दलिया इडली आणि दोसा

Submitted by मितान on 31 January, 2011 - 14:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

यावेळी दलिया जरा जास्तच आणला गेला. दलियाची खिचडी घरात कोणाला विशेष आवडत नाही. आणि गोड तरी किती करून खाणार. म्हणुन जालावर दलियाच्या रेसिपी शोधताना दलिया इडली सापडली. दोन तीन ठिकाणच्या रेसिपी एकत्र करून तयार झालेली ही दलिया इडली ! ज्यांना तांदूळ कमी खायचा आहे किंवा चालतच नाही अशा खवैय्यांसाठी ही एक मस्त रेसिपी आहे. ट्राय करा !

सामग्री :
१ कप दलिया
अर्धा कप उडीद किंवा मुगाची डाळ
१०-१२ मेथी दाणे
अर्धा कप दही
जिरे मोहरी, कढीपत्ता, हिंग, तेल वगैरे फोडणीचे साहित्य
१ मोठा चमचा चणा डाळ
अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा
मीठ

क्रमवार पाककृती: 

दलिया आणि डाळ ७-८ तास वेगवेगळे भिजत घाला. दलियामध्ये भिजवताना भरपूर पाणी घाला. कारण ते जास्त शोषले जाते. मेथी दाणेही भिजत घाला.
मग एकत्र वाटून घ्या. साधारण नेहमीचे इडलीचे पीठ असते तेवढे बारीक नि पातळ मिश्रण तयार करून घ्या.
एका कढईत तेल तापवून जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग नि चणा डाळ घालून फोडणी तयार करा. ती वरच्या मिश्रणात मिसळा.
आता त्यात दही, मीठ आणि खायचा सोडा घाला. चांगले फेटून घ्या. इडलीपात्राला तेलाचा हात लावुन त्याच्या इडल्या लावा. १५ मि इडल्या वाफवुन झाल्या की इडलीपात्र न उघडता तसेच बाजूला ठेवा. त्या इडल्या गार झाल्यावर काढायला जास्त सोप्या जातात.
मग गरम गरम सांबार आणि चटणीसोबत खायला घ्या.

इडली केली की आई दोसा पण करते याची सवय असल्याने लेकीने आजही दोशाचा हट्ट धरला. मग काय ! याच पिठाचा मस्त दोसा तयार झाला.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात साधारण मध्यम आकाराच्या २०-२२ इडल्या होतात.
अधिक टिपा: 

दलियाच्या इडल्या तांदळाच्या इडल्यांएवढ्या फुगत नाहीत आणि गरम खाणार असाल तर थोड्या चिकट पण वाटतात.
फर्मेंट करण्यासाठीचा वेळ यात वाचतो.

माहितीचा स्रोत: 
नेट वरील विविध रेसिपीज्
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त, नक्की करून बघणार, कालच घरात दलियाचे १ मोठे पाकीट आलय. मी वाणसामानाच्या यादीत मोठा दलिया -१ छोटे पाकीट लिहील्यावर नवर्‍याने बारीक दलियाचे मोऽठे पाकीट आणले Proud
यात अर्धा दलिया, अर्धा इडली रवा करून बघीतलेस का? की तू अजिबातच तांदुळ खात नाहीस.
तुझ्या शब्दखुणांमध्ये 'दाक्षिणात्य' शब्द घालणार का, त्यामुळे पाककृतीवचे वर्गीकरण नीट होऊन "विषयवार पाककृती>>प्रादेशिक>>दाक्षिणात्य" मध्ये सगळे इडली-दोसा प्रकार सापडतील.

थान्कु थान्कु सगळ्यांना Happy

रुनि, 'दाक्षिणात्य' लेबल दिलं आहे.

मी रवा नाही घातला. आता करेन तेव्हा घालून बघेन. मी तांदुळ खाते. दलिया संपवायचा होता लवकर म्हणुन यावेळी ही इडली केली.

जागु, मी लगेच केले होते इडली दोसे. थोडेसे पीठ उरले होते ते संध्याकाळपर्यंत काही विशेष फुगले नव्हते. आणि चवीतही फरक पडला नाही.

अकु, दिनेशदा, मंजुडी,स्मिता, अनानी धन्यवाद Happy
मी केलेले दोसे बिनतेलाचे आहेत म्हणुन क्रिस्पी झाले नाहीत. मला वाटतं थोडा रवा नि थोडे तेल वापरले तर कुरकुरीत दोसेही करता येतील.

मी केले आज सकाळी मस्त कुरकुरीत आणि चवदार डोसे. उद्या फोटु डकवते.
दलिया - ३ वाटी
मुगडाळ - १/२वाटी, उडदडाळ - १/२ वाटी, तांदुळ- १ वाटी
सगळ वेगवेगळे रात्री भिजवले. सकाळी तांदुळ डाळ बारीक वाटुन घेतले त्यात ५-६ हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा टाकुन परत वाटले मग भिजलेला दलिया आणि वाटीभर शिळा भात घालुन मिनिटभर फिरवले.
मिश्रणात वाटीभर चिरलेली कोथिंबीर आणि हिंग हळदिची फोडणी घालुन डोसे बनवले. मस्त हलके, स्पॉन्जी आणि चविष्ट डोसे झालेत. फोटु काढायला शिल्लक न उरल्यामुळे. घरी गेल्यावर परत डोसे बनविणेत येतील व फोटु डकविण्यात येइल