भावनिक ताण निरसन

Submitted by नरेंद्र गोळे on 17 March, 2011 - 12:20

आपल्यासोबत कायमच भावनिक तणाव असतात. न सुटणारे प्रश्न, न आवडणारी माणसे, गोंधळ गडबड, प्रदूषण ह्यांचे तणाव एकापाठोपाठ एक आपल्यावर आक्रमण करत असतात. शरीराचा व मनाचाही प्रतिसाद 'लढा वा पळा' स्वरूपाचा असतो. म्हणजे झेपत असेल त्याच्याशी लढा आणि झेपत नसेल त्यापासून पळ काढा. मात्र सार्‍याच तणावांनी एकदम हल्ला बोलताच शरीर वा मन प्रत्येक बाबतीत लढायचे वा पळायचे ह्याचा निर्णय करण्याआधीच ती समस्या येऊन ठेपते आणि मग आपण तिचा सामना करू शकत नाही. म्हणून एका वेळी एकच समस्या हाताळणे आणि 'लढा वा पळा' चा निर्णय त्वरित घेणे ह्यामुळे तणावांचे व्यवस्थापन सोपे होते. ह्याकरीता इंग्रजांप्रमाणे 'फोडा व झोडा' तंत्र अवलंबावे. म्हणजे ज्या जीर्ण, असाध्य आणि कायमच सोबत करणार्‍या समस्या असतात त्यांची भीती स्थगित ठेवावी. त्यांच्यावर निर्णय घेणे पुढे ढकलावे. ज्या थोड्या प्रयत्नांनी सुटण्यासारख्या पण लगेच लक्ष देणे आवश्यक आहे अशा अनेक समस्या एकएक करून सोडवाव्यात. म्हणजे समस्या सुटत असल्याचे पाहून हुरूप येतो. जे ताण आपण घेण्याची गरज नसते किंवा जे ताण आपण घेतल्यामुळे परिस्थितीत काहीच फरक पडत नाही ते तणाव घेऊच नये.

हे समजवण्यासाठी एक गोष्ट सांगितली होती. ती अशी. एक खेडूत आगगाडीतून निघाला होता. त्याला सांगण्यात आले की ३५ किलो सामान एका तिकीटावर नेता येते. त्याहून जास्त सामान सोबत असल्यास सामानाचे तिकीट वेगळे काढावे लागते. म्हणून त्याने स्टेशनवर आपल्याकडल्या साऱ्या सामानाचे वजन केले. ३५ किलो वेगळे काढून ते हातात धरले. उरलेले सामान डोक्यावर घेऊन तो गाडीत बसला. टी‌.सी. आला. त्याने एकूण सामान पाहिले, मोजले. आणि ३५ किलोहून जास्त सामानाचे तिकीट मागू लागला. इतर लोकही त्यालाच साथ देऊ लागले. खेडूताचे म्हणणे असे की ३५ किलो सामानच मी नेत आहे. उरलेले तर मी माझ्याच डोक्यावर वाहून नेत आहे ना? पण त्याला सामानाचे तिकीट काढावेच लागले. आपल्याला खुडुताचे वागणे तद्दन मूर्खपणाचे वाटेल. पण तणावाच्या बाबतीत आपणही असेच काहीसे वागत असतो. समजा सोसायटीतला केर काढलेला नसेल तर आपण त्याचा ताण वाहतो. त्यासाठी वेगळी माणसे नियुक्त असतात. जबाबदार लोक पाहणी करण्यासाठी ठरवलेले असतात. आपण ताण घेऊनही अचानक काही फरक पडण्यासारखा नसतो. अशावेळी न काढलेला केर आपण पाहिलाच नाही असे वागणे केव्हाही चांगले. म्हणजे तो प्रश्न न सोडवता, केवळ मनावेगळा करणे. हे मात्र शिकूनच घ्यावे लागते.

प्रच्छन्न अभिव्यक्ती हा तणावमुक्तीचा एक मार्ग आहे. आपल्याला जे वाटते आहे ते दुसर्‍याला, इतरांना खुलेपणाने स्पष्ट शब्दात आणि आवाजात सांगता आले पाहिजे. सभ्यतेच्या बुरख्याआड आपण मोठ्याने हसणेही विसरलेलो असतो. अलीकडे नवीन हास्य क्लब निघालेले आहेत. तेथे सगळे मिळून सकाळी मोठ्याने हसण्याचा कार्यक्रम करतात. त्यांचे अनुभवही तणावमुक्तीचेच असतात. घरी एकटेच असतांना आवडते गाणे मोठ्याने, मोठ्या आनंदाने म्हणण्याचा उद्योग करून पाहा. तणाव कमी होतील. एखाद्याचे म्हणणे आपल्याला अन्यायकारक, अपमानकारक अथवा कमी लेखणारे वाटले तर आपण चिडतो. त्यालाही अपशब्द बोलतो. तसे न करता, त्याला त्याचे बोलणे आपल्याला "अन्यायकारक, अपमानकारक अथवा कमी लेखणारे वाटलेले आहे" ह्याची स्पष्ट शब्दात जाणीव करून द्यावी. तो जर आपल्यापेक्षा हुद्यानी वरिष्ट असेल, बलवान असेल तर मोठ्याने खिन्न हसून आपली विफलता, विमनस्कता त्याला जाहीर करावी म्हणजे तो जरी बदलला नाही तरी आपली मानसिकता तणावग्रस्त राहत नाही.

अपेक्षाभंगाचे दुःख दारूण असते. अशा वेळी अनेक गोष्टींचा राग येऊ शकतो. आपल्यालाही आणि समोरच्यांनाही. राग येऊच नये म्हणून काय करावे आणि आल्यास त्याचा सामना कसा काय करावा हे रागनियमनाबाबत लिहिताना वेगळ्याने कधीतरी लिहेन.

नको त्या गोष्टीत, नको तेवढे तादात्म्य साधण्याची मनाला सवय असते. त्यामुळे अनावश्यक तणाव वाढतात. याबाबतीत मी एक ऐकलेली गोष्ट सांगतो. दोन शिष्य नदीपार कामासाठी आलेले असतात. परततांना नदीला पूर चढलेला असतो. एक गरोदर स्त्री त्यांच्याच तीरावर अडकून पडलेली दिसते. ती त्यांना विनंती करते की 'मला कुणीतरी खांद्यावर घेऊन पलीकडे पोहोचवा हो!' एक शिष्य ते काम पत्करतो. ते नदीपार जातात. ती स्त्री उतरून आभार मानते आणि आपल्या वाटेने निघून जाते. शिष्य चालत चालत आश्रमाजवळ येतात. ज्या शिष्याने स्त्रिला घेतलेले नसते तो दुसर्‍याला म्हणतो, 'ब्रह्मचारी असूनही तू त्या स्त्रिला खांद्यावर उचलून घेतलेस, तुझे ब्रह्मचर्य बुडाले. मी आता हे गुरूजींना सांगणार.' त्यावर दुसरा शिष्य म्हणाला, 'तू तिला अजूनपर्यंत मनात धरून राहिला होतास होय? मी तर तिला नदीकिनारीच खाली उतरवून आलेलो आहे. (म्हणजे तुझेच ब्रह्मचर्य आता बुडालेले असणार!)'. तर मुद्दा हा आहे की कुठलीही गोष्ट झाली तरीही, ती अकारण आपले मन, खूप काळपर्यंत, व्यापून राहत आहे असे लक्षात येताच, ती मनावेगळी करण्यातच तणावमुक्ती साधते.

तणाव घेणे वाईट नाही. मात्र एका तणावाचा पद्धतशीर निचरा केल्याशिवाय दुसरा घ्यायचा नाही असे धोरण ठेवल्यास ते साचत नाहीत आणि त्यांचा मुकाबला समर्थपणे करता येतो. ह्या विषयावर खूप काही लिहीण्यासारखे आहे. इथे मात्र ती साठा उत्तरांची कहाणी ह्या पाचा उत्तरांमध्ये संपन्न करीत आहे.
.
http://aarogyasvasthata.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. मला इसीजी , कोलेस्टेरोल चेक करायचे आहे पण भीती वाट्ते आहे. तुमची लेखमाला खूप उपयुक्त आहे.

Happy

लेख चांगला आहे. फक्त ताण घेवू नका असे सांगितल्यावर लोकांनी ताण घेणे सोडले असते तर किती छान होते, तसे होत नाही ना. लेख वाचून असे करायचे ठरवले तरी ते फार दिवस केल्या जात नाही परत येरे माझ्या मागल्या.

तणावाचे व्यवस्थापन असा एक मॅनेजमेंट टॉपिक आहे. त्याचा खरंच अभ्यास केला तर तणावास दुर ठेवता येते हे त्यात शिकवले जाते. मी त्याचा अनुभव घेतला आहे.घेतो आहे. तसेच कंफ्लिक्ट मॅनेजमेंट म्हणुन भांडण का व कसे होते याची ही माहिती त्यात शिकवतात. आणि मतमतांतरे असली तरी एकत्र राहून आणि आपली मते राखून काम कसे करायचे हेही त्यात शिकवतात. हा टॉपिक सासू सुनाना जरुर शिकवला तर बरीचशी घरे सुखी होतील असा माझा विश्वास आहे. पाहू रिटायर झाल्यावर हाही उद्योग करावा असा विचार आहे.

हसरी, अश्विनीमामी, प्रसन्न अ, अरुंधती, रूनी आणि सुनील जोग
प्रतिसादाखातर सगळ्यांचे महःपूर्वक धन्यवाद!

>>>पण तणावाच्या बाबतीत आपणही असेच काहीसे वागत असतो. समजा सोसायटीतला केर काढलेला नसेल तर आपण त्याचा ताण वाहतो. त्यासाठी वेगळी माणसे नियुक्त असतात. जबाबदार लोक पाहणी करण्यासाठी ठरवलेले असतात. आपण ताण घेऊनही अचानक काही फरक पडण्यासारखा नसतो. अशावेळी न काढलेला केर आपण पाहिलाच नाही असे वागणे केव्हाही चांगले. म्हणजे तो प्रश्न न सोडवता, केवळ मनावेगळा करणे. हे मात्र शिकूनच घ्यावे लागते.>>>
पूर्णपणे असहमत आहे.
अशा वृत्तीने जी स्थिती उद्भवली आहे ती डोळ्यासमोरच आहे
तणाव घेणे ही सकारात्मक वृत्ती -अर्थात मर्यादेत- आहे हे सिद्ध झाले आहे.
यात टोकाच्या भूमिका घेऊन चालत नाही-

लेखही आवडला आणि वर रेव्युचे म्हणणेही पटले.. मला वाटतं ताण सहन करू न शकणा-यांनी तसं करायला काहीच हरकत नसावी.. पण ज्यांना त्रास होतो आहे त्यांच्यासाठी हा लेख उपयुक्त ठरावा Happy