भाषा कशी शिकावी?

Submitted by माबो वाचक on 11 April, 2024 - 03:03

माझे दहावी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. त्यानंतर ११वी व १२वी शास्त्र शाखा इंग्रजी मध्यमा मधून, व त्यानंतर ४ वर्षे अभियांत्रिकी अर्थात इंग्रजी माध्यमातून. मी “इंग्रजी” पाचवी ते १२वी अशी ८ वर्षे शिकलो. शाळेत असताना एलमेंटरी व intermediate या इंग्रजीच्या दोन परीक्षा दिल्या व पास झालो. इंग्रजी या विषयामध्ये मी कधीही नापास झालो नाही.
हे सर्व सांगण्याचे प्रयोजन हे कि, एव्हढे इंग्रजी शिकूनसुद्धा अभियांत्रिकी संपल्यानंतर मला इंग्रजीमध्ये जुजबी संभाषणसुद्धा करता येत नव्हते. हे असे का? हा प्रश्न मला बरीच वर्षे छळत होता व गेल्या काही वर्षात त्याचे उत्तर सापडले. ते असे कि - मी एव्हढी वर्षे इंग्रजी हा विषय शिकलो, इंग्रजी भाषा नाही.
तर या निमित्ताने द्वितीय भाषा कशी शिकावी? हा प्रश्न पडला. यामध्ये काय करावे व काय करू नये याबद्दल माझे विचार मांडत आहे.

सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे कि भाषा हे कौशल्य आहे व ते कौशल्याप्रमाणेच शिकले पाहिजे. जसे कि सायकल चालविणे. कौशल्यामध्ये सरावाने सुधारणा होते. इतर विषय कि ज्यामध्ये माहिती,नियम,पद्धती असतात त्याप्रमाणे भाषा शिकून चालणार नाही.

लहान मूल त्याची मातृभाषा कशी शिकते हे पाहिल्यास काही उत्तरे सापडतात. लहान मूल त्याचा पहिला शब्द बोलण्याअगोदर त्याने अनेक वेळा तो शब्द ऐकलेला असतो. तसेच लहान मुले अतिशय सोपे व छोटे शब्द पुन्हा पुन्हा बोलतात. हळूहळू त्याचे रूपांतर छोट्या वाक्यांमध्ये होते. व त्यानंतर मोठी वाक्ये बोलली जातात. हे सर्व शब्द व वाक्य त्यांनी ऐकलेली असतात. हे सर्व होण्यास काही वर्षांचा कालावधी जातो. या कालावधीमध्ये मुलाच्या कानावर सतत त्याच्या मातृभाषेतील शब्द व वाक्य पडत असतात. म्हणजे कोणतीही भाषा शिकण्यासाठी त्या भाषेतील शब्द व वाक्ये सतत कानावर पडावे लागतात. ऐकणे ही नवीन भाषा शिकण्याची पहिली पायरी आहे. त्यानंतर बोलणे. ते सुद्धा दैनंदिन व्यवहारातील ऐकलेले व छोटे शब्द पुन्हा पुन्हा बोलणे. त्यानंतर छोटी वाक्य पुन्हा पुन्हा बोलणे. यातून मेंदूचा भाषा कौशल्याचा सराव व विकास होतो. यामुळे मनातील विचार व भावना भाषेद्वारे सहज प्रकट होतात त्यासाठी जाणून-बुजून प्रयत्न करावे लागत नाहीत. (म्हणजे मातृभाषेत विचार करून त्याचे भाषांतर करावे लागत नाही.)
भाषा बोलण्याचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाल्यावरच त्या भाषेतील मुळाक्षरांची ओळख व्हावी. व त्यानंतर ती भाषा वाचण्यास व लिहिण्यास शिकता येईल.

पुनरावृत्ती - कोणतेही कौशल्य शिकण्यातील महत्वाचा भाग म्हणजे ती गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. म्हणजेच सराव करणे. सरावाने सहजता येते. सरावामुळे मेंदूतील न्यूरल पाथवेज ताकदवान होतात. म्हणून भाषा शिकताना ती भरपूर बोलली पाहिजे.

भाषेचे नियम अर्थात व्याकरण - ज्यांना एखाद्या भाषेचा सखोल अभ्यास करायचा आहे त्यांनी व्याकरण शिकावे. परंतु दैनंदिन व्यवहारात बोलण्यासाठी भाषा शिकताना व्याकरण शिकायची काय गरज? भाषा हे कौशल्य आहे, जे सरावाने येते. केवळ नियम माहित करून नाही. किंबहुना त्यासाठी नियम माहित असण्याची गरज नाही. अगदी निरक्षर व्यक्ती सुद्धा त्याची मातृभाषा बोलू शकतेच कि. त्याला कोठे व्याकरण माहीत असते? उलट सुरुवातीला व्याकरण शिकणे हे अडथळा ठरू शकेल असे मला वाटते. कारण बोलताना ते व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे का याचा विचार मनात येऊन बोलण्याच्या सहज प्रक्रियेमध्ये बाधा येत असावी. जर लहान मुलांची मित्रमंडळी भिन्न भाषा बोलणारी असतील तर मुलेसुद्धा ते भाषा सहज शिकतात. तेथे व्याकरण शिकण्याची गरज नसते.

मी शाळेत हिंदी व संस्कृत हे विषय प्रत्येकी तीन वर्ष शिकलो. संस्कृत मध्ये व्याकरण व भाषांतर यावर प्रचंड भर होता. भाषा बोलता येण्याच्या अगोदरच व्याकरण व भाषांतर शिकणे चुकीचे आहे असे मला वाटते. आज मी कामचलाऊ हिंदी बोलू शकतो परंतु संस्कृत मध्ये मात्र मला एकही वाक्य बोलता येत नाही. मला हिंदी येण्याचे कारण म्हणजे हिंदी भाषा टीव्ही, सिनेमा, व्यवहार इत्यादी मध्ये कानावर पडते व बोलण्याची गरज भासते. त्यामुळे ऐकणे व बोलणे या क्रिया घडल्या. जे संस्कृतच्या बाबतीत घडले नाही.

माझ्या मते मुले इंग्रजी शिकत असताना उच्चार व स्पेलिंग यांच्या अचूकतेबद्दल अति आग्रही असू नये. त्यामुळे मुलांच्या उत्साह व आनंदावर विरजण पडते व तसेच त्यांचा फोकस या गोष्टी अचूक करण्याकडे जातो. त्यामुळे भाषेच्या माध्यमातून व्यक्त होण्याकडे दुर्लक्ष होते. उच्चार व स्पेलिंग कालांतराने आपोआप (ऐकणे व वाचणे या प्रक्रियेद्वारे अनुक्रमे) सुधारतात.

मला इंग्रजी सुधारण्यासाठी बातम्या ऐकणे व पुस्तके वाचणे हा सल्ला मिळाला होता. परंतु ते करून सुद्धा माझे संभाषणातील कौशल्य सुधारले नाही. कारण बातम्या मधील इंग्रजी हे दैनंदिन जीवनात उपयोगी नव्हते. व केवळ वाचल्यामुळे बोलायला येत नाही.
मी इंग्रजी सिनेमे व टीव्ही सिरीज पाहायला चालू केल्यानंतर आणि कामाच्या ठिकाणी ऐकायला व प्रत्यक्ष बोलायला चालू केल्यानंतर माझ्या इंग्रजी संभाषण कौशल्यात सुधारणा झाली.

केवळ इंग्रजी माध्यमात शिकल्याने इंग्रजी संभाषण कौशल्य येत नाही. जर त्या शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थी इंग्रजीमध्ये बोलत असतील तरच त्याचा उपयोग होतो (जसे कि कॉन्व्हेंट शाळांमध्ये). माझा एक मित्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकला होता पण तिथे शिक्षक व विद्यार्थी आपापसात मराठीतच बोलत. त्यामुळे त्याचे इंग्रजी संभाषण कौशल्य माझ्याइतकेच कच्चे होते. अशा इंग्रजी माध्यमात शिकल्याने इतर विषयांच्या आकलनावर मात्र विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच ठेवणे व मुलांना मौखिक इंग्रजी संभाषण उत्तम प्रकारे शिकवणे.

सारांश - तर माझ्या मते, नवीन भाषा शिकताना सर्वप्रथम ती बोलण्यास शिकावी. त्यासाठी त्या भाषेतील दैनंदिन व्यवहारातील शब्द व वाक्ये भरपूर प्रमाणात कानावर पडावीत. त्याचबरोबर, ते शब्द व वाक्ये पुन्हा पुन्हा बोलून त्यांचा सराव व्हावा. आणि हे जर इंग्रजीच्या बाबतीत शैक्षणिक अभ्यासक्रमात करता आले, तर मुलांचे इंग्रजी संभाषण कौशल्य खूपच सुधारेल असे वाटते.

तळटीप : लेख लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे व लेख विस्कळीत झाला आहे याची जाणीव आहे. लेख लिहून झाल्यावर आता असे वाटते कि यात मी नवीन किंवा वेगळे काहीच सांगितले नाही, पण तरीही लिहिण्याचे कष्ट घेतल्याने माबो वर प्रकाशित करत आहे. Happy
डिस्क्लेमर : लेखातील विचार हे वैयक्तिक आहेत व अनुभवातून आले आहेत. माझ्याकडे "भाषा" किंवा "शिक्षण" या क्षेत्रातील औपचारिक शिक्षण नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. बर्‍याच मुद्द्यांशी पूर्णपणे सहमत आहे. विशेषतः <<भाषा बोलता येण्याच्या अगोदरच व्याकरण व भाषांतर शिकणे चुकीचे आहे असे मला वाटते>> अगदीच! आपल्याकडे संस्कृत अगदी चुकीच्या पद्धतीने शिकवली जाते. त्यामानाने टिमविची पद्धत बरी आहे.

वेगळ्या विषयावरचा लेख. छान...
भाषा आधी ऐकाव्या, बोलाव्या मग व्याकरण शिकावे हे (संस्कृतचा अपवाद सोडल्यास) मला पटते.
स्पेलिंगवर भर देऊ नये हे ठीक पण उच्चार सुधारले पाहिजेत.दोन्ही कच्चे राहिले तर भाषा शिकणे कठीण.

संस्कृत समजण्यासाठी मात्र व्याकरण शिकणे महत्वाचे आहे. कारण संधिविग्रह जमला नाही तर ऐकलेल्या गोष्टीचा अर्थ लागणे व बोलणे हे दुरापास्त आहे.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद.
@हपा, हे "टिमवि" काय आहे? आणि त्यांची शिकवायची पद्धत काय आहे?
@ MazeMan, तुमचे थोडेफार पटू लागले आहे. तसेही संस्कृत आता बहुतांशी बोलली जात नाही. माझ्या माहितीप्रमाणे तिचा उपयोग जुने ग्रंथ वाचण्यासाठी केला जातो. (आयुर्वेद, इत्यादीमध्ये) त्यामुळे कदाचित व्याकरणावर जास्त भर देऊन शिकवीत असतील.
<<<< उच्चार सुधारले पाहिजेत.दोन्ही कच्चे राहिले तर भाषा शिकणे कठीण. >>>> मान्य. परंतु भाषा पुरेशा प्रमाणात ऐकली गेली तर उचार आपोआप सुधारतात. चुका काढल्या तर रसभंग होण्याची शक्यता असते, विशेषतः लहान मुलांमध्ये हा माझा मुद्दा होता. Happy

चुका काढल्या तर रसभंग होण्याची शक्यता असते>>>
हे खरं आहे. चुका दाखवताना डिस्करेज न करणं हे एक स्किल आहे.

चांगला लेख. बरेच मुद्दे पटले. संस्कृत शिकताना व्याकरणाचा फार बोजा होतो. म्हणून हलली संभाषण वर्ग घेतात बरेच ठिकाणी. हरपा, टिमवी मध्ये पण संभाषण कमीच असते. ( मी शिकलो तेंव्हा तरी). त्याचा एक साचा आहे सुभाषितमाला, काही नाटकातले उतारे, काही पंचतंत्र गोष्टी.. चित्र रुपी तर नसायचेच काही. म्हणजे दोन मुले आहेत आणि त्यांच्यात गप्पा, वस्तू , फळे, फुले त्यांची नावे , एकवचन अनेकवचन , जवळ- लांब- वर- खाली ई काही नसे. एकदम देव वन माला पासून सुरू. रस निर्माण होण्यासाठी आधी छोटी वाक्ये बोलता यायला हवीत. तुझ नाव काय? कुठे राहतोस? वय काय? आवडी काय? असे बोलता यायला हवे. ह्यावर भर द्यायला पाहिजे. AF Pune ला फ्रेंच शिकताना आम्हाला नंदिता वागळे म्हणून मॅडम होत्या. त्या फ्रेंच मराठी (फ्रेंच इंग्रजी ऐवजी) असे शिकवत बरेचदा. धमाल येत असे. छोटे उदाहरण.. volte - face हा फ्रेंच शब्द बरेच वेळा इंग्रजी दैनिक वापरतात. मराठी प्रतिशब्द काय तर घूमजाव Happy
Sanglot असा एक शब्द आहे ज्याचा मराठी प्रतिशब्द आहे हुंदका Happy तिथेच माधुरी पुरंदरे पण होत्या शिकवायला. त्या पण असेच शिकवत. त्या तर एकाच शब्दाला इतके प्रतिशब्द सांगत फारच मजा येत असे. आणि चर्चा वादविवाद घडवून आणत.. भाषेपलीकडे जाऊन ह्या दोघी जी बौद्धिक घेत एकदम लाजवाब. विचार करायला, विचार फ्रेंच भाषेत मांडायला प्रवृत्त करत. जे भाषा शिकताना फार महत्त्वाचे आहे.

अरे वा कसला पहिला प्रयत्न.. छान लेख लिहिला आहे.

आपल्याकडे शाळेत संस्कृत भाषा शिकवायचेच नाहीत.. तो फक्त एक स्कोरिंग सब्जेक्ट होता. ज्यात रट्टा मारणे अपेक्षित होते. आमच्या शाळेत हुशार मुलांच्या दहावी अ वर्गाला पूर्ण संस्कृत शिकवायचे. रट्टा मारायला हुशार मुले कशाला पाहिजे हा प्रश्न आता पडतो.

मला पूर्ण संस्कृत असल्याने हिंदीत काय शिकवायचे कल्पना नाही. पण मी हिंदी शिकलो ते बॉलीवूडमुळे आणि मुंबईकर असल्याने..

सध्या इथल्या इंग्लिश शाळेत सुद्धा हिंदी मराठी दोन्ही विषय सुरुवातीपासून कंपल्सरी आहेत. माझी बायको हिंदी मराठी ट्युशन घेते. बहुतांश मुले अमराठी आहेत. मजेशीर किस्से घडत राहतात. बरेच जणांचा कल भाषा शिकण्यावर नसून परीक्षेपुरता रट्टा मारण्यावरच असतो. तरी बायको प्रयत्न करते की त्यांनी तसे करू नये आणि भाषेला समजून घ्यावे.. पण त्यांच्या पालकांना सुद्धा गुण किती मिळतात यातच रस असतो. त्यामुळे निबंध सुद्धा लिहिले जात नाहीत तर पाठ केले जातात.

लेख छान आहे.

लंपन, माधुरी पुरंदरे.. शिक्षिका होत्या तुम्हाला... वाह

संस्कृत स्कोरिंग सब्जेक्ट होता. >>>खर आहे

ज्यात रट्टा मारणे अपेक्षित होते. >>> विभक्ती प्रत्यय पाठ करणे आलेच न?

MazeMan, लंपन, ऋन्मेऽऽष, उपाशी बोका - प्रतिसादांबद्दल धन्यवाद. या विषयावर चांगली चर्चा येथे घडून येत आहे.
<<< चुका दाखवताना डिस्करेज न करणं हे एक स्किल आहे.>>> खरं आहे. आत्मस्तुतीचा रोष पत्करून सांगतो - माझ्याकडे शेजारची मुलगी गणित शिकायला यायची. पहिली व दुसरीत असताना. तिला मी कायमच पैकीच्या पैकी मार्क द्यायचो. जर गणित चुकले असेल, तर ते दुरुस्त करायला लावून.
<< .. तो फक्त एक स्कोरिंग सब्जेक्ट होता. >> खरे आहे. मलाही दहावीला संस्कृतमध्ये ९० पेक्षा जास्त मार्क होते. पण एकही वाक्य बोलता येत नाही. आता इतक्या वर्षानंतर समजतहि नाही.
<<< त्या तर एकाच शब्दाला इतके प्रतिशब्द सांगत फारच मजा येत असे.>>> जर इतके प्रतिशब्द एकाच वेळी शिकले, तर ते लक्षात राहतात का?

संस्कृत ही मृत भाषा आहे, ती शिकून (जास्त गुण मिळतील हे वगळता) काहीही उपयोग नाही. जास्तीची भाषा शिकायचीच असेल तर माझी पसंती स्पॅनिश आणि चायनीज (मंडारीन, कॅन्टोनीज) या भाषांना.

संस्कृत ही मृत भाषा आहे, ती शिकून (जास्त गुण मिळतील हे वगळता) काहीही उपयोग नाही. >>>
मैत्रिणीची बहीण बी ए एम एस डॉक्टर आहे. ती शिकत असताना संस्कृत वापरते म्हणाली होती.
संस्कृत बोलता आले तर वाणी शुद्ध होते, जीभ जड होत नाही. हा एक प्रॅक्टिकल फायदा जाणवतो मला. आदि शंकराचार्यलिखित स्तोत्रे वगैरेंना एक नाद असतो. कधी आळसावल्यासारखे वाटत असताना ती स्तोत्रे म्हटली तर फ्रेश वाटते.
बाकी जागतिक रोजगाराच्या संधी प्राप्त करून घेण्यासाठी ज्या भाषेची चालती आहे किंवा जी डिमांडमध्ये येऊ शकते ती भाषा शिकण्यात काही गैर नाही.

लेख पूर्णपणे पटला.
कॅनडात मुलांना इंग्रजी शिकवताना तुम्ही लिहिलंय तसच थोडफार शिकवतात. सुरुवातीला उच्चाराप्रमाणे स्पेलिंग लिहा सांगतात. चुकीचं असेल तरी चालेल, पण काय ऐकू येतं तसं लिहा. आणि बोलणे आणि वाचनावर भर देतात. जे आपल्याकडे त्या काळी तरी अगदीच दुर्लक्षिलेले असे.

बरेच प्रतिसाद शाळेतल्या भाषा एक विषय याबद्दल आहेत. लेखकांची अपेक्षा भाषा बोलता येणे याबद्दल आहे.
_____________________
१)चुकीचे लोक मार्गदर्शन करणारे भेटतात हीच मोठी गोची आहे. इंग्रजी भाषेसाठी तरी. नंतर फार उशीर होतो.
२) भाषा उचलता आली पाहिजे. व्याकरण घोटून आणि रेटून येत नाही.
३) जरा चांगले योग्य उच्चार केले तर "काय रे फारच फाडफाड बोलतोस" किंवा "सायनाच्या **** ******** ****? अशी टिंगलखोर लोकं आणि मित्रही असतात.