द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - ४

Submitted by बेफ़िकीर on 9 February, 2011 - 03:57

याला म्हणतात होय शिक्षा?

याची कल्पनाच नव्हती.

आकाशच्या मनास तो विचार तीव्रतेने व्यापू लागला. अत्यंत कडक ऊन, सगळीकडे नुसती रणरण आणि कारागृहाच्या मागील प्रचंड जागा खणून फ्लॅट करायचे काम! त्यावर अनेक प्रकारचे लहानमोठे दगड, झाडेझुडुपे आणि मोठाल्ले खडकही! नाश्त्यानंतर सगळेच कैदी तेथे कुदळी अन फावडी घेऊन राबायला लागलेले होते. जवळपास सव्वाशे! आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी दहा हवालदार! त्यातच तोही होता.

पठाण!

साडे सहा फूट आणि अवाढव्य देहाचा पठाण! ज्याने कालच नसीमला फरफटत चेंबरमध्ये नेलेले होते. नसीमचे काय झालेले असेल हे आकाशला समजत नव्हते. पठाणकडे तर बघायचीही भीती वाटत होती. त्याच्या नजरेतच असे भाव होते की 'मला तू दिसलास की संपलास'!

दोन क्षण त्या सक्तमजूरीच्या कामावर विचार करत असतानाच आकाशच्या पोटरीत सण्णकन काहीतरी बसले. वेदनेनी कळवळत आकाश खाली बसला. मागून शिव्या ऐकू आल्या.

"******... चल्ल... कुदळ उच्चल... "

'तूही समोरच्या महाप्रचंड जागेत खणायचेच काम करायचे आहेस' हे सांगण्याची सभ्य तर्‍हा नव्हतीच!

पायावर हात धरून ठेवत आकाश वाकून कसातरी कुदळ घ्यायला धावला. कैद्याला एकेक टोपी असायचीच! पण ती सहसा कुणी घालायचे नाहीत. कुणी पाहुणे येणार असतील भेट द्यायला तर मात्र घालावी लागायची. पण या उन्हात काम करताना मात्र कैदी टोपी आणायचेच आणायचे! आणि आकाशने आणलेली नव्हती. आणू का असे विचारल्यावर पुन्हा शिव्यांचा भडिमार झाला.

येथील वागणुकीमुळे माणसाच्या मनात संतापाचे स्फोट होतात पण काहीही करता येत नाही. त्यामुळे ही स्फोटक वेष्टने मनावर चढवून माणूस वर्षानुवर्षे राबत राहतो. आणि जेव्हा खुल्या जगात बाहेर पडतो तेव्हा प्रसंगाप्रसंगानुरूप स्फोट होतो मनाचा! पुन्हा एखादा गुन्हा, पुन्हा शिक्षा, पुन्हा सक्तमजूरी!

आश्चर्य म्हणजे कैदी हासत खेळत कामे करत होते. कुदळ घेऊन खणायला लागल्याच्या पाचव्याच मिनिटाला आकाशला जाणवले. आपले काही खरे नाही. भयानक त्रास होत होता. दंडातून गोळे येत होते. उभे राहावत नव्हते. त्यातच ती पोटरीवर बसलेली केन! आणि आकाश धपापत कसाबसा कुदळ जमीनीवर मारू लागला. इतकी वर्षे जेल असूनही ही जमीन अशीच का असेल हे त्याला समजत नव्हते. नंतर लक्षात आले. या जमीनीवर येताना आपण उतरत आलो होतो. याचा अर्थ सरळ आहे. ही जमीन खोदून आणि खणून त्यावर करायचे काहीच नाही आहे. फक्त खोदत राहणे हीच शिक्षा! ही शिक्षा देता यावी म्हणून खोदायची आहे ही जमीन!

माणसाच्या आणि कायद्याच्या अंधपणाचे अतिशय नवल वाटले आकाशला! काय केले होते आपण? एक सुरा घेऊन धावलो त्या नालायकावर! मेला असता तर निदान ही कुदळ उचलायचे काम तरी गोड वाटले असते. पण खोटी केस झाली. खुनाचा प्रयत्न आणि हाफ मर्डर! निर्मल जैनला तर स्पर्शही झालेला नव्हता. हाफ मर्डरची केस उभी राहिलीच कशी? पण आता या प्रश्नांना उत्तरे देण्याची वेळ नव्हती. आणि जेव्हा वेळ होती तेव्हा आकाशच्या ऐवजी निर्मल जैनच्या पैशांचे म्हणणे ऐकले जात होते. आकाशचा वकील आकाशची केस स्ट्रॉन्ग असूनही मार खात होता. हास्यास्पद विधाने करण्यापर्यंत त्याची मजल जाण्याचे कारण हेच होते की हातात असलेली केस केवळ पैशांच्या जोरावर हातातून चाललेली होती.

बळी तो कान पिळी हेच खरे! निर्मल जैनकडे पैशाचे बळ होते. आणि आपल्याकडे कसलेच बळ नव्हते. इव्हन खरोखर त्याचा हाफ मर्डर करण्याचीही आपली वृत्ती नव्हती. आणि तो? बाबूसारख्यांना पोसून अनेकांना ठार मारतोय!

जमीनीवर कुदळीचे प्रहार करताना आकाशला जणू जमीनीऐवजी निर्मल जैनचे डोकेच दिसू लागले. तात्पुरत्या आवेषात त्याने कुदळीचे घाव घातले. पण आणखीन काही क्षणातच ताकद संपली. हे असे किती वेळ खणायचे? दिवसभर? आपण जिवंत तरी राहू का? आकाशने सदर्‍याला कपाळाचा घाम पुसण्यासाठी जे दोन क्षण घेतले त्यातही लांबून एक शिवी ऐकू आलीच. 'आराम करू नकोस' हे सांगण्यासाठी! आणखीन एक काठी पोटरीवर बसू शकेल या भीतीने आकाशने वेदना विसरून कुदळ पुन्हा उचलली.

आणि केवळ अर्ध्याच तासाने तो खाली पडला. सन स्ट्रोकसारखे काहीतरी झाल्यामुळे! या असल्या घटना रोजच्याच होत्या तिथल्या सगळ्यांसाठी! कुणी ढुंकूनही पाहिले नाही. दोन हवालदारांनी मात्र त्याला खेचत खेचत जेलमध्ये नेले. तेथे काही वेळाने तो शुद्धीवर आला. डोक्याला दुखापत झालेली होती. त्या खोलीतही त्याला अजून गरगरतच होते. सहन होत नव्हता तो अनुभव! केविलवाण्या नजरेने एका हवालदाराकडे त्याने पाहिले आणि म्हणाला..

"पाणी.."

"पाणी हवय? "

हवालदाराने अगदी नम्रपणे पाणी आणून दिले. आकाशला ती माणूसकी अजब वाटली. घटाघटा त्याने पाणी प्यायले आणि हवालदाराकडे पाहिले. पण पाहताच आले नाही. खण्णकन कानाखाली एक प्रहार झाला. वेदनेने पिळवटलेल्या चेहर्‍याने आकाशने मान फिरवली. तोवर पाठीत एक बुक्की बसली. आणि नंतर शिवीगाळ! 'काम करणे सडून आराम करतोयस काय येथे' म्हणून!

पुन्हा आकाशला त्याच प्लॉटवर आणण्यात आले. मात्र यावेळेस टोपी दिली त्याला!

आयुष्यात कधी असले कष्ट उपसलेले नव्हते. अक्षरशः रडावेसे वाटत होते. वाटत होते कसले आकाश चक्क कुदळ खाली फेकून उन्हातच बसला आणि रडू लागला.

हेही दृष्य यापुर्वी अनेकांनी पाहिलेले होते. अनेक कैदी कष्ट नकोसे होऊन रडू लागायचे. त्या कैद्यांना इतर कैदी आणि हवालदार खदाखदा हासायचे. आत्ताही आकाशला जाणवले. आजूबाजूने खदाखदा हासण्याचे आवाज येतायत. आणि तोवर आणखीन एक काठीचा तडाखा पाठीत! कारण नसताना!

आपले घर म्हणजे काय असते आणि ते किती महत्वाचे असते याची यथार्थ जाणीव आकाशला आज होत होती. मुलींसारखे रडत बसण्यात काहीही अर्थ नाही हे आकाशने स्वतःच्याच मनाला समजावले. आणि बुद्धीचा पहिला वापर केला त्याने कारागृहात!

खूप जोरात आणि आवेशात हालचाल केल्यासारखे सुस्कारत, श्वास घेत, घशातून आवाज काढत कुदळ उचलायची. पण ती ताकदीने जमीनीवर आपटायची नाही. अलगद टाकायची. त्यामुळे येणारा बाउन्स बॅक तरी येत नाही. आणि शक्तीही कमी खर्च होते. अधून मधून मात्र खरेखुरे घाव घालायचे. पण हेही अवघडच होते. प्रश्न आत्ताचा नव्हता. प्रश्न होता उद्या सकाळी उठवेल तरी का?

मनात कालपासूनच सुटायचे कसे याचा विचार येऊ लागलेला होता. बाबूचे अत्याचार आठवले की मळमळत होते. एकेकाच्या कहाण्या आठवल्या की शहारे येत होते. पार्श्वभागाच्या वेदना वाढायलाच लागलेल्या होत्या. कुठेही पाहिले तरी उन्हाच्या झळा आणि ब्राईटनेसमुळे अंधारी आल्यासारखे वाटत होते. एकाच दिवसात अनेक वर्षांची कैद सोसल्यासारखी मनस्थिती झालेली होती. एकेक दिवस कसा जाणार हे समजत नव्हते. कैदी इतके त्रास सोसूनही हासतात कसे काय ही बाब आश्चर्यकारक वाटत असतानाच तिरस्करणीयही वाटू लागली होती. राक्षस आहेत सगळेच हा विचार बोचत होता.

प्यायला पाणीही का ठेवत नसतील हे काही समजत नव्हते. घामाच्या धारांनी सदरा ओला कच्च झाला. स्वतःचेच शरीर स्वतलाच नकोसे होण्याची ही आल्यापासूनच्या एकाच दिवसातील तिसरी वेळ होती. पहिल्यांदा बाबूने केलेले अत्याचार, दुसर्‍यांदा प्रातर्विधी उरकताना आणि आत्ता तिसर्‍या वेळेस थकून गेलेले असूनही राबायला लागत असताना!

मार बसेल या भीतीने काहीतरी हालचाली करत राहणे अनिवार्य होते. थांबला तो संपला ही उक्ती अक्षरशः खरी ठरत होती येथे!

दिड तास! हा दिड तास विचारांमध्ये आणि कष्टांमध्ये कधी संपला ते समजलेही नाही त्याला! अचानक सगळे कैदी एका दिशेने धावताना दिसले. तिथे काय असेल ते त्याला माहीत नव्हते. पण सगळेच धावतायत तर आपणही धावू, निदान या कष्टांमधून तरी काही क्षण सुटका असा विचार करून तोही धावू लागला. मात्र 'का धावतोय' हे त्याचे त्यालाच माहीत नसल्याने इतर कैद्यांच्या धावण्याच्या उत्साहापेक्षा त्याचा उत्साह खूपच कमी होता. खरे तर पाय उचलवतही नव्हते सक्तमजूरीमुळे!

आणि का धावलो ते समजले.

पाणी!

हे एवढे पाणी!

रांगा लागल्या. रागेवरून भांडणे, शिवीगाळ सुरू झाले. हवालदाराने एक दोघांना झोडपलेही. आकाश सर्वात शेवटी उभा होता. घसा इतका सुकलेला होता की आपल्याला पाणी हवे आहे हेही लक्षात राहिलेले नव्हते. मात्र आता शरीराने व्याकुळतेची परमावधी गाठली. कधी एकदा रांग संपतीय असे वाटू लागले. रांग मुंगीसारखी सरकत होती. आकाशला दिसले. प्रत्येकाला एकेक टमरेल पाणी मिळत होते. साधारण अर्धा लिटर असावे.

शेवटी एकदाचा त्याचा नंबर आला. आजवर घरी असताना आपण वाट्टेल तस पाणी फेकून द्यायचो. अर्धे भांडे पाणी प्यायल्यानंतर उरलेले पाणी बेसीनमध्ये फेकायचो. एक नळ पूर्ण बंद व्हायचा नाही आणि सतत गळत राहायचा याचे आपल्याला काहीही वाटायचे नाही. कपाळावर घामाचा थेंब जरी आला तरी आपण खसाखसा चेहरा साबणाने धुवून टाकायचो. आणि साबण लावलेला असताना नळ तसाच सुट्टा असायचा.

पाणी!

आज पाणी पिताना जणू स्वर्गसुख लाभत होते त्याला! टमरेलमधील ओल सुद्धा त्याने ते टमरेल तोंडावर उपडे धरून शोषली. अजून पाणी मिळेल का हे विचारायचे नसते हे आता अनुभवावरून माहीत झालेले होते. सगळे कैदी आपापल्या बरॅकमधील कैद्यांबरोबर वेगवेगळे ग्रूप्स करून बसलेले त्याने पाहिले. विश्रान्ती वाटतं? अरे वा? हे असं असलं तर जरा बरंय! नाहीतर सकाळी कुदळ घेतली की संध्याकाळीच सोडायचे.

आकाश चालत चालत त्याच्या बरॅकमधील कैद्यांपाशी गेला.

बाबूने सकाळीच त्याच्या कानाखाली लावलेली होती. आणि त्यानंतर आकाशने बाबूला बिनदिक्कत सांगीतले होते की तुच तुझ्या बायकोचा दलाल आहेस. ती नवलेबरोबर झोपते हेच चांगले करते तुझ्याबरोबर झोपण्यापेक्षा! बाबू अजूनही गप्प गप्पच होता. सगळे गोल करून बसल्यावर त्याला वाघने विचारले. असा गप्प का म्हणून! बाबूने रात्रीची अख्खी कहाणी सांगीतली. मिनीला लालू छेडतो हे बाबूला तिच्या तोंडून ऐकूनही काहीही करता येत नाही याचे आकाशला अतिशय दु:ख झाले. ते त्याने व्यक्तही केले. त्याचवेळी मिनीला आता येथे येत जाऊ नकोस असे सांग असेही तो म्हणाला. त्यावर बाबूनेही सांगीतले की त्याने ते आधीच तिला सांगीतले काल पहाटे! मात्र बाबू पुढे म्हणाला की नवले हरामखोर आहे. मिनी आली नाही तर तो माझा अमानुष छळही करेल. आणि मुख्य म्हणजे मला काहीही बोलता यायचे नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे... अंतर्गत छुपी परवानगी मिळाली तर माझे एन्काउंटरही करतील. केव्हाही!

माणूस इतका सहजपणे स्वतःच्या मृत्यूबाबत बोलतो हे पाहून आकाशला धक्का बसला.

तेवढ्यातच हवालदारांनी आरोळ्या ठोकल्या. पटापटा सगळे कैदी पुन्हा कामाला लागले. आकाशचे शरीर जड झालेलेच होते. काही वेळाने काही डंपर्स येऊन माती घेऊन निघून गेले.

त्या दिवशी जेवताना मात्र आकाशला ती पाणचट आणि बेचव आमटी आणि चोथा असलेली भाजी हे पदार्थ जगातील सर्वोत्कृष्ट स्वादाचे पदार्थ भासले. अन्नाचा एकेक कण त्याने शोधून शोधून खाल्ला.

अजूनही कालच्या ऑर्केस्ट्राची चर्चा मधूनमधून चाललेलीच होती.

दुपारी मात्र सक्तमजूरीचे काम नव्हते. दुपारी एका हॉलमध्ये बसवून थोडे वाचन, एक तास टीव्ही आणि एक अध्यात्मिक कॅसेट ऐकणे वगैरे झाले.

चार वाजता चक्क क्रीडाप्रकार होते. फूटबॉल, व्हॉलीबॉल आणि रनिंग ट्रॅक! येथे मात्र कैद्यांना सदरा काढायची परवानगी मिळत होती. आकाशला तर पायही उचलवत नव्हता. इतर कैदी मात्र पिसाटल्यासारखे खेळू लागलेले होते. आणि आकाशला हळूहळू जाणवायला लागले ते.... !!!

हे एक विश्व आहे. येथे खेळताना हे कैदी एकमेकांबरोबर खूप मजा करतात. हासतात, पडतात, थट्टा करतात, एकमेकांची साथ देऊन टीमवर्क दाखवतात. खेळताना यांना स्वतःच्या व्यक्तीगत जगाचा विसर पडलेला असतो. आपण आत्ता एकटेच बसलो आहोत म्हणून, पण आपण खेळायला जाऊ शकलो असतो तर कदाचित घटकाभर आपणही सगळे विसरलो असतो. माणसाला मनोरंजन, हासणे या बाबींमधून इतका आनंद मिळू शकतो की तो त्याचे दु:खही घटकाभर विसरू शकतो. आणि हा आनंद तो कायम शोधतही असतो. हे विश्व आपले आहे? नाही. नसेलही! पण जबरदस्तीने का होईना आपल्याला ते स्वीकारावे लागणार आहे. हे सगळे कैदी! यांच्यातील कुणीतरी उद्या सुटून जाणार असेल. त्यावेळेस इथल्या आठवणींनी तो आणि त्याचे मित्र बेजार होतील. ताटातुट होताना ओक्साबोक्शी रडतील. सुटकेचा आनंदही कदाचित त्याला घेता येणार नाही. इथल्याच काहींना सगळे आयुष्यही इथेच काढायचे असेल. जन्मठेप! बाहेरचे आयुष्य तरी काय असते? जन्मठेपच की? इतकंच, की तुम्ही हवे ते करायला मोकळे असता. इथे नियम कडक असतात इतकाच फरक! या जन्मठेपेच्या कैद्यांसमोर कुणी सुटून चालल्यावर त्यांना स्वतःच्या कायमस्वरुपी वास्तव्यातील तीव्रता अधिक बोचेल आणि ते उन्मळून पडत असतील. आणि काही...???? काहींना ... फाशी झालेली असेल. जिवंत आहेत तोवर खेळून आनंद घेतायत, हासतायत! फाशीसाठी यांना नेले जाईल तेव्हा आक्रोश करतील. फरफटवले जातील. ज्यांची फाशीची तारीख अजून आलेली नाही तेही आक्रोश करू लागतील. ..... जेल!

येथून सुटका करून घेण्याचा विचार कितीजणांच्या मनात येत असेल? बहुतेक प्रत्येकाच्याच! पण जमत नसणार! यापुर्वी असे प्रयत्न कित्येकवेळा झालेले असणार! हाणून पाडले गेलेले असणार! नंतर तसा प्रयत्न करणार्‍यांना नरकयातना भोगायला लागत असणार! चेंबरमध्ये!

सुटका! आपण काल आलो आणि आत्ता आपल्या मनात सुटकेचाच विचार असणार हे तर इथल्या प्रत्येक अनुभवी पोलिसाला आणि कैद्यांना माहीत असेल. आपण काय करायला हवे? आपण चेहरा असा करायला हवा ज्यावरून वाटावे की आपल्याला येथे आल्याचा पश्चात्ताप होत आहे, आपण रडत आहोत आणि आपल्याला हेही समजलेले आहे की येथून सुटका शक्य नाही. आपण फक्त निरश झालेलो आहोत आणि जाच सोसत आहोत. स्वभावाने गरीब आहोत. आपल्या चेहर्‍यावरून एकाही माणसाला हे वाटता कामा नये की आपण सुटकेचा विचार करतोय! बेसावध! लोकांना बेसावध ठेवल्याशिवाय हे शक्य नाही.

अंधार पडू लागला तरी कैदी खेळायचे थांबेनात! आता मात्र त्यांना पाण्याचीही आठवण येत नव्हती. नुसती धमाल चाललेली होती. आकाशचे संपूर्ण शरीर दुखत होते. प्रत्येक स्नायू!

आंघोळ!

घामाने थबथबलेले कैदी एका भिंतीपाशी रांगेने उभे राहिले. वरून पंधरा वीस रबरी नळ्या सोडण्यात आलेल्या होत्या. त्या नळ्यांमधून येत असलेले पाणी अंगावर घेत कैदी आनंदत होते. आकाश अजिबात खेळलेला नव्हता. मात्र सकाळपासूनच त्याला आंघोळ करायची होती. तोही रांगेत उभा राहिला. सदरा त्याने काढून हातात घेतलेला होता. सदराही आपण धुवून टाकावा असे त्याने ठरवलेले होते.

पाण्याचा सर्वांगाला स्पर्श झाला तसा त्या कातरवेळेच्या गार हवेत एक रोमांच उठला त्याच्या शरीरावर! बाहेर निघावेसे वाटेना! पण चार ते पाच मिनिटांचाच अवधी होता. साबण नाही की काही नाही! नुसते पाणि अंगावर घ्यायचे. कुणीतरी कुणाला तरी म्हणाले की रविवारी सकाळी डेटॉल साबण मिळतो. व्वा! काय पण जीवनशैली होती!

ओला पायजमा आणि धुतलेला सदरा अशा अवस्थेत आकाश बाहेर आला. अनेक कैद्यांनी आतल्या चड्डीवरच आंघोळ केलेली होती. आकाशला ते प्रशस्त वाटले नाही. त्यावरूनही थट्टा झाली. पण व्हर्बल थट्टा आता किरकोळ वाटू लागली होती. बाबूने आजही आंघोळ केली नाही.

कालची रात्र एकमेकांशी बोलण्यात आणि बाबूला का बोलावले असावे यावर चर्चा करण्यातच गेली होती. पुर्ण अंधार पडल्यावर मात्र आकाशला पुन्हा भीती वाटू लागली. आज रात्री बाबू नवलेचा सूड आपल्यावर उगवेल की काय? या प्रकाराची दाद कुठे मागायची? त्याची बायकोच नवलेकडे जात असल्याने नवले केव्हाही बाबूलाच स्पेअर करणार! आपण काय करणार?

बरॅकमध्ये आल्यानंतर आकाशने सरळ विषयच काढला वाघसमोर! बाबू आणि मुल्ला ऐकत होते.

आकाश - वाघ... माझ्याशी तसेच वागणार असलात तर सांगा.. मी एकटा आहे अन तुम्ही तिघे... आणि मी तक्रार करूनही फायदा होणार नाही हे मला माहीत आहे... पण तसेच वागणार असलात तर हाफ मर्डरची केस आहेच... उद्या सकाळी कुदळ डोक्यात घालीन प्रत्येकाच्या... फासावर जाईन.. एकदाच काय ते सांगा..

हे काल आलेलं पोरगं असं बोलतंय बघून आधी सगळ्यांचीच करमणुक झाली. प्रचंड हासले तिघे! मग वाघने सांगीतले.

"तसलं काय नाय रे??... तू दोस्त आहेस आता...पण एक मात्र आहे.. बायकीपणा केलास तर ठोकून काढू सगळे... "

"बायकीपणा म्हणजे??"

"रडलास, किंचाळलास, डोकं गुडघ्यात घालून बसलास, कंप्लेन केलीस, असलं काहीही केलंस तर.. मुझे बचाओ बिचाओ ओरडलास तर... "

"तुला काय माहीत हे सगळं? तुझी बायको तर 'आओ जाओ घर तुम्हारा' होती..."

आकाशसारख्या पोराने एकदम असे वाक्य टाकावे हा धक्काच होता सगळ्यांना! वाघने ताडकन उडी मारून त्याला धरले. आणि वाघ सुरू झाला. एकेक जीवघेणा फटका घालत होता तो आकाशला! आकाश किंचाळत होता. सहा सात फटके होईस्तोवरच एक हवालदार धावत आला तिथे!

हवालदार - ए ****... काय चाललंय??? आ????

आकाशकडे सगळेच बघत होते. हा आता काही सांगतो की काय?

आकाश - काही नाही... मी ह्याला म्हंटलं माझी मारलीस तशी तुझी मारू का? तर फटके द्यायला लागला..

पोलिस खदाखदा हास तिथून निघून गेला. वाघला जाणवले. पोराने मार खाल्ला पण एकी टिकवली. आता तोही 'आओ जाओ घर तुम्हारा'ची आठवण येऊन हसायला लागला. आणि म्हणाला...

"गेली स्साली नरकात... आओ जाओ नरक तुम्हारा म्हणायला"

सगळेच हसू लागले आणि मुल्लाने अचानक विचारले.

मुल्ला - बाबू.. धोत्रेला विचारलंस का?? नसीमला काय करतायत ते??

बाबू - ... ***** आहेत *****...

मुल्ला - का??

बाबू - घाण केली त्याच्या अंगावर चेंबरमध्ये... तसाच ठेवलावता रात्रभर.. आज धुतलाय..

मुल्ला - ****

बाबू - पठाण एकदा हातात यायला पाहिजे रे.. गोट्याच चेचणार आहे मी साल्याच्या..

मुल्ला - तुझ्या *** **... तुझ्या दुप्पट आहे तो... ** वाकडे करत येणार नाही...

बाबू - कुदळ घालावीशी वाटत होती आज मला त्याच्या टाळक्यात...

वाघ - पण... म्हणजे नसीमला मारलेले दिसत नाहीये...

बाबू - गुरासारखे मारतायत.. चेंबर असल्यामुळे आवाज येत नाही आपल्याला... गुरासारखा मारतायत..

वाघ - त्यापेक्षा आत्ताच फाशी का देत नाहीत??

बाबू - हीच शिक्षा आहे वाघ.. फाशीची वाट बघायला लावणे हीसुद्धा शिक्षाच आहे...

आकाश - कधी आहे त्याला फाशी??

आकाशला हा प्रश्न विचारतानाही दोन वेळा श्वास घ्यावा लागला होता.

मुल्ला - दोन महिन्यांनी... आता आला की दोन दिवसांनी त्या बरॅकमध्ये हालवतील..

आकाश - पण... त्याला हार्ट अ‍ॅटॅक कसा येत नाही??

मुल्ला - मरायचं प्रत्येकालाच आहे रे.. जिंदगी आहे तोवर मजा करायची असते..

आकाश - ते... ते चेंबरमध्ये जे केलं त्याची कंप्लेन्ट नाही करता येत??

बाबू - कोण करणार? कुणाकडे करणार? वकील कुठला? आरोपीच न्यायाधीश असला तर काय??

आकाश - हे लोक.. मारतात म्हणजे... कसे मारतात??

बाबू - तू फेकून बघ ना तुझी त्या हवालदाराच्या थोबाडावर.. म्हणजे समजेल..

आकाश - मुल्ला.. काल तू काय म्हणत होतास?? पाच जण असले तर सुटता येईल...

मुल्ला - पाच जण असले तर नाही.. पाचपैकी एक मरायला तयार असला तर..

आकाश - हो पण तो तयार असला तर बाकीचे कसे सुटतील??

मुल्ला - त्याचा प्लॅन आहे... पण या दोघा *****ना तो मान्य नाही...

बाबू - बकवास करतो हा.. असं कुणी सुटू शकेल का?

आकाश - काय प्लॅन आहे पण??

बाबू - काही प्लॅन नाहीये.. तो काय प्लॅन आहे होय??

आकाश - मुल्ला.. तुला विचारतोय..

मुल्ला - एकानी... ट्रान्स्फॉर्मवर उडी मारायची.. त्याचा कोळसा होणार हे नक्की.. पण उडी मारण्याआधी जोरात ओरडायचं... लाईट तर जातीलच.. धावाधाव होईल.. आपण कुणीतरी बोंब मारायची.. हा हा ट्रान्स्फॉर्मवर पडला.. जनरेटर चालू होऊन सगळे तिकडे जाईपर्यंत आपण नवलेकडे धावायचं... त्याचं रिव्हॉल्व्हर उचलायचं... त्यालाच होल्ड अप करून बाहेर पडायचं... आणि लांब दुसर्‍या गावाला जाऊन त्याला सोडायचा... या शिवाय दुसरा काहीही उपाय नाही...

बाबू - बकवास करतो हा..

आकाश - हो पण हे करण्यासाठी एकाला ट्रान्स्फॉर्मरवर उडी कशाला घ्यायला पाहिजे??

मुल्ला - मग लाईट कसे घालवणार?

आकाश - लाईट कशाला जायला पाहिजेत? डायरेक्ट नवलेकडे जायचं...

मुल्ला - तुझ्या बापाला सोडतील का तिथे??

आकाश - हा कसा जातो मग?? बाबू??

मुल्ला - त्याची बायको नवलेवर जान कुर्बान करते.... तुला बायको आहे का?

आकाश - म्हणजे ऑफीसला जाताच येत नाही?

मुल्ला - त्या दिशेने पाय टाकलास तरी तंगडं मोडून ठेवतील..

आकाश - म्हणजे कुणीच ऑफीसला जात नाही?

मुल्ला - लेखी परवानगी मागावी लागते. एकालाच सोडतात. ऑफीसला जाण्याचे कारण आधी सांगावे लागते लेखी. पहार्‍यातच जाता येते.

आकाश - मग जाता कुठे कुठे येते??

मुल्ला - या बरॅकच्या या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंत आणि त्या कोपर्‍यापासून या कोपर्‍यापर्यंत!

आकाश - पण आज बाहेर होतोच की दिवसभर?

मुल्ला - ते देखरेखीत.. असं वाटलं की फिरता येत नाही जेलमध्ये..

आकाश - पण मग.. ट्रान्स्फॉर्मरपर्यंत तरी कसे जाणार?

मुल्ला - आंघोळीनतर जायचे.. तेव्हा अंधार पडत असतो..आणि सगळे मोकळेही असतात बाहेर..

आकाश - वाघ... तुम्हाला या प्लॅनमध्ये काय चूक वाटली??

वाघ - बरोबर काय आहे त्या प्लॅनमध्ये?

आकाश - म्हणजे??

वाघ - गाढवा.. आधी मरायला कोण तयार होणार.. झालाच तरी ऐनवेळी त्याचं उडी मारण्याचं धाडस होईल का? मारलीच तर मारायच्या आधी ओरडायची शुद्ध राहील का? तेही झालंच तर नेमका ट्रान्स्फॉर्मवर पडून लाईट जातीलच याचा भरवसा काय? की उगाच एखाद्याला मारून टाकायचं? समजा लाईट गेले तरी सगळे हवालदार काय तिकडेच धावतील असंय का? त्यांना ट्रेनिंग असतं लेका! घोळ झाला तरी सगळी परिस्थिती कशी कंट्रोल करायची ते! मुरलेले असतात ते! आणि एवढे सगळे होऊनही जर बरेचसे तिकडे धावलेच आणि आपणही नवलेच्या क्वार्टरपाशी धावू लागलो तरी तिथल्या हवालदारांच काय? ते त्याच वाटेतून नसतील का येत इकडे धावत? आणि समजा ते वाटेत भेटले नाहीतही, तरी नवलेच्या क्वार्टरमध्ये आपल्याला प्रवेश मिळेलच असे कुठे आहे? संध्याकाळी सात वाजता तो क्वार्टरमध्येच असेल हे कशावरून? समजा ऑफीसमध्ये असला तर? आणि ऑफीसमध्ये असला तर आपण ऑफीसपर्यंत पोचताना वीस हवालदार समोरून धावून येतील त्याचं काय? तेही अगदी नाही आले तरी नवले काय आपल्या स्वागतासाठी त्याचं रिव्हॉल्व्हर आपल्याकडे फेकणार आहे? तो गोळ्या घालेला पहिल्यांदा. समजा ते रिव्हॉल्व्हरही मिळालं तरी आपल्या **त दम असेल का नवलेला होल्ड अप करायचा? नवलेच काय दुसर्‍या कुणालाही होल्ड अप करायचा दम असेल का? कसलं टेन्शन असेल आपल्यावर? पकडले गेलो तर आपले काय करतील या गोष्टीचं! आणि एवढं सगळं करून आपण नवले किंवा कुणालातरी होल्ड अप करून बाहेर काढलं तरी जाणार कुठे? बाहेरच्या जगातले पोलिस शिकारी कुत्र्यांसारखे मागे लागतील. खुद्द नवलेवरच हल्ला केलेला पाहून! पेपरमध्ये तर एवढी बदनामी होईल की आपले चेहरे शेंबया पोरालाही माहीत होतील. बालिशपणा करतो हा मुल्ला! इथला स्टाफ काय ** आहे का काय?

वाघच्या बोलण्याचा परिणाम झाला तसा सगळेच गप्प बसले. वाघ नेहमी निगेटिव्हच बोलायचा. याचा बाबू, नसीम आणि मुल्लाला फार राग यायचा. पण त्याचवेळेस त्यांना हेही माहीत असायचं की तो जे बोलतोय त्यातलं अक्षर अन अक्षर खरं आहे. आत्ताही बाबू आणि मुल्ला चरफडत गपचूपच बसलेले होते. पर्यायच नव्हता. वाघचे बोलणे सत्य होते. आणि हे सगळे करताना किंवा केल्यावर पकडलो गेलो तर कसा मार खावा लागेल याची कल्पना दोघांनाही होती.......

.... नव्हती ती फक्त... आकाशला..

"याच प्लॅनमध्ये एक चांगला बदल करता येईल... सगळेच धोके बाद होतील...."

दचकली ती बरॅक! काल आलेला पोरगेलासा कैदी अत्याचार सहन करून आज सांगतोय की येथून सुटायचा मार्ग आहे???

मुल्लाला तर आकाश वेडा असावा असे वाटले.

वाघ - काय बदल???

आकाश - माती असशी... मातीत मिळशी..

आकाश शुन्यात बघत बोलावे तसा बोलला. वाघच्या डोळ्यांत क्षणभरच चमक येऊन गेली. बाबू आणि मुल्लाला तो डायलॉगच समजला नाही.

तेवढ्यात....

कर्र... कर्र.. खण्ण..

एक लोढणं आत येऊन पडलं.. अचानक.. धप्प!

दचकलेच सगळे!

आणि दुसर्‍याच क्षणी समजलं! हा नसीम आहे... नसीम..

हा एकाच दिवसात कसा काय परत आला? हा तर चार दिवसांनी़ यायला हवा होता..

तेवढ्यात बरॅकच्या बाहेरून पठाणचे वाक्य ऐकू आले..

"फासीसे पहले मरजायेगा इसलिये आजही वापैस लाया इसको.. संभालो.. और एक बात... फिर किसीने जुर्रत की तो इससे बुरा हाल होगा.."

वाघने पटकन उठून नसीमच्या तोंडावर पाणी शिंपडलं! बाबूने पाण्याचे चार घोट त्याच्या घशात ओतले. तरीही नसीम बेशुद्धच! त्याच्या अंगाला एक घाणेरडा वास येत होता. तो असह्य होत होता. पण नसीमला शुद्धीवर आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले. मुल्लाने तर त्याला गदागदा हालवले.

तब्बल वीस मिनिटांनी नसीमने डोळे किलकिले केले. आणि त्यानंतर तब्बल अर्ध्या तासाने नसीम चक्क बोलूही लागला.

"आई *** त्या पठाणची... केन खुपसली केन... आवाज निघत नाही बाबू तोंडातून.. केन खुपसल्यावर.. *****... माझ्या तोंडावर ***... सगळ्यांदेखत.. त्याची *******.. रात्रभर तसाच ठेवला मला... गोट्यांना चिमटे लावले होते.. जीवच गेला असता... कसा काय वाचलो माहीत नाही.. आयशप्पथ पुन्हा असला विचार नाय करणार मी.. रहम मागत होतो रहम... पण ***** स्साले हासत होते... वाघ... ए वाघ... मला गळा दाबून मारतोस का बायकोला मारलंस तसं?? मार मला... मला नाही जगायचं.. दोन महिन्यांनी मरणार ते आज मरेन.. पण हे सहन होत नाही.. डोळ्यात तिखट टाकलं रे माझ्या.. "

नसीमची ती विदारक कहाणी ऐकून आकाशचे थोबाडच बंद झालेले होते. मगाशी 'मार्ग आहे' म्हणणार्‍या आकाशला आता समजून चुकलेले होते. आपण चुकीची हालचाल केली आपणही चेंबरमध्येच!

बाबू, मुल्ला आणि वाघ सगळेच पराकोटीच्या संतापाने खदखदत असूनही जमीनीकडेच बघत होते. काहीच करता येणे शक्य नव्हते. कैद्यांना अशीही ट्रीटमेन्ट मिळते हे बाहेरच्या जगाला माहीतच नव्हते. अर्थात, कैद्याने अशी काही भयंकर चूक केली तरच मिळायची ती ट्रीटमेन्ट! असेही कैदी अनेक होते ज्यांनी आजवर शिवीही उच्चारलेली नव्हती. शिस्तीत वागायचे. त्यांना चांगलीही वागणूक मिळायची. पण चूक झाली की संपलं!

खूप खूप वेळ लांबलेल्या त्या शांततेचा भंग करत मुल्लाने आकाशला विचारलं..

"काय बदल करायचा म्हणत होतास तू??"

'काही नाही' अशा अर्थाने घाबरून मान हालवून आकाश एकटक नसीमकडे बघत राहिला.

"अबे बोल ना?"

मग हळूहळू नसीमनेही विचारले. मग नसीमला मुल्लाने मगाशी झालेली सगळी चर्चा सांगीतली.

शेवटी बाबूनेच आकाशला खिजवत्या स्वरात विचारले.

"काय रे पिल्ला.. एका दिवसात तुझ्याकडे प्लॅन पण झाला तयार सुटण्याचा?? ऐकव तर आम्हाला??"

आणि काहीसा धीर एकवटून आकाश बोलू लागला.

"आपण.... आपण जी.. जी जमीन आपण खोदतो... ती सगळी माती... डम्पर्समधून नेतात.... इकडे.. एकाने ट्रान्स्फॉर्मवर उडी मारली की धावाधाव होईल.. तिकडे चौघांनी त्या डंपरमधील मातीत बसायचे... फक्त नाक बाहेर... फक्त नाक.. त्या डंपर्सचं चेकिंग होत असेल असं मला तरी वाटत नाही.. "

बराच वेळ सगळे त्या योजनेवर विचार करत होते. ती योजना दोषयुक्तच होती. फक्त मुल्लाच्या योजनेपेक्षा खूपच कमी दोष होते तिच्यात!

वाघ - अक्कलशुन्य आहेस तू...

आकाश - ..... का???

वाघ - डंपरवाले सांगणार नाहीत का?

आकाश - त्यांना... बाबूच्या बायकोने आधीच पैसे द्यायचे...

सर्रकन काटा आला सगळ्यांच्याच अंगावर! कारण योजना कदाचित निर्दोष बनू शकणार होती. निदान प्रवास तरी तसाच चालू झाला असता.

वाघ - डंपर... नक्की चेक करत असणार...

आकाश - ती माहितीही.. बाबूच्या बायकोने काढायची...

बाबू - कशी??

आकाश - एकदाच... एकदाच तिला त्याग करावा लागेल.. नवलेकडे यावे लागेल..

बाबू - आणि सकाळी मला भडवा म्हणालास तू..

आकाश - अंहं.. नवलेला खुष करायला नाही...

बाबू - मग??

आकाश - डंपर बाहेर जात असतील अशा वेळेस तिने आत यायचे.. आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघायचे..

बाबू - तिच्यायला.... हे शक्य आहे रे...

आकाश - डम्पर्स चेक करत असले तर प्रश्नच मिटला..

वाघ - हो पण एक जण मेला किंवा ओरडला म्हणून त्या जमीनीवरचे सगळे हवालदार नाही धावायचे ..

आकाश - हो पण जे दोघे तिघे उरतील त्यांचे लक्ष तिकडेच असेल..

वाघ - हो पण इतके कैदी असतील ना तिथे???

आकाश - कैदी तिकडेच धावतील..

वाघ - हे मात्र बरोबर आहे... आणि त्या धावणार्‍या कैद्यांना आवरायला हवालदारही..

आकाश - फक्त डंपरवाले धावणार नाहीत...

वाघ - का??

आकाश - कारण बाबूच्या बायकोने त्यांना पैसे दिलेले असतील..

मुल्ला - पण हे डंपर्स पुढे जातात कुठे??

बाबू - मला माहितीय.. मी सहज विचारलवतं एकदा..

मुल्ला - कुठे???

बाबू - वाघोलीला एका प्लॉटवर ही माती टाकतात...

मुल्ला - वाघोली??

बाबू - हं..

मुल्ला - पण मग... तिथे आपण पोचलो की आपण काय करणार??

आकाश - त्याची योजनाही बाबूची बायकोच अंमलात आणेल..

बाबू - एक गाडी नक्की आणेल ती तिथे..

वाघ - हे सगळं मला मूर्खपणाचं वाटतंय..

बाबू - तू नेहमी असाच बोलतोस..

वाघ - कारण मी वर्षानुवर्षे पाहात आहे.. कैदी कसे प्रयत्न करतात आणि कसे फसतात...

बाबू - पण आकाश.. हे सगळं मी मिनीला सांगणार कसं??

आकाश - का?

बाबू - तिथे पहारा असतो... रेकॉर्डर पण असू शकतो..

आकाश - मग एकच पर्याय आहे..

बाबू - काय?

आकाश- तिला ते लिहून द्यायचं...

बाबू - कसं काय?

आकाश - दुपारी आपल्याला पेपर वाचायला देतात ना??

बाबू - हं..

आकाश - त्यातील अक्षरे बोटांनी फाडून आपल्याकडे ठेवायची.. ह.. द... की... ना.. रू .. अशी..

बाबू - आकाश... तू भयानक आहेस...

आकाश - आणि बरॅकाध्ये आल्यावर त्यांना नंबर द्यायचे.. ह ला १, ती ला २ वगैरेप्रमाणे...

बाबू - पेन कुठे असते?

आकाश - तेवढे तुला मिळवायला लागेल..

बाबू - आणि मग??

आकाश - आणि ती नंबर दिलेली अक्षरे तू तुझ्या बायकोला द्यायचीस...

बाबू - कशी??

आकाश - ती तुझ्यासाठी काहीतरी खायला तर आणू शकेलच ना एखाद दिवस??

बाबू - मग??

आकाश - त्या डब्यात घालायचीस..

बाबू - जवळच्या वस्तू चेक करतात गेटवर..

आकाश - माफ कर.. पण मला नाही वाटत तुझ्या बायकोचे इतके चेकिंग होईल..

बाबू - नक्कीच होईल.. ती नवलेचा तिरस्कार करते हे नवलेला नक्की माहीत आहे...

आकाश - मग... मग तिला ते तिच्या कपड्यांमध्ये लपवून ठेवावे लागेल..

बाबू - महिला पोलिस असतातच...

आकाश - त्यांनी अगदीच चेकिंग करण्याची तयारी दाखवली तर तिने तो कागदाचा बोळा फेकून द्यायचा..

वाघ - एक मिनिट .. एक मिनिट.. मला काहीही समजत नाहीये.. त्या अक्षरांचे काय करायचे??

आकाश - वाक्ये तयार होतील असे नंबर्स द्यायचे त्यांना..

वाघ - म्हणजे काय??

आकाश - म्हणजे 'गुरुवारी दहा वाजता वाघोलीला सहा जणांची गाडी ठेव', 'डंपर्सचे चेकिंग होते का ते तपास' वगैरे असे!

वाघ - असे कसे करता येईल अक्षरांना नंबर्स देऊन??

आकाश - सहज शक्य आहे.. आता पेपरमध्ये बातमी आली समजा.. की ट्रकखाली हातगाडी येऊन दोन ठार! तर यात आपल्याला गाडी , हात, ट्रक आणि दोन हे चार शब्द मिळणार! ट्रक म्हणजे डंपर इतके तिला समजणे आवश्यक आहे. अर्थात, डम्परखाली युवक ठार अशी बातमी आली तर फारच सोपे!

वाघ - भ्यें**... बेकार आयडियाय रे?? पण ही अशी वाक्यं कधी तयार होणार??

आकाश - सरळ आहे.. जेव्हा वाक्ये तयार होतील तेव्हाच तो प्लॅन आपण तिला सांगू शकतो..

वाघ - म्हणजे महिना लागला तर महिना, आठवडा तर आठवडा!

आकाश - इतका वेळ लागेल असे मला वाटत नाही... बहुतेक परवापर्यंत वाक्ये तयार होतील.

बाबू - मी उद्याच एक पेन मिळवतो... सांगतो की तू काय काय लिहितोस..

आकाश - हं.. त्यांना सांग मी श्लोक लिहितो म्हणून..

मुल्ला - बाबू... या पोराचा प्लॅन तर डेन्जर आहे रे??

बाबू - मजबूत वाटतोय मला प्लॅन.. वाघ.. तुला काय वाटतंय??

वाघ - मी आज रात्रभर विचार करणार आहे... उद्या सांगतो..

बाबू - भाडखाऊ... माझ्या बायकोचा आपल्या सुटकेसाठी उपयोग होऊ शकतो.. समजलं का??

वाघ - सॉरी.. मी आजवर जे बोलायचो ती थट्टा होती..

आकाश - ते सगळं ठीक आहे.. पण...

चारही जणांच्या माना आकाशकडे वळल्या..

"पण मरणार कोण???"

सन्नाटा पसरला. इतर बरॅकमधील कुणालाही सामील करून घेणे शक्यच नव्हते. कारण अनेक संकटे उद्भवली असती..

"दोन आठवड्याच्या आत प्लॅन केलात तर... मी मरायला तयार आहे..."

दूरवर... खूप वर वर दिसणारे चांदण्याचे आकाशही..

.... चक्रावून नसीमकडे पाहात होते...

गुलमोहर: 

मी प.

वास्तव..... प्रखरपणे जाणवतय्..........छान आहे हा भाग. पुढील भाग लवकर टाका.

खुपच तुम्हि वास्तववादि लिहिता, अक्शरशा अन्गावर काटा येतो वाचताना, अस वाट्त आपण प्रत्यक्श तिथे वावरतोय,

छान लिहिता तुम्हि,

Famous कैदी संजुबाबा, हर्शद मेहता, गवळी काय करतात?
बाबु सारख त्यांना पण विडी सिगारेट दारु आणि मोबाईल फोन मिळतो
मंग तिथुनच स्वतःचा धंदा चालवला जातो त्याना सर्व सेपरेट असत कारण पैसा साहेब
जेल मधे सुखाच आयुष्य जगायला ते तिथे पैसा देतात अपवाद अजमल कसाब कारण तो आपल्या
भारत सरकारचा पाहुणा आहे त्याला वाचायला वर्तमानपत्र पुस्तक पेश्शल खाना रमजानच्या दिवसात
मांसाहार खजुर अशा सुख सोयी दिल्या जातात कारण आता सर्व नाही लिहित आपण सुज्ञ आहात Wink

Back to top