Lemon Tiramisu (लेमन तिरामिसु)

Submitted by रूनी पॉटर on 3 March, 2011 - 22:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. ३ मोठी लिंबं (इथे मोठी पिवळ्या रंगाची लिंब (Lemon) मिळतात ती घ्यावीत भारतातल्यासारखी छोटी लिंबं (Lime) मिळतात ती घेवू नयेत).
२. स्वीट्न्ड कंडेन्स्ड मिल्कचा १ छोटा डबा (साधारण ४०० ग्रॅमचा मिळतो तो)
३. ताज्या हेव्ही व्हिपींग क्रीमचा १ कार्टन (१ पिंट, साधारण अर्धा लिटर) हे कुठल्याही सुपरमार्केटमध्ये मिळेल
४. १ पाकीट लेडीफिंगर बिस्कीटे (२०० ग्रॅमच्या पाकीटात २४-२५ लेडीफिंगर्स येतात तेव्हडी पुरतात)
५. ३ चहाचे चमचे साखर.
६. साधारण कपभर कोमट दूध.
७. सर्व्ह करतांना सजावटीसाठी डेसीकेटेड कोकोनट किंवा डार्क चॉकलेटचा एक तुकडा खिसून घालायला. हे ऐच्छिक आहे मी वापरत नाही.

क्रमवार पाककृती: 

तिरामिसुचे क्रीम -
१. पहिल्यांदा एका भांड्यात सगळ्या लिंबाच्या साली बारीक खिसणीने (आलं किसायची) बारीक किसायच्या. किसलेली साल खवलेल्या नारळासारखी दिसते. त्यात २ लिंबाचा रस पिळुन हे मिश्रण बाजूला ठेवून द्या.
२. दुसर्‍या एका मोठ्या भांड्यात सगळे हेवी व्हिपींग क्रीम, साखर घेवून लाकडी चमच्याने ढवळा.
३. क्रीमच्या मिश्रणात कंडेन्सड् मिल्क टाका आणि लाकडी चमच्याने ढवळा. आता हे मिश्रण बासुंदी इतके घट्ट झाले असेल.
४. आता या वरच्या मिश्रणात लिंबाचा रस + किसलेली साले यातले अर्धे मिश्रण टाका. हळू हळू लाकडी चमच्याने हलवा. मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागते. साधारण श्रीखंडाइतके घट्ट होते. या स्टेजला मिश्रणाची चव घेवून बघायची. आंबट गोड चव यायला हवी. नुसतीच गोडमिट्ट चव लागत असेल तर बाकीचा लिंबाचा रस हळू हळू घालायचा. सगळे मिश्रण नीट ढवळायचे, आतापण जर चव गोडच लागत असेल तर तिसर्‍या लिंबाचा रस घालायला हरकत नाही.
जसे जसे यातले लिंबाच्या रसाचे प्रमाण वाढते तसे तसे याचा घट्टपणा वाढत जातो. हे तयार झाले तिरामिसुचे क्रीम, लेडीफिंगर बिस्कीटं दूधात बुडवून कॅसरोलमध्ये रचेपर्यंत हे क्रीम मस्त घट्ट झालेले असेल.
आता एखादे कॅसरोलसारखे भांडे किंवा 8 बाय 8 चा केक टिन घ्या.

पहिला थर/लेयर - हा थर तयार करण्यासाठी एका पसरट भांड्यात कोमट दूध घ्यायचे आणि त्यात एक एक बिस्कीट बुडवायचे, बिस्कीट पूर्णपणे बुडायला हवे. मग बिस्कीट तळहातावर दाबून त्यातले दूध काढून टाकायचे आणि चपटे बिस्कीटं पॅनच्या तळाशी अगदी एकाशेजारी एक ठेवायची. संपूर्ण भांडेभर बिस्कीटांचा थर लावायचा.

दुसरा थर/लेयर - तयार केलेल्या क्रीममधले अर्धे क्रीम चमच्याने या बिस्कीटांच्या थरावर सगळीकडे पसरवायचे.

तिसरा थर/लेयर - पहिल्या थराप्रमाणेच बिस्कीटं दूधात बुडवून तळहातावर दाबून त्यातले दूध काढून क्रीमच्या थरावर नीट माडून तिसरा थर तयार करायचा.

चौथा शेवटचा थर/लेयर - उरलेले सगळे क्रीम बिस्कीटांवर पसरवायचे. झाऽऽले तिरामिसु तय्यार. आता तयार झालेले तिरामिसु ४-५ तास फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवा.
नंतर सर्व्ह करतांना तिरामिसुवर डेसिकेटेड कोकोनट भुरभुरुन किंवा डार्क चॉकलेट किसून सर्व्ह करता येईल. हे न करता पण तिरामिसु सऽऽही लागते. Happy

Bon appetit!

वाढणी/प्रमाण: 
वरच्या प्रमाणात १०-१२ सर्व्हिंगस होतील पण २-३ जण सहज हे तिरामिसु संपवू शकतात.
अधिक टिपा: 

१. ज्यांच्याकडे इथल्यासारखे मोठे लिंबू (लेमन) मिळत नाही फक्त लहान लिंबू (लाइम) मिळते त्यांनी लिंबाचा रस + संत्र्याची साल टाकायला हरकत नाही. फक्त संत्र्याची साल आणि संत्र्याचाच रस असे चालणार नाही. मिश्रण घट्ट होण्यासाठी लिंबाचा रस आवश्यक आहे.

२. पटकन थंड करायचे असेल तर हिवाळ्यात सरळ १५-२० मि. घराबाहेर बर्फात ठेवायचे आणि उन्हाळ्यात फ्रीजरमध्ये ठेवायचे. समजा फ्रीजरमध्ये जऽरा जास्त वेळ राहीले तर लेमन तिरामिसु आयस्क्रीम म्हणून वाढावे :). अर्थात केल्यावर लगेचच खाल्ले तर कधीतरी लिंबाच्या सालीचा कडवटपणा जाणवतो. तेव्हा पार्टीच्या आदल्या रात्री करून फ्रीजमध्ये ठेवले तर मुरलेले तिरामिसु एकदम मस्त लागते.

३. यात भऽरऽपूऽर कॅलरीज असतात पण हे इतके भारी लागते की खातांना असले काही लक्षात ठेवणे अशक्य आहे तेव्हा दुसर्‍या दिवशी अवश्य जीमला जाणेचे करावे Proud

४. ही कृती मी जर्मन भाषेत शिकले तेव्हा कोणी जर्मनीत असेल आणि त्यांना हे करायचे असेल तर त्यांच्यासाठी साहित्य देतेय. penimarkt मध्ये सगळे साहित्य मिळेल.
व्हिपींग क्रीमसाठी - 2 Schlagsahne (दह्याच्या डब्यासारख्या दिसणार्‍या कंटेनरमध्ये हे मिळते, २०० ग्रॅचे २ डबे लागतील.)
स्वीट्न्ड कंडेन्स्ड मिल्क - Gezuckerte Kondensmilk warmebehandelt (Milch Madchen) हे टुथपेस्ट्सारख्या २०० ग्रॅ. ट्युबमध्ये मिळायचे, २ ट्युब्स लागतात.
साध्या सारखेसोबत/ऐवजी तिथे मिळते ती vanila zukcker वापरावी.

५. ओरीजनल तिरामिसुची कृती इथे सापडेल.

६. विद्यार्थीदशेत असतांना बर्‍याचदा ऐन वेळेला शुक्रवारी रात्री पार्टी ठरत असे तेव्हा घरातल्या असलेल्याच वस्तू वापरून हे तिरामिसु झटपट करता येई म्हणून आम्ही याला इंस्टंट तिरामिसु म्हणायचो.
लेडीफिंगर्स्/कंडेन्स्ड मिल्क/साखर/दूध/लिंबं नेहमी घरात सापडतेच फक्त घरी येतांना हेव्ही व्हिपींग क्रीम आणले की झाले त्यामुळे दहातल्या किमान आठ पार्ट्यांसाठी हे केले जायचे.

७. याला अस्सल इटालियन लोक तिरामिसु म्हणतील का हे माहीत नाही. क्रीम आणि बिस्कीटांचे एकावर एक थर असतात म्हणून आम्ही याला तिरामिसु म्हणायचो.

८. इटलीला गेले होते तेव्हा बघीतले की सगळ्या दुकानात आयस्क्रीमच्या काचेचा कपात, तर कधी छोट्याश्या साध्या काचेच्या वाटीत तिरामिसु विकायला ठेवलेले असते. त्यामुळे सर्व करायला खूप सोपे पडते. छोट्या पार्टीसाठी बर्‍याचदा मी ७-८ डेझर्ट कपातच तिरामिसु करते म्हणजे मग कापा आणि ताटलीत सर्व्ह करा वगैरे भानगडी कराव्या लागत नाहीत. प्रत्येकाला एक कप दिला की झाले.

माहितीचा स्रोत: 
रुमेनियन रूममेट
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं बहुतेक असावं. आमच्याइथे एक केक शॉप आहे. त्याला विचारले आयसिंग साठी क्रिम कुठुन आणलेस. त्याने दोन किलोचा टेट्रापॅक दाखवला आणि इथेच कुठेतरी दुकान आहे म्हणाला. पण त्याचे ते क्रिम चक्क सोयाबिनपासुन बनवलेले होते. मला वाटलेले दुधाचे बनवतात. आज परत दुकानात जाते पाहायला आणि विचारायला.

सॉरी २ दिवस नसल्याने उत्तर देता आले नाही. तर ते क्रिम घट्ट झाले नाही शेवट पर्यंत त्यामुळे बासुंदी म्हणतच खाल्ले. थोडं फ्रिजरमधे मुद्दाम जास्त वेळ ठेवलं होतं ते जवळजवळ ८-१० तासांनी आईसक्रिम झाले.

रूनी, रविवारी केलं होतं तिरामिसु. पर्फेक्ट प्रमाण, पर्फेक्ट रेसिपी. बासुंदी च्या कन्सिस्टंसी वरून श्रीखंडापर्यंत जाईल की नाही अशी आधी शंका वाटत होती पण कसली फूलप्रूफ रेसिपी लिहिलियेस. अनेक धन्यवाद!! खूपच छान झालं होतं.

रुपाली, मी केलेलं २० च्या वीकेंडला.. छान लागलं..
माझ्याकडे कन्डेन्स्ड मिल्क नव्हतं.. मी दुधाची पावडर वापरली आणि बिस्किटांच्या ऐवजी केक.
आता कॉफी वालं करून झालं की कळवेनच!

नानबा,
मिल्क पावडरचे प्रमाण कळवशील का म्हणजे इतर कोणी करणार असेल तर त्यांना करता येईल. कंडेन्स्ड मिल्क नसल्याने साखर वाढवायला लागली असेल ना तुला.
रैना, टाकते गं फोटो फक्त त्यासाठी मला एकदा लेमन तिरामिसु करायला लागेल.

आमच्या एरियात नवीन कॉफी शॉप उघडले आहे, तिथे मी काल तिरामिसु खाल्ला. त्यावर टॉपिंग म्हणून, कॉफिच्या रोष्ट केलेल्या अखंड बिया टाकल्या होत्या. मस्त लागला तो प्रकार.

मस्त फोटो, रूनी. ते भांडं पण मस्तय. अश्याच भांड्यात ठेवलं पाहिजे तिरामिसु Happy
मी जेव्हा केलं तेव्हा त्याला लेमनीश कलर आला होता. मी संत्र्याची साल पण टाकली होती. माझ्याकडे डेसीकेटेड कोकोनट , चॉकलेट दोन्ही नव्हतं म्हणून मग लिंबाच्या चकत्याच ठेवल्या वर.

फोटो काही खूप खास नाही आला. पण टाकते इथे.

t1.jpg

सावनी मस्त दिसतोय फोटो. क्रीमचा रंग पण मस्त आलाय, ऑरेंज झेस्ट मुळे रंग आला असेल ना.

प्रकार चांगला वाटतोय. करून बघायला हवा.
तिरामिसूमध्ये लेडीफिंगर बिस्किटांच्याऐवजी एंजल फूड केक पण वापरता येतो.
आणि खर्‍या तिरमिसूमध्ये कॉफी आणि रम्/ब्रॅंडीपण असते.

धन्यवाद shmt.
त्रिशंकू
ही खर्‍या तिरामिसूची कृती नाहीये, ती कृती वेगळी लिहीली आहे, क्र. ५ तळटीप पहा.
बरेच जण केक वापरत असले तरी तसच खर्‍या तिरामिसूत लेडीफिंगरच वापरतात.

रुनी, एवढ्या सोप्प्या आणि मस्त रेसिपी साठी खूप खूप धन्यवाद.
काल लेकाच्या वाढदिवसाला लेमन तिरामिसु केले होते. सही झाले होते आणि हे प्रमाण पण एकदम पर्फेक्ट आहे. सगळ्यांना खूप आवडले. तिरामिसु हा प्रकार कोणालाच माहित नव्हता. त्यामुळे एकदम हटके डेझर्ट केल्याचं समाधान मिळालं.
ह्यातला लिंबांचा स्वाद खूपच छान लागत होता. आपल्याकडे लिंबाच्या स्वादाचे गोड पदार्थ विशेष नसल्यामुळे हे तिरामिसु अगदी मस्त वाटले.
रुनी, तुला परत एकदा धन्यवाद.

रॉणीदेवींचा विजय असोऽ !! मनापासून धन्यवाद!!

अफलातून झालाय तिरामिस्सू. रात्रीपर्यंत वाट कोण बघेल? आत्ताच एक चमचाभर खाल्ला. रंग बिल्वाच्या तिरामिस्सूसारखा न येता पांढराच राहिलाय. त्यावर कुठल्याशा जर्मन कंपनीचं (Rud Laderach डोक्यावर कुठेकुठे टिंब...) चिली चॉकलेट किसून घातलं. लै मज्जा!

(फोटो नको म्हंटलं तरी टाकतेच नंतर!) Proud

हो ना नानबा काल आपल्यासगळ्यांना आवडला त्यामुळे पुन्हा कधीतरी करायला आवडेल Happy

आज आरतीचे कॉर्न दोसे, अल्पनाचा सखुबत्ता आणि रुनी तुझा लेमन तिरामिस्सु असा ऑल मायबोलिअन मेनू होता!

ले. ति. भन्नाटच लागतो! संपत आला असता फोटोची आठवण झाली. गेल्यावेळी काढलेले फोटो आता मिळत नाहीयेत, तेव्हा हा आत्ताचा............

lemon-tiramissu-runi-maayboli.jpg

Pages