नारायणराव बालगंधर्वांची नाटकं जोरात सुरू आहेत. नुकताच एका कर्जाचा डोंगर उतरून कधी नव्हे ते रु ३०००० इतकी रक्कम नारायणरावांच्या सहकार्यापाशी शिल्लक आहे. नारायणराव बसले आहेत. त्यांच्या पुढ्यात नानाविध उंची अत्तरं मांडलेली आहेत. नारायणरावांनी नुकतीच अत्तरांची खरेदी आटोपली आहे. माझ्या नाटकाला येणार्या रसिकांकरता उंची अत्तर हवंच, हा नारायणरावांचा अट्टाहास आहे. नारायणराव रसिकतेने अत्तराचा सुवास घेत आहेत.
"नारायणराव, आता हे ३०००० रुपये बँकेत जमा करतो.."
"हो, चालेल. एवढं अत्तरांचं बील चुकतं करा आणि उरलेली रक्कम बँकेत टाका.."
"किती झाले अत्तरांचे..?"
"२५०००..!!"
याला म्हणतात रसिकता, याला म्हणतात षौक..!
गडकरी मास्तर तसे जरा आजारीच वाटताहेत. नारायणराव त्यांना भेटायला आले आहेत. "मास्तर, मला एक नाटक द्या.." नारायणरावांच्या चेहेर्यावर मास्तरांबद्दलची भक्ति आणि आदर..!
मास्तर म्हणतात, "अहो नारायणराव, द्रौपदी, सुभद्रा, भामिनी या सगळ्या तुमच्या नायिका. भरजरी वस्त्र नेसणार्या. माझ्या नाटकाची सिंधू गरीब आहे. चालेल तुम्हाला?"
"मास्तर, तुमच्या नाटक मिळणार असेल तर फाटक्या वस्त्रातली नायिकाही मी करायला तयार आहे. पण मला नाटक द्या."
'ठीक आहे' असं म्हणून गडकरी मास्तर 'एकच प्याला'ची वही नारायणरावांच्या हाती ठेवतात.
एकच प्याल्याच्या तालमी सुरू होतात आणि त्याच वेळेला गडकरी मास्तर गेल्याची बातमी येते. नारायणराव हात जोडत आभाळाकडे पाहात 'मास्तर....!" असा टाहो फोडतात. अक्षरश: गलबलून येतं असं दृष्य.
ऐन प्रयोगाच्या वेळेस स्वत:च्या मुलीच्या निधनाची वार्ता समजूनही 'शो मस्ट गो ऑन..' या न्यायानुसार 'रसिकजनांच्या सेवेत जराही कुचराई होणे नाही..' असं म्हणत रंगमंचावर 'नाही मी बोलत..' हे पद लडिवाळपणे रंगवणारे नारायणराव बालगंधर्व आणि सुबोध भावेचा त्यावेळचा अप्रतिम अभिनय..!
रंगमंचावर 'रवी मी..' रंगलं आहे. संगीतसूर्य केशवराव भोसल्यांच्या भूमिकेत असलेला वसंतरावांचा नातू राहूल देशपांडे मस्त झुपकेदार मिश्या, फेटा वगैरे बांधून धैर्यधर झाला आहे. रंगमंचावर त्याच्यासोबत साक्षात नारायणराव बालगंधर्वांची भमिनी उभी आहे. संयुक्त मानापमानाचा प्रयोग सुरू आहे. राहूल 'रवी मी' त मस्त फिरतो आहे. श्रोत्यांमधून मनमुराद दाद येते आहे. 'खर्चाची पर्वा नाही, रसिकांकरता जे जे उत्तम, उदात्त, उच्च असेल तेच मी देईन..' या सततच्या ध्यासापायी आमचे नारायणराव नेहमी कर्जात बुडालेले. संयुक्त मानापमानाच्या प्रयोगामुळे बर्यापैकी रक्कम जमते. पण स्वत:च्या कर्जाची पर्वा न करता नारायणराव ती रक्कम टिळकांच्या स्वराज्य फंडाला देतात. पण उदार, उमद्या मनाचे केशवराव नारायणरावांना म्हणतात, "तुम्ही काळजी कशाला करता? मी आहे तुमच्यासोबत. आपण अजून प्रयोग करू आणि तुमचं कर्ज फेडू!" पण नारायणराव बालगंधर्व या शापित यक्षाच्या नशीबी काही वेगळंच. हे सगळं ठरतं आणि खुद्द केशवराव भोसलेच निवर्ततात...!
बोलपटाचा जमाना येतो आणि नाटकधंदा मागे पडतो. मराठी रसिकांच्या पदरात अलौकिकतेचं, संपन्नतेचं, समृद्धीचं, श्रीमंतीचं दान टाकणार्या, एका जमान्यात उत्तुंग वैभवाचे दिवस पाहिलेल्या नारायणराव बालगंधर्व या शापित यक्षाच्या आयुष्याला उतरती कळा लागते. महाराष्ट्र वाल्मिकी गदिमांचं एक वचन आहे - 'जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे..' तेच खरं..!
... आणि अखेरीस वार्धक्याने झुकलेले, थकलेले, खचलेले, किंचित लंगडणारे बालगंधर्व मावळत्या सूर्याला नमस्कार करताहेत आणि पडदा पडतो. नो रिग्रेटस्!
जा बाई नियती, तुला माफ केलं मी..!
मंडळी, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'बालगंधर्व' या सिनेमाबद्दल मी काय अन् किती बोलू? शुक्रवार ६ मे, २०११ या दिवशी मराठी रजतपटाच्या पत्रिकेत उच्चीचे सारे ग्रह एकवटले आणि नितीन देसाई कृत बालगंधर्व हा चित्रपट प्रदर्शित झाला...!
नितीन देसाईने हे अवघड, अजोड शिवधनुष्य फार सुरेखरित्या पेललं आहे. अक्षरश: भव्यदिव्य, आभाळाएवढं मोठं काम नितीनने आणि त्याच्या सार्या टीमने केलं आहे. नितीन देसाई हा स्वत: एक उच्च दर्जाचा कलादिगदर्शक. त्यामुळे जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सारं काही आपल्या चित्रपटात हवंच हा नितीनचा अट्टाहास, हे वेड. परंतु या वेडापायीच 'बालगंधर्व' हा उच्च दर्जाचा चित्रपट निर्माण होतो. चित्रपटातील बालगंधर्वांच्या उंची, भरजरी पैठण्या, दागदागिने, केशभूषा, वेशभूषा हे सगळं अतिशय नेत्रसुखद! चित्रपटात दाखवल्या गेलेल्या गंधर्व नाटक मंडळींच्या त्या रोजच्या शे- दिडशे माणसांच्या चांदीच्या ताटातल्या त्या जिलबीयुक्त जेवणावळी..! काय सांगू? किती बोलू..?
दिगदर्शक रवी जाधव, पटकथा संवादकार अभिराम भडकमकर, महेश लिमयेची अप्रतीम सिनेमॅटोग्राफी, चित्रपटातले सारे कलाकार. खूप खूप मेहनत घेतली आहे या सगळ्यांनी.
चित्रपटात जरी नारायणरावांचीच जुनी पदं घेतली असली तरी त्याचं उत्तम संगीत संयोजन कौशलने केलं आहे आणि या कामात त्याला मोलाची मदत झाली आहे या चित्रपटाचा सह-संगीत संयोजक आदित्य ओक याची. डॉ विद्याधर ओक यांच्या घरात अभिजात शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत याचीच पूजा केली जाते त्यामुळे आदित्य या त्यांच्या चिरंजिवाकडे ही परंपरा चालतच आलेली. अगदी पदं निवडण्यापासून ते ऑर्गनची साथसंगत करण्यापर्यंत आदित्यने या चित्रपटाकरता परिश्रम घेतले आहेत..!
नारायणरावांच्या पदांव्यतिरिक्त कौशलची स्वत:चीही तीन गाणी या चित्रपटात आहेत तीही सुंदर. खास करून 'परवर दिगार..' ही प्रार्थना. 'नाथ हा माझा..' हे पद आणि बालगंधर्व हे समानार्थी शब्द आहेत. अभिजात संगीतातली आजची आघाडीची तरूण गायिका वरदा गोडबोलेने हे पद फार सुरेख गायले आहे. सुरेल आवाज आणि सुंदर तान ही वरदाची खासियत..! बेला शेंडेही नेहमीप्रमाणे छानच गायली आहे. खूप गुणी मुलगी आहे ती.
आनंद भाटे! सॉरी, आनंद भाटे नव्हे, आनंद गंधर्वच तो..! नारायणरावांची पदं गाणं हे या चित्रपटातलं सर्वात मोठं आव्हान. आणि तेच आनंदने लीलया पेलंलं आहे. या मुलाच्या गळ्यातून नारायणराव खूप छान उतरतात. सुरेल, भावपूर्ण, लडिवाळ गायकी असलेला आनंद..!
आनंदा, जियो रे...!
आणि सुबोध भावे? हे माझ्या महाराष्ट्रातल्या आया-बहिणींनो, दृष्ट काढा रे त्या पोराची..! नारायणराव बालगंधर्वांच्या स्त्री वेषातला, भरजरी पैठणी नेसलेला, सुरेख, सुंदर, अप्रतिम, देखणा असा सुबोध भावे..! सुबोधच्या रंगमंचावरील सिंधू, द्रौपदी, भामिनी, सुभद्रा एकापेक्षा एक देखण्या जमल्या आहेत..!
बाबारे नितीन देसाई, अरे तू किती मोठं काम केलं आहेस हे तुझं तुला तरी महित्ये का रे? नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात साक्षात बालगंधर्व आणि त्या निमित्ताने मराठी संगीत, मराठी कला, वैभवशाली असलेली मराठी संगीत रंगभूमी, मराठी माणसाची कला आणि त्याची कलासक्ति याची समर्थ ओळख तू आजच्या तरूण पिढीला करून दिलेली आहेसच, परंतु केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर सार्या जगालाही करून दिली आहेस..! मराठी रजतपटाची मान तू सार्या जगतात उंचावली आहेस. खूप धन्य वाटलं रे तुझा हा चित्रपट पाहून...!
चटकाच लावून जातात बालगंधर्व. स्वयंवरात 'दादा ते आले ना..? अशी एन्ट्री घेत जगाला 'नाथ हा माझा'चं स्वरामृत भरभरून पाजणार्या नारायणराव बालगंधर्वांना अखेरीस रंगमंचावर संवाद म्हणताना ठसका लागतो आणि त्यांची तोंडातली कवळी खाली पडते. आणि तेव्हाचा सुबोध भावेचा तो चेहेरा..! अपमानीत, खिन्न, रडवेला..!
कोण आहे ही नियती? काय आहे तिचा न्याय? माहीत नाही..! तुमच्याआमच्या पदरी शेवटी उरतं ते फक्त यमनातलं 'नाथ हा माझा..' आणि तेच अमृत आहे, तेच अक्षय आहे, तेच चिरंतन आहे..!
-- तात्या अभ्यंकर.
अगदी असाच आहे हा चित्रपट.
अगदी असाच आहे हा चित्रपट. देखणं रुप, अप्रतिम संगीत, सर्व कलाकृती आणि गंधर्वांचा इतिहास काय सुरेख आहे सगळं. वेड लावून गेला हा सिनेमा.
तात्या, फार इच्छा आहे हो हा
तात्या, फार इच्छा आहे हो हा चित्रपट बघायची. बालगंधर्वांची उपलब्ध असलेली, सर्व गाणी माझ्याकडे आहेत, पण त्यातून खरे ते समजतच नाहीत.
डॉ विद्याधर ओक आणि त्यांचे चिरंजीव, यांचे वादन मी प्रत्यक्ष ऐकले आहे. सगळ्या थोर माणसांचा हातभार लागलाय या चित्रपटाला.
आता मा. दिनानाथ पण असे भेटोत.
नितांत सुंदर चित्रपट,
नितांत सुंदर चित्रपट, सगळ्यांनी आवर्जून पहावा असा. सगळ्या टिमचे efforts दिसुन येतात.
आणि सुबोध भावे...... आहाहा......... शब्द अपुरे पडत आहेत.....
खूप छान लिहिलय....
खूप छान लिहिलय....
तात्या, सुरेख लिहिलं आहेत.
तात्या, सुरेख लिहिलं आहेत.
http://www.maayboli.com/node/25583 इथे 'चित्रपट' ह्या ग्रूप अंतर्गत ह्याच सिनेम्यावर धागा उघडला आहे. सर्व गोष्टी एकाच जागी राहाव्यात, म्हणून हे लिखाण ह्या धाग्यावरही चिकटवाल का कृपया?
आवडलं. मस्त लिहिलं आहेत
आवडलं. मस्त लिहिलं आहेत तात्या.
सुंदर लिहिलंय. चित्रपट
सुंदर लिहिलंय. चित्रपट पाहायची उत्कंठा लागलीय अगदी.
खूप आतून आणि सुंदर
खूप आतून आणि सुंदर लिहिलंय.
आता मा. दिनानाथ पण असे भेटोत.>> अगदी अगदी दिनेशदा. मनापासून इच्छा आहे दिनानाथांवरचा चित्रपट बघण्याची..
मस्त! चित्रपट पहायचे भाग्य
मस्त! चित्रपट पहायचे भाग्य कधी लाभेल कुणास ठाऊक.
फारच छान लिहिल आहेत तात्या.
फारच छान लिहिल आहेत तात्या. हा चित्रपट बघायची आधीपासून उत्सुकता होती, तुमच्या परीक्षणामुळे आता ती दुप्पट झाली.
अमेरिकेच्या महाराष्ट्र मंडळानी प्रयत्न केले तर आम्हाला पण लवकरच ही मेजवानी मिळेल अशी आशा आहे. आजच आमच्या मंडळाच्या अध्यक्षांच्या मागे लागतो!
वा.. तात्या काय अप्रतिम
वा.. तात्या काय अप्रतिम लिहिलं आहे तुम्ही! सुरेख.
खूप छान लिहिलय.. चित्रपट
खूप छान लिहिलय.. चित्रपट पहायचाय.. वीकेंडला वेड्यासारखं उन्हातान्हात भटकून पण तिकिट्स नाही मिळाली..
[चांगलं लक्षण वाटलं हे पण.. असो..]
तात्या जबरदस्त लिहिलं आहे.
तात्या जबरदस्त लिहिलं आहे. उद्या हा सिनेमा बघणारच !
पुण्यात कुठे रीलीज होणार/झाला
पुण्यात कुठे रीलीज होणार/झाला आहे?
तात्या मस्त लिहिलयं.
तात्या मस्त लिहिलयं.
मीरा.. सगळीकडे आहे दिवसाला
मीरा.. सगळीकडे आहे दिवसाला एकेक तरी शो.
http://www.google.co.in/url?q=http://www.punediary.com/Movies/Default.as...
इथे पहा
सर्व मायबोलीकर प्रतिसादींचा
सर्व मायबोलीकर प्रतिसादींचा मी ऋणी आहे. वाचनमात्रांचेही औपचारीक आभार मानतो..
तात्या.
बघायला, निदान काही महिने वाट
बघायला, निदान काही महिने वाट बघावी लागेल आम्हाला. निदान गाणी तरी ऐकायला मिळोत.
मस्त लिहिलंय!!
मस्त लिहिलंय!!
तात्या, आपण केलेले रसग्रहण
तात्या,
आपण केलेले रसग्रहण आवडले. उत्तम काम केले आहे टीम ने , सुबोध चा अभिनय पण अप्रतिम पण मला ड्रेपरी नाही आवड्ली. नाडीवाले ब्लाउज घातले आहेत बालगंधर्वान्ना. त्यांची कानावरुन केस घेण्याची पद्ध्त, कानातल्या कुड्या हे नाही दिसले. काही ठिकाणी तर कुन्दन चे दागीने घातले आहेत , आणि डिझायनर पैठ्ण्या आहेत नवीन प्रकारच्या (जरा जास्तच झगमगीत ) पारम्पारिकता जपायला हवी होती असे वाटले. अर्थात हे माझे मत. खुप परिश्रम करुन चित्रपट केला आहे त्यामुळे त्रुटी दाखवणे हा उद्देश नाहि...पण बालगंधर्व म्हणले की डोळ्यासमोर जो फोटो येतो ना त्यात थोडी तफावत जाणवली.
लेख फारच मस्त. अगदी भारावून
लेख फारच मस्त. अगदी भारावून जाऊन लिहिलाय ते जाणवतयं...
नारायणराव बालगंधर्वांच्या
नारायणराव बालगंधर्वांच्या स्त्री वेषातला, भरजरी पैठणी नेसलेला, सुरेख, सुंदर, अप्रतिम, देखणा असा सुबोध भावे..!
>>>>>> अग्गदी अग्गदी.......पण त्याहुन ही सुंदर त्याचा मुद्राभिनय !
नीता लुल्ला कशी बेअक्कल आहे
नीता लुल्ला कशी बेअक्कल आहे यावर खास ठेवणीतले 'भाष्य' आले नाही अजून

नाडीवाले ब्लाउज घातले आहेत
नाडीवाले ब्लाउज घातले आहेत बालगंधर्वान्ना
<<<< नाडीवाले ब्लाउज ???
पाठीवर दोरीने knot बांधायचे ब्लाउज म्हणायचय का ?
नाडी म्हणाजे पयजामा डोळ्यासमोर आला !
पुन्हा एकवार सर्वांना
पुन्हा एकवार सर्वांना धन्यवाद..
(ऋणी) तात्या.
हो.. खोल गळा असल्यावर
हो.. खोल गळा असल्यावर नाडी/दोरी/लेस ने वरच्या बाजुला गाठ बांधतात ना...हल्लीची फॅशन आहे ती.
तात्या, चांगले लिहीलेत.
तात्या, चांगले लिहीलेत. चित्रपट बघायची उत्सुकता वाढली.
काल चित्रपट पाहिला.. आमच्या
काल चित्रपट पाहिला.. आमच्या ग्रुपचा मराठी अभिमान आणि चित्रपटाचं ६ कोटी हे मराठीतलं पहिलं वाहिलं इतकं मोठं बजेट ऐकुन २०० रु पर हेड ची तिकीटं काढून पाहिला. (उगीच अॅड लब्ज वाल्याला वाटायला नको मराठी माणसं प्लॅटीनमचं तिकीट मराठी चित्रपटासाठी काढत नाहीत - इति एक मित्र) पण भारी आहे चित्रपट. काही गोष्टी खटकल्या पण ह्म्म... नक्की पहावाच असा आहे. चित्रपट झाल्यावर शेवटच्या श्रेयनामावलीला बालगंधर्वांचे फोटो दाखवत होते ते अगदी शेवटपर्यंत थांबून पाहिले सगळ्यांनी. खरोखर भारावुन गेलेले प्रेक्षक. सुंदर अनुभव आहे हा चित्रपट पहाणे म्हणजे..
चित्रपट परिचय आवडला
चित्रपट परिचय आवडला तात्या.
नक्की बघणार हा चित्रपट.
खुप छान लिहलयं. चित्रपट
खुप छान लिहलयं. चित्रपट पाहायलाच हवा..
Pages