घर - ११

Submitted by बेफ़िकीर on 7 February, 2011 - 04:08

दुसर्‍या जागेत राहायला जाणे यात दोन मोठे प्रॉब्लेम्स होते. एक म्हणजे हवी तशी जागा मिळणे! अर्थात, चितळ्यांनी दिलेला नवीन प्रस्ताव फारच आकर्षक होता. डेक्कन जिमखान्यावरची नवीन शाखा एकहाती चालवणे आणि मदतीला दोन सहकारी, त्यात पुन्हा दोन हजार रुपये पगार आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टीही!

त्यामुळे जागेसाठी अगदी आठशे जरी भाडे द्यायला लागले तरी जमण्यासारखेच होते. उलट हे अधिकच बरे झाले होते. हॉटेल चालवण्याची कटकट चोवीस तास मागत होती दिवसातले! याउलट चितळ्यांचे हे नवीन काम करणे म्हणजे दिवसातील नऊ तास आणि आठवड्यातून एक सुट्टी! पुन्हा कसलीच डोकेदुखी नाही.

पण दुसरा प्रश्न अधिक मोठा होता.

हे 'घर' सोडून जायचे कसे?

काय कारण सांगायचे? कोण ऐकणार? आणि इथेच राहिलो तर वारंवार हेच ऐकायला लागणार की गौरी अपशकुनी आहे. तिला कायम दुय्यमच स्थान मिळणार! जी व्यक्ती स्वतःच्या संसाराचा सर्वनाश झाल्यानंतर केवळ स्वतःच्या आईला शांतता मिळावी म्हणून आपल्या प्रस्तावावर राजी होऊन येथे आली तिला आपण नेमके कसे स्थान द्यायला पाहिजे आणि कसे देत आहोत?

वसंताचा मेंदू पोखरून निघत होता. पण त्याने एक नक्की केलेले होते. कुणाशीही न भांडता, कुणालाही दोष न देता, पण इथून जायचेच! इतरांच्या स्वास्थ्यासाठी तरी जायचेच! त्यात आपला कोणताही स्वार्थ आहे असे नाहीच आहे आणि तसे कुणाला वाटूही द्यायचे नाही.

गौरी मात्र अजूनही म्हणत होती की आपले लग्न झाल्याला जेमतेम दोन वर्षे होत आलेली असताना तू असा निर्णय घेण्याचे खापर माझ्यावर फुटेल. आणि केवळ माझ्यावर खापर फुटेल म्हणून मी नकार देत आहे असे नसून मुळात आपण घर सोडण्याइतके काहीही वाईट झालेले नाही. माझ्याबाबत त्या असे म्हणतात हा त्यांचा मुळ स्वभाव नाही हे तूच मला सांगत आला आहेस.

पण वसंताने हा निर्णय का घेतला होता?

त्याची अनेक कारणे होती. एक तर गौरीला या दोघी कधीही आपल्यातली मानणार नव्हत्या. कुणालाही इतकासा आजार झाला तरी नैसर्गीकरीत्या त्यांच्या मनात जर असा विचार आला की गौरी येथे आल्यापासून हे सगळे होत आहे तर तो विचार थोपवण्यासाठी कुणीही काहीही करू शकले नसते. हां! इतकेच की त्यांनी तो व्यक्त केला नसताही! पण एखाददिवशी तो व्यक्त होणारच!

दुसरे म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती इतरांहून कमी असल्यामुले कदाचित वारंवार असे प्रसंग येत राहिले असते ज्याच्यात इतरांना आपली मदत केवळ बाबा म्हणतात म्हणून करावी लागली असती. अशा वेळेस आपण ती मदत नाकारू शकतो हेही खरे आहेच! पण नाकारली तर असेही म्हंटले असते की 'आता हे अगदी स्वतंत्र झाले आहेत'!

तिसरे म्हणजे पुन्हा गौरी! पण यावेळेस विषय वेगळा! तिला आता मूलबाळ होणार नव्हतेच! अशा परिस्थितीत, केवळ आपण एकत्र कुटुंबात आहोत म्हणून तिलाही सगळ्यांचे कष्ट पडावेत हा कुठला कायदा? अर्थात, अंजली वहिनी आणि तारका वहिनी यांनीही हा विचार केला असता तर काय झाले असते ते तर आहेच! पण त्या असा विचार करतच नाहीत असे नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या इथे राहिलेल्या आहेत इतकेच! त्यात त्यांचा मोठेपणा आहेच! त्या वेगळ्या झाल्या नाहीत किंवा आपापल्या नवर्‍याचे कान त्यांनी सतत भरवले नाहीत हा मोठेपणा आहेच! पण म्हणून त्यांच्या मनात काही वेगळे होणे नसतेच असे नाही. अशा वेळेस गौरीला आपण ही लाईफस्टाईल का स्वीकारायला लावायची? आपल्याला तो अधिकार आहे का? तिने तिच्या आईच्या मन:शांतीसाठी आपल्याशी लग्न केलेले असताना आपण आपल्याला हवे तसे तिला कसे काय वागवू शकतो? हे खरे आहे की हे घर नसते, सगळे एकत्र नसते तर आपलीही परवड झालीच असती. पण कसेसे जगलो असतो. आपल्यामुळे कुटुंब विभक्त होणार हा ठपका आहेच! पण आज गौरीचे घरातील स्थान काय? तर सर्वात लहान आणि एका गरीब दिराची बायको! तीही विधवा झाल्यानंतर मग दिराशी लग्न करून आलेली! याच दृष्टीने सतत पाहिले जाणार! 'आम्हीच मदत केली आणि सांभाळले म्हणून आज वसंताभावजी येथे पोचले आहेत' हे सतत दाखवून दिले जाणार! हॉटेलचा पचका झाला याचा वारंवार उल्लेख होणार! यापेक्षा विभक्त होण्याचा ठपका बरा नाही का? आणि उद्या जर अचानक गौरी म्हणाली की ज्या अपेक्षेने मीतुझ्याघरी आले त्यातील कोणत्याच अपेक्षा तर पूर्ण झाल्याच नाहीत उलट मला नावेच ठेवली जात आहेत व त्यामुळे मी तुझ्याबरोबर आयुष्य का घालवावे असा प्रश्न माझ्या मनात येत आहे' तर आपण काय करणार? ना घरका ना घाटका!

बायको म्हणजे मस्करी नव्हे! ती तिचा सर्व इतिहास, शुद्ध प्रेमाचे माहेर, सर्व गोड आठवणी हे सगळे सोडून सासरी येते. येथील अपेक्षांचे ओझे सांभाळात, त्यावर गोड हासण्याचा प्रयत्न व नंतर अभिनय करत आणि माहेरच्या आठवणीने दु:खी होत येथे टिकून राहण्याच्या प्रयत्नात आयुष्य घालवते. हे सगळे का तर म्हणे समाजरचनाच अशी आहे. पुरुषाला जर सासुरवाडीला जायची प्रथा काढली तर कसे वाटेल्? तिकडे त्याच्या प्रत्येक हालचालीत, कृतीत आणि बोलण्यात उणीदुणी काढायला सुरुवात झाली तर कसे वाटेल? आणि आपल्या स्वतःच्या घरीपरत गेलो आणि बाप जर म्हणाला की तुझी जबाबदारी आता आमच्यावर नाही, आहे तसा तिकडेच नांद तर कसे वाटेल?

एक फक्त विभक्त झालो याचा दोष माथी लागणे आणि त्या बदल्यात या सर्व दु:खांपासून सुटका! काय अधिक चांगले?

विभक्त होणे!

वसंताने शेवटी कसेबसे गौरीलाही पटवून दिले.

आणि आज रात्रीच त्याने तो विषय काढला. अर्थातच, आईसमोर नाही! कारण आईचा चेहराच ते ऐकून कसा झाला असता हे त्याला माहीत होते. शेवटी शेंडेफळ होते ते!

बाबा चरकलेच! हा अचानक असे काय बडबडतोय!

बाबा - काय रे? अचानक?

वसंताने विचार केला. आपल्याला असे विषयही सगळ्यांसमोर का काढावे लागतात? काहीच प्रायव्हसी का नाही? मला जे म्हणायचंय ते मी फक्त बाबांना का सांगू शकत नाही? पण नाही! ते सगळ्यांसमोरच बोलायला हवे.

वसंता - अचानक असं नाही.. डेक्कन जिमखान्यावर काम मिळालंय ना?.. आता रोजचं जाणं येणं म्हणजे..

बाबा - मी दिवसातून वीस किलोमीटर चालायचो मालाची विक्री करायला..

वसंता - तो काळ वेगळा होता बाबा..

बाबा - कसला आलाय वेगळा.. तुझं सगळं असंच असतं... भाडंही भरून आलेला असशील..

वसंता - अजून जागाच मिळाली नाहीये...

बाबा - शोधूच नकोस.. एकत्र राहिल्याने खूप फायदे होतात...

'तोटे काय काय होतात ते म्हाईत आहे का तुम्हाला' हा प्रश्न वसंताने गिळून टाकला.

दादा - पण काय झालं काय? अचानक असं का ठरवतोयस?

वसंता - अचानक नाही रे... आता कामाची जागा बदलली..

दादा - डेक्कन म्हणजे पंधरा मिनिटात पोचशील..

वसंता - तसं नाही दादा...

आता मात्र अंजली वहिनींनी मुख्य मुद्दा काढला.

अंजली - तुम्हाला.. घरात काही... मनस्ताप वगैरे तर...

वसंता - छे छे? काय बोलताय वहिनी? अहो सगळे आहेत म्हणून तर चाललंय...

अंजली - मग असं का ठरवताय??

वसंता - सांगीतलं ना? ..

अंजली - काय गं गौरी??

गौरी - मी नाहीच म्हणतीय... ह्यांनी काय डोक्यात घेतलंय काय माहीत...

अंजली - गौरी नाही म्हणतीय तरी कशाला जाताय तुम्ही??

तारकावहिनींनी अत्यंत सूचक प्रश्न विचारला.

तारका - कुणी काही बोललंय का तुम्हाला?

वसंत - छे हो... असा का सगळे गैरसमज करून घेताय?

कुमारदादाने आता जेवण थांबवलं आणि तो बोलू लागला. तसे सगळ्यांनीच जेवण थांबवून ऐकायला सुरुवात केली.

दादा - वसंता.. माणसं नशीबाने मिळतात. आपण आपले आई वडील निवडू शकत नाही, आपल्या पोटी कोण जन्माला यावं तेही निवडू शकत नाही. इतकंच काय, आमच्यावेळी तर नवरा आणि बायकोही निवडता येत नव्हते... पण ही नशीबाने मिळालेली माणसं जी असतात ना? त्यांच्यातच आपले सुख आणि दु:ख असते.. याशिवाय जग म्हणजे काय वसंता? आपली नोकरी, आपला संसार आणि घर! या घरातच आपलाही संसार आणि इतरांचाही संसार असू शकतो. समजा आम्ही तीन मोठे भाऊ तुला नसतो तरीही आई बाबांचा संसार इथे असताच! त्यांचा आणि तुझा असे दोन संसार येथे नांदले असते. इतरांच्या संसारांचा, अस्तित्वाचा आणि साथ देण्याच्या मनोवृत्तीचा आदर करतच आपलाही संसार आदरणीय होईल अशा पद्धतीने करणे हेच आपल्यासारख्या सामान्य माणसांचे जीवन असते. यात चमत्कार घडत नाहीत. लॉटर्‍या लागत नाहीत. खजिने मिळत नाहीत. आपण राजकारणात नसतो. आपण बिझिनेसमध्ये नसतो. आपण लोकांना नोकर्‍या देऊ शकत नाही कारण आपल्याला आपलीच नोकरी सांभाळण्याचे काम असते. आपली मुले शाळेत जातात आणि कॉलेजमध्ये जातात आणि शेवटी संसाराला लागतात. आपण दानधर्म करत नाही. आपण बुवा होत नाही. संसार सोडत नाही. सन्यास घेत नाही. हे आपले ज सामान्यत्व असते त्यात असामान्यता इतकीच, की आपण आयुष्यात कुणालाही दुखावले नाही, सगळ्यांशी मिळून मिसळून वागलो आणि पुण्य ज्याला कशाला म्हणत असतील ते साठवून जगाचा निरोप घेतला. इतके सगळे सांगण्याइतका काही तू घोर अपराध केलेला नाहीस किंवा करायला चाललेलाही नाहीस. पण एक लक्षात घे, की घर सोडणे, आपल्या रक्ताच्या नातेवाईकांना सोडणे, विभक्त होणे यातील हेतू, यामागचे कारण काहीही असो! पण त्यामुळे गोडी मात्र कमी होते नात्यांमधील! तुला वाटत असेल की अनेकांनी आजवर सांगीतले की लांब राहिले की नात्यात गोडी असते, जवळ रहिले की धुसफूस होते. पण एक लक्षात घे! लांब राहिले की जी गोडी असते ती बरीचशी कृत्रिम झालेली असते. आणि जवळ राहण्यातून जी धुसफूस होते ती मुळातच सहवासामुळे असलेल्या प्रेमातून निर्माण होते. विचार कर वसंता! लव्ह मॅरेजेस म्हणून जी काही असतात, त्यातली कितीशी टिकतात? अनेक टिकत असतीलही! पण जी टिकत नाहीत ती का टिकत नाहीत माहीत आहे? कारण ते जे काही 'लव्ह' असते ते आकर्षण असते. आकर्षणाचा कंटाळा येतो आणि त्या आवडलेल्या चेहर्‍यामागील स्वभाव समजायला लागतो. अशा वेळेस खटके उडतात. आणि मग ते लग्न बिनसते. आणि ज्यांचे लव्ह मॅरेज टिकते ते का टिकते माहीत आहे? कारण मुळातच असलेल्या आकर्षक किंवा आकृष्ट चेहर्‍यांमागचे स्वभावही चांगलेच असतात. जे फक्त आणि फक्त सहवासामुळेच कळतात. सहवास हा अत्यंत महत्वाचा घटक आहे वसंता! अत्यंत महत्वाचा! वर्षानुवर्षे लांब राहणारे सख्खे भाऊ मनानेही दुरावू शकतात. पण वर्षानुवर्षे शेजारी राहणारे आणि अत्यंत भिन्न स्वभावाचे लोक एकमेकांच्याशिवाय जगूही शकत नाही अशा पातळीला पोचू शकतात. यामुले सहवास कुणाशी ठेवायचा आणि कुणाशी नाही हे माणसाने स्वत:च्या सद्सद्विवेकबुद्धीला विचारूनच ठरवायला हवे. आजवर झालेल्या संस्काराना विचारूनच ठरवायला हवे. सहवास सोडण्याची उर्मी हजार वेळा मनात येऊ शकते वसंता, पण सहवास सोडायचा नाही हा विचार एकदा जरी मनात आला तरी माणसाने जिंकली म्हणायची लढाई! मी हे सगळे जे तुला सांगत आहे ते स्वार्थातून नाही. गौरी आज या दोघींना मदत करते, ती निघून गेल्यावर पुन्हा या दोघीच राहतील असे मला वाटते म्हणून नाही. तुझ्यासारखा एक लहान भाऊ सतत घरात असावा ज्यामुळे हक्काने कामे सांगता येतात म्हणून मी असे म्हणत नाही. मी हे जे म्हणत आहे ते आजवर जे बाबांनी मला शिकवले आहे तेच सांगत आहे. तुझा संसार उभा राहिला, स्वतंत्र झाला, छान झाला तर इथे कुणाला नको असेल? कुणाला असे वाटेल की गौरीसारख्या इतके सोसलेल्या मुलीने या घरात एकत्र राहून सगळी कामे करावीत? कुणालाच नाही वाटणार वसंता! पण इतकेच वाटते की तू एकटा झालास, स्वतंत्र झालास तर हळूहळू येणेजाणे, भेटणी कमी व्हायला लागतील. मग हळूहळू निमित्तानिमित्ताने भेटणे सुरू होईल. मग काही वेळा तेही नाही. मग फक्त कार्याला भेटणे! मग दुरावे! शेवटी बाहेर कुणी भेटले आणि म्हणाले की ते कुमार पटवर्धन तुमचे कोण हो? तो माझा थोरला भाऊ आहे. इतकेच सांगण्यापुरते नाते राहील. तू काही अमेरिकेत चाललेला नाहीस. दोनच किलोमीटरवर चालला आहेस तरीही सांगतो. एकाच वास्तूत राहणे आणि काहीश्याच अंतरावर राहणे यात भरपूर फरक आहे. तू म्हणशील हेच मी सगळे राजूला का सांगीतले नाही? त्याचे कारण असे आहे की त्याचे प्रमोशन होत होते त्या बदलीमुळे! तेही दोन स्टेप्स पुढचे! अशा वेळेस त्याला आपण विरोध करणे योग्य नाहीच! समजा, तसाही त्याला प्रस्ताव आला असता की तुम्हाला नोकरी करायचीच असली तर आमच्याकडे फक्त कानपूरलाच जागा आहे, तर त्याने काय केले असते? करावीच लागली असती ना बदली मान्य?पण तुझी बाब वेगळी आहे. तू इथेच, पुण्यातच असणार आहेस. तेही, चितळ्यांचे जुने दुकान एक किलोमीटरवर आणि नवे दुकान दोन किलोमिटरवर इतकाच फरक आहे. या फरकासाठी तू जागा बदलायचा निर्णय घेत असशील हे खरेही वाटत नाही आणि योग्यही वाटत नाही. घरातील वादविवाद होतातच! या बायका आपले सगळे सोडून इथे आलेल्या असतात आणि केवळ आपापल्या नवर्‍याच्या स्वप्नांमध्ये स्वतःची स्वप्ने जमतील तशी मिसळून एक कॉमन स्वप्नांचा लहानसा साठा तयार करतात. त्यात त्यांचे स्थान नेहमीच गौण ठरवले जाते दुर्दैवाने! त्यांची स्वप्ने रंग बदलतात, नवर्‍यांची नाहीत! त्यामुळे मुळातच एक मुलगी सासरी येते तेव्हा तिला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. अनेक चांगल्या किंवा तिला आवडत्या गोष्टींचा! अशा अवस्थेत केव्हा ना केव्हा स्वतःचे असामाधान , स्वतःचा त्याग एखाद्या स्फोटाप्रमाणे शब्दांमधुन बाहेर पडतो. ते शक्य असतेच! ते होतेच! पण या सगळ्याच्या मुळाशी प्रेम असते वसंता! आणि तेही सततच्या सहवासातून निर्माण झालेले प्रेमच! नुसतेच रक्ताचे नाते आहे म्हणून असलेले प्रेम नव्हे.

सरळ होते! कुमारदादाच्या या बोलण्यानंतर कोण वेगळे राहण्याचा डिसीजन घेणार? सगळेच पानाकडे बघत विचार करत बसलेले होते. वसंता मात्र बोलू लागला.

वसंता - पटलं दादा! म्हणतोस ते अगदी खरं आहे. सहवासातून निर्माण झालेले प्रेम हे सर्वश्रेष्ठच! पण... मला एका प्रश्नाचे उत्तर देशील का?

दादा - ??????

वसंता - सहवासच नकोसा होत असला तर काय करायचे?

दादा - कुणाला नकोसा झाला आहे सहवास???

वसंताने मान खाली घातली. नको तेच बोलायला लागणार होते. ती वेळ कुमारदादाने आणलेलीच होती. अंजली वहिनी आणि तारका वहिनींचा सहवास गौरीला अत्यंत बोचरा वाटतो हे काय वाट्टेल ते झाले तरीही कुणाला सांगायचे नाही हे वसंताने ठरवलेलेच होते. सगळ्यांनाच धक्का बसेल असे वाक्य तो बोलला!

वसंता - मला.... तुमच्या सगळ्यांचा!

अण्णाने खटकन कुमारदादाकडे पाहिले. दादाने मान खाली घातलेली होती. अंजली वहिनी आणि तारका वहिनी एकमेकांकडे बघत होत्या. गौरीने शरमेने मान खाली घातली होती. आपला नवरा म्हणजे अक्षरशः अजब आहे हे तिला समजलेले होते. वेदा आणि उमेश पटकन निघून गेलेले होते. आणि बाबा???

बाबांच्या त्या जाड भिंगांच्या चष्म्यातूनही समजत होते. डोळे पाणावलेले आहेत. आधीच आईंना झालेला कॅन्सर, त्यात वसंताने हे वाक्य बोलणे! पण सगळ्यांसमोर रडणेही शक्य नव्हते. त्यांनी डोळे पुसलेही नाहीत. फक्त मान इतकी खाली घातली की कुणाला समजुही नये की त्यांना काय वाटते आहे.

कुमारदादा मात्र निश्चलपणे, वसंताकडे न बघतच बोलला.

दादा - बाबा बसलेत इथे वसंता! काय बोलतोयस समजतंय ना तुला?... तू... खोटं बोलतोयस ना?

वसंताला आजवर असा आवंढा आलेला नव्हता.

हे घर सोडायचं? हा विचार कसा मनात आला आपल्या? कुणाला सोडायचं? का सोडायचं? चार शब्द आपल्या, तेही आज आलेल्या बायकोला ऐकायला लागले म्हणून? हिने तर हिचा स्वतःचा संसारही मांडलेला होता. तो नष्ट झाला ही बाब वेगळी! पण तेव्हा ही कोण होती आपल्या आयुष्यात? कुठे होती ही तेव्हा? आणि आज ही घरात आली आणि आपण... आपण हे घर.. सोडायचं??? हे घर???

हुंदका कसाबसा दाबून... पानाकडे बघत वसंता उद्गारला..

वसंता - अग.... दी.. खरं बोलतोय...

क्षणभर सगळे श्वास रोखले गेले. आणि पुढच्याच क्षणी भडका उडाला. अजली वहिनींना तो ताण तर सहन झालाच नाही, पण आजवर ज्याचे मुलाप्रमाणे केले त्या वसंता भावजींनी हा निर्णय घ्यावा हे तर अजिबातच सहन झाले नाही त्यांना!

अंजली - ज्जा... चालते व्हा दोघेही... चालते व्हा.. सगळेच वेगळे राहू... इथे आईंना कॅन्सर झालाय... आणि आपण सगळेच वेगळे होऊ... बाबा आहेतच आईंचे बघायला.. जा तुम्ही... मीच जागा शोधायला सुरुवात करते तुमच्यासाठी... काय गं गौरी?? तुला काही लाज वाटत नाही? एवढीशी असल्यापासून इथे उंडारायला यायचीस... आज लग्न करून आल्यावर माझ्या दिराला वेगळे काढतेस?? अक्कांना तरी विचारलेस का? आणि काय हो भावजी?? हे सगळे विचार, आमचा तिटकारा हे सगळं अगदी आजंच बरं झालं बरं?? आं?? आजवर नाही आला तो तिटकारा? एवढेसे असल्यापासून... जाऊदेत.. मला मागचं काही काढायचंच नाही आहे....

अण्णा आणि दादा त्या अवताराकडे बघतच बसले होते. तिकडे आईंना आवाज आला असावा. त्यामुळे बाबा उठून तिकडे गेले त्यांना सोबत द्यायला! वसंता काय म्हणतो आहे हे आईंना सांगायची हिम्मत बाबांमध्ये नव्हतीच!

गौरी मात्र रडू लागली.

गौरी - मी नाही हो वहिनी यांना म्हणाले असं... ह्यांनीच डोक्यात घेतलंय.. विचारा यांना.. काल कित्ती वेळा मी यांना सांगीतलं की असला निर्णय घेऊ नका...

अण्णा - गौरी ... तू रडू नकोस... वसंता.. असले विचार डोक्यातून काढून टाक.. आईला त्रास होईल..

वसंता - माफ करा मला सगळे.. मी वाईट आहे असे समजा हवे तर... पण... मी वेगळाच राहणार...

तारका - बायकोच्या ताटाखालचे मांजर आहात सांगा की तोंडाने.. मी वेगळाच होणार म्हणे!

तारका वहिनी भडकल्या तसा मात्र वसंता चूपचाप बसला.

अण्णा - वसंता.. हा असला निर्णय तू का घेतो आहेस ते काही माहीत नाही... वेगळे होण्यात काही फारसे गैर आहे असेही नाही... आम्हीही जाणारच होतो की फ्लॅट झाल्यावर.. पण ते रद्द केले हा भाग वेगळा.. पण माणसाला असे वाटणे... की आपला आपला संसार असावा.. यात तसे गैर काहीच नाही.. पण ज्या स्टेजला तू हा निर्णय घेतो आहेस त्याचा विचार कर... आत्ताच तुझ्यावर एक पोलिस केस होऊन गेली.. अजून बस्तान बसलेले नाही... राजू कानपूरला आहे.. आम्ही दोघेच आहोत... त्यात आईचं असं झालंय.. बाबांचं वय झालेलं आहेच... अशा वेळेस तू घरात असायला पाहिजेस की वेगळं व्हायचं?? आं??

मात्र आधीचे तारकावहिनींचे वाक्य ऐकून गौरी मात्र आता ऐकून घेण्याच्या पलीकडे गेलेली होती. वसंताने दिलेली सक्त ताकीद उधळवून लावत ती बोलली.

गौरी - दादाभावजी.. हे वेगळं होण्याच्या निर्णयाचा दोष मला माझ्या माथी नको आहे.. मी स्पष्ट सांगते सगळ्यांना की मी या निर्णयाच्या विरुद्धच आहे... पण मला माझ्या नवर्‍याचे ऐकायलाच हवे... तो वेगळे घर थाटणार असला तर मी काही इथे राहू शकत नाही... पण या निर्णयाचे खापर माझ्यावर कुणी फोडू नये..

वसंता गप्पच होता.

दादा - तुला कुणी बोलतंय का काही गौरी? अंजली आणि वहिनी... तुम्ही गौरीला उगाच बोलू नका..

अंजली - आम्ही कुणालाच बोलणार नाही... हवे तसे वागा..

धुसफूस खूपच वाढू लागली तसे बाबा अचानक तिथे आले. आणि दादाला म्हणाले..

बाबा - कुमार... एकदा एखाद्याने वेगळे राहायचा निर्णय घेतला की त्यात बदल केल्यानंतर घरातली शांतता पुर्वीसारखी होत नाही....

सगळेच बाबांकडे आश्चर्याने बघत असताना बाबा पुढे म्हणाले..

"जाऊदेत त्याला..."

विदीर्ण नजरेने वसंता पाठमोर्‍या बाबांकडे बघत होता. आणि इतर पाचही जणांच्या डोळ्यातून पाणी बाहेर यायचा प्रयत्न करत असले तरीही बाबांनी दिलेल्या निर्णयाचा मान ठेवायचा म्हणून पापण्यांमध्येच खोळंबलेले होते.

===============================================

अबोल्यानेच आवराआवरी करून आपापल्या खोलीत सगळे निघून गेल्यावर गौरीने आज मात्र वसंताशी स्पष्ट आणि मनात आहे तेच बोलायचे ठरवले.

गौरी - तू हे काय करतो आहेस वसंता... घर सोडतोयस... आणि तेही माझ्यासाठी.. मी मुळातच कमनशीबी आहे.. पण हे घर सोडण्याचा.. मोडण्याचा आरोप माझ्यावर होणार आहे... कायमचा ठपका.. आणि तोही मी तुझ्यासाठी सहन केला असता... पण मुळात हे करण्याची गरजच नाही आहे... इतका त्रास मला होतंच नाही आहे... आणि आज आपल्या दोघांची इथे गरज आहे.. आईंना कॅन्सर झालाय... अशा अवस्थेत हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे... पहिल्यांदा तू दादांना जाऊन भेट आणि सांग की तू चूक करत होतास...

वसंता - गौरी... निर्णय जेव्हा घेतला जातो तेव्हा ढोबळ मानाने विचार मांडले जातात... आणि निर्णय घेतला गेलेला असतो अत्यंत सुक्ष्म बाबींमुळे.. ज्यांना त्या ढोबळ स्वरुपाच्या वक्तव्यांमध्ये स्थानच उरत नाही.. त्या बाबी कुणी मान्यही करत नाही आणि लक्षात घ्यायलाही तयार नसते...

गौरी - म्हणजे काय??

वसंता - तू जेव्हा सकाळी उठून खाली जातेस ना? तेव्हा तुझ्यावर तीन नजरा असतात... हिची स्वच्छ काम करण्याची क्षमता किती... वेळेत काम करण्याची क्षमता किती... किती काम करते.. कुणाकुणाचे प्रेमाने करते... कुणाबाबत हिच्या कृतींमध्ये आकस दिसतो.. ही सगळी निरीक्षणाची पातळी असते... यात फक्त आणि फक्त पाहिलेच जाते.. कृती केली जात नाही.. यानंतर पातळी येते ती प्रतिक्रियेची... त्यात जे चांगले दिसले असेल त्याची स्वभावाप्रमाणे कंजुषपणे किंवा दिलदारपणे किंवा उपरोधिकपणे प्रतिक्रिया दिली जाते... म्हणजे असे... की अण्णाला समजा तू केलेली भाजी आवडली आणि त्याने तसे जाहीरपणे सांगीतले... तर तारकावहिनी जर दिलदार असतील तर म्हणतील... यांनाच काय, मलाही खूप आवडली भाजी... आता पुन्हा करशील तेव्हा मलाही सांग.. म्हणजे शिकून घेईन... यात एक मवाळपणा आणि त्यासोबतच दिरदारी असते... समजा तारकावहिनींचा स्वभाव कंजुष असला तर म्हणतील.. हं.. चांगली झालीय... बास... इतकंच... त्यांना जर उपरोधिकपणे बोलायचं असलं तर त्या म्हणतील... बरं झालं बाई यांना हवी तशी भाजी करणारी कुणी तरी आहे... मला तर इतके वर्षं काही जमतच नव्हतं...

या पातळीला माणसे सहज पोचतात... ही पातळीसुद्धा केवळ दुसरीच पातळी आहे गौरी... नीट ऐक.. केवळ दुसरीच पातळी.. निरीक्षण आणि त्यानंतरची प्रतिक्रिया... म्हणजे तू आमटीसाठीचे ओगराळे चुकून भातासाठी वापरलेस हे निरीक्षण... आणि 'अगं भातवाढणं आहे ना इथे' असे सौम्यपणे म्हणणे ही प्रतिक्रिया.. यात 'भातवाढणे वापरायला हवेस, तू काय करते आहेस हे मी पाहात आहे आणि तुझ्यापेक्षा मला जास्त नीटनेटकेपणा आवडतो' या तीन गोष्टी दाखवून दिल्या जातात... सहज पोचतात या पातळीवर माणसे... कुठल्याही घरातली..

तिसरी पातळी येते ती म्हणजे मुद्दामहून दुसर्‍याच्या चुका जाहीर करायच्या.. त्या चुका आहेत हे मुळात सर्वमान्य असेल याचा अंदाज असायला हवा.. म्हणजे... भातवाढणे असताना ओगराळे वापरणे ही चूक आहे हे आई, अंजली वहिनी आणि दादा आणि अण्णाला मान्य असायला हवे... आणि हेही माहीत असायला हवे की ते त्यांना मान्य आहे... मगच ही पातळी गाठता येते... या पातळीवर या दोघीही पोचलेल्या आहेत.. माझे त्यांनी कितीही केलेले असले... माझेही त्यांच्यावर तितकेच प्रेम असले तरीही.. ही पातळी त्यांनी गाठणे यात त्यांचा तुझ्यावरचा राग सिद्ध होतो... एक लक्षात घे... पुरुष घरात लक्ष देतच नसतात असे मुळीच नाही... उलट बारीकसारीक आविर्भावावर लक्ष असते आमचे..

ही पातळी तितकी धोकादायक नसते... कारण माणूस चुका टाळू शकतो...

चवथी पातळी म्हणजे इतरांच्या मनात किल्मिष आणणे.. जसे अंजली वहिनींनी रोज रात्री आपल्या खोलीत गेल्यावर दादाला सांगणे की आज गौरीने असे केले अन तसे केले.. यातून एक सामुहिक मनस्थिती बनायला लागते...

याही पातळीवर त्या दोघी पोचलेल्या आहेत आणि ही पातळी धोकादायक आहे.. कारण यानंतर तुझी अशी एखादी किंवा इतर काही चूक होईल तेव्हा दादा आणि अण्णा यांची मनस्थिती मुळातच तुला फेव्हरेबल नसेल..

त्यांच्या बायका जे बोलत आहेत ते त्यांना योग्य वाटेल..

ही पातळी या दोघींनी का गाठली याचीही एक कारणमीमांसा आहे गौरी.. तुझ्याहून मी श्रेष्ठ आहे हे दाखवणे हा मानवी स्वभावच आहे.. मानवीच काय, प्राण्यांमध्येही हा स्वभाव असतोच... मग एखादा चुकीचा वागतो हे सातत्याने सांगीतले जाणे ही कृती करावीशी वाटू लागते.. आणि याला कारण काय असते माहीत आहे?? तेच कारण.. जे मगाशी दादा सतत म्हणत होता... सहवास... सततचा सहवास.. या सततच्या सहवासनेच ही पातळी गाठली जाते...

सगळे विचारतायत की आईला कॅन्सर झाल्यानंतरही मी हा निर्णय कसा काय घेतला.. उत्तर ऐकायचेय??

आईचे कोण किती करते यावरून तुझे जगणे हैराण करून ठेवतील दोघी! शेवटी एक दिवस सगळ्यांसमोर दादाच मला सांगेल की 'वसंता, अरे गौरीला जरा सांग आईचेही करायला पाहिजे म्हणून'!

हे असेच का होईल हेही ऐक! लहान, हाफपँटमध्ये असलेल्या वसंताचे मी केले हे पुढे सांगणे जितके महत्वाचे ठरू शकेल त्याहीहून महत्वाचे हे ठरेल की ऐन आजारात आईंचे गौरीने काहीही बघितले नाही. तू चोवीस ता आईपाशी बसलीस तर दुसरे काह्तरी काढतील. पण इतके नक्की गौरी... की आईचे आजारपण हे एक मोठे कारण बनणार आहे एकमेकामधील संबंधांचे! इतकेच काय, आपण वेगळे राहिलो तर आपल्याला आणि राजूदादाला तर या दोघी नावे ठेवतीलच, पण एकमेकींशीही भांडतील!

या सगळ्याचे कारण काय माहीत आहे? माणसाला खरे तर स्वतंत्रच व्हायचे असते. कधीच जबाबदार्‍या नको असतात. कुणी असा माणूस पाहिला आहेस जो असे म्हणतो की माझे काम वाढवा आणि हवा तर पगार कमी करा? उलट पगार वाढला तरी आपले काम कमी कसे होईल हे पाहणे ही मानवी वृत्ती आहे. तू इथे असणे यचा अर्थच असा की या दोघींना सतत असे वाटणे की त्यांच्या कितीतरी नंतर येथे आलेली, नवीन असलेली एक व्यक्ती आहे जिच्यावरही त्याच सगळ्या जबाबदार्‍या असायला हव्यात. या अपेक्षा, ही वृत्ती, हे सगळे वर्षानुवर्षांच्य सहवासानेच होते गौरी!

मी आईच्या आजारपणावरून वाद होतील असे म्हणून त्यातून मोक्ळा होत आहे असे मुळीच समजू नकोस. रोज सकाळी आणि संध्याकाळी मी आणि तू आईला भेटायला येत जाऊ! प्रश्नच नाही. एकदाच शिव्या खाऊ की आपण विभक्त झालो. पण हा जो सहवास सहवास म्हणतो ना दादा? तो सहवास तितकासा सुखदच असतो असे नसते. तो थोरला असल्यामुळे त्याला कुणीही उलटून बोलत नाही एक अंजलीवहिनींशिवाय... त्यामुळे त्याला हे सगळे कदाचित सुखद वाटतही असेल की त्याला थोरला असल्याचा मान मिळतोय... पण.. तुला कायम अपमानच मिळणार आहे गौरी...

शेवटचा मुद्दा... तू आज आलीस या घरात... मी येथेच जन्मलो.. येथेच आणि याच लोकांमुळे वाढलो.. तुझ्यासाठी मी या सगळ्यांना सोडणे कितपत संयुक्तिक आहे असा प्रश्न खुद्द तुझ्याही मनात कदाचित येईल इतकी तू मोठ्या मनाची आहेस... इतरांच्या मनात तर येईलच येईल.. पण एक लक्षात घे...

तू आणि मी लग्न केले ... आता आपल्याला मूल बाळ होणार नाही म्हणून ठीक आहे... पण आपल्याला मुले झाली असती... तर आपली शेवटपर्यंत हीच इच्छा असती की या सर्व मुलांनी एकत्र राहावे... पण बाबा स्वतः??

बाबा स्वतः कुठे राहिले घरातल्याबरोबर? माझे सख्खे दोन काका वारले हे तुलाही माहीत आहेच.. दोघेही थोरले होते बाबांहून.. पण शिक्षणासाठी जे बाबा पुण्याबाहेर गेले ते दहा वर्षे तिकडेच होते की... लग्नानंतरचीही दोन वर्षे तिकडेच काढली त्यानी....

आई मुलगा... वडील मुलगा.. मित्र मित्र... भाऊ भाऊ.. बहिणी बहिणी.. आणि दीर वहिनी... या सर्व नात्यांपेक्षा सर्वात अधिक चॅलेंजिंगम सर्वात अधिक आनंददायी आणि सर्वाधिक मानसिक आधार देणारे नाते कुठले असते गौरी?? अर्थातच नवरा बायको... मी फक्त तुझ्यासाठी आणि तू फक्त माझ्यासाठी असण्याची जी भावना असते ना... तिच्यासमोर धबधब्यासारखी कोसळणारी दु:खेही किरकोळ वाटू शकतात गौरी... "

अर्थातच.... गौरीने वसंताला मारलेली ती दीर्घ मिठी अबोलपणे हेच सांगत होती....

... की तू फक्त माझ्यासाठीच बनलेला आहेस हे मला... त्याचवेळेस माहीत असते तर???

============================================

आई!

काय सांगणार आईला निघताना? दोन दिवस आधीच कुमारदादाने सांगीतलेले होते. वसंताला चितळ्यांनी दुकानाच्या शेजारी जागा दिलीय आणि तिथेच राहायला सांगीतलेले आहे. आईला ती एक प्रकारची व्यावसायिक प्रगतीच वाटेल याची काळजी घेण्यात आली होती. पण हे सगळे तोवर ठीक होते जोवर तो प्रसंग प्रत्यक्षात उद्भवलेला नव्हता.

पण आज किरकोळ सामान नवीन जागेत हालल्यानंतर सगळ्यांना नमस्कार करून झाल्यावर आईकडे जायचे होते. मुळात आजवर तापटपणे बोलणार्‍या अंजलीवहिनी आणि बिनधास्त पाणउतारा करणार्‍या तारका वहिनी अबोलच झालेल्या होत्या. डोळ्यांवरूनच कळत होतं! रडून रडून हालत झालेलि आहे ते! पण ते दाखवणं अमान्य होतं कुमारदादाला! आईसमोर कुणीही असं दाखवायचं नाही की वसंता चालल्याचे कुणाला दु:ख झालेले आहे असे त्याने जाहीर केलेले होते.

पण.... !

पण... !

आईच्या खोलीत तिला नमस्कार करायला वसंताने पाय ठेवला आणि आईने त्याला दारात पाहूनच आपले बाहू फैलावले. किती लांब जाणार होता तो? तर फक्त दोन किलोमीटर! आणि का जाणार होता? तर कायमचा तिकडे राहायला!

वसंताला समजलेच नाही की तो कधी धावत आईकडे गेला आणि तिच्या मांदीवर दोके ठेवून गदगदू लागला. एक अन एक जण.... एक अन एक जण त्या खोलीतून त्याच क्षणी बाहेर पडला.. कारण ते दृष्य पाहणे कुणालाही शक्य नव्हते... न रडता पाहणे तर शक्यच नव्हते...

बाबांना धीर देत अंजली वहिनी त्यांच्या पाठीवरून हात थोपटू लागल्या.

'घर'!

आज 'घर' दुभंगत होते. कायमचे!

आईच्या डोळ्यात पाणि जमा झाले होते त्याला दोन कारणे होती. वसंता आता सारखा इथे नसणार हे एक... आणि... आपले काही बरे वाईट झाले तर त्या वेळेस तो कदचित आपल्याजवळ नसेल... हे दुसरे..

आई - दोन महिने पडून राहावे लागते होते मला... तुझ्यासाठी... कारण तू पोटात होतास आणि... हालचाल झाली तर... काहीही झाले असते... आईने आणि सासूबाईंनी जिवाचे रान केले माझ्यासाठी... आणि .. तुझा जन्म झाला वसंता... कुमारचा जन्म झाला तेव्हा झाला नसेल इतका आनंद झाला रे मला.. आणि आज पहिल्यांदाच... तू पुण्यात असूनही... इथे नसणार... सगळ्या सदाशिव पेठेत आपले घर म्हणजे... एक उदाहरण देण्यासाठीचेच घर होते... पण आता ते दुभंगले.. अहो... अहो इकडे या ना... तिकडे काय उभे राहता??... हा चाललाय माझा मुलगा घर सोडून... राजू.. राजू निदान प्रमोशनसाठी गेला.. हा नुसताच चाललाय.. आणि राजू गावाला गेला तेव्हा... मला... मला कॅन्सर नव्हता हो झालेला... ही अशी उठून कानपूरला गेले असते मी बिगुलला पाहायला.. पण आता काय... गौरी... सांभाळ हो याला.. बायको नेहमी बायकोच नसते बरं??... कित्येक वेळा तिला मैत्रीण व्हावे लागते... कित्येक वेळा... हट्टा करणारी मुलगीसुद्धा... नवर्‍याला लहानपणीच्या आठवणींनी गलबलून आले तर बहीणही.... आणि... आणि आईपासून जर तो दुसरीकडे राहायला जाणार असेल ना???... तर... आईसुद्धा..!!!!!

नाही सहन झाले कुणालाच!

गौरी ओक्साबोक्शी रडली. अंजली वहिनी आणि तारका वहिनींनी तिला जवळ घेतले. हा निर्णय कुणी आणि का घेतलेला आहे हेच समजेनासे झालेले होते.

शेवटी दादा आणि अण्णाला भेटून ....

... वसंत पटवर्धन ... आपल्या प्रभात रोडवरील नवीन भाड्याच्या जागेत राहायला निघाले...

पार पार पार त्या लकडी पुलाच्याही पुढे... केवढे ते भाडे... नउशे रुपये महिना... ..

आता ... आता फक्त राजा राणी...

... रोज दोन वेळा घरी येऊ अस आश्वासन देऊन ते निघाले.. सामान लावायच्या वेळेस सग्ळे तिथे गेलेले होतेच... आत्ता कुणी त्यामुळेच त्यांच्याबरोबर गेले नाही... कारण आत्ता आईबाबांच्या बरोबर असणे हे कर्तव्य होते... मात्र सगळ्यांना गौरी सांगून गेली होती... सगळा राग वगैरे विसरून.. मोठे मन करून.. आम्हाला आशीर्वाद द्यायला... सारखे घरी येत जा... आणि मला हक्काने येथे बोलवूनही घेत जा...

एका संसाराला कदाचित खर्‍याखुर्‍या अर्थाने सुरुवात होत होती...???

आणि....

.. दोनच दिवसांनी घराचे दार वाजले...

अँ???????

हा इथे कसा काय?? वसंताला भयंकर राग आला खरे तर!

गगन दारात उभा होता... गगन...!!

वसंताला समजले... नक्कीच याच्या बापाने मागच्या केसची काही ना काही नुकसान भरपाई घ्यायला म्हणून याला पाठवलेले असणार... नंतर मग स्वतःही येणार असेल...

"क्या रे???"

"कितना ढुंढा आपको??? घरपे गया तब पता चला... इधर रहनेको आगये आप..."

"क्युं??"

"आपको बतानेका था...."

गगनने बिनदिक्कत पायरीवर बसून अमिताभच्या आवेशात कर्वे रोडकडे बघत बेदरकारपणे सांगीतले..

"क्या बतानेका था???"

"के मैने आपको माफ करदिया है.."

वसंताला त्याच्या पाठीत एक लाथ घालावीशी वाटत होती.

"अच्छा... तुने माफ करदिया... और उस दिन चिपकली गिर रही है ये देखाभी नही.."

"चिपकली गिरेगी ये क्या सपनेमे आयेगा?... शुकर करो साप नही गिरा..."

"मार खाना है क्या??"

"उल्टा चोर कोतवाल को डाटे????"

"कान के नीचे बजाउंगा.. किसलिये आया है??.. पगार तो दे दिया था..."

"पगार तो बापको देते थे आप मेरे..."

"तो????"

"तो क्या तो?? .. मेरा क्या???"

"तेरा क्या मतलब??"

"मै नही ना रह सकता आपके बिना... "

"मतलब... ????"

"मै अभी इधरही रहनेके लिये आया हू... हटो..."

वसंताला हातांनी बाजूला करून त्या दिव्य बाळाने घरात प्रवेश केला.

"तू कैसे क्या रहेगा इधर?? चल्ल.. घर जा..."

"सुबहका भूला शामको वापस आये तो उसे भूला नही कहते..."

"मै तुझे भूलाबिला कुछ नही कह रहा हूं... जा इधरसे..."

"ये देखो चाची... अब मै इनको भूला कह रहा हूं.. तो बोलते है मै तुझे भूला नही कह रहा हूं... "

"????"

"क्या जमाना आया है.. हमारे टाईमपे ऐसा नही था... रेडिओ नही है घरमे?? देखते क्या हो?? मुफ्त नही रहनेवाला हूं मै... हम गरीब लोग जरूर है... लेकिन मेहनतकी खाते है... घरमे सब काममे चाचीका हाथ बाटुंगा.. तभी रोटी मांगुंगा.. चाची... एक चाय पिलाईये... फिर देखिये मेरी करामत..."

वसंताने गौरीकडे 'ही काय बला आली आता' अश्या दृष्टीने पाहिले.

तर गौरी आणखीन अजब! वसंता गौरीकडे हबकून बघतच बसला. काय तर म्हणे????

"राहूदे याला... तसा येडचाप आहे... पण बोलायला भारी आहे... मलाही सोबत होईल..."

गुलमोहर: 

Happy Happy :स्मित:मि दुसरा.............खुप छान..........

मस्त...

आजचा भाग नाही आवडला. खूपच मोठे डायलॉग झालेत.
मान्य आहे की पात्रांना लेखकच बोलवतो पण इथे पात्रांच्या तोंडून फक्त लेखकच बोलतोय असे वाटतेय.

>>>>आजचा भाग नाही आवडला. खूपच मोठे डायलॉग झालेत.
मान्य आहे की पात्रांना लेखकच बोलवतो पण इथे पात्रांच्या तोंडून फक्त लेखकच बोलतोय असे वाटतेय.
>>>>>>

अनुमोदन...
कुमार दादाचे दैलोग म्हणे एखाद्या नेत्याने, जेवता जेवता, एकदम उभं राहून भाषण द्यावं , अश्या थाटाचे झालेत,
आणि गगन वगेरे ला उगाच घरात घुसवला आहे, काहीच गरज नव्हती...

असो पण पुढचा भाग लवकर टाका...
पु ले शु

भाग आवड्ला.....डायलोग जरा विस्तारलेतच पण होत असं कधिकधि,... लेखक लिहीताना स्वःताला लेखात इतका हरवुन घेतो की 'लेखंच लेखक होउन जातो'.

पण हरकत नाही...वाचायला आवड्लं.

साती आणि प्रसन्नला अनुमोदन! मलाही नाही आवडला आजचा भाग. वसंतचे विचार पटले नाहीत. दादाचे बोलणे ऐकून वसंत निर्णय बदलेल असं वाटत होतं... ते तर झालं नाहीच, पण आपल्या निर्णयाचं जे समर्थन त्याने केलं, तेही आवडलं नाही. गगनलाही खरंच उगीचच घरात घुसवला आहे. त्याचा आगाऊपणा जरा अतीच वाटतो.

सुरश ला अनुमोदन!
एकत्र कुटुंबात असे प्रकार घडत असतात. घरातील जेष्ठ भाषण ठोकल्याप्रमाणेच बोलतात. ते त्यांच कामच असते.
भाग आवडला.

मश्तच.....
वसंताने अस्सा र्निणय नको घ्यायला होता. कुमार दादाचे पटले(थोडे जास्तच लांबलचक होते), पण वसंताने दिलेले विश्लेशन तर अगदिच नाहि पतल, नो वे..., काहि पॉईटच नव्हता. वसंता चुकला.....

आणि दुखात सुख म्हणजे गगन. अस वाटल होत, चला.. एक अजब कॅरॅकटत आहे म्हणजे धमाल, पण हॉटेल बंद म्हनजे ति पण मजा नाहि :(.... पण ..... गगन बॅक.. म्हनजे अजुन मजा आहे तर. त्याचि वाक्य वाचलिना, मस्त स्माईल येते चेहर्‍यावर.....

लगे रहो भुषणराव..

भाग आवडला.
अशा परिस्थितीत वसंताने घर सोडणे चुक की बरोबर सांगणे अवघड आहे.
पण जवळुन भांडण्यापेक्षा लांब राहुन चांगले रहाणे श्रेयस्कर.
अर्थात एकत्र राहुन करण्यात पण चॅलेंज आहेच.