काळ्या इतिहासाचा साक्षीदार- समर पॅलेस-बीजिंग( मार्बल बोट फोटो)

Submitted by वर्षू. on 19 April, 2011 - 05:48

बीजिंग च्या बाहेर एका तासाच्या अंतरावर असलेल्या समर पॅलेस मागे ८०० वर्षांचा इतिहास आहे.
८०० वर्षापूर्वी मंगोल डायनेस्टी चा सम्राट कुबलाय खान,याने स्वतःसाठी हा राजवाडा बांधून घेतला.
नंतर बाराव्या शतकाच्या सुरुवातीला छिंग डायनेस्टीच्या सम्राटाने हा पॅलेस अजून वाढवून ,नव्याने भर टाकून आपल्या आईला, तिच्या साठाव्या वाढदिवशी भेट म्हणून दिला.
छिंग डायनेस्टीचा सम्राट 'शिएनफंग' याच्या झनानखान्यात १६ वर्षाची 'लान' ची जेंव्हा भरती झाली तेंव्हा कुणालाही स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल कि ही रखेली एक दिवस चीन वर सलग ४८ वर्षं राज्य करणार म्हणून.
सम्राटापासून तिला एक मुलगा झाला आणी लान चे नशीब फळफळले. सम्राटाच्या मुख्य कॉनक्युबाईन (रखेली / उपपत्नी) चे पद तिला प्राप्त झाले. तिचं नाव बदलून 'छ शी' ठेवण्यात आले. .. १८६० मधे सम्राटाचा मृत्यू झाल्यावर ,तिने अनेक कपट,कारस्थानं करून सम्राटाच्या पट्टराणी आणी युवराजाचा काटा काढला. आपल्या अल्पवयीन मुलाला राज्याभिषेक करून स्वतःच राज्य करू लागली. ती सिंहासनामागे एका जाळीदार पडद्याआड बसे. म्हणून तिला लेडी बिहाईंड द कर्टन असंही म्हणत.छ शी ने स्वतः च्या चैनीसाठी खूप मोठ्या प्रमाणात,मन मानेल तसा पैसा खर्च केला. २९० हेक्टेअर जागा व्यापलेल्या या महालात छ शी ने अपरंपार वैभव भोगले. नौसेनेसाठी असलेला फंड केवळ स्वतःच्या सुखविलासा करता तिने एक (न हलणारी)संगमरवरी नौका बांधण्यात खर्च करून टाकला. महालासमोर १०,००० मजूर लावून विशाल तळे बनवले.या तळ्यात छ शी ला मोत्ये आवडत म्हणून खास शिंपल्यांची शेती करण्यात येई आणी इथून निघालेले मोती सर्वच्यासर्व एकटी छ शी वापरत असे. या तलावात विहार करायला छ शी खेरीज अजून कुणालाच अनुमती नव्हती.

लवकरच तिचा मुलगा मरण पावला. तिने सर्व नियम धाब्यावर बसवून आपला पाच वर्षाचा भाचा,'क्वांग शू'ला गादीवर बसवले. क्वांअ शू ला खरोखरच प्रजेसाठी काही करावेसे वाते. छ शी च्या लक्षात आले कि जर प्रजा सुधारली तर सत्ता आपल्याहातून निघून जाईल.त्यामुळे तिने चिडून जाऊन ,'क्वांग शू' ला या समर पॅलेस मधे एका लहानश्या जागेत तो मरेपर्यन्त डांबून टाकले . ती नेहमी म्हणे कि ती क्वांग शू मेल्यानंतरच मरेल. आणी खरोखरच तसे झाले. कैदेत १५ वर्षं राहिल्यावर दुर्दैवी क्वांग शू केवळ ३४ व्या वर्षी मरण पावला. योगायोग असा कि दुसर्‍याच दिवशी 'छ शी' वयाच्या ७४ व्या वर्षी मरण पावली. नंतर दोनच वर्षानी, १९११ मधे छिंग डायनेस्टीचे साम्राज्य संपुष्टात आले.

समर पॅलेस च्या समोरच्या बागेत ,आपल्या आईला आरामात फिरता यावे म्हणून सम्राटाने बांधलेला हा ७२८ मीटर लांबीचा हा पॅसेज, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मधे शामिल आहे. लाँग कॉरिडॉर ला प्रवेश फी नाही.त्यामुळे इथे दिवसभर बरेच ज्येष्ठ नागरीक,पोराबाळांसमवेत बागेतून फिरायला येतात. इतकच नाही तर कॉरिडॉर च्या दोन्ही बाजूंनी कमरेइतक्या उंच ,रुंद कठड्यावर बसून पत्ते,माजोंग इ. खेळायची पण मुभा आहे.फक्त पैसे लावून जुगार बिगार खेळायला परवानगी नाही.

पॅलेस समोर,तळ्याकडे तोंड करून उभा असलेला हा क्विलिन्,रक्षणकर्त्याचे कर्तव्य पार पाडतोय

चीने च्या पॅलेसेस मधे महालाच्या प्रवेशद्वाराबाहेर पुरुष प्रधान संस्कृतीचा सिंबल म्हणून उजव्या बाजूला ड्रॅगन तर डाव्या बाजूला राणी चं सिंबल म्हणून फीनिक्स असतो. मात्र छ शी च्या राज्यात ड्रॅगन आणी फिनिक्स च्या जागा बदललेल्या होत्या Happy उगाच नाही तिचा आज ही उल्लेख' ड्रॅगन लेडी' म्हणून केला जातो.

हीच ती ड्रॅगन लेडी,' छ शी'

महालाच्या आतल्या बाजूचे भाग, निरनिराळे महाल्,अंगणं,चौक..

या महालात छ शी ने सम्राटाच्या पुत्राला जन्म दिला. पुढे ती स्वतः शेवटपर्यन्त इथेच राहिली.

छ शी चे शयन कक्ष, येथील भांडी,पात्रं,वस्तू शुद्ध सोने आणी पाचू वापरून बनवलेल्या आहेत.

सोन्याच्या पत्र्याने मढवलेले असे अनेक हंडे त्यांच्यात पाणी भरून महालांबाहेर ठेवण्यात येत. हे त्या काळचे अग्निशामक यंत्री असत. पुढे युरोपिय सत्तेने चीन मधे आपले पाव रोवल्यावर सर्व हंड्यांवरचे सोने त्यांनी चाकूद्वारे खरवडून पळवले.

छ शी ला उधळपट्टी करायला खूप आवडे. तिच्या जेवणाकरता तीन हॉल वापरले जात. एकेका वेळी पन्नास पन्नास खाण्याचे पदार्थ टेबलावर तिला हवे असत. मग एका खोलीत ती ती फक्त जेवणाचा वास घेई, दुसर्‍या खोलीत थोडं चाखे,मग तिसर्‍या खोलीत जेवण घेत असे.
तसच तिला फुलांपेक्षा फळांचा सुवास आवडे म्हणून तिच्या खोलीत शेकड्यांनी ताजी फळं ठेवली जात्,जी दिवसातून दोन वेळा बदलली जात.

महालाच्या परिसरात अशी 'भुतहा' झाडं खूप दिसली

हा राजाचा महाल. इथे छ शी राजासोबत बसून त्याच्या रखेलींची निवड करे. राजाला आवडणार्‍या रखेलीला त्याच्यापासून मूल न होऊ देण्यासाठी, छ शी च्या हुकुमावरून तिच्या पाठीखाली कमरेवर लाकडाच्या ओंडक्याने खरपूस मार देण्यात येई.

राजाच्या महाला च्या आसपास च्या महालांमधून त्याच्या ३००० रखेलींचे वास्तव्य होते

सम्राटाच्या उम्मीदवार रखेल्यांचा एक फोटो इकडे ठेवण्यात आलेला आहे.या लहानग्या पोरींचे इनोसंट चेहरे पाहून मन भरून आलं

या परिसरात असलेल्या एका लहानश्या महालात बाहेर पडायच्या सर्व दरवाज्यांवर भिंती बांधून बंद करून टाकल्यात. इथेच क्वांग शू ला १५ वर्षं बन्दिवास भोगावा लागला. त्याला महालासमोरच्या छोट्याश्या अंगणात कडक पहार्‍यात फिरायची मुभा होती.

From Summer palace

ही च ती भिंत.. तिला पाहून सुद्धा गुदमरायला झालं

पॅलेस समोरच्या तळ्यावरून दूरवर दिसणारा पॅगोडा

आणी हे ते मोत्ये पिकवणारे, छ शी ला नावेतून सैर करवणारे सुंदर, मॅन मेड अतिविशाल तळे

आता या तळ्यात आम पब्लिक ही नौका विहार करू शकतात.. शिवाय इकडे निघणारे मोती ही विकत घेऊ शकतात.

ती फेमस मार्बल बोट

गुलमोहर: 

.

Amazing, is the only word for your narration dear!

कम्माल दर्शन घडवलस वर्षू
धन्यवाद!

एखादी स्त्री इतकी सुखलोलुप आणि स्वार्थी असू शकते, पाहून अन वाचून वाइट वाटलं!

असो!
तुझ्या ह्या माहिती-प्रयोगाला मात्र मनापासून दाद!!

थांकु लोक्स!! Happy
तुमच्या प्रतिसादांमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतयं बर्का.. तर सावधान !!!!!! Proud

वर्षू, आता तूझ्या लेखणीला आणि फोटोग्राफीला बहर यायला लागलाय.
खुप छान वाटलं.
खरं तर हा इतिहास माहित नसता, तर किती रम्य ठिकाण वाटलं असतं.

वर्षु,
समर पॅलेस तर आवडलाच !
पण त्या राजाची,छ शी राणीची स्टोरी तर एकदम आवडली !

इतका मोठा महाल यांना फक्त राहण्यासाठी ...?
आम्ही मात्र एकडे एका १बीएचकेच अजुन स्वप्न पहातोय ...!
आमची अशी अवस्था बघुन ती 'छ शी' राणी काय म्हणाली असती, छी ! तुमच्या जिंदगानीवर किंवा
शी ! काय माणुस आहे ?
Lol

राजाच्या महाला च्या आसपास च्या महालांमधून त्याच्या ३००० रखेलींचे वास्तव्य होते
बाप रे ! इथे नक्की प्रिंटींग मिस्टेक झाली असणार, ३ च ३०, आणि ३० च ३००....३००० झालं असणार !
काय एकेक माणसं असतात ना !
Wink

खरय दिनेश दा.. पण त्या वास्तूमागची थोडीतरी माहिती मिळावी या उद्देश्याने टाकली Happy
पण या पॅलेसमधे फिरताना तेंव्हाचा इतिहास पावलोपावली भेटतच राहतो प्रत्येक कानाकोपर्‍यातून ..पर्सनली मलापण दडपण आलेलं सर्व पाहताना..

ती भयानक बाई इतकी वर्षं कशी काय सत्ता उपभोगू शकली. कुणी तिच्या अत्याचारांना त्रासून बंड कसे नाही केले?

बाकी माहिती छान. धन्यवाद Happy

कुणी तिच्या अत्याचारांना त्रासून बंड कसे नाही केले?
अहो, एकदा सगळी सुत्र हाती आली ना तर अशा 'बंड' करणार्‍यांचा, आडवे येणार्‍यांचा काटा (एका रात्रीत) काढायला कितीसा वेळ लागतो, फक्त नोटा पुरवल्या की झालं.

माहिती आता वाचली.... बाप रे! क्रौर्य ह्यालाच म्हणतात काय? त्या छोट्या पोरींचा फोटो पाहून कसेसेच झाले.

वर्षू, आता तूझ्या लेखणीला आणि फोटोग्राफीला बहर यायला लागलाय.>> दिनेश, म्हणजे याच्या आदी वर्षुनी लिहलेले सगळे लेख झेलावे लागले असं म्हणायचंय का? Happy

खुपच सुंदर,जीवंत लिहीले आहेस तु..वाचताना सतत डोळ्यासमोर वास्तव येत होतं..जुन्या वास्तुला किती छान त्याच रुपात ,तोडफोड न करता तसेच्या तसे टिकवुन ठेवले आहे..सगळी चित्रं न जोडीला तुझी लाजवाब लेखणी त्यामुळे योग्य प्रभाव पडला आहे.मला चिन च्या इतिहासाची फारशी माहिती नव्हती.त्यामुळे ज्ञानात नक्किच भर पडली आहे..बहोत बढिया है..ऐसे ही कलम ऑर कॅमेरा चलाते रहियेगा..

यस वर्षु,
आजच ऑफिस मध्ये मी जरा घाईघाईत वाचल
मग म्हटलं घरी जाऊन वाचू . मस्त . तुझ्याकडून हीच अपेक्षा होती
प्रकाशचित्रे सुरेख आणि वृतांत माहितीपूर्ण.
असेच या पुढे फोटोसहीत चीनचे दर्शन घडव. पुलेशु.:)

हेल्लो,
संपूर्ण वर्णन वाचताना आणि फोटोग्राफ्स पाहून अगदी प्रत्यक्ष तेथे उभे असल्या सारखे वाटले. धन्यवादFAMILY~1_edited.JPG

वर्षू मस्त माहिती सांगितलीस. समर पॅलेस मी बघितला पण काही काही गोष्टी राहून गेल्यात हे तुझे फोटो बघून कळलं. बाकी ती जेवणाच्या ३ हॉलची माहिती वै गाईडनी सांगितली होती. झब्बू देऊ? Wink

खरंच .... किती हा स्वार्थ, क्रौर्य !!!!
-------------------------------------------------------------------------
.... माहितीपूर्ण लेखन आणि फोटोंमुळे लेख खूप आकर्षक झालाय.

Pages