मज्जाखेळ [३-५] / [५-७]: बेडकांची शर्यत

Submitted by सावली on 11 January, 2011 - 06:35

अलिकडेच सुचलेला एक नवा खेळ. यात मुलांना साध्या बेरजा आणि तुलना करता येईल.

साहित्यः

वेगवेगळ्या रंगाचे ओरिगामी कागद पाच, एक मोठा लांब कागद, आणि नोंद करायला वही , पेन्सिल

कृती:

सर्वात आधी अशा प्रकारच्या कृतीने उड्या मारणारे बेडुक तयार करुन घ्या. इंटर्नेटवर सर्च केल्यास बर्‍याच कॄती मिळतात, त्यातली हि अगदी सोप्पी वाटते.
http://familyfun.go.com/printables/printable-origami-jumpin-frog-703288/

जर मुल मोठं असेल तर त्यालाच ते बेडुक बनवायला शिकवा , नाहीतर स्वतः करुन द्या. हे बेडुक बोटाने दाबले की पुढे उड्या मारतात.

आता बेडकांवर ए बी सी डी इ अशी किंवा इतर कोणतीहि नावे घाला, आकडे नको.

मग त्या मोठ्या कागदावर समान अंतरावर चार आडव्या रेषा काढा.
रेषांना गुण ठरवा. सुरुवातीला १ ते ४ असे साधेच गुण ठेवा.

आता वहीमधे एक तक्ता करुन पाच उभे कॉलम आखा. त्यांना बेडकांच्या नावाचे हेडींग द्या. आपल्याला प्रत्येक बेडकाचे गुण लिहायचे आहेत.

आता बेडुक मोठ्या कागदाच्या एका बाजुला ठेवुन त्याला मुल बोटाने दाबेल. बेडकाची उडी कोणत्या रेषे पर्यंत पोचते ते बघुन त्या रेषेप्रमाणे गुण लिहा. मुल मोठं असेल तर गुण सुद्धा त्यानेच लिहिले तरी चालतील. नाहीतर तुम्ही लिहा.

अस करत सगळ्या पाचही बेडकांचे पहील्या फेरीमधले गुण लिहा.
अशा अजुन तीन किंवा पाच फेर्‍या करता येतील. त्यांचे गुण तसेच एका खाली एक लिहायचे.

आता मुलांना विचारुन एक एक बेरजा करता येतील एका वेळी केवळ दोन आकड्यांची बेरीज करु द्यायची. हव तर बोटांवर किंवा मण्यांवर मोजायला दिलं तरी चालेल.

कुठला बेडुक जिंकला ते माहिती करुन द्यायला मुलं बेरजा करतील Happy जमत नसल्यास करुन दाखवावे पुढच्या वेळि तरी नक्की जमेल.

सगळ्या बेरजा झाल्या की कुठला आकडा मोठा कुठला लहान यांची तुलना सुद्धा करता येईल.

मोठ्या मुलांसाठी गुणाचे आकडे मोठे घेता येतील. म्हणजे १५, ३०, ४५ असे वगरे. उडी पहिल्या रेषे पर्यंत पोचलीच नाही तर गुण वजा करण्याचा नियम पण करता येईल.

मुलांना तक्ता कसा करायचा ते ही शिकवले जाईल.

अधिक टिपा : अगदी तीन वर्षाच्या मुलांना कदाचित नियम कळणार नाहीत. थोडे मोठे झाले की कळतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users