अक्षरलेखन - काही टिप्स

Submitted by पाषाणभेद on 7 February, 2011 - 02:22

माझ्या मागच्या एका धाग्यात बर्‍याच जणांनी माझ्या अक्षराचे कौतूक केले होते अन मी 'अक्षर लेखन कसे सुधारावे' याबाबत लेखही लिहीणार होतो. बर्‍याच दिवसांपासून लिहीन लिहीन म्हणत होतो पण वेळ नसल्याने हा लेख लिहीला नव्हता.

आता माझे अक्षर फारच छान आहे अशातला भाग नाही. कदाचीत हा लेख माझ्या जुन्या स्मृतींना उजाळा असूही शकतो.

लहाणपणाचे माझे अक्षर कसे होते याबाबत मला आठवत नाही. माझ्या लक्षात माझी इयत्ता ५ वी पुढील वर्षे आहेत. इयत्ता ४ थी पर्यंत माझ्या वेळी पाटी अन पेन्सील असायची. म्हणजे वह्यावैगेरे होत्या असे आठवते, पण माझे अक्षर नक्की कसे होते अन लिहीतांना मी लेडपेन्सीलचा किती वापर करायचो ते नक्की आठवत नाही. नाही म्हणायला चित्रवैगेरे काढायचो. माझे १० वी पर्यंत शिक्षणाचे मराठी माध्यम होते. ५ वी नंतर शाळेचा कॅनव्हास मोठा झाला. माझे अक्षर तेव्हा फार वळणदार होते असे नाही. जाणूनबुजून, अक्षर सुधारणा होण्यासाठी पानेच्या पाने शुद्धलेखन कर असा काही प्रकार मी केला नाही. शाळेतल्या शिक्षकांनीही तसे प्रयत्न केले नाही. गृहपाठ त्यांनी तपासला पण कधी अक्षरावरून मार खाल्ला नाही. म्हणजेच माझे अक्षर इतरांनी वाचण्यायोग्य निश्चीतच होते.

त्यावेळी आत्ताच्यासारखे बॉलपेन, जेलपेन यांचे प्रस्थ नव्हते. जे काही मिळायचे ते शाई भरून वापरायचे फौंटनपेन मिळायचे. बॉलपेन वापरणे म्हणजे काहीतरी गैर करणे असे वातावरण होते. शिक्षकसुद्धा बॉलपेनने लिहीलेले असले की शिक्षा करायचे असे आठवते. शाईचा फौंटन पेन वापरला तर अक्षर सुधारते असा प्रवाद असायचा. त्या काळी Waterman व कॅम्लीन असले ब्रांडेड फौंटनपेन प्रसिद्ध होते. शाळेत काही वेळेस फिरते विक्रेते त्यांच्याकडचे शाईपेन विकायला यायचे. त्या पेनांवर बॉलपेनही मोफत असायचा. मी कधीच तसले पेन विकत घेतले नाहीत. त्याकाळी एकतर खिशात आता आपण देतो तसला पॉकेटमनी मुलांना द्यायची पद्धत नव्हती. माझ्या वडलांच्या ओळखीचे एक 'दिपक स्टोअर्स' म्हणून स्टेशनरीचे दुकान होते. तेथूनच आम्ही आमचे पेन, पेन्सीली, कागद आदी वस्तू घेत असू. फौंटनपेन विकत घेणे ही एक चैन असायची. फौंटनपेनची निब ही पुर्ण लांबीची असायची. बर्‍याचवेळा ही निब घासली जायची किंवा वाकडी व्हायची. मग २५-३० पैशात नविन निब टाकावी लागायची. निबच्याखाली असलेली जिभ ही कधी बदलावी लागायची नाही. त्या निब अन जिभ ची सेटींग करून (योग्य अंतर ठेवून) शाईचा फ्लो कमी जास्त करता यायचा. असल्या फौंटनपेनमध्ये शाई भरावी लागत असे. शाईची मोठी दौत घरी भरलेलीच असायची. ती कॅम्लीन कंपनीची होती असे आठवते. दुकानात शाई भरणे हाही प्रकार असायचा. अमुक दुकानातली शाई फिकी असते अशा गोष्टीही मित्रांमध्ये होत असत. शाई भरण्यास ५ पैसे लागत. एकदा दुकानदाराने आग्रह करून एक हाफ निबचा चायना पेन (त्याकाळीही असलेला!) घ्यायला आग्रह केला होता. त्यात शाई भरणे फार सोपे होते. पेन उघडला की त्याच्या आतमध्ये एक प्लास्टीकचे ड्रॉपर असे. ते दाबून पेन दौतीत बुडवला अन ड्रॉपर दाबणे सोडले की निबेद्वारे तो पेन शाई शोषून घेत असे. पण त्या हाफ निबच्या चायना पेनमध्ये शाई कमी बसत असे. माझा ५ वीत पहिला क्रमांक आला होता. वार्षिक स्नेहसंमेलनात मला शाळेने एक फौंटनपेन बक्षिस दिला होता. तो गळका निघाला.

ह्या फौंटनपेनला आठवड्यातून धुण्याचाही कार्यक्रम असे. नंतर तो वाळवणे शाई भरणे असले उपकार्यक्रमही होत असत. एखाद्या भांड्यात पेन बुडवायचा तेव्हा ते पाणी निळे होई. तो निळा रंग आपण कपड्याला निळ देतो तसा असे. सगळ्या मुलांच्या कंपासमध्ये २/३ तरी शाईपेन असतच असत.

सहावीत असतांना माझ्या एक इंग्रजीच्या शिक्षकांकडे शिकवणी लावली होती. शिकवणी दुपारची असायची. शिकवणी सुरू होण्याच्या आधी अर्धा तास आम्ही मुले त्यांच्या घराबाहेर जमत असू. त्यात एक जनार्दन नावाचा माझा मित्रही होता. त्याने एकदा तेथील फरशीवर फौंटनपेन घासला. त्याला त्याबद्दल विचारले असता 'त्याने पेन चांगला चालतो अन अक्षर चांगले येते' असे सांगितले. मीही माझा पेन तेथे घासून घेतला. थोडक्यात निबचे टोक जाड करण्यासारखा तो प्रकार होता. त्या वेळी कधी जाणूनबुजून इतर कोणाचे अक्षर बघणे, वही मागणे आदी प्रकार केले नाहीत. नंतर त्याच की पुढल्या वर्षी माहीत नाही, पण माझ्या वर्गात दत्तात्र्येय नावाचा मुलगा आला. आमच्या घराच्या पुढच्या गल्लीतच तो राहत असे. त्याचे अक्षर मोठे ढबू पण गोलसर होते. ते बघितल्यावर नकळत मी माझे अक्षर ताडून बघितले. माझे अक्षर त्यामानाने छोटे होते. माझेही अक्षर त्याच्यासारखे टपोरे आले पाहिजे हे माझ्या मनात आले. मी ही मग तसा प्रयत्न केला. पण दत्ता म्हणत असे की तुझेच अक्षर छान आहे. एकुणच त्याला माझे अन मला त्याचे अक्षर चांगले वाटत असे. एकदोन वेळा मी त्याच्या वह्या घरी आणून ते वळण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. मी तसलेच मोठे अक्षर काढण्याचा प्रयत्न करत असे. नंतर माझ्या वर्गात विवेक नावाचा हुशार मुलगा आला. (पुढे तो डॉक्टर झाला.) तो माझ्याच शेजारी बसायला लागला. त्याचेही अक्षर मोठे सुरेख अन जवळपास माझ्याच वळणाचे होते. आता तो शेजारीच बसत असल्यामुळे नकळत त्याच्याचसारखे अक्षर काढण्याचा छंद लागला. पुढल्यावर्षी आमच्या तिघांच्या तुकड्या विभागल्या गेल्या.

एक मात्र समजले की पेन विशिष्ट कोनात चालवला की अक्षर चांगले येते अन तोच कोन लिहीतांना सांभाळला पाहिजे. आपले अक्षर चांगले आले पाहिजे असा मनातून ध्यास घेतला गेला. मी वर्तमानपत्राच्या फाँन्टचा बारीक नजरेने अभ्यास करत असे. त्यातील अक्षरांचे वळण कसे असते, कोठे बारीक होणे, सरळ रेषा कशा मारणे आदी मी निरीक्षण करत असे. घरी पाटीवर तसली वळणे काढणे, अक्षरे काढणे आदी करत असे. नकळत पेन अन पेन्सिलीचा कोन साधत गेला अन माझे अक्षर होते त्या पेक्षा वळणदार बनले. ७ वी ८ वीत वर्गशिक्षक माझ्याकडून दर महिन्याचे कॅटलॉग लिहून घ्यायचे. अर्थात माझे अक्षर फारच चांगले आहे असा त्यात अभिमान, गर्व नव्हता. उलट कुणाचे अक्षर माझ्यापेक्षा चांगले असले की त्या मुलाचा हेवा वाटायचा. ८ नंतर योगेश नावाच्या हुशार मुलाच्या शेजारी मी बसत असे. त्याचे अक्षर तर पुर्ण शाळेत एक नंबरचे होते. अशाप्रकारे इतरांचे पाहून आपलेही अक्षर चांगले असावे असे वाटत असे.

नंतर मी पाटीवर वेगवेगळ्या कोनातून अक्षरे काढून पाहत असे. त्यात तिरपी अक्षरे असलेली स्टाईल (आता समजले की ती स्टाईल इटॅलीक असते!) मला फार आवडली अन मी त्याच प्रकारे लिहू लागलो. पेन कसा धरायचा, किती दाब द्यायचा असला विचार मी नेहमी करत असे. दहावीच्या परीक्षाचे पेपरही फौंटनपेननेच लिहीले. पण एक मोठी चुक मी तेव्हा केली. परीक्षेसाठी नविन पेन घेतला. नविन पेनची निब अजून रुळलेली नव्हती. अर्थातच त्यामुळे माझे परीक्षेतील अक्षर खराब आले.

नंतर अकरावीपासून मी बॉलपेन वापरणे चालू केले. अक्षर चांगले होतेच आता बॉलपेनमुळे शाई एकसारखी येत असे. त्यामुळे वेगात लिहीणे जमत असे. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला मी रेनॉल्ड्सचे दोन पेन अन चारपाच रिफिल्स आधीच आणून ठेवले होते. ते थोडे वापरले अन त्यांच्या रिफीलचा बॉल 'सेट' झाला. त्याच पेनने मग मी पेपर लिहीले. कॉलेजमध्ये वेगाने लिहीण्याची सवय लागावी म्हणुन अक्षरावर विचार करणे सोडून दिले. नोकरीला लागल्यानंतर मात्र लिहीण्याचा फारसा संबंध राहीला नाही. तरीही काही लिहायचे असेल तर पुर्वीसारखेच चांगले अक्षर यावे याचा प्रयत्न करतो. देवनागरी लिपीतले माझे अक्षर बरे आहे परंतु अजूनही इंग्रजी कर्सीव्ह योग्यरीत्या जमत नाही. कदाचीत माझे शिक्षण मराठीत झाल्याचा तो परिणाम असावा.


छायाचित्र १

अक्षर लेखन सुधारण्यासाठी काही टिप्सः
१) मराठी / देवनागरी लिपीचे वळण कसे आहे ते काळजीपुर्वक बघा. आपली लिपी वाटोळी आहे. ती वळणदारपणेच काढता आली तर बघतांना चांगले वाटते. त्यामुळे वळणदार अक्षरच येईल याकडे कटाक्षाने लक्ष द्या.


छायाचित्र २

२) अगदीच लहान मुलांना "अक्षराकडे लक्ष दे, निट लिही, शुद्धलेखन लिही पाच पाने" असे नेहमी म्हणू नये. ते त्यांच्या पद्धतीनेच शिकतील. फक्त ती मुले थोडी समजदार झाली (५वी ६ वी च्या पुढे) तरच त्यांना अक्षरवळण समजेल. तेव्हा चांगल्या अक्षराचा आग्रह करावा.


छायाचित्र ३

३) सुरूवातीला तुम्ही पाटीवर लेखन केले तर उत्तमच. (सुरूवात म्हणजे: जेव्हा तुमची इच्छा 'चांगले अक्षर यावे' अशी असेल तेव्हा.) पाटीवरची पेन्सील मात्र बारीक खडूसारखी येते तीच वापरावी.

४) एखादे मुळाक्षर सुरूवातीला लिहावे. त्याचे वळण छापलेल्या अक्षरासारखे येवू देण्याचा सराव करावा. नंतर इतर मुळाक्षरे घ्या.

५) पेन्सीलचे टोक थोडे तिरपे केले तर योग्य वळणाचे अक्षर येते हा अनुभव आहे. असलाच सराव लेड पेन्सिलीने एखाद्या वहीवरही करता येतो.

६) फौंटनपेन वापरायचे असेल तर नविन निब रूळू द्यावी लागते. त्यामुळे नविन निबने एखाद्या कच्या कागदावर गोल गोल रेघोट्या मारत रहा. ते गोल दोन्ही बाजूने काढा. (म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेने व विरुद्ध दिशेनेसुद्धा.) त्याने नविन निबचे टोक योग्य घासल्या जाईल. हिच पद्धत नविन बॉलपेन आणल्यास करावी. आजकाल बोरूच्या आकाराच्या वेगवेगळ्या निबचा संच मिळतो. तो उपयोगी ठरावा. (मी कधी तो वापरला नाही.)


छायाचित्र ४

७) जेलपेनने योग्य आकार, दाब देवून येत नाही. त्यासाठी बॉलपेन वापरावा.

८) ईटॅलीक अक्षरे चांगली दिसतात. पण ती फारच तिरपी नसावीत.

९) परीक्षेसाठी नवीन पेन कधीच वापरू नये. परीक्षेसाठी तुमच्या नेहमीच्या पेनचे ३/४ संच तयार करून ठेवावेत. टिप क्रमांक ६ वाचा व ती अवलंबवा. मी तर ६ पेपरासाठी ६ रिफील्स तयार करून ठेवायचो. रिफिल्स जसजशा संपत जाताता तसतशा त्या बॉलमधून जास्त शाई सोडत जातात. त्याने अक्षर खराब येते.

१०) लिहीण्यासाठीचा कागद गुळगुळीत कधीच नसावा. एकाच प्रकारच्या खरखरीत कागदावर (जसे कॅनव्हास आदी ) अक्षर छान येते.

११) मराठीचे लेखन करतांना उर्ध्वरेषा द्याव्यातच. आजकाल लिखाणात उर्ध्वरेषा न देण्याचा प्रघात पडलाय. ते योग्य नाही. अर्थात उर्ध्वरेषादेण्यामुळे काही वेळ लागतोच तो वेळ मराठी (देवनागरी) लिपी लिहीणार्‍यांसाठी लक्षात घेतला जावा.

- पाषाणभेद उर्फ सचिन
०६/०२/२०११

गुलमोहर: 

वा वा.... शाळेचे दिवस आठवले Happy

>>एकदा दुकानदाराने आग्रह करून एक हाफ निबचा चायना पेन (त्याकाळीही असलेला!) घ्यायला आग्रह केला होता. त्यात शाई भरणे फार सोपे होते. पेन उघडला की त्याच्या आतमध्ये एक प्लास्टीकचे ड्रॉपर असे.
गोल्डन टोपणवाले का रे?.... आमच्या शाळेच्या दिवसात ते गोल्डन टोपणवाले "हिरो" पेन्स फार फेमस होते!

सचिन, अगदी माझ्याच लहानपणीचे कि हे सगळे. अक्षराचे नमुनेही सुंदर आहेत. मला शाळेत हस्ताक्षरासाठी नेहमीच बक्षीस मिळत असे. मी मग पत्र पण खुप लिहित असे. आता हाताने काही लिहिण्याचे प्रसंगच फारसे येत नाहीत.

सुरेख लेख.
खरतर मला फौंटनपेन, निब हे शब्द खूप उशीरा कळले. आम्ही शाळेत असतांना शाईपेनाला पत्तीपेन म्हणायचो (किती वर्षांनी पत्तीपेन शब्द आठवला मला), निबला पत्ती म्हणायचो. नवीन पेनची निब रुळण्यासाठी आम्ही दगडी काळ्या पाटीवर घासायचो.
बुमरँग तुम्ही म्हणताय ते हिरो पेनच. मी नववीत गेल्यावर घरी खूप हट्ट करून घेतले कारण ते खूप महाग होते त्या काळात इतर पेन ५-६ रु मिळत असतांना या पेनला २५-३० रु. मोजावे लागायचे. या हिरो पेनाची एकच अडचण म्हणजे यात शाई कमी मावायची. त्या काळी लकी पेन वगैरे संकल्पना पण फार जोरात होत्या, मी १० वी आणि १२ वी असे दोन्हीचे पेपर एकाच हिरो पेनने लिहीले होते. निब अगदी गुळगुळीत झाली होती त्यामुळे खूप पटपट लिहीता यायचे त्याने.

संगणक युगात हस्ताक्षराबद्दल हल्ली जरा अनास्थाच दिसून येते. त्यामुळे या छान लेखाचं विशेष अप्रूप.
<<आपली लिपी वाटोळी आहे. .... त्यामुळे वळणदार अक्षरच येईल याकडे कटाक्षाने लक्ष द्या.>> पाषाणभेदजी, आपल्या या पहिल्या टिपबद्दल एक उपाय असा असावा कीं लिहीताना खडू,पेन, पेन्सील शक्यतो टोंकापासून लांब धरावा/वी व मनगट सैल ठेवावे. [ कांही मुलं पेन्सील अगदी टोंकाच्या तासलेल्या भागाकडे धरतात व त्यामुळे अक्षर गिचमिड येणं अपरिहार्य असतं]

खरेच लहानपणातले दिवस आठवले.इकडे आल्यानंतर सुरुवातीला आई वडीलाना ,बहिणीला लांब पत्रे लिहायचें, नंतर फोनमुळे ते बंद झाले. आता मराठी लिहिणे जवळपास शून्यच !
छान आहे लेख आणी अक्षराचे फोटोही.

ह्या फौंटनपेनला आठवड्यातून धुण्याचाही कार्यक्रम असे. नंतर तो वाळवणे शाई भरणे असले उपकार्यक्रमही होत असत. एखाद्या भांड्यात पेन बुडवायचा तेव्हा ते पाणी निळे होई.

अगदी अगदी!!
मी ५वीपासून शाईपेन वापरायला जी सुरुवात केली, ती इंजिनिअरिंग होईपर्यंत!
अगदीच खराब झालं तरच पेन बदलायचं आणि नवीन आणायचं. मला कॅम्लिनचंच पेन लागे. १०वीत असताना एकच पेन होतं. मग परीक्षेत पंचाईत नको म्हणून मी अजून १ पेन आणलं. त्यावेळी विज्ञानाची सरावपरीक्षा (practicals) जवळ आली होती. बाबा गमतीत म्हणाले, "सशाची शिकार करायला वाघाच्या शिकारीची तयारी केलियेस!" कारण सरावपरीक्षा खूप सोप्पी असते Happy
मी सगळे पेपर्स पण याच पेनने लिहायची. मला पेपरला बॉलपेन जमायचं नाही. वहीत वगैरे चालयचं.
इतकं असून, मराठीच्या पेपरात निबंध सुरुवातीलाच लिहून, सगळा पेपर २ तास ४५ मिनिटांत पुरा होऊन मी शेवटच्या सारांशलेखनातले शब्द मोजत बसायचे.
मजा होती सगळी!!
Happy

लेख आवडला. आता पुन्हा दिसामाजी काहीतरी ते "लिहावे" असं वाटतंय..

चला एकूणच सगळ्यांच्या लहाणपणाच्या आठवणी यानिमीत्त्ताने जाग्या झाल्या. छान वाटले मला.