेगार कोकम सरबत सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
पाकावर आहे.
अधिक टिपा: 

एप्रिल महिना सुरुझाला की बाजारात रातांबे म्हणजेच कोकमे दिसु लागतात. पित्ताशामक म्हणुन हे प्रसिद्ध आहेत हे काही सांगायला नको. पुर्वी उन्हाळ्यात घरोघरी अशाप्रकारे कोकम सरबताच्या बरण्या तयार होत. मला आठवते आम्ही लहान असताना शेजार्‍यांकडे पापड लाटायला गेलो की ब्रेक मध्ये कोकम सरबत मिळायचे. खर तर त्याच आकर्षणाने पापड लाटायला जायची हौस वाटायची. तेंव्हा फ्रिज कमी असल्याने बर्फही कुणाच्यातरी घरुन वगैरे आणुन सरबते वाटाली जात. सरबताचा पाक संपला की नुसती कोकमे खायला पण मजा यायची.
खरे तर ही पद्धत आणि कोकमाचे गुण सगळ्यांना माहीतच असतील. पण हल्ली घरात काही वेगळे करायला गेले की कॅमेरा स्वस्थ बसत नाही आणि मग त्यातील फोटो माबोवर येण्यासाठी हट्टाला पेटतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेच रातांबे मग वाळवायचे त्याला पुटं चढवायची आणि त्याची आमसुलं बनवायची...

ताज्या कोकम सरबताची चव महान लागते.. घरी बाटली तयार आहे.. गेल्यावर दोन तरी ग्लास प्यायला पाहिजे.. मस्त जिरेपूड घालून.... कोकम सोडा पण झकास लागतो...

मी गेलेले देसाइंकडे रातांबे घ्यायला.. पण खुप शिळे वाटले. मला सांग कसे निवडायचे असतात. गडद रंगाचे की गुलाबीसर ? कडक की मउ Uhoh

धन्यवाद! माझ्याकडे जो कॅन आहे त्यावर सार आणि सोलकढी साठी असे लिहिलंय आणि चव घेतली तर खूप खारट लागले. म्हणून विचारले कारण उद्या एका कार्यक्रमासाठी बनवायचे आहे.

माझ्याकडे जो कॅन आहे त्यावर सार आणि सोलकढी साठी असे लिहिलंय>>>

थोडे साखर घालुन करुन बघा! कारण सरबतात आपण थोडे चवी पुरते मीठ वापरतोच!
आमच्य कडे आगळच आणुन ठेवलयं ते वरण, सार, सरबत, सोलकढी सर्वांसाठी वापरतो!

हो झालं व्यवस्थित ! साखर थोडी जास्त लागली कोकम क्रश पेक्षा पण मस्त झाले ! जीरा पावडर पण घातली होती. धन्यवाद!

Pages