हुलग्याची उसळ आणि सार

Submitted by प्राची on 11 April, 2011 - 03:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हुलगे,
ओलं खोबरं,
एक चमचा धणे,
छोटा कांदा,
चिंच,
गुळ,
गोडा मसाला,
लाल मिरचीपूड,
मीठ,
फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, कडीपत्ता आणि भरपूर लसूण,
कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

१. हुलगे आदल्या रात्री भिजत घालावेत.
२. सकाळी भरपूर पाणी घालून कुकरला हुलगे शिजवून घ्यावेत.
३. पाणी आणि हुलगे वेगळे निथळून घ्यावे.
४. ओलं खोबरं, धणे, बारीक चिरलेला कांदा आणि चिंच वाटून घ्यावे. हे वाटण निथळून घेतलेल्या पाण्यात मिसळून चवीप्रमाणे तिखटमीठ घालावे. गूळ घालावा. वरून हिंग-मोहरी, कढीपत्ता, लसणीची झणझणीत फोडणी द्यावी. कोथिंबीर घालावी. एक उकळी काढावी.
हे झालं हुलग्याचं सार तयार. Happy
५. शिजलेले हुलगे मिक्सरमधून जरा फिरवून काढावेत. जरा चेचल्यासरखे व्हावेत इतपतच फिरवावेत. कढईत हिंग-मोहरी, कढीपत्ता, लसणीची झणझणीत फोडणी करावी. चेचलेले हुलगे त्यात घालून जरा परतावे. मग त्यात चवीप्रमाणे तिखटमीठ, गोडा मसाला, गूळ घालावा. सगळे नीट मिसळून जरा परतून घ्यावे. वरून ओले खोबरे आणि कोथिंबीर घालावी.
ही झाली हुलग्याची उसळ. Happy

वाढणी/प्रमाण: 
खाण्यार्‍यावर अवलंबून :)
अधिक टिपा: 

१. सार गरमगरम प्यायला मस्त लागते. उसळही वाटीत घेऊन नुसती हाणावी.
२. हुलगे भिजवण्याआधी नीट निवडून घ्यावेत, नाहीतर घासात दगड येऊन दात पडण्याचा संभव असतो. Proud

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा, हुलगे... नुसतं नाव ऐकलं तरी माझ्या तोंडाला पाणी सुटतं... माझ्या गावी हुलगेच पिकतात त्यामुळे त्याची ऊसळ अनेकदा करतात... मुंबईत केलं जात नाही... पण त्यांची चव जिभेवर रेंगाळते नुसती... Happy

ह्याचं कळण पण फार चविष्ट होतं. हुलगे/कुळिथ हे अतिशय पौष्टिक आहे पण दुर्लक्षित कडधान्य आहे. Happy

कोकणात आजी उसळ करते त्यात कांदा. चिंच वगैरे नाही घालत. शिजवलेले कुळिथ फोडणिला टाकून खोबरं, थोडा गोडा मसाला, मीठ, गूळ एवढंच, बाकी अंगच्या चवीवरच ही उसळ ठेवतात.

अरे वा, वा प्राची! मस्तच गं Happy
हुलगे, त्यांची पिठी, कुळीथाचं भरपूर लसूण, कांदा, मिरच्या वगैरे घालून केलेलं पिठलं, सगळंच आवडीचं.
हल्लीच गावाकडचे कुळीथ मिळालेत. सार/ उसळ होणारच आता. Happy

आम्ही ह्याला कुळीथाच कढण म्हणतो. तापातुन उठल्यावर किंवा बाळंतपणात देतात प्यायला.
बाकी हुलग्याची उसळ अप्रतीम

धन्यवाद. Happy

शिजवलेले कुळिथ फोडणिला टाकून खोबरं, थोडा गोडा मसाला, मीठ, गूळ एवढंच, >>> मंजू, उसळीत कांदा, चिंच नाही घालत आम्हीसुद्धा. ते वाटून सारात घालायचं.

मला प्रचंड आवडतात हुलगे. नुसते खमंग भाजून वरून मीठ्पाणी लावून खार्‍या दाण्यासारखेही करायची आई. येताजाता खायला फार आवडायचे. Happy

मला प्रचंड आवडतात हुलगे. नुसते खमंग भाजून वरून मीठ्पाणी लावून खार्‍या दाण्यासारखेही करायची आई. येताजाता खायला फार आवडायचे. <<< आमच्या घरी पण.

आमच्याकडे त्यात आल्याचे तूकडे टाकतात. नवल म्हणजे मला हुलगे नायजेरियात पण मिळाले होते. (भारतातले नव्हते, भलत्याच देशातले होते. ) पण मोठे आणि चवीला छान होते.

अच्छा, वरच्या कृतीत क्र. ४ म्हणजे सार आणि क्र. ५ म्हणजे उसळ आहे. माझा जरा गोंधळ झाला होता. Happy

कुळीथ शिजवलेलं पाणी आणि थोडेसे शिजवलेले कुळिथ जरा चेचून घेऊन ते आंबट ताकात मिसळायचं. त्यात चवीप्रमाणे मीठ, साखर घालून, चिरलेली कोथिंबीर घालून उकळायला ठेवायचं. साजूक तुपाची हिंग, जिरं, हिरवी मिरची आणि ठेचलेल्या लसणाची चरचरीत फोडणी करून उकळत्या कळणात घालायची. कळणासोबत वाफाळता भात, त्यावर तूप.... माझं कम्फर्ट फूड! Happy

मस्त, आवडीचा प्रकार, पण मंजु म्हणाल्या प्रमाणे एकदम दुर्लक्षीत, भरपूर आयर्न मिळत खर तर ह्यातून
मंजुडी -एकदम सहीच

आमच्याकडे हुलग्याचे शेंगुळे करायची आजी.. अहाहा.. थंडीछ्या दिवसात गरम-गरम शेंगुळे म्हणजे पुर्ण जेवण व्हायचे Happy

बाकी उसळ आणि सारची पाकृ छानच Happy

आम्ही ह्याला गमतीत ढेकणांची उसळ म्हणतो... बर्‍याच दिवसात खाल्ली नाहीये.. आईला आठवण करायला पाहिजे.. आणि उसळ आणि कळण दोन्ही एकाच दिवशी होते नेहमीच..

कुळथाचं पिठलं आमसूल व ओलं/ सुकं खोबरं घालून.... कुळथाचं कळण, आसट मोकळा गरम भात, तूप, मीठ, लिंबाच्या लोणच्याची फोड, सोबत मिरगुंडं..... फक्कड मेजवानीचा बेत आहे हा!
प्राची, छान रेसिपी.

हुलगे उष्ण पडतात म्हणून आमच्याकडे हिवाळ्यातच खाल्ले जातात. शिंगोळे ह्याच्याच पीठाचे करतात ना ? उसळ कधी खाल्ली नाही. इथे देसी दुकानात बघितले आहेत एकदा हुलगे (Horse Gram). परत दिसले तर आणेन उसळीसाठी.

तोषवी, आमवात म्हणजे काय ?

आमच्या घरी पण कुळथाची उसळ ( कोकणीत उपकरी ) न ते शिजवलेल्या पाण्याचं सार मिळून सार -उपकरी अशी जोडी असायची नेहमी. यम्मी !! आता घालते भिजत थोडे कुळीथ संध्याकाळी अन या प्रकाराने करुन पाहिन.

यम्मी! कुळथाची उसळ आणि दही = मेजवानी. आणि वर कळण (मंजूडीने सांगितलेल्या पध्दतीने) म्हणजे अमृत! आमच्याकडे दुपारच्या नाश्त्याला पण उरेल इतकी उसळ केली जाते Happy

हुलगे/कुळिथ हे अतिशय पौष्टिक आहे पण दुर्लक्षित कडधान्य आहे

अगदी खरे.. आमच्याकडे हे भाजुन मग त्याचे पिठ दळतात. भाजलेल्या बेसनसारखा रंग येतो त्या पिठाला. त्या पिठाचे पातळ पिठले करतात, कोकणात कुळथाची पिठी म्हणतात त्याला.. अहाहा काय चव असते त्याला.. आठवुनच तोंपासु. (कृती नीट आठवत नाहीय, आईला विचारायला पाहिजे). गरम मसाला वापरुन आणि अकु ने लिहिलेय तसे खोबरे घालुन पातळसर पिठी केली जाते याची. पिठीसाठी कुळीथ भाजले जात असताना त्या भाजलेल्या कुळथांचाही आम्ही फन्ना उडवायचो... Happy

आणि आमसुलही बहुधा घातले जाते.

कुळथाचे पिठले :

तेलाची मोहरी, हिंग, जिरं, हळदीची फोडणी करायची, त्यात आवडीप्रमाणे हिरवी मिरची किंवा लाल सुकी मिरची घालायची. ठेचलेला लसूण घालून तो जरा चॉकलेटी होईपर्यंत परतायचा, त्यात पाणी घालायचं. आमसूल, मीठ घालून पाण्याला उकळी आली की त्याला कुळथाचं पीठ लावायचं. जरा पातळसरच ठेवायचं. पिठल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि गरम वाफाळत्या भाताबरोबर ते छानपैकी भुरकायचं.
आमच्याकडे हिरवी मिरची घातली तर लसूण घालत नाहीत आणि कोथिंबीर बारीक चिरून घालतात, आणि लसूण घालून करायचं असेल तर सुक्या मिरच्याच फोडणीत घालतात.

आमच्याकडे हे भाजुन मग त्याचे पिठ दळतात.<< न भाजलेले जास्त चवदार लागते,
पुण्यामधे न भाजलेलेल हुलगे दळून द्यायला गिरणीवाले नकार देतात, भाजलेले असतील तरी ते सगळ्यात शेवटी दळायला टाकतात.

मंजुडीने सांगितल्या प्रमाणेच कळण आमच्याकडे करतात. मागच्या वेळी भारतातून आणले होते कुळीथ. ईथे पण मिळाले देसी दुकानात पण काहीतरी प्रचंड उग्र चव आहे त्याला. सध्या बर्ड फीडर मधे घालून संपवणं सुरू आहे.
http://jugalbandi.info/2009/04/horse-gram-cocktail-fritters-kulith-vade/
ही एक रेसिपी पण छान आहे.

कुळथाची उसळ, कळण, पिठलं सगळंच फेव्हरिट. Happy
कुळीथ हे कोकण-स्पेशल कडधान्य आहे असा माझा समज होता.

मंजुडी, कुळथाच्या पिठल्याला जिरं आणि सुकं खोबरं भाजून आणि वाटून घालून बघ. Happy

Pages