आणखी एक राधिका

Submitted by मंदार-जोशी on 2 May, 2011 - 06:05

८ मार्च २०११ रोजी सगळा देश - नव्हे - अखिल विश्व जागतिक महिला दिन साजरा करत असतानाच राजधानी दिल्लीत राधिका तन्वर या कॉलेज तरुणीला एका युवकाने गोळी घालून ठार केल्याच्या वृत्ताने सगळा देश हादरला.

"सगळा देश हादरला" असं लिहीण्याची पद्धत असते. कारण असले प्रकार आजकाल इतके सर्वसामान्य झाले आहेत की कुणी हादरत वगैरे नाही. एका सहकर्मचार्‍याची प्रतिक्रिया अगदी प्रातिनिधिक म्हणावी लागेल. "असेल काहीतरी प्रेमाबिमाचं लफडं, सोड यार".

सुदैवाने चार दिवसांत पोलीसांनी यशस्वी(!) तपास करुन खुन्याला अटक केली. विजय उर्फ राम सिंग हा तो खूनी. पोलीसांनी नेहमीच्या पद्धतीने चौदावं रत्न दाखवून त्याची चौकशी केली तेव्हा जे उघड झालं ते समजल्यावर मात्र हा विषय डोक्यातून जाईना.

उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील राम सिंग हा राधिकाच्या घराजवळच असणार्‍या एका शिवणकाम कारखान्यात कामाला होता. राधिकाचा पाठलाग करणे आणि तिला छेडणे हा त्याचा आवडता छंद होता. तसंही मुलींना अशा प्रकारे त्रास देणे हे प्रकार नवीन नव्हते, पण त्याचा राधिकावर विशेष "जीव" असावा. असाच एकदा राधिकाचा पाठलाग करत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच राधिकाने धावत रस्त्यातच उभ्या असलेल्या काही लोकांना गाठले आणि "तो माणूस मला छेडतोय" अशी आरोळी ठोकली. एखादा चोर, मुलींना छेडणारा नि:शस्त्र गुंड असे कोणी तावडीत सापडले की हात साफ करायला लोक टपलेलेच असतात. अर्थातच त्या लोकांनी मग "लडकी को छेडता है" किंवा तत्सम डायलॉग मारत त्याला बेदम चोप दिला. अशा अनेक गोष्टी कानावर आल्याने राम सिंगला कामावरुन काढून टाकण्यात आले. असेच काही दिवस गेले पण राम सिंग राधिकाचा पाठलाग करणे आणि तिने स्पष्ट नकार दिल्यावरही तिच्याकडे आपल्या एकतर्फी "प्रेमाची" कबूली देणे सोडेना.

नोकरी गेल्याने राम सिंगने मुंबई गाठली आणि तिथे रोजगार शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्याच्या विकृत डोक्यातून राधिकाचा विचार जाता जाईना. त्याने वारंवार दिल्लीला येऊन राधिकाच्या मागावर राहणे सोडले नाही. एकदा राधिका बस मधून उतरून पादचारी पुलावरून जात असताना पुन्हा त्याने राधिकाला गाठले आणि त्याच्याशी लग्न करण्याची गळ घातली. तिच्याही मनात त्याच्याविषयी 'प्रेमभावना' असल्याचा त्याचा समज होता. तसं बोलून दाखवल्यावर राधिकाने तिथेच त्याच्या श्रीमुखात भडकावली. आता हा आपल्याला त्रास देणार नाही अशा समजूतीत असलेल्या राधिकाला मात्र राम सिंगच्या मनात भडकलेल्या सूडाग्नीची कल्पना कशी असावी?

विजय उर्फ राम सिंगने आपला सूडाग्नी शमवण्यासाठी राधिकालाच संपवण्याचा घाट घातला. त्याने सरळ गुरगाव गाठले आणि तिथून दोन हजार रुपये देऊन एक 'कट्टा' उर्फ गावठि पिस्तूल विकत घेतले. गंमत म्हणावी की दैवदुर्विलास, आपल्या देशात डि.व्ही.डी प्लेअर आणि पिस्तुल या दोन वस्तू एकाच किंमतीत आणि सहजतेने विकत घेता येतात.

पिस्तूल घेऊन पूर्ण तयारीने तो पुन्हा दिल्लीला आला आणि एके दिवशी संधी साधून त्याने राधिकाला गाठले. पुन्हा त्याला झिडकारून राधिकाची पाठ वळताच त्याने खिशातून पिस्तुल काढले. पण लगेच न चालवता जिना सुरू होण्याच्या जराच आधी त्याने तिच्यावर झाडून जिन्यावरुन उतरुन पळ काढला. पुलावर बर्‍यापैकी वर्दळ असल्याने काही क्षण कुणाला काय झाले ते समजेना. ह्याच गोंधळाचा फायदा घेऊन राम सिंग तसाच पिस्तूल हातात घेऊन पळाला आणि दिल्लीच्या गर्दीत दिसेनासा झाला.

पोलीसांनी तिच्या घरच्यांकडे आणि महाविद्यालयातील मित्रपरिवाराकडे आधी चौकशी केली. मग इतर तपास सुरु झाला आणि राम सिंगच्या खोलीत राहणार्‍या मित्रांकडून माहिती मिळाल्यावर तपास वेगाने करुन त्याला मुंबईतून अटक केली. राम सिंगला त्याच्या कृत्याविषयी अजिबात पश्चात्ताप नव्हता "माझी बायको नाही झाली तर आता इतर कुणाचीही होणार नाही" असले विकृत समाधान त्याच्या चेहर्‍यावर झळकत होते.

मला सर्वात जास्त क्लेषकारक वाटलेली बाब म्हणजे राधिकाच्या घरच्यांच्या चौकशीत पोलीसांना जी धक्कादायक बाब समजली ती होय. असे काही प्रकार अनेक दिवस सुरू असल्याचे राधिकाने तिच्या घरच्यांना सांगितलेच नव्हते! मग त्याचं नावही ठाऊक असणं दूरच राहिलं. राम सिंगला जेव्हा अटकेनंतर तिच्या घरच्यांनी पाहिले तोपर्यंत त्यांनी त्याला त्यांच्या घराच्या आसपास बघितलेही नव्हते!! राधिकाने जरी फक्त तिच्या घरच्यांना 'एक माणूस आपला पाठलाग करत असतो आणि आपल्याला छेडत असतो" असं नुसतं सांगितलं असतं तरी पुढची कारवाई करुन पुढची अप्रिय घटना टाळता आली असती.

हे समजल्यावर मनात असंख्य प्रश्नांचे मोहोळ उठले. असे का झाले असावे? याला घरचे वातावरण कारणीभूत असावे का? शक्य आहे. कारण असले प्रकार घडल्यावर "तुझीच काहीतरी चूक असेल" अशी मुक्ताफळे उधळणारे पालक आहेतच की. मुलांना आई-वडीलांची इतकी भीती वाटावी, की छेडछाड आणि पाठलागासारख्या गंभीर बाबीही त्यांना सांगायला संकोचावे? मुलांना - आणि विशेषतः मुलींना) धाकात ठेवण्याच्या प्रयत्नात आपण त्यांना आपल्यापासून दूर करत आहोत ह्याची जाणीव पालक म्हणून आपल्याला राहिली नाही असे झाले आहे का? मुले आणि आई-वडील/एकूणच घरातले यांच्यातला संवाद इतका हरवत चालला आहे का, की आपल्या अब्रू आणि जिवाला असलेल्या धोक्याबाबतही घरच्यांशी बोलावेसे मुलांना वाटू नये? की राधिकाला वाटलं तशी ही बाब गांभीर्याने घेण्याजोगी वाटत नाही अनेक मुलांना? बाहेर घडणारं सगळं आपल्या आई-वडिलांना सांगणारी मुले आहेत, मान्य. पण अगदी काहीच न बोलणारी, थोडंच सांगणारी, किंवा नेमकं महत्वाचं तेच न सांगणारीही मुलं आहेतच की.

विकृत मंडळी जागोजागी असणारच, पण मग मुले असले प्रकार घरी का सांगत नसावीत? काहीही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा विश्वास आपण आपल्या मुलांच्या मनात निर्माण करण्यात अपयशी ठरतोय का?

अशा अनेक राधिका या आधी झाल्या आहेत. पुढेही होतील. पण मुलांच्या मनात विश्वास निर्माण करण्याच्या दिशेने — जेणेकरुन त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकता येतील — आपल्याला काय करता येईल?

गुलमोहर: 

@मुक्तेश्वर
तुमचे म्हणणे पटले नाही. ज्या काळात मुला-मुलींना मोकळीक नव्हती तेव्हाही छेड-छाड, एकतर्फी प्रेम वगैरे त्रास मुलींना व्हायचाच. 'तो कोपर्‍यावर उभा असेल तर..' या भीतीने लांबच्या रस्त्याने जाणार्‍या मुली मी बघितल्यात.
शिक्षक १०-११ वीतल्या मुलीच्या प्रेमात पडणे वगैरे प्रकारही व्हायचे. अगदी सर्रास! आणि उगाच पाश्चात्यांना नावे ठेवणे नको. इथे जाणवलेली गोष्ट म्हणजे छेड काढणे हा प्रकार नसतो. डेट साठी स्पष्ट विचारतात. 'नाही' म्हटले की विषय संपतो. उगाच पाठलाग करणे, बघत उभे रहाणे वगैरे प्रकार नसतात.

अत्यंत दुर्दैवी घटना.
पालकांशी संवाद तर हवाच. शिवाय मुलामुलींना स्वसंरक्षणाचं शिक्षणही मिळायला हवं. अर्थात पिस्तुलाच्या गोळीपुढे कराटे वगैरे तरी काय उपयोगाचे ? Sad

सरकार झोपले आहे . महिलान वर होनारया अनयावर आवाज उचला काय्दा बनला पहिजे आजचा सामना दि.२.५.११. पान क्र.८

इथे जाणवलेली गोष्ट म्हणजे छेड काढणे हा प्रकार नसतो. डेट साठी स्पष्ट विचारतात. 'नाही' म्हटले की विषय संपतो. उगाच पाठलाग करणे, बघत उभे रहाणे वगैरे प्रकार नसतात.>>>

हे फारच चांगले आहे. पण हे वाचून मला असे वाटले की डेटसाठी स्पष्ट विचारणे हे तरी काय आदर्श आहे का?

सहज आपले मनात आले. बाकी काही नाही.

छेडछाड, खाणाखुणा अशा गोष्टी पूर्वी पण होत्या, पण आता खून करण्याइतपत मानसिकता होण्यामागे बर्‍याच अंशी टीव्ही आणि सिनेमे पण कारणीभूत आहेत असं वाटतं. कोणी कितीही नाकारलं तरी गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारचे सिनेमे अणि टीव्ही सिरियल्स येत आहेत त्यांचा नक्कीच मुलांच्या मनावर परिणाम होत आहे, गरजेपेक्षा जास्त धीटपणा आला आहे... 'सबकुछ चलता है' ही भावना नकळत लहानपणीच निर्माण होत आहे.

बेफिकिर, डेट साठी विचारणे याचा अर्थ मला तुझ्याशी ओळख वाढवायला, तुला अधिक जाणून घ्यायला आवडेल एवढाच असतो. बरेचदा समोरच्या व्यक्तीला जाणून घेताना खरेतर स्वतःलाही जाणून घेतले जाते. मुव्ही-पिझ्झा, गोल्फ गेम, म्युझियमला भेट वगैरे अ‍ॅक्टिव्हिटीज मधुन ओळख वाढते. त्यातून काही पक्के नाते जुळतेच असे नाही. हे एक प्रकारचे पाश्चात्य पद्धतीचे कांदे-पोहेच असतात.

चांगला लेख मंदार...
ठमा - प्रचंड अनुमोदन
आणि मुळात याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी...आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनप्रबोधन व्हायला हवे...
स्त्री ही केवळ भोग्यवस्तू आहे ही भावना मुलांना काय जन्मजात नसते. आजूबाजूचे वातावरण, घटना आणि प्रसंगातून हे त्यांच्या मनावर बिंबत जाते.
परस्त्री ही मातेसारखी असते हे तो पुस्तकात वाचतो आणि घरी दारूच्या नशेत आलेले वडील आईला शिव्या देतात, तिच्यावर हात उचलतात (हे प्रकार फक्त झोपडपट्टीत नाहीत तर मध्यमवर्गीय घरातही होतात) हे पाहतो तेव्हा त्याचे त्याच्या मनस्थितीनुसार परिणाम होत जातात. एकतर त्याला या सर्व प्रकाराबद्दल कमालीची चीड येते किंवा हे सगळे असेच चालते असे म्हणून तो परिस्थितीला शरण जातो.
अजुनही आपल्याकडे लैंगिक शिक्षण देण्याबाबत उदासीनता आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा मोठ्या मुलांकडून, पिवळ्या पुस्तकातून आणि ब्लू फिल्ममधून विकृत स्वरूपात येणारी माहीतीच त्याच्या डोक्यात बिंबवली जाते.
त्यातून आपले चित्रपट, मालिका यांच्याबद्दल तर बोलायलाच नको.
"तू मेरी नही हो सकती तो और किसी की नही हो सकती" या डायलॉगला आपल्याकडे टाळ्या पडतात तेव्हा खरा पुरुष हा असाच असतो हा समज दृढ होत जातो.
अर्धवट वय, अर्धवट ज्ञान, मनातल्या भावनांचा निचरा होण्यासाठी आवश्यक साधनांचा अभाव आणि समाजाचे अक्षम्य दुर्लक्ष यातून हे प्रकार घडतात.
यांना खर्या अर्थाने मानसिक दिलाश्याची गरज असते पण ती त्यांना कधीही मिळत नाही आणि त्यांच्या आत कोंडला गेलेला हा सगळा उद्रेक अतिशय विकृत स्वरूपात बाहेर पडतो त्यावेळी अचानक सर्वांना जाणिव होते.
अत्यंत हुशार, सुशिक्षित पालकांची मुलेही जेव्हा अशा प्रकरणात सापडल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या आजूबाजूलाही आज अनेक असे धुमसते बॉम्ब फिरत आहेत.
पण वाया गेलेला म्हणून त्यांना हेटाळणीयुक्तच नजरेने पाहिले जाते. या अशा वाया गेलेल्यांना जरा जरी प्रेमाचा ओलावा मिळाला तर मोठ्या प्रमाणावर अशा घटनांना आळा बसू शकतो.
अनेक स्वयंसेवी संस्थांनी रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी आणि वेश्यावस्तीत सुरु केलेल्या सुधारगृहांचे अनुभव बोलके आहेत.

इथे जाणवलेली गोष्ट म्हणजे छेड काढणे हा प्रकार नसतो. डेट साठी स्पष्ट विचारतात. 'नाही' म्हटले की विषय संपतो. उगाच पाठलाग करणे, बघत उभे रहाणे वगैरे प्रकार नसतात.>>>

हे फारच चांगले आहे. पण हे वाचून मला असे वाटले की डेटसाठी स्पष्ट विचारणे हे तरी काय आदर्श आहे का?
>>> तिथे "आदर्श" असा काही प्रकारच नसतो.

आणि मुळात याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी...>>
परस्त्री ही मातेसारखी असते हे तो पुस्तकात वाचतो आणि घरी दारूच्या नशेत आलेले वडील आईला शिव्या देतात, तिच्यावर हात उचलतात (हे प्रकार फक्त झोपडपट्टीत नाहीत तर मध्यमवर्गीय घरातही होतात) हे पाहतो तेव्हा त्याचे त्याच्या मनस्थितीनुसार परिणाम होत जातात. एकतर त्याला या सर्व प्रकाराबद्दल कमालीची चीड येते किंवा हे सगळे असेच चालते असे म्हणून तो परिस्थितीला शरण जातो.
>>>चँप, मग तुला माझ्या मतालाही अनुमोदन द्यावं लागेल हं.

मंदार, चांगलं लिहिलयस.. एकतर्फी प्रेमापायी मुलींना त्रास देणे, त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्याचे प्रकार वर्षानुवर्षं चालू आहेत्.त्यात छोट्या मोठ्या सर्व शहरांचा सामावेश आहे. आता पिस्तुलं इतकी ईझीली मिळू शकतात ही खरच काळजीची बाब आहे. मुलींची मानसिक वृत्ती ही आजतागायत बदलली नाहीये. त्यांना अजून ही असल्या गोष्टी घरी सांगायला लाज/भीती वाटते.
पालकांशी मनमोकळा संवाद करता येणं हे फार गरजेचं आहे. आपल्या पाल्याबद्दल जागृत राहणे हे पालकांचे कर्तव्य आहे.
घरापासून सुरुवात झाली तरच समाजामधे हळूहळू बदलाव येईल.

अवघड आहे. शहरांमधे या सगळ्याचं प्रमाण जरा जास्तच पहायला मिळतं. निव्वळ सौंदर्य आकर्षण, प्रेमाच्या बदलत्या आणि संकोचित व्याख्या आणि पाल्य आणि पालकांमधला कमी होत चाललेला संवाद हेच याचे मुळ कारण आहे. पण तडकाफडकी घरात सांगूनही चालत नाही. शेवटी पुन्हा प्रश्न येतो तो मुलीच्या बदनामीचा. काहीही झालं नसलं तरीही गप्पच बसावं लागतं काहीही झालं तरीही गप्पच बसावं लागतं. निदान खेड्यात तरी हेच बघायला मिळतं. पण कुठेतरी हे थांबायला हवं. नागपुरमधे भरवस्तीत झालेली 'किरणापुरे' या या युवतीची हत्या आणि सर्व माहीत असूनही गपगुमान काहीच न झाल्याचा अभिर्भाव मिरवत उंडारणारा समाज आपल्याला पहायला मिळाला. मग हे आता थांबवायचं तरी कसं?

गोजिरी धन्यवाद.
राम सिंग काही अंतर पिस्तुल घेऊन धावत असलेला दिसलाही असेल लोकांना. पण कोणीही त्याला अटकाव केला नाही.

<<पण खरचं राधीकेने आपल्या घरी हे सांगितलं असतं तर पुढील जीवघेणा प्रसंग टळला असता.>>>

याबद्दल थोडा साशंक आहे मी. फार फार काय झाले असते एकतर घरच्यांनी वर मंदारने म्हटल्याप्रमाणे तिलाच ब्लेम केले असते किंवा कदाचित तिला सपोर्ट करुन पोलीसात तक्रार केली असती. अशा केसेसमध्ये पोलीस फार फार तर रामसिंगला दरडावू शकतात किंवा न्यायालये कमाल ३ ते ६ महिन्यांची साधी कैद सुनावु शकतात. उत्तर प्रदेशातील पोलीसांचे एकंदर रेकॉर्ड पाहीले असता ते अजुनच कठीण दिसते.
रामसिंगचा एकंदर विकृत स्वभाव बघता यामुळे तो अजुनच भडकला असता व कदाचित चित्र यापेक्षा वाईट असले असते.

हे प्रकार 'नेव्हर एंडींग ' या सदरात मोडणारे आहेत. दुर्दैवाने आपला ९९% समाज अजुनही 'बघे' या प्रकारात मोडणारा आहे. तसेच आई-वडील आणि मुले यांच्यातली वाढत चाललेली दरी हे चित्र खुप भयानक आहे. माझे स्वतःचे असे मत आहे की केवळ कुटूंबियांवर अवलंबुन न राहता स्त्रीयांनी स्वतः शारिरीक दृष्ट्या अशा प्रकारांना तोंड द्यायला सक्षम बनणे हा सगळ्यात महत्वाचा आणि बेसिक उपाय आहे.

अशा विकृत लोकांना पकडणे, शिक्षा करणे हे सर्व उपाय तात्पुरते ठरतात. कारण जोपर्यंत स्त्रीया अशा विकृतीला समर्थपणे तोंड द्यायला सिद्ध होत नाहीत, सक्षम होत नाहीत तोपर्यंत याप्रकारच्या विकृती पुन्हा पुन्हा मान वर काढत राहणार. त्यात अशा गुन्ह्यासाठी आपल्याकडचे कायदे फारच तकलादु आहेत. गुन्हेगार सहजासहजी निसटून जातात. एखाद्याने असा गुन्हा केलाय हे लक्षात येताच त्या व्यक्तीला लगेचच कडक शिक्षा व्हायला हवी. जोपर्यंत कायद्याचा धाक निर्माण होत नाही आणि स्त्री स्वतः खर्‍या अर्थाने सबला होत नाही तोपर्यंत या आणि अशा घटना घडतच राहणार. नाईलाज आहे.............

विकृत मंडळी जागोजागी असणारच, पण मग मुले असले प्रकार घरी का सांगत नसावीत? काहीही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा विश्वास आपण आपल्या मुलांच्या मनात निर्माण करण्यात अपयशी ठरतोय का? <<<

मंदार,
माझं मत असं आहे, काहीही होऊ दे, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी असं जर मुलीला सांगितलं तर मुलगी अबला न राहता, सबला होऊन, समोर आलेलं संकट स्वतः हाताळायचं धैर्य आजच्या नारी मधे नक्कीच आहे. Of course, there are exceptions also, काहींना कोणाचेच सपोर्ट लागत नाही, अन्याय करणार्‍याला दे माय धरणी ठाय करुन सोडतात.

@ स्वाती२
ज्या काळात मुला-मुलींना मोकळीक नव्हती तेव्हाही छेड-छाड, एकतर्फी प्रेम वगैरे त्रास मुलींना व्हायचाच. 'तो कोपर्‍यावर उभा असेल तर..' या भीतीने लांबच्या रस्त्याने जाणार्‍या मुली मी बघितल्यात.>>> हो मान्य आहे. परंतु ते प्रमाण अत्यल्प होते आणि त्यांची मजल एकदम खुन करण्यापर्यंत गेल्याचे उदाहरण ही नगण्य सापडेल.

पाश्चात्यांना नावे ठेवणे नको. इथे जाणवलेली गोष्ट म्हणजे छेड काढणे हा प्रकार नसतो. डेट साठी स्पष्ट विचारतात. 'नाही' म्हटले की विषय संपतो. उगाच पाठलाग करणे, बघत उभे रहाणे वगैरे प्रकार नसतात.>> हा मुद्दा जर तुम्ही अनुभवलेला असल्यास माझ्याकडे याचे उत्तर नाही. कारण मी परदेशवारी केली नाही. परंतु त्यांचे तोडक्या कपड्यात राहणे, मद्यपान, धुम्रपान, कुठेही एकमेकास आलींगन, चाळे हे प्रकार चित्रपटात वारंवार दाखवितात त्यावरुन तसे लिहीले आहे. असो.

>>> विकृत मंडळी जागोजागी असणारच, पण मग मुले असले प्रकार घरी का सांगत नसावीत?

काही वर्षांपूर्वी बहुतेक सांगलीत किंवा सांगलीच्या आसपास घडलेली ही गोष्ट. एका डॉक्टरकी शिकणार्‍या मुलीच्या मागे एक पुढार्‍याचा मुलगा लागला होता. ती दाद देत नव्हती त्यामुळे त्याने एक दिवस तिच्या घरी जाऊन तिच्यावर पिस्तूल किंवा चाकू किंवा तत्सम शस्त्राने हल्ला केला. ते बघून शेजारची एक मध्यमवयीन महिला तिला वाचवायला मध्ये पडली व स्वत:च गंभीर जखमी झाली. कोर्टात काही काळ खटला चालला व आश्चर्य म्हणजे काही दिवसांनी त्या मुलीने त्याच मुलाशी लग्न करून खटला मागे घेतला. त्याच मुलाशी लग्न करायचे होते तर त्याने हल्ला करेपर्यंत वाट का बघितली? आणि तिला वाचविण्याचा प्रयत्नात गंभीर जखमी झालेल्या त्या मध्यमवयीन महिलेचे काय? या प्रकरणात फक्त हा मुलगाच विकृत आहे का आपला जीव घेण्याचा प्रयत्न करणार्‍याशी लग्न करणारी ही मुलगी सुध्दा विकृत आहे?

या प्रकरणात फक्त हा मुलगाच विकृत आहे का आपला जीव घेण्याचा प्रयत्न करणार्‍याशी लग्न करणारी ही मुलगी सुध्दा विकृत आहे?>>> बापरे! मास्तुरे, काय भयानक घटना आहे... पण मला नाही वाटत, ती मुलगी विकृत असेल... आपल्याकडे पुढार्‍यांना आणि त्यांच्या मुलांना नको तितकी पॉवर मिळत असते. त्या जोरावर काहीही करण्याची रग त्यांच्यात निर्माण होते. त्या मुलाने त्या मुलीला काय सांगितले असेल, सांगता येत नाही... तिला इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचाही प्रयत्न केला असू शकतोच. कुठल्या नाईलाजापुढे त्या मुलाशी तिने लग्नाचा निर्णय घेतला असेल, याची आपण कल्पनाच न केलेली बरी! Sad

त्या मुलाने त्या मुलीला काय सांगितले असेल, सांगता येत नाही... तिला इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचाही प्रयत्न केला असू शकतोच. कुठल्या नाईलाजापुढे त्या मुलाशी तिने लग्नाचा निर्णय घेतला असेल, याची आपण कल्पनाच न केलेली बरी>>> हेच म्हणायचे होते.

या प्रकरणात फक्त हा मुलगाच विकृत आहे का आपला जीव घेण्याचा प्रयत्न करणार्‍याशी लग्न करणारी ही मुलगी सुध्दा विकृत आहे?>>>पण तिथली न्याय व्यवस्था नक्कीच 'अत्यंत विकृत' आहे.

यावर आता काय लिहायचे तेच कळत नाही. रिंकु पाटील नंतर दुसरा प्रकार आमच्या शाळेत झाला. ९ वी. आमच्या बॅच्मेटला एका १० वी च्या मुलाले चाकुने मारले. गेली बिचारी. अक्षरशः ते बघुन हादरलो होतो आम्ही. तेंव्हा जास्त काही कळत नव्हते पण ११ वीला असताना एका मुलीला एका मुलाने चिठ्ठी दिली. त्या गल्लीतले १०-१२ लोकांनी त्या मुलाला वर्ग चालु असताना बडवले. तसेच बाहेर नेले. सगळ्या शाळेने तो प्रकार बघितला. परत २ वर्षेतरी असा काही प्रकार बघितला नाही. पालक खुपच सतर्क झाले होते (असं वाटतय) आता त्या मुलाला मारणे जरी कायद्याने गुन्हा वाटत असले तरी झाला तो प्रकार चांगलाच झाला असे तेंव्हा वाटत होते.

आता त्याच गावात येवढे स्थितंतर आलेय कि बोलायची सोय रहिली नाही.

मास्तुरे, ती घटना मला चांगली माहित आहे. तो मुलगा नगरसेवकाचा होता, ती मुलगी डॉ. होती. त्याने तिच्या घरी जाउन गोळ्या झाडल्या, शेजारीन वाचवायला आली गंभीर जखमी झाली. नंतर त्या मुलीने त्याच्याशी लग्न केले...

जरी बाहेर कुणी त्रास दिला आणि घरी सांगितले तरी २ शक्यता होतात. पहिल्यांदा त्या मुलाचे स्टेट्स बघितले जाते. कु णाचा आहे, जर दम देण्यात झेपणारा असेल तर दम दिला जातो, बर्यापैकी वजन्दार असेल, तर कुठल्या तरी पुढार्याला मध्ये घालुन समज दिली जाते, आणि जर पुढार्याचाच मुलगा असेल तर ... फार वाईट अवस्था होते. दाद मागायला जागाच रहात नाही. पोलिस सुध्हा काही मदत करु शकत नाहीत. Sad आणि समजा फारच गॉन केस असेल तर मुलीलाच दुर्लक्ष करायला सांगीतले जाते.

संवाद हरवला आहे,
समाज हरपला आहे
संस्कृती लोप पावली आहे.
दिशा हीन लोक वाट फुटेल तिकडे जात आहे. नेते भरकटले आहे.
स्वत:चे संरक्षण स्वतः करण्याचे दिवस आहेत.

मास्तुरे.. सांगलीत घडलेली केस पुर्ण वेगळी होती... त्या मुलीने तो निर्णय अत्यंत विचारपुर्वक घेतला होता... कधी भेट झाली तर सांगेन Happy
बाकी बर्‍याचशा प्रतिक्रीयांशी सहमत..:)

Pages