अहं ब्रह्मास्मि - एक विलक्षण कवी

Submitted by असो on 27 April, 2011 - 21:54

नेटवर साधारण चारेक वर्षांपूर्वी आलो तेव्हा काव्यांजली नावाच्या कम्युनिटीशी संबंध आला. यापूर्वी कविता आणि माझं काही सख्य नव्हतच. उलट कुणी कवी आहे म्हणून ओळख करून दिली कि पोटातच गोळा यायचा.

पण कुठलाच टाईमपास होत नसल्यानं मग मी ही कविता लिहायला लागलो. वाचू लागलो. माझ्यामुळं अनेकांच्या पोटात गोळा येऊ लागला.

एक दिवस अहं ब्रह्मास्मि या आयडीने माझं लक्ष वेधून घेतलं. सहजच त्यांची कविता वाचून पाहीली आणि अक्षरशः वेडा झालो.

ऊर्ध्व-गमन

एकांताच्या पाटीवरली...
मौन-अक्ष्ररे स्वचछ उमटली..
नित्य गिरवता..
मिळुनी गेली..
भलत्या,सलत्या,
मनास छळत्या,
प्रश्नांचि उत्तरे.
थांबुन गेला..
मन कोलाहल..
आत खोलवर,
आणी बोलकी,
शांतीच केवळ उरे.

जीवात्म्याची तहान सरली...
ईच्छा मग ना काही उरली..
सारा झगडा संपुन गेला..
आणी उघडली,
सहजा-सहजी,
स्वर्गलोकीचि दारे..
ह-हृदयामधुनी,
झरू लागले,
आनंदाचे झरे.
आत खोलवर,
आता बोलकी,
शांतीच केवळ उरे.

चैतन्याशी जडली मैत्री...
मोह न उरला आता गात्री..
जीव जाहला पुन्हा तवाना..
अन आत्म्याचे,
आदीम काळीज,
भारित झाले पुरे..
आत खोलवर,
फक्त बोलकी,
शांतीच व्यापुन उरे.

-- अहं ब्रह्मास्मि

पुढे कवितेची वेगवेगळी रूपं पहायला मिळाली. एका कवितेने मात्र ब्रह्माजींचा आणि कवितेचाही मी पुरता फॅन झालो. अल्पाक्षरी कविता होती ती. पण त्यात इतकं गहीरं तत्वज्ञान मांडलेलं होतं आणि मांडणी इतकी विलक्षण होती कि बस्स...

विचाराला चालना देणारी, गुढतेकडे झुकणारी.

कविता म्हटलं कि चेहरा आकस्रून घेणारा मी नंतर त्यांच्या कविता आवर्जून शोधून वाचू लागलो.

फिकीर 'उद्या'ची कशा करावी
'काल'च तो तर येऊन गेला
काल-परिघावर मागे जाता
बिंदू 'उद्या'चा 'काल'च झाला

आदि-अंत ना काल-वर्तुळा
बिंदुवर मी उभा 'आज'च्या
चालत रहाता पुढे-पुढे मी
पोहोचेन जागी आरंभाच्या

जिथे असे ते घर प्रेमाचे
घेईन म्हणतो तिथे विसावा
शीणच सारा हरून जाता
पुन्हा प्रवासा आरंभ व्हावा

विसरीन जर का परी कधी मी
प्रवासात घर मुक्कामाचे
आनंद सारा हरपुन जाईल
प्रवास होईल केवळ ओझे

परीघावरती फिरताना मग
कधी एकदा असे घडावे
घरीच रहावे कायमसाठी
भटक-चक्र हे थांबुन जावे

--अहं ब्रह्मास्मि

पुढे ही ओळख वाढत गेली. हळू हळू त्यांच्या स्वभावातील मिस्किलपणाही समोर येऊ लागला. कधीही कुणाबद्दल वाईट न बोलणारा हा मनुष्य नियतीने घेतलेल्या भीषण परिक्षेत नियतीला लाजवून गेला. त्या काळात त्यांच सखोल चिंतन चाललेलं असलं पाहीजे.

त्यांच्या कवितांमधून ते सहजपणे डोकावत असे. ते शीघ्रकवी होते. इतक्या गहि-या कविता ते अक्षरशः फोन वर बोलता बोलता पोस्ट करत असत. आश्चर्य व्यक्त करायच्या आत दुसरी, मग तिसरी.. त्यांचं चिंतन इतकं सखोल असलं पाहीजे.

खिडकीत नार, मेले विचार
पोलादी दार, लागला टाळा.

फुटकी सतार, करते शृंगार
लुचण्या हजार, कावळे गोळा.

निर्वस्त्र भार, गुह्यात वार
भोगुन ठार, गोठला डोळा.

हसणे उधार, अश्रु चुकार
जगणे नकार, खरकटा बोळा.

सरता बहार, निर्माल्या हार
कचर्यात पार, फक्त पाचोळा.

मृत्यु उदार, देतो आधार
माने आभार, संपला मेळा.

- अहं ब्रह्मास्मि

ज्या वेळी त्यांच्या डझनाने कविता आल्या त्या त्या वेळी नियतीशी त्यांची लढाई तीव्र झालेली होती हे मागाहून समजलं. कविता लिहून सोडून देणं हा त्यांचा गुण जरी अनेकांना भावला तरी तो उचलणं ब-याच जणांना अद्याप जमलेले नाही .. काही वेळा कविता बाऊंसर गेली कि लोक प्रतिसाद न देता वाचत. मग ती तशीच मागे जात असे. पण एकदाही त्यांनी कविता वर काढलीये असं स्मरणात नाही.

लोक अर्थासाठी जेव्हा त्यांना भंडावून सोडत, तेव्हा ते एकदा म्हणाले होते कविता अशी सोलून दाखवताना यातना होतात. अर्थात कधीकधी गंमत म्हणून अहिराणी बोलीत कविता करणे, कधीकधी मुक्तछंदात कविता लिहीणे या आवर्जून केलेले प्रकारातही दर्जाबाबत कधीच तडजोड झाली नाही.

विश्व जाहलं आंगनं

जीव मोकया मोकया
झालं आभाय ठेंगनं
खेळायले त्याह्यासाठी
विश्व जाहलं आंगनं

चेंडू झाये सुर्व्य सारे
आनी गि-हांचे भोवरे
खेयताना लपाछपी
किस्न्-विवरे रांजनं

हितं चांदन्यांच्या गोट्या
खेये चांद आट्यापाट्या
कोलता जराशी ईटी
राह्य जागी ओठंगुनं

धुमकेतुंची शेपटे
सूय-पारंब्या खेलाया
भोंडल्याले सारे हाती
गोल धयती रिंगनं

रचली लगोरी ज्याने
आनी फोडली कितिदा
त्यानंबीथं घ्यावं राज
त्याले इतकं मागनं

कुदवतो थकंस्तव
मंग घेई तो कुशीत
तयालेच असलं रं
बरं सोबतं वागनं

-- अहं ब्रह्मास्मि

सांजसंध्येच्या एका कवितेला कवितेतूनच रिप्लाय देताना त्यांचा मिस्कील स्वभाव उफाळून आलेला दिसतो.

kyaa baat hai.. yeh to....

आज मी प्रेमात आहे.
जग सारे झाले गुलाबी
आज मी प्रेमात आहे.
नच दिसे कोठे खराबी
आज मी प्रेमात आहे.

पेटी वाहणारी कचर्याची,
भासे मज कुंडी फुलांची.
रस्ता खड्डयात हरवलेला,
चंद्र मज हा भासताहे.
आज मी प्रेमात आहे.

थुंकणारी ही जी जनता,
वाटते मज पुज्य देवता.
उकिरड्यावरचे ते डुक्कर,
जणू गोंडस ससाच आहे.
आज मी प्रेमात आहे

धुर वहानांचा हा जो दाटे,
धुकेच मजला तेचि वाटे.
पोलिसमामा चौकामधला,
योग्यासमान दिसतो आहे.
आज मी प्रेमात आहे.

वहानाचा मज लागे धक्का,
साँरी'म्हणुनि हसलो बरका!
माझ्या सगळ्या शत्रुंनाही,
आज सलाम करतो आहे.
आज मी प्रेमात आहे.

- अहं ब्रह्मास्मि

त्यांचं एक वैशिष्ट्य आवर्जून सांगावंस वाटतं म्हणजे लोक कवितेचा वृत्तबंध पाळतात. पण ब्रह्माजींनी त्यांना आकृतीबंधही दिला.

शून्य या नावाची त्यांची कविता शून्य या आकारातच लिहीली होती. वळवळ नावाच्या कवितेत त्यांनी शब्दांच्या सहाय्याने झुरळाचा आकार काढला होता.. तर एकदा आकाशकंदील !
पण आशय आणि गेयता कुठेही ढळली नव्हती. माबोवर अशा कविता देणं जमणार नाही. त्या कवितांची ऑर्कूटवरील लिंक मात्र देता येईल.

स्वान्तसुखाय अशा कविता मुख्यत्वे लिहीणारा हा कवी कधी कधी ऑर्कूटवर इतरांसाठी भावानुवादाच्या धाग्याची सुरूवात करून देई. त्यांच्यामुळं कित्येकांना कविता लिहायला जमलं. खोल अर्थ कळला..
पण स्वतःसाठी मात्र त्यांनी सुफी कवितांचे अनुवाद केले. या कविता इतक्या वैयक्तिक होत्या कि घरीदेखील कुणालाच माहीत नव्हत्या. त्यांच्या मागे एकदा त्यांच्या आईने मला मुलाच्या कविता एकदा वाचायच्यात ही इच्छा माझ्याजवळ व्यक्त केली होती.

सजणी भेटे सजणाला
- अहं ब्रह्मास्मि

सजणी द्वारी आला तो.
आतुरही अति झाला तो.

बंद दारी थाप मारे.
'कोण आहे?' ती विचारे.

'मी आहे' तिजला म्हणाला.
अन तिथेचि घात झाला.

ती म्हणे 'घर हे अधुरे.
'मी' नी 'तू' साठी अपूरे.

दार होते बंद त्याला.
तो तिथोनी मग निघाला.

निबिडशा रानात गेला.
साधनेला प्राप्त झाला.

कैक वर्षे तप करोनी..
परतला योगी बनोनी.

तेच घर अन तेचि दार,
ठोठावले त्याने दुबार.

'कोण आहे?' प्रश्न आला.
ती आतुर त्या उत्तराला.

'तूच आहे' तो म्हणाला..
दार उघडे.. आत आला.

(सूफी गीतावर आधारीत)

टीप : तूच आहेस... या दोन शब्दात सर्व धर्मांचे सार आहे असं त्यांचं स्पष्टीकरण होतं. अहं ब्रह्मास्मि असा आयडी घेणारा हा कवी नास्तिकाचे अध्यात्म मान्य करीत होता. तेच तर आहोत आपण सर्व - अहं ब्रह्मास्मि ही ओळ त्यांच्या कधीही डिलीट न होणा-या प्रोफाईलला आहे.

अहं ब्रह्मास्मि
-------------

चराचरी सा~या..
बह्माचे आकार.
जाहले साकार..
ठायी ठायी.

पाखराची चोच..
झाडाची डहाळी.
दगड, शहाळी..
सारे तेच.

उधळले रंग..
वहाणारे वारे.
ग्रह आणी तारे..
सारे ब्रम्ह.

वस्तुमात्र सारे..
अणु रेणु ढग.
पेशीचे सुभग..
आकार ते.

ब्रह्मांडात जे जे..
तेचि या पिंडात.
ब्रह्माचिच बात..
तंतोतंत.

देव ना आकाशी..
नको वृथा भ्रम.
आहोत ते ब्रह्म..
आपणचि.

- अहं ब्रह्मास्मि

मृत्यूची त्यांना जाणीव झाली होती कि काय कळत नाही. कारण त्या दरम्यान त्यांच्या कवितांमधून मृत्यूविषयक चिंतन दिसून येत होतं.

मृत्यूपूर्वी अवधे काहीच दिवस त्यांनी लिहीलेली कविता

चिंता जराही नाही, कसलीच नाही खंत
घडते आनंदयात्रा, असता ईथे जिवंत

अस्तित्व फक्त येथे, आहे पुरे खुषीला
मिळतात मुक्त प्राण, मी एक भाग्यवंत

माझ्यापरी न कोणी, मी आगळा निराळा
माझ्याच ठायी वसते, संपूर्ण ते अनंत

भुते ही शक्तीशाली, दिमतीस येथ माझ्या
पृथ्वी ही भोगतो मी, श्वासा नसे उसंत

वर्षा ऋतु सुखाचा, शिशीरातही आनंदी
सौंदर्य हर ऋतुचे, ~हुदयी सदा वसंत

जगता असे भरुन, या चालत्या क्षणात
मृत्यु कधीही यावा, होईल तो सुखान्त

---------------- अहं ब्रम्हास्मि

वयाच्या अवघ्या पंचेचाळीशीत वाढदिवसाच्या दिवशी हा उमदा कवी चटका लावून गेला. जस्मिनचा रवी ही काव्यशृंखला मात्र पूर्ण झाली नाही. ती आता तशीच अर्धवट राहणार याची खंत आहे.

त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर..

उजेडानेच होतो, सावलीचा भास.
मधे असे अंत, पुढे मागे श्वास.

जीवनाला लागे, मरणाचा ध्यास.
मॄत्युनेच शांती, जगण्याने त्रास.

मेला तो सुटला, जगणार्‍या फास.
मेलं जर कोणी, आनंदाने हास !

घडीभराचा हा, फसवा प्रवास.
जन्मा येई जे जे, पावे ते ते नाश.

जगणं अपवाद, एक बाब खास.
मॄत्यू हा नियम, सारे करी ग्रास.

--अहं ब्रह्मास्मि

काव्यांजली तर्फे प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कवितांचा विशेषांक प्रसिद्ध झाला. त्याची ही लिंक..

http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=41419010&tid=559298946920398889...

एका आगळ्या वेगळ्या , प्रसिद्धी पासून दूर राहीलेल्या या विलक्षण कवीला भावपूर्ण श्रद्धांजली !!

गुलमोहर: 

पाखराची चोच..
झाडाची डहाळी.
दगड, शहाळी..
सारे तेच.

उधळले रंग..
वहाणारे वारे.
ग्रह आणी तारे..
सारे ब्रम्ह.>>

अप्रतिम!

सुंदर काव्य परिचय!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

अहं ब्रह्मास्मि यांना ब्रह्माजी याच नावाने सर्व जण हाक मारत असत. त्यांचं नाव श्री घनःशाम पोटभरे असं होतं हे खूप कमी जणांना माहीत आहे.

अतिशय सुंदर परिचयाबद्दल धन्यवाद.

लेख वाचताना आपणही काव्यांजलीवर जाऊन ब्रम्हाजींची नविन कविता वाचावी असे वाटायला लागले.. आणि तेवढ्यातच 'त्यांच्या मागे एकदा त्यांच्या आईने मला मुलाच्या कविता एकदा वाचायच्यात ही इच्छा माझ्याजवळ व्यक्त केली होती' हे वाक्य वाचले. खुप हळहळ वाटली.

त्यांचे सगळे काव्य एकत्र कुठे वाचता येईल? वरची लिंक मला घरी जाऊन पाहता येईल.

साधनाताई

ब्रह्माजींच्या कवितांचे एक ई-पुस्तक काव्यांजली तर्फे प्रकाशित करण्यात आलेले आहे. त्याची लिंक लेखात दिलेली आहेच. तिथे जाऊन पुस्तक मागवले कि त्यांच्याकडून ते विनाशुल्क वितरित केले जाते. आपल्याला फक्त ईमेल अ‍ॅड्रेस द्यावा लागेल..

ऑर्कूटवर अहं ब्रह्मास्मि, ब्रह्माजी, आय डी ब्रस्म या नावाने सर्च दिल्यास त्यांच्या कविता दिसतात. सर्वच दिसतात असही नाही. मराठी कविता, काव्यांजली आणि कवितांचे गाव या तीन समूहात तुम्हाला त्या सापडतील.

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=14281876218200259547
ही त्यांची प्रोफाईल..

ब्रह्माजींनी त्यांचं लिखाण क्धीच वर काढलेलं नाही पण त्यांच्यावरचा हा लेख मी वर काढतोय...

ही ओळख आहे एका प्रसिद्धीपासून दूर गेलेल्या कवीची. ज्याच्या आयुष्यावर एखादी विलक्षण कथा लिहीता आली असती आणि मला त्यावर शाबासकी मिळवता आली असती. पण असं करणं योग्य ठरलं नसतं. ज्या माणसाने आपण काय भोगलं याची कधीच वाच्यता केली नाही, नियतीच्या क्रूर खेळाबद्दल कधी तक्रार केली नाही ..उलट त्यातून तो खोल चिंतन करीत गेला त्याच्याशी ही प्रतारणा ठरली असती..

या लेखात सर्व भावभावना टाळून फक्त ओळख करून दिलेली आहे. या कविता आवडल्या तर ती दाद ब्रह्माजींना असेल. माझ्या लेखाला नाही... आणि म्हणूनच हा लेख वर काढताना अपराधीपणा वाटत नाही. खरं म्हणजे एव्हढ्याशा लेखात पूर्ण ओळख करून देता आलीये असही म्हणता येणार नाही.. पण निदान आता तरी ब्रह्माजी उर्फ घनःशाम पोटभरे यांच्या कविता सर्वांपर्यंत पोहोचाव्यात असं खूप वाटतंय.

- अनिल

सुंदर परीचय अनिल!!

सरता बहार, निर्माल्या हार
कचर्यात पार, फक्त पाचोळा.

मृत्यु उदार, देतो आधार
माने आभार, संपला मेळा.

व्वा व्वा!! गहन तत्वज्ञान!!

अहं ब्रह्मास्मि यांना सलाम!

अनिल धन्यवाद.

तुमच्या लेखाद्वारे त्यांच्या कवितांशी उत्तम परिचय करुन दिलात, पण लेख वाचताना ब्रम्हाजींच्या आयुष्याबद्दलही जाणुन घ्यावेसे वाटते.

पण असं करणं योग्य ठरलं नसतं. ज्या माणसाने आपण काय भोगलं याची कधीच वाच्यता केली नाही, नियतीच्या क्रूर खेळाबद्दल कधी तक्रार केली नाही ..उलट त्यातून तो खोल चिंतन करीत गेला त्याच्याशी ही प्रतारणा ठरली असती..

हेही बरोबर आहे. शिवाय एखाद्याच्या आयुष्याबद्दल कळले की त्याच्या साहित्यातही आपण त्याच्या त्या मर्यादित आयुष्याच्या खुणा शोधत बसतो आणि त्या प्रयत्नात कधीकधी त्या साहित्यातुन अमर्याद काही असे जे त्याला सांगायचे असते ते दिसत नाही. काहीच माहित नसताना कोरी पाटी ठेऊन त्यांचे साहित्य वाचायला मला आवडेल.

जगता असे भरुन, या चालत्या क्षणात
मृत्यु कधीही यावा, होईल तो सुखान्त

... अप्रतीम!!!

धन्यवाद अनिलजी. ब्रह्मास्मि यांच्या स्मॄतीस अभिवादन!!