मनोरंजनाचे घेतले व्रत - २: विजय आनंद उर्फ गोल्डी

Submitted by मंदार-जोशी on 15 November, 2010 - 08:17

मला देव आनंदचे सिनेमे का आवडतात, किंबहुना का आवडायचे, त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे याचाच धाकटा भाऊ विजय आनंद उर्फ गोल्डी याचा त्याच्या अनेक चित्रपटांना लाभलेला परीसस्पर्श.

Goldie_Self1.jpg

विजय आनंदचं मला पहिल्यांदा दर्शन झालं ते त्याच्या सर्वोत्तम म्हणून गणला गेलेल्या 'गाईड' (१९६५) या सिनेमाच्या श्रेयनामावलीत. दूरदर्शनवर पहिल्यांदा पाहीलेल्या या चित्रपटातलं 'तेरे मेरे सपने एक रंग है' हे गाणं का कोण जाणे मनात घर करुन बसलं होतं. पुढे तो सिनेमा अनेकदा पाहिल्यावर त्याच्यातली अनेक सौंदर्यस्थळं उलगडली आणि गोल्डीच्या दिग्दर्शनाबद्दल आदर निर्माण झाला. कल्पक चित्रिकरण करून श्रवणीय असलेली गाणी प्रेक्षणीय बनवण्याची हातोटी काही मोजक्या दिग्दर्शकांना साधली होती त्यातलाच एक म्हणजे गोल्डी.

त्याचं एक वैशिष्ठ्य म्हणजे कमीत कमी गोष्टी वापरून केलेलं चित्रीकरण. देव आनंद, वहीदा, आणि दोन-तीन झाडं या शिवाय होतं काय ह्या गाण्यात? गाण्याची गंभीर प्रकृती आणि देव आनंदला फारसं नाचता वगैरे येत नसणे (अर्थातच त्यामुळे झाडांच्या फांद्यांना लटकणे वगैरे सर्कस कॅन्सल) ह्या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर विजय आनंद पुढे काय आव्हान असेल याची कल्पना येते. दृश्ये बर्‍यापैकी मोठ्या टेक्स मध्ये चित्रित करणं आणि कॅमेरा हलकेच वळवून दुसर्‍या मितीत काय चाललं आहे ते दाखवणं या आपल्या वैशिष्ठ्याचा उपयोग इथेही करून त्याने हे गाणं फक्त तीन मोठ्या टेकस् मध्ये चित्रित झालं होतं.

Goldie1_Guide.jpg

कथा ऐकताच गोल्डीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुरवातीला नाकारली होती, पण अनेक कारणांनी इतर कुणी उपलब्ध न झाल्याने त्यालाच ती स्वीकारावी लागली. आर.के.नारायण यांच्या गाईड या पुस्तकावर आधारित सिनेमा काढणं हाच एक मोठा जुगार होता. नायिकेचे नायकाबरोबर असलेले विवाहबाह्य संबंध आणि बंडखोरपणा हे प्रमुख कारण होतंच, पण त्याचबरोबर नायक असलेल्या राजू गाईड याचं हीरो या संकल्पनेला फटकून असलेला क्वचित आप्पलपोटा वाटू शकेल असा स्वभाव, राजूमुळे आपण आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहोत याची जाणीव न ठेवता एका चुकीमुळे त्याला लाथाडणारी स्वार्थी नायिका रोझी, कथा नक्की कुठे चालली आहे किंवा शेवट काय होणार याच्याविषयी अजिबात अंदाज न येणे, आणि धड ना सुखांत धड ना दु:खांत असलेला शेवट. पण विजय आनंदच्या दिग्दर्शन कौशल्याने हा चित्रपट त्याकाळचा मोठा हिट ठरला. चित्रपटात गावात दुष्काळ पडतो ते दर्शवण्यासाठी दाखवलेली गावातल्या लोकांची दृश्ये आठवली तर याचा अंदाज येईल. नायकाचा विचित्र स्वभाव गृहित धरला तरी त्याच्या वेदना, आक्रोश, शेवटची धडपड काळीज चिरुन जातात. देव आनंदला अभिनय यायचा नाही हे म्हणणार्‍यांनी हा सिनेमा - शक्यता कमी आहे, पण पाहिला नसेलच तर - जरूर पहावा. गोल्डीने दगडातून देव निर्माण केलाय. याचीच परिणिती देवला त्याच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळण्यात झाली (पहिला काला पानी साठी). शिवाय गोल्डीलाही सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शन आणि पटकथेसाठीचे फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले ते वेगळंच.

दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी जसे मध्यमवर्गाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक चित्रपट केले, तसं विजय आनंदने रहस्यपटांमध्ये प्राविण्य मिळवलं होतं. तीसरी मंझील (१९६६) हा १९५७ सालच्या नौ दो ग्यारह यानंतरचा गोल्डीचा पुढचा रहस्यपट. निर्माता नासीर हुसेनशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर देव आनंद या चित्रपटातून बाहेर पडला (बरं झालं, नाहीतर बेभान होऊन देव आनंद ड्रम वाजवतोय की ड्रम देव आनंदला वाजवतायत असा प्रश्न पडला असता). दिग्दर्शकाच्या भूमिकेत गोल्डी मात्र तसाच राहिला. दुर्दैवाने चित्रीकरण सुरू असतानाच देवच्या जागी नायक म्हणून आलेल्या शम्मी कपूरच्या दोन लहान मुलांची आई असलेली आणि जिच्यावर तो प्रचंड जीव टाकत असे अशी त्याची बायको गीता बाली हे जग सोडून गेली. शम्मी कपूरची मानसिक अवस्था लक्षात घेत त्याला सांभाळून घेऊन अशा नाजूक परिस्थितीतही विजय आनंदने हा चित्रपट ठरवलेल्या वेळेत पूर्ण केला. चित्रपटातील पात्रांपेक्षा कॅमेरा हाच प्रमुख निवेदक असला पाहिजे याची जाणीव असलेल्या गोल्डीने सिनेमातील पात्रांच्या बरोबर फिरत असलेल्या कॅमेर्‍याच्या वेगवान हालचाली, तुकड्यातुकड्यात चित्रीत केलेली दृश्ये एकत्र गुंफणे अशा करामतींचा प्रभावी वापर करून हिंदी चित्रपटांच्या इतिहासातल्या उत्तम थरारपटांपैकी एकाला जन्म दिला. संपूर्ण चित्रपटभर संशयाची सुई खून झालेल्या रूपाचा होणारा नवरा रमेश (प्रेम चोप्रा) आणि नर्तिका रुबी (हेलन) यांच्या भोवती फिरवत ठेऊन शेवटी अगदी अनपेक्षित पात्र (प्रेमनाथ) खलनायक म्हणून समोर आणणं या या चित्रपटातल्या रहस्याचा यु.एस.पी. ठरला.

Goldie2_TeesariManzil.JPG

याच क्लुप्त्यांसह नेहमीच काहीतरी हटके देण्याचा प्रयत्न करण्यार्‍या विजय आनंदने त्याच्या पुढच्याच वर्षी ज्वेल थीफ हा आणखी एक जबरदस्त रहस्यपट सिनेरसिकांना सादर केला. रहस्यपटांची एक गोची असते. त्यांना रिपीट व्हॅल्यू नसतो असं म्हणतात. ज्वेल थीफचं वेगळेपण ह्यातच आहे की आज चाळीसहून अधिक वर्षांनीही पुन्हा पुन्हा बघावासा वाटणारा आणि क्षणभरही कंटाळा न येता तितकीच मजा आणणारा हा हिंदीतला एकमेव रहस्यपट असावा. इतर रहस्यपटांमध्ये अतिपरिचयात् अवज्ञा झालेल्या अनेक गोष्टी पटकथेचा अविभाज्य भाग असल्यानं इथे कंटाळवाण्या होत नाहीत. उत्कृष्ठ पटकथा-संवाद लेखक असलेल्या गोल्डीला या सिनेमात दिग्दर्शनाबरोबर याही गोष्टी करायला मिळाल्याने असलेल्या स्वाभाविक स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करत अनेक अनेक नव्या गोष्टी समोर आणल्या. विचार करा, ज्वेल थीफ मध्ये अशोक कुमारच्या ऐवजी प्राण असता, तर त्यातला 'सस्पेन्स' चाणाक्ष प्रेक्षकांच्या लगेच लक्षात आला असता की नाही? किंवा एखाद्या भलत्याच व्यक्तिरेखेला खलनायक म्हणून आणलं असतं तर? सगळ्या सस्पेन्सचा तिथेच चुथडा झाला असता आणि सिनेमा साफ झोपला असता ते वेगळंच.

पण ती भूमिका अशोक कुमारने करणे यात विजय आनंदने अर्धी लढाई जिंकली. आपल्या नेहमीच्या 'इमेज'च्या विरोधात जात खलनायक साकारणार्‍या अशोक कुमारने त्या भूमिकेचं सोनं केलं, इतकं की हिंदी चित्रपटसृष्टी एका उत्कृष्ठ खलनायकाला मुकली असं तो चित्रपट पाहिल्यानंतर वाटू शकतं. खलनायकाच्या माणसांनी बेशुद्ध केल्यावर जमिनीवर पडलेल्या नायक देव आनंदला बघत बघत प्रवेश करणारा अशोक कुमार हे दृश्य म्हणजे खास गोल्डी टच. एक नायक-दोन नायिका किंवा दोन नायक-एक नायिका असलेले प्रेमाचे त्रिकोण या मसाल्याच्या जोरावर असंख्य निर्माते-दिग्दर्शक-नट मंडळींच्या घरातल्या चुली पेटल्या, पण त्याचबरोबर हिंदी चित्रपटातल्या नायकाने अनेक ललनांबरोबर जेम्स बॉंड छाप फ्लर्टींगही करणे ही एरवी धक्कादायक आणि धाडसी वाटणारी गोष्ट ज्वेल थीफमध्ये मात्र त्याकाळी कुणालाही खटकली नाही.

Goldie3_Jewel-Thief-1967.jpgGoldie4_Jewel-Thief-1967.jpg

रहस्यपटात गाणी टाकली की तो प्रेक्षकांच्या मनावरची पकड गमावतो असाही एक समज आहे. पण 'दिल पुकारे आ रे आ रे आ रे' या गाण्यात नायिकेच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसणारा ताण बघितला तर हे गाणं उत्कंठा वाढवायला मदतच करतं हे लक्षात येईल. चित्रपटाच्या शेवटाआधी असलेल्या 'होठों पे ऐसी बात' या गाण्याचं वेगवान चित्रीकरण, नाचणार्‍या वैजयंतीमाला भोवती वेगात गोल फिरणारा कॅमेरा, एका तुकड्यात दिसणारा चेहरा अर्धवट झाकलेला प्रिन्स अमर हे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला नेऊन पोहोचवतात.

'आपली शेजारी राष्ट्रे' हा विषय विजय आनंदला त्याचा भाऊ चेतन आनंद प्रमाणेच प्रिय असावा. याचे संदर्भ त्याच्या काही चित्रपटातल्या संवादांतून आपल्याला पहायला मिळतात. 'तेरे घरके सामने' या सिनेमात नायक आणि नायिका या दोघांच्या वडिलांचं एकमेकांशी हाडवैर असतं. त्यांच्या प्रेमाचं पर्यावसान लग्नात होण्यात (असंख्य हिंदी शिणूमांप्रमाणे इथेही) हीच अडचण असते. पण ही समस्या सामोपचाराने सोडवली पाहीजे हे समजावताना गोल्डीचा नायक नायिकेला नेहरूप्रणित पंचशील तत्वांची आठवण करून देतो.

प्रख्यात दिग्दर्शक आणि हृषिकेश मुखर्जी यांच्यावरच्या माझ्या लेखात मी विजय आनंदचा उल्लेख केला होता तो गाण्यांच्या सुंदर चित्रिकरणासंदर्भात. तसं बघायला गेलं तर या दोघांच्या सिनेमांत खरं तर काही फारसं साम्य नाही, पण दोन गोष्टींचा उल्लेख करावाच लागेल. एक हे की त्यांच्या चित्रपटांतील गाणी नुसती ऐकत असलो तरी डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहतात. आणि दुसरं हे की गाणी कुठेही 'घुसवली आहेत' असं वाटत नाही. सहज आधीची दृष्ये किंवा संवाद यांच्या माध्यमातून चित्रपट आपल्याला लीलया गाण्यात घेऊन जातो.

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी (१९५४) देव आनंदच्या टॅक्सी ड्रायव्हरसाठी पटकथा लिहून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार्‍या विजय आनंदने दिग्दिर्शित केलेला पहिला चित्रपट हा नौ दो ग्यारह. देव आनंद आणि कल्पना कार्तिकच्या भूमिका असलेल्या या रहस्यपटानंतर त्याने काला बाझार (१९६०) मध्ये नोकरी मिळवण्यात आणि मिळालेली टिकवण्यात अपयशी ठरलेल्या, आणि मग वाममार्गाला लागलेल्या तरूणाची कथा सादर केली. यात त्याने एक छोटीशी पाहुण्या कलाकाराची भूमिकाही केली होती (नायिकेचा भूतपूर्व प्रियकर). या चित्रपटात एका गाण्याच्या आधी एक अप्रतीम दृश्य आहे. नायक देव आनंद वाममार्गाने भरपूर पैसे कमावतो आणि एके दिवशी आई-बहिणीसाठी कपडे आणि दागिने घेउन घरी येतो. जिना चढताना त्याला ठेच लागते, सगळे दागिने वगैरे वस्तू इतस्ततः पडतात आणि त्याच वेळी सुरु झालेल्या भजनातल्या 'ना मै धन चाहूं, ना रतन चाहूं' या शब्दांनी सदसदविवेकबुद्धी जागृत असलेला नायक एकदम चपापतो.

तेरे घर के सामने या सिनेमातलं तेच शब्द असणारं गाणं आठवा. या गाण्याच्या आधी नायक म्हणतो, "...लेकिन एक बात कहे देता हूं. चाहे आसमान टूट पडे, चाहे धरती फूट जाए, चाहे हस्तीही क्यों न मिट जाए, फिरभी मैं......" असं म्हणून थोडासा थांबल्यावर नायिका नुतन म्हणते "फिरभी मै?" आणि मग "तेरे घर के सामने...." म्हणत गाणं सुरु होतं. दारूच्या ग्लासात नुतन असल्याची कल्पना करून देव आनंद पडद्यावर हे गाणं म्हणतो. कळस म्हणजे जेव्हा बिअरच्या ग्लासात बर्फ टाकला जातो तेव्हा ग्लासातल्या नुतनचं शहारून देवला विनंती करणं आणि मग देवने चिमट्यानं तो बर्फाचा तुकडा ग्लासातून काढून टाकत तिची 'सुटका' करणं......अहाहा! निव्वळ अप्रतीम!! त्याच चित्रपटातलं 'दिल का भंवर करे पुकार' च्या आधी नायक नायिका कुतुबमिनार चढत असताना काय वातावरणनिर्मिती होते ते आठवून बघा.

Goldie6_TereGharKeSamne.JPG

काला बाझार चित्रपटातल्या एका गाण्याची तर बातच न्यारी. यात देव आनंदच्या वरच्या बर्थ वर असलेल्या नायिका वहीदाला उद्देशून तो 'उपरवाला जान कर अंजान है' असं म्हणतो, पण समोर बसलेल्या तिच्या आई-बाबांचं लक्ष जाताच 'उपरवाला म्हणजे देव' या अर्थाची खूण करून सारवासरव करतो ते लाजवाब!

Goldie5_KalaBazar.jpg

जॉनी मेरा नाम चित्रपटातलं "पल भर के लिये कोई हमें प्यार कर ले" या गाण्यात तरी काय होतं? नायक, नायिका, आणि एक छोटसं घर. पण गोल्डीने घराच्या असंख्य खिडक्यांचा धमाल वापर करून हे गाणं अजरामर केलं. हे गाणं ऐकलं की आजही डोळ्यांसमोर येतं ते ते त्यातलं वेगवेगळ्या आकाराच्या असंख्य खिडक्यांचं बंगलेवजा घर आणि त्यातून आत येण्याचा प्रयत्न करत देव आनंदचा हेमा मालिनीला पटवण्याचा प्रयत्न.

अशी असंख्य गाणी आहेत, पण एक शेवटचं उदाहरणं देऊन हे गाणं चित्रिकरण पुराण थांबवतो. ब्लॅकमेल चित्रपटातलं किशोर कुमारने गायलेलं सुप्रसिद्ध 'पल पल दिल के पास' हे गाणं सगळ्यांना माहित असेलच. नाही, मी त्याबद्दल बोलणार नाही बरं! मी सांगणार आहे त्या चित्रपटातल्या शेवटच्या गाण्याबद्दल. चित्रपट बघण्याआधी मी फक्त 'पल पल...' हेच गाणं ऐकलं/पाहिलं होतं. डि.व्ही.डी. आणल्यावर चित्रपटातली गाणी वारंवार बघितली. चारी बाजूंनी आग लागलेली असताना जीव वाचवण्यासाठी लाकडांच्या ओंडक्यांखाली गवतात लपून बसलेले नायक-नायिका आणि बाहेर हत्यारबंद व्हिलनमंडळी - या पार्श्वभूमीवर 'मिले, मिले दो बदन' हे गाणं टाकण्याच्या गोल्डीच्या आयडीयाच्या कल्पनेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. दुर्दैवाने संगीत गाजलं असलं तरी हा चित्रपट आपटला. कदाचित अगदीच बालीश कल्पनांवर आधारित असल्यानं असेल (तिरसट वैज्ञानिक, त्याचा सौर ऊर्जेविषयक संशोधन आणि शोध, वगैरे).

'कहीं और चल' हा चित्रपट दिग्दर्शित केल्यावर फायनॅन्सरकडून फसवणूक वाट्याला आलेल्या गोल्डीने नायक म्हणून कारकीर्द उताराला लागलेल्या देव आनंदला 'जॉनी मेरा नाम' मार्गे यश मिळवून दिलं. दुर्दैवाने या नंतर तूलनेने माफक यशस्वी ठरलेले 'तेरे मेरे सपने' आणि 'राम-बलराम' वगळता यशाने त्याच्याकडे नेहमी पाठच फिरवली.

'तेरे मेरे सपने' बरोबरच त्याने अनेक चित्रपटात नायकाची भूमिकाही केली, पण त्यातले 'मै तुलसी तेरे आंगन की' आणि कोरा कागज' हे दोनच उल्लेखनीय म्हणावे लागतील. दुर्दैवं असं, की त्यातही त्याच्याबरोबर असलेल्या अभिनेत्री - अनुक्रमे नूतन-आशा पारेख आणि जया भादुरी - भाव खाऊन गेल्याने तो या दोन सिनेमातही अभिनेता म्हणून दुर्लक्षितच राहिला. कालांतराने त्याने 'तहकीकात' या दूरदर्शन मालिकेत डिटेक्टिव्ह सॅमच्या रूपात आपल्यातल्या अभिनयाची पुन्हा एकदा चुणूक दाखवली.

Goldie8_KoraKagazMainTulsi.jpgGoldie9_Tehequikaat.jpg

एव्हाना 'गाईड'मध्ये गोल्डीने ज्याला दगडाचा देव करून शेंदूर फासला त्या देव आनंदने चक्र उलटं फिरवून देवाचा दगड आणि मग दगडाची खडी करून त्यावर एव्हाना डांबरही फासला होता. आपल्याला दिग्दर्शन येतं या समजातून त्याने स्वतः ते करायला सुरुवात केली. प्रसिद्ध पत्रकार शिरीष कणेकर यांनी त्याला एकदा देव आनंदला 'गोल्डीला तो त्याचे चित्रपट दिग्दर्शित करायला का सांगत नाही' असं विचारलं असता त्याने "गोल्डी तो मोटा हो गया है" आणि "गोल्डी डायरेक्ट करेगा तो फिर मैं क्या करुंगा?" अशी दोन अचाट आणि अतर्क्य उत्तरं दिली. तेव्हा त्यांच्यातलं गोल्डी दिग्दर्शन करणार आणि देव अभिनय हे नातंही संपुष्टात आलं होतं.

चित्रपट्सृष्टीतील अनेक कलावंतांप्रमाणे विजय आनंदही काही काळ सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष होता. पण त्याने केलेल्या अनेक सूचना आणि नाविन्यपूर्ण कल्पना धुडकावल्या गेल्यावर गोल्डीने बाणेदारपणा दाखवत पदाचा राजीनामा दिला.

विजय आनंदने हिंदी चित्रपटसृष्टीला काय दिलं ह्याचं उत्तर सोप्प आहे. एक किस्सा सांगतो. अमर-अकबर-अँथनी मधली रक्तदान वगैरे दृश्यांचा संदर्भ देऊन एकाने मनमोहन देसाईंना "तुम्ही असले आचरट सिनेमे का बनवता?" असं विचारलं असता त्यांनी "हिंदी चित्रपट पाहणार्‍या प्रेक्षकाचं सरासरी मानसिक वय तेरा आहे असं आम्ही मानतो" असं उत्तर दिलं होतं. कुठल्या आधारावर त्यांनी हे विधान केलं होतं बाप्पा जाणे, पण ते खरं असेल तर ते तेरापर्यंत खेचून आणण्याचं श्रेय गोल्डीला निर्विवादपणे द्यावं लागेल.

अशा या गुणी दिग्दर्शकाला २३ फेब्रुवारी २००४ रोजी वयाच्या सत्तराव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने या जगाचा निरोप घ्यायला लावला. असं म्हणतात की देव आनंद आपल्या सबंध आयुष्यात फक्त दोनदा रडला. पहिल्यांदा त्याची आई गेली तेव्हा आणि दुसर्‍यांदा विजय आनंद गेला तेव्हा.

"हा चित्रपट पुन्हा बनवायचा झाला तर नायकाच्या भूमिकेसाठी सद्ध्याच्या अभिनेत्यांपैकी तुम्हाला कोण योग्य वाटतो?" रेडिओ मिर्ची पुरस्कृत पुरानी जीन्स फिल्म महोत्सवात (२०१०) 'तीसरी मंझील' च्या प्रदर्शनाच्या वेळी शम्मी कपूरला एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला. "मला नाही वाटत हा चित्रपट पुन्हा कुणी बनवू शकेल" प्रचंड आत्मविश्वासाने क्षणाचाही विलंब न लावता शम्मी ताडकन् उत्तरला. २००७ साली आलेल्या जॉनी गद्दार चित्रपटात एक पात्र 'जॉनी मेरा नाम' हा सिनेमा बघत असल्याचे दृश्य आहे. विजय आनंदला वाहिलेली ही श्रद्धांजली होती.

Goldie_Self2.jpg

ज्याचे चित्रपट आजही निर्माते-दिग्दर्शक-पटकथा लेखक यांना स्फूर्तीस्थान ठरतात पण क्वचितच त्याच्या एवढी उंची गाठू शकतात अशा या ओजस्वी कलावंताला माझा सलाम!

Goldie_MoviePosters.jpg

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भ: ज्वेल थीफ, तीसरी मंझील, ब्लॅकमेलच्या व्ही.सी.डी. आणि डी.व्ही.डी., माझे चित्रपट प्रेम, तसंच आंतरजालावरील अनेक.
सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
पहिला लेख: मनोरंजनाचे घेतले व्रत - १: ऋषिकेश मुखर्जी
तिसरा लेखः मनोरंजनाचे घेतले व्रत - ३: अशोक कुमार उर्फ दादामुनी

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित.

गुलमोहर: 

छान लेख. सर्व चित्रपट अजून लक्षात आहेत/
एक बक्षीस देऊ ? देवानंदचा नाच बघायचाय ? तोही पद्मिनी आणि रागिणी या दोन नृत्यबिजल्यांसोबत !!
इथे आहे ... (किस बाई किस ..)

http://www.youtube.com/watch?v=tADwEajGW-c&NR=1

मस्त लिहून राहीलायस रे...
वाह मजा आली हे सगळे वाचून....
इतक्या सहज ओघवत्या भाषेत सांगितल्यामुळे आता हे रेफरन्स छान लक्षात राहतील...
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
आणि हो पुन्हा एकदा गाईड आणि तेरे घर के सामने बघण्याची इच्छा बळावलीये...

मंदार्..खूप सुरेख लिहितोयस ही मालिका..
गोल्डी ला कोण विसरू शकणार.. गाईड तर आमचं बायबल आहे.. आठवड्यातून एकदा पाहिलाच पाहिजे.. Happy
तू वर लिहिलेले सर्व सिनेमांची डीवीडीज आहेत आमच्या कलेक्शन मधे.. तुलसी सोडून Happy
आता या मालिकेतील तिसरा लेख कोणावर लिहिणारेस्.ही उत्सुकता लागून राहिलीये

छान लेख!! फक्त
>>सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष असताना केलेल्या अनेक सूचना आणि नाविन्यपूर्ण कल्पना धुडकावल्या गेल्यावर गोल्डीने बाणेदारपणा दाखवत पदाचा राजीनामा दिला.
हा पॅरा मधेच घुसडल्या सारखा वाटतो!!! त्याला थोडा आगापिछा देउ शकलात तर बरं होईल!!

मंदार खरचं खुपच सुंदर लिहले आहे .गाईड हा सिनेमा मी दोन्,तिन वेळा बघितला पण फक्त त्यामधील गाण्यासाठी.
पण इतकी बारकाई सिनेमा मध्ये बघणं मला हे कधीच जमणार नाही. विजय आनंद बद्द्ल म्हणशील तर त्याचा एक्च सिनेमा मी बघितला तो म्हणजे मै तुलसी तेरे आंगण की. त्याच्या दिग्दर्शना बद्द्ल काहीही माहित नव्ह्ते.
या लेखामुळे कळले. हॅट्स ऑफ यु............................मंदार

नक्की कुठे ते आठवत नाही, पण मी असं एके ठिकाणि वाचलं होतं की ज्वेल थीफच्या वेळी वैजयंतीमालाने खूप नखरे केले होते. होठों पे ऐसी बात च्या वेळेस गोल्डीचा संयम सुटला आणि त्याने सरळ तिला काढून टाकून दुसर्‍या अभिनेत्रीला घेऊन सिनेमा पुन्हा शूट करण्याची धमकी दिली होती. हे खरं असेल तर त्याच्या हिमतीला दाद द्यायला हवी.

सुंदर लेख.. गोल्डीचे सिनेमे वेगळेच आहेत....
जॉनी गद्दार'च्या अर्पणपत्रिकेतच विजय आनंदचा उल्लेख आहे.>>>
हो, डायरेक्टर खुप मोठा फॅन आहे गोल्डीचा.. अन जॉनी नाव पण मुद्दाम घेतल त्याने या फिल्म ला(जॉनी मेरा नाम मधलं ).. अस वाचलं होतं..
पुढच्या लेखाची वाट पहातेय Happy

गोल्डी माझा पण आवडता फील्ममेकर होता. त्याच्या आठवणींना उजाळा दिल्यासाठी धन्यवाद.

मंदार,
चांगली माहीती मिळाली ..
मी तर विजय आनंद यांना 'तहकीकात' या दूरदर्शन मालिकेत डिटेक्टिव्ह सॅमच्या रूपात प्रथम पाहिलं
ती मालिका मी खुप आवडीने पहायचो .
Happy

हाही लेख आवडला मंदार.

>>शम्मी कपूरच्या दोन लहान मुलांची आई असलेली आणि जिच्यावर तो प्रचंड जीव टाकत असे अशी त्याची बायको गीता बाली हे जग सोडून गेली

मला वाटतं गीता बालीच्या शेवटच्या दिवसांत शम्मी कपूरचे आणि तिचे संबंध पूर्वीसारखे उरले नव्हते. त्याचं तिच्याकडे बरंचसं दुर्लक्ष झालं होतं. ती गेली तेव्हाही तो तिच्याजवळ नव्हता. हे मला कुठेतरी वाचल्याचं आठवतंय. बहुतेक "एक होता गोल्डी" मध्ये असेल.

सर्वांना धन्यवाद Happy

आणखी एक गोष्ट. गाईडच्या एका विशिष्ठ भागासाठी (उत्तरार्ध) गोल्डीने देवला (त्याची इच्छा नसतानाही) केसांचा कोंबडा काढायला लावला होत असंही वाचल्याचं स्मरतंय. नक्की कुठे ते आठवत नाहीये. 'एक होता गोल्डी' वाचलं नसल्याने खात्री करता येत नाही (त्यात आहे का ते?).

मंदार, लेख छान आहे !
......<<मी तर विजय आनंद यांना 'तहकीकात' या दूरदर्शन मालिकेत डिटेक्टिव्ह सॅमच्या रूपात प्रथम पाहिलं
ती मालिका मी खुप आवडीने पहायचो>>...........मी सुद्धा !
तू सांगितलेले सगळे चित्रपट पाहूनही बराच काळ लोटला. गाणी मात्र खूप आवडतात......लेख वाचून आता पुन्हा चित्रपट पहावेसे वाटायला लागलंय !:)

छान! Happy
आगाऊ च्या लेखाचीही आठवण झाली Happy

एकच सुचना/विनंती!
मधे एकदोन पिक्चरच्या शेवटाबद्दल माहिती आहे.. म्हणजे शेवटपर्यंत कळत नाही की हा विलन असतो!
जमल्यास ते काढा... मी ते बघितलेले नाहीत Uhoh तरीही बघीन गोल्डी साहेबांसाठी Wink

आजच तेरे घर के सामने बघितला. झकाअस! Happy धन्यवाद सांगितल्याबद्दल!
आणि लगेच एक करेक्शन!
>>कळस म्हणजे जेव्हा बिअरच्या ग्लासात बर्फ टाकला जातो तेव्हा ग्लासातल्या नुतनचं शहारून देवला विनंती करणं आणि मग देवने चिमट्यानं तो बर्फाचा तुकडा ग्लासातून काढून टाकत तिची 'सुटका' करणं...>>
ती बिअर नाही! बाकी काहीही असेल, पण बिअर नक्कीच नाही Proud

एकच सुचना/विनंती!
मधे एकदोन पिक्चरच्या शेवटाबद्दल माहिती आहे.. म्हणजे शेवटपर्यंत कळत नाही की हा विलन असतो!
जमल्यास ते काढा...
-----------------------------
अनुमोदन.. बाकी लेख उत्तम आहे.

मनस्मी, ऋयाम....
तुमचं पटतंय, तुम्हाला निराश करताना वाईट वाटतंय पण आता ते शेवटाबद्दलचे उल्लेख काढणं शक्य नाही हो.
एक सांगतो; समजा तुम्ही हा लेख वाचलाच नाहीये, तर पॉईंट्स मध्ये मोजायचं झालं तर तुम्हाला १०० एवढी मजा येईल. समजा तुम्ही हा लेख वाचून ते चित्रपट पाहिलेत, तर तुम्हाला ९९ एवढी मजा येईल. तेव्हा चलता है Happy

ऋयाम, मला मद्य या विषयाबद्दल फार माहिती नाही, पण ती बिअर आहे असं दोन संदर्भात आढळलं (आणि दारू लिहिणं प्रशस्त वाटलं नाही Wink ) म्हणून तसं लिहिलं.

छान लेख. पहिला लेख पण आवड्ला होता. गाइड माझा फेवरिट. रोझी व राजू यांच्यातले नाते तर अप्रतिम रंगविले आहे. समोरच्या जिवंत बायकोस नाकारून मुर्तींमध्ये रमणार्‍या मार्कोची व्यक्तिरेखा पण जबरदस्त आहेत गाणी तर विचारायलाच नको. मैं तुलसी तेरे आंगन की नावाच्या अगम्य सिनेमात गोल्डी होता ना?

रच्याकने ती बीअर नक्कीच नाही तो सोडा आहे. स्पार्कलिंग वाइन पण नाही. सोडयातले बुड्बुडे तसे येतात. Happy

सुंदर लेख!!!

रोझी व राजू यांच्यातले नाते तर अप्रतिम रंगविले आहे. समोरच्या जिवंत बायकोस नाकारून मुर्तींमध्ये रमणार्‍या मार्कोची व्यक्तिरेखा पण जबरदस्त आहेत गाणी तर विचारायलाच नको.>>>मामींना अनुमोदन Happy

ग्लासातल्या नुतनचं शहारून देवला विनंती करणं आणि मग देवने चिमट्यानं तो बर्फाचा तुकडा ग्लासातून काढून टाकत तिची 'सुटका' करणं......अहाहा! निव्वळ अप्रतीम!! >>>>>>>>>>>>>अगदी अगदी! मंदार नेहेमीप्रमाणेच मस्त!

धन्स मानुषी, या लेखाच्या निमित्ताने यु-ट्युबवर पुन्हा पुन्हा ते गाणं बघितलं आणि प्रत्येक वेळी तितकंच आवडलं Happy
मामींनाही अनुमोदन.

फार सुंदर लिहीलंयस मंदार... अगदी ओघवतं...... ज्वेल थीफ आणि गाईड माझे फार आवडते चित्रपट आहेत............ तहकीकात पाहून हाच तो व्यासंगी गोल्डी हे पटायचंच नाही इतकी बालीश रहस्ये असायची............... त्याच्या मोस्ट पिक्चर्सच्या डीव्हीडीज आहेत माझ्याकडे,

Pages