घर - १०

Submitted by बेफ़िकीर on 2 February, 2011 - 07:52

आपल्या खोलीत गौरी रडून रडून अर्धमेली झालेली होती. कारण उघड होते. ती लग्न करून इथे आल्यानंतर पहिल्यांदा वसंताचा चितळेंकडचा जॉब गेला. नंतर हॉटेल चांगले सुरू झालेले असले तरीही 'तो जॉब गेला' हे सत्य होतेच! जेमतेम कुठे 'यात गौरीच्या पत्रिकेचा दोष नाही' हे सत्य सगळ्यांना मनातल्या मनात मान्य होतंय तोवर हा दुसरा धक्का!

आईंना कर्करोग झाला.

हे बाबांनी सगळ्यांना सांगीतले त्याला आता दिड महिना झालेला होता. आणि आईंची प्रकृती वरून ठणठणीत दिसत असली तरी पाऊल खूपच दुखत होते आणि वेदना वाढलेल्या होत्या.

कॅन्सर म्हणजे मृत्यू हे समीकरण रूढ असण्याचा काळ तो!

आईंनी कसे काय धैर्य टिकवले होते स्वतःचे हेच आश्चर्य होते.

डॉक्टरांनी औषधे दिलेली होती. मलमे दिलेली होती. त्याचवेळेस आयुर्वेदीक उपायही सुरू झालेले होते. आईंना आता चालताना खूपच त्रास होत होता, त्यामुळे त्या बराच वेळ बसूनच असायच्या.

सगळ्यांचे आईंशी वागणे आता बदललेले होते. मुलेही सांभाळून बोलत होती. आई दुखावणार नाहीत, त्यांना कमीतकमी त्रास होईल हाच सगळ्यांचा दृष्टिकोन होता. राजू आणि गीताही तातडीने पुण्याला येऊन गेलेले होते.

आणि आजच डॉक्टरांनी एक्स रे पाहून सांगीतले होते.

"आणखीन एक ऑपरेशन करावे लागेल... त्याचा खर्च एक लाख रुपये आहे...कारण तयत दिली जाणारी औषधे अमेरिकेतून आयात करावी लागतात"

आणि आई आणि बाबा त्यांच्या खोलीत निघून गेल्यानंतर आणि मुले झोपल्यानंतर सगळे जण स्वयंपाक घरात जमून त्यावर चर्चा करत होते.

तारका - मी तर म्हणते पैशांचा प्रश्नच नाही... जे शक्य आहे ते सगळे करायलाच हवे..

अण्णा - अर्थातच...

दादा - शरद... आपण चौघे पंचवीस पंचवीस हजार घालूयात... शक्य आहे का वसंता तुला??

वसंता - हो? देतो की...

अण्णा - हा काय प्रश्नय का दादा..

अंजली - मला काय वाटतं.. त्या बिडवे महाराजांना एकदा विचारायचं का?

दादा - ते विचारूच गं... पण जे उपचार आहेत ते तर करायलाच पाहिजेत ना..

अंजली - ते करू नका कुठे म्हणतीय... पण हे सगळं असं का व्हावं??

दादा - असं का व्हावं म्हणजे??.. माणसाला काहीतरी व्याधी होतेच..

अण्णा - दादा.. मीउद्या काढून आणतो पैसे.. आपण तिला परवा अ‍ॅडमीट करू...

तेवढ्यात बाबा तिथे आले.

तारका - झोपल्या का?

बाबा - नाही... बसलीय.. विचार करतीय..

तारका - बाबा... परवा अ‍ॅडमिट करायचं चाललंय..

बाबा - हं.. तेच बोलायला आलो मी..

दादा - .... काय??

बाबा - ती म्हणतीय काही ऑपरेशन वगैरे करू नका..

अण्णा - म्हणजे काय??

बाबा - ती म्हणतीय तिचं आता सगळं झालंय.. काय करायचेत उपचार? होईल ते पाहावे म्हणतीय ती..

दादा - असं कसं?? चार चार मुलं आहेत.. आम्ही कसे तयार होऊ??

बाबा - कुमार... प्रश्न तो नाही आहे... आज जरूर पडली तर मीही पंचाहत्तर हजार देईन... म्हणजे?? देईनच.. मला द्यायलाच पाहिजेत... मी त्याच्याचसाठी ठेवलेले आहेत ते... पण.. माणसाला जर उपचार नकोसे झाले ना... तर त्याचे मन उपचारांना साथही देत नाही बघ... मग त्या उपचारांचा काही उपयोगही होत नाही..

दादा - आपण तिला तयार करू उपचारांसाठी.. आमच्यावर भार नको म्हणून ती हे सगळं म्हणत असणार...

बाबा - बघ बुवा.. मी तर म्हणतो उपचार करूच.. पण... तिच्या मनात ती इच्छा जागवायला हवी...

अंजली - मी बोलते त्यांच्याशी.. आत्ता जाऊन बोलू का??

बाबा - हं....

सगळेच उठून आईंच्या खोलीत आले. आई विषण्ण चेहर्‍याने आपल्या खोलीत बसलेल्या होत्या. स्वतःच स्वतःच्या पायाला मलम चोळत होत्या. सगळे आत आले तसा त्यांचा चेहरा खुलला.

अंजली - आई.. मला तुमच्याशी बोलायचंय..

आई - काय गं??

अंजली - आपण ऑपरेशन करून घेऊ...

आई - अगं ऐक... डॉक्टर काय म्हणाले माहीत आहे का? की या प्रकारच्या कॅन्सरच्या गाठी मधून मधून येत राहतात.. आज ऑपरेशन केलं तरी परत काही दिवसांनी पुन्हा करावे लागेल.. माझं काय म्हणणं आहे... आत्ता तरी मला बरं वाटतंय... उगाच आत्ता लाखभर रुपये घालवायचे... आणि महिन्याने परत डॉक्टर म्हणायचे.. आता ऑपरेशन करावे लागेल.. त्यापेक्षा थोडे थांबू... मग एकदमच बघू...

सगळ्यांचेच चेहरे पडले. आईंनी कर्करोग आणि मृत्यू दोन्ही मनातच स्वीकारले असावे असे वाटू लागले होते सगळ्यांना!

गौरी - पण याला काही कायमस्वरुपी उपचार नाहीच आहेत का?

गौरीने विचारलेला हा प्रश्न सगळ्यांनाच विचारायचा होता.

बाबा - बघू आता... नवीन नवीन शोध लागतायत... आयुर्वेदातही उपचार आहेतच.. त्यांचा म्हणे उपयोग जरा उशीरा होतो इतकेच.. पण चांगले उपचार आहेत ते... मला तर वाटतं कीही बरी होणारच.. आपण जितके घाबरतो तितका रोग अधिक परिणाम करतो..

अंजली - तेच म्हणायचंय मला.. आज ऑपरेशन केलं की परत लेगच करावंच लागेल असं तरी कुठे आहे? डॉक्टरांना तरी काय सगळंच माहीत असतं असं थोडीच आहे? उलट मी तर म्हणते शक्य तितक्या लवकर शक्य ते उपचार करायला हवेत... आणि चार चार मुले आहेत... काय घाबरायचंय उपचारांना..

आई - तसं नाही गं.. मी काही असं म्हणत नाही आहे की मला कुणाला त्रास द्यायचा नाही आहे.. मला इतकंच म्हणायचंय की.. जरासे थांबू...

अंजली - आई.. अशा आजारात थांबणे योग्य नाही... तुम्ही कसलीही काळजी करू नका.. सगळे समर्थ आणि खमके आहेत... अहो.. अण्णाभावजी म्हणतात तसे अ‍ॅडमीट करू आपण आईंना परवाच!

शेवटी अंजलीच्या मतानेच ठरले. दुसर्‍याच दिवशी अण्णाने पंचवीस हजार काढून दादाकडे आणून दिले. वसंताने पंधरा आणले आणि दहा उद्या देतो म्हणाला! कुमारदादाकडे इमर्जन्सीसाठी ठेवलेले पैसे होतेच!

आईंना अ‍ॅडमीट केले. दुसर्‍या दिवशी ऑपरेशन होते. तोवर वसंताचेही सगळे पैसे आलेच. तिकडून राजूने मनी ऑर्डर केलेली होती. ती आलीच असती चार दिवसात!

ऑपरेशनचा खर्च ९६,००० रुपये झाला. त्यामुळे प्रत्येकाला एक एक हजार परत मिळाले. बाबांकडून कुणी पैसे घेतले नाहीत. त्यांचे पैसे 'अगदीच वेळ पडली तर वापरायचे' असे ठरलेले होते.

चार दिवसांनी आई घरी परत आल्या.

सगळे व्यवस्थित चाललेले होते.

पण जेव्हा दैव परीक्षा घेते तेव्हा अभ्यास असूनही उत्तरे देता येत नाहीत........

आणि.... दैवाने वसंताची आणि गौरीची पुन्हा परीक्षा घेतली...

=====================================

एका गिर्‍हाईकाने मिसळ खाताना आणखीन कांदा मागीतला.

गगन - इतनाच देते है..

गिर्‍हाईक - अबे ला????

गगन - चार आना एक्स्ट्रॉ होगा..

गिर्‍हाईक - तेरा हॉटेल है क्या?? जा... कांदा लेके आ...

वसंता हल्ली गगन आणि गिर्‍हाईक या सुसंवादात फारसा पडत नव्हता.

गगन - ओ साब... ये कांदा मांगते है... मिस्सल के साथ कांदा खाते है या कांदे के साथ मिस्सल??

वसंता - देदे...

गगन - मालिक बोलते इसलिये दे रहा...

गिर्‍हाईक नेहमीचे असल्यामुळे त्याला गगन हे प्रकरण व्यवस्थित माहीत होते. त्याने गगनची खरडपट्टी तर बाजूलाच, कपाळाला आठीही पाडली नाही.

गगनने कांदा आणून आपटला. तो एक पूर्ण कांदा होता. न चिरलेला!

गिर्‍हाईक - ये क्या है??

गगन - टमाटर है... कांदा मांगते है और कांदा दिया तो बोलते है ये क्या है? क्या आदमी है..

गिर्‍हाईक - अबे काटके ला..

गगन - वो मेरा काम नही है... वो साब को बोलो...

वसंताने निमूटपणे तेथे येऊन तो कांदा उचलला आणि चिरून गिर्‍हाईकाला दिला.

तोवर बसचा ड्रायव्हर आला. त्याने नेहमीच्या थाटात हाक मारली..

ड्रायव्हर - गग्गSSSSSSन... एक कटिंग दूध एक्स्ट्रॉ..

गगन - ये आगया प्रेमनाथ..

ड्रायव्हर हसू लागला. तोवर गगनने चहा आणून आदळला.

ड्रायव्हर - उपकार करतो का बे चहा आणतो म्हणजे??

गगन - पीना है तो पियो.. ड्रायव्हरको दिनमे दो चाय फ्री है.. उसमेभी नाटक मत करो...

ड्रायव्हर - एक मिस्सळभी फ्री है...

गगन - वो सुबह खाचुके हो आप..

ड्रायव्हर - और एक चाहिये...

गगन - साडे तीन रुपया दो...

ड्रायव्हर - अबे देदुंगा.. तू ला पहले...

गगन - ऐसे आदमीही एक दिन हॉटेल डुबानेवाले है...

हे चाललेले असतानाच गौरी अचानक तिथे आली.

गौरी - वसंता????

तिच्या चेहर्‍याकडे पाहून वसंता गंभीर झाला आणि पटकन बाहेर आला..

वसंता - काय गं???

गौरी - अरे आईंच्या छातीत खूप दुखायला लागलंय... पुन्हा अ‍ॅडमीट करायचंय.. चल तू..

वसंता - गगन.. दादीको फिर हॉस्पीटलमे ले जारहे है... तू देख जरा...

गगन - हा हा... जाओ..

या बाबतीत मात्र गगन एकदम परिपक्वपणे वागायचा..

वसंता आणि गौरी घरी पोचले तेव्हा धावपळ चाललेलीच होती. एक रिक्षा आणलेली होती. के ई एम ला न्यायचे होते आईंना! घरात फक्त तारका वहिनी आणि अंजली वहिनीच होत्या बाबांबरोबर! वसंता पोचल्यावर त्याने आणि गौरीने आईला रिक्षेत बसवले. त्या रिक्षेतून बाबा आणि अंजली वहिनी आईंना घेऊन निघाले. तारकावहिनी आणि वसंता व गौरी हे दुसर्‍या रिक्षेतून के ई एम ला निघाले. बाजूच्या दुकानातून त्या पुर्वीच अण्णाला आणि दादाला फोन केलेले होते. ते दोघे परस्पर हॉस्पीटलमधे धावलेले होते.

आणि इकडे....

गगन निवांत पाय ताणून एका खुर्चीवर बसलेला होता... तेवढ्यात कंडक्टरही आला..

त्यानेही मिसळच मागवली.. त्याला मिसळ देईपर्यंत एक आजोबा, जे नेहमी यायचे, तेही आले. त्यांनीही मिसळ मागवली.

गगन आपला मिसळ समोर आपटून पुन्हा खुर्चीवर जाऊन बसत होता.

आधीचे गिर्‍हाईक मिसळ ओरपत होते. तोवर ड्रायव्हरने मिसळीवर लिंबू पिळलेले होते. कंडक्टर आणि आजोबांनी मिसळ पुढे ओढून घेतलेली होती.

कंडक्टर - क्या बे घनचक्कर... मालिक किधर गया तेरा??

गगन - जो सामने रख्खा है वो खानेका चुपचाप.. ये पीएमटी का बसस्टॉप नही है..

कंडक्टर - तेरे बापको पता है क्या तू किस तरहा बात करता है ये??

गगन - तभी तो इधर भेजा है मुझे.. बोला कंडक्टरको सीधा करनेके लिये हॉटेल पे काम कर..

कंडक्टर - तर्री ले के आ...

गगन - शादी नही हुई और बच्चे का नाम विनोद खन्ना..

कंडक्टर - क्या??

गगन - खाना तो शुरू करो... तर्री चाहिये..

ड्रायव्हरने मिसळ खायला सुरुवात केली. आजोबांनी पहिला भुरका मारला आणि कंडक्टरने गगनकडे खाऊ का गिळू अशा नजरेने बघत लिंबू पिळले.

कंडक्टर - तेरी उमर क्या है बे??

गगन - तेरा... क्युं??

कंडक्टर - मै तेरे बापके उमरका हूं....

गगन - तो मै क्या नाचूं??

गगनने उभे राहात दोन्ही हात कंबरेवर ठेवून कंबर हालवत दिलेले हे उत्तर पाहून आजोबा आणि ड्रायव्हर खो खो हासू लागले.

ड्रायव्हर - तू ऐसा बात करना किससे सीखा रे??

गगन - फ्री मे सिर्फ एक मिस्सल और दो चाय है...

ड्रायव्हर - मतलब??

गगन - जानकारी लेना फ्री नही है...

ड्रायव्हर - इसमे क्या जानकारी???

गगन - सामने देखके खाना खाओ.. मुझे सोचने दो...

ड्रायव्हर - क्या सोचरहा है??

गगन - कि ये दुनियामे मेरा रोल क्या है...

ड्रायव्हर - फडका मारनेका...

गगन - मेहनत का खा रहा हूं... खूनपसीनेकी कमाई है... हरामकी तरहा मिस्सल फ्री नही लेता मै..

ड्रायव्हर - स्साले... मुझे गाली देता है??

गगन - गरीबका खूनभी खून होता है साहब.... आजसे पच्चीस बरसके बाद मै आपको कामपे रख्खुंगा..

ड्रायव्हर - लिंबू ला एक..

गगन - यहा पेड नही है नीमका.. कलसे घरसे दो नीम जेबमे लेके आया करो...

ड्रायव्हरला लिंबू देताना गगनने मौलिक सल्ला दिला.

इतके बोलणे होईपर्यंत सर्वात आधी आलेले गिर्‍हाईक एकदम ताडकन उभेच राहिले. त्याच्याकडे पाहतानाच गगनला धक्का बसला. कारण त्या गिर्‍हाईकाचे डोळे प्रचंड विस्फारलेले होते. तो माणूस एकदम हॉटेलच्या बाहेर धावला. कुणालाच काही कळेना! गगन धावत बाहेर गेला. ते गिर्‍हाईक लांब जाऊन उल्टी करत होते. पाच एक मिनिटांनी ते जरा शांत झाले आणि लडखडत निघून जायला लागले. गगन धावला.

गगन - ओ स्साब... पैसा दो...

त्या गिर्‍हाईकाने फक्त 'नंतर' अशा अर्थी हात केला आणि त्याला काहीतरी झालेले असावे हे समजून गगन पुन्हा हॉटेलमध्ये आला.

गगन - देखा? उधारीका नया तरीका है ये... बाहर जाके उल्टी करनेका.. और तबीयत खराब होगयी बोलके उधार करके घर जानेका.. हमारा देश इसी वजहसे..

ड्रायव्हर - अबे चूप?? .. स्साला दो फूट लंबाई नही और बाते करता है??

ड्रायव्हरला गगन काहीतरी खरमरीत उत्तर देणार तोच ते आजोबा अचानक ताठ झाले. आणि काही कळायच्या आत त्यांनी स्वतःच्या टेबलवरच उल्टी केली. तसेच पडून राहिले.

ते दृष्य मात्र भयानक होते. ड्रायव्हर आणि कंडक्टरसकट गगनच्या डोक्यात तोच किडा वळवळला. या दोघांना झालेल्या उल्टीचा संबंध मिसळीशी तर नाही??

आजोबांना हालवले तर हलेचनात! अक्षरशः फाटली त्या कंडक्टरची! पहिल्यांदा त्याने स्वतःची आणि नंतर ड्रायव्हरची प्लेट ढवळून पाहिली. काही विशेष दिसले नाही. मग तो आत धावला. पातेले ढवळले.

आणि डोळे विस्फारून ओरडतच बाहेर आला...

"बोधे... अरे तर्रीत पाल पडलीय... "

पण हे ऐकायला बोधे ड्रायव्हर कुठे धड होता?? तो पोट दाबत हॉटेलच्या बाहेर धावलेला होता. त्याने कशी काय कुणास ठाऊक पण एक रिक्षा थांबवली अन त्यात स्वतः बसून हॉस्पीटलकडे जायला निघाला. ते पाहून कंडक्टरने आरडाओरडा करून त्या रिक्षेत स्वतःचा शिरकावही करून घेतला.

गगनच्या मनातल्या उलथापालथी कुणालाही समजत नव्हत्या. मिसळ खाल्ल्याने सगळ्यांना काहीतरी झाले असावे इतपत अंदाज त्याला आलेला होता. पण 'पाल' हा मराठी शब्दच त्याला माहीत नव्हता. त्याने आधी ओरडाआरडा करून माणसे जमवली आणि त्या आजोबांना तिथून न्यायला सांगीतले. आमच्याकडच्या खाण्यामुळे काहीतरी झाले असावे हेही त्याने स्पष्टपणे सांगून टाकले. परिणाम विचित्रच झाला. एका भडक माथ्याच्या माणसाने त्याच्याच कानफडात वाजवली. घाबरलेला गगन रडला मुळीच नाही, पण नुसताच भेदरून बघत राहिला.

कुणीतरी आत गेले आणि मिनिटभरातच ओरडत परत आले.

"पाल आहे अरे पाल... मिसळीत पाल मरून पडलीय..."

जमाव भडकलाही आणि घाबरलाही! गगनकडे खूप चौकशी केली लोकांनी!

पाच सहा मिनिटांतच प्रकार लक्षात आला. हे चुकूनच झालेले असणार! यात काही हेतू असूच शकत नाही.

पण गगन भेदरलेलाच होता. नक्की झालंय काय तेच त्याला समजेना! शेवटी तो स्वतःच आत गेला आणि स्टूलावर उभे राहून त्याने सगळी भांडी तपासली. मिसळीच्या कटाचे पातेले डावाने ढवळल्यावर त्याला पाल मरून पडलेली दिसली. सर्रकन शहारा आला त्याच्या अंगावर!

कुणाकडेही काहीही न बघता तो सरळ वसंताच्या घराकडे धावत सुटला. धड रस्ता आठवत नाही की काय सांगायचे हेही समजत नाही अशा अवस्थेत तो काही वेळ धावला. चुकून चिमण्या गणपतीपासून सरळच गेला तो लक्ष्मी रोडलाच लागला. मग काहीतरी चुकले असे समजून उलटा वळायला लागला तर एका रिक्षेतून आवाज आला. त्याने वळून पाहिले तर वसंता, गौरी आणि तारका चाललेले होते.

वसंता - क्या रे??

वसंता गगनला धावून दमलेला पाहून आणि हॉटेल सोडून आलेला पाहून अवाकही झाला होता आणि रागावलाही होता. गौरीने रिक्षा तशीच पुढे नेली. वसंताला आपली चूक कळली.

तो नवीन रिक्षा शोधू लागला. तेवढ्यात गगन मागून धावत आला आणि म्हणाला...

"चिपकली गिरगयी मिस्सलमे... चार लोग मरगये है..."

घामच फुटला वसंताला! आता काय करावे ते त्याला समजेना! त्याने गगनला आधी रिक्षेत घातले आणि रिक्षा हॉस्पीटलकडे वळवली. तिथे पोचल्यावर तरी जराशी बरी बातमी कळली.

आईंचे तसे बरे होते, खूप घाम आल्यामुळे आणि छातीत दुखल्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक आलेला असणार असे सगळ्यांना वाटले होते. ते अगदीच खोटे नव्हते. हार्टवर प्रेशर चांगलेच आले होते. पण फार सिरियस नव्हते. तोवर दादा आणि अण्णाही पोचले. अण्णाने राजूच्या ऑफीसमध्ये कानपूरला फोन लावून बातमी कळवली. इकडे वसंता गगनला का बरोबर घेऊन आला असे तारकावहिनींनी विचारले.

"मिसळीत पाल पडली म्हणतोय हा...खाणारे चार जण मेले दादा..."

कुमारदादा हतबुद्ध होऊन पाहातच बसला वसंताकडे! गौरीने तोंडावर हात ठेवून भीती व्यक्त करेपर्यंत गगन म्हणाला..

"चार लोगोंने खायी.. सब मर नही गये होंगे.. लेकिन एक दादाजी है वो मर गये.."

अण्णा - वसंता... पहिला हॉटेलवर चल.. घोळ झाला असेल तिथे मोठा..

वसंता, अण्णा, गौरी अन गगन एकाच रिक्षेत बसून एटीजीकडे धावले. तिथे हा मोठा जमाव होता.

पोलिसांना कुणी बोलावलं ते काही समजेना!

एक सबइन्स्पेक्टर आणि दोन हवालदार चक्क!

तो मोरे नावाचा सबइन्स्पेक्टर वसंताला पाहून पुढे झाला..

मोरे - तूच का पटवर्धन? हॉटेल तुझंय??

वसंता - .. हो..

वसंताला कधीही वाटले नव्हते की त्याच्या आयुष्यात असा प्रसंग येईल! मोरेने चक्क खाडकन कानाखाली मारली होती त्याच्या! अण्णा आणि गौरी ताबडतोब मध्ये पडले.

मोरे - भाडखाव... दो लोग मर गये... दो हॉस्पीटलमे मरजायेंगे... तू तो गया अब... तेरेको तो फासीच लगेगी अब...

मोरेने परत हात उगारलेला पाहून अण्णा पुन्हा मधे पडला. सगळेच मोरेला सांगू लागले की हे चुकून झाले होते. असे कुणी मुद्दाम करेल का वगैरे!

जमाव मात्र भडकत चाललेला होता. वसंता, गगन, गौरी आणि अण्णाला घेऊन पोलिस चौकीवर गेले. तेथे एका बाकड्यावर बसवून ठेवेपर्यंत गगनचे वडीलही तेथे पोचले आणि म्हणाले..

"ये लडका मेरा है साब.. ये छोटा है... इसका कुछ कसूर नही.. इसको छोड दो साब..."

त्याला तर लागोपाठ चार फटके खावे लागले. माणूस जितका गरीब तितके फटके असे सूत्र होते.

त्याला शिवीगाळ करून पोलिसांनी दुसरीकडे बसवून ठेवले. गगन अजूनही रडत नव्हता. पण वडिलांना मारल्यामुळे जास्ती घाबरला होता. त्याने एकदाच विचारले..

"बहुत लगा पप्पा??"

त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे बघत नकारार्थी मान हालवली.

जमावातील काही जण तिथेही आले होते. तेवढ्यात कुमारदादाही आला. त्याने बरीच हुज्जत घालायचा प्रयत्न केला. शेवटी तर त्याने 'यातून सोडवा' असाही एक टेबलाखालचा मार्ग सुचवून पाहिला. त्याच्यावरही दरडावल्यावर मात्र पोलिसांनी तिथे एका आजींना बोलावले.

त्या आजी खूप रडत रडत म्हणू लागल्या...

"अरुणावहिनी आणि मी जुन्या मैत्रिणी हो?.. ह्यांना मी नेहमी सांगायचे.. पोटात जळजळते ना.. उगाच बाहेरचे खात जाऊ नका.. पण ऐकायचे नाहीत... म्हणायचे.. तुझ्याच मैत्रिणीच्या मुलानी हाटेल काढलंय.. त्याचा धंदा झाला की तुझ्याच मैत्रिणीला बरं वाटेल.. "

आजींना बोलतानाच हुंदके फुटत होते. पटवर्धन कुटुंबियांना आजच समजत होते की ही बाई आपल्या आईची मैत्रीण आहे. पण आपल्या आईपेक्षा तर बरीच मोठी आहे की ही? मग कशी काय मैत्री झाली?

आजी पुढे म्हणाल्या...

"कसल्या सह्या घेताय हो?? काय उपयोग आता या सगळ्याचा?? यांचे प्रेत अजून तपासणीत आहे.. त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार आहे?? शेजारपाजारचा कुणीतरी करेल.. आम्ही दोघंच होतो... आता मी... "

'आता मी एकटीच आहे' यातील 'एकटी' हा शब्द आजींना बोलताही आला नाही.

मात्र ते पाहून वसंता अचानक ओक्साबोक्शी रडायला लागला.

मोरे - ए ****... आता रडतोयस होय?? आ?? ... ****...

दादाने सगळ्यांसमोर अचानक मोरेला सांगीतले की शिव्या देऊ नका. त्यावर मोरेने दादाला सज्जड दम भरला. आजींच्या तक्रारपत्रावर सह्या झाल्यावर त्या वसंताकडे आल्या.

"वसंता... तू धाकटा ना रे??... तुझ्यावर नाही हो माझा राग.. चांगल्या घरातलायस तू... पण... पण... आम्हीच चांगले नव्हतो रे..."

वसंताने आधी त्या आजींचे खांदे धरले. गौरी आणि अण्णानेही त्यांना आधार दिला. पण नंतर मात्र वसंताने त्यांच्या पायावर डोके टेकून माफी मागीतली.

"ह्या पोराचं वय कितीय??? क्या रे?? उमर कितनी तेरी???"

कुणी काही बोलायच्या आतच चुकून गगन बोलून गेला..

"तेरा साल"

"तेरा??... काय रे?? ह्याला कस्काय कामावर ठेवलंस?? आ?? कांबळे.. आणखीन एक कलम ठोक भडव्यावर... बालमजूर ठेवला.... आणि काय रे नेपाळ्या... तुला अक्कल नाही का बारक्या पोराचा जीव धोक्यात घालायचा नाही ही???"

गगनच्या वडिलांना अंदाजाने समजले की प्रकार काय असावा?

"साब.. ये चौदा सालका है.. तेरा सालका नही है.. पिछलेही साल तेरा साल होगये इसको"

परत मार खाल्ला बिचार्‍याने! कारण त्याच्याकडे पुरावा काहीच नव्हता गगनचे वय सिद्ध करणारा!

तोवरच दुसरी कंप्लेन्ट आली. ती भवानी पेठेतील चौकीतून इकडे ट्रान्स्फर झालेली होती. त्यात एका माणसाला विषबाधा झाल्याने तो मेलेला होता. आता हा कोण माणूस ते वसंताला समजेना!

नेमका त्या लोकांनी त्या माणसाचाअ फोटो आणलेला होता. तो गगनला दाखवण्यात आला. गगनने सांगून टाकले की हाच पहिल्यांदा आजारी पडला.

तोपर्यंत ससूनमधून आलेल्या पोलिसाने सांगीतले की ड्रायव्हर जिवंत आहे आणि उपचारांनी आठ दिवसांनी बरा होईल आणि कंडक्टरला काहीही झालेले नाही. ड्रायव्हरचा भाऊ तिथे आला आणि त्याने वसंताला धरले. पोलिसांनी त्या भावाला बाजूला केले. मोरे पुन्हा ओरडू लागला.

"किती जणांचा जीव घेतलायस?? आ?? किती संसार जमीनीवर आणलेस?? खड्यात घातलेस??"

गगन लहान असल्यामुळे त्याच्यावर विषबाधेसंदर्भात केस करणे शक्यच नव्हते. पण त्याला कामाला ठेवले म्हणून त्याच्या वडिलांवर आणि वसंतावर सेपरेट केस दाखल झाली. त्यातच कंडक्टर तपासकामाच्या संदर्भात तिथे आला. त्याने स्पष्टपणे सांगीतले..

"आम्ही तर रोजचाच नाश्ता करतो तिथे.. असं कधीच झालेलं नाही... हे लोक चांगले आहेत... "

पण त्याला मोरेने दरडावले. पालिकेचा आरोग्यखात्याचा माणूस आला. त्याच्याबरोबर प्रयोगशाळेतील दोन माणसे होती. त्यांनी काहीतरी कागद सबमिट केले.

या सगळ्यात आपण काय करायचे तेच पटवर्धन कुटुंबियांना समजत नव्हते. आता दादा पुन्हा हॉस्पीटलमध्ये गेला. बाबा तर प्रचंड घाबरलेले होते. दादाने त्यांना आधार दिला आणि तो तिथेच काही वेळ थांबला.

इकडे चौकीवर दोन वार्ताहर आले. त्यांना मोरेच्या एका हवालदाराने इत्यंभूत बातमी दिली.

'भिकारदास मारुती चौकातील उपहारगृह एटीजी येथील खाद्यपदार्थांमुळे विषबाधा होऊन दोन मृत्यूमुखी पडले तर एक मरणाशी झगडत आहे. पदार्थांमध्ये पाल पडलेली असल्याचे आढळले. अशी बाब होऊ नये यासाठी पुरेशी दक्षता घेतलेली दिसली नाही. छपर व भिंती यावर पुरेसा उजेड नाही. अनेक ठिकाणी कोळ्यांची जळमटे आहेत. येथे विषारी किडे येऊ नयेत यासाठी महापालिकेच्या नियमांना अनुसरून असलेली उपाययोजना केल्याचे दाखले आरोपीकडे नाहीत.... इत्यादी इत्यादी...'

त्याला वसंता परोपरीने सांगत होता की अशी अस्वच्छता तेथे अजिबात नाही आहे आणि हॉटेल सुरू होऊन काही महिनेच झालेले असल्यामुळे महापालिकेचे औषध मारायला अजून आठ महिने आहेत नियमाप्रमाणे वगैरे! पण काही फायदा झाला नाही.

आता जमावही कंटाळून निघून चाललेला होता. काही साक्षीदार मात्र थांबवून ठेवण्यात आलेले होते. ते तोंडाला येईल ते सांगत होते. प्रत्यक्ष घटनेचे पूर्णतः साक्षीदार फक्त दोघेच होते. कंडक्टर आणि गगन! आणि अर्धवट साक्षीदार होता ड्रायव्हर!

तिकडे गौरीने जाऊन हॉटेलवरील गल्ला शाबूत आहे की नाही ते पाहिले. तो असणारच होता कारण आता तिथे दोन हवालदार होते. मात्र त्यांनी तिला पैसे घेऊ मात्र दिले नाहीत.

तो दिवस आणि पुढचा दिवस आत्यंतिक ताणाचे दिवस होते. आणि त्यातील रात्र तितकीच ताणाची!

वसंता आणि गगनला आणि त्याच्या वडिलांना तर सोडलेच नाही चौकीवरून! पण इतर कुणाला थांबूही दिले नाही. रात्रभर पोलिस वसंताला दरडावत होते. दुसर्‍या दिवशी बाबा सकाळीच आले. त्यांच्यासमोर जायची वसंताला लाज वाटली. गौरी तर तडफडतच होती. बाबांनी कसलीतरी जपाची माळ दिली आणि आईला दोन दिवसांनी सोडतील असे वसंताला सांगीतले. नंतर ते पोलिसांशी काही बोलून निघून गेले.

नाचक्की!

नाचक्की हे एकच संकट फार मोठे असते. त्यात आणखीन दोन घरांचे शापही लागलेले होते.

तब्बल छत्तीस तासांनी पोलिसांनी प्रकरण मिटवण्याची तयारी दाखवली. भवानी पेठेत राहणारा आणि विषबाधेने मेलेला माणूस नशीबाने ब्रह्मचारी होता. त्याच्या भावाने घासाघीस करून शेवटी तीस हजार मान्य केले. पोलिसांनी मात्र साठ हजाराखाली एक पैसा मान्य केला नाही. आजींनी काहीही मागीतले नाही. आजोबांचे अंत्यसंस्कार अण्णाने केले.

मात्र पोलिसांनी गगनच्या वडिलांवरची आणि वसंतावरची बालमजूरासंदर्भातील केस काढून घेण्यासाठी आणखी दहा मागीतले.

गगनचे वडील खरे तर रडायलाच लागले होते. ते रडायला लागले तसा मात्र गगनचा धीर खचला. तो भर चौकीत पहिल्यांदाच रडला. आणि त्याला तेवढ्यातच शब्द ऐकू आले वसंताचे...

"हे दहा हजारही देतो मी... या गरीब माणसाला त्रास देऊ नका.. "

एक लाख!

हॉटेल कायमचे बंद करणे आणि एक लाख रुपये या मोबदल्यात केस फाईल करण्याची तयारी दाखवली गेली.

ज्या काळात एक लाखात एक फ्लॅट यायचा त्या काळात एक लाख द्यायचे होते.

आईच्या ऑपरेशनसाठी सर्वांनी मिळून आधीच पंचवीस पंचवीस हजार दिलेले होते. आता हे एक लाख कुठून उभे करायचे हा प्रश्न संपूर्ण कुटुंबाच्या मनावर व्यापून राहिलेला होता.

आज चार दिवसांनतर आजारी आई तिच्या खोलीत पडून राहिलेली होती. मुलांना आपापल्या खोलीत जायला सांगीतलेले होते. आजच कानपूरहून राजूदादा आणि गीतावहिनीसुद्धा आलेले होते.

आणि सगळे नेहमीप्रमाणेच स्वयंपाकघरात बसून या गंभीर विषयावर चर्चा करत होते.

जेव्हा सगळे चांगले असते, सगळे चांगलेच वागतात. जेव्हा काही वाईट होते, तेव्हा लोक कसे वागतात यावर त्यांचे खरे वागणे ठरायला हवे.

बाबा - वसंता... धीर तर सगळ्यांनीच धरायला हवा आहे.. पण.. हे एक लाख.. त्यात आणखीन ते दहा हजारही तू डोक्यावर घेतलेले आहेस...

वसंता - ते धरूनच एक लाख आहेत...

बाबा - तरी काय झाले?? आता हे एक लाख आपल्याला सगळ्यांना मिळून उभे करायचे आहेत...

वसंताने मान खाली घातली. त्याने गौरीला दिलेल्या वचनास आज तो जागू शकला नव्हता.

'मी जिवंत असेपर्यंत तुला आनंदात ठेवायचा प्रयत्न करेन' हे ते वचन!

आज तिला आपल्या घरात आणून सगळ्यांसमोर याचक बनवावे लागले होते त्याला!

अण्णा - एक लाख... हं... तुझ्याकडे किती आहेत रे??

वसंताचे डोळे भरून आले. त्याच्याकडे जेमतेम दहा हजार उरलेले होते. चारही भावांनी आईच्या ऑपरेशनसाठी एक लाख उभे करताना हा विचार केलेला नव्हता की वसंताचा संसार आत्ताच सुरू झालेला आहे, त्याच्याकडून इक्वल रक्कम घ्यायला नको. आणि आज मात्र अण्णा विचारत होता की तुझ्याकडे किती आहेत??

कुमारदादा त्याच्या स्वभावाप्रमाणे म्हणाला...

दादा - आपल्या सगळ्यांना पंचवीस पंचवीस हजार द्यायला लागतील..

पटकन तारका वहिनीने वाक्य टाकलेच..

तारका - त्यातच आत्ता आईंचंही ऑपरेशन झालं नाही???

अंजली - तेच ना... दिवसच फिरलेत..

अण्णा - काय रे वसंता?? .. तुझ्याकडे किती आहेत??

वसंता - साधारण ... एक... दहा हजार वगैरे असतील..

अंजली - दहा हजाराने काय होणार??

दादा - म्हणजे आपल्याला पंचवीसच्या ऐवजी तीस तीस हजार द्यावे लागतील..

अण्णा - राजू?? ... तुझं काय??

राजू - जमतील तितके देतो...

अण्णा - किती पण??

राजू - काय आता.. बघतो.... असतील पंधरा हजार वगैरे... आत्ताच बिगुलची फी भरली ना..

अण्णा - अवघड झालंय सगळं...

गौरी - माझ्याकडे... माझ्याकडे थोडं... सोनं आहे..

गौरीने एकदम ते वाक्य टाकलेले पाहून खरे तर सगळ्यांना बरेच वाटले. पण वसंता? त्याच्या मनात वेगळाच विचार आला. की हिचं हे सोनं असणार एक तर हिच्या माहेरचं किंवा हिच्या पहिल्या नवर्‍याने घेतलेलं! ते आपण कशाला मोडायचं?? हा विचार बोलून दाखवताना आपण भावांचे पैसे मात्र घेतो आहोत हे त्याला जाणवले नाही...

वसंता - ते कशाला मोडतीयस??... आम्ही चौघे उभे करतो ना पैसे???

झालं! भडका उडाला!

तारका - व्वा! म्हणजे स्वतःजवळचे तसेच ठेवायचे... अन दुसर्‍याचे...

चट्टकन जीभ चावली तारका वहिनींनी 'दुसर्‍याचे' हा शब्द उच्चारताना कुमारदादांकडे पाहून!

दादा - इथे सगळे एकच आहेत.. कुणी परका नाही..

अंजली - तुम्ही नेहमी हेच म्हणत आला आहात... पैसा काय झाडाला लागतो???

तारका - आणि.. मी म्हणते... एवढ्या मोठ्या उड्या आधी मारायच्याच कशाला??

गौरीच्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागलं होतं! तरीही ती निर्धाराने म्हणाली..

गौरी - नाही नाही... मी विकते ना सोनं.. त्यात काय एवढं.. सोनं परत घेता येईल..

अंजली - कितीय सोनं??

गौरी - सोनं... तरी असेल की पन्नास हजाराचं..

वसंता - तुझ्या.... माहेरचं आहे की... तिकडचं??

गौरी - हा प्रश्न कुठे आला?? स्त्रीधन आहे ते...

तारका - हं! स्त्रीधन... आमच्या तर कधी स्त्रीधन हा प्रकारच नशीबी आला नाही..

अंजली - त्या एका वाकीवरून काहीही बोलू नकोस हां तारका.. ती आईंनी उमेश झाल्यावर मला दिलेलीय..

तारका - त्याचा काही संबंध आहे का?? स्त्रीधन म्हणजे माहेरहून मिळालेले सोने..

अण्णा - तुम्ही दोघी कशाला वाद घालताय पण?? इथे विषय काय चाललाय??

अंजली - तुम्ही तिला बोला.. मला बोलत जाऊ नका पुन्हा..

बाबा - एक मिनिट... वाद थांबवा.. कोण कोण किती किती पैसे उभे करू शकतो ते मला सांगा..

अंजली - आमचं सगळं आयुष्यच असं जाणार आहे..

आता मात्र वसंता भडकला.

वसंता - बाSSSSSSस... बास करा आता... इथे इतकं टेन्शन आहे अन तुम्हाला शेरेबाजी सुचतीय?? आज गजाआड गेलो असतो मी... काहीही चूक नसताना माझी... आणि घर दुरुस्तीच्या वेळेला माझं शिक्षण सोडायला लावून माझं आयुष्य बरबाद होईल हे सुचलं नाही?? आणि कुमारदादाच्या त्या बिल्डरला पैसे देताना मला फक्त बाराशेच पगार आहे हे सुचले नाही?? आईच्या ऑपरेशनच्या वेळेस माझ्याकडे तेवढे पैसे नसतील हे सुचले नाही?? मी गौरीच्या सोन्याला का नको म्हणतोय हे समजत नाही? हे सोनं जर तिच्या आधीच्या सासरचं असलं तर आपल्याला हक्क आहे ते घेऊन आपले प्रॉब्लेम्स सोडवण्याचा??

वसंताला गौरी सतत ओढत होती तरीही तो बोलत होता. आणि त्याच्यापेक्षा तारस्वरात ओरडून अंजली वहिनी म्हणाल्या..

अंजली - तुम्हाला आहे वाटतं आधी प्रॉब्लेम्स निर्माण करून मग भावांकडून सोडवून घेण्याचा?? मी आधीपासूनच सांगत होते... ही अवलक्षणी आहे.. जिथे जाईल तिथे वाटोळंच होईल..

दादा - अंजलीSSSSS

दादा ओरडले हे पाहायलाही गौरी थांबली नाही. धावत आपल्या खोलीत गेली.

आणि तब्बल दहा मिनिटांनी वसंता वर आला आणि रडणार्‍या गौरीच्या पाठीवर थोपटून म्हणाला..

"दोन दिवसात आपण इथून बाहेर पडायचं गौरी... मी कुणाकडूनही एक पैसाही घेणार नाही आहे..."

गौरी रडता रडता थांबून अवाक होऊन 'आपला इतका आदर करणारा' वसंत आणि त्याच्या प्रेमाचा अतिरेक पाहात होती.

दुसर्‍या दिवशी सकाळीच वसंता चितळ्यांच्या दुकानात गेला.

"काय?? भिकारदास मारुती गाजवून आलात असं ऐकलं???"

मिश्कील आणि छद्मी हासत चितळे म्हणाले..

"एक.... एक शेवटची मदत करू शकाल का??"

"आज्ञ महाराज... "

"एक लाख रुपये द्याल??"

"छे.. काहीही काय?? आम्हालाही बेड्या पडायच्या..."

"बिनपगारी काम करेन इथे..."

"सव्वा आठ वर्षे??? ... आणि पोबारा केलात की आम्ही काय करायचं??"

"किती द्याल???"

"शुन्य रुपये देईन मी शुन्य... "

"निदान... काम द्याल??"

"माणसं भरली आहेत आता सगळी.. किती डोळे लावून बसणार आम्ही तरी तुमच्याकडे?? काय एकेक जण येतात... मोठे धंदा करायला निघाले... आम्हाला विचारा खाद्यपदार्थांचा धंदा करायचा म्हणजे काय काय काळजी असते ते... काळ्याचे पांढरे झाले आमचे या धंद्यात... एक पैसा देणार नाही... "

वसंता मान खाली घालून बाहेर पडू लागला. डोळ्यात दु:ख आणि संताप या दोन्हींच्या मिश्रणातून पाणी आलेले होते. गौरीला आपण एक राहणीमानही देऊ शकत नाही याचे पराकोटीचे वैषम्य मनात होते. आज या वळणावर भावांकडून मदत मागायची नाही असे ठरवल्यामुळे मोठ्या अडचणीत आपण आलेलो आहोत हे जाणवत असूनही त्या निर्णयावर फेरविचार करायचा नाही असे मनात येत होते. जगात 'फक्त आपले' असे गौरीशिवाय कुणीही नाही हे प्रकर्षाने जाणवत होते. अर्थात, आई बाबा होतेच, पण त्यांना त्रास तरी किती द्यायचा!

मागून मोठा हशा ऐकू आला. काउंटरवरचे सर्व स्टाफमधील लोक इतके का हासत असावेत वसंताला कळेना! हेच ते आपले जुने मित्र! जे आज आपल्यावर हासतायत! आणखीनच खिन्न होत त्याने पायरीवरून उतरायला सुरुवात केली.

काय एकेकावर परिस्थिती ओढवते!

मागून अचानक हाक ऐकू आली.

"पटवर्धन..... "

खिन्नपणे वसंताने मागे वळून पाहिले.

चितळे दारात आले होते.

"मोरेला मी शांत केलाय बरं.. त्याला म्हंटलं गरीब माणसाला त्याची चूक नसताना पिडलंस तर बदली करून टाकेन... काय??? आणि या दुकानात काम नसलं तरी डेक्कनला एक छोटी शाखा काढतोय... चालवाल का तेवढी??? कारण हल्ली प्रामाणिक माणसेच मिळत नाहीत हो??? आणि मराठी माणसाने मराठी माणसालाच मदत करावी नाही का?? क्काय?? आणि त्यातल्यात्यात.. निदान पुणेकरांचे नाव तरी जरा सुधारावे?? क्काय???"

चितळेंच्या पावलांवर वसंताच्या आसवांचा अभिषेक झाला त्या सकाळी!

आणि रात्री... गौरीच्या खांद्यावर!

गुलमोहर: 

चितळ्यांबद्द्ल एवढ चांगल लिहिणारे तुम्हीच पहिले!.. लोक (विषेशतः पुण्याबहेरचे) नेहमी त्यांच्या दुपारी दुकान बंद ठेवण्यावर बोलत असतात पण त्यांच्या मालाची गुणवत्ता अप्रतिम आहे हे विसरतात. त्यांच्या समाजकार्या बद्दल तर खुप कमी लोकाना महिती आहे. ह्या भागाचा शेवट वाचताना (एक पुणेकर म्हणुन) खुप मस्त वाटल.

कथा मस्त चालली आहे. पु. ले. शु.

अहो चौकटचे राज्या साहेब बेफिकीरराव पुण्यातच राहतात हो
त्याना पुण्याबाहेरचे म्हणुन नका ...

मस्तच..

मस्तच....
आवडला हा भाग.... वसंतावर आलेल्ला हा प्रसंग वाचुन वाईट वाटल. आणि घरातिल परिस्थिति तर काय बोलावे... दादा आणि आण्णा धिराचे म्हणुन चाललय हे सगळ नाहितर......

अगेन बिच्चारी गौरी....

तुम्ही कथा फार सुंदर लिहीता. पण तुम्ही कलाची लढाई आणि बना हि कथा मधेच का लिहीण्याचे बंद केलेत. मी त्या कथा वाचण्यास फार उस्तुक आहे.

next part...................please..........