मोबाईलच्या गावात

Submitted by बिपिनसांगळे on 4 February, 2024 - 08:25

मोबाईलच्या गावात
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

फाईव्ह जी मोबाईल खेळत होता. तो गेम खेळण्यात एक्सपर्ट होता. त्याची बोटं पटापट चालायची . पण ते खेळताना . लिहिताना नाही . तो पुढच्या-पुढच्या लेव्हलला चालला होता. त्या गेममध्ये राक्षस होता. अक्राळविक्राळ प्राणी होते. आणि मधूनच आग ओकणारे सर्पही !

त्याचं नाव राजू होतं. पण तो सारखा मोबाईल खेळतो म्हणून त्याचे मित्र त्याला फाईव्ह जी म्हणत.त्याला मोबाईल गेम्सचं वेड लागलं होतं. प्रचंड वेड ! तुमच्यासारखंच . आईने हाक मारलेलीही त्याला कळत नसे . सारखा मोबाईल खेळतो म्हणून आई त्याला रागवायची . पण राक्षसाच्या संकटापुढे आईचं रागवणं म्हणजे किरकोळ गोष्ट .

त्याने स्क्रीनवरच्या राक्षसाला चुकवलं . पण - तो पुढे आलाच… अन… अरे बापरे ! वेगळंच काहीतरी घडलं . ज्याची त्याने कधी अपेक्षाही केली नव्हती.

त्या राक्षसाचा हात स्क्रीनमधून बाहेर आला. भला दांडगट, केसाळ , काळा कुळकुळीत. त्याने फाईव्ह जीला धरलं व आत ओढून नेलं. स्क्रीनच्या आत. त्याची शुद्ध हरपली.

जेव्हा त्याने डोळे उघडले, तो वेगळ्याच ठिकाणी होता. सारंच अनोळखी होतं . आजूबाजूला नुसतं पठार. हिरव्यागार गवताचं. एका बाजूला दरी. तो एका डोंगरावर होता. सकाळची वेळ. स्वच्छ प्रकाश. तो चालत दरीच्या बाजूला आला. खाली नदी होती. निळ्याशार पाण्याची. चमचमणारी . हिऱ्यामोत्यांची. पलीकडे एक गाव होतं.

तो बघत उभा राहिला. काय शांतता होती तिथे. बापरे! भीती वाटेल एवढी. एक माणूस नव्हता. कसलाही आवाज नव्हता. पक्ष्यांची किलबिलही नव्हती.

त्याला एकदम एकटं वाटलं. घाबरल्यासारखं वाटलं. आता काय करायचं? घरी कसं परत जायचं ? आणि आई ?... त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.

“ रडू नकोस,” एक आवाज आला.

डोंगराच्या पायवाटेवरून एक मुलगा वर येत होता. त्याच्याच वयाचा. स्मार्ट. फाईव्ह जीला जरा बरं वाटलं.

तो मुलगा जवळ आला. म्हणाला,” काय? राक्षसाने आत ओढलं ना? “

फाईव्ह जीला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला,” हो. पण तुला कसं कळलं? “

तो मुलगा म्हणाला,” मला सगळं कळतं. कारण मी सिक्स जी आहे! “

त्यावर राजू हसला आणि त्याला आश्चर्यही वाटलं .

तो मुलगा पुढे म्हणाला,” हे खाली गाव दिसतंय ना, ते मोबाईलचं गाव आहे. तिथे सगळे मोबाईलवेडे राहतात. त्या सगळ्यांना तुझ्यासारखंच पकडून आणलंय. शिक्षा म्हणून. कारण ते हातातून मोबाईल जराही सोडत नव्हते. सारखा मोबाईल . प्रत्येक गोष्टीला मोबाईल . नाहीतर गेम्स . हातात तो नसला तर वेड लागायचं यांना . हे गाव नाही. हा एक तुरुंग आहे. इथून बाहेर परत जाता येत नाही. शिक्षा एकच- इथे मोबाईलच नाही ! "

" मग ? आता कसे राहत असतील ? "

" कसे म्हणजे ? वेड्यासारखे वागतात आता . पण सुधारतील हळूहळू . "

हे भयंकर होतं . आणि आता राजूही तिथेच ...

सिक्स जी एक बोट सारखं हवेतच सरकवत होता. स्क्रोल केल्यासारखं. म्हणजे तो पण...

म्हणे मोबाईलचं गाव ! असं कसं ? गावात तर एकही मोबाईलच नाहीये. सगळे मोबाईल गेले कुठे ? हे एक कोडंच होतं .

तेवढ्यात दाणदाण आवाज यायला लागला. तो गेममधला राक्षस येत होता. त्याला पाहताच सिक्स जीचा चेहरा बदलू लागला . तो एकदा मित्रांसारखा , एकदा बाईंसारखा तर एकदा आईसारखा दिसू लागला .
मग तो अदृश्यच झाला. पुन्हा फाईव्ह जी एकटाच ! राक्षसाच्या तावडीत ! अन - स्क्रीनवर पाहणं वेगळं आणि प्रत्यक्षात पाहणं वेगळं .

तो राक्षस महाभयंकर होता . जीवाला धडकी भरवणारा .

राक्षसापासून वाचण्यासाठी राजू पळू लागला. डोंगर संपला. तो एका कडयावर पोचला . खाली दरी. दरीमध्ये नदी .आणि ती नदी अचानक चमचमू लागली. नदीमध्ये हिरेमोती नव्हते, तर फेकलेले मोबाईल होते. अनेक मोबाईल. पकडून आणलेल्या लोकांचे. जप्त केलेले स्मार्ट फोन्स. त्यांचे स्क्रीन्स आता आधीपेक्षा जास्त चमकू लागले होते . का बरं ? कोणास ठाऊक ? त्यांच्या स्क्रीनचा प्रकाश त्याला असह्य झाला. आता त्याला कळलं , मोबाईलच्या गावातले मोबाईल कुठे आहेत ते. त्या नकोशा प्रकाशामुळे त्याच्या डोळ्यांवर अंधारी आली . त्याला चक्कर आली आणि तो खाली पडला. उंच कड्यावरून खाली . हवेत एखादं भिरभिरं फिरल्यासारखं ! मोबाईलच्या नदीत. तिथे एकापेक्षा एक भारी मोबाईल होते. पण- आता त्याला एकही मोबाईल नको होता.

तो ओरडला, “ आई.”

आईचा प्रेमळ आवाज आला,” राजू, काय झालं रे ? घाबरलास का ? “

त्याने डोळे उघडले. तो त्याच्या घरात होता. पलंगावर. समोर आई होती. त्याला स्वप्न पडलं होतं… त्याने आईला स्वप्न सांगितलं.

त्यावर आई म्हणाली,” पाहिलंस ना, सारखा मोबाईल खेळतोस म्हणून अशी स्वप्न पडतात. अरे,तिथे तुला पक्षीही दिसले नाहीत. कारण रेडिएशन. तिथल्या नदीत किती मोबाईल होते. ते रेडिएशन पक्ष्यांना सहन होत नाही. ते त्यापासून लांब जातात . आणि आपण ? ... आणि ते तर स्वप्न होतं; पण इथे आपल्या जगात काय ? अख्ख जगच मोबाईलचं गाव झालंय. आणि इथे शिक्षा एकच, सारखा मोबाईल घेऊन बसायचं. पण हे बरोबर आहे का ? मी सारखी मोबाईल घेते का ?”

हे मात्र राजूला पटलं. तो म्हणाला, “ अजिबात नाही ! मोबाईलच्या राक्षसाला आपणच हरवायला पाहिजे आता. “

तेवढ्यात आई बाहेर बघून ओरडली, राजूच्या बाबांना, “अहो, तो मोबाईल जरा बाजूला ठेवा आणि पटकन आवरून घ्या “.

त्यावर राजूला हसू आलं .

ते बघून आई म्हणाली , “ हो रे . सुरुवात बाबांपासून !”

मग तो म्हणाला , “ हं ! अन शेवट मी .”

मित्रांनो , तुमचं काय ?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळ्यांसाठी

आणि आजच्या गटग निमित्त खास

पियू आणि अतरंगी यांच्या बच्चे कंपनीसाठी

मस्त आहे कथा...
लहान मुलांना आवडेल अशी.. आणि त्यांनी वाचावी अशी..
सगळ्यांनाच रीलेट होईल

छान आहे. Srd +1
आजीआजोबासुद्धा मोबाईलच्या नादी लागलेत!

आजीआजोबासुद्धा मोबाईलच्या नादी लागलेत!
Lol
हसण्यासारखे नसेल हे पण खरे आहे..
ज्यांच्या हाती मोबाईल साठ सत्तर वयाचे झाल्यावर आला ते सुद्धा या व्यसनात अडकले आहेत.

वाचक मंडळी खूप आभारी आहे .
छोट्या वयोगटाची आहे . पण ती त्यांच्यापर्यंत जास्त पोचावी , असं वाटतं

वाचकांचे पुन्हा आभार

नुकती एक मुलाखत पाहिली .
त्यामध्ये तो सांगत होता

माझी आई वयस्कर आहे आणि ती सतत मोबाइल घेऊन बसते . मला तो काढून घ्यावासा वाटत नाही कारण तो तिचा मुख्य टाइमपास आहे .
अवघड झालंय आता !