टिपुआना टिपु आणि वावळा

Submitted by दिनेश. on 12 November, 2010 - 04:33

From Tipu

एखादे झाड ओळखता आले नाही, कि मला उगाचच बैचैन व्हायला होते. भारतात होतो, तोवर ठिक होते.
मोजकी असली तरी पुस्तके हाताशी होती, त्यातही मोजके फोटो होते. निदान नाव तरी कळायचेच.

पण हि अक्कल मला फार उशीरा आली. ज्या झाडांचा सहवास अनेक वर्षे लाभला, त्यांच्या ओळखीबाबत
संभ्रम का व्हावा ते कळत नाही ?

फार पुर्वी शीव म्हणजेच सायन हि मुंबईची हद्द होती. त्याच्या उत्तरेला अगदी तूरळक वस्ती होती.
ट्राम सर्व्हीस मात्र किंग्ज सर्कल पर्यंतच होती. (नाही मी तेवढा म्हातारा नाही, ट्राम बघितल्याचे
मला आठवत नाही.) त्यामूळे तिथे एखादी विश्रामाची जागा असावी आनि तिथे खास सावलीसाठी झाडे असावीत हे ओघाने आलेच.

पण किंग्ज सर्कलचा परिसर मात्र माझ्या नित्य परिचयाचा. पोद्दार कॉलेजमधे असताना, संध्याकाळी
कॉलेज सूटले, कि रुईयाच्या स्टॉपवरुन बस पकडणे अशक्य असायचे. त्यावेळी किंग्ज सर्कलहून ३५१
नंबरची खास बस सूटायची. ती पकडण्यासाठी मी तिथपर्यंत चालत जायचो.

त्यावेळी फ़्लायओव्हर नव्हता. पण तिथे असणार्‍या दोन प्रचंड मोठ्या झाडांखाली बसची वाट बघत
मी उभा असायचो. तिथून लक्ष मात्र असायचे समोरच्या अरोरा थिएटरकडे. तिथे त्यावेळी इंग्रजी आणि
दाक्षिणात्य चित्रपट लागायचे. असे निदान दोन वर्षे तरी मी नक्कीच केले. पण त्या दोन झाडांकडे
निरखून बघायचे मात्र सूचले नाही.

मला आठवतय तो फ्लायवोव्हर त्याच दरम्यान सुरु झाला. आणि तिथून ती दोन झाडे, नेहमीच
नजरेच्या टप्प्यात यायची. ती कायम हिरवीगार असत, असे आठवतेय. पण त्यांना कधी बहर
वा फ़ूले आलेली आठवत नाहीत. कधी फळे, शेंगा लागल्याचे आठवत नाहीत.

एरवी झाडांच्या खाली पडलेला सडा, वर बघायला भाग पाडतो. पोद्दार समोरचे पर्जन्यवृक्ष, रस्त्यावर
चिकट शेंगांचा सडा घालतात. (तो इतका चिकट असतो कि त्याने तो रस्त्या ओबडधोबड होतो.)
राजा शिवाजी विद्यालयाच्या मागच्या जंगली बदामाखाली, त्याची जठराच्या आकाराची फळे,
बहराच्या दिवसात लाल हिरवी फूले असणारच. आणि हे नसले, तर त्याचा उग्र वास असतोच.
पण किंग्ज सर्कलच्या या दोन झाडांनी मात्र कधी अशी ओळख दाखवली नाही.

इतकेच काय पानगळ होऊन, झाडाखाली पाने पडल्याचे पण आठवत नाही. त्या वाहत्या
रस्त्यावर पाचोळा टिकेल, याची शक्यता नाही, पण फूटपाथच्या बाजूला पण कधी तो दिसला
नाही. दादरला वरचेवर जाणे होते माझे, आणि प्रत्येकवेळी या दोन झाडांकडे नजर जातच असे.
पण खरेच कधी या झाडाला फ़ूले आलेली बघितली नाही.

पण आपण जसे परिचयातल्या मुलामुलींच्या जोड्या मनातल्या मनात जोडून टाकतो, तसे
या झाडाला, हळदीच्या रंगाची फ़ूले यावीत, असे मी ठरवून टाकले होते.

मग आफ़्रिकेत आल्यावर मी हे झाड बघितले. याचे नाव टिपुआना टिपु. सुंदर हिरवागार
रंग आणि अवाढव्य पसारा. सहज संभर फ़ूटांची उंची आणि साठेक फ़ूटांचा घेर.
का कुणास ठाऊक मला या झाडांना बघून त्या झाडांचीच आठवण येते.
मला आठवतय डॉ. डहाणूकरांनी त्यांचे नाव वावळा असे लिहिले होते. पण त्यांनाही
त्याबद्दल खात्री नव्हती.

आणि मग माझ्या मनाने एक खेळ सुरु केला. मला कधी कधी त्या मुंबईतील
झाडांवर पिवळी फूले बघितल्याचा भास होतो. या टिपुला मात्र अगदी सुरवातीला मोजकीच
फ़ूले आली. मग मी मुद्दाम त्याच्या जवळ जाऊन, फुलोरा निरखत असे. नेहमीच्या
पिवळ्या रंगापेक्षा थोडी वेगळी छटा. आंबेहळदीच्या रंगाकडे झुकणारी.
आणि फुलांचा आकार तरी किती वेगळा. झाडाखाली कायम सडा.

जसा इथला वसंत रंगू लागला, तशी याच्या फूलांची संख्याही. शिवाय पानगळ
झालीच नव्हती. हा हिरवापिवळा डोलारा, महिनाभर तरी असाच तजेलदार आहे.
याची गंमत अजून संपली नाही. फूलांनंतर येणार्‍या शेंगा या अश्याच खास.
शेंगा तरी कसे म्हणायचे, हि तर विमानेच. (या विमानांचा देठ अगदी नाजूक, हलक्याशा झुळुकिने सहज तूटणारा.)

एक वाटाण्याएवढी बी आणि तिला एकच पंख. पण हे डिझाईन इतके परफ़ेक्ट आहे
कि झाडावरुन सुटायचा अवकाश, लगेच गिरक्या घेत, हे विमान उडायला लागते.
झाडावर गतसालच्या शेंगा अजून आहेत. आणि वार्‍याची नेमकी झुळुक आली, कि ग्राऊंड क्लीयरन्स
मिळाल्यासारखी हि विमान उडायला लागतात. मग मी ती गोळा करुन आणतो, आणि
घराच्या गच्चीवरुन उडवत राहतो.

http://picasaweb.google.com/lh/photo/jhzQGKA3OokhitEjrwnN6abWWBwIRwu-Lq7...

माझ्या शेजारणीने सांगितले कि या झाडाचा तसा उपद्रवच असतो. झाडाखाली फूलांचा आणि
शेंगांचा कचरा पडलेला असतो. रोजच्या रोज झाडून काढला, तरी तो कंमी होत नाही. शिवाय
झाडाचा विस्तार एवढा, कि झाडत झाडत दुसऱ्या बाजूला गेले, कि परत पहिल्या ठिकाणी
नवा कचरा.
हि बियांची विमाने सर्वदूर पोहोचतात आणि लगेच रुजतात. त्यामूळे सगळीकडे यांचीच गर्दी.
पण या झाडाची सावली मात्र थंडगार असते, असे ती म्हणाली.
याचे काहि औषधी उपयोग नाहीत असेहि ती म्हणाली.

नेटवर शोधल्यावर हा टिपु मूळ दक्षिण अमेरिकेतील असे कळले. पण त्याचे नेटवर जे
प्रकाशचित्र उपलब्ध आहे ते अगदीच विरळ पर्णसंभाराचे आहे. यालाच प्राईड ऑफ़ बोलीव्हिया
असेही म्हणतात. कुठल्याही हवामानात हे झाड तग धरू शकते. आणि त्या त्या हवामानाप्रमाणे
त्याच्या पानांचा आकार, संख्या आणि फूलांची संख्याही बदलते.

आता परत आपल्या वावळ्याकडे वळू या. वावळा म्हणजे, Holoptelea integrifolia. त्यालाचा
भारतीय एल्म असेही म्हणतात. त्याचा फूलोरा तसा अनाकर्षकच असतो. फ़ळे मात्र, चपटी
गोलाकार असतात. मधे थोडी फ़ुगीर असतात.

हा बराच काळ भारतात असावा.त्याची साल सांधेदुखीवर वापरतात. बियांचा वापर पोटातील
जंतांचा नाश करण्यासाठी वापरतात. मधुमेह, सूज, त्वचारोग, मुळव्याध आदी अनेक आजारात
त्याचा उपयोग करतात.

पण अजून मला खात्री नाही, कि ती दोन झाडे वावळ्याचीच आहेत कि टिपूची ? आता पुढच्या
भारतभेटीत गाठभेट घेऊन, विचारपूस करायलाच हवी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दिनेशदा तुम्ही दाखवलेली फुलं आणि बिया क्वचित बघितल्याचे आठवते.
डॉ. कैलास गायकवाड यांनी दाखवलेली झाड वेगळि आहेत ना. या झाडाच्या बिया उन्हाळ्यात सगळीकडे उडतात. आम्ही त्या सोलुन आतला नखापेक्षा छोटा चपटा गर खायचो Happy अजुनही मिळाला की मी खाते.

कैलास यांनी टाकलेल्या फोटोत ज्या बिया आहेत त्यांना लहानपणी आम्ही "कावळ्याच्या भाकरी" म्हणायचो. Uhoh
बाकी त्यातल्या बिया मस्त लागतात.. Happy

वावळ्याची २ झाडे माझ्या घरामागेच आहेत. अर्थात हे फोटो आंतरजालावरचे आहेत. Happy
वावळ्या आम्ही आवडीने खातो. Happy

डॉक्टर तूम्ही दाखवलेत ते झाड, राणीच्या बागेत पण आहे, असे आठवले आता. पण तशा भरपूर शेंगा त्या झाडांना लागलेल्या आठवत नाहीत.
सावली, (या शिष्याच्या डोक्यात हे आत्ता शिरलं बरं का !) या टिपुच्या बिया वार्‍याने खुप दूरवर जातात.
आणि मजा म्हणजे, जरा चांगली ओलसर माती मिळाली, कि तो पंख नष्ट होतो, म्हणजे बी ने आणखी दुसरीकडे उडत जायला नको म्हणून.
चिंगी, कावळ्याच्या भाकरी मस्त शब्द. आणि त्या बिया लहान मूलांनी अवश्य खाव्यात !!

वावळा बघितलाय. अंगभर पोपटी रंगाच्या पापड्या मिरवतो.
पण हे आंबेह्ळदी फुलांचं झाड मात्र ओळखीचं नाहीये.

मी अजुन नाही पाहिलंय वावळ्याचे झाड (किंवा पाहिलं असेल पण आता आठवत नाही :().
बाकी टिपुचे झाड गुलमोहर प्रवर्गातील का? त्याच्या कळ्या गुलमोहरासारख्या (निदान फोटोत तरी) दिसत आहेत. सुरुवातीला मला बहाव्यासारखा फोटो वाटला. Happy
डॉक, दोन्ही फोटो मस्त Happy

छान माहिती दिनेशदा....

टिपूचे झाड पाहिल्याचं आठवत नाही. पण वावळ्याची झाडं पाहिली आहेत. आमच्या जुन्या घराजवळ होतं एक झाड (अजूनही आहे!) त्याच्या बिया खायचो आम्ही. त्याला ''बदाम'' म्हणायचो. जवळपासच्या झोपड्या, वस्तीतील मुलंही ते बदाम आवडीनं खायची.

योगेश, गुलमोहोराच्या कूळातील काही झाडे आहेत आपल्याकडे (तूर्‍यात येणारी फूले, भाल्यासारख्या शेंगा ) उदा. वारस.
पण हे झाड त्या कूळतले नाही. याच्या शेंगा वार्‍यावर उडत जातात.
अकु, लहान मुलांना बरोबर कळते काय खायचे आणि काय नाही ते.

या वरून आठवले. गेल्या वर्षी उन्हाळा संपायला आला होता तेव्हा लोकसत्ता मध्ये एक बातमी आली होती. वर दिलेल्या परिसरात एक वृक्ष आहे. त्याचे मूळ ठिकाण अंदमान आहे. पुर्ण मुंबईत त्या प्रकारचे एकच झाड आहे. त्या झाडाला पालवी की फुलं आली की समजावं पाऊस आठ दिवसात सुरू होईल. तर त्या झाडाला पालवी/ फुलं आल्याची ती बातमी होती. मला वृक्षाचे नाव आठवत नाही. पण तो खुप प्रचंड आहे असे लिहिले होते.

मी अजुन नाही पाहिलंय वावळ्याचे झाड

हे झाड अजुन ज्यांनी पाहिले नाही त्यांनी एकतर माझ्ह्या ऑफिसात यावे किंवा बेलापुर स्टेशनला जावे. नेरुळची गाडी बेलापुरात जिथुन शिरते त्या तिथे प्लॅटफॉर्मच्या अगदी जवळ मोठा वृक्ष आहे याचा.

दिनेश, ती दोन झाडे मी पण नेहमी पाहते. मलाही ती आवडतात पण कधीच ओळखु आली नाहीत. तिथे जवळच मेक्सिकन सिल्वर लिफचे झाड आहे असे कलबागांनी सांगितलेले. पण तेही झाड मला कधी दिसले नाही.

वरचा पहिला फोटो पाहुन मला एका दुस-या पिवळ्या फुलांच्या झाडाची आठवण आली. मला नाव माहित नाही पण मुंबईत शोभेचे म्हणुन सर्वत्र लावतात. (जंगली नाहीये हे झाड). हे झाड साधारण ७-८ फुट वाढते, शंकुच्या आकाराची फुलांचा मोठ्ठा घोस लागतो टोकांना. पाने लांबट, कातरलेली, कडुनिंबासारखी पण फिकट पोपटी असतात. आताशा बहर सुरू झालाय याचा. पुर्ण बहरात इतकी फुले येतात की पुर्ण झाड पिवळे आणि त्याच्याखाली मधुन मधुन पोपटी पाने असे मस्त रंगते ते झाड....

(रच्याकने, आता पानगळ आणि मग नंतर बहर येईल. कॅमेरा खिशात ठेऊनच बाहेर पडायला पाहिजे घरातुन Happy )

साधना, फुलांचे वर्णन बहाव्याचे तर पानांचे वर्णन टिकोमा चे वाटतेय. आता फोटो हवाच.
आणि त्या किंग्ज सर्कलच्या झाडांना कधी फूले आलेली दिसली, तरी त्याचा फोटो (निदान बातमी तरी हवीच.)
बेलापूर स्टेशनच्या बाहेर, बहाव्याचे पण झाड आहे.
आता मुंबईत ऋतू बदलले आहेत, बहर कधी येईल, सांगता येत नाही.
चैत्रपालवी, वैशाखवणवा, श्रावणसरी, माघमास थंडी, आखाडसासरा या शब्दांचे अर्थ / संदर्भ नकोत बदलायला.

बहावा मी ओळखते, माझ्या आवडत्या झाडांपैकी एक आहे तो. पण बेलापुर स्टेशनबाहेरचा मात्र मी पाहिला नाही अजुन. मला बहावा बहरात आला कीच ओळखता येतो Happy ..

मी जे म्हणतेय ते बहावा नाही. खिशात कॅमेरा घेऊन फिरते आणि फोटू डकवतेच. इथे पैशाला पन्नास झाडे आहेत त्याची Happy

दिनेश, विशालच्या आंबोलीच्या फोटोंमध्ये कळलावीच्या खालची पिवळी फुले कसली आहेत?? मला त्यांचीच आठवण आलेली वरचा पहिला फोटो पाहुन...

कैलास यांनी टाकलेल्या फोटोत ज्या बिया आहेत त्यांना लहानपणी आम्ही "कावळ्याच्या भाकरी" म्हणायचो. >>
चिंगी, आम्ही त्याला चिमणीची भाकरी म्हणायचो. Happy

हो टिकोमाच तो. प्रतिभावान लेखक असेल तर किती छान वर्णन करता येते, त्याचे उदाहरण म्हणून मला डॉ. डहाणूकरांचे वर्णन आठवले. त्यांनी लिहिले होते हि फुले म्हणजे उंचावरच्या शिंक्यातले लोणी पळवण्यासाठी बाळगोपाळांनी रचलेली उतरंडच जणू. त्या गुच्छाला कसली शिस्त म्हणून नसते. प्रत्येक फूल (मूल) जागा मिळेल तिथे घुसायचा प्रयत्न करत असते.

आपल्याकडच्या पिवळ्या टॅबेबुयाचा पिवळा रंग पण खुपच तेजस्वी असतो. हे झाड मोठे असते, खोड खडबडीत. पाने पांढरट पिवळी.
हि झाडे बेळगावला भरपूर दिसतात. कोल्हापूरला पण आहेत. मुंबईत बघितल्याचे आठवत नाही. मुंबईत गुलाबी टॅबेबुया मात्र आहे. एक मोठे झाड, चेंबूरला डायमंड गार्डनच्या समोरच्या फूटपाथवर आहे.