१. ३ मोठी लिंबं (इथे मोठी पिवळ्या रंगाची लिंब (Lemon) मिळतात ती घ्यावीत भारतातल्यासारखी छोटी लिंबं (Lime) मिळतात ती घेवू नयेत).
२. स्वीट्न्ड कंडेन्स्ड मिल्कचा १ छोटा डबा (साधारण ४०० ग्रॅमचा मिळतो तो)
३. ताज्या हेव्ही व्हिपींग क्रीमचा १ कार्टन (१ पिंट, साधारण अर्धा लिटर) हे कुठल्याही सुपरमार्केटमध्ये मिळेल
४. १ पाकीट लेडीफिंगर बिस्कीटे (२०० ग्रॅमच्या पाकीटात २४-२५ लेडीफिंगर्स येतात तेव्हडी पुरतात)
५. ३ चहाचे चमचे साखर.
६. साधारण कपभर कोमट दूध.
७. सर्व्ह करतांना सजावटीसाठी डेसीकेटेड कोकोनट किंवा डार्क चॉकलेटचा एक तुकडा खिसून घालायला. हे ऐच्छिक आहे मी वापरत नाही.
तिरामिसुचे क्रीम -
१. पहिल्यांदा एका भांड्यात सगळ्या लिंबाच्या साली बारीक खिसणीने (आलं किसायची) बारीक किसायच्या. किसलेली साल खवलेल्या नारळासारखी दिसते. त्यात २ लिंबाचा रस पिळुन हे मिश्रण बाजूला ठेवून द्या.
२. दुसर्या एका मोठ्या भांड्यात सगळे हेवी व्हिपींग क्रीम, साखर घेवून लाकडी चमच्याने ढवळा.
३. क्रीमच्या मिश्रणात कंडेन्सड् मिल्क टाका आणि लाकडी चमच्याने ढवळा. आता हे मिश्रण बासुंदी इतके घट्ट झाले असेल.
४. आता या वरच्या मिश्रणात लिंबाचा रस + किसलेली साले यातले अर्धे मिश्रण टाका. हळू हळू लाकडी चमच्याने हलवा. मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागते. साधारण श्रीखंडाइतके घट्ट होते. या स्टेजला मिश्रणाची चव घेवून बघायची. आंबट गोड चव यायला हवी. नुसतीच गोडमिट्ट चव लागत असेल तर बाकीचा लिंबाचा रस हळू हळू घालायचा. सगळे मिश्रण नीट ढवळायचे, आतापण जर चव गोडच लागत असेल तर तिसर्या लिंबाचा रस घालायला हरकत नाही.
जसे जसे यातले लिंबाच्या रसाचे प्रमाण वाढते तसे तसे याचा घट्टपणा वाढत जातो. हे तयार झाले तिरामिसुचे क्रीम, लेडीफिंगर बिस्कीटं दूधात बुडवून कॅसरोलमध्ये रचेपर्यंत हे क्रीम मस्त घट्ट झालेले असेल.
आता एखादे कॅसरोलसारखे भांडे किंवा 8 बाय 8 चा केक टिन घ्या.
पहिला थर/लेयर - हा थर तयार करण्यासाठी एका पसरट भांड्यात कोमट दूध घ्यायचे आणि त्यात एक एक बिस्कीट बुडवायचे, बिस्कीट पूर्णपणे बुडायला हवे. मग बिस्कीट तळहातावर दाबून त्यातले दूध काढून टाकायचे आणि चपटे बिस्कीटं पॅनच्या तळाशी अगदी एकाशेजारी एक ठेवायची. संपूर्ण भांडेभर बिस्कीटांचा थर लावायचा.
दुसरा थर/लेयर - तयार केलेल्या क्रीममधले अर्धे क्रीम चमच्याने या बिस्कीटांच्या थरावर सगळीकडे पसरवायचे.
तिसरा थर/लेयर - पहिल्या थराप्रमाणेच बिस्कीटं दूधात बुडवून तळहातावर दाबून त्यातले दूध काढून क्रीमच्या थरावर नीट माडून तिसरा थर तयार करायचा.
चौथा शेवटचा थर/लेयर - उरलेले सगळे क्रीम बिस्कीटांवर पसरवायचे. झाऽऽले तिरामिसु तय्यार. आता तयार झालेले तिरामिसु ४-५ तास फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवा.
नंतर सर्व्ह करतांना तिरामिसुवर डेसिकेटेड कोकोनट भुरभुरुन किंवा डार्क चॉकलेट किसून सर्व्ह करता येईल. हे न करता पण तिरामिसु सऽऽही लागते.
Bon appetit!
१. ज्यांच्याकडे इथल्यासारखे मोठे लिंबू (लेमन) मिळत नाही फक्त लहान लिंबू (लाइम) मिळते त्यांनी लिंबाचा रस + संत्र्याची साल टाकायला हरकत नाही. फक्त संत्र्याची साल आणि संत्र्याचाच रस असे चालणार नाही. मिश्रण घट्ट होण्यासाठी लिंबाचा रस आवश्यक आहे.
२. पटकन थंड करायचे असेल तर हिवाळ्यात सरळ १५-२० मि. घराबाहेर बर्फात ठेवायचे आणि उन्हाळ्यात फ्रीजरमध्ये ठेवायचे. समजा फ्रीजरमध्ये जऽरा जास्त वेळ राहीले तर लेमन तिरामिसु आयस्क्रीम म्हणून वाढावे :). अर्थात केल्यावर लगेचच खाल्ले तर कधीतरी लिंबाच्या सालीचा कडवटपणा जाणवतो. तेव्हा पार्टीच्या आदल्या रात्री करून फ्रीजमध्ये ठेवले तर मुरलेले तिरामिसु एकदम मस्त लागते.
३. यात भऽरऽपूऽर कॅलरीज असतात पण हे इतके भारी लागते की खातांना असले काही लक्षात ठेवणे अशक्य आहे तेव्हा दुसर्या दिवशी अवश्य जीमला जाणेचे करावे
४. ही कृती मी जर्मन भाषेत शिकले तेव्हा कोणी जर्मनीत असेल आणि त्यांना हे करायचे असेल तर त्यांच्यासाठी साहित्य देतेय. penimarkt मध्ये सगळे साहित्य मिळेल.
व्हिपींग क्रीमसाठी - 2 Schlagsahne (दह्याच्या डब्यासारख्या दिसणार्या कंटेनरमध्ये हे मिळते, २०० ग्रॅचे २ डबे लागतील.)
स्वीट्न्ड कंडेन्स्ड मिल्क - Gezuckerte Kondensmilk warmebehandelt (Milch Madchen) हे टुथपेस्ट्सारख्या २०० ग्रॅ. ट्युबमध्ये मिळायचे, २ ट्युब्स लागतात.
साध्या सारखेसोबत/ऐवजी तिथे मिळते ती vanila zukcker वापरावी.
५. ओरीजनल तिरामिसुची कृती इथे सापडेल.
६. विद्यार्थीदशेत असतांना बर्याचदा ऐन वेळेला शुक्रवारी रात्री पार्टी ठरत असे तेव्हा घरातल्या असलेल्याच वस्तू वापरून हे तिरामिसु झटपट करता येई म्हणून आम्ही याला इंस्टंट तिरामिसु म्हणायचो.
लेडीफिंगर्स्/कंडेन्स्ड मिल्क/साखर/दूध/लिंबं नेहमी घरात सापडतेच फक्त घरी येतांना हेव्ही व्हिपींग क्रीम आणले की झाले त्यामुळे दहातल्या किमान आठ पार्ट्यांसाठी हे केले जायचे.
७. याला अस्सल इटालियन लोक तिरामिसु म्हणतील का हे माहीत नाही. क्रीम आणि बिस्कीटांचे एकावर एक थर असतात म्हणून आम्ही याला तिरामिसु म्हणायचो.
८. इटलीला गेले होते तेव्हा बघीतले की सगळ्या दुकानात आयस्क्रीमच्या काचेचा कपात, तर कधी छोट्याश्या साध्या काचेच्या वाटीत तिरामिसु विकायला ठेवलेले असते. त्यामुळे सर्व करायला खूप सोपे पडते. छोट्या पार्टीसाठी बर्याचदा मी ७-८ डेझर्ट कपातच तिरामिसु करते म्हणजे मग कापा आणि ताटलीत सर्व्ह करा वगैरे भानगडी कराव्या लागत नाहीत. प्रत्येकाला एक कप दिला की झाले.
यम्मो... मला फार आवडतो लेमन
यम्मो... मला फार आवडतो लेमन तिरामिस्सु
सोप्पी रेसिपी आहे एकदम
असाच स्ट्रॉबेरीज चा पण करता येतो. स्ट्रॉबेरी कुली किंवा टॉपिंग वापरायचे
लाजो स्ट्रॉबेरी कुली म्हणजे
लाजो स्ट्रॉबेरी कुली म्हणजे काय?
रुनी, "कुली" किंवा "coulis"
रुनी, "कुली" किंवा "coulis" म्हणजे साखर आणि पाणी उकळायच, कच्च्चा पाक करायचा त्यात स्ट्रॉबेरीजचे तुकडे आणि लेमन ज्युस घालुन ब्लेंड करायचे...आणि गाळायचे...कुठल्याही डेझर्त्स्वर, आईस्क्रिमवर घालुन खायचे घरच्याघरी करता येण्यासारखे...
पुन्यात या गोष्टी कुठे मिळतील
पुन्यात या गोष्टी कुठे मिळतील ते सांगा ना ( कॅपाचा पत्ता नको... लक्ष्मी रोड , सिं रोड चा चालेले )
१] भारतातल्यासारखी छोटी लिंबं (Lime) मिळतात ती घेवू नयेत
२] ताज्या हेव्ही व्हिपींग क्रीमचा १ कार्टन
३] १ पाकीट लेडीफिंगर बिस्कीटे
वर्षा_म, १. हेव्ही व्हिपिंग
वर्षा_म,
१. हेव्ही व्हिपिंग कार्टन देशात अगदी इझिली डेअरी मध्ये मिळत.
२.लाईम्स वापरल्याने चव वेगळी येईल. पण वाईट नक्कीच लागणार नाही. लेमन चा फ्लेवर थोडा फ्रुटी असतो बेसिकली. लेमन ज्युस पेक्षा १/४ क्वांटीटी कमी करावी लागेल लाइम ज्युसची.
३.लेडी फिंगर बिस्किटांच्या बदल्यात काय वापरता येईल , अंदाज करता येत नाही. पण त्या कुकीजच्या भरपुर रेसीपीज इंटरनेटवर अव्हाईलेबल आहेत.
http://www.cooks.com/rec/search/0,1-0,lady_finger_cookies,FF.html
रुनी काय चुकल असेल तर दुरुस्त कर.
धन्स सीमा
धन्स सीमा
वर्षे, लिंबाच्या ऐवजी संत्र
वर्षे, लिंबाच्या ऐवजी संत्र वापर ऑरेंज तिरामिसु होईल
अमुल चे क्रिम चे कार्टन्स मिळतात बिग्-बझार मधे ते वापर.
लेमन ऐवजी देशात
लेमन ऐवजी देशात मोसंब/संत्रे+लिंबू असे कॉम्बो पण वापरता येईल.
सीमा त्या लेडीफिंगर्सच्या
सीमा त्या लेडीफिंगर्सच्या बदल्यात काय वापरता येईल माहित नाही पण पार्ले-जी बिस्कीटं वापरली तर काय होईल असा एक विचार डोक्यात आला.
भारतात कधी कधी ईडीलिंबू म्हणून मोठे संत्र्यासारखे लिंबू मिळते ना ते वापरता येईल मिळाले तर. नेहमी मिळणार्या छोट्या लिंबाची (लाइमची) साल कदाचित कडवट निघू शकते. साल कडवट नसेल तर वापरून बघायला हरकत नाही.
हो मिनोती संत्र्याची साल + रस
हो मिनोती संत्र्याची साल + रस + लिंबाचा रस - इंट्रेस्टींग, करून बघेन मी स्वतःच पुढच्यावेळी.
छान प्रकार आहे हा. भारतात
छान प्रकार आहे हा. भारतात लिंबाची पाकवलेली साल मिळते (संत्र्या मोसंब्याची पण मिळते) ती वापरता येईल.
पार्लेजीपेक्षा गुड डे जास्ती
पार्लेजीपेक्षा गुड डे जास्ती जवळची होतील का लेडी फिंगर्स ना?
माझ्या मैत्रिणीचे व्हर्जन . तीच मँगोमिसू पण करते असेच.
मी खाल्लेले नाही कधी कारण खाऊ शकत नाही म्हणून पण लोक अगदी चाटून पुसुन प्लेट साफ करतात.
वॉव्व! मन झाले तिरामिसु!!
वॉव्व! मन झाले तिरामिसु!!
१. हेव्ही व्हिपिंग कार्टन
१. हेव्ही व्हिपिंग कार्टन देशात अगदी इझिली डेअरी मध्ये मिळत
अजिबात मिळत नाही. अमुलचे मिळते पण ते हेवी नाहिय तर लाईट आहे आणि पातळ असते. अर्थात ह्या रेसिपीत व्हिप करा आणि वापरा असे लिहिले नाही त्यामुळे वापरता येईल.
मला तिरामिसु करायची खुप इच्छा होते पण लेडीफिंगर बिस्किटे आणि मस्कारपोने चिज इकडे कुठुन मिळायला?? आता निदान लेमन तिरामिसु विथ गुडडे बिस्किट करुन पाहिन
मी करून पाहिले आज लगेच संत्री
मी करून पाहिले आज लगेच संत्री वापरुन. पण हेवी व्हिपींग क्रिम मिळत नाही म्हणून अमुलचेच वापरले. पण ते घट्ट होत नाहीये अजिबात. पण संत्र्याचा स्वाद सही आलाय. ऑरेन्ज बासुंदी म्हणून खपवावी का काय असा विचार आधी केला पण आता फ्रिजर मधे ढकललय ते भांडं. घट्टं झालं तर आइसक्रिम म्हणून खाणार नाही तर ऑरेन्ज बासुंदी
जर्मनित मिळनारे साहित्य
जर्मनित मिळनारे साहित्य सानगितले....त्याबद्दल Thanx a lot.
रुनी, आमच्या गावाकडे २
रुनी, आमच्या गावाकडे २ प्रकारची मोसंबीसदृश्य फळे दिसतात. एकाला तिथे खट्टा किंवा गलगल म्हणतात तर दुसर्याला किंब. यातलंच एक इडलिंबू. आत्ता सिझन नुकताच संपलाय. पण कुठे मिळाला तर फोटो टाकेन. ती फळ बहुदा चालतिल इथे.
मी नक्की करुन बघणार. सोप्पी रेसेपी आहे ही.
(गलगलचं लोणचं घालतात अन किंब कच्चेच तुकडे करून कोथिंबिर, गुळ, पुदिना हिरव्या मिरच्या वाटुन घालून खातात)
http://www.fruitipedia.com/galgal.htm इथे फोटो आहे गलगलचा
अल्पना, तु फोटो टाकलायस तसेच
अल्पना, तु फोटो टाकलायस तसेच लेमन्स... ते गलगल वापरुन चालेल या तिरामिसुत
सही... रूनी ह्यात कॉफीचा
सही... रूनी ह्यात कॉफीचा फ्लेवर नाही का ?
मला वाटायचं की तिरामिसू म्हणजे कॉफी असणं कम्पल्सरी असतं !!
रुनी, मस्त रेसीपी आहे!!
रुनी, मस्त रेसीपी आहे!! नक्कीच करुन पाहाणार!!
मस्तं रेस्पी गं रुने. लवकरच
मस्तं रेस्पी गं रुने. लवकरच करून बघावी लागेल.
सोप्पी वाटतेय, नक्की करून
सोप्पी वाटतेय, नक्की करून बघणार!
सहीये. करुन बघते हे.
सहीये. करुन बघते हे.
धन्यवाद. नक्की करून बघा आणि
धन्यवाद. नक्की करून बघा आणि सांगा कसे झाले तिरामिसु ते.
अल्पना तू फोटो दिलाय ते लेमन वापरून नक्की करता येईल, वर लाजोने म्हटलच आहे.
हह
माझ्यामते क्रीम घट्ट होण्यासाठी चांगला अॅसिडिक ज्युस हवा फक्त संत्रे वापरलेस का की संत्रे + लिंबू? नुसत्या संत्र्याने कदाचित होणार नाही. माझ्यामते संत्र्याची साल + लिंबाचा रस ह्या काँबोने क्रीम घट्ट व्हायला हवे. जसे जसे लिंबाच्या रसाचे प्रमाण वाढते तसा तसा दाटसरपणा वाढत जातो. अर्थात लाइट क्रीम घट्ट होईल की नाही हे करून बघितल्याशिवाय कळणार नाही
फक्त संत्रे.
फक्त संत्रे.
अजून खाऊन संपले नसेल तर
अजून खाऊन संपले नसेल तर प्रायोगिक तत्वावर थोड्याश्या क्रीममध्ये लिंबाचा रस घालून बघायला हरकत नाही.
लेडि फिं नसल्यास मारी ची
लेडि फिं नसल्यास मारी ची बिस्किटे वापरुन पण छान होते तिरामिसु.
सही गं रुनी. सायोच्या
सही गं रुनी. सायोच्या मलाईबर्फीसारखं आता तिरामिसु म्हटले की तू आठवलीच समजा
सर्वांचे आभार टिप्सबद्दल.
HH, तिरामिसु क्रिम घट्ट झाले
HH, तिरामिसु क्रिम घट्ट झाले का शेवटी?
झाले असेल तर मीही अमुल वापरुन प्रयत्न करेन.. नाहीतर वर्चुअलीच खावे लागेल
साधना, वाशी/नव्या मुंबईत
साधना, वाशी/नव्या मुंबईत शॉपराईट आहे का? तर तिथे हे.व्हि.क्रि. मिळण्याची शक्यता आहे. आमच्याइथे भांडूपला आहे, तेवढ्या लांब जाण्यापेक्षा मी लेमन्/ऑरेंज बासुंदी खाणं स्विकारेन
HH, ऑरेंज बासुंदी की ऑरेंज तिरामिसु ते सांग लवकर.
Pages