इ.स. १०००० - भाग ३

Submitted by बेफ़िकीर on 14 March, 2011 - 07:16

"हे माझे घर आहे असे काही सांगता येत नाही, पण तुम्ही प्रश्न विचारून हैराण करत आहात मला, म्हणून जितके मला माहीत आहे, आठवत आहे तेवढे मी सांगतो"

गलबल कमी झाली. ४६३४४ उर्फ गोप याचे म्हणणे सगळ्यांनाच पटले. त्याला त्याच्या घराच्या जागी झालेला मातीचा ढिगारा आणि त्यावर उगवलेली रोपे आणि नंतर खोदकाम झाल्यानंतर मिळालेले अनाकलनीय अवशेष व त्यांचे आकार दाखवून काहीच समजणार नव्हते. मुख्य म्हणजे ८००० वर्षांपुर्वीचा माणूस म्हणजे आपल्यापेक्षा अप्रगत, अविकसित असणार हे सगळ्यांना आता मनोमन पटले. शांतता पसरली तसा गोप बोलू लागला.

"माझे नाव गोप आहे.. तुम्हा लोकांना नाव नसते व त्यामुळे कुणालाच नाव नसणार याची खात्री झालेली आहे.. पण तसे नाही.. आमच्यावेळेस प्रत्येकाला एक नाव असायचे... त्याचे स्वतःचे नाव, त्यानंतर त्याच्या जन्मदात्या वडिलाचे नाव आणि त्यानंतर आडनाव! म्हणजे काय ते मी स्पष्ट करतो.. जगात कदाचित गोप या नावाची अनेक माणसे असतील त्या वेळी.. एक तर नटच होता पिक्चरमधला.. पिक्चर आणि नट म्हणजे काय ते सावकास सांगेन.. पण तो गोप खूप प्रसिद्ध होता... आता प्रश्न असा आहे... की नाव म्हणजे काय? तर मला पृथ्वीवरून मंगळावर आणणार्‍या या ज्या १६९९ आहेत त्यांना १६९९ च्या ऐवजी काहीतरी वेगळे म्हंटले जायचे... उदाहरणार्थ रजनी... समजा यांना १६९९ ऐवजी आपण रजनी म्हनालो तर? काय फरक पडणार आहे? काहीच नाही... आज १६९९ या नंबरला तुमच्या प्रशासनाकडून ज्या ज्या सुविधा, सवलती, अधिकार व स्वातंत्र्य आहे ते सर्व 'रजनी' या व्यक्तीला मिळू शकेल.. प्रश्न इतकाच आहे की रजनी नावाची आणखीन एक स्त्री जगात इतरत्र कुठेतरी जन्माला येऊ शकेल.. म्हणजे जन्माला आलेल्या कोणत्यतरी स्त्रीलाही हेच नांव तिचे आई वडील ठेवतील..."

"एक मिनिट.. एक मिनिट..."

कुणीतरी व्यत्यय आणला तसा गोप त्या व्यक्तीकडे पाहू लागला...

"तू आत्ता म्हणालास की नाव ठेवतील.. नाव ठेवतील म्हणजे काय??"

"म्हणजे एक बाळ जन्माला आले की त्याला हाक काय मारायची?? गुड्डु, पिटु, पप्पू, चिमणी, बंडू, पिंकी असली लाडाची नावे पुढे चालत नाहीत...."

"गोंधळ घालू नकोस.. मुळात नाव ठेवायचे म्हणजे काय करायचे??"

"गोंधळ तुम्ही घालताय.. नाव ठेवायचे म्हणजे त्याला एक नाव देण्यात यायचे..."

"तेच... तेच विचारतोय मी.. कशाच्या आधारावर नाव देण्यात यायचे??"

"म्हणजे काय??"

"म्हणजे सिस्टीम काय होती???"

"सिस्टीम कसली आलीय त्यात?? पत्रिकेत एक अक्षर यायचं.. त्या अक्षरापासून सुरू होणारे नाव द्यायचे.. दहा बारा नावे असली त्याच अक्षरापासून सुरू होणारी तर चॉईस असायचा.. त्यातलं एक ते निवडायचे..."

"हा फार घोळ घालतोय..."

"मी काय घोळ घालतोय?? "

"जन्माला आलेल्या बालकाला काय नाव द्यायचे हे कसे ठरायचे?? म्हणजे आजवर हे नाव कुणालाच दिले गेले नाही याची खात्री करण्यासाठी काय डेटाबेस असायचा??"

"असं काही नव्हतं की कुणालाच न दिलं गेलेलं नावच द्यायला पाहिजे..."

"हां! एक्झॅक्टली.. मला हेच म्हणायचं आहे... म्हणजेच एका नावाची एक लाख माणसे एकाचवेळेस असू शकतील..."

"हो पण पुरते ऐका की तुम्ही??"

"बोल..."

" त्या बालकाला ते नाव मिळायचे.. ते त्याचे प्रथम नाव.. त्या बालकाला जन्म देणार्‍या वडिलांचे नाव त्या प्रथम नावाच्या पुढे लागायचे आणि शेवटी आडनाव... असे तीन नावांचे कॉम्बिनेशन समान असणारा दुसरा गृहस्थ जगात असणे खूपच अवघड!"

"तू दिशाभूल करतोयस... त्या काळी माझ्यामते फक्त स्त्रीच जन्म देऊ शकायची मुलांना..."

"म्हणजे काय? मग आता कोण देतं??"

"कुणीही..."

"कुणीही??? म्हणजे???"

"म्हणजे जन्माला आलेलं बालकही स्वतःपासून एक क्लोन तयार करू शकतं स्वतःचा... "

"फेकता काय मंगळावर??"

"फेकता काय म्हणजे??"

"म्हणजे बंडला मारता का??"

"म्हणजे काय??"

"अरे पुड्या सोडतोस का तू???"

"याचा अर्थ काय??"

"आट्या टाकतो का आट्या????"

"हा काय बोलतोय कुणाला समजतंय का??"

"थापा मारतोस का तू??"

"छे??? ... यात काय थाप?? काही दिवसांनी तू तुझ्यासारखे अनेक ४६३४४ तयार करू शकशील.."

"तू कोण आहेस? मूळ माणूस की मूळ माणसाने तयार केलेला क्लोन??"

"मी मूळ आहे... पण हा शेजारी उभा आहे तो क्लोन आहे..."

गोप दचकलाच!

"म्हणजे असे प्रत्येकाचे क्लोन असतात???"

"हो... ते सगळे मंगळाच्या एका चंद्रावर असतात... थंड वातावरणात..."

"पण.. पण ते शांत कसे बसतात???"

"म्हणजे काय??"

"म्हणजे .. त्यांच्यात्यांच्यात हाणामार्‍या होत नाहीत??? त्यांच्यावर मूळ माणसाचा कंट्रोल कसा काय??"

"प्रत्येक जण आपला क्लोन निद्रितावस्थेत ठेवून देतो.. सगळे झोपलेले असतात..."

"अन खायला प्यायला??"

"मायनस ४६ डिग्रीमध्ये काय खाणार??"

"म्हणजे प्रेतासारखे पडलेले असतात नुसते???"

"हो... समजा आपला एखादा हात फ्रॅक्चर झाला तर क्लोनचा हात आणून लावायचा..."

"पण... पण तो क्लोन बोंब नाही का मारत??"

"त्याला काय कळतंय?? "

"म्हणजे काय??"

"तो झाडासारखा असतो... नुसता शांत पडलेला असतो..."

"असे किती क्लोन आहेत तुझे???"

"परवडण्यावर आहे... माझे तीन आहेत.. साहेबांचे सोळा आहेत...."

"पण ते जिवंत कसे राहतात??"

"तू नाही का राहिलास?? जिवंत राहण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या गरजा नसतातच.. "

"असं कसं??"

"झाडांना कुठे काय असतं??"

"का? ते जमीनीतून पाणी शोषतातच की??"

"हो मग क्लोन्सना वायूभक्षण करता येतोच की??"

"मलाही एक दहापाच क्लोन्स हवे आहेत माझे..."

"त्याला अ‍ॅप्रूव्हल लागतं... ते मंडई करण्यासारखे नाही आहे..."

"कुणाचं अ‍ॅप्रूव्हल??"

"ते आत्ता तुला कळून उपयोग नाही.. तू पुढे बोल..."

"हं... तर त्या बाळाला एक नांव मिळायचं.. ते बाळ जेथे जन्माला आलं तिथलं ते नागरीक व्हायचं.. "

"हां.. हेच.. मला हेच विचारायचं होतं.. "

"काय??"

"तुमच्या वेळेस फक्त पृथ्वीवरच राहायचे ना सगळे??"

"हो... का??"

"मग त्या पृथ्वीवरती वेगवेगळे विभाग का होते सगळ्यांचे???"

"का होते म्हणजे??? आपोआपच असायचे ते विभाग.."

"कोणकोणते विभाग होते???"

"अमेरिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया वगैरे..."

"हे सगळे काय आहे??"

"खंडांची नावे..."

"खंड म्हणजे काय???"

"म्हणजे समुद्रावर जे भूभाग असायचे ते एकमेकांपासून वेगळे असायचे.. प्रत्येकाला खंड म्हणायचे..."

"वेगळे असायचे म्हणजे?? वेगळेच असतात की??"

"हो मग असतात की?? नाही कुठे म्हणतोय?? त्यातलं अंतर हळूहळू वाढायचं.. वर्षाला एक सेन्टिमीटर वगैरे... म्हणजे आठ हजार सेन्टिमीटर म्हणजे... बापरे... आठशे मीटर्स लांब गेले असतील नाही सगळे खंड??"

"नाही नाही.. पण मुळात खंड वेगळे असले तरी सगळे मानवच ना??"

"मग??"

"म्हणजे एकच ना सगळे??"

"हो.. म्हणजे तसे एकच..."

"मग वेगवेगळे खंड होते म्हणजे काय??"

"आता साधंच पहा.. तू इथे मंगळावर असतोस..."

"मी इथे नसतो... मी शुक्रावर असतो... हल्ली शुक्रावर काही ठिकाणी माणूस राहू शकतो.. हजारभर माणसे आहेत तिथे.. पण सूर्याच्या अतिशय जवळ असल्यामुळे फार काळजी घ्यावी लागते..."

गोप ती विधाने ऐकून हादरलेला होता...

"बर ठीक आहे.. तू शुक्रावर राहतोस.. समजा तुझा जन्मच तिथे झालेला असला... तर मग तू शुक्राचाच रहिवासी म्हणून नाही का...अस्तित्वा....त...ये..."

"पृथ्वीशिवाय इतरत्र माणसाला जन्म द्यायला परवानगीच नाहीये..."

"अरे बाबा... ठीक आहे.. पण तू पृथ्वीच्याच एका खंडावर जन्माला आलास तर दुसर्‍या खंडावर जन्मलेल्या माणसापेक्षा तू वेगळाच नसणार का???"

"कसा काय???"

"अती थंड प्रदेशातील माणसांचा रंग वेगळा असतो.. तेथील वनस्पती वेगळ्या असतात... वातावरण वेगळे असते... अन्न वेगळे.. साधनसंपत्ती.. खनिजे .. सगळंच वेगळं... तू कुवेतमध्ये जन्माला आलास तर पेट्रोल खूप असलेल्या प्रदेशात असशील.. भारतात आलास तर शाकाहार खूप असलेल्या प्रदेशात.. रशियात जन्माला आलास तर मरणाची थंडी.. म्हणजे प्रत्येक माणसाची शरीरयष्टी.. अन्न.. सवयी.. कपडे.. रंग.. हे सगळंच वेगळं असणार ना????"

गोपची ती विधाने ऐकून तो माणूस लबाड हासत इतरांकडे पाहू लागला व म्हणाला...

"ऐकलंत?? माझाच प्रयोग योग्य होता.. त्या काळातील संस्कृतीत प्रत्येकजण मुळातच भिन्न होता.. प्रत्येकाचे अन्न, वातावरण, बौद्धिक व शारिरीक क्षमता, देहयष्टी व उद्दिष्टे भिन्न भिन्न असायची..."

गोपला हे काही समजले नाही... तो म्हणाला..

"म्हणजे काय?? असणारच की?? एक दुसर्‍यासारखा कसा काय असेल??"

"अंहं..कधीच असू शकत नाही.. पण.. आमच्या या जगात आता प्रत्येकाची शरीययष्टी 'बेस्ट पॉसिबल' शरीरयष्टी आहे.... त्याच्या हाडपेरातून त्याला जितके सुदृढ बनवता येईल तेव्हढे तो बनलेला असतो.. सगळ्यांचा आहार ठरलेलाच असतो.. वेगळे काहीही खाल्ले जात नाही.. कायदा आहे.. प्रत्येकाची उद्दिष्टे समान आहेत.. कुणालाही दुसर्‍यापेक्षा जास्त अधिकार नाहीत.. हां.. एक मात्र आहे... प्रत्येकाची विचार करण्याची कुवत मात्र भिन्न भिन्न आहे व त्या.... त्या..."

"त्या बाबत तुम्हाला काहीही करता येत नाही... हो ना???"

त्या माणसाने मान खाली घातली. सगळेच उत्सुकतेने गोपकडे पाहू लागले..

"मला पृथ्वीवरून निघताना १६९९ म्हणाल्या होत्या.. काही गोष्टी कुणालाच समजत नाहीत.. तुम्ही सगळे हे.. हे जे पॉईन्ट्स मिळवता... तू जे आत्ता म्हणालास की प्रत्येक माणसाची बौद्धिक कुवत वेगळी असते व त्यावर तुमचे नियंत्रण नाही.. १६९९ जे म्हणाल्या होत्या की कुणीही केव्हाही मरू शकतो... हे... हे सगळे काय आहे हे माहीत आहे तुम्हाला???"

".... का... य???"

"ऐक मित्रा... मी मागे एक पुस्तक वाचलेले होते... त्यातील माहिती मी दहा दहा वेळा वाचली... फारच अद्भुत वाटली मला ती माहिती.. पुस्तक म्हणजे काय माहीत आहे ना???"

अनेक माना नकारार्थी हालल्या...

"कागद म्हणजे काय माहीत आहे??"

"अर्थातच..."

"तुम्ही कागदाचा उपयोग काय करता???"

"अनेक उपयोग आहेत... का??"

"त्यावर मजकूर .. म्हणजे मॅटर लिहीत नाही????"

"... छे?????"

"हं... आमच्यावेळेस कागदावर लिहीले जायचे...."

अचानक खळबळ माजली. काही संतापलेले आवाज गोपच्या कानावर पडले. काही माणसे टिचक्याही वाजवत होती. त्या सर्वांना इतर काही जणांनी शांत केले...

"काय झालं काय??? हे आवाज कसले??"

"सगळे चिडले होते तुझ्यावर.... हल्ली कागद मिळत नाहीत याला तुमच्या काळातील लोक जबाबदार आहेत म्हणून..."

"कागद तर झाडापासून बनवतात पण..."

"हो पण झाडे सगळी साउदर्न हेमिस्फिअरवर आहेत ना... "

"त्याला मी काय करणार??"

"बरं तू बोल पुढे...."

"हं... तर आपल्याला असलेली माहिती लोक कागदावर लिहायचे व ते कागद इतर लोक वाचायचे.. त्यातून त्यांनाही ती माहिती मिळायची... त्यातच ते सगळे लिहीलेले होते... वीस अब्ज वर्ष झाली असतील त्या घटनेला.. वीस अब्ज वर्षांपुर्वी एक सूक्ष्म बिंदू होता... हे सगळे तुम्हाला माहीत असेलच ना???"

"अं??? ... नाही... हे कशाबद्द्ल आहे???"

"ऐक... एक बिंदू होता... तो बिंदू कुठे होता... का होता... हे काहीही माहीत नाही... कुणालाच... मात्र त्या बिंदूमध्ये अमर्याद गुरुत्वशक्ती व अमर्याद वस्तूमान होते... वस्तूमान म्हणजे डेन्सिटी.. डेन्सिटी इतकी जास्त होती त्याची.. की त्या बिंदूच्या भोवती.. अख्ख्या विश्वात जे काय असेल ते सगळे त्या सूक्ष्म बिंदूचाच भाग बनून राहिलेले होते.. तो बिंदू किती वर्षापुर्वी होता हे सांगता येईल.. पण त्या बिंदूच्या आधी काय होते हे कधीच सांगता येणार नाही... कारण आज असलेली कालमापन पद्धतच अस्तित्वात नव्हती.. खरे तर 'काळ' हा घटकच नव्हता तेव्हा.... आज आपण ज्याला सेकंद मिनिट तास आठवडा वर्ष आणि दशक शतक म्हणतो असे काहीही नव्हते तेव्हा.. कारण मुळात काही नव्हतेच तेव्हा.. कोणतीही प्रक्रिया घडत नव्हती... कुणीही नव्हते.. काहीही नव्हते.. तो बिंदू स्वतःच्याच केंद्रबिंदूने स्वतःच्याच पृष्ठभागावर पाडलेल्या गुरुत्व प्रभावामुळे आत आत खेचला जाऊन इतका सूक्ष्म झालेला होता की इतके अमर्याद वस्तूमान त्यात मावणे हे अशक्य होऊ लागले.. त्याच वस्तूमानाचा दाब आता त्याच बिंदूच्या मध्यभागावर पडू लागला.... आतू बाहेर आणि बाहेरून आत असा प्रचंड दाब.. अमर्याद दाब.. ज्याची कल्पना करणे.. तितकी एनर्जी असते यावर विश्वास ठेवणे.. हेच शक्य होणार नाही... या अमर्याद परस्परविरोधी दाबामुळे...

एक महाभयानक स्फोट झाला.. तो बिंदू फुटला... शकले शकले झाली त्याची... आतील सर्वच्या सर्व वस्तूमान निमिषार्धात बाहेर फेकले गेले..

ही होती 'काळ' या घटकाची सुरुवात... ज्या क्षणी तो स्फोट झाला तो क्षण आपल्या विश्वाच्या इतिहासातील पहिला क्षण होता... सर्वात पहिला क्षण.. त्या आधी एकही सेकंद कधी झालेला नव्हता.. कारण कशाला होणार तो सेकंद?? कोणत्या प्रक्रियेला?? कोणती प्रक्रियाच अस्तित्वात नव्हती म्हंटल्यावर सेकंद हा कालमापन घटक अस्तित्वातच कस येणार?? या स्फोटामुळे तो अस्तित्वात आला.. पहिला सेकंद... पहिला सेकंद ते आज.. २० अब्ज आणि आठ हजार वर्षे...

इतका अमाप कालावधी गेलेला आहे तो स्फोट होऊन.. आणि असे मानले जाते की अजून तितकीच वर्षे.. म्हणजे बहुतेक वीस अब्ज वर्षे.. हे विश्व असेच फेकले जात राहील.. एकमेकांपासून सगळे विभक्त होत राहतील.. तारे.. ग्रह.. ग्रहांचे चंद्र.. धूमकेतू.. कृष्णविवरे... सगळे काही..

मास! याला मास असे म्हणत होता तो लेखक.. मी आशाला वाचून दाखवले पण तिला त्यात काडीचा इन्टरेस्ट नव्हता.. मला मात्र होता..

हे मास सुरुवातीला विविध वायू व धूळ या स्वरुपाचे होते... ते चक्राकार पद्धतीने त्या मूळ बिंदूच्या भोवती फिरू लागले.. मग त्या वायू आणि धुळीपासून पुंजके बनू लागले.. विरळ विरळ पुंजके... ते पुंजके त्यच स्वरुपात लांब लांब जातही त्याच बिंदूभोवती फिरू लागले.. त्यांच्यातील अंतर जसे झपाट्याने वाढू लागले तसा फिरण्याचा वेग कमी कमी होत गेला.. दोन पुंजक्यांमधील अंतरे अमाप आणि अमर्याद वाढू लागली.. पुढे पुढे या पुंजक्यातील धूळ आपला गुरुत्वप्रभाव त्याच पुंजक्यांमधील वायूच्या कणांवर पाडू लागली व धूळ व वायू यांचा पुंजका आत आत शोषला जात त्याचा एक गोल बनला.. गोल म्हणजे नेमका स्फिअर नसेलही.. पण वर्तुळाकार फिरत असल्यामुळे त्यांनाही गोलाकारच प्राप्त होऊ लागला..

एक पुंजका.. आपल्याला वाटेल की एक पुंजका म्हणजे हा इतकासा.. तसे नव्हते.. एका पुंजक्यात अब्जावधी आकाशगंगा होत्या... आज ज्याला तुम्ही गॅलक्सी म्हणता आणि स्वतःला ६४२ क्रमांकाच्या गॅलक्सीवरील मानवजमात म्हणवता ती गॅलक्सी अशाच एका पुंजक्यातील केवळ एक न दिसू शकणारा ठिपका आहे...

एकमेकांपासून अमर्याद अंतरे कापलेले आणि अचाट प्रसरण पावलेले हे विश्व... आज कुठे कुठे पोचलेले आहे ते मानवाला ज्ञात असणे अशक्यच.. इतकेच काय तर मगाशी १६९९ म्हणाल्या त्याप्रमाणे ६४१ आणि ६४३ या आकाशगंगावरील सृष्टीपर्यंत माणूस पोचतही नाही... म्हणजे आपल्याच पुंजक्यातही आपण कुठे जाऊ शकत नाही... तर हे विश्व कुठे कुठे पोचलेले असेल हे कसे आणि कधी आणि कुणाला कळणार?? अशक्यच आहे ते!

तर आता मुद्यावर येतो... हा सगळा इतिहास आमच्यावेळेस अनेकांनी लिहून ठेवला होता... मात्र प्रत्येक पुस्तकात.. हा इतिहास लिहायला सुरुवात करताना.. हटकून एकच वाक्य असायचे... ते म्हणजे...

तो बिंदू का निर्माण झाला आणि त्याचा स्फोट का झाला, कधी झाला आणि नेमक कुठे झाला हे कुणालाही कधीही कळलेले नाही...

याचाच अर्थ मंगळावर आलेल्या माणसांनो... आज तुम्ही मला येथे उभे करून जुनी संस्कृती.. जी लयाला जाऊन आठ हजार वर्षे झालेली आहेत.. तिचा अभ्यास करू पाहात आहात... मात्र तुमचेही मेंदू.. कितीही प्रगत असले ... कितीही तंत्रज्ञान विकसित असले तरीही... विश्वाचे रहस्य आणि तुम्ही यांच्यात अजूनही तितकेच अंतर आहे... जितके माझ्याकाळच्या माणसांमध्ये आणि विश्वाच्या रहस्यात होते...

सांगण्याचा उद्देश इतकाच... की प्रत्येक धर्माच्या... आता धर्म म्हणजे काय हा प्रश्न तुम्ही विचारालच.. तर त्याबाबतची माहिती आधी सांगतो...

आधी सांगितल्याप्रमाणे विश्व प्रसरण पावल्यानंतर पुंजक्यांमध्ये असलेल्या आकाशगंमधील एकेका सूर्यमालेत एकेक तारा होता... आपला सूर्य हा लहान तारा आहे.. तो तार्‍यापासून तयार झालेला तारा आहे.. मूळ तारा नाही... अशा सूर्यापासून एका विशिष्ट अंतरावर व एका विशिष्ट अक्षात जर एखादा ग्रह फिरला व फिरता फिरताच स्वतःभोवतीही फिरला तरच त्याच्यावर आपल्यासारखी जीवसृष्टी निर्माण होऊ शकते या संकल्पनेला तुमच्या या अतीप्रगत पिढीने तडा दिलेला आहे.. तुम्ही स्वतःच्या जगण्यासाठी अत्यावश्यक असलेले ऑक्सीजन, पाणी व अन्न हे घटक मंगळ, चंद्र व काही प्रमाणात शुक्रावरही निर्माण केलेले दिसत आहेत.. मंगळावर पाणी मिळावे म्हणून तुम्ही मंगळाच्याच एका चंद्रावरील हायड्रोजन आणि ऑक्सीजनचा संयोगही करत आहात.. अचाट शक्ती आहे मानवाकडे हेच खरे..

पण एक काळ असा होता.. जेव्हा सूर्याभोवता फिरता फिरताच स्वतःभोवतीही फिरणारा व सूर्यापासून एक विशिष्ट अंतर राखून एका विशिष्टच अक्षात फिरणारा एकमेव ग्रह होता तो म्हणजे पृथ्वी... आजही तसा ग्रह एकमेवच आहे.. फक्त तुम्ही इथे येऊन पोचला आहात..

तर ती पृथ्वी अर्थातच अती तप्त होती.. कालांतराने ती थंड होत गेली.. तिच्या गर्भातील तापमान आजही अफाट असणारच.. पण पृष्ठभाग निवळला... तेथे पाणी निर्माण झाले कारण पृथ्वी या एकाच ग्रहावर ऑक्सीजन असल्याचे ज्ञात आहे.. तोही भरपूर प्रमाणावर... अर्थातच.. ऑक्सीजन व पाणी यावर तग धरू शकणारे सजीव पहिल्यांदा समुद्रात निर्माण झाले.. हे सजीव कसे निर्माण झाले यातही निसर्गाचीच किमया आहे.. आणि या सजीवांपासूनच पुढे कालांतराने उत्क्रांती होत होत आजच्या मानवाचाही जन्म झाला.. हे मानव पृथ्वीवरील विविध भूप्रदेशांमध्ये जन्माला आल्यामुळे व आज तुमच्यापैकी प्रत्येकाला आहे तितके शास्त्राचे ज्ञान नसल्यामुळे पृथ्वीलाच सबकुछ मानणे, सूर्याला देव मानणे, सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो असे मानणे वगैरे पातळ्या येत गेल्या...

एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या... की आज जरी तुम्ही सर्वांना समान समजत असलात तरीही सगळे मुळातच समान नसतातच...

प्रत्येकाचा मेंदू.. अनुभव.. वय.. शरीरयष्टी.. प्रादेशिक सुबत्ता.. शिक्षण.. असे अनेक घटक प्रभाव पाडतात...

यातूनच एक श्रेष्ठ व दुसरा कनिष्ठ असे वर्गीकरण व्हायचे....

ताकदीने कमी असलेल्यांना... म्हणजे दुर्बल लोकांना ताकदवान लोकांनी आपले गुलाम बनवले.. त्यांच्याकडून स्वतःची कामे करून घेणे व स्वतः अधिकाधिक आरामात आयुष्य घालवणे हे सुरू झाले.. यातूनच बंड उभे राहू लागले.. ते निपटून काढण्यासाठी अनेकदा अज्ञात शक्तीबाबत काही ग्रह निर्माण करून देण्यात आले.. जसे ताकदवान लोकांना त्या शक्तीनेच ताकदवान बनवलेले आहे.. ती शक्ती त्यांना प्रसन्न झालेली आहे.. असे असे वागलात तर कोप होईल वगैरे... कोप म्हणजे त्या शक्तीने दिलेली शिक्षा... आता याला तर काही धर्म म्हणता येत नव्हते... मग काही पीडित वर्गातील सूज्ञ लोकांनी खूप खूप न्याय्य विचार करून एक समाजप्रणाली लिहून काढली.. ती लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करताना ते स्वतःच मारले गेले... त्यांचा छळ केला गेला सामर्थ्यवान वर्गाकडून.. कारण त्यांचे म्हणणे रास्त मानले गेल्यास सामर्थ्यवान वर्गाचे प्रभुत्वच गेले असते...

जवळपास सगळेच धर्म हे अशाच पीडित वर्गातील छळ सहन करणार्‍या विचारवंतांनी निर्माण केलेले दिसतात... मी हिंदू धर्मात आहे... आमच्या धर्मातील मूळ दैवते राम व कृष्ण यांनी अनुक्रमे रामायण व महाभारत या काव्यकथांमधून धर्म विशद केले.. तेच पाळले जात होते आमच्या काळपर्यंत... पण महत्वाचा मुद्दा असा.. की हा धर्म एका विशिष्ट प्रदेशात व वंशात जन्माला आलेल्यांपुरताच मर्यादीत होता.. जसे अरबस्तानात व मंगोलिया या देशात जन्माला आलेल्या व वंशाने अरब, मुघल असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा जन्मजात धर्म मुसलमान हाच असणार.. नंतर अर्थातच बदला यायचा धर्म.. पण अशा बाबी क्वचितच...

तर असे विविध धर्म निर्माण झाले.. संपूर्ण जगाचे व सूर्यमालेचे, त्यातील आपल्या नगण्यतेचे, सर्वांमागे असलेली शक्ती एकच असणार या वस्तुस्थितीचे ज्ञान नसणार्‍या मानवाने त्यावेळेस आपापल्या भौगोलिक प्रदेशानुसार आपापले धर्म स्थापन केले...

प्रश्न येथेच संपला नाही... काही धर्मवादी कडवे तर काही स्वातंत्र्याला महत्व देणारे... सर्वसमावेशक असे... मी ज्या धर्मात आहे तो धर्म सर्वसमावेशक मानला जायचा... इस्लाम धर्म पाळणारे अनेकदा कडवे असायचे...

कोणताही धर्म 'दुसर्‍या धर्मातील लोकांना आपलाच धर्म जबरदस्तीने पाळायला लावा' अस कधीच सांगत नाही... मात्र त्यातील तत्वांचा सोयीस्कर अर्थ लावून इतर धर्मियांवर आक्रमणे करण्यात आली.. त्यात विध्वंस झाला... संस्कृती मिक्स होत गेल्या... शेवटी शेवटी अण्वस्त्रे निघाली... आणि अण्वस्त्रे निर्माण झाल्यावर व एकदा त्यांचा वापर झाल्यानंतर सर्व जगाला पटले... की अण्वस्त्रे जर वापरली तर मानवजातीचाच विध्वंस होईल... मग नुसतेच एकमेकांवर दबाव आणणे व इतर काही विधायक कार्ये करणे यासाठी त्या शस्त्रांचा वापर होऊ लागला.. याचा परिणाम म्हणजे जगात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले... भांडवलवादी सामर्थ्यवान देशांकडून होणारी पिळवणूक थांबावी यासाठी प्रयत्न होऊ लागले..

मला खूप आश्चर्य वाटते.... आश्चर्य या गोष्टीचे वाटते की....

.. ज्या मानवतेच्या आणि सर्व समान असण्याच्या शिकवणीसाठी आमच्या भारत देशातील अनेक नेत्यांनी आणि संतांनी स्वतःचे जीवन व्यतीत केले... ती समानता आज तुमच्या इतक्या प्रगत मेंदूच्या लोकांमध्ये आली कुठून???

तुमच्यात तर एकही संत दिसत नाही... तरीही कुठेही मारामार्‍या नाहीत... साधा राग आला तरी तो तुम्ही लोक व्यक्त करत नाही... टिचक्या वाजवता... सर्वत्र व्यवस्थित वाहतूक... तुमच्याकडे विविध देश नाहीत.. कोणीही कोणत्याही धर्माचा नाही तर फक्त एक विशिष्ट नंबर असलेला मानव आहे...

हे... हे असे घडलेच कसे?????
---------

गोपचा हा लांबलचक संवाद अत्यंत तन्मयतेने ऐकत असताना व नोट करून घेत असतानाच गोपच्या या शेवटच्या प्रश्नाने सर्वांचीच तंद्री भंगली. सगळेच एकमेकांकडे पाहू लागले. मात्र १६९९ अजूनही गोपकडेच पाहात होती. ती कल्पना करत होती की ती स्वत जर ८००० वर्षांपुर्वीची असती तर या नवीन जगाशी स्वतःला मॅच करून घेताना तिला किती त्रास झाला असता. गोपने परिस्थिती फारच परिपक्वपणे सांभाळलेली होती असे तिला वाटत होते. वास्तविक गोप मुळापासून हादरलेला होता. इथे आत्ता य जगात जगण्यापेक्षा आपण आधीच बेशुद्धावस्थेत मेलो असतो तर बरे झाले असते इथपर्यंत विचार करण्यापर्यंत त्याची मजल गेलेली होती. पण १६९९ ला मात्र आश्चर्यच वाटत होते.

पण एका बाबतीत मात्र गोप हुषार होता. त्याने फक्त विश्वाची निर्मीती व धर्म आणि प्रांतांची निर्मीती इतकेच सांगितलेले होते. या सर्वांना अपेक्षित होते ते हे की समोर असलेली चित्रे, चित्रणे, जुनाट वस्तू व पुतळे वगैरे वरून गोपने त्या संस्कृतीत त्या त्या गोष्टी काय काय होत्या हे सांगावे. गोपने त्या विचारापासून फाटाच घेतलेला होता.

१६४२ इथलाही प्रमुखच दिसत होता. तो गहन चेहरा करून उभा राहिला. सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. १६४२ बोलू लागला.

"गॅप! काहीतरी गॅप आहे... नक्कीच... कारण हा ४६३४४ जे बोलत आहे तो अभ्यास तर याही संस्कृतीने केलेला आहे... बिग बॅन्ग थिअरी आणि याने सांगितल्यापेक्षा कितीतरी अधिक ज्ञान आपल्याकडेही आहे... पण.. हा ज्या संस्कृतीत राहत होता आणि आपण ज्या संस्कृतीत आहोत.. त्यात ज्ञान फक्त इतकेच कसे काय वाढले???

आपल्यातील अनेकांना धर्म, प्रान्त, त्यावरून होणारे युद्ध यातील प्रत्येक तपशीलाची माहिती नसली तरी मला ती माहिती आहे.. बहुतेक १९३९ ते १९४५ या कालावधीत कुठले तरी भयंकर युद्ध झालेले असावे... ज्यात बहुतांशी पृथ्वीवासीय सहभगी झालेले होते... ते युद्ध का झाले ते माहीत नसले तरीही युद्ध झाले हे मानण्याइतपत पुरावे आहेत आपल्याकडे...

आणि त्यानंतरचे युद्ध २०७५मध्ये झाले... त्या युद्धात बर्‍याच मोठ्या भूभागावर परिणाम झाला... पण.. मानव टिकून राहिला... मग असे असेल तर... इसवीसन ४००० मध्ये जो प्रलयंकारी भूकंप झाला तोवर २०७५ मध्ये टिकलेल्या मानवाची.. म्हणजे त्या १९२५ वर्षात जबरदस्त प्रगती व्हायला हवी होती... आणि मुख्य म्हणजे... ती प्रगती होवो न होवो... इसवीसन ६०१२ साली असे काय झाले कुणास ठाऊक.. की ४००० च्या भूकंपानंतरच्या २०१२ वर्षांमध्येही मानव अप्रगतच होता... आणि इसवीसन आठ हजार एकवीसमध्ये मात्र तो अत्यंत प्रगत झाला... आणि आत्ताचे तर सगळे सगळ्यांना ज्ञातच आहे...

या प्रत्येक टप्प्यावर असे काय झाले जे आपल्याला समजत नाही आहे.. काय रे ४६३४४... तुला काहीमाहीत आहे २०७५ च्या वॉरबाबत???"

गोप बावळटासारखा म्हणाला...

"मला कसे माहीत असणार?? मी २००० सालीच बेशुद्ध नाही का पडलो???"

जमलेल्या प्रत्येक माणसाने स्वतःच्या उजव्या बोटांनी स्वतचा वरचा ओठ वर उचलला व डाव्या हाताच्या बोटांनी डावा ओठ खाली ओढला. असे प्रत्येकाने तीन वेळा केले. अगदी १६४२ नेही!

गोप - हे .. हे काय केले सगळ्यांनी???

१६४२ - तू विनोद केलास त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली....

गोप - मला एक समजेल का??? तुम्ही सगळे असे विचित्र का वागता?? अरे हसू आले तर हसा की???

१६४२ - पण.. हसू तर... आनंद झाला की येते ना??

गोप - मग विनोद ऐकल्यावर तुम्हाला गहिवरून वगैरे येते का??

१६४२ - म्हणजे काय??

गोप - विनोद झाल्यावरही हासतातच ना??

१६४२ - काय सांगतोस?? का पण??

गोप - का म्हणजे?? त्या परिस्थितीचे हसू येतेच आपोआप... आता समजा आमच्या जगात एखादा माणूस 'मी कसा मगाशी उडालो वर' तसा उडाला असता तर सगळे हासले असतेच...

१६४२ - हो पण पृथ्वीवर कसा कुणी उडेल?

गोप - अरे मंगळावर उडाला तरी हासलेच असते...

१६४२ - का??

गोप - का म्हणजे काय? गंमत नाही का वाटत एक माणूस आपला चाललाय वर वर्...पक्ष्यासारखा..

१६४२ - त्यात काय वाटायचंय?? इथे गुरुत्वाकर्षण कमी आहे..

गोप - तुम्ही रुक्ष आहात... सगळेजण.. तुमच्या संस्कृतीत विनोदच नाहीये???

१६४२ - विनोद म्हणजे काय?? नीट सांग...

गोप - व्वा! काय प्रश्न आहे.. म्हणे विनोद म्हणजे काय..

१६४२ - सांग..

गोप - विनोद म्हणजे.. च्यायला खरच की राव.. विनोदाची व्याख्या काय???

१६४२ - म्हणजे काय?? ज्या गोष्टीला व्याख्याच नसते ती झाली की हसायचात का??

गोप - गप रे जरा.. मला विचार करू देत... हां.. आता मला सांग...

१६४२ - काय??

गोप - की समजा एखादा नवरा आपल्या जाड बायकोला फार भिऊन वागत असेल आणि ती त्याला कुंच्याने मारताना आपण पाहिले तर आपल्याला हसू नाही का येणार???

१६४२ - काहीही समजले नाही..

गोप - काय समजले नाही??

१६४२ - अनेक शब्द समजले नाहीत... नवरा म्हणजे काय???

गोप - नवरा म्हणजे भूतलावरचा एक सर्वाधिक उपेक्षित प्राणी...

१६४२ - प्राणी??????

गोप - प्लच.. म्हणजे माणूसच रे.. तशी पद्धत आहे म्हणायची...

१६४२ - उपेक्षित म्हणजे??

गोप - ज्याची सतत कुचंबणा होते...

१६४२ - कुचंबणा म्हणजे काय??

गोप - कुचंबणा म्हणजे जे करायचे असणे ते करायला न मिळणे आणि जे करायचे नसणे तेच करावे लागणे..

१६४२ - असं काहीच होत नाही आमच्यात...

गोप - कसं होईल?? लग्न कुठे होतात तुमची???

१६४२ - लग्न म्हणजे??

गोप - लग्न म्हणजे स्त्री व पुरुष या दोघांनी एकत्र राहण्यासाठी केलेला विधी...

१६४२ - विधी?? व्हॉट इज विधी??

गोप - एक फॉर्मॅलिटी...

१६४२ - पण एकत्र का राहायचे??

गोप - तेव्हा मुले तशीच होत.. वेगवेगळे राहिल्याने मुले होत नसत...

१६४२ - म्हणजे मुले होण्यासाठी एकत्र राहायचे महिनाभर??

गोप - महिनाभर??? आयुष्यभर... आणि महिनाभर राहून कसे काय चालेल??

१६४२ - महिन्यात मूल होतं म्हणून विचारलं..

गोप - महिन्यात मूल होतं??? भलतीच प्रगती म्हणायची.. म्हणजे मग डोहाळजेवणच नसेल नाही??

१६४२ - व्हॉट इज डोहाळजेवण??

गोप - मला सांग.. जिला मूल होणार त्या बाईला गर्भ राहिल्याच्या पहिल्या आठवड्यात काही खावेसे वगैरे वाटते का??

१६४२ - सारखेच खावेसे वाटते..... का?? तुमच्यावेळेस अशा माणसाला उपाशी ठेवायचात???

गोप - माणसाला??? अरे हो... हल्ली कुणालाही मूल होते नाही का?? आणि बारसेही नसणार तुमच्यात..

१६४२ - बारसे म्हणजे???

गोपने पाळण्यावरून आणि खालून बाळ इकडून तिकडे देण्याची अ‍ॅक्शन करत विचारले..

गोप - कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या???

१६४२ - हे काय असते???

गोप - .. हां.. सॉरी... तुम्ही असे म्हणत असाल नाही का??.. कुणी ११२२ घ्या.. कुणी ११२३ घ्या...

१६४२ - चूSSSSSSSSSSSSSSप...

दचकलाच गोप! सगळे मान तुकवून काहीतरी पुटपुटत होते. मिनिटभरानंतर १६४२ म्हणाला..

१६४२ - ११२३ चे नाव घ्यायचे नाही तोंडातून.. तो आमचा महान नेता आहे..

गोप - सॉरी... काय केले तुमच्या त्या महान नेत्याने??

१६४२ - काय केले??? त्यानेच असत्य लक्षात येणार्‍या चीप्स बनवल्या... ते अहिंसावादी होते..

गोप - त्यांची दुर्दैवी हत्या झाली का हो???

आता सगळेच दचकले. गोप म्हणजे भूत असावा असे त्याच्याकडे पाहात १६४२ म्हणाला..

१६४२ - होय... तुला कसे माहीत??

गोप - अंदाज एक आपला... अहो.. मला तशी एक चीप मिळेल का हो?? मनातले न समजण्याची??

१६४२ - कुणाच्या मनातले??

गोप - अहो माझ्या मनातले इतरांना न समजण्याची...

१६४२ - मग तू काय वाट्टेल ते सांगायला लागशील..

गोप - नाही हो नाही.. माझ्या खासगी आयुष्यात मला वापरता यावी म्हणून मागतोय... मला इतकी वर्षे जिवंत ठेवलंत तर हा एक उपकार करा न माझ्यावर.. उगाचच आपले पॉईन्ट्स जात बसतात माझे..

१६४२ - त्यावर विचार करू... मल एक सांग... तू सुरुवातीला म्हणालास की पत्रिकेत अक्षर येते... ही पत्रिका काय प्रकार असतो???

गोप - ते जाऊदेत...

१६४२ - ते जाऊदेत असे म्हणून चालणार नाही... खलास होशील..

गोप - आता जगलो की ८००० वर्षे.. टाका मारून मला.. सारख्या आपल्या धमक्या, दहशत आणि भीतीच..

१६९९ हळूच उठली आणि स्वतःच्या पोटावर हात ठेवून १६४२ कडे आली. त्याला पुटपुटत म्हणाली...

१६९९ - आपण त्याला ब्रेक देऊ... तो खूप वेळ बोलतोय...

१६४२ मात्र सतत तिच्या पोटावर ठेवलेल्या हाताकडे बघत होता. तिने पटकन हात बाजूला घेतला.

१६४२ - ओक्के... सो गाईज... आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात... अर्ध्या तासाने आपण पुन्हा भेटू!

विश्रान्तीच्या काळात १६९९ गोपला घेऊन एका दालनाच्या आत गेली. खूप प्रशस्त अशी खोलीच होती ती एक! त्यत सर्व सुविधा होत्या. एक गुबगुबीत गादी असलेला बेडही होता. १६९९ ने अंगुलीनिर्देश केल्यावर गोप त्या बेडवर जाऊन बसला.

१६९९ - आता तिथेच बस तासभर... आणि नीट विश्रान्ती घे.. पुढचा सेशन एक तासाने आहे... प्रश्नोत्तरांचा... त्यासाठी तू फ्रेश असायला हवास....

गोपने आनंदाने विचारले...

"एक तास????? ते साहेब तर अर्धाच तास म्हणाले होते..."

"तो मंगळाचा अर्धा तास आहे... त्याचा अर्थ पृथ्वीवरचा एक तास होतो... "

"तुम्ही चाललात का???"

"हो... काही लागलं तर ती बेल वाजव... एक माणूस येईल... "

"एक विचारू शकतो का???"

".... काय???"

"ते... मगाशी तुम्ही... त्या साहेबांशी बोलायला गेलात तेव्हा.. पोटावर का हात ठेवला होतात?? चीप वाजू नये म्हणूनच ना????"

गोरीमोरी होत १६९९ पाहू लागली.

"मी थकलो आहे असे तुम्हाला वाटले म्हणून तुम्ही विश्रान्तीचा तास मागीतलात ना??"

१६९९ ने निरखून गोपचे पोट पाहिले. कुणी याला एखादी चीप दिली की काय हे तपासले..

"काय बघताय???"

"तुला.... चीप तर नाही ना दिली कुणी????"

"नाही... का???"

या 'का' चे उत्तर देणे म्हणजे स्वतःचा पराभव मान्य करण्यासारखे होते.. त्याच्याकडे चीप नसतानाही त्याने अत्यंत अचूक निदान कसे केले हे १६९९ ला समजेना...

पण तरी तिने गोंधळल्यामुळे उत्तर दिलेच...

"मग..... तुला... तुला कसे समजले की.. मी त्यासाठी हात ठेवला होता म्हणून.... "

गोप खूप गंभीर झाला. खाली जमीनीकडे पाहात म्हणाला...

"मन ही सगळ्यात कार्यक्षम चीप असते आ........ शा....... "

गुलमोहर: 

भुषणराव,
विश्वउत्त्पत्तीची घटना जरी काल्पिनिक असली तरी या लेखाच्या सहाय्याने छान माहीती व एक अंदाज मिळाला.

"मन ही सगळ्यात कार्यक्षम चीप असते" >> भावला विचार.

भुषणराव,
विश्वउत्त्पत्तीची घटना जरी काल्पिनिक असली तरी या लेखाच्या सहाय्याने छान माहीती व एक अंदाज मिळाला.

"मन ही सगळ्यात कार्यक्षम चीप असते" >> भावला विचार.

पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत.

आशा!
हा चांगलाच धक्का मिळल.
यात काही तरी रहस्य कथेप्रमाणे जाणवत आहे.
ज्याप्रमाणे आदिमानव जास्त चिवट आणि जवळ जवळ आताच्या मानवा इतकाच बुद्धीमान होता
तसाच आताचा मानव त्याकाळी जास्त शक्तिमान असेल का?
का जेनेटिक बदलांमुळे कमकुवत असेल?

मस्त...

बेफिकीरजी, वा!!! Happy सुंदरच चाललीये कथा.... किती पायाभूत संकल्पना समजावल्या आहेत. प्रचंड कसोटीचं काम आहे अशा पद्धतीने विचार मांडणं... ह्यासाठी डोळसपणे जग पाहण्याची वृत्ती, भरपूर ग्रास्पिंग पॉवर, स्मरणशक्ती, वाचन, चिंतन आणि मनन हवं, जे तुमचं आहेच आणि हे कमी की काय? म्हणून ते सगळं लेखणीतून सुरसपणे उतरवण्याचं कौशल्यही आहे. किती वेगवेगळे विषय हाताळत आहात!!!! धन्य आहात ___/\___ Happy
राजकारण, समाजकारण, इतिहास, भूगोल, आदिम संस्कृती, तत्वज्ञान, मानसशास्त्र, खगोलशास्त्र अशा सगळ्याच प्रांतांतून लीलया संचार केलाय तुम्ही बेफिकीरजी... आणि गोप सोबतचे संवाद तर फार फार आवडले... कागद मानवाच्या वापरामुळे संपले यावरुन चिडलेले लोक, त्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरत असलेल्या वेगळ्या हालचाली... क्लायमॅक्स मधले गोपचे आ....शा म्हणणे..सगळेच क्लास!!! पुन्हा एकदा निवडक १० त नोंदवत आहे... भन्नाट हा एकच शब्द ह्या कादंबरीसाठी शोभतो! कीप इट अप!!!! Happy

मी ही कादंबरी आत्ताच पाहिली आणि वाचली.३ भाग एकत्र वाचायला मिळाल्याने मजा आली.
मस्त आहे. पुढिल भाग वाचायला उत्सुक.

वा बेफिकीर जी,
बेफिकीर झकास आहे हाही भाग!!!
खुप पिड्तात हे भविश्यातले लोक.
पण कय हो त्याना ह्य खाल्च्या शब्दाचा अर्थ कसा काय कळाला?????

धर्म ..... तत्वांचा ............. आक्रमणे ........विध्वंस ....... दबाव .........विधायक ............कार्ये........स्वातंत्र्याचे वारे ........वाहू ............ भांडवलवादी........पिळवणूक

आश्चर्य ........ भारत....... देशातील ............संतांनी .............. समानता ...........

राग............

असो....पुढचा भाग लवकर येऊद्यात.

बेफिकीरजी खुप छान झाला हाही भाग संपुर्ण विश्वाची निमिंती कशी झाली याचे प्रत्यक्ष दर्शन अतिशय चांगल्या रितीने तुम्ही घडवलं आहे . मन ही सगळ्यात कार्यक्षम चीप आहे हा विचार आवडला . पु .भा .शुभेच्छा

सॉलीड....
तुमची कल्पनाशक्ती अफाट आहे बेफी...
म्हणजे, मानवांच्या भाव-भावना तुम्ही सूक्ष्मपणे रेखाटू शकता हे कळले होतेच पण आता भविष्यातल्या मानवांच्यापण...
मानलं तुम्हाला...
तुमच्याकडे पण एखादी चीप आहे का काय Happy

नमस्कार बेफिकिरजी,
तुमची कल्पनाशक्ती अफाट आहे.
तीनहि भाग आज वाचले.

खुपच छान...

पुढचा भाग लवकर येऊद्यात.

मस्त ! खुप छान !
इसवीसन २०७५, ४०००, ६०१२ आणि इसवीसन आठ हजार एकवीस या महत्वाच्या टप्प्यावर काय काय घडले यची उत्सुकता वाततेय !
पु. ले. शु.

भुषणराव..... शेवट वाचुन खुप हसलो.. खास करुन >>>
सारखेच खावेसे वाटते..... का?? तुमच्यावेळेस अशा माणसाला उपाशी ठेवायचात???
१६४२ - बारसे म्हणजे???
गोपने पाळण्यावरून आणि खालून बाळ इकडून तिकडे देण्याची अ‍ॅक्शन करत विचारले..
गोप - कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या???
गोप - .. हां.. सॉरी... तुम्ही असे म्हणत असाल नाही का??.. कुणी ११२२ घ्या.. कुणी ११२३ घ्या...
गोप - त्यांची दुर्दैवी हत्या झाली का हो??? >>> हा हा हा...

मधला भाग मला कळला नाहि कारण ग्रह तारे ह्या सगळ्या बाबतित अस्लेले कमि ज्ञन आणि अरसिकता...

छान !! वाचत आहे !!

"मलाही एक दहापाच क्लोन्स हवे आहेत माझे..."

"त्याला अ‍ॅप्रूव्हल लागतं... ते मंडई करण्यासारखे नाही आहे..." >>>> त्यांन्ना मंडई म्हणजे काय माहीत असेल ??

तुम्ही असे म्हणत असाल नाही का??.. कुणी ११२२ घ्या.. कुणी ११२३ घ्या >>> Rofl