http://www.youtube.com/watch?v=YwfCMvo19s8
डब लब डब लब डब लब......
धकधकणार्या हृदयाचा आवाज. शांततेत नांदणार्या संथ हृदयाच्या डोहावर निष्ठूर काळाच्या काठीचे एका मागोमाग एक घाव घातले तर....
.... तर कसे तरंगांचे ओरखडे, वेदनेच्या लाटा उठतात, कसे दु:खाचे बुडबुडे फुटतात, कसं डबडबून येतं हृदय..... कसं घायाळ घायाळ होतं... आत आत!
हे असं घायाळ क्षण संभाळत जगणार्या या देहाच्या कक्षेला भेदूनही रोजचा सूर्य....
तो उगवतो, मावळतो, निर्विकार क्षणांचा पारा थेंबा-थेंबावे ठिबकतो, संततधार धरल्यासारखा...
कुणी अन का... केलेल्या नवसाची फेड करीत जगतो आपण एक नको असलेलं आयुष्य?
ही... ही... अमानुष सक्तीही, आसक्ती होते मग कधीतरी. रोजच्या श्वास घेण्यालाही "जीवन" म्हणायला लागतो आपण कधीतरी.....
....मार्गाला लागतो आपण कधीतरी.
अशाच एका कलत्या दुपारी पाऊल उमटतं न जगलेल्या आयुष्याचं... चाहूल लागते निरभ्रं मनभरल्या दोन-चारच श्वासांची. अगदी थोडाचवेळ का होईना पण, अर्थ मिळणार असतो त्यातल्या प्रत्येक श्वासाला. आतापर्यंतं तुकड्या तुकड्यात पांघरलेली ही स्थळ-काळाची लक्तरं.... एकदा कदाचित फक्त एकदाच वस्त्रं बनून येणार असतात.... आपलं उरलं-सुरलं नागडं अस्तित्वं सजवण्याची एक... एकच संधी.
दैवाने कापून, तोडून, भिरकाटून दिलेला आपलाच दुसरा तुकडा भेटणार असतो संध्याकाळच्या कलत्या उन्हात. पूर्णत्व अनुभवायचं, परत एकदा, शेवटचंच बहुतेक.... अगदी काही तास की मिनिटं का पळं?
आपल्यातच आपण विरघळण्याची वाट बघतो आपण. प्राण वेध घेतात, एकदा डोळे बनून, कधी चाहूल घेत तर कधी श्वासात गंध शोधत...
डब लब डब लब डब लब......
सवयीने धकधकतं हृदय आणि त्याबरोबर सवयीनेच घाव घालत असते अदृष्टाची काठी.
पाणी काय हृदय काय, घाव बसला की तरंग उठतात, लाटा किनार्याला थडकून फुटतात..... पण धकधक आहेच अविरत, सवयीनेच...
घावांनी हल्लक झालेला, कसोशीने जोडलेला वरचा पापुद्रा साधतोय न साधतोय तोच परत काठी वाजते... सवयीनेच!
वाट बघण्यातही हजार मरणं जगतो आपण, अगदी आनंदानं!
अजून भगभगणरा रोजचा सूर्य आणि त्याबरोबर ठिबकणारा क्षणांचा पारा... वितळतात आपल्यासाठी आणि.....
आणि दिसतो, भेटतो आपल्या कायेबाहेरचा आपलाच प्राण!
अन सगळे बंध तोडून निघतो एक आकांत, एक आssssह.......
.....दिलसे!
’धागिन धाsग दिन देsग धागदिन
धागिन धाsग दिन देsग धागदिन’
शब्द नाहीतच नुसतीच केविलवाणी धडपड.... एकमेकांना सांगण्याची अन समजून घेण्याची...
अरे कसा आहेस?
फार सोसलंस रे....
कुठे होतीस गं?
किती शोधलं तुला?
काय झालं हे?
............
योजलेलं यातलं काहीच म्हणत नाहीत....
हृदयं छातीत न धडधडता कानातच वाजतात.... धापणार्या आवाजात, शब्दं संपून, शब्दांच्या पलिकडलं, फक्त आपल्याला अन त्याला कळेल अशा अनाकलनीय भाषेत ओरडत रहातात..
याच भाषेत धापतात, रडतात, कुजबुजतात दोघे.... आssह, दिलसे रे!
आपसूकच आकळतं त्यांच त्यांनाच मग...
विलगलेली ही दोन पानं पानझडीच्या एका घावात वेगळी होऊन कुठे, कशी भरकटली, कसल्या कसल्या वावधुळींनी कुठे कुठे भिरकावून दिलं दोघांना, दिशाहीन होऊन एकमेकांना शोधत कशी फरपटली दोघं.....
’धिंधिं तानं धित्तान झिग झिग...
ता अ धि अ धिंss धिंधिं ना
नागिन धिं
अ धिंss धिंधिं ना....
अ धिंधिं तानं धित्तान झिग झिग...
किती जंगलं, किती काटे, कसली गावं, कसली माणसं, कुणा कुणाचे ओरबाडे, कुठे कुठे ओरखडे, कसे घाव-डाव, कसं खपली धरणं, कसं भरून येणं.....
’धिंधिं तानं धित्तान झिग झिग...
मग दोघांनी आयुष्य, आयुष्य म्हणत काळाच्या पुस्तकात कुठल्यातरी दोन पानांत कसाबसा मिळवलेला विसावा, तिथेच पडलेली जाळी....
अन मग पडलेल्या जाळीतून जमतील तशी, मिळतील तितकी वाचलेली अक्षरं....
माग घेण्यासाठी..... आहेस का तू? कुठे असशील तू? .....
आssह, दिलसे!
समजावतात एकमेकांना...
काय करणार, तुझा माझा इलाज नाही, सखे. कात झडल्या जाळीतही अडकून असतं एक जिंदा दिल, धकधकतं ना गं, सवयीनेच.
दिल म्हटलं की दर्द आलाच की रे....
नव्हे गं, दर्द आहे तिथेच दिल आहे.
राणी, ह्याच वेदनेचे पंख होऊन, जाळी झालेलं हे कलेवर फोडून उडून का जात नाही आपली आस आणि विश्वासही?
तरीही थिजलेल्या मनाच्या दगडी पहार्यावरही पालवतात चुकार वेली, घोसावतातही यथावकाश....
कुणा कुलकुलणार्या चोचींसाठी शिंपी होतो डोळ्यांचा काठ.....
येणार्या ऋतूसाठी परत एकदा सजतात डहाळी डहाळीवर, तुझे-माझे श्वास....
पानझडही येतेच, तिचाही नाईलाज.....
आsssह दिलसे रे!
डब लब डब लब डब लब......
धकधकणार्या हृदयाचा आवाज. शांततेत नांदणार्या संथ हृदयाच्या डोहावर निष्ठूर काठीचे एका मागोमाग एक घाव घातले तर....
.... तर कसे तरंगांचे ओरखडे, वेदनेच्या लाटा उठतात, कसे दु:खाचे बुडबुडे फुटतात, कसं डबडबून येतं हृदय..... कसं घायाळ घायाळ होतं... आत आत!
दिलसे रे !
****************************************
पुस्तक वाचतो नं आपण, तसं गाणं वाचायची खोड आहे मला. पहिल्यांदा नुसतीच सुरावट, मग गायकाचा किंवा गायिकेचा आवाज, मग शब्दं, मग सूर आणि शब्दांचं एकत्र नांदणं, मग ताल-ठेक्यांची झुळझुळ, त्यासाठी वापरलेली वेगवेगळी वाद्यं किंवा नुस्ते आवाज वगैरे वगैरे...
ह्यात आवडलेलं गाणं अनेकदा ऐकलं जातं. एखाद्या गहन/सखोल पुस्तकासारखं प्रत्येक ऐकण्यात वेगळा पदर उलगडत जातो... आणि कधी कधी दृश्यमान होतं गाणं.
ए. आर. रहमानचं "दिलसे" हे गाणं असंच ऐकलं मी.... मनात आलं ते लिहून ठेवलंही. ह्या लेखात सघन असं काही नाही. पण जमेल त्या वाकड्या तिकड्या शब्दांत माझी अनुभूती (मोठ्ठा शब्द आहे...) तुमच्या पर्यंत पोचवण्याचा थोडा अट्टाहास म्हणा, ना. माझ्यासारखं गाणं "वाचणार्यांना" नक्की काहीतरी जाणवेल. इतरांना कदाचित आवडणारही नाही. पण तरीही.......
हा लेख वाचण्यापूर्वी आणि कदाचित नंतरही ते गाणं ऐकायला हवं.....नाहीतर एखाद्या सुंदर मैफिलीचा नुसताच वृत्तांत वाचल्यासारखं होईल ते.
परत एकदा सांगत्ये, हे मला "दिसलेलं" गाणं आहे.... तुम्हाला तसं दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे माझा.
ए. आरचा अत्यंत व्याकूळ करणारा, कधी थोडा रुद्ध, हळवा होणारा आवाज, त्याची मॉड्युलेशन्स भावली. संथ सुरू होणारं गाणं....
पहिल्याच ओळीत तीन वेळा धमाका उडतो "सूरज", "पारा" आणि "दिलसे" याच शब्दांवर. त्याबरोबरच त्याने वापरलेली वाद्य किंवा सॅंपलिंग करून वापरलेले आवाज. त्यातला एक आवाज म्हणजे पाण्यावर काठी मारल्यास उठणारा आवाज.... नीट कान देऊन ऐकल्यास ऐकू तर येतोच पण एकदा ऐकला की गाणंभर पाठ सोडत नाही.
"गम दिलके बस चुलबुले है... पानी के ये बुलबुले है... उठतेही बनते रहते है...." इथे कळतो त्या काठीच्या आवाजाचा परिणाम.....
"शब्दं संपले आणि तरीही काही सांगण्यासारखं उरलं की सुरू होतो तराणा...." असं कुणी म्हटलंय (बहुतेक कुमारजींनी)
धपापणार्या हृदयाची काहीतरी सांगण्याची धडपड अगदी अगदी पकडलीये मृदुंगाच्या किंवा मटक्याच्या बोलांनी.
"धागिन धाग दिन देग धागदिन
धागिन धाग दिन देग धागदिन"
खरोखर धाप लागून बोलायला गेल्यास, तोंडाने घेतलेल्या श्वासाचा वापर करून म्हटलेले पुढचे बोल -
"धिंधिं तानं धित्तान झिग झिग...
ताss अ धि अ धिंss अ धिंधिं ना
नागिन धिंन अ धिंss धिं ना....
अ धिंधिं तानं धित्तान झिग झिग... "
त्यातल्या मधे मधे आलेल्या ’अ’ ने जो परिणाम साधलाय तो शब्दातीत आहे.
शिवमणीन वापरेलेले अनेक ड्रम्स, इतर पर्कशन वाद्यं, मधला सरगम, अन ते मॄदुंग/मटक्याचे बोल... ह्या सगळ्यांचा मेळ केवळ केवळ अप्रतिम.
ए आरच्या इथे लागलेल्या आवाजा बद्दल काय बोलावं?
मला स्वत:ला हे गाणं थोssडं धावल्यासारखं वाटतं. किंचित लय कमी केली तर ह्यातला "मझा" दुप्पट होईल अशी मलाच का कुणास ठाऊक पण खात्री वाटतेय...
माझ्या मनात हे गाणं चालू होतं त्या लयीला एकदम "सुकून है" होतं, माझं.
हा लेख लिहिला तेव्हा चित्रपट बघितला नव्हता. नंतर कधीतरी बघितल्यावर त्याचं केलेलं चित्रिकरणही आवडलं.
हा लेख किंचित वेगळ्या
हा लेख किंचित वेगळ्या स्वरूपात जुन्या मायबोलीवर होता. किंबहुबा ह्या लेखावरून मला गानभुलीची कल्पना सुचली.
हे गाणं इतकं कधीच "ऐकलं"
हे गाणं इतकं कधीच "ऐकलं" सुद्धा नव्हतं, तुम्ही म्हणता तसं "वाचणं" तर दूरच..
पण ते इतकं भिडणारं असेल असं नव्हतं वाटलं. हा लेख वाचून पुन्हा एकदा ते ऐकलं आणि पटलं..
दाद, तुमच्या नजरेने जग बघितलं तर जगण्यातला आनंद कितीतरी वाढतो हो!! अगदी मनापासून सांगतेय..
मी मुद्दाम तुमच्या लेखनाच्या पाऊलखुणा शोधून माझ्या IE च्या Favourites मधे जपून ठेवल्या आहेत. मनात आलं की केव्हाही वाचायला मिळाव्यात म्हणून.
प्रतिसाद थोडा मोठा होत असेल म्हणून माफ करा, अगदीच रहावत नाही सांगितल्याशिवाय..
बकुळीची फुलं आठवतात मला तुमचे लेख वाचत असताना. त्या फुलांचा गंध जसा वेड लावतो नं, तसं काहीसं होतं तुमची गानभुली वाचताना.
"बूंद ना गिरी एक लहू की...कछूना रही निसानी.."अस्स्सं होतं अगदी..
तुम्हाला शतशः धन्यवाद. इतकं सुंदर काहीतरी "दाखवल्याबद्दल"
(प्रतिक्रिया देताना काही मागंपुढं झालं असेल तर प्लीज समजून घ्या. एखादं काही खटकलं असेल तर जरूर सांगा. मी दुरुस्त करीन नक्की.)
प्रज्ञा. किती सुंदर
प्रज्ञा. किती सुंदर प्रतिसाद... खरच. तुला जे वाटलं ते इतकं आतलं, मुळचं अन शक्तिमान आहे की, दुसर्या कुठल्याच शब्दांनी ते इतकं साजिरं बाहेर पडलं नसतं.
धन्यवाद.
(लिहितेस? लिही... जिथून हा प्रतिसाद आला ना, तिथून लिही)
आज हे गाणे तुमच्या शब्दातून
आज हे गाणे तुमच्या शब्दातून 'पाहिले' ,आवडले...अगदी दिल से!
बहुतेक हा तुझा मी वाचलेला
बहुतेक हा तुझा मी वाचलेला पहिला लेख होता. त्यावरून मी तुझी फॅन झाले. शिवाय हा लेख वाचताना दिल से कितीदा व कसे ऐकले त्याला तोड नाही.
मी नुसता तुझा हा लेख वर पाहून किती एक्साईट झालीय तुला माहित नाही!
पुन्हा सुंदर! गाणं आवडत आहेच
पुन्हा सुंदर! गाणं आवडत आहेच पण हे वाचल्यावर आता लेखाची प्रिन्ट हातात घेऊन पुन्हा पुन्हा ऐकायला हवे!
अ प्र ति म ! काय जीवघेणं
अ प्र ति म !
काय जीवघेणं लिहितेस गं तू ? मनात असलं काहीतरी चालू असतं, पण त्या 'काहीतरी'ला शब्द मिळत नाहीत. तुझं लिहिलेलं वाचलं की कळतं, अरे हेच ते....
अजून लिही गं. खूप खूप लिही. अधाशासारखं वाचलं मी.
माझंही लाडकं गाणं.आजवर असंख्य वेळा ऐकलंय. पण तरी तो पाण्यावर काठी मारल्याचा आवाज मात्र आज जास्त जाणवला.
>>वाट बघण्यातही हजार मरणं
>>वाट बघण्यातही हजार मरणं जगतो आपण, अगदी आनंदानं!
कित्ती खरं. सूरज पिघला था वर धमाका होतो आणि आपणही या गाण्यात, लयीत, शब्दात मिसळून जातो. वेड लावतं हे गाणं.
शलाकाताई, अशीच सुंदर गानभूली अनुभवायला मिळू देत.
मला स्वत:ला हे गाणं थोssडं
मला स्वत:ला हे गाणं थोssडं धावल्यासारखं वाटतं. किंचित लय कमी केली तर ह्यातला "मझा" दुप्पट होईल अशी मलाच का कुणास ठाऊक पण खात्री वाटतेय...>>> अगदी अगदी अगदी!
एक विनंती, याच चित्रपटातलं 'ए अजनबी' या गाण्यावर देखील लिहाच असंच काहीसं.
मला बर्याचदा वाटतं लिहावं.. लिहतो, फाडतो.. नाही जमतच नाही. काही गोष्टी नाहीच पकडता येत शब्दात.
आपण तेही करता अन् इतकं उत्कृष्ट! हॅट्स ऑफ! सलाम!
एकदम दिलसे लिहिलं आहे. आवडलं
एकदम दिलसे लिहिलं आहे. आवडलं
कॉलेजमध्ये माझी एक गिटारिस्ट मैत्रिण ती सुरुवातीची धून आणि नंतरचेही तुकडे अप्रतिम वाजवायची. त्या सुरांवर गाणं म्हणायला काय वेगळंच मस्त वाटायचं ना ... परत त्या काळात गेले तुमच्या लेखामुळे !
मग दोघांनी आयुष्य, आयुष्य
मग दोघांनी आयुष्य, आयुष्य म्हणत काळाच्या पुस्तकात कुठल्यातरी दोन पानांत कसाबसा मिळवलेला विसावा, तिथेच पडलेली जाळी....
अन मग पडलेल्या जाळीतून जमतील तशी, मिळतील तितकी वाचलेली अक्षरं....>>>>>
हे गाणं त्याच्या सूर ताल लयींसकट उभं राहिलं....मागे पुढे अनेकानेक सुंदर सुंदर रंगीत तुकडे जोडत...
कसले ते माहित नाही... पण तुम्ही फार छान लिहिलतं.....!!
अतिशय सुंदर लिहीले आहे.. खूप
अतिशय सुंदर लिहीले आहे.. खूप आवडले..
मागच्या आठवड्यात या गाण्यातील माझ्या आवडत्या दोन ओळी
"दिल है तो फिर दर्द होगा.. दर्द है तो दिल भी होगा..
मौसम गुजरते रहते है.. दिले से दिल से दिल से रे...!"
फेसबुकवर स्टेटस मध्ये डकवल्या होत्या..
रेहमानसरांनी ज्या प्रकारे गाणे गायले आहे ते निव्वळ अप्रतिम.. थेट ह्दयाला भिडते .. नि जोडीला ते शब्द ’धागिन धाsग दिन देsग धागदिन
धागिन धाsग दिन देsग धागदिन’: नि "धिंधिं तानं धित्तान झिग झिग...
ताss अ धि अ धिंss अ धिंधिं ना
नागिन धिंन अ धिंss धिं ना....
अ धिंधिं तानं धित्तान झिग झिग... " त्यातच अनेक वाद्यांचा घडवून आणलेला मिलाफ.. लाजवाब..
तुमचे हे लिखाण तंतोतत जुळते ! दिलसे रे दिलसे रे...
खूप दिवसापासून तुमचे लेख
खूप दिवसापासून तुमचे लेख वाचतेय..प्रज्ञा ने खूपच छान शब्दात लिहिलंय मला तेवढं जमणार नाही
पण प्रामाणिक पणे सांगते.. हे गाणं नवर्याला खूप आवडतं म्हणून हजार वेळा कानावर पडलंय.. 'ऐकलं' म्हणता येणार नाही कारण मी गाणे कधीच ऐकत नाही एकाही गाण्यातले शब्द मला माहिती नसतात..
हे असं निरर्थक अत्तापार्यात्न मी कशी जगत आले ह्यावर उत्तरच मिळत नाही .. पण तुमचे सगळे लेख वाचून मी काही तरी मिस्लय एवढ नक्की वाटायला लागलं आहे..
ह्या तुमच्या गाण्यामुळे असेल किवा कशामुळे असेल बाकीच्या लेखात पण बारकावे किवा तो दर्द येतो आणि लेखांच गडद पण वाढतं त्यामुळे मी एकही लेख चुकवत नाही
तर हा दर्द कि जे काही आहे ते डायमेंशन माझ्या मध्ये नाहीये त्यामुळे गोष्टीन्कडे बघण्याची ती दृष्टीच नाहीये ..
दिनेशदा, जागू चा निसर्गा कडे बघण्याची दृष्टी असो .. नाही तर रैना ची विश्वाचे आर्त मधली दृष्टी असो किवा तुमची गान्भुली हे असं मी कधी अनुभवलंच नाहीये
असं का होत असेल..
असो मी खूप काही शिकतेय . आणि तुम्ही खूप सुरेख लिहिता
आभार सगळ्यांचे,
आभार सगळ्यांचे, प्रतिसादांसाठी.
प्रित, अत्यंत प्रामाणिक प्रतिसाद आहे तुझा (अगंच म्हणते आहे, रागावू नकोस).
माझं वावरणं गाण्यात खूप आहे.... नव्हे गाण्यातच आहे असं म्हटलं तरी चालेल. तू काही मिसलं नाहीयेस.
आपल्याला काय भिडतं ते महत्वाचं. माझं दिनेशदांचं, रैनाचं अन अनेकांचं वाचून तुला वाटेल.... की "ह्यांच्यासारखं" आपल्याला अनुभवायला मिळालं नाही...
तसं नाहीये, प्रित.
तुला काय भेटू येतं? कोणत्या अनुभवानं, चाहुलीनं तू क्षणभरासाठी "फक्तं तू अन तो अनुभव" अशा अवस्थेत जातेस? ते शोधून काढ. तो क्षण येईल तेव्हा मात्रं सजग अस, त्याची पाऊलखूण अगदी नीट उमटू दे मनात... हळू हळू तुझ्याच लक्षात येईल की त्या अन तशा अनुभ्वांचं गावच्या गाव तुझ्या मनात वसेल....
माझ्यासाठी गाणं, दिनेशदांसाठी निसर्गं, वैभव जोशी साठी गजल (शोधून काढून वाच ह्याचं)...
तुझ्यासाठी काय ह्याचा शोध तुलाच घ्यायचाय... किंवा काही एकच एक नाही तर, ह्या अशा सगळ्या सगळ्यांसाठी तुझ्या मनाची माती घडवली असेल देवानं?... शोध तुलाच घ्यायचाय.
असो... माझ्या अनेकानेक शुभेच्छा आहेत, ते तुझं गाव तुला अगदी लग्गेच सापडो.
दाद, अगदी
दाद,
अगदी खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र सांगते आज तुला मेसेज टाकणार होते, बर्याच दिवसात नविन लेखन नाही दिसले तुझे. नोरा ची हिरकणी वाचली आणि वाटले दाद आता एक कथा येवु दे तुझी. कारण तुझे लेखन नेहमी मनाला भिडते.
आणि असा विचार करतच लेख विभाग उघडला. ( तुला माझ्या भा पो का गं?:))
नेहमी सारखेच सुंदर. मला हे गाणे कॉलेज मधे असताना खुप आवडायचे ( आणि आता पण)
दाद, तू ना नुसते सुंदर लेख,
दाद, तू ना नुसते सुंदर लेख, कथाच लिहीत नाहीस तर अत्यंत मनमोकळा, दिल से भिडणारा प्रतिसादही देतेस

हा लेख अगदी बारकाव्यांसकट लिहीला आहेस. आहाहा! ए आर तर ठार वेडा आहे, कुठून कुठून वाद्यं शोधतो देव जाणे. जिया जले पण जबरी आहे.
बाकी संगीत तुझ्यामधे वसलयं हे कोणीही सांगू शकेल. तुझी बाबुल मोरा तर हाय... नवरा s/w engineer आणि classical singer सुद्धा आहे. त्याला मराठी फार पटापट वाचायची सवय नाहीये माझ्यासारखी, तरीसुद्धा त्याला बाबुल मोरा आवर्जून वाचायला लावली, तर डोळ्यातून घळाघळा पाणीच आलं त्याच्या. आईला पण वाचायला दिली होती. सुरेख !!!!
अजुन काय बोलू?
दाद, आजपर्यंत फ़क्त ऐकलं होतं
दाद, आजपर्यंत फ़क्त ऐकलं होतं गं हे गाणं...
आज अनुभवलं, धन्स
शलाका, जियो!!!
शलाका, जियो!!!
तुझ्यासाठी काय ह्याचा शोध
तुझ्यासाठी काय ह्याचा शोध तुलाच घ्यायचाय... किंवा काही एकच एक नाही तर, ह्या अशा सगळ्या सगळ्यांसाठी तुझ्या मनाची माती घडवली असेल देवानं?... शोध तुलाच घ्यायचाय>>>

दाद प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद.. मला अगच म्हण
अगदी तेच शोधायचा प्रयत्न करतेय, बालपणात काहीच रुजलं नाहीये एक नृत्य आणि वाचन सोडून.. आणि दोन्हीला परवानगी नव्हती किवा प्रायोरिटी दिल्या गेली नाही ..मुलांसोबत आता बालपण शोधतेय आणि परत रुजवतेय सगळं .. म्हणून कधी तरी खंत वाटते कि खूप काही सुटून गेलंय..
तुमचे हे लेख असं बोट धरून शिकवतात ..त्यामुळे एकदम मस्त वाटत ..
दिलसे दिलतक पोहोचलं गाणं!
दिलसे दिलतक पोहोचलं गाणं!
मी हे गाणं बर्याच वेळा नुसतं
मी हे गाणं बर्याच वेळा नुसतं ऐकलय ! अत्ता नीट समजून ऐकेन!
पण छान लिहिलय!!
दाद, आजपर्यंत गाणं आवडतं
दाद, आजपर्यंत गाणं आवडतं म्हणुन कैक वेळा ऐकलय... आज मात्र अनुभवायला मिळालं... अगदी दिल से
कसं जमतं ग तुला इतकं चोख लिहायला आणि तरी मनाला भिडेल असं?/
जियो!!
दाद, हे वाचताना, आणि नंतर
दाद,
हे वाचताना, आणि नंतर दिलसे ऐकलं. ह्या आधीही अनेकदा ऐकलं होतं पण आता अगदी कान देऊन ऐकलं.
धन्यवाद.
विव्हळ करणारं लेखन.जाणत्याचे
विव्हळ करणारं लेखन.जाणत्याचे ऐकणे..शब्दात शब्दातीत मांडलं आहेस..
या आधी ही गाणं ऑल टाईम फेवरेट
या आधी ही गाणं ऑल टाईम फेवरेट मध्येच होतं

पण आजवर हे गाणं दिलसे ऐकत होते
हा लेख वाचल्यानंतर आता गाणं नुसत ऐकलं जातच नाहीये, अनुभवलं जातय
लिहित रहा
फारच सुंदर रसग्रहण. अनेक
फारच सुंदर रसग्रहण. अनेक आभार.
दणक्यात पुनरागमन! खूप वाट
दणक्यात पुनरागमन! खूप वाट पहायला लावलीत. पण सार्थकी लागली!!
बापू.
पहिल्याच ओळीत तीन वेळा धमाका
पहिल्याच ओळीत तीन वेळा धमाका उडतो "सूरज", "पारा" आणि "दिलसे" याच शब्दांवर. >>>>>>>> इथे बहुदा "दिलसे" च्या जागी "आंधी" हा शब्द हवा होता...
.
.
छान वाचन आहे आपले................
@ दाद, माफ करा तुमच्या बाफवर
@ दाद,
माफ करा तुमच्या बाफवर लिहीतोय. पण राहवलंच नाही.
सर्वप्रथम गानभुली साठी अनेक धन्यवाद. ही मालिका अतिशय सुंदर आहे. हे ललित देखील अपवाद नाही त्याला. दिलसे रे हे माझं इतकंसं आवडतं गाणं नाही पण अचानक ऐकताना आनंद देतंच. खरं तर कुठल्याही गाण्याला नावं का ठेवू नयेत हे ते गाणं तयार होताना अनुभवल्याने चांगलंच कळालंय. कुणीही गाणं वाईट होण्यासाठी बनवत नाही, मात्र ते काहींना आवडतं काहींना नाही. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनुभूती हे एक महत्वाचं कारण असू शकेल !!
सुरेख लेख.
दाद, गेल्या महिन्यात असाच एक
दाद,
गेल्या महिन्यात असाच एक शब्दातीत अनुभव मिळाला. प्रवासात होतो. खूप अन्धारून आलं होतं आणि पावसाच्या सरी येत-जात होत्या. संजीव अभ्यंकरांच्या पूरिया-धनश्रीची सीडी लावली आणि एका वेगळ्याच विश्वात कुणीतरी उचलून नेल्याचा आभास झाला. मी ती सीडी पूर्वी ऐकली होती, आवडली होती पण त्यादिवशी काही तरी वेगळंच घडलं.
एरव्ही आपल्याला चांगल्या कार्यक्रमाला 'कंपनी' असली तर हवी असते पण त्यादिवशी बरोबर कोणी नव्हतं तेच बरं वाटत होतं ... तो फक्त माझ्यासाठीच गातोय, अधे-मधे, आजू-बाजूला कोणीही नाही, फक्त तो आणि मी अशी ती थेट-भेट होती.
संजीवच्या सुरावटींचं गारुड दाट होत गेलं आणि आपण नेमकं काय ऐकतोय हेच कळेनासं झालं. षडज कुठेतरी पुसटसा जाणवत होता - नव्हता आणि जीवघेणा निषाद पिळवटून टाकत होता. मागे संजीवचाच 'दिन-की-पूरिया' ही ऐकला होता, त्याचं साम्य अधूनमधून जाणवत होतं तोच काही तरी वेगळंही वाटत होतं. थोड्यावेळानं रागाच्या 'व्याकरणा'चा [आणि आपल्या तोटक्या ज्ञानाचा] विचार मागे पडला आणि उरलं फक्त 'स्वर-सौंदर्य'!
सौन्दर्य ही संकल्पनाही किती विविध असते? मन प्रसन्न होउन थयथयाट करू लागतं ते सुंदर असतंच असतं आणि काळजाला घरं पडतात तेही सुंदर वाटतं. नेमकं काय होतंय ते कळू नये पण उचंबळून आल्यासारखं वाटावं हासुद्धा सौंदर्याचाच एक आविष्कार! सौन्दर्याच्या एका दालनातून दुसर्या दालनात ... मग नव्याच एका दालनात अशी सफर चालली होती. त्याचं वर्णन शब्दात कसं करणार? ती शब्द-कळा शलाकाताईंवर प्रसन्न आहे; माझ्यावर नाही!
तीच सीडी मग परत लावली .. पुन्हा नव-नव्या अनुभूती घेतल्या.
ती सीडी एका मित्राला मी कॉपी करून दिली होती. त्याला फोन लावला आणि विचारलं, '' पूरिया-धनश्री ऐकलास की नाही?'' तो '' अजून नाही'' म्हणाला.
'' देव तुझं भलं करो.''
'' का रे बाबा? काय झालं?''
''काही नाही. तुझ्यासारखा कमनशिबी तूच. जाऊ दे.''
रात्री उशीरा त्याचा फोन आला. '' धन्य झालो.''
आम्ही दोघांनीही शब्दच वापरले होते पण किती अपुरे?
'दिलसे'चं रसग्रहण वाचून वाटलं, 'धन्य झालो'! गाण्यापेक्षा निरुपण अधिक सुंदर!! '' हा अनुभव असा कितीदा येतो?
-बापू.
Pages