इ.स. १०००० - भाग ९

Submitted by बेफ़िकीर on 11 April, 2011 - 03:03

अवकाशातील एका नगण्य ग्रहाच्या ठिपक्याकडे उदासवाणेपणाने बघत गोप बसून राहिलेला होता. आपण का जिवंत आहोत, कुठल्या माणसांमध्ये आहोत आणि इतके असहाय्य का आहोत या विचारांच्या पलीकडे गेला होता आता तो! झाड होणार होता तो आता! झाडाच्या भावना समजत नाहीत, पण ते जिवंत असते, तसा होणार होता गोप!

१६९९ गुर्मीत होती. अख्ख्या ६४२ या आकाशगंगेत असलेल्या सर्व मानवजातीचा राजा हा आता तिच्या हातातले बाहुले झालेला होता. १६२२ या तिच्या साहेबासकट आणि सर्व एजंटांसकट संपूर्ण मानवजात तिच्या नाटकाला फसलेले होते. गोप हा अप्रगत मानव तिच्या ताब्यात आलेला होता आणि त्याचवेळेस तो अवघ्या ६४२ मधील मानवजमातीतील सुपिरियर मानवही ठरलेला होता.

राजांची राणी! १६९९!

गोपच्या त्या भावविरहीत चेहर्‍याकडे पाहताना होत असलेल्या आनंदामुळे ती अनेकदा आपले ओठ विलग ठेवून हासतच होती.

या प्रकारात एक गोची होती. गोपचा आता जर पुन्हा कुणाशी संपर्क झाला तर तो सत्य परिस्थिती सांगून टाकेल हे तिला जाणवलेले होते. त्यामुळे आता पृथ्वीवर जायचेच नाही असे तिने ठरवलेले होते. या स्पेस प्लॅटफॉर्मवर उरलेले सर्व आयुष्य काढणे म्हणजे आत्ताच्या पुणेकरांनी निवृत्तीनंतर पाचगणीला जाण्यासारखे, म्हणजे 'जाऊ शकण्यासारखे' किंवा आयुष्यभर अमेरिकेत राबल्यानंतर आराम करण्यासाठी कायमचे कॅनडाला जाण्यासारखे होते.

१६९९ मुळातच ऐंशी वर्षांची होती. आयुष्यभर अत्यंत अक्कलहुषारीने तिने तिच्या जन्माच्या वेळेस मिळालेल्या दहा लाख पॉईंट्सपैकी जवळपास साडे आठ लाख पॉईंट्स शाबूत ठेवलेले होते. इतका दीर्घ कालावधी इतके जबरदस्त पॉईंट्स मेन्टेन करणे हा एक प्रकारचा विक्रमच म्हणायला पाहिजे! त्यासाठी तिने कोणत्याही कारणासाठी तिचे पॉईंट्स जाताच काही ना काही युक्त्याप्रयुक्त्या करून ते पुन्हा मिळवलेले होते. तब्बल ऐशी वर्षे असे करत राहणे हा विनोद नव्हता. तिला कल्पना होती की सर्व तांत्रिक प्रगतीचा शक्य तो संपूर्ण फायदा घेऊन तिने ऐंशी वर्षे आपले सौंदर्य आणि प्रकृती मेन्टेन केलेली होती मात्र हे आता अधिक टिकणे शक्य नव्हते. बहुधा वर्ष दिड वर्षातच ती आहे त्याहूनही म्हातारी दिसायला लागणार होती. जवळपास पंचाण्णव वर्षांची वगैरे! हा 'दिड वर्षे' हा तिचा अंदाज होता. तिला ते नक्की माहीत नव्हते. कदाचित ते अजून पाच वर्षे लांबलेही असते किंवा कदाचित पुढच्याच महिन्यात तिच्या शरीराने सर्व 'तारुण्य व सुदृढता' लांबवणार्‍या औषधांना नाकारायला सुरुवात केली असती.

हा अंत अर्थातच भयानक असणार होता. असह्य असणार होता. असा अंत होतानाही मनस्थिती शाबूत राहावी यासाठी त्या समाजात काही औषधे होती. अशा लोकांना समाज आधार देत असे. त्यांचे उरलेले आयुष्य व्यवस्थित जावे यासाठी यंत्रणा कार्यरत असायच्या व भ्रष्टाचाराला त्यात स्थानच नसायचे.

त्या समाजातील मानवाने आपली आयुर्मर्यादा वाढवून एकशे वीसपर्यंत नेलेली होती. अ‍ॅव्हरेज आयुष्यच नव्वद वर्षांचे झाले होते. पंचाहत्तराव्या वर्षी एखादा गेला तर 'लवकर गेला' असे म्हणत!

१६९९ कडे मात्र अभूतपूर्व अशी शक्ती राहणार होती तिच्या म्हातारपणी! अवघ्या ६४२ वासियांसाठी १६९९ महान व्यक्ती ठरणार होती कारण ४६३४४ ने तिला आपले मानलेले होते.

१६९९ गोपला आणि सर्वच मानवांना फसवत आहे हे जर कुणाला समजले असते तर १६९९ चा भयानक अंत करण्यात आला असता. कारण फसवणुकीला जबरदस्त शिक्षा होती त्या समाजात!

याच कारणासाठी गोपवरचा आपला ताबा कधीही जाऊ नये व भांडेही फुटी नये म्हणून १६९९ ला याच स्पेस प्लॅटफॉर्मवर राहणे अत्यावश्यक होते.

८००० वर्षे जगलेल्या मानवाकडून प्राचीन काळातील अनेक रहस्ये उलगडणारी माहिती मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार्‍या १६२२ व त्याच्या टीमला शेवटी अपयश आलेले होते. कारण गोप हा ८०-११ चा अंश असल्याचे १६९९ ने सर्वत्र सांगितले होते व आता ती केवळ त्याच्याचबरोबर आणि एकांतात काळ व्यतीत करणार होती. परिणामतः १६२२ आणि त्याच्या टीमच्या हातात तसेच अवघ्या ६४२ वासियांच्या हातात आता काहीही राहिलेले नव्हते. केवळ गोपची पृथ्वीवर परत यायची इच्छा होणे यावरच सारे अवलंबून होते. मात्र त्यांना हे माहीत नव्हते की वास्तविक गोप पृथ्वीवरच काय, त्या स्पेस प्लॅटफॉर्मवरही एक पाऊलही स्वतःच्या इच्छेने टाकू शकत नाही आहे. बोलविता धनी १६९९ आहे.

१६९९ ने गोप ८०-११ चा अंश आहे हे दाखवून आणखीन बरेच पॉईंट्स जमा केलेले होते. आता तिच्याइतके पॉईंट्स एखाद्या संताकडेच असू शकतील इतके पॉईंट्स होते.

तिने पृथ्वीशी सर्व संपर्क जवळपास बंद केलेला होता. स्पेस प्लॅटफॉर्मवर पुढचे एक वर्ष सहज घालवता येईल एवढ्या भुकेच्या गोळ्या होत्या. पाण्याचा व प्राणवायूचा साठा होता. एका वर्षात १६९९ इकडची दुनिया तिकडे करून टाकणार होती. तिने आता गोपच्या अंगावरील सर्व चीप्स ताब्यात घेतलेल्या होत्या. गोपच्या मनातील सर्व विचार तिला आता जाणवत होते. गोपच्या मनात तिच्याबद्दल आलेला एखादा रागीट विचार जाणवला की ती भेसूर चेहरा करून गोपकडे पाहात होती. तिचा तो अचानक बदलून एखाद्या जख्खड म्हातारीसारखा आणि अती संतप्त चेहरा पाहून गोप घाबरत होता.

एखादे स्पेस शटल यावे आणि आपल्याला पृथ्वीवर जाता यावे असा विचार तर त्याच्या मनात कित्येकवेळा आला. १६२२ ला आपण उगाचच घालवून दिले हा विचार करून गोप मनातच आक्रंदत होता.

त्याला प्रत्यक्ष त्रास काहीही होत नसला तरीही इथे तो एक प्रकारे बंदिवासात होताच. त्यात पुन्हा आत्तापर्यंत असलेले अधिकाराचे व श्रेष्ठत्वाचे स्थान जाऊन आता एक अत्यंत तिय्यम स्थान त्याला प्राप्त झाले होते. त्यामुळे नाऊ ही वॉज नथिंग!

या प्रकारातून आपली सुटका कशी होणार याबाबत त्याच्या मनात येत असलेले सर्व विचार १६९९ ला कळत असल्याने व मनातील विचार थांबवणे शक्यच नसल्याने त्याने आत अखंड बडबडच सुरू केली. आपण बोलतो तेव्हा काय बोलायचे यावर विचार करावा लागत असल्याने गोपच्या मनात असलेले सुटकेचे विचार तो जे बोलत आहे त्या विचारांमध्ये मिसळून रेकॉर्ड व्हायला लागले तशी मात्र १६९९ भडकली.

१६९९ - ए .. बोलू नकोस...

गोप - का?

१६९९ - बोललास तर वाईट होईल..

गोप - काय वाईट होईल??

१६९९ - बोलणे बंद कर आधी..

आपल्या नुसत्या बोलण्यामुळेच तिला काहीतरी प्रॉब्लेम होत आहे हे गोपच्या लक्षात आले. त्याने आता बडबड वाढवली.

गोप - तर मला १६९९ या स्त्रीने सांगितले की गोप तू बोलणे बंद कर. म्हणून मी बोलणे बंद करेन असे तिला का वाटले ते मात्र तिने सांगितले नाही. नुसतीच धमकी दिल्यामुळे मला नुसतीच भीती वाटली. पण आता ती भीती वाटली काय अन नाही काय, नळाला पाणीच नाही तर रांग हवीच कशाला? पण हे समजत असूनही कावळा ओरडतोच. आता त्याला काय कचकड्याचे चेंडू द्यायचे खेळायला? भागवत सप्ताह करायचा राहिलेलाच आहे अजून! मंडईपाशी पोचणे म्हणजे नुसता व्याप! बढती मिळाली तर स्कूटर घेणार म्हणतोय! पण मिरच्या काय कुंड्यांमध्ये लावतात? मला तर हल्ली वाटायला लागलंय की भरदुपा...

१६९९ - बाSSSSSSस.... बाSSSSSस कर... बंद कर बोलणं!

तिने कानांवर हात दाबले. गोप ऑनच राहिला.

गोप - तर भरदुपारी, आता दुपारीलाच भर असं का म्हणतात? भरसकाळी का नाही? भर संध्याकाळी का नाही? सकाळ मात्र भली! म्हणे भल्या सकाळी!

खण्ण! १६९९ ने संतापून काहीतरी लोखंडी ऑब्जेक्ट गोपच्या अंगावर फेकला तो गोपने चुकवल्यामुळे मागे कशावरती आदळला. त्याचा आवाज होतोय तोवरच तो स्पेस प्लॅटफॉर्मच्या बाहेर फेकला गेला. १६९९ ने चिडून अत्यंत ताकदीने फेकलेला असल्यामुळे तो ऑब्जेक्ट चुकून स्पेस प्लॅटफॉर्मच्या कक्षेबाहेरच गेला. आणि तिथून तो अनंताच्या प्रवासाला लागला. ते भयाण दृष्य गोप खिळून पाहात होता. कोणत्यातरी ग्रहाने खेचेपर्यंत, कोणत्यातरी कृष्णविवरात कधीतरी अदृष्य होईपर्यंत किंवा एखाद्या धूमकेतूमुळे त्याची शकले होईपर्यंत तो ऑब्जेक्ट आता युगानुयुगे तसाच अवकाशात फिरत राहणार होता.

स्पेस प्लॅटफॉर्मची गुरुत्वकक्षा इतकी लहानशी असल्याची गोपला कल्पनाच नव्हती. त्याने ते दृष्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तरी त्याचा विश्वास बसत नव्हता. म्हणजे आपण काही कारणाने जर शंभर एक फुट लांब गेलो तर आपणही गुदमरून एक मिनिटभरात मरू आणि आपले प्रेत त्या ऑब्जेक्टसारखेच विश्वाच्या अंतापर्यंत फिरत राहील.

अत्यंत भयाण कल्पना होती ती! गोप त्या दिशेला अजूनही थिजून पाहात होता. त्याच्या मनातील विचारांमुळे १६९९ च्या पोटावरील चीप जोरात वाजत होती. त्यामुळे १६९९ खुष व्हायच्या ऐवजी हादरलेली होती. कारण आता तिची जबाबदारी हजारपटींनी वाढलेली होती. गोपला प्लॅटफॉर्मपासून लांब जाणे अशक्य आहे हे तिला माहीत होते. कारण आधाराला काहीच नव्हते. एखादे स्पेस शटल आल्याशिवाय या प्लॅटफॉर्मच्या कक्षेबाहेर जाणार कसे? एखाद्याने बाहेर उडी मारली तरीही तो प्लॅटफॉर्मकडेच खेचला जाईल हे तिला माहीत होते. पण एक मात्र होते. एखादी फळी किंवा शिडीसारखी गोष्ट जर प्लॅटफॉर्मवर मिळाली तर तिच्या सहाय्याने हा मानव बाहेर जाऊ शकेल हे तिला माहीत होते. तिच्या माहितीप्रमाणे अशी कोणतीही गोष्ट प्लॅटफॉर्मवर नसली तरीही आता गोपकडे लक्ष देणे अत्यावश्यक होणार होते.

खाडकन मान वळवून गोपने १६९९ कडे पाहिले. ती भेसूर हासत होती.

१६९९ - असाच जाशील तरंगत तूही!

१६९९ ने त्या गोष्टीचे दहशत बसवण्यासाथी भांडवल करायचा प्रयत्न केला. पण मनात ती जाणून होती. एकदा का ४६३४४ अवकाशात फेकला गेला की आपण संपलो. आपले काही अवकाशात जाऊन त्याला पुन्हा आणण्याचे, म्हणजे त्याचे प्रेत पुन्हा घेऊन येण्याचे सामर्थ्य नाही. त्यासाठी आपले साहेब, म्हणजे १६२२ च पाहिजेत. हे जाणून असल्यामुळे तिने उलटी गेम टाकून गोपला अवकाशात फेकण्याची भीतीच बसेल असा प्रयत्न सुरू केला.

१६९९ - आणि एकदा अवकाशात गेलास की संपलास तू!

गोप ८०४० वर्षे जगलेला होता. त्यातील चाळीस वर्षे तो शुद्धीत होता. ८००० वर्षे तो बेशुद्ध होता. त्याला मृत्यूची भीती अजूनही होतीच, पण आत्ताची परिस्थिती अशी होती की येथे तिच्या ताब्यात गुलामासारखे राहून एक खेळणे होण्यापेक्षा मृत्यूच आला तर? एक दोन मिनिटांच्या असह्य वेदना! इतकेच! नंतर एक अथांग शांतता! जी कशी असते ते कोणत्याही हयात मानवानेच काय तर हयात सजीवानेही अनुभवलेले नाही.

१६९९ आपल्या बोलण्याला का घाबरतीय हे त्याच्या लक्षात येत नव्हते. तसेच आत्ताही त्याला असे जाणवत होते की तिचे ते भीती दाखवणे काहीसे भाकड वाटत आहे. त्यात कशाचीतरी झाक आहे. नेमकेपणाने तिला आपल्याला भीतीच दाखवायचीय असे वाटत नाही आहे. मधेच ती आपल्याकडेच घाबरून पाहिल्यासारखी बघतीय!

दोन सकारात्मक बाबी हाती आल्या गोपच्या!

एक म्हणजे ती त्याच्या बडबडीला काही ना काही कारणाने वैतागली किंवा घाबरली आहे आणि आत्ता तो ऑब्जेक्ट गेला तसे आपणही गेलो तर ही आपल्याला जी भीती वाटतीय तिने ती पूर्णपणे सुखावलेली नाही आहे. तिला स्वतःलाच त्यात काहीतरी भीती वाटतीय!

गोपला हेही लक्षात आले की आत्ता आपल्या मनातले विचार तिला नीटसे समजत नाही आहेत. कारण माणूस खरे बोलतोय की खोटे हे प्रामुख्याने लक्षात आणून देणार्‍या चीपला सातत्याने मानवाच्या मनातील विचार प्रदर्शित करत राहणे अशक्य होते. ढोब़ळ मानाने विचार समजू शकत असावेत. गोपला ते जाणवले कारण १६९९ सतत पोटाजवळची चीप हातात घेऊन ती पाहात गोपकडेही पाहात होती. त्या चीपचा बहुधा गोंधळ झाला असावा.

गोपची ट्यूब पेटली.

सत्तत बडबड करणे हा चीपला निकामी करण्याचा उपाय आहे हे त्याला जाणवले. मात्र हा उपाय आपण राखीव उपाय म्हणून ठेवावा असेही त्याला वाटले. त्याने आता बडबड न करण्याचा डिसीजन घेतला. मधूनच एखादे असंबद्ध वाक्य टाकले तरी चीपचा बोर्‍या वाजू शकेल ही कल्पना त्याला सुचली.

गोप - तो ऑब्जेक्ट अगदी गरूड पक्ष्यासारखा झेपावला नाही? जणू दोन ब्राह्मणांनी अंतरपाटच धरला आहे मधे!

चीप कडकडली. १६९९ ने ती तीनवेळा तपासली. वाक्यातील 'ऑब्जेक्ट झेपावला' हे शब्द सुसंबद्ध वाटले. इतर सर्व शब्द, जसे गरुड, ब्राह्मण, अंतरपाट वगैरे, गोंधळ निर्माण करणारे ठरले.

१६९९ ला तो चीपचाच प्रॉब्लेम आहे की काय असेही वाटले.

ती चीप रिप्लेस करायची म्हणजे पृथ्वीवासियांशी संबंध येणार! १६९९ ने वाट पाहायची ठरवले. आणि गोपने दर मिनिटभराने एखादे असंबद्ध विधान त्या क्षणीच्या परिस्थितीशी सुसंबद्ध वाटेल अश्या पद्धतीने करायचे ठरवले. मात्र दोन तीन मिनिटांतच १६९९ला घोळ लक्षात येऊ लागला. मात्र त्याबाबत गोपला धमकावण्याशिवाय वा इजा पोहोचवण्याशिवाय तिच्याकडे काहीच उपाय नव्हता. आणि इजा पोहोचवणे अशक्य होते कारण त्याला नीट ठेवणे व फक्त आपल्याच बरोबर ठेवणे यावर तिचा सगळा प्लॅन विसंबून होता. पुन्हा चुकून एखादे शटल अचानक आले तर १६९९ गोपला आत नेऊन स्थानबद्ध करणार होती आणि शटलचालकाला सांगणार होती की ४६३४४ निद्रिस्त आहे. त्याला जर समजले की १६९९ ने ४६३४४ ला इजा पोहोचवलेली आहे तर १६९९ चे काहीच खरे नव्हते.

४६३४४ मुद्दाम घोळयुक्त बोलत आहे हे लक्षात आल्यावर १६९९ भयंकर भडकली.

१६९९ - आत चल..

गोप - आत काय अन बाहेर काय! हायवे तो हायवेच!

१६९९ - कसला हायवे?

गोप - ६४१ ते ६४३ जाणारा?

१६९९ - असला हायवे नसतो.. तू काय करतोयस ते मला समजलेले आहे..

गोप - चिमणी चिव चिव करून थुईथुई नाचून निघून गेली तरी फूटबॉल खेळणे चालूच आहे..

१६९९ - या वाक्याला काहीही अर्थ नव्हता.. गप्प बस.. नाहीतर...

गोप - नाहीतर काय??

१६९९ ने आत जाऊन एक वायर बाहेर आणली. आणि गोपला काही कळायच्या आतच ती लांबूनच त्याच्या पोटावर टेकवली.

असह्य वेदनांनी भयंकर किंकाळी फोडून गोप उडून बाजूला पडला. कितीतरी सेकंद १६९९ आपले दोन्ही ओठ हातांनी विलग करून मान वर करून हासतच राहिली.

शॉक! एक जबरदस्त शॉक बसला होता गोपला!

ही बाई इतकी क्रूर असेल असे त्याला मुळीच वाटलेले नव्हते. त्याला वाटत होते की स्वार्थासाठी फक्त आपल्याला या प्लॅटफॉर्मवर जखडून ठेवेल. पण ती तर असलेही प्रकार करत होती.

झिणझिण्या आलेल्या पोटाच्या भागावर हात दाबून गोप हादरून १६९९ कडे पाहात होता.

१६९९ अजूनही हासतच होती.

१६९९ - समजले आता? आता जे मी सांगेन तेच करायचे...

गोप - म्हणजे तू चांगली नाहीस तर स्वभावाने...

१६९९ ने पुन्हा ओठ विलग केले आणि आत निघून गेली. एकटा गोप प्लॅटफॉर्मच्या कक्षेबाहेर जाऊ शकणार नाही हे तिला माहीत होते.

खिन्न गोप बसून राहिला.

जीवन! जिवंतपणा! चैतन्य!

अवकाशातील एका नगण्य बिंदूवर आता चैतन्याचे दोन ठिपके होते. त्यातील एक ठिपका दुसर्‍याचा गुलाम होता. गुलाम ठिपका निराश झालेला होता. त्याला स्वतःचे चैतन्य आता नकोसे झालेले होते. लांबवर बरीच फिरून दुसर्‍या दिशेला पोचलेली पृथ्वी दिसत होती. अजूनही तिच्या काही भागावर सूर्यप्रकाश असावा. थोड्याच वेळात ती दिसेनाशी होणार होती. नंतर या प्लॅटफॉर्मचा दिवस जितक्या तासांचा असेल तितक्या तासांनीच ती पुन्हा दिसू शकणार होती. कदाचित पृथ्वीच्या अडीच दिवसांइतकाही दिवस असेल या प्लॅटफॉर्मचा! सूर्य? एखादवेळेस सूर्य दिसेल की काय कुणास ठाऊक असेही गोपला वाटत होते.

तहान लागली होती त्याला! पोटावरच्या झिणझिण्या तशाच होत्या अजूनही!

गोप उहून आत आला. येतानाच त्याने विचार केला. १६९९ ला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवायचा. मात्र तितक्यातच त्याला तेही जाणवले. आत कुठेतरी चीप वाजली होती. याचा अर्थ १६९९ ला गोपच्या मनातील तो विचार रफ स्वरुपात समजलेला असणे शक्य होते.

गोपने ठरवले. एक भन्नाट नाटक करायचे. तिच्या ताब्यात असल्याचे नाटक! हा विचार करताना मात्र तो रामरक्षा म्हणत होता. त्यामुले चीपवर संदिग्ध मेसेजेस आलेले असणार होते. १६९९ ला काहीच समजलेले असणार नव्हते.

न दृष्टं अपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि:

जे डोळ्यांना दिसत नाही ते ही रामानेच रक्षिलेले असते. तेथेही तुमचे रक्षण रामच करतो.

गोप आत आला आणि समोरचे दृष्य पाहून त्याला बावचळल्यासारखे झाले.

एका जवळपास दहा फूट उंची असलेल्या आणि रंगाने लालबुंद असलेल्या एका अत्यंत देखण्या व तेजस्वी पुरुषाच्या आलिंगनात १६९९ डोलत होती. त्या पुरुषाच्या तेजस्वी लाल रंगाचा प्रकाश सर्वत्र पसरलेला होता. १६९९ च्या चेहर्‍यावर आनंदाचे सर्वोच्च शिखर गाठल्याचे भाव होते. त्या पुरुषाने आपल्या एकाच हाताने तिला उचलून आपल्या आलिंगनात घेतले होते तर दुसर्‍या हाताने तो तिच्या केसांमधून हात फिरवत होता.

अचानक दोघांचे लक्ष गोपकडे गेले.

१६९९ त्या पुरुषाच्या आलिंगनात डोलतच गोपकडे बघून हासत त्या पुरुषाला म्हणाली..

१६९९ - स्लेव्ह... हा स्लेव्ह आहे १७८९!

त्या पुरुषाचे नाव १७८९ असावे हे गोपला जाणवले. त्या पुरुषाचे निळे डोळे अत्यंत भेदक होते. ते रोखले गेल्यानंतर गोपला शरीर वितळते की काय असे वाटले. त्या पुरुषाचा आवाजही युद्धात शंख फुंकताना होतो तसा नादमय आणि थिजवणारा होता.

१७८९ - बाहेर बस...

गोप - तुम्ही कोण??

१६९९ - हा ६४१ चा प्रतिनिधी आहे... मी याच्याबरोबर तिकडे जाणार आहे.. तिथे याचे राज्य आहे... याला मी व मला हा आवडतो.. मी तिथे राणी होईन.. ६४२ चे सर्व मानव त्यावेळी माझे गुलाम झालेले असतील... तुझ्याच माध्यमातून... कारण तू सर्वश्रेष्ठ मानव आहेस हे त्यांना वाटत आहे व तू माझा गुलाम झालेला आहेस हे त्यांना माहीत नाही आहे. त्यामुळे मी तुझ्या माध्यमातून सर्वांना माझे गुलाम करणार! मी परराज्याशी हातमिळवणी केली हे कुणालाही समजू नये म्हणून मी गुप्तता राखत आहे. तुझ्यामार्फत मी पृथ्वीवर विविध संदेश प्रसारित करत राहणार आहे. आता बाहेर जा... आम्हाला एकांत हवा आहे...

गोप - मला तहान लागली आहे...

१६९९ - आत्ता काहीही मिळणार नाही...

गोप - १६९९, प्लीज मला पाणी तरी द्या...

१६९९ - मुळीच नाही.. गुलामांनी तोंड चालवायचे नसते.. अन्यथा... अंत होईल तुझा...

गोप - पाणी...

१६९९ - गो अवे... आम्हाला डिस्टर्ब करू नकोस.... नाहीतर क्षणार्धात मरशील...

गोप घाबरून बाहेर आला. १६९९ चा आवाजच तसा भेदक होता. थरकाप उडेल असा! आणि त्यात तो महामानव! दुसर्‍याच आकाशगंगेवरून येथे पोचलेला होत. थक्क करणारी प्रगती! ६४२ वासियांपेक्षा कितीतरी देखणी जमात! कितीतरी उंच, धिप्पाड आणि तेजस्वी! त्याला राग आला असता तर तर आपण समाप्तच झालो असतो हे गोपला जाणवले.

पृथ्वी आता लवकरच दिसेनाशी होणार होती. लांबून का होईना, पण निदान ती दिसत तरी होती इतका वेळ! आता ती पुन्हा किती तासांनी दिसेल याबद्दल काहीच माहीत नव्हते. त्यामुळे विषण्णपणे गोपने पृथ्वीचा शेवटचा बिंदू दिसेनासा होईपर्यंत तिच्याकडे टक लावून पाहत बसण्याचा निर्णय घेतला.

मनात त्याने प्रार्थना केली. हात जोडून!

'धरणीमाते, तुझ्यावर पय टेकून उभा राहायचो तेव्हा मला तो माझा अधिकार वाटायचा... पायाखालून वाळू सरकली असल्या म्हणी निर्माण करायचो आम्ही त्यावेळेस... आज तुझा पूत्र आकाशगंगेच्याही पलीकडे पोचणार आहे.. मी तुझी कधीच प्रार्थना केली नाही.. आज हात जोडून प्रार्थना करतो माते... मला तुझ्याजवळ घे.. तुझ्याकडे घेऊन जा... मेलो तरी चालेल पण माझे मृत शरीर तुझ्याच कुशीत मिसळूदेत.. लवकर घेऊन जा मला!'

वारंवार हीच प्रार्थना करत असतानाच एकेका बिंदूने पृथ्वी दिसेनाशी होत होती. शेवटचा बिंदू राहिला तेव्हा गोपने प्रार्थनेची तीव्रता प्रचंड वाढवली. हात जोडून आणि पापणीही न लववता तो एकटक रोखून त्या बिंदूकडे पाहात असतानाच...

.... आपण काही खरच पाहिले की नाही यावर त्याचा विश्वास बसेना..

पृथ्वीच्या त्या शेवटच्या, दिसेनाश्या होणार्‍या बिंदूपासून .... एक.... एक आणखीनच अत्यंत नगण्य ठिपका स्वतंत्र झालेला होता.... आणि... तुफान वेगाने तो जवळ जवळ येत आहे असा गोपला भास होत होता...

पृथ्वी जेव्हा पूर्णपणे दिसेनाशी झाली.... तेव्हाच आतून जबरदस्त भीतीने ठोकलेल्या बायकी किंकाळीचा आवाज आला... क्षणार्धातच १७८९ हा तेजस्वी पुरुष सूक्ष्म रुपातून प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडला... आणि किंकाळ्या फोडत बहेर आलेली १६९९ पृथ्वीवरून निघालेल्या त्या अती वेगवान ठिपक्याकडे भयातिरेकाने बघत होती....

१६९९ - हे... हे ... हे काय आहे??? हे काय बोलवलंस तू?? कसं काय बोलवलंस???

गोप - ते मी बोलावलेलं नाही... ते आपोआप येतंय...

१६९९ धावत आत गेली. बाहेर आली तेव्हा तिच्या हातात एक गोळी होती.

१६९९ - ही खा...

गोप का?

१६९९ - प्रश्न विचारलेस तर हाल हाल होतील... या गोळीने झोप येते.. तू विश्रांती घेत आहेस असे मी सांगणार आहे..

गोपने गोळी हातात घेतली.

१६९९ - खा पटकन..

आता काय करायचे हे गोपला समजेना! गोळी खाल्ली तर पृथ्वीमातेने प्रार्थना ऐकून पाठवलेली मदत न भेटताच परत जाण्याची शक्यता होती.

गोप - बापरे... आंणखीन एक याSSSSSन...

गोपने अवकाशात पाहात दचकून हे वाक्य उद्गारले आणि १६९९ ची मान वळताच ती गोळी स्पेस प्लॅटफॉर्मच्या कक्षेबाहेर फेकून दिली. मात्र १६९९ ने याच्याकडे पाहताच याने तोंडात गोळि टाकल्याचा अणि अचानक गुंगी आल्याचा अभिनय सुरू केला. हे तिच्या चीपवर तिला समजू नये म्हणून रामरक्षा म्हणायला लागला. संस्कृतमुळे तर आणखीनच भन्नाट गोंधळ झाला चीपवर! १६९९ ला आधी निघालेले यन बघावे, निद्रिस्त गोपकडे बघावे, स्वतःच्या चीपकडे बघावे की गोप म्हणतोय तसे खरच दुसरे यान निघाले आहे की नाही ते तपासावे हेच समजेना!

तिने गोपला ओढत आत न्यायची सुरुवात केली.

वास्तविकपणे... पृथ्वीवरून जी मदत निघाली होती ती वेगळीच होती...

६४१ कडून काहीही ६४२ च्या कक्षेत आले तर एक प्रकारचे संदेश सर्वत्र पोहोचायचे... ते पोचले की ६४१ चा अंश जिथे कुठे आलेला असेल तिथे पृथ्वीवरून मेगासॉनिक वेगाने याने निघायची..

मगाशी सूक्ष्मरुपात पळून गेलेल्या ६४१ च्या तेजस्वी राजकुमाराला पकडायला ते यान निघालेले होते...

.... आणि त्याचवेळी १६९९ च्या हृदयाशी असलेली मास्टरचीप, जी जिवंत असताना कधीही कुणालाही बंद करता येत नाही व ज्या चीपवर फोर्स्ड मेसेजेस पाठवण्याचा अधिकार एजंट आणि नॉमिनीजना असतो... ती चीप अचानक वाजू लागली...

नखशिखांत हादरलेल्या १६९९ ती चीप काढून पाहिली...

१६२२ या तिच्या साहेबाचा संदेश होता...

"भयानक अंत नको असेल तर प्लॅटफॉर्मच्या कक्षेबाहेर स्वतःहून निघून जा आणि मर... आम्ही पोचायच्या आत...."

गुलमोहर: 

बेफीकीर,

ठीक वाटला हा भाग !

(अवांतर : स्काय-फाय ( सायन्स फिक्षनचा ) चा फील जातोय ... असे वाटले जरासे !!)

हा ही भाग आवडला!!

गोप बाहेर असताना आत १६९९ चे ६४१ च्या महामानवाबरोबरचे आलिंगनबद्ध होणे वाचून आता मेलोड्रामॅटीक होतंय की काय शंका मनात डोकावली परंतु काही क्षणातच ती दूर झाली.

सहि झालाय.......
भुषणराव मला अस वातल होत आज कमित कमि ३ तरि भाग वाचायला भेटतिल, असो....
१६९९ हि शेवटि व्हिलन निघालि, आता पाहु पुढे काय काय होतय ते....

प्लिज लवकर पुढचा भाग पोस्ट करा.

काय राव नुसते आभार मानु नका........???
पुढचा भाग कधी लिहिणार ते सांगा..................?
राग राग राग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग होतोय नुसता इतका वेळ वाट बघुन.......
विसरलात कि काय पुढे काय लिहायचं आहे ते???????
ही ही हीस्मित स्मित स्मित

नमस्कार पर व तृष्णा,

काही तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस पुढचा भाग लिहिता येणार नाही. क्षमस्व!

आपल्या प्रोत्साहनाने नेहमीच बळ मिळत राहते.

-'बेफिकीर'!

कृपया वाट पाहू नयेत. काही तांत्रिक अडचणींमुळे मी इतक्यात पुढचा भाग लिहू शकत नाही. गैरसमज नसावा व लोभ असू द्यावात! आपल्या प्रतिसादाने नेहमीच हुरूप येतो.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

ललित लिहिण्यात नाही का येत तांत्रिक अड्चण.....................?

अगं तृष्णा, ह्या कादंबरी लेखनात आणि बाकी ललितांमध्ये बेसिक फरक आहे. इथे त्यांना आधी त्यांचं टाईम मशीन इ.स. १०००० ला ट्युन करावं लागत असेल... मग ते जिथे कुठे पोहोचेल, तिथून गोपला शोधून त्याच्याकडे यानाने जावं लागत असेल, मग गोपच्या मनातले विचार जाणून घ्यायला स्पेशल चीप बसवावी लागत असेल आणि मग परत येऊन लिहून मायबोलीवर प्रकाशित करता येत असेल.... अनंत तांत्रिक अडचणी असतील त्यांना... समझा करो यार!!!!! Proud

Pages