ओळख

Submitted by पॅडी on 8 March, 2024 - 02:34

एकाच घरात राहतो तरी, तिचानमाझा छत्तीसचा आकडा
मला शेजारतीची घाई, तिच्या चित्तात जागता काकडा

टिकत नाही घरात नजर, बाहेर शोधतो काहीबाही
तिचा प्रवास उगमाकडे; पण काडीचेही कौतुक नाही

म्हटले: अफाट आभाळ बघ, शोषून घे अथांग प्रकाश
म्हणाली: ह्यात विशेष काय? आत डोकवायचा अवकाश

उधाण उडाण मी क्षीरसागर, खेळतो भाळतो लाटांवर
तिच्या मौनाची अदभूत गाज, चुकूनही नसते काठावर

मारतो मांडी; मुडपतो ओठ, शब्द गिरवतो लळीवाळे
कौतुक सोडाच, म्हणते कशी: कित्ती करशील कागद काळे..?

तिचा न माझा छत्तीसचा आकडा, एकाच घरात राहतो जरी -
तिच्याच सानिध्यात ओळख होईल, माझी मलाच कधीतरी...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults