पारंपारीक पद्धतीने आंब्याचे लोणचे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 May, 2011 - 14:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक डझन मध्यम आकाराच्या कैर्‍या
पाव किलो जाडे मिठ
१०० ग्रॅम मोहरीची डाळ
लाल तिखट ८ चमचे
४ चमचे हळद
२ चमचे मेथी
१० ग्रॅम हिंग
पाव किलो तेल

क्रमवार पाककृती: 

आंब्याच्या तुम्हाला आवडतात त्या आकाराच्या फोडी करुन घ्या. त्या फोडींना थोडी हळद व थोडे मिठ चोळुन ४-५ तास कडकडीत उन्हात वाळवा.

दुपारी फोडी वाळवत टाकुन संध्याकाळी लोणच घातल तरी चालेल.

जाडे मिठ पाट्यावर किंवा मिक्सरवर जाडसर वाटुन घ्या. नंतर वाटलेले मिठ तव्यावर किंवा कढईत चांगले भाजुन घ्या.

कढईत २-३ चमचे तेल घेउन त्यावर मेथी परतवा.

मेथी काढुन थंड करत ठेवा व त्याच कढईत मेथी परतवुन राहिलेल्या तेलात हिंग, हळद व लाल तिखट मिडीयम गॅसवर ४-५ मिनिटे परतवा.

मेथी थंड झाली की ती वाटून घ्या.

आता आंब्याच्या फोडींवर मेथीचा गर, मिठ, हिंग, हळद, लाल तिखट घालुन एकजीव करा.

आता उरलेले सगळे तेल गरम करा. फोडणी देण्याइतपत गरम झाले की गॅस बंद करा १० मिनीटांनी त्यात मोहरीची डाळ परतवा. लगेच टाकु नका नाहीतर मोहरीची डाळ करपेल.

आता राईची डाळ टाकलेले तेल पुर्ण गार झाले की ते आंब्यांच्या फोडींच्या मिश्रणात ओता व पुन्हा एकजीव करुन काचेच्या बरणीत दाबुन दाबुन भरा.

तेल फोडींच्या वर आले पाहीजे. जर नसेल आले तर अजुन गरजेपुरत तेल गरम करा व थंड करुन बरणीत ओता.

जर फोडी तेलात बुडाल्या नाहीत तर काही दिवसांत त्यांना बुरशी येते.

लोणच्याच्या बरणीचे झाकण घट्ट बंद करा व ८-१० दिवसांनी लोणचे वापरण्यास काढा.

वाढणी/प्रमाण: 
वर्षभरासाठी एक बरणि पुरे ना ?
अधिक टिपा: 

आंब्याच लोणच म्हटल की आजीचीच आठवण येते. आजी अगदी मुंबईला राहणार्या सुद्धा सगळ्या नातवंडांना लोणच पाठवुन द्यायची. तिच्या हातच लोणच आमच्या आख्या कुटुंबातील लहान मुलांना आवडायच. डब्ब्याला सुद्धा अधुन मधुन आवर्जुन नेल जायच. १० वर्ष झाली ती जाऊन पण तिच्या हातची चव अजुनही जिभेवर रेंगाळत आहे. म्हणुनच ही लोणच्याची पाककृती तिला समर्पित.

शक्यतो जाडेच मिठ वापरा त्यामुळे वेगळीच चव येते व लोणचे जास्त टिकते.

हिंग, हळद व लाल तिखट न परतवताही डायरेक्ट फोडिंमध्ये मिसळले तरी चालते.

लोणचे वापरण्यासाठी काढताना सारखी बरणी उघडू नका. महिनाभराचे एका लहान बरणीत काढून घ्या.

माहितीचा स्रोत: 
आजीची पद्धत आणि पुस्तकाची मदत.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स मिनी, सिंडरेला. झोपायच्या वेळेत पाकृ टाकल्याचा परीणाम. बदल केला आहे.

आईग्ग्ग्ग्ग्ग्ग.... जागुले, का गं असा छळ मांडलायस? Proud

ताजे ताजे आंब्याचे लोणचे ... तोंपासु... लागला Happy काय फक्कड रंग आलाय... चवीला पण ब्येश्टच असणार Happy

जागु, मासे संपले का करून सगळे? Proud
लोणचे मला मुळात फार कमी आवडते, ते ही लिंबाचे आणि चविला गोड असेल तरच. त्यामुळे कैरिचे लोणचे माझा जिव्हाळ्याचा विषय नाही. Sad
तरिही तुझ्या कोणत्याही पाकृच्या बीबी वर हजेरी लावली नाही तर चुकल्या चुकल्यासारखे वाटते. Happy
हे लोणचं रूचकर असेल यात वाद नाही.. तुझ्या घरी येईन तेव्हा चव नक्की पाहेन. Happy

व्वा जागु मस्त!

कालच लोणच्याची बरणी भरली !
माझी आई करते माझ्या साठि लोणचे, ह्याच पध्द्तीने ! Happy

मी पण ह्याच पध्द्तीने करते पण खडे मीठ कधी वापरल नाही ह्या वेळेस वापरुन बघते.
रच्याकने साउथ मधे सांबार / रस्सम वैगरे मधे खडे मीठच वापरतात. त्याचे कारण काय?

मस्त!

तोंपासु असे लिहितालिहिता परत तोंडात पाणी गोळा होतेय.. लोणचे बघितले की माझ्या तोंडात झरे कुठुन उमळतात तेच कळत नाही. लोणचे घालतेच आता. हल्ली जिकडेतिकडे सोडियमयुक्त नमकच मिळते. खडेमिठ मिळवण्यासाठी बेलापुर नाहीतर शिरवणे गावात जायला पाहिजे.

मामि, लाजो, सायो थ.न्ड, अरुन्धती, पियापोटी धन्स.

दिनेशदा मला ह्याच पद्धतिचे लोणचे आवडते. लग्न झाल्यापासुन मी सासरी असे लोणच घालते. सगळ्या.न्ना आवडते. जाड्या मिठाने वेगळीच चव येते लोणच्याला. आणि आवड असल्याने असले खटाटोप अगदी वेळ काढून मी करते.

दक्षे अग मासे नाही सम्पले अजुन. काळजी करु नकोस. एवढ्या जिव्हाळ्याने येतेस बिबिवर माझ्या त्याबद्दल धन्स ग.

अखी, साधना खरच करुन बघा.

जागू, मस्त गं! आजी-आई लोणच्यात अशी मोहरीची डाळ घालत नसत. त्यामुळे मैत्रिणींच्या डब्यातले लोणचे मला भारी आवडत असे. मी स्वतः कैरीच्या इन्स्टन्ट लोणच्याशिवाय कुठलेच लोणचे केले नव्हते. पण मात्र अल्पनाचा सखुबत्ता वाचून लगेच करून पाहिला. आता हे लोणचेही जमलं तर करून बघेन.
एक शंका : मीठ भाजताना उष्णतेने वितळत नाही का?

जागुताई माझि आई ह्यात फक्त २ बदल करुन लोणचे घालते.

१) मेथीचे दाणे घालत नाही.
२) आंब्याच्या फोडी मिठ अणि हळद लावुन सगळे पाणि काढुन चंगल्या २-३ दिवस उन्हात ठेवते.
पण मला एकदम मुरलेले लोणचे आवडते आणि माझ्या वडीलंना एकदम करकरीत लोणचे.. ते ऑफिसच्या कंपाउंडमधील कैर्‍या आणुन घरीच त्यांचे करकरीत लोणचे बनवुन खातात.. Happy तसेही त्यांना सगळे जेवण करता येते एक चपात्या सोडल्या तर.. Happy

रुपाली हो अग काही जण रात्री फोडी.न्ना मिठ लावतात आणि सकाळी त्याचे पाणी टाकुन दिवसभार वाळवुन त्याचे लोणचे घालतात. २-३ दिवस वाळवल्या म्हणजे ते आ.न्बोशिचे लोणचे झाले. तेही छान लागते.

रैना, सायली धन्स.

मन्जु नाही ग वितळत.

जागू, धन्य आहेस बाई तू अगदी.
माझ्या आईच्या हातच्या लोणच्याची आठवण करून दिलीस.

अगदी सेम पद्धत आईची.
आम्ही फक्त हापूसच्याच कैरीचे लोणचे घालतो. कारण त्याची कैरी मस्त करकरीत रहाते. नरम पडत नाही शिजल्यासारखी. दुसरे म्हणजे उन्हात २-३ दिवस मीठ व हळद लावून वाळवतो.
अक्खी मोहरी उन्हात वाळवली आणि लगेच कांडली की मस्त डाळ निघते.
खड्या मीठाची व खड्या काळा हिंगाची चव एकदम मस्त(इती आई).

आईने इतके करूनही मी ह्या लोणच्याकडे चुकुन बघत नाही.
फक्त कैरी-छुंदा व गोड लिंबू लोणचेच प्रिय आहे. त्यामूळे हे आंब्याचे आबंट लोणचं नातेवाईकांच्या घरात(घशात) जातं व थोडेसे आमच्या इतरांच्या (घरच्यांच्या). Happy

लोणचं पुराण संपुर्ण!

माझी आई संपूर्ण वर्षाच्या आंब्याच्या लोणच्यात अजिबात तेल घालायची नाही. कैर्‍या वाळवलेल्या नसायच्या. लोणच्यात व्हीनेगर घालायची. दर वेळी जेंव्हा छोट्या बरणीत वापरायला काढायची तेंव्हा फोडणी करून गार करून लोणच्यात घालायची. त्यामुळे लोणच नेहेमी ताजच लागायच. हे लोणच २-३ वर्षपण चांगल रहात. आम्ही इथे रहाणारी सगळी भावंडं ( आते, मावस, मामे) तिने केलेलच लोणच आणायचो. प्रवासात तेल सांडणं वगैरे भीति नसायची. व्हिनेगरच प्रमाण माहित नाही. पण लोणच तेलाशिवायपण खाता येईल एवढ ओल आणि छान असायच. अतिशय स्वादिष्ट लोणच असायच.

मिरा तुला कैरी छुंदा आवडतो ? मी केला आहे. पण कॉमन असल्याने मि रेसिपी नाही टाकली.

आर्च मस्त. बाजारातल्या काही लोणच्यांमध्ये व्हिनेगर घालतात टिकण्यासाठी.

पीहु धन्स.

मंजुडी मीठ नाही जळत. मी नेहमी लोणच्यात मिठ भाजुनच टाकते. भाजायचे म्हणजे ५-७ मिनिटे गरम तव्यावर परतायचे. त्यामुळे मिठातला पाण्याचा अंश निघुन जातो.

Pages